Sunday, March 23, 2014

यशवंतरावांच्या कार्याने भाषाविकास - दिव्य मराठी - १३ जानेवारी २०१३






चिपळूण येथे १२, १३, १४ जानेवारी २०१३ रोजी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातयशवंतराव चव्हाण यांचे विचारविश्व व आजचा महाराष्ट्रया विषयावर हा परिसंवाद आयोजिण्यात आला होता. त्या परिसंवादाची मी केलेली बातमी दै. दिव्य मराठीच्या १३ जानेवारी २०१३ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.

यशवंतरावांच्या कार्याने भाषाविकास - प्रा. दीपक पवार यांचे प्रतिपादन

- समीर परांजपे
- यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण)

महाराष्ट्र हा मराठय़ांचा नाही तर मराठी माणसांचा म्हणूनच ओळखला जाईल, अशी ग्वाही यशवंतराव चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र एकत्र राहिला पाहिजे या भावनेने यशवंतराव चव्हाण यांनी कायम काम केले. भाषा विकासासाठी यशवंतराव चव्हाण यांनी जितके मोलाचे काम केले तितके काम त्यांच्यानंतरच्या एकाही नेत्याने केले नाही. यशवंतरावांचा अपवाद वगळता महाराष्ट्राचे गेल्या ५० वर्षांत इतर नेत्यांनी इतक्या मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले आहे की त्याचे दुष्परिणाम भावी पिढय़ांना भोगावे लागत आहेत, असे प्रतिपादन प्रा. दीपक पवार यांनी आज येथे केले.
साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात स्व. बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर पार पडलेल्या परिसंवादात ते बोलत होते. ‘यशवंतराव चव्हाण यांचे विचारविश्व व आजचा महाराष्ट्रया विषयावर हा परिसंवाद आयोजिण्यात आला होता.
प्रा. दीपक पवार पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या विकासाकरिता यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, भाषा संचालनालय या तीन गोष्टी स्थापन केल्या. या तीन संस्थांवर त्यांनी तज्ञ माणसे नेमली. पण यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर या संस्थांची दुरवस्था झाली आहे. अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगायचे या तीनही संस्था मरणपंथाला लागलेल्या आहेत. राज्य मराठी विकास संस्थेची नंतर स्थापना झाली, पण आज तिचे कार्यालय एखाद्या खुराडय़ासारखे कोंबण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नव्याने स्थापन झालेल्या भाषा विभागाला आजवर तीन सचिव लाभले तरी त्याचे गाडे अद्यापही रुळावर यायला तयार नाही. हे सगळे चित्र लक्षात घेतले तर यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला वसा पुसून टाकण्याचे काम त्यांच्यानंतरचे राजकारणी करीत आहेत, असेही पवार पुढे म्हणाले.
या परिसंवादात बोलताना उल्हास पवार यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांनी नेहमीच सुसंस्कृत राजकारण केले. समाजातील तळागाळातल्या लोकांचे कल्याण व्हावे यासाठी त्यांनी सारी धोरणे आखली व निर्धाराने राबवली. यशवंतराव चव्हाण हे अभ्यासू राजकारणी नेते होते. त्यांचा ग्रंथसंग्रह तसेच व्यक्तिसंग्रहही खूप मोठा होता. त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध प्रकल्पांना चालना दिली. त्याचप्रमाणे संस्कृती, भाषा तसेच विज्ञान, उद्योगधंद्यांचा विकास कसा होईल यासाठीही यशवंतरावांनी ठामपणे प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व चौफेर विचार करणारे होते. त्यांनी महाराष्ट्रात जे काम केले त्यामुळेच हे राज्य प्रगतिशील म्हणून देशाच्या नकाशावर झळकते आहे.
याप्रसंगी बोलताना डॉ. . . जोशी म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाचे संस्कृतीकरण, संस्कृतीकरणाचे मूल्यसंवर्धन केले. राजकारणाला संस्कृतीचा चेहरा देण्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांनाच द्यावे लागेल. यशवंतरावांनंतर अशी कामगिरी करणारा एकही नेता आता महाराष्ट्रात उरलेला नाही, असे चित्र दिसते. समजा असे नेते असलेच तरी ते अनेक गोष्टींनी जखडले असल्याने ते यशवंतरावांसारखी कामगिरी करू शकत नाहीत. या वेळी शेषराव मोहिते नाना जोशी यांनीही यशवंतराव चव्हाण यांचे कार्य व्यक्तित्वाची थोरवी आपल्या भाषणांतून व्यक्त केली.

No comments:

Post a Comment