‘असा घडला भारत’ या पुस्तकाच्या
निमित्ताने अक्षरधारा व रोहन प्रकाशनच्या संयुक्त विद्यमाने ‘कसा घडला भारत’ या विषयावर
औरंगाबाद येथे २१ एप्रिल २०१३ रोजी एका परिसंवादाचे
आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘असा घडला भारत’ या पुस्तकाची ओळख करुन देणारा लेख मी दै. दिव्य मराठीच्या २१ एप्रिल २०१३च्या अंकात
लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
गाथा आधुनिक भारताची...
- समीर परांजपे
खादा भूप्रदेश हा देश म्हणून आकाराला येण्यासाठी अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक घडामोडी
कारणीभूत ठरत असतात. तद्वत मोगल, ब्रिटिश शासकांच्या
स्थिरावण्यातून भारतात हिंदू धर्माशिवाय इतर अनेक धर्मही रुजले. या सर्व धर्मांच्या
परस्पर सहकार्य, द्वेष, त्वेषातून विविधतेतही एकतेचा धागा असलेली
संस्कृती जन्माला आली. दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र
झाला. त्यानंतर स्वकियांची लोकशाही तत्त्वांवर आधारित राजवट भारतात
प्रस्थापित झाली. स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे उद्दिष्ट अशा
तऱहेने गाठले गेल्यानंतर त्याच्या पुढचा टप्पा होता तो म्हणजे
भारतीयांच्या कल्याणासाठी सरकारने झटणे, त्यांना सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे. १९४७ ते आजपावेतोच्या कालावधीवर नजर टाकली तर त्याचे देशातल्या विविध सामाजिक व राजकीय घटनांच्या दृष्टीने विविध टप्पे पाडावे लागतील. त्यांच्या अवलोकनातूनच ‘भारत कसा घडला’ हे समजून घेणे सोपे जाईल. नेमकी हीच दृष्टी बाळगून रोहन प्रकाशनने ‘असा घडला भारत’ या बृहद्ग्रंथाची निर्मिती केली आहे.
भारतीयांच्या कल्याणासाठी सरकारने झटणे, त्यांना सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे. १९४७ ते आजपावेतोच्या कालावधीवर नजर टाकली तर त्याचे देशातल्या विविध सामाजिक व राजकीय घटनांच्या दृष्टीने विविध टप्पे पाडावे लागतील. त्यांच्या अवलोकनातूनच ‘भारत कसा घडला’ हे समजून घेणे सोपे जाईल. नेमकी हीच दृष्टी बाळगून रोहन प्रकाशनने ‘असा घडला भारत’ या बृहद्ग्रंथाची निर्मिती केली आहे.
‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत कसा घडत गेला, या विषयी साद्यंत
माहिती एकत्रितपणे मिळविण्याची सुविधा ‘असा घडला भारत’ या ग्रंथामुळे
झाली आहे. अशा प्रकारचा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा प्रयोग इंग्रजी व हिंदी
भाषेमध्ये अद्याप झालेलाच नाही. त्यामुळे ‘असा घडला भारत’चा इंग्रजी
व हिंदी भाषेतही अनुवाद व्हायला हवा.’
