Saturday, March 15, 2014

रेल्वेच्या इतिहासातील अज्ञात पाने (सायंदैनिक आपलं महानगर - २८ मे १९९७)


या लेखाचा मुळ भाग



















या लेखाचा उर्वरित भाग.




इतिहास म्हणजे माणसाच्या अखंड धडपडीची नोंद असते. मध्य रेल्वेने १९९७ साली आपली पूर्वज ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या कामकाजासंदर्भातील सुमारे पंधरा हजारावर पृष्ठसंख्या असलेली कागदपत्रे मुंबई पुराभिलेख कार्यालयाकडे सुपूर्द केली. त्यानिमित्त मी महानगर या सायंदैनिकात २८ मे १९९७ रोजी एक लेख लिहिला होता. त्या लेखाच्या दोन जेपीजी फाइल्स वर दिल्या आहेत.

रेल्वेच्या इतिहासातील अज्ञात पाने

- समीर परांजपे

इतिहास ही एक कला आहे की शास्त्र, या वादामध्ये १९ व्या शतकाच्या अखेरीस इतिहास हे एक शास्त्र आहे असा कौल लागला. इतिहास हे एक शास्त्र आहे हे सर्वमान्य झाल्यावर इतिहासाची लेखनपद्धती काय असावी, यावर पंधराव्या शतकापासून संशोधकांमध्ये जी चर्चा सुरु होती तिला आधुनिक वळण देण्याचे काम सर्वप्रथम जर्मन इतिहासकार रॅन्के यांनी केले. जगातील अनेक संस्कृतींचा अभ्यास करुन टाँयन्बीने इतिहास म्हणजे संस्कृती असे समीकरण तयार केले. इतिहासात संस्कृतींचा उदय आणि र्हासाशिवाय दुसरे काहीही नसते, असे प्रतिपादन करणार्या टाँयन्बीच्या पुढे एक पाऊल टाकले ते इ. एच. कार यांनी `व्हाँट इज हिस्ट्री हा ग्रंथ लिहून, आधुनिक रितीने इतिहासलेखन करताना प्राथमिक आणि दुय्यम संदर्भसाधनांचा वापर कसा करावा, याचे विश्लेषण त्यांनी या पुस्तकात केले आहे. प्राथमिक संदर्भसाधनांमध्ये मूळ कागदपत्रे येतात. तर दुय्यम संदर्भसाधनांमध्ये लेख, प्रबंध, पुस्तके आदींचा समावेश होतो. लिखित आणि अलिखित अशा दोन उपप्रकारांत असलेल्या संदर्भसाधनांची विश्वासार्हता ठरवणे ही इतिहासलेखनाची पहिली पायरी आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने १२ मार्च १९९७ रोजी आपली पूर्वज ग्रेट इंडियन पेनिन्सूला रेल्वेच्या (जी. आय. पी.) कामकाजासंदर्भातील सुमारे पंधरा हजारांवर पृष्ठसंख्या असलेली कागदपत्रे मुंबईतील पुराभिलेखागार कार्यालयाकडे सुपूर्द केली. ही घटना विशेष महत्वाची आहे. गेली ८० ते ९० वर्षे मध्य रेल्वेच्या रेकाँर्डरुममध्ये ही कागदपत्रे धुळ खात पडली होती. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व मध्य रेल्वेच्या लक्षात येताच त्यांनी १९ फेब्रुवारी १९९७ रोजी पुराभिलेखागार संचालकांना ही कागदपत्रे जतन करण्यासाठी ताब्यात घ्यावीत अशी विनंती केली. मध्य रेल्वेच्या रेकाँर्डरुममध्ये १८५३ सालापासून ते आजपर्यंतच्या कामकाजाचा सुमारे दीड लाख पाने भरतील इतका दस्तऐवज जमवण्यात आला आहे. यातील १८५३ ते १९२० पर्यंतच्या कालावधीतील जी. आय. पी. रेल्वेच्या कामकाजाबद्दलची अनेक कागदपत्रे मध्य रेल्वेने याआधी १९४० साली मुंबई पुराभिलेखागाराच्या कार्यालयाला सादर केली होती. मुंबईतील फोर्ट विभागातल्या एल्फिन्स्टन काँलेज इमारतीमध्ये मुंबई पुराभिलेखागार आहे.
