चिपळूण येथे १२, १३, १४ जानेवारी २०१३ रोजी भरलेल्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनात
‘यशवंतराव चव्हाण यांचे विचारविश्व
व आजचा महाराष्ट्र’ या विषयावर हा परिसंवाद आयोजिण्यात आला होता. त्या परिसंवादाची मी केलेली बातमी दै. दिव्य
मराठीच्या १४ जानेवारी २०१३ रोजी
प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.
मनश्रीच्या ‘डोळस’ यशोगाथेने सारेच भारावले!
बालश्री पुरस्कारप्राप्त
युवतीची साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत
समीर परांजपे
- यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण)
‘मला आई-वडिलांनी
नेहमी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वाढवले... गाणे, अभिनय शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. मी
सगळ्यांपेक्षा वेगळी आहे असे मला कधीच वाटू दिले नाही...’ अशा
भावना जन्मत:च अंध असलेल्या व बालश्री पुरस्कार प्राप्त मनश्री
सोमण हिने रविवारी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत मांडल्या.
मुख्य सभामंडपातील
बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर मनश्री व तिची आई अनिता सोमण यांना बोलते केले, ते प्रख्यात लेखक सुमेध वडावाला- रिसबूड यांनी... तिने आजवर केलेल्या संघर्षातून फुललेली यशोगाथा एका हृदयस्पर्शी
कार्यक्रमात साहित्य रसिकांसमोर उलगडत गेली.
मनश्री ही सोमण
दांपत्याची मुलगी. ती जन्मत:च अंध
तसेच आणखी काही व्याधींनी ग्रस्त,
पण आई-वडिलांनी
दिलेल्या प्रचंड
आत्मविश्वासाच्या पाठबळावर सुरू झाली वाटचाल...ती
करताना अनेक अडथळे आले, मनस्तापाचे प्रसंग आले...पण त्यावर मात करून मनश्री सर्वसामान्य मुलांप्रमाणेच शिकली. आज ती मुंबईच्या सेंट झेवियर्स या कॉलेजमध्ये बीए तृतीय वर्षाला आहे. ती उत्तम गाते, अभिनय करते. या
गुणांची दखल घेऊन तिला बालश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मनश्रीने आज या मुलाखतीदरम्यान दोन छान गाणी गाऊन तसेच अभिनयाचा पैलू दाखवून
उपस्थितांची दाद मिळवली.
बहीण, शिक्षकांचे सहकार्य
मनश्रीने
सांगितले की, यशश्री ही माझी मोठी बहीण, पण ती मला मैत्रीण म्हणूनच जास्त जवळची वाटते. ती
जसे आयुष्य जगते तसेच मीही जगावे असे तिला नेहमी वाटते. त्यामुळे
ती मला घेऊन तिच्या मैत्रिणींकडे जाते. आम्ही कॅफे कॉफी डे ला
जातो, चित्रपट पाहतो. तिच्यामुळे
मी अनेक गोष्टींचा मोकळेपणाने आनंद घेऊ शकले.
उज्ज्वल भविष्यासाठी
प्रयत्न
आपल्या आवडीनिवडीविषयी मनश्री सांगते की, मला डॉ. सलील कुळकर्णी यांनी गायलेली गाणी व त्यांचे संगीत आवडते. आई अनिता म्हणाल्या की,
मनश्रीला लहानपणापासूनच सर्व गोष्टींचे नीट ज्ञान व्हावे यासाठी आमचा कटाक्ष असायचा. आम्ही तिला घेऊन ज्या ज्या वेळी बाहेर जायचो त्या वेळी बसचा रंग कोणता आहे,
त्याचबरोबर आणखी काय काय गोष्टी आजूबाजूला आहेत हे आम्ही तिला आवर्जून सांगायचो. तिला कोणाचा स्पर्श कोणत्या भावनेने केलेला असतो हे ओळखण्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला.
आज तिची जी वाटचाल सुरू आहे त्यात आई म्हणून मी समाधानी आहे. भविष्यात तिने आणखी यशाची शिखरे गाठावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहाणार आहोत.
No comments:
Post a Comment