पं. हृदयनाथ मंगेशकर यांची २३ जानेवारी २००० रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मी घेतलेली विशेष मुलाखत. त्या मुलाखतीचा उर्वरित भाग.
प्रख्यात संगीतकार
हृदयनाथ मंगशेकर यांची मी घेतलेली ही मुलाखत दै. सामनाच्या २३ जानेवारी २०००च्या
अंकात प्रसिद्ध झाली होती. मुलाखतीचा विषय होता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!! शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तित्वामधील भावलेल्या गोष्टींविषयी हृदयनाथ मंगेशकर
या मुलाखतीत माझ्याशी भरभरून बोलले. २३ जानेवारी हा शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस.
त्या दिवशी दै. सामनाच्या वतीने दरवर्षी भलाथोरला विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतो. २३ जानेवारी २००० रोजीच्या विशेषांकात ही मुलाखत अग्रक्रमाने छापून आली होती.
शिवसेनाप्रमुखांचा
पिंड सच्च्या कलावंताचा...
- समीर परांजपे
हिंदुहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मूळचा पिंड सच्च्या कलावंताचा आहे. त्यामुळे
ते आपले विचार अत्यंत पोटतिडकीने व एका तडफेने मांडतात. सच्चा कलावंत हा बेफिकीर
असतो. त्याच्या मनात जे विचार येतात, तेच विचार तो लोकांसमोर मांडतो. त्याचे
परिणाम काय होतील अशा भीतीने तो स्वत:च्या भूमिका बदलत नाही की तोलून मापून शब्द
वापरत नाही. शिवसेनाप्रमुखांचे परखड बोल याच जाणीवेतून येतात. त्यामुळेच त्यांचे
व्यक्तित्व मला प्रिय आहे. मी तर म्हणेन शिवसेनाप्रमुख हे कलावंतच असल्याने आज
सार्या भारतात लोकप्रिय ठरले आहेत अशा शब्दांत ख्यातनाम संगीतकार पंडित हृदयनाथ
मंगेशकर यांनी शिवसेनाप्रमुखांचे व्यक्तिचित्र रेखाटण्यास प्रारंभ केला.
महाराष्ट्राच्या
रंगभूमीस ललामभूत ठरलेल्या मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची जन्मशताब्दी संपूर्ण
देशभरात साजरी होत आहे. मा. दिनानाथांची थोरवी सुकन्या लतादीदी मंगेशकर यांनी
आपल्या स्वरांनी अवघी दुनिया मोहून टाकली आहे. त्याचबरोबरीने आशा भोसले, पं.
हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर या भावंडांनीही आपल्या स्वरगंगेत
रसिकजनांना न्हाऊ घातले आहे. मंगेशकर घराण्यातील प्रत्येक व्यक्तीला
शिवसेनाप्रमुखाविषयी खास आत्मीयता आहे. त्याचेच दर्शन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या
शब्दाशब्दांतून व्यक्त होत होते.
शिवसेनाप्रमुख हे एक
आगळेच रसायन आहे असे सांगू पं. हृदयनाथ मंगेशकर भूतकाळात रमून गेले. ते म्हणाले `मला आठवते की, तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट या
कितांबांनी मंडित झालेले नव्हते. मी १९६३-६३ या काळातील गोष्ट सांगतोय तुम्हाला.
आचार्य अत्रे यांच्या `मराठा’मध्ये मी थोडेबहुत लिहायचो.
त्या कामासाठी शिरीष पै यांना भेटायला जायचो. एकदा शिरीष पै यांनी मला बाळासाहेब
ठाकरे यांचे दुरुन दर्शन घडविले. ते प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपूत्र असल्याचे
शिरीषताईंनी मला सांगितले होते. मी मास्टर दिनानाथांचा मुलगा आहे हे त्यावेळेपर्यंत
शिवसेनाप्रमुखांना माहितीही नव्हते. `मार्मिक’मधून बाळासाहेबांची
व्यंगचित्रे, लेखन मी वाचायचो. मला आठवते गारंबीचा बापू हे नाटक लंडनला जायला
निघाले होते, त्या समारंभाचे अध्यक्ष म्हणून शिवसेनाप्रमुख उपस्थित होते. तेव्हा
माझी बाळासाहेबांशी पहिली भेट झाली. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही त्यावेळी गप्पा मारल्या
होत्या. ’
हृदयनाथ मंगेशकर
सांगत होते `मार्मिककार, शिवसेनाप्रमुख व हिंदुहृदयसम्राट
होण्यापर्यंतचा बाळासाहेब ठाकरे यांचा मी अत्यंत जिज्ञासेने न्याहाळतो आहे.