पण त्यानंतरही जी. आय. पी.च्या संदर्भातील अशी अनेक कागदपत्रे होती की, ज्यांना पुराभिलेखागाराचा राजमार्ग दिसला नव्हता. १२ मार्च १९९७ रोजी मध्य रेल्वेच्या विनंतीनुसार पुराभिलेखागाराच्या कर्मचार्यांनी मध्य रेल्वेच्या रेकाँर्डरुममध्ये गेल्या ७० ते ८० वर्षांपासून जमलेले धुळीचे धर अक्षरश: व्हाँक्युम क्लिनरने साफ केले आणि या कागदपत्रांची छाननी केली. २०० पानांची बांधणी असलेल्या दस्तऐवजाला व्हाँल्युम असे म्हणतात. अशा बांधणीचे सुमारे २१० व्हाँल्यूम्स रेल्वेकडून पुराभिलेखागाराने ताब्यात घेतले. आता सध्या उर्वरित ३८०० व्हाँल्यूम्सची छाननी सुरु असून त्यातून बरीचशी नवीन महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध होतील. आत्तापर्यंत भारतीय रेल्वेचा इतिहास लिहिला गेला त्यात संदर्भसाधने म्हणून या कागदपत्रांचा काहीच उपयोग केला गेला नव्हता. आता या कागदपत्रांमुळे रेल्वेच्या इतिहासात नवीन भर पडेल. १८४३ साली लाँर्ड डलहौसीने भारतात रेल्वे सुरु करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती. १९ एप्रिल १८४५ रोजी इनलँड रेल्वे असोसिएशनची मुंबईच्या टाऊन हाँलमध्ये स्थापना होऊन त्यात या कामाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. या समितीचे अध्यक्ष लाँर्ड विलिग्बी असून त्यात जगन्नाथ शंकरशेठ, करसेटजी जमशेदजी जिजीभाँय, दादाभाँय वाडिया ही मंडळीही अग्रेसर होती. त्यानंतर त्वरित बाँम्बे ग्रेट इस्टर्न रेल्वेची स्थापना झाली. कालांतराने तिच नाव इस्ट पेनिन्सुला रेल्वे असे झाले. या रेल्वेने मुंबई ते दख्खन असा मार्ग बांधण्याचे निश्चित केले. पण अनेक प्रशासकीय अडचणींमुळे प्रत्यक्षात ठाणे ते मुंबई या रेल्वेमार्गावर १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावू लागली. तेव्हापासूनच्या जी. आय. पी. रेल्वेच्या इतिहासासंदर्भात फार मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेले नाही. १९०० साली जे. क्लार्क यांनी `द ग्रेट पेनिन्सुला रेल्वे अंडर द ओरिजिनल कंपनीज अँडमिनिस्ट्रेशन ही ४६ पानांची पुस्तिका लिहिली. त्यानंतर यासंदर्भात एस. एन. शर्मा यांनी दोन खंडात जी. आय. पी. रेल्वेचा इतिहास १९६० साली लिहून प्रसिद्ध केला. यात १८५३ ते १९०० या काळातील घटनांचा मागोवा आहे. १९४७ नंतर भारतीय रेल्वेचा सम्यक इतिहास सांगणारी विविध पैलूंवरील अनेक पुस्तके लिहिली गेली असली तरी १२ मार्च १९९७ रोजी पुराभिलेखागाराच्या ताब्यात जी. आय. पी. रेल्वेच्या कारभाराची जी कागदपत्रे आली ती इतिहास संशोधकांसाठी अज्ञात होती. ही कागदपत्रे प्राथमिक संदर्भसाधने या प्रकारात येतात.
