Friday, March 14, 2014

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुतळे बनले सामाजिक विद्वेषाचे `स्फोटक बाॅम्ब!' ( दैनिक सामना - ७ नोव्हेंबर १९९७)



या लेखाचा मुळ भाग







या लेखाचा उर्वरित भाग.







महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत थोर व्यक्तींच्या पुतळ्यांच्या विटंबनेचे जे प्रकार घडले तसे भविष्यात पुन्हा घडू नयेत म्हणून पुतळ्यांची निगा व संरक्षण यासंदर्भात महाराष्ट्र विधीमंडळाच्या १९९७ सालच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील एक विधेयक मंजूर होण्याची शक्यता होती. त्या विधेयकाचा मसुदा याअाधीच सर्वपक्षीय चर्चेसाठी खुला झाला होता. या पाश्वर्भूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर पुढे पाच वर्षे या कालावधीत पुतळ्यांच्या विटंबनेचे जे प्रकार घडले त्याचा विचार व्हायला हवा. त्याशिवाय १९२७ साली आॅर्किअाॅलाॅजिकल सर्व्हे आॅफ इंडियाने पुतळ्यांचे केलेले सर्वेक्षणही उद्बोधक अाहे. या गोष्टींचे विवेचन करणारा लेख मी दैनिक सामनाच्या ७ नोव्हेंबर १९९७ रोजीच्या अंकात पान क्र. १ वर लिहिला होता.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुतळे बनले सामाजिक विद्वेषाचे `स्फोटक बाॅम्ब!'

