इराणी हाॅटेलांवर मी लिहित असलेल्या लेखमालेचा `इथे एक इराणी होता...' हा दुसरा व अंतिम भाग दैनिक दिव्य मराठीच्या आज २ मार्च २०१४च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला होता. या लेखाचे पान व टेक्स्ट मजकूर याच्या दोन लिंक व जेपीजी फाईल पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sameer-paranjape-artilce-about-irani-hotel-divya-marathi-4536816-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/02032014/0/4/
---------
इथे एक इराणी होता...
-----------------------------
- समीर परांजपे
-----------
स्वातंत्र्योत्तर काळात 1980च्या दशकापर्यंत मुंबई शहरामध्ये सामाजिक, राजकीय, तसेच कामगार क्षेत्रातील, साहित्य प्रांतातील चळवळी जोमात होत्या. विविध प्रवाहांच्या विचारांची घुसळण या काळात जोमाने होत होती. मात्र, या निमित्ताने झडणारे वादविवाद, चर्चा हे सगळे साग्रसंगीत साजरे व्हायचे ते मुंबईतील फोर्ट, व्हीटीपासून ते पार माहिम, शीवपर्यंतच्या इराणी हॉटेलांमध्ये! मराठी साहित्य विश्वात लिटिल मॅगझिनचे युग 1960च्या दशकात अवतरले. त्या वेळी या युगाच्या प्रवर्तकांनी विचारमंथनासाठी आसरा घेतला, तो मुख्यत्वे या इराणी हॉटेलांचाच. इराणी हॉटेलांशी मराठी साहित्यिकांचा जो ऋणानुबंध होता, त्याच्या रम्य आठवणी ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांच्याकडे आहेत. काळसेकर म्हणतात, ‘व्ही. टी. रेल्वे स्थानकाजवळ जिथे आता मॅकडोनाल्ड आहे, तिथे पूर्वी ‘न्यू एम्पायर’ नावाचे इराणी हॉटेल होते.
लिटल मॅगझिन चळवळीत सहभागी असलेल्यांपैकी चंद्रकांत खोत, वसंत गुर्जर, राजा ढाले, अरुण कोलटकर, मी, प्रदीप नेरूरकर, नारायण बांदेकर अशा सगळ्यांचा ‘न्यू एम्पायर’हा हक्काचा अड्डा होता. मराठी साहित्यातले विद्रोही विचारांचे लोकच येथे जमत, असे नाही; तर ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर, अशोक जैन, कुमार केतकर यांच्यासारखे दिग्गज पत्रकार, साहित्यिक तसेच ग्रंथाली वाचक चळवळीतील प्रमुख मंडळीही ‘न्यू एम्पायर’मध्ये नेमाने येत असत. सगळ्या विचारधारेच्या लोकांना हे इराणी हॉटेल समभावाने सामावून घेत असे. इराणी हॉटेलमध्ये ‘पानी कम’ चहा व ब्रुन किंवा बन मस्का घेऊन तासन् तास बसता येत असे. त्याबद्दल इराणी हॉटेलचे मालक गि-हाइकांना कधीही काहीही बोलत नसत. ‘कामाशिवाय बसू नये’ हा उडुपी वगैरेसारख्या बाकीच्या हॉटेलांचा दंडक असतो. मात्र, ‘कामाशिवायही मनसोक्त बसावे’ ही फक्त इराणी हॉटेलांची खासियत होती. या हॉटेलांमध्ये ‘सोस्यो’ हे शीतपेयही हमखास मिळे, जे इतर हॉटेलांत पटकन नजरेत भरत नसे.