भारतातील राजकारणी पुरुष म्हणून मला प्रथम भगवान श्रीकृष्णाचे असीम आकर्षण आहे.
त्यानंतर चाणक्य हा जरी कुटनितीज्ञ असला तरी त्याच्या नीतीचा मी अत्यंत चाहता आहे.
त्यानंतर छत्रपती शिवराय हे तर कालातीत पुरुषच होते. श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती
शिवराय यांची वैशिष्ट्ये आपल्या विचारांत बाणवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतात
हिंदुत्ववादी विचारांचा ठामपणे प्रचार केला. सावरकरांसारख्या तेजस्वी पुरुषाच्या
निर्वाणानंतर एक गॅप निर्माण झाली होती, पण ती पोकळी भरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे यांनी भरुन काढली. भगवान श्रीकष्णाची राजनीती, चाणक्यनीती, छत्रपती
शिवरायांचा हिंदवी स्वराज्याचा विचार, स्वा. सावरकरांचा हिंदुत्ववाद या चारही
विचारधारांना एका धाग्यात गुंफून ते विचार पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आहेत. शिवसेनाप्रमुख सच्चे कलावंत असल्याने
त्यांचे विचार सडेतोड आहेत. त्यात परिणामांची पर्वा न करण्याचा थोडासा अविचारही
असेल कदाचित, पण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना त्यांच्या प्रतिभेचा स्पर्श असतो. ’
`या पार्श्वभूमीवर दुसरे राजकारणी बघा. त्यांच्या शब्दांना
प्रतिभेचे कोंबच फुटत नाहीत. ते शब्द तोलून मापून बोलतात. लोकांची नाडी गवसली की
गोड गोड शब्द बोलून जनतेला झुलवतात. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुखांसारख्या
सडेतोड व्यक्तिमत्त्वाच्या माणसांच्या विचारांचा विपर्यास केला जातो. आपल्या
समाजात उदारमतवादी बुद्धिवंतांचा जो एक मोठा कळप वावरत असतो, ते कायम
शिवसेनाप्रमुखांवर टीकेचे आसूड ओढत असतात. अशा विचारवंतांमुळेच आपल्या समाजाचे
मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसांच्या
न्याय्य हक्कांबद्दल संघर्ष केला. आज मुंबईत मराठी माणसे राहतात. कानांना मराठी
भाषा ऐकायला मिळते. याचे श्रेय शिवसेनाप्रमुखांनाच आहे. ते ऋण सर्वांनीच मान्य
करायला हवे. ’
हृदयनाथ मंगेशकर यांचा
बोलण्याचा ओघ अधिक धारदार बनला होता `शिवसेनेचा व्याप जसजसा वाढत गेला तसतसा
शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकांतही बदल होऊ लागला. अलीकडच्या काळात हिंदुत्वाची
भूमिका शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण भारतात एकट्यानेच ठामपणे मांडली आहे. छत्रपती
शिवरायांनी मांडलेल्या हिंदवी स्वराज्याची कल्पना हा शिवसेनाप्रमुखांच्या
हिंदुत्ववादी संकल्पनेचा गाभा आहे. नाहीतर रा. स्व. संघ, जनसंघ, भाजप हे सोयीस्करपणे
हिंदुत्वाची भूमिका मांडत असतात. पितृभू, पुण्यभूबरोबरच जो हा देश आपली मातृभूमी
आहे असे जो म्हणेल ती भारतातील कोणतीही व्यक्ती ही हिंदूच आहे अशी व्यापक व्याख्या
सावरकरांनी मांडलेली होती. या हिंदुत्त्वाशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे
अतिशय जवळचे नाते आहे. ’
`शिवसेनाप्रमुख हे मुळातले कलावंत असल्याने, त्यांच्या लाखो लोकांच्या
उपस्थितीत सद्यस्थितीत होणार्या सभाही चांगल्याच रंगतात. यामध्ये बाळासाहेब ठाकरे
श्रोत्यांशी संवाद साधतात. त्यांच्या अनेक सभांना मीही उपस्थित राहिलेलो आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या भाषणांमध्ये गमतीदार विनोद असतात. विनोद पेरत पेरत, हशा पिकवत
ते लाखो लोकांना अक्षरश: मंत्रमुग्ध करतात. मुसोलिनी, चर्चिल, हिटलर या