- समीर परांजपे



महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत थोर व्यक्तींच्या पुतळ्यांच्या विटंबनेचे जे प्रकार घडले तसे भविष्यात पुन्हा घडू नयेत म्हणून पुतळ्यांची निगा व संरक्षण यासंदर्भात महाराष्ट्र विधीमंडळाच्या १९९७ सालच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील एक विधेयक मंजूर होण्याची शक्यता होती. त्या विधेयकाचा मसुदा याअाधीच सर्वपक्षीय चर्चेसाठी खुला झाला होता. या पाश्वर्भूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर पुढे पाच वर्षे या कालावधीत पुतळ्यांच्या विटंबनेचे जे प्रकार घडले त्याचा विचार व्हायला हवा. त्याशिवाय १९२७ साली आॅर्किअाॅलाॅजिकल सर्व्हे आॅफ इंडियाने पुतळ्यांचे केलेले सर्वेक्षणही उद्बोधक अाहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रांतामध्ये १८८०च्या दशकात टिळक युग अस्तित्वात अाले. जहाल विचारसरणीने भारलेले क्रांतिकारक चापेकरांसारखे युवक छोट्या छोट्या घटनांतून ब्रिटिशांना हादरे देण्याच्या पवित्र्यात होते. भारताच्या इतिहासात देशभक्तीच्या भावनेने ब्रिटिश व्यक्तींच्या पुतळ्याची विटंबना करुन ब्रिटिशांना धक्के देण्याचा पहिला मान चाफेकर बंधूंना जातो. मुंबईतील फोर्ट भागात अाज जिथे टाटा टेलिकाॅमची (पूर्वीचे विदेश संचार निगम) गगनचंबी इमारत उभी अाहे त्या जागी १८९६च्या सुमारास राणी व्हिक्टोरियाचा पुतळा उभा होता. १६ अाॅक्टोबर १८९६ रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास चाफेकर बंधूंनी राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याच्या तोंडास डांबर फासले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर तुकडीतील बाळ मंगेश वागळे यांच्या घरातून पळविलेल्या जोड्यांचा हारही या पुतळ्यास घालण्यात अाला. हे काम एका हिंदूनेच केले अाहे असा अाशय असलेले एक निनावी पत्र चाफेकर बंधूंनी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याच्या हातात ठेवून ते पसार झाले. राणीच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे लक्षात येताच ब्रिटिश अधिकारी चांगलेच धास्तावले. अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी हा `पुणेरी भामट्यांचा' कट असल्याचा अारोप केला. या घटनेनंतर पुढे ११ वर्षांनी टी. के. गज्जर नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याच्या तोंडावरील डांबराचे डाग नाहीसे केले. 
राजकीय कारणासाठी पुतळा विद्रुप करण्याच्या भारतातील या पहिल्या घटनेनंतर इतर क्रांतिकारकांनीही हीच प्रथा पुढे चालविली. जानेवारी १९०१मध्ये पी. टी. जोशी व दामले या दोन युवकांनी नागपूरमधील राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याला डांबर फासले. त्यासाठी त्यांना अनुक्रमे दोन व एक वर्षांची कारावासाची शिक्षा झाली. याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अलाहाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने राणीच्या पुतळ्यावर डांबरे फेकले. मुंबईतील राणीचा जो पुतळा चाफेकरांनी विद्रुप केला होता त्याच पुतळ्याचे नाक १९४२च्या चलेजाव चळवळीत कोणा अज्ञात व्यक्तीने तोडले. या व अलाहाबादमधील पुतळा विद्रुप करण्याच्या घटनेमागचे सूत्रधार ब्रिटिश पोलिसांना शेवटपर्यंत सापडू शकले नाहीत.
१९२५च्या सुमारास ब्राह्मणेतर चळवळीने चांगलाच जोम धरला होता. यावर्षी चळवळीचे नेते केशवराव जेधे यांनी पुण्याच्या बुधवारपेठेत महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा अशा अाशयाचा ठराव स्थानिक महापालिकेत मांडला. अर्थात या ठरावाला उच्चवर्णीय सदस्यांनी बैठकीत विरोध करुन तो ठराव बहुमताने फेटाळला. यावेळी निर्माण झालेल्या जातीय वातावरणाचा खरपूस समाचार प्रबोधनकार ठाकरे यांनी ७ सप्टेंबर १९२५च्या `प्रबोधन' नियतकालिकाच्या अंकात `पुतळ्यांचा प्लेग' या शीर्षकाचा अग्रलेख लिहून घेतला. माझी जीवनगाथा या आत्मचरित्रवजा पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांनी महात्मा फुले पुतळा प्रकरणाविषयी म्हटले अाहे की, `पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील ब्राह्मणेतर तरुण रास्ता पेठेतील लोकमान्य टिळकांचा पुतळा