इराणी हॉटेलांमधील खाद्यपदार्थांचे दरही सामान्य माणसांच्या खिशाला परवडणारे होते. इतकी सर्व अनुकूल परिस्थिती असल्याने, आम्ही लिटल मॅगझिनवाले इराण्यात गराडा टाकून बसलेलो असायचो. इराण्यात बसून आम्ही कविता लिहिल्या, लेख लिहिले. आमच्यापैकी प्रत्येक कवीच्या कवितासंग्रहात इराण्यात बसून लिहिलेली त्याची एक तरी कविता नक्कीच आढळेल. इराणी हॉटेलच्या मालकांच्या जुन्या पिढीतील लोकांना आपण धंद्यातून खूप नफा कमवावा, अशी असोशी नव्हतीच फार. त्यामुळे त्यांचे वागणे हे आम्हा चळवळ्या लोकांसाठी पथ्यावर पडणारेच होते.’ इराण्याच्या हॉटेलमधील वातावरण कविता, लेख लिहिण्याकरिता कसे पोषक होते, याची वर्णने 1970च्या दशकात साहित्य वर्तुळात नव्याने वावरू लागलेल्या अनेकांकडून ऐकण्यासारखी आहेत. कवी अरुण कोलटकर यांनी तर इराण्याच्या हॉटेलवर एक नितांतसुंदर कविताच लिहिली आहे. फोर्टमध्ये पीपल्स बुक हाउसच्या शेजारी एक इराणी बेकरी होती. ती जागा तशी लहान होती. पण तेथे मिळणारे पुडिंग आणि चहा यांचे अनेक लोक चाहते होते. पाव बनवल्यानंतर त्याची लादी कापताना जो चुरा उरतो, तो दुधात मिसळून त्याचे पुडिंग केले जाते. त्याचा चहाबरोबर आस्वाद घेण्यासाठी अनेक साहित्यिक, कलाकारांचे पाय या इराणी बेकरीकडे वळत. फोर्टमध्ये स्ट्रँड बुक स्टॉलच्या जवळ एक इराणी हॉटेल होते. तिथे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमून ब्रुन मस्का, बन मस्का व चहाच्या सोबतीने तावातावाने चर्चा करीत. कधीकधी या चर्चेतून काही वादंग उद्भवून वातावरण तप्त बनायचे... मग काही वेळातच ही सारी वितंड-वादळे पानी कम चहाच्या पेल्यामध्ये विरून जायची.
पुन्हा हास्यविनोदाला बहर यायचा. इराणी हॉटेलांचे मालकही कधी कधी गमतीचे वागायचे. सतीश काळसेकरांनी एक किस्सा सांगितला. ‘एका इराणी हॉटेलचा मालक रोज संध्याकाळी आपल्या हॉटेलातून बर्फ घेऊन घरी जायचा. त्याचे हॉटेल चांगलेच मोठे होते. फ्रिजसहित सगळी उपकरणे त्याच्या हॉटेलमध्ये होती. ती घरीही असावी, असा आमचा समज होता. तरीही मग हा रोज बर्फ घरी का न्यायचा? कारण त्याने आपल्या घरी फ्रिज विकत घेतलेला नव्हता!’ फोर्टमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयामागे हीरो रेस्टॉरंट म्हणून इराण्याचे हॉटेल होते. व्ही. टी., फोर्ट भागात नोकरी, व्यवसाय करणार्यांपैकी ज्यांना ट्रेकिंगला जाण्यासाठी शनिवारी रात्री शेवटची लोकल पकडायची असे, त्यांची आपापल्या सॅकमध्ये ट्रेकिंगसाठी लागणारे सामान, खाण्यापिण्याचे पदार्थ प्लास्टिक बॅगांमध्ये भरून घेण्याची सारी पूर्वतयारी हीरो रेस्टॉरंटमध्ये होत असे. हीरो रेस्टॉरंटचा मालकच अनेकदा या ट्रेकर्सना या पूर्वतयारीसाठी स्वत:हून मदत करायचा. 1980च्या दशकात मात्र कालानुरूप काही गोष्टी धंदेवाईक दृष्टीने इराणी हॉटेलशी जोडल्या गेल्या. त्यामुळे फोर्ट, व्ही.टी., चर्नी रोड, ग्रँट रोड, तसेच माहिम, शीव येथील काही इराणी हॉटेलांमध्ये कालांतराने बिअरही मिळू लागली. त्याबरोबर चकन्याच्या विविध पदार्थांचीही तेथे चलती सुरू झाली. गिरगाव चौपाटीसमोरील विल्सन कॉलेजच्या मागच्या बाजूला तसेच तेथील भारतीय विद्या भवन इमारतीच्या पुढील चौकामध्ये बिअर विकणारी दोन इराणी हॉटेल आजही सुरू आहेत.