असे प्रतिपादन ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे माजी मुख्य
संपादक दिलीप पाडगावकर यांनी या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी काढले होते, ते अगदी सार्थ
आहेत.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची राज्यघटना कशी असावी, या देशाने कोणत्या
स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावा, समाजातील सर्व
वर्गांच्या कल्याणासाठी कोणत्या योजना राबवाव्यात, असा खल समाजधुरीणांमध्ये
सुरू झाला. त्यातूनच अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले गेले. महत्त्वाकांक्षी
पावले उचलली गेली. त्याचे जे भलेबुरे परिणाम भारताच्या जडणघडणीवर झाले त्याच पायावर आजचा भारत उभा आहे. ‘असा घडला भारत’ या ग्रंथाचे
साक्षेपी संपादक मिलिंद चंपानेरकर व सुहास कुलकर्णी यांनी या गोष्टीचे भान राखूनच सदर
ग्रंथाला आकार दिला आहे. त्यासाठी या ग्रंथामध्ये कालावधीचे १९४७ ते १९५०, त्यानंतर १९५१ ते १९६०, १९६१ ते १९७०, १९७१ ते १९८०, १९८१ ते १९९०, १९९१ ते २०००, २००१ ते २०१२ असे टप्पे पाडण्यात
आलेले आहेत. या टप्प्यांत देशातल्या सर्वच क्षेत्रांतील महत्त्वाच्या
व मूलगामी घडामोडींच्या नोंदी आवश्यक तितक्या शब्दांत व विवेचक रीतीने दिलेल्या आहेत. या नोंदी वाचताना
त्यातून योग्य अर्थवहन होतेच, शिवाय त्याविषयी ज्यांना अधिक जाणून घ्यायचे
असेल त्यांच्याकरिता अधिकचे संदर्भही पुरवण्यात आलेले आहेत. या ग्रंथाला
दै. ‘दिव्य मराठी’चे माजी मुख्य संपादक कुमार केतकर यांची विद्वत्तापूर्ण
प्रस्तावना लाभलेली आहे.
फाळणी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण
ते भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेपर्यंतच्या १९४७ ते १९५० या कालखंडातील
भारतातल्या घडामोडींचा आढावा या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. राज्यघटना निर्मितीचे
काम २५ नोव्हेंबर १९४९ला पूर्ण होऊन २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय
प्रजासत्ताकाची घोषणा झाली व राज्यघटना अमलात आली. १९५० मध्ये भारतीय
लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५०च्या अखेरपर्यंत
व पुढच्या काळातही विविध क्षेत्रांतील प्रगतीसाठी मूलभूत ठरतील, अशा अनेक संस्था निर्माण केल्या गेल्या. पं. नेहरू यांच्या
दूरदर्शी नेतृत्वामुळेच हे महान कार्य घडू शकले. त्यानंतरचा
दुसरा टप्पा हा १९५१ ते १९६०चा असून त्याचे
महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. १९५१मध्ये स्वतंत्र भारतातील
पहिली जनगणना, लोकसंख्या वाढीवरील नियंत्रणासाठी कुटुंबनियोजन कार्यक्रमाची
मुहूर्तमेढ, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रवर्तन, जमीन सुधारणा
कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पहिली घटना दुरुस्ती, भारतातील रेल्वे
सेवेचे राष्ट्रीयीकरण अशा अनेक घडामोडींचे संदर्भ या पुस्तकात पाहताना आपण विविध दशकांचे
टप्पे ओलांडत २०१२पर्यंत येऊन थडकतो.
१९४७पासून भारताने अणुऊर्जेपासून ते हरित क्रांतीपर्यंतच्या
अनेक क्षेत्रांत वेगाने प्रगती केली. मात्र, भारतात आजही
गरिबी, निरक्षरता, आर्थिक विषमता, सामाजिक विषमतेचा
जाच अशा अनेक समस्या तितक्याच उग्र स्वरूप धारण करून आहेत. आपल्या देशात
अफाट लोकसंख्या आहे. या गोष्टींशी झुंजत देशाची प्रगती साधणे ही वाटते
तितकी सोपी गोष्ट नाही, याचे भान पुस्तक वाचताना येत जाते. १९७७मध्ये इंदिरा
गांधी यांनी आणीबाणी पुकारल्यानंतरच्या काळात देशात त्यांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण
तयार झाले. त्यातून जनता पक्ष अस्तित्वात आला. पुढे इंदिरा
गांधी यांचा पराभव करून जनता पक्ष अडीच वर्षे सत्तेवर आला व कालांतराने आपापसातील अंतर्गत
मतभेदांमुळे त्या पक्षाचे सरकार गडगडले. आणीबाणीचा हा कालखंड
राजकीयदृष्टय़ा सर्वात वादग्रस्त मानला जातो. देश घडत असताना
रा. स्व. संघाच्या प्रेरणेने स्थापन झालेला जनसंघ, मग भाजप हे
राजकीय पक्ष, तर दुसऱया बाजूला अल्पसंख्याकांमधील मूलतत्त्ववाद्यांच्या
वाढत्या संघटना यातून देशातील विद्वेषाचे वातावरण वाढीला लागले. खलिस्तानच्या
मागणीसाठी पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी कारवाया, सुवर्णमंदिरावर
झालेली कारवाई, इंदिरा गांधी यांची झालेली हत्या, राजीव गांधी
यांची कालांतराने झालेली हत्या अशा घटना वेगाने देशात घडत गेल्या. भारताचे शेजारी
असलेले पाकिस्तान, चीन यांच्याशी आपली युद्धे झाली.
