15 जानेवारी 1956 रोजी जन्मलेल्या मायावतींचा आज वाढदिवस असून, मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या वाढदिवसाचे जंगी सोहळेही अत्यंत वादग्रस्त ठरत आलेले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी चौथ्यांदा विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. 1993 मध्ये समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून संपादिलेल्या यशाच्या बळावर वयाच्या 39 व्या वर्षी त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या राज्याच्या पहिल्या दलित महिला मुख्यमंत्रीही ठरल्या. त्यानंतर 1997 तसेच 2002 मध्ये भाजपशी आघाडी करून मायावती या पुन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. आता त्या पुन्हा चौथ्यांदा या पदावर कार्यरत आहेत. मायावती म्हणजे वादांचे आगरच आहे. त्यांच्या संपत्तीत पडलेली कोट्यवधी रुपयांची भर हे देशातील भ्रष्टाचार किती वाढला आहे याचे निदर्शक आहे अशी चर्चा त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने केली जाते. मायावती यांनी कांशीराम तसेच बहुजन समाज पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला हत्ती तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उभारलेल्या पुतळ्यांवरूनही खूप वादंग माजले. यातील काही पुतळे झाकण्याचे आदेश उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिल्याने मायावती या अजून चर्चेत आल्या. बसपातील बाबूसिंह कुशवाह तसेच बसपाच्या कलंकित मंत्र्यांवर मायावतींनी उ्त्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारवाई केली हे सत्यही काही लपून राहिलेले नाही. मायावती यांचे राजकीय गुरू व मार्गदर्शक कांशीराम यांच्या शिकवणीप्रमाणे प्रारंभी उत्तर प्रदेशची सत्ता हस्तगत करण्यासाठी दलित राजकारणावर मायावतींनी अधिक भर दिला होता. मात्र, काळाच्या ओघात मायावतींनी राजकीय पाया विस्तारण्यासाठी उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांसह अन्य उच्चवर्णीयांनाही बसपाशी जोडून घेण्याचे प्रयत्न केले. त्याचा त्यांना फायदाही झाला. मायावतींचे सोशल इंजिनिअरिंग म्हणतात ते हेच. मात्र, या साºया कृती फक्त राजकारणासाठी असल्याने त्यातून फार मोठे सामाजिक अभिसरण किंवा प्रबोधन होईल अशी आशा करणे चुकीचे ठरेल.
उत्तर प्रदेशात एका बाजूला काँग्रेसचा संपूर्ण सफाया झालेला असताना समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग हे मायावतींना कायमच राज्यात कडवे आव्हान उभे करीत आले आहेत. मुलायमसिंग यांची कारकीर्दही वादग्रस्तच असली तर मायावती याबाबतीत मुलायमसिंगांपेक्षा नक्कीच वरचढ आहेत. ताज कॉरिडोर बांधकामातील घोटाळ्यासंदर्भात मायावती यांच्या निवासस्थानावर 2003 मध्ये सीबीआयने छापा मारला होता. त्याच्यानंतर दोन दिवसांनी मायावतींविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला. जाहीर संपत्तीपेक्षा अधिक मालमत्ता बेकायदेशीर मार्गाने गोळा केल्याचा गुन्हा मायावतींवर पुढे दाखल करण्यात आला. ताज कॉरिडोर घोटाळाप्रकरणी मायावती यांच्यावर खटले चालविण्यासाठी ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे विधान 2007 मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल टी. व्ही. राजेश्वर यांनी केले. त्यांच्या या निर्णयाला वकिलांनी न्यायालयात आव्हान दिले. मायावतींवर ताज कॅरिडोर घोटाळाप्रकरणी खटले चालविण्याची परवानगी मागणारी सीबीआयने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानेही पुढे फेटाळून लावली. त्यामुळे मायावतींवर या प्रकरणी उभा राहू पाहणारा खटला सुनावणीला येण्याआधीच संपला.
मायावती या अशा अनेक गोष्टींतून कायम चर्चेत राहिल्या. त्याच्यातून त्यांनी वादही ओढवून घेतले. 2007-08 या आर्थिक वर्षामध्ये मायावती यांनी 26 कोटी रुपये प्राप्तीकर भरला. देशात सर्वाधिक प्राप्तिकर भरणाºया पहिल्या 20 व्यक्तींच्या यादीत मायावती यांचे नावही त्यामुळे सामील झालेले होते. मायावती यांनी बेकायदा मार्गांनी संपत्ती गोळा केल्याच्या सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात मायावती व त्यांचा पक्ष बसपाचे असे म्हणणे होते की, पक्षकार्यकर्ते, नेते यांनी सप्रेम भेटीदाखल दिलेल्या वस्तू व रोख रक्कम यांच्यातून मायावतींकडे ही संपत्ती जमा झालेली आहे. त्यामुळे तिला बेहिशेबी असे म्हणणे अयोग्य आहे. अशा भेटवस्तू मायावतींना त्यांच्या वाढदिवसाच्या जंगी सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या आहेत. मायावती यांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केली नसल्याच्या इन्कमटॅक्स अॅपलेट ट्रायब्यूनलने दिलेला निर्वाळा योग्य आहे या दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने अलीकडेच घेतला आहे. कारण मायावतींच्या विरोधात केंद्र सरकारने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने 3 ऑगस्ट 2011 रोजी फेटाळून लावली होती ही पार्श्वभूमीही केंद्र सरकारच्या ‘शहाणपणाला’ आहे. मायावती यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, राजकारणाचे असे अनेक वादग्रस्त पैलू आहेत की, ज्यांच्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणात कधी फटका बसला आहे तर कधी फायदा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांत मायावतींना कितपत यश मिळेल हेही यथावकाश स्पष्ट होईलच.
sameer.p@mh.bhaskarnet.com
----------
No comments:
Post a Comment