तोडणार अशी अफवा उठल्याने गोर्या पोलिसांनी दहा दिवस टिळकांच्या पुतळ्याला कडे केले होते. याच काळात महात्मा फुले यांची बदनामी करणारी एक पुस्तिका त्यांचा पुतण्या म्हणविणार्या व्यक्तीने छापून बाजारात अाणली होती. शेवटी पुण्याच्या गढूळ वातावरणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा विषय अपूर्णच राहिला.' पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात महात्मा फुुले यांचा पुतळा सन्मानाने स्थापित करण्यात अाला. तसेच रास्ता पेठेतील महात्मा फुले यांचे निवासस्थान हे राज्य पुरातत्व खात्याने संरक्षित वास्तू म्हणून उत्तमप्रकारे जतन केले अाहे.
एखाद्या व्यक्तीच्या दुराग्रही स्वभावामुळे पुतळ्याबद्दल राजकारण कसे घडते याचे उत्तम उदाहरण प्रबोधनकारांच्याच `माझी जीवनगाथा' या पुस्तकामधील जुन्या अाठवणी या विभागात देण्यात अाले अाहे. सर फिरोजशहा मेहता या १९ व्या शतकातील कर्तबगार पुढार्याचा उल्लेख `लायन आॅफ बाॅम्बे' असा होत असे. मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर जिथे फिरोजशहा मेहता यांचा पुतळा ज्या चबुतर्यावर उभा अाहे ती जागा १८९०च्या सुमारास रिकामी होती. छत्रपती शाहू महाराजांनी स्वत: एक लाख रुपये खर्चून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची परवानगी मुंबई महानगरपालिकेकडे मागितली होती. तेव्हा `मुंबईच्या विकासात ज्यांनी योगदान दिले त्यांचेच पुतळे या शहरात उभारायला हवेत. शिवाजी महाराजांचा या शहराशी संबंध काय?' असा सवाल करुन फिरोजशहा मेहता यांनी या ठरावाला मुंबई महानगर पालिकेच्या बैठकीत विरोध केला. त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभारण्याचा प्रस्ताव बारगळला. काही वर्षांनी पंचम जाॅर्ज याच्या राज्याभिषेकाच्या मुहूर्तावर त्याचा पुतळा या चबुतर्यावर उभारावा अशी मागणी केल्यावर मेहतांनी हाही ठराव उलथून पाडला. शेवटी फिरोजशहा मेहता यांच्या निधनानंतर त्यांचाच पुतळा या चबुतर्यावर उभारण्यात अाला.पण कालगती अशी विचित्र अाहे की, ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फिरोजशहा मेहता यांनी प्राणपणाने विरोध केला होता त्याच शिवाजी महाराजांचे नाव स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९९०च्या दशकात बोरीबंदर रेल्वेस्थानकाला देण्यात अाले. अाज हे छत्रपती शिवाजी टर्मिनस सतत डोळ्यासमोर पाहात फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्याला त्या चबुतर्यावर दिवस काढावे लागत अाहेत!
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात अाले. १९६५ साली बाबू मुंबारकर या नेत्याने मुंबईतील प्रमुख ठिकाणी असलेले ब्रिटिश अधिकार्यांचे पुतळे तेथून हटवावे या मागणीसाठी जोरदार अांदोलन केले व ते पुढे जाॅर्ज फर्नांडिस यांनी उचलून धरले. पुढे १२ अाॅगस्ट १९६५ रोजी ब्रिटिश राजे-राणी, अधिकार्यांचे सर्व पुतळे तेथून उचलून भायखळा येथील जिजामाता उद्यानात नेऊन ठेवण्यात अाले. मुंबईतील रमाबाई अांबेडकर नगरामध्ये डाॅ. बाबासाहेब अांबेडकर य़ांच्या पुतळ्याची झालेली विटंबना  सडक्या जातीयवादी प्रवृत्तींनीच केलेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या पुतळ्यांची जी विटंबना भारतीयांकडून केली जात असे त्यामागे देशप्रेमाचा उदात्त हेतू होता हे लक्षात येईल. स्वातंत्र्यानंतर मात्र पुतळे हे दुसर्यांबद्दलचा विद्वेष प्रकट करण्यासाठी तोडले-फोडले जाऊ लागले. ते सामाजिक तणावाचे स्फोटक बाॅम्बच बनले.
 उद्बोधक सर्वेक्षण
पुतळ्यांची निगा व संरक्षणासंदर्भात जो प्रस्तावित कायदा महाराष्ट्र शासनाने करण्याचे ठरविले होते त्यात पुतळ्यांचे वर्गीकरण कसे करावे याबद्दल काही कलमे अाहेत. या अनुषंगाने अाॅर्किअाॅलाॅजिकल सर्व्हे अाॅफ इंडिया या पुरातत्त्वशास्त्राशी संबंधित केंद्र शासनाच्या खात्याने मुंबईतील ६९ पुतळ्यांचे १९२९ साली केलेेले सर्वेक्षण अत्यंत बोलके अाहे.या सर्वेक्षणात मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, इमारतींमध्ये असलेल्या सर्वच महत्त्वाच्या पुतळ्यांची नोंद करण्यात अाली असूनही ही वर्गीकरण पद्धती अाजही उपयोगी पडू शकते.