भारतीय इतिहासावर संशोधन करणार्यांच्या दृष्टीने महाराष्टर् शासनाच्या मुंबई पुराभिलेखागार म्हणजे सोन्याची खाण आहे. १८२१ सालच्या आँगस्ट महिन्यात विल्यम विसेनक्राफ्ट या पहिल्या रेकाँर्डकीपरच्या हाताखाली मुंबई राज्याच्या पुराभिलेखागाराची स्थापना झाली. १९६० सालानंतर मुंबई हे मुख्य पुराभिलेखागार ठरुन त्या खालोखाल कोल्हापूर आणि पुणे इथेही पुराभिलेखागार स्थापन करण्यात आली. १९७१ साली त्यांच्या शाखा औरंगाबाद, नागपूर येथेही निघाल्या. या सर्वात मुंबई पुराभिलेखागाराचे वैशिष्ट्य असे की, १६३० ते १९५४ या काळातील राजकीय घडामोडी, सैनिकी मोहिमा, शिक्षण, न्याय, ग्रामीण अर्थव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य इत्यादी अनेक विषयांवरील पाच लाख व्हाँल्युम्स होतील इतकी कागदपत्रे इथे जतन करण्यात आली आहेत.
रेल्वे या विषयासंदर्भात मुंबई पुराभिलेखागाच्या ताब्यात जी कागदपत्रे १९४० साली आली ती सर्व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येतात. १८४४ ते १८४८ या कालावधीत रेल्वे हा विषय सर्वसामान्य प्रशासन खात्याच्या अंतर्गत येत होता. १८४९ ते १९६०मध्ये रेल्वे अर्थ खात्याच्या मांडवाखालून गेली. १८६०मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची स्थापना झाल्यानंतर रेल्वे या विषयाला हक्काचे कुंकु मिळाले. मुंबई पुराभिलेखागारामध्ये १९४० रोजी जी कागदपत्रे आली त्यात जी. आय. पी. रेल्वेच्या कारभारासंदर्भातले १८५९ ते १९२१ या काळातील निवडक ७०३८ व्हाँल्युम्स आहेत. कोर्ट डायरेक्टरची रेल्वेसंदर्भातील १८५० ते १८५६ या काळातील २८ व्हाँल्युम्समध्ये संग्रहित केलेली पत्रे, १८७० ते १८९४ या कालावधीतील १२५ व्हाँल्युम्समध्ये असलेले अँबस्ट्रँक्स आहेत. १९२० पर्यंत सरकारी कार्यालयांत फायलिंगची पद्धत नसल्याने ही कागदपत्रे मिनट बुक्स इनवर्ड लेटर, आऊटवर्ड लेटर रजिस्टर्स, सर्व्हे, डायरी अशा हस्तलिखित रुपात एकत्रित आहेत.
मध्य रेल्वेने १२ मार्च १९९७ रोजी मुंबई पुराभिलेखागाराला जे २१० व्हाँल्युम्स सुपूर्द केले त्यांचे वैशिष्टय् काय असा प्रश्न पडतोच. या कागदपत्रांत १८४९ ते १९५५ पर्यंतची कागदपत्रे आहेत. १८४९ साली इस्ट इंडिया कंपनी आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे यामध्ये झालेले इंटेंडर, १८६५ साली रेल्वे रुळांचे विस्तारीकरण करण्यासंदर्भात जी. आय़. पी.