दादरला शिवाजी
पार्कजवळ असलेल्या सावरकर सदनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी
स्वा. सावरकरांची भेट याच सदनात घेतली होती. सावरकरांच्या वास्तव्याने पुनित
झालेल्या सावरकर सदनामध्ये सावरकरांशी संबंधित वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले. ते
कार्य स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केले. त्या वस्तुसंग्रहालयाविषयी माहिती
देणारा लेख मी सांज लोकसत्ता या सायंदैनिकात २८ मे १९९३ रोजी लिहिला होता. या
लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
सावरकर सदनातील
वैशिष्ट्यपूर्ण वस्तुसंग्रहालय!
- समीर परांजपे
दादरला शिवाजी
पार्कजवळ असलेल्या सावरकर सदनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. रत्नागिरीच्या
स्थानबद्धतेतून सुटल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथम दादरच्या गणेशपेठ
लेनमध्ये राहावयास आले. १९३८मध्ये सावरकर सदन बांधल्यावर ते तेथे राहावयास गेले.
१९३८च्या जून महिन्यापासून स्वा. सावरकरांच्या वास्तव्याने सावरकर सदनाला
राजकीयदृष्ट्याही महत्व प्राप्त झाले. सावरकरांनी येथेच अपले अखेरपर्यंत वास्तव्य
केले.
सावरकर सदनाच्या
महात्म्याविषयी स्वा. सावरकरांचे सुपुत्र विश्वास सावरकर यांनी सांगितले ` स्वा. सावरकरांनी हिंदुमहासभेचे सर्व राजकारण सावरकर सदनातूनच चालविले होते.
१९४०-४२च्या सुमारास नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांना भेटण्यासाठी खास या सदनात
आले होते. याच घरात स्वा. सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव व धाकटे बंधू नारायणराव
यांचेही १९३८ ते १९४२च्या दरम्यान वास्तव्य होते. अनेक राजकीय घडामोडींनी सावरकर
सदनाचा कोपरा न कोपरा भारावलेला असे. या सदनात स्वा. सावरकरांना भेटायला
येण्याच्या निमित्ताने क्रांतिकारक निरंजन पाल, अकाली दलाचे नेते सरदार तारासिंग,
हिंदी भाषेचे कोशकार डाँ. रघुवीर, सेनापती बापट इ. महनीय व्यक्तीही वेळोवेळी येऊन
गेल्या आहेत. आचार्य अत्रे यांनीही विधानसभेची निवडणुका जिंकल्यानंतर सर्वात प्रथम
सावरकर सदनाकडे धाव घेऊन स्वा. सावरकरांचे दर्शन घेतले होते. स्वा. सावरकरांच्या
जीवनाचा कालखंड बघितला तर त्यांचे सर्वाधिक वास्तव्य याच सदनात झाले आहे. १९४८ला
महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी स्वा. सावरकरांना याच सावरकर सदनातून
अटक करण्यात आली होती. महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणाच्या खटल्यातून स्वा.
सावरकरांची अखेर निर्दोष मुक्तता झाली. त्यावेळचे वातावरणही या वास्तूने अनुभवलेले
आहे. सावरकर सदनातच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अखेरचा श्वास घेतला होता.
अनेक महनीय
व्यक्तींनी भेट दिलेल्या या सावरकर सदनात तळमजल्यावर एका खोलीत स्वातंत्र्यवीर
सावरकर राजकीय कार्यकर्ते, ओळखीच्या लोकांना भेटत असत. महत्त्वाच्या व्यक्तींना
भेटीसाठी पहिल्या मजल्यावरील खोलीत बोलाविले जाई. तळमजल्यावरील बैठकीच्या खोलीत
सावरकरांनी देशाच्या राजकीय स्थितीवर अनेकदा प्रकट चर्चा केली होती. त्या
दृष्टीनेही या खोलीला एक आगळे महत्त्व आहे. सावरकर सदनामध्ये तळमजल्यावरील या
बैठकीच्या खोलीमध्ये १९९३ साली स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने
सावरकरांच्या जीवनाशी संबंधित वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आले. या
वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन क्रांतिकारक बंगेश्वर राँय यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या समारंभास विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती जयवंतराव टिळक, प्रा. सुहास बहुलकर व
सावरकरांचे सुपुत्र विश्वासराव हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वा. सावरकर
राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह पंडित बखले यांनी या वस्तुसंग्रहालयाबद्दल सांगितले
की, सावरकारांच्या निर्वाणानंतर सावरकर सदन राष्ट्रीय स्मारक बनावे अशी अनेकांची
इच्छा होती. पण त्यात यश आले नाही. या सदनात सावरकरांची स्मृति चिरंतन राहावी
यादृष्टीने सावरकर स्मारकाने या घराच्या तळमजल्याच्या बैठकीच्या खोलीत सावरकरांशी
संबंधित वस्तुसंग्रहालय उघडण्याचा निर्णय घेतला. स्वा. सावरकरांचे जावई माधवराव
चिपळूणकर यांनी आम्हाला तात्यारावांच्या वापरातील काही वस्तू दिलेल्या होत्या.
