सार्वजनिक गणेशोत्सवातील सामाजिक उठाव या लेखाचा मुळ भाग...
----
सार्वजनिक गणेशोत्सवातील सामाजिक उठाव या लेखाचा उर्वरित भाग
सार्वजनिक
गणेशोत्सवांवर प्रभुत्व गाजविणार्या पुरोहितशाही विरोधात ब्राह्मणेतर
वर्गातील धुरीणांनी जोरदार अावाज उठविला होता. त्यामुळे या उत्सवाला काही
प्रमाणात विधायक वळण लागले . त्या प्रवाहाचे स्मरण करुन देणारा लेख मी
दैनिक दिव्य मराठीच्या २२ सप्टेंबर २०१२च्या अंकात लिहिला होता. त्या
लेखाची जेपीजी फाईल वर दिली अाहे.
सार्वजनिक गणेशोत्सवातील सामाजिक उठाव.
- समीर परांजपे
सार्वजनिक
गणेशोत्सव समाजातील सर्व स्तरांतील लोक साजरे करतात असे म्हणण्याची प्रथा
असली तरी या उत्सवांवर ब्राह्मण व पुरोहितवर्गाचे प्रभुत्व काही अंशी कायम
राहिले होते व अाहे. जातीय भेदभावाचे दर्शनही त्यातून होते. या पुरोिहतशाही
विरोधात ब्राह्मणेतर वर्गातील धुरीणांनी जोरदार आवाज उठविल्याची व
त्यामुळे गणेशोत्सवाला विधायक वळण लागल्याची उदाहरणे अाहेत. सार्वजनिक
गणेशोत्सवाच्या इतिहासाची अारती गाताना ही उदाहरणे जाणीवपूर्वक गाळली
जातात. त्यामुळे ती ठोसपणे सांगणे अावश्यक अाहे.
त्यातील एक महत्त्वाचा प्रसंग प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या माझी
जीवनगाथा या पुस्तकातच नोंदवून ठेवलेला अाहे. महाराष्ट्र राज्य साहित्य
अाणि संस्कृती मंडळाने १९९७मध्ये माझी जीवनगाथा या पुस्तकाच्या
प्रथमावृत्तीचे पुर्नमुद्रण केले अाहे. या पुस्तकाच्या पान क्र. ३०६ ते
३०९मध्ये दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव या शीर्षकाखाली हा सारा प्रसंग
देण्यात अाला अाहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी वर्णिलेला १९२६ सालचा हा
प्रसंग पुढीलप्रमाणे अाहे.
१९२६ सालच्या अाधी मुंबईतील दादर भागामध्ये त्यापूर्वी कधीही
ब्राह्मणव ब्राह्मणेतर असा वाद नव्हता. मुंबईसारख्या `ये रे दिवसा भर'
वृत्तीच्या लोकांनी गजबजलेल्या विभागात कसलाही वाद खेळायला लोकांना उसंत
असणारच कोठून? दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव सालोसाल थाटामाटात साजरा
व्हायचा. सर्व थरांतील लोकांकडून गणेशोत्सवासाठी वर्गण्या गोळा व्हायच्या.
कोणीही नाही म्हणायचे नाही. अापल्याला जमत नाही नि दादरकर ब्राह्मण मंडळी
पुढाकाराने उत्सव साजरे करतात, अलबत सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे, अशा
समजुतीने लोक वर्गण्या देत. पण हा `पुढाकार' इतका बळावला की, उत्सवाचे
कार्यकारी मंडळ एकजात ब्राह्मणांचे. इतरांचा तिथे शिरकाव नाही.
कार्यक्रमासाठी येणारे कवी, वक्ते, शाहीर, कीर्तनकार सारे ब्रह्मवृंदच.
गणेशोत्सवाचा उद्देश हा अखिल हिंदूंची एकजूट करणे असा असेल तर त्यात
स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांनाही भरपूर भाग घेता अाला पाहिजे, हा विचार बळावू
लागला. सार्वजनिक उत्सवाला गणेशमूूर्तींचे प्रत्यक्ष स्पर्श करुन पूजन
करण्याचा कोणत्याही अस्पृश्याला हक्क असला पाहिजे, अशी मते ठामपणे मांडली
जाऊ लागली. सामाजिक एेक्यासाठी सक्रिय असलेल्या युवक मंडळाने तसे पत्र
दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे पाठविले. त्यामुळे खळबळ माजली.
दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष त्यावेळी डाॅ. जावळे हे
प्रतिष्ठीत असामी होते.
दुसर्या बाजूस समाजसुधारक युवक मंडळाने पाचशे अस्पृश्य बांधवांकडून
प्रत्येकी चार अाणे वर्गणी जमवून ती उत्सव समितीकडे भरुन सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळाचे सदस्यत्व मिळविलेले होते. त्या युवक मंडळाचे
प्रेरणास्थान डाॅ. बाबासाहेब अांबेडकर होते.