काश्मीरचा प्रश्न वारंवार उकरून काढणाऱया पाकिस्तानने १९९९मध्ये कारगिलवर
आक्रमण केले. चीनने सध्या अप्रत्यक्षपणे भारताची अनेक बाजूंनी कोंडी करण्याचा
प्रयत्न चालवला आहे. शीतयुद्ध व शीतयुद्धोत्तर काळात सोव्हिएत रशियाने
भारताला आर्थिक, लष्करी, तंत्रज्ञानविषयक सबळ सहकार्य केले. सोव्हिएत रशियाचे
विघटन झाल्यानंतर जागतिक परिस्थिती बदलली. अमेरिकेचे वर्चस्व
आणखी वाढले. १९९१मध्ये भारतात आर्थिक उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर
ते आजपावेतो देशाने प्रगतीचा पुढचा टप्पा गाठलेला आहे. अणुसंशोधन, अवकाश संशोधन, उपग्रह प्रक्षेपणापर्यंत
भारताच्या प्रगतीचा झपाटा विलक्षण आहे. हा सारा पट आपल्याला
‘असा घडला भारत’ या पुस्तकातून नेमका टिपता येतो. बाबरी मशीद
हिंदुत्ववाद्यांनी उद्ध्वस्त करणे, मुंबईत झालेली बॉम्बस्फोट मालिका, गोध्रामध्ये
घडलेले रेल्वे जळीत प्रकरण, त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या भयंकर
जातीय दंगली, त्यात अल्पसंख्याकांना वेचून त्यांची घडवण्यात आलेली हत्याकांडे, गुजरातमध्ये
मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची सत्ता अधिक बळकट होणे, अशा अनेक घटनाही
गेल्या दोन दशकांत घडलेल्या आहेत. त्याच्या विश्लेषक
नोंदी ‘असा घडला भारत’ या ग्रंथामध्ये वाचायला
मिळतात. स्थलमर्यादेअभावी या बृहद्ग्रंथाची सविस्तर ओळख इथे करून
देणे शक्य नाही. मात्र, महासंगणकपर्वाची सुरुवात ते सचिन
तेंडुलकरच्û शंभराव्û शतक असे अनेक
विषय या ग्रंथात समाविष्ट आहेत. सामाजिक, राजकीय घडामोडींमध्ये
रस असणारे वाचक, लेखक, पत्रकार, प्राध्यापक, वकील, शालेय, महाविद्यालयीन
विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी, पीएच. डी. करणारे संशोधक
अशा सार्यांसाठी ‘असा घडला भारत’चे महत्त्व
अनन्यसाधारण आहे.
sameer.p@dainikbhaskargroup.com
असा घडला भारत
संपादक - मिलिंद चंपानेरकर, सुहास कुलकर्णी
प्रकाशक - रोहन प्रकाशन, पृष्ठसंख्या -९२४
No comments:
Post a Comment