Monday, March 10, 2014

कलावंत नेहमी आतून अस्वस्थ असायला हवा - विजया मेहता (मी घेतलेली मुलाखत) ( दै. दिव्य मराठी - १ फेब्रुवारी २०१४)

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे ९४ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलन ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली १ व २ फेब्रुवारी २०१४ रोजी पार पडले. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांची विशेष मुलाखत मी वृत्तपत्रासाठी घेतली होती. ही मुलाखत दै. दिव्य मराठीच्या १ फेब्रुवारी २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. ती पुढे दिली आहे.

---------
कलावंत नेहमी आतून अस्वस्थ असायला हवा - विजया मेहता
---------
(मुलाखत - समीर परांजपे)
------


---------
कलावंत नेहमी आतून अस्वस्थ असायला हवा - विजया मेहता
---------
(मुलाखत -समीर परांजपे)
------
पंचम निषाद या संस्थेच्या वतीने येत्या 11 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील रवींद्र नाटय़मंदिरच्या मिनी थिएटरमध्येमॅजिक मुव्हमेन्टस् सर्च बाय ए परफॉर्मर - ऍन एन्काऊन्टर विथ विजया मेहताही पाच दिवसांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तुम्ही मुंबईमध्ये खूप वर्षांनी मराठीतून रंगभूमीविषयक कार्यशाळा घेत आहात...
विजया मेहता - मुंबईत मी खूप वर्षांनी मराठीतून रंगभूमीविषयक कार्यशाळा करते आहे हे खरे आहे. मात्र गेल्याच वर्षी गोव्यामध्ये मी मराठीतून अशी कार्यशाळा केली होती. पण त्या आधी संगीत अकादमी, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्, पीटर ब्रुक्स यांच्या बरोबर काम करीत असताना मी रंगभूमीविषयक कार्यशाळा घेण्यासाठी  देशभर फिरत होते. मुंबई, भोपाळ, दिल्ली अशा अनेक ठिकाणी मी कार्यशाळा घेतलेल्या होत्या. अर्थात या कार्यशाळा मराठी भाषेतून नव्हत्या हेही वेगळे सांगायला नको. ज्या रंगभूमीवर मी दिग्दर्शक, नटी म्हणून वावरले त्या काळात माझ्या बरोबर काम करताना एक पिढी प्रशिक्षित झाली. आता मी घेत असलेल्या रंगभूमीविषयक कार्यशाळेत मला ज्युनिअर असलेली पिढी व आताची नवी पिढी अशा दोन्ही पिढय़ा सहभागी होत आहेत. माझ्या नंतरची पिढी व आताच्या नव्या पिढीची कामाची पद्धत वेगळी आहे. रंगभूमीविषयक कार्यशाळेत या दोन्ही पिढय़ांबरोबर वावरताना माझेही प्रशिक्षण होईल. दोन पिढय़ांच्या कामाच्या पद्धतीत, वातावरणात खूप फरक पडला आहे असे म्हटले जाते. पण मला ते फारसे पटत नाही. कारण कोणतीही कला सादर करताना आपल्या कामाचे नेमके स्वरुप काय? आपण हे कोणासाठी करतोय? हे ठरवून घेणे आवश्यक असते. आपला प्रेक्षक नेमका कोण आहे हे ठरविणे आवश्यक असते. तो तुमचा फोकल पॉईंट असायला हवा. कलेवर मनापासून नितांत प्रेम करा, पण कला सादर करताना स्वत:च्या प्रेमात पडू नका. नाटक करणारा असो वा कोणतीही कला सादर करणारा तो आतमधून नेहमी अस्वस्थ असला पाहिजे. ही अस्वस्थता आपल्याला नवे काही शोधण्यासाठी प्रेरित करते. त्याचबरोबर आपल्याला जी कलाकृती वा नाटक सादर करायचे आहे त्याची योग्य पूर्वतयारी करायला हवी. वेळेचे योग्य नियोजन करायला हवे. अशा पद्धतीने काम करण्यासाठी पिढी नवी की जुनी हा प्रश्न उद्भवत नाही. रवींद्र नाटय़मंदिरमध्ये होणाऱया रंगभूमीविषयक कार्यशाळेत विक्रम गोखले, सुहास जोशी, नीना कुळकर्णी, रिमा लागू, वंदना गुप्ते, विजय केंकरे, मीना नाईक, स्वाती चिटणीस, अश्विनी एकबोटे व नवीन पिढीतील कलाकारही सहभागी होत आहेत.