त्याशिवाय स्मारकाने प्रयत्न करून अन्य काही वस्तू मिळविल्या. प्रिन्स आँफ वेल्स म्युझियमचे
संचालक डाँ. सदाशिवराव गोरक्षकर यांनी या कामी पुढाकार घेतला व या
वस्तुसंग्रहालयाची नीटस मांडणी करुन दिली. स्वा. सावरकरांना त्यांच्या
आयुष्यक्रमात मिळालेली सन्मानचिन्हे तसेच मानपत्रे ही या वस्तुसंग्रहालयात
ठेवण्यात आली आहेत. त्या मानपत्रांमध्ये सावरकर सत्कार मंडळ –परळ (२६ जून १९३८), द
हिंदू सिटिझन्स आँफ कलकत्ता (१६ फेब्रुवारी १९३९), कानपूर म्युनिसिपल बोर्ड चेअरमन
(१ जानेवारी १९४३), समस्त गुजरात वीर सावरकर सन्मान मंडळ – अहमदाबाद (२३ आँगस्ट
१९४६), कराची फॅन्सी पीस गुडस् मर्चंट असोसिएशन (४ सप्टेंबर १९३८), लखनौ म्युनिसिपल
बोर्ड, ठाणे महानगरपालिका (११ डिसेंबर १९३८), आदी मानपत्रांचा समावेश आहे.
स्वा. सावरकर
वस्तुसंग्रहालयातील एकंदर मानपत्रांची संख्या १२ आहे. या मानपत्रांच्या मजकूरावर
नजर टाकली असता असे दिसते की, स्वा. सावरकरांनी केलेल्या क्रांतिकार्याने प्रभावित
होऊन अनेक संघटनांनी त्यांचा सत्कार केलेला होता व सत्कार करणार्यांत केवळ
हिंदुत्वनिष्ठच नव्हते. स्वा. सावरकरांचा अभ्यास करणार्यांना ही मानपत्रे नक्कीच
मोलाची वाटतील. या मानपत्रांबरोबरच स्वा. सावरकरांचे बूट, चष्मा, कोट, टोपी इ.
व्यक्तिगत वापरातल्या वस्तूही या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तुंची
आकर्षकरित्या मांडणी करण्यात आली आहे. स्वा. सावरकरांच्या आयुष्यातील काही
महत्त्वाचे क्षण टिपणारी मोजकी दहा छायाचित्रेही येथे मांडण्यात आली आहेत.
सावरकर सदनातील हे
वस्तुसंग्रहालय पूर्ण वेळ सुरु ठेवण्याचा सावरकर स्मारकाचा इरादा होता मॉत्र काही
कारणांमुळे पुढे ते शक्य होऊ शकले नाही. सध्या दररोज दुपारी तीन ते संध्याकाळी
सातपर्यंतच हे वस्तुसंग्रहालय लोकांना पाहाण्यासाठी खुले असते. स्वा. सावरकर हे
फक्त पुस्तकांमधूनच कळतील असे नाही तर त्यांचे अधिक जवळून दर्शन या
वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातूनही होऊ शकेल. ज्यांना हे वस्तुसंग्रहालय पाहाण्याची
इच्छा आहे त्यांनी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, शिवाजी
पार्क, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ या पत्त्यावर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment