अमेरिकेचे लोकप्रिय ‘कंट्री सिंगर’ हा बहुमान मिळवलेले जॉर्ज जोन्स यांचे 26 एप्रिल २०१३ रोजी वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले. या महान गायकाच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख मी दै. दिव्य मराठीच्या ५ मे २०१३च्या अंकात लिहिला होता. त्या लेखाची लिंक व जेपीजी फाईल.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-of-remembaring-4254813-NOR.html
------------------------
गमावलेल्या माणसांची गोष्ट
--------------
- समीर परांजपे
-----------
काहींच्या ललाटरेखी भव्य यशाचे दिव्यत्व लिहिले नसेलही; पण रसिकांच्या मनामनात रुजण्याचे, सौम्य पण स्थायी लोकप्रियता लाभण्याचे भाग्य नक्कीच तिथे रेखलेले असते. अमेरिकेचे लोकप्रिय ‘कंट्री सिंगर’ हा बहुमान मिळवलेले जॉर्ज जोन्स हे याच भाग्याचे. नुकतेच 26 एप्रिल रोजी वयाच्या 81व्या वर्षी त्यांचे अमेरिकेतील नॅशव्हिले येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गेली पन्नास वर्षे आपल्या गाण्यांनी रसिकांचे कान तृप्त करणारी एक मैफल संपली. अमेरिकन संस्कृतीतील सारे गुण-अवगुण अंगी मुरवलेले जॉर्ज आपल्या मस्तीत, अनेक वैयक्तिक वादळे अंगावर घेत जगले. कधी कधी हा माणूस आपले आयुष्य उधळून तर लावत नाही ना, अशी शंका येत असतानाच त्यांच्या गाण्याच्या तलम स्वरांनी त्यांच्या जगण्याला तोलून धरले. कोणत्याही मोजमापाने तोलता येणार नाही, असा आनंद हा माणूस आपल्या गाण्यांतून सर्वांना देत गेला. हाती असलेल्या गिटारीच्या तारा छेडत समोरच्या माइककडे जणू दुर्लक्ष केल्यासारखी नजर राखून जॉर्ज जोन्स आपल्या गाण्यातून सुरांचे जे इंद्रधनुष्य उभे करायचे, त्याला तोड नव्हती. परंतु या सुरांना काही काळ ग्रहणही लागले. मद्य तसेच अमली पदार्थांच्या व्यसनाने त्यांचा सूर भरकटत गेला. पण गंधर्व हा अनेकदा शापितच असतो, तसे आयुष्य वाट्याला आलेल्या जॉर्ज यांनी त्या विपरीत परिस्थितीतूनही भरारी घेतली. ‘आवाज की दुनिया’मधील आपले स्थान अढळ ठेवले. ‘पोसम’ या टोपणनावाने निकटवर्तीयांमध्ये ओळखले जात असलेल्या जॉर्ज जोन्स यांची गानकारकीर्द 1950 च्या दशकात सुरू झाली.
21 व्या शतकाचे पहिले दशक संपल्यानंतरही ती आपली सोबत करत होती. जॉर्ज जोन्स यांच्या निधनानंतर मात्र आता तिला गतस्मृतींचे वलय प्राप्त होईल. पण त्यातील जिवंतपणा कायम राहणारच. कमावले तसे गमावलेही, हे त्यांच्या आयुष्याचे जणू मुख्य सूत्रच असावे. गाणे गाऊन कमावलेल्या लाखो डॉलर्सच्या संपत्तीपैकी बहुतांश भाग या पठ्ठ्याने व्यसने, उधळपट्टी आणि तीन घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या माजी बायकांना भरपाई देण्यात खर्ची घातला.
1960 च्या दशकात तर त्यांची लोकप्रियता तुफान वाढलेली. त्या काळातील सहप्रवासी असलेले गायक, संगीतकार जॉर्ज जोन्स यांच्याकडे ‘उस्ताद’ म्हणूनच पाहत असत. नेमके याच काळात अमेरिकेत पॉप, रॉक गायकांचे हात आकाशाला टेकलेले होते. कोणीही जमिनीवर यायलाच तयार नसायचे. या सितार्यांकडे बघणाºया पॉप, रॉक रेडिओ स्टेशन्सनी जॉर्ज जोन्सना फार थारा दिला नाही. मात्र त्याने जोन्स यांचे काही अडले नाही. ते जाहीर कार्यक्रमांतून गात राहिले. चाहते त्यांच्या सुरांमागे धावत राहिले. त्यांनी गाताना कोणाचाही अनुनय केला नाही की डोक्यावर काऊबॉय हॅट घालून आजच्या भाषेत चमकेशगिरी केली नाही. ‘आहे तसे’ या तत्त्वावर या माणसाने सुरांचा संसार मांडला. (वैयक्तिक आयुष्यात जॉर्ज जोन्सचे तीन संसार मोडले!)
1920च्या दशकामध्ये अमेरिकेत कंट्री म्युझिकचा जोमदार प्रवाह वाहू लागला. दक्षिण अमेरिकेतील ग्रामीण भागांमध्ये परंपरेने जे संगीत रुजलेले होते, ते कंट्री सिंगरच्या मुखातून देशभर पोहोचले. या संगीतात अमेरिकेतील लोकसंगीत व पाश्चिमात्य संगीताचे एकजीव मिश्रण झालेले होते. बँजो, इलेक्ट्रिक आणि ऑटिस्टिक गिटार, फिडल, हार्मोनिका या वाद्यांच्या संगतीने हे कंट्री म्युझिक फुलले. 1940 मध्ये या प्रकारच्या संगीताच्या लोकप्रियतेचा आलेख चढा राहिला. 1950 व 1960 च्या दशकात अमेरिकेत कृष्णवर्णीयांना स्वअस्मितेची मोठ्या प्रमाणावर जाणीव झाली. त्यातून बंडखोरीचा हुंकार तेथील समाजात उमटला. त्याचे दृश्यरूप कालांतराने पुढे आले ते मायकेल जॅक्सनच्या सुरांच्या निमित्ताने... पॉप, रॉकच्या या साºया झंझावातात कंट्री म्युझिकचे जॉर्ज जोन्ससारखे शिलेदार शांतपणे आपले काम करत होते. रसिकांना रिझवत होते. ते मध्यममार्गी होते. कोणत्याही विचारसरणीचे ओझे खांद्यावर टाकून फिरणारा हा माणूस नव्हता. 1980 च्या दशकात जॉर्ज यांना कंट्री म्युझिकमधील ध्रुवासारखे अढळ स्थान प्राप्त झाले. गार्थ ब्रुक्स, रँडी ट्रॅव्हिस, टॉबी किथ, टिम मॅकग्रा यासारखे अनेक प्रसिद्ध कंट्री सिंगर जॉर्ज यांच्यापुढे आदराने मान लवून उभे असायचे.