महाराष्ट्र शासनाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पुराभिलेखागार कार्यालयात या सर्वेक्षणाची मुळ प्रत उपलब्ध अाहे. या सर्वेक्षणात मुंबईतील तत्कालीन पुतळ्यांचे वर्गीकरण करताना तो पुतळा कोणाचा अाहे, त्या व्यक्तीचे ऐतिहासिक महत्त्व काय? त्या पुतळ्याची उंची व तो कशापासून बनविला गेला अाहे, तो कोणी व किती साली बनविला व किती साली विशिष्ट ठिकाणी बसविला, या पुतळ्याची देखभाल कोणती संस्था करते याची सारी माहिती मिळवून त्याचा एक तक्ताच त्यावेळी अाॅर्किअाॅलाॅजिकल सर्व्हे अाॅफ इंडियाने प्रसिद्ध केला होता. 
मुंबई बेट हे भूकंपाच्या अनेक धक्क्यांपासून निर्माण झाले असून या बेटाचा एस्प्लनेड व माहिम हा भाग पहिल्यांदा पाण्याखालून भूपृष्ठावर आल्याचे भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात. १९२७ सालची मुंबई लक्षात घेता त्यावेळी फोर्ट, व्ही. टी., गिरगाव, परळ, भायखळा, माझगाव, दादर याच भागांमध्ये अनेक उलाढाली होत असत. त्यामुळे मुंबईतील नामवंतांचे पुतळे याच भागात केंद्रित झालेले अाढळतात. अाॅर्किअाॅलाॅजिकल सर्व्हे अाॅफ इंडियाच्या या सर्वेक्षणामध्ये एस्प्लनेड विभागातील शोराबजी शापुरजी, लाॅर्ड सॅडहर्स्ट, लाॅर्ड रे, अल्बर्ट एडवर्ड, प्रिन्स अाॅफ वेल्स, कावसजी जहांगीर रेडिमनी, थाॅमस अाॅर्मिस्टाॅर्न, सर फ्रँक हेन्री साऊटर नाईट, पेस्तनजी होरमासजी कामा, सर बार्टर फ्रियर, हेन्री फाॅनेट, जेम्स गिब्ज, जाॅन विल्सन, सर जाॅर्ज बर्टवूड, जेम्स बर्कले, ड्यूक अाॅफ वेलिंग्टन, सर सँथमोर फिटरगाल्ड यांच्या पुतळ्यांची दखल घेतली अाहे. तर टाऊन हाॅलमधील सर चार्ल्स फोर्बस, जगन्नाथ शंकरशेठ, जमशेदजी जिजीभाॅय़, जाॅन लाॅर्ड एल्फिन्स्टन, स्टिफन बॅलिंग्टाॅन, एच. बार्टल फ्रियर, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, चार्लस् कोरिया यांच्या पुतळ्यांचीही या सर्वेक्षणात नोंद करण्यात अाली अाहे.
फोर्ट विभागातील व्हिक्टोरिया राणी, डाॅ. थाॅमस ब्लानेय, धरमजी मुळजी, बोमानजी होरमजी, जाॅर्ज हेन्री, ई,. सी. के. अाॅलिव्हंट, सर फ्रँक साऊटर, हेन्री अर्थबुथनाॅट, रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक, किवन एम्प्रेस आॅफ इंडिया, विलियम हाॅर्वे, थाॅमस ब्लेने, जाॅन न्यूगंट या पुतळ्यांचा सदर सर्वेक्षणात समावेश अाहे. जे. जे. हाॅस्पिटलच्या अावारातील जमशेदजी जिजीभाॅय, करसेटजी जमशेदजी, दिनशा माणिक पेटिट, विल्यम जेम्स मूर, कावसजी जहांगीर, दिनशा वाच्छा, डोंगरी भागातील केशवजी नाईकांचा पुतळा असलेले कारंजे, ग्रँट मेडिकल काॅलेज अावारातील चार्लस मोरहेड, बाॅलिंगाॅल, डाॅ. राॅबर्ट हेन्स, जमशेदजी जिजीभाॅय, जाॅन पीट, भायखळा भागातील करसेटजी माणेकजी, प्रिन्स अल्बर्ट, शेठ नावेदजी राघवजी, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, लाॅर्ड नाॅर्थब्रुक, प्रिन्स अाॅफ वेल्स, लेडी फिअर, डेव्हिड ससून तर गिरगावातील देवीदास प्रेमजीवनदास अशा सुमारे ६९ पुतळ्यांचा या सर्वेक्षणात समावेश अाहे.
या पुतळ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी तत्कालीन मुंबई प्रांत सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव यांच्यात विभागली गेली होती असे या सर्वेक्षणातील नोंदींवरून दिसते. अाॅर्किअाॅलाॅजिकल सर्व्हे अाॅफ इंडियाने मुंबई शहरात भेट द्यायला येणार्या पर्यटकांना पुतळे पाहाता यावेत यासाठी हे सर्वेक्षण हाती घेण्यात अाले होते. ज्या नेटकेपणाने हे सर्वेक्षण केले गेले ती पद्धती महाराष्ट्रातील सर्वच पुतळ्यांची गणना व वर्गीकरणाबाबत कायम राखता येईल. असे याअाधीच झाले असते तर अाज अनधिकृत पुतळ्यांचा जो प्रश्न उग्र झाला अाहे तसा तो झाला नसता असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे मत अाहे. पुतळ्यांसंदर्भात प्रस्तावित कायदा संमत होत असताना अाॅर्किअाॅलाॅजिकल सर्व्हे अाॅफ इंडियाने  १९२९ साली केलेल्या सर्वेक्षणाकडेही महाराष्ट्र सरकारने लक्ष देणे गरजेचे होते. मात्र तसे काहीच झाले नाही. व पुतळ्यांची देखभाल करण्यासाठी होणारा प्रस्तावित कायदाही महाराष्ट्र विधीमंडळात मंजूर न झाल्याने हा सगळा विषयच पुढे बारगळला. सद्सद् विवेकबुद्धीला हार पत्करावी लागते ती अशी!

No comments:

Post a Comment