नेत्यांनीही आपल्या सभांमधून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्याचे आढळून येईल. या
अलौकिक गुणांमुळेच आज शिवसेनेचा इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्याचे आढळून
येईल. मी तर म्हणेन, शिवसेनेचा पायाहा शिवसेनाप्रमुखांनीच घातला व शिवसेनेचा कळसही
शिवसेनाप्रमुखच आहेत. आज चित्र काय दिसते, तर अन्य पक्ष हे उघडपणे जाती-पातीचे,
धर्माचे राजकारण करीत असतात, मात्र शिवसेनाप्रमुखांनी जाती-पातीच्या राजकारणात
कधीही रस घेतला नाही. तरीही शिवसेनाप्रमुखांवर जातीयवादी राजकारण केल्याचा आरोप
केला जातो तेव्हा वाईट वाटते. शिवसेनाप्रमुखांवर अनेकदा उगीचच टीका होते. ’
हृदयनाथ मंगेशकर
पुढे म्हणाले `छत्रपती शिवरायांना अपयश हा शब्दच जणू माहीत नसावा.
त्यांच्या धोरणामुळे ते कालातीत ठरले. स्वा. सावरकर यांना अपयश खूप मोठे आले पण
त्यांनी आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेचा कधीही त्याग केला नाही. शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे हेही एकदा मांडलेला विचार किंवा भूमिका बदलत नाहीत, परखडपणे बोलणे
हे त्यांचे वैशिष्ट्यच आहे. या गुणांमुळेच शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर येऊ शकली.
राजकारणात काहीवेळा अपयश येते. निवडणुकांमध्ये नुकतेच शिवसेनेला सत्तेवरुन पायउतार
व्हावे लागले. पण यश असो वा अपयश, या दोन्हींमध्ये शिवसेनाप्रमुखांचा सच्च्या
कलावंताचा पिंड प्रकर्षाने दिसून आला. जे मनात ते मुखात असे त्यांचे वागणे आहे.
म्हणून हिंदुत्वाची भूमिका अत्यंत परखडपणे मांडणारे भारतातील एकमेव राजकीय नेते
म्हणून शिवसेनाप्रमुखांची आज सर्वांना ओळख आहे. ’
`शिवसेनाप्रमुख हे खरे शिवभक्त आहेत. त्यांची व माझी जेव्हा
पहिली भेट झाली त्याच्या दुसर्या दिवशी शिवसेनाप्रमुखांनी मला छत्रपती शिवाजी
महाराजांचा एक पुतळा भेट म्हणून पाठविला. तो पुतळा मी आजही जपून ठेवलेला आहे.
सामाजिक बांधिलकी मानणारा, राष्ट्रभक्ती अंगात बाणविलेला एक सच्चा कलावंत असे मी
त्यांचे वर्णन करेन. शिवसेनाप्रमुखांना मी राजकारणी नेता वगैरे म्हणणार नाही.
राजकीय नेत्याप्रमाणे कुटनीतीचे राजकारण शिवसेनाप्रमुख करु शकत नाहीत. कारण
त्यांचा सडेतोड, परखड स्वभाव. एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते समोरुन युद्ध खेळतात.
त्यांच्यातील वीरपुरुषाचे मला विलक्षण आकर्षण आहे. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा
जो व्यापक विचार या देशात रुजविला त्यामुळे हिंदुहृदयसम्राट हा बहुमान त्यांना
मिळालेला आहे.’
शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त पं. हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांना
हार्दिक शुभेच्छा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. व सामनाच्या वर्धापनदिनानिमित्त
त्यांनी सामना परिवाराचेही अभिष्टचिंतन केले. नंतर आमच्या गप्पांनी नव्या
सहस्त्रकातील महाराष्ट्र या विषयाचे वळण घेतले. पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले `नव्या सहस्त्रकात महाराष्ट्रामध्ये कुठलेही बोटचेपे सरकार सत्तेवर येऊ नये अशी
मनापासून इच्छा आहे. आज महाराष्ट्रात मराठी भाषेची पिछेहाट झालेली आहे. माझे विचार
कदाचित जुनाट वाटतील पण आज आमच्या लोकांवर दूरदर्शन, चित्रपट संस्कृतीने मोठे
आक्रमण केलेले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी यापुढे सरकारला काम करावे लागेल.