12 सप्टेंबर 1931 रोजी टेक्सास येथील साराटोगा येथे जन्मलेल्या जॉर्ज जोन्स यांचे वडील पेशाने ट्रक ड्रायव्हर होते. वयाच्या नवव्या वर्षी जॉर्ज जोन्स यांच्या हाती त्यांच्या वडलांनी कौतुकाने भेट दिलेली गिटार पडली. या गिटारीच्या तारा छेडता छेडता, पुढे त्या सुरांमध्येच हा पोरगा हरपून गेला. जॉर्ज यांनी वयाच्या सतराव्या वर्षी डोरोथी बॉनव्हिलियन हिच्याशी विवाह केला. पण तो पुढे अपयशी ठरला. 1950 ते 1953 या कालावधीत ते सैन्यात दाखल झाले होते. त्यांनी गायलेले व त्याची रेकॉर्ड निघालेले पहिले गाणे होते ‘नो मनी इन धिस डिल’. 1954मध्ये हे गाणे ध्वनिमुद्रित होऊन सर्वांच्या तोंडी रुळू लागले. जॉर्ज यांची सांगीतिक कारकीर्द सुरू झाली होती, मात्र वैवाहिक आयुष्याची विसकटलेली घडी ताळ्यावर येत नव्हती. 1954 मध्ये त्यांनी शिर्ले कोर्ले हिच्याबरोबर विवाह केला. हे संसारसुख 1968पर्यंतच टिकले. 1955 मध्ये ‘व्हाय बेबी व्हाय’ या गाण्याने जॉर्ज जोन्सना मोठ्या यशाची चव चाखायला मिळाली. हा गायक स्वत:ही सुंदर गाणी लिहीत असे. ‘जस्ट वन मोअर’, ‘व्हॉट अॅम आय वर्थ’, ‘कलर ऑफ द ब्लूज’ या स्वरचित गाण्यांतून त्यांनी आपल्या प्रतिभेचे नाना रंग दाखवले. यशाच्या आतील पदर हा अपकीर्तीचा असतो. नेमके याच काळात जॉर्ज जोन्स मद्यव्यसनाच्या विलक्षण आहारी गेले होते. 1959मध्ये ‘व्हाइट लायटनिंग’ या त्यांच्या गाण्याने लोकप्रियतेची परिसीमा ओलांडली. 1962 मध्ये ‘शी थिंक्स आय स्टील केअर’ या त्यांच्या गाण्याने इतकी लोकप्रियता मिळवली की त्यांचे ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. ‘द रेस इज ऑन’ (1964), ‘वॉक थ्रू धिस वर्ल्ड वुईथ मी’ (1968) या गाण्यांनी यशोशिखर पादाक्रांत करणारे जॉर्ज हे तिसर्यांदा विवाहबद्ध झाले. टॅमी विनेट या उभरत्या गायिकेबरोबर मांडलेला संसार 1975 पर्यंत टिकला. मात्र या दांपत्याने ‘वुई आर गॉन्ना होल्ड ऑन’, ‘गोल्डन रिंग’, ‘निअर यू’ सारखी अवीट गोडीची द्वंद्वगीते म्हटली ती याच काळात. त्यानंतर जॉर्ज जोन्स यांचे ‘द बॅटल’ व ‘अलोन अगेन’ असे दोन अल्बमही आले. चोखंदळ रसिकांच्या पदरात सुरांचे भरभरून दान देणाºया जॉर्ज यांनी आपले ‘आय लिव्हड् टू टेल इट ऑल’ हे आत्मचरित्र 1996मध्ये प्रसिद्ध केले. स्टिल डुइंग टाइम, आय ऑलवेज गेट लकी विथ यू अशा गाण्यांनी 1981 ते 1984 च्या काळात पुन्हा यशाचे वारे अंगावर झेलत असतानाच जॉर्जनी नॅन्सी सेपुल्वेदो हिच्याबरोबर चौथा विवाह केला. 1992 मध्ये वॉल्स कॅन फॉल या जॉर्ज जोन्स यांच्या अल्बमच्या पाच लाख कॉपीज विकल्या गेल्या. यश मिळाले तरी जॉर्ज जोन्स कायम आर्थिक ओढाताणीतच असायचे. त्यातच त्यांना 1999मध्ये कार अपघात झाला. त्याच वर्षी ‘चॉइसेस’ या गाण्याकरिता सर्वोत्कृष्ट गायकासाठीचे ग्रॅमी अवॉर्ड जॉर्जना मिळाले. 26 एप्रिल रोजी जॉर्ज जोन्स यांच्या थकल्या कुडीतून प्राण निघून गेला, मात्र मागे उरले आहेत त्यांच्या स्वरांचे पंचप्राण... आता अमेरिकन कंट्री संगीतातील दर्दी रसिकांनी त्याचीच पूजा बांधायची आहे.
(sameer.p@dainikbhaskargroup.com)
No comments:
Post a Comment