त्या वेळी या बदलाने इराणी हॉटेलांचे पारंपरिक शौकीन काहीसे दुखावले गेले. इराणी हॉटेलांमध्ये चहा व ब्रुन मस्का, ऑम्लेट पाव मागवून काही तास बसण्याची जी चंगळ होती, तिला तरुण पिढीतील इराणी हॉटेल मालकांच्या हिशेबी वृत्तीने चाप बसला. हळूहळू इराणी हॉटेलांमध्ये चायनीज फूड, काही ठिकाणी चक्क मसाला डोसा, इडली हे पदार्थही मिळायला लागले. मुंबईत जागोजागी उगवलेल्या उडुपी रेस्टॉरंटच्या स्पर्धेत टिकून राहणे इराणी हॉटेल व्यावसायिकांना दिवसेंदिवस अडचणीचे ठरू लागले. त्यातूनच सुरू झाला इराणी हॉटेल बंद करून ती जागा अन्य व्यावसायिकांना विकण्याचा सिलसिला. व्ही.टी.चे ‘न्यू एम्पायर’ बंद होऊन तिथे ‘मॅकडोनाल्ड’ आले. अंधेरी पश्चिम येथे स्टेशनसमोर असलेले इराण्याचे हॉटेल बंद होऊन तिथेही मॅकडोनाल्ड सुरू झाले. माहिमच्या क्राऊन बेकरी अँड रेस्टॉरंटनेही अशीच मान टाकली. इराणी हॉटेल मालकांच्या 2010च्या दशकातील युवा पिढीला हॉटेल धंद्याचे अजिबात आकर्षण नाही. त्यातील अनेक युवा-युवती उच्च शिक्षण घेऊन एक तर परदेशात गेले आहेत, किंवा भारतात राहून अन्य उद्योगधंद्यांमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे आपल्या मालकीच्या इराणी हॉटेलांमधील भव्य जागा हीच त्यांच्या मनाला भावणारी एकमेव गोष्ट. ती विकून किंवा तिचा अन्य उद्योगधंद्यांसाठी वापर करून अधिक पैसा कसा कमावता येईल, याकडे या युवा पिढीचे लक्ष लागले आहे.
सध्याचे व्यावहारिक जग लक्षात घेता, या तरुण पिढीचा दृष्टिकोन साफ चुकीचा आहे, असेही म्हणवत नाही. जग त्याच्या वेगाने बदलत असते. या बदलाच्या जात्यात आता ग्रँट रोड पूर्व येथील मेरवान हे इराणी हॉटेलही आले आहे. मुंबईतील कशीबशी तग धरून असलेली पंचवीसहून अधिक इराणी हॉटेल्स अजूनही सुपात आहेत. ती कधी तरी जात्यात येतीलच. मुंबईचे हे लोण पुणे, हैदराबादकडेही सरकले आहे. पुण्यामधील लकी हे इराण्याचे हॉटेल अस्तंगत झाले. कॅम्प भागातले नाझ व डेक्कन जिमखान्यावरचे कॅफे गुडलक ही इराणी हॉटेल आजही उत्तम व्यवसाय करत असली तरी त्यांचा इराणी हॉटेलचा पारंपरिक बाज केव्हाच हरवला आहे. पूर्वी पुण्यात प्रभात कंपनी होती त्या वेळी देव आनंदसहित अनेक प्रख्यात कलाकार मंडळी आवर्जून कॅफे गुड लक तसेच लकी रेस्टॉरंटमध्ये अड्डा जमवायला जात असत. पुढचा काळ कदाचित असा येईल, की मुंबई, पुणे, हैदराबाद या तीन शहरांमध्ये ज्या नाक्यांवर जिथे जिथे इराणी हॉटेल होती व नंतर ती बंद झाली, तिथे या हॉटेलांचा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांना सांगण्यासाठी नीलफलक लावावे लागतील... ‘इथे एक इराणी होता...’
sameer.p@dainikbhaskargroup.com
(समाप्त)
No comments:
Post a Comment