भविष्यात शिवसेनेला बहुमत मिळून महाराष्ट्रात हा पक्ष पुन्हा सत्तेवर आला तर आपली
आजची धोरणे त्यांनी कणखरपणे राबविली पाहिजेत. असे झाल्यासच त्यातून महाराष्ट्राचे
चित्र एकदम वेगळे दिसेल. ’
`. आज लोक वेगवेगळ्या कात्रीत सापडले आहेत. जुन्या
संस्कृतीची नाळ संपूर्णपणे तोडू शकत नाहीत. नवी संस्कृती जशीच्या तशी स्वीकारायला
लोक तयार नाहीत. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झालेली आहे. त्यामुळे आपला समाज
नेभळट, सत्वहीन होण्याचा धोका आहे. असे जगणे आपल्याला आवडेल का याचा विचार
प्रत्येकानेच करावयाचा आहे. आता आमच्या संगीत क्षेत्राचीच गोष्ट घ्या. पूर्वी
आकाशवाणी हे माध्यम प्रभावी होते. आकाशवाणीवरुन लोक गाणी ऐकायचे. ती त्यांच्या
मनात रुजायची. पण आताच्या टी. व्ही. संस्कृतीत साडेतीन मिनिटांच्या गाण्यातील बोल,
लय, ताल याकडे कोणाचेही लक्ष नसते. तर त्या गाण्यावर एखाद्या अभिनेत्रीने कोणते
कपडे घालून कसा नाच केला यावरच अधिक चर्चा होते. यामध्ये गाण्याचे सूर विसरले जातात.
लक्षात राहाते फक्त अभिनेत्री. ’
हृदयनाथ मंगेशकर आता
सांस्कृतिक र्हासाबद्दल तळमळीने सांगू लागले `आज मराठी प्रेक्षकांतही
बराच बदल झाला आहे. मराठीतील कुसुमाग्रज, आरती प्रभू, ग्रेस, गोविंदाग्रज यांच्या
कवितांतील शब्दांचे अर्थ मला आज अनेक ठिकाणी श्रोत्यांना समजावून द्यायची वेळ
येते. सावरकरांच्या काव्यातील संस्कृतप्रचूर शब्द आज अनेक श्रोत्यांना कळत नाहीत.
गेली तीस वर्षे `भावसरगम’चे कार्यक्रम मी करतोय. या कार्यक्रमांना जुन्या
पिढीबरोबरच नव्या पिढीचेही श्रोते मिळतात. आता `भावसरगम’मध्ये मी लोकांमध्ये गाण्याविषयी, मराठी काव्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी
या पद्धतीनेच कार्यक्रमाचे सादरीकरण करतो. पण सजाण प्रेक्षकांची संख्या कमी होत
चालली आहे. मोफत प्रवेश असलेल्या कार्यक्रमांना लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित
राहातात. `भावसरगम’मध्ये मी जे काव्यगायनाद्वारे प्रबोधनाचे कार्य
करतो त्याचे मर्म जाणून कार्यक्रमाला उपस्थित राहाणारे प्रेक्षक कमी झाले आहेत.
मुंबईत पार्लेसारख्या मराठीबहुल भागात मा आजवर मराठी गाण्यांतील शब्दांचे अर्थ
समजावून सांगण्याची पाळी आलेली नाही. पण काही ठिकाणी ती येते. मुंबई सोडली की
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात माझ्या कार्यक्रमांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो
त्यावरुन असे वाटते की, नव्या सहस्त्रकात मराठी भाषा संवर्धित करण्याचे काम खर्या
अर्थाने महाराष्ट्राचा ग्रामीण भागच करणार आहे. ’ असे सांगून पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या
मनोगतास पूर्णविराम दिला. त्यांचे हे बोल मनात साठवत मीही लतादीदी मंगेशकर यांच्या
`प्रभुकुंज’ निवासस्थानातून परत माघारी माझ्या मुक्कामाला
यायला निघालो....
(शब्दांकन – समीर परांजपे)
No comments:
Post a Comment