च्या अधिकार्यांमध्ये झालेला पत्रव्यवहार, बोर्ड रेल्वे एजंटची १८९६ ते १८९८ची पत्रे, साऊथ इंडियन रेल्वे कंपनीच्या २३व्या अहवालाची प्रत (१९०२), भारतीय रेल्वे प्रशासकीय अहवाल (१९११), त्यानंतर रेल्वे नियोजनाचा अहवाल (१९५५) असे सुमारे २१० व्हाँल्युम्स आले आहेत. आणखी ३८०० व्हाँल्युम्सची छाननी पुराभिलेखागार करत असून तो दुसर्या टप्प्यातील रेकाँर्ड १९९७ सालच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मध्य रेल्वेने मुंबई पुराभिलेखागाराला हस्तांतरित केला. पुराभिलेखागाराला कधी कधी मुळ प्रतीच्या नकला करून तो दस्तऐवज जतन करण्याची प्रथा आहे. परंतु गेल्या ६० ते ७० वर्षांत मध्य रेल्वेच्या रेकाँर्डिंगरुममध्ये कुणीही प्रवेश करण्याचेच धाडस केलेले नसल्याने या नवीन रेकाँर्डसच्या नक्कल प्रती पुराभिलेखारात मिळणे शक्य नाही.
रेल्वेच्या इतिहासासंदर्भातील जी कागदपत्रे पुराभिलेखागारात आहेत त्यातून कोकण रेल्वेमार्ग बांधण्यासाठी १८६६ सालापासून ब्रिटिश सनदी अधिकार्यांनी कशा हालचाली सुरु केल्या होत्या. यासंदर्भातील पत्रांचे संकलन केलेली एक पंचवीस पानांची पुस्तिका महाराष्ट्र शासनाने १९६९ साली प्रकाशित केली होती. मुंबईच्या घाटकोपर स्थानकापासून कोकण रेल्वेमार्ग सुरु करुन पारसिकद्वारे पेण-पनवेल व पुढे महाडपर्यंत तो रेल्वेमार्ग वाढवायचा तसेच खोपोलीपासून पनवेलपर्यंत एक मार्ग काढावा , असा विचार त्यावेळी प्रबळ होता. पण १८८२ साली अबकारी खात्याच्या आयुक्तांच्या आक्षेपामुळे त्यात कसे बदल झाले याचे प्रत्ययकारी चित्रण या पुस्तिकेतून उभे राहाते. परंतु १९६९नंतर कोकण रेल्वेसंदर्भातील पुस्तिकेचे पुर्नमुद्रण झालेले नसल्याने कोकण रेल्वेचा इतिहास लिहिणार्यांना ही पुस्तिका संदर्भसाधन म्हणन माहीतच नाही. रेल्वेच्या दस्तऐवजांवर अशा परिचयात्मक पुस्तिका पुराभिलेखागार तसेच भारतीय रेल्वे खात्याने प्रसिद्ध केल्या पाहिजेत.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात जी. आय. पी. हा एक उपविभाग आहे. मात्र भारतीय रेल्वेच्या कारभारावर जी विविध दृष्टीकोनातून पुस्तके लिहिली गेली त्यातील काहीच महत्त्वाची आहेत. इंडियन रेल्वेमेन -१९२९, इंडियन रेल्वे पाँलिसी –मोलस्वर्थ, गिलफोर्ड, इंडियन रेल्वेज अँड देअर प्रोबेबल रिझल्टस् – १९३०, इंडियन रेल्वे सेंच्युरी सेलिब्रेशन – १९५३, इंडियन रेल्वेज – सेंट्रल फॅक्टस् अँड मेजर प्राँब्लेम्स – १९७१, इंडियन रेल्वेज – फायनान्शियल अँड कमर्शिअल प्रोफाईल – आर. एन. सक्सेना अशा निवडक ५७ पुस्तकांचा ऐवज क्लासिक आहे. मात्र भारतीय रेल्वेच्या इतिहासाचे अनेक पैलू आजही अज्ञात आहेत. ते प्रकाशात आणण्याचा प्रारंभ जी. आय. पी.च्या नव्याने उजेडात अलेल्या दस्तऐवजांची छाननी करण्यापासून संशोधकांनी करायला हवा. १८५३ साली भारतात रेल्वे सुरु झाल्यापासून येथील सामाजिक घडी बदलण्यात, जातीभेद कमी करण्यत रेल्वेचा किती सहभाग होता या दृष्टीकोनातून लिहिली गेलेली आतापर्यंत फारशी प्रकाशित झालेली नाहीत. तो प्रयत्न ही नवी संदर्भसाधने तपासून व्हावा. कारण ग्रामचीने म्हटले आहे की, इतिहास म्हणजे इतिहास म्हणजे माणसाच्या अखंड धडपडीची नोंद असते.


No comments:

Post a Comment