नवीन पिढीची काम करण्याची पद्धत खूप घाईगर्दीची झाली आहे....
मला नव्या पिढीतले सांगतात की आम्हाला कामाची खूपच गडबड असते. मालिकेचे चित्रीकरण करताना संवाद अगदी आयत्यावेळी हातात मिळतात, सराव करायला थोडा वेळही मिळत नाही. सारे काही धावपळीतच करावे लागते. काही वर्षांपूर्वी मी लाईफलाईन नावाची एक मालिका दिग्दर्शित केली होती. या मालिकेमध्ये रोजचे चित्रीकरण करताना आम्ही 84 माणसे अत्यंत काटेकोरपणे व व्यवस्थित पूर्वनियोजन करुन काम आटपत होतो. कुठेही कसलाही गोंधळ होत नसे, आयत्यावेळची धावपळ नसे. याचे कारण चित्रीकरण सुरु होण्याच्या आधी काही दिवस आम्ही मालिकेचे चित्रीकरण नेमके कशा पद्धतीने करायचे आहे याचे चोख नियोजन केलेले असायचे. वेळेचा सदुपयोग केल्याने आमचे कामही उत्तम होत असे. नव्या पिढीने या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
कलाक्षेत्रात रेनेसाँमध्ये चढउतार येत असतात असे ब्रिटिश स्कॉलर केनेथ टायनन यांनी म्हटले होते. इंग्लंड, युरोपमध्येही पहिल्यांदा टीव्ही आला. त्यावेळी आता लोकांचा कल घरी बसून करमणूक करुन घेण्याकडेच असेल, कोणीही फारसे थिएटरमध्ये नाटक पाहायला फिरकणार नाही असे म्हटले जात होते. मात्र टायननने त्यावर असे सांगितले की, घरात टीव्ही बघत बसून होणाऱया करमणुकीलाही लोक एक दिवस कंटाळतील. पुन्हा ते तिकिटे काढून थिएटरमध्ये नाटक पाहायला जाण्यास प्रारंभ करतील. टायननचे हे शब्द खरे ठरले. असे चढउतार कलेच्या प्रांतात येतच असतात. रंगभूमीही त्याला अपवाद नाही.
पंढरपूर येथे होत असलेल्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या दीर्घ नाटय़ानुभवाविषयी सांगा...
अरुण काकडे यांचे रंगभूमीशी मनस्वी नाते आहे. रंगायन ही संस्था 1960 साली सुरु झाली. पण त्याच्या आधी पाच वर्षांपासून मी व अरुण काकडे यांनी रंगभूमीविषयक कामांना प्रारंभ केला होता. त्या वेळेपासून काकडे यांची रंगभूमीविषयीची तळमळ मी अनुभवलेली आहे. नाटक सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी काकडे करीत असलेली धावपळ, धडपड ही सारी आतून आलेली असते. रंगायतनला ही त्याचा मोठा फायदा झाला. पुढे रंगायतन फुटली. त्यानंतर अरुण काकडे हे आविष्कार नाटय़संस्थेत सक्रिय झाले. तिथेही त्यांनी आजवर झपाटलेपणाने काम काम केले आहे. हे झपाटलेपण हीच अरुण काकडे यांची शक्ती आहे. पंढरपूरला होत असलेल्या नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण काकडे यांची निवड झाल्याची बातमी ऐकली त्यावेळी मला अतिशय आनंद झाला होता.

-------------

No comments:

Post a Comment