दादरच्या टिळक ब्रिजच्या दक्षिणेकडील पायथ्याजवळ सगळी जागा त्यावेळी
रिकामी होती. तेथेच या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप होता. आम्हाला उत्सव
मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे पूजन करु द्यावे, अशी मागणी करत युवक संघाच्या
अनेक सभासदांचा घोळका टिळक ब्रिजपाशी जमला. दुसर्या बाजूला
उच्चवर्णीयांचाही घोळका जमला. या दोघांशीही बोलणी करण्यात रावबहादुर बोले
यांनी पुढाकार घेतला. बोले यांनी अापल्या मदतीला प्रबोधनकार ठाकरे यांना
बोलावून घेतले. अस्पृश्य बांधवांना गणेश पूजनाचा हक्क बजावता अालाच पाहिजे
यासंबंधी अनुकूल निर्णय घेण्यासाठी दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या
कार्यकारी समितीला प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या दिवशी दुपारी तीन
वाजेपर्यंतची मुदत दिली. या सार्या प्रकाराने हादरलेल्या दादर सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी समितीने मग सुधारणावादी युवक मंडळाचे
प्रेरणास्थान असलेल्या डाॅ. अांबेडकर यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा केली.
त्यातून असा तोडगा निघाला की या गणेशमूर्तीची रिवाजाप्रमाणे ब्राह्मण
पुजार्याने प्राणप्रतिष्ठापू्र्वक शास्त्रोक्त पूजाअर्चा करायची. ती
झाल्यावर कोणत्याही अस्पृश्याने एक पुष्पगुच्छ स्वत: नेऊन त्या
पुजार्याच्या हातात शिवून द्यावा व त्याने तो बिनतक्रार घेऊन गणपतीला
वाहावा. याप्रमाणे ठरताच अस्पृश्य वर्गातील नामांकित कार्यकर्ते मडकेबुवा
यांना प्लाझा गार्डनच्या नळाखाली अांघोळ घालण्यात अाली व त्यांनी
सर्वांसमक्ष लाल गुलाबाचा गुच्छ पुजार्याच्या हातात दिला. पुजार्याने तो
टाळ्यांच्या गजरात गणपतीला वाहिला. त्यानंतर पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत
मंडपातले कार्यक्रम सुरळीत पार पडले.
दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव पुढच्या वर्षीपासून बंद करण्यात येत
अाहे. अशी घोषणा त्या मंडळाचे अध्यक्ष डाॅ. जावळे यांनी गणेशोत्सवाच्या
अखेरच्या रात्री केली! दादरचा १९२६मध्ये बंद पडलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव
पुढे तीस वर्षांनी समर्थ व्यायाम मंदिराच्या गणेशोत्सवाला सार्वजनिक हे
विशेषण लावून सुरु झाला. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये एकेकाळी मेळ्यांना
अधिक प्रतिष्ठा व लोकप्रियता होती. मेळे हे लोककलेशी नाते सांगणारे अाहेत.
या मेळ्यांच्या स्वरुपाबद्दल लेखक ब. ल. वष्ट यांनी संशोधक स. गं. मालशे
यांच्या विवेचक टिपणांवर आधारित एक लेख मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव
असलेल्या केशवजी नाईकांच्या चाळीतील गणेशोत्सव मंडळाने १ आॅगस्ट १९९२ रोजी
प्रसिद्ध केलेल्या `सार्वजनिक गणेशोत्सव - शतकाची वाटचाल' या पुस्तकात
लिहिला अाहे. (पृष्ठे - १३३ ते १४०). `मेळा : एक देशभक्तीपर कलाविष्कार'
असे या लेखाचे शीर्षक अाहे.
या लेखामध्ये दिलेल्या माहितीनूसार गणेशोत्सवातील मेळ्यामधून
म्हटल्या जाणार्या पद्यरचनांची छोटी पुस्तके प्रकाशित होत असत. गणपतीच्या
मेळ्याची पदे हे अशा पुस्तकांपैकी उपलब्ध सर्वात जुने पुस्तक अाहे. ते
१८९४मध्ये प्रकाशित झाले होते. कलगीवाले पिराजी यांनी त्यातील पदे रचली
होती. सन्मित्र समाज मेळ्याची स्थापना १८९८मध्ये झाली. या मेळ्यातील पदे
अस्सल मराठी बाण्याची होती. छत्रपती शिवराय व लोकमान्य टिळक ही त्यांची
दैवते होती. टिळकयुगाचा अस्त झाला. त्यानंतर देशाच्या राजकारणात महात्मा
गांधी यांचे पर्व सुरु झाले. मेळ्यातील पदे व संवादातून महात्मा गांधींचे
तत्त्वज्ञान सांगितले जाऊ लागले. तसेच टिळक व गांधीजी यांच्या
तत्त्वज्ञानातील फरक, मतभेद हे तीव्रतेने मांडले जाऊ लागले. गांधीयुगात
सावकार, शेतकरी हे विषय मेळ्याच्या पदांत अाणि संवादात येत. सामाजिक
अांदोलने वेगवेगळी वळणे घेत होती. त्यात `सत्यशोधक' चळवळीचाही मोठा वाचा
होता. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज ही या चळवळीची दैवते
होती. १९२२ ते १९२७ या काळात छत्रपती मेळ्याने सामाजिक विषयांची ही आघाडी
गाजवली. छत्रपती मेळ्याच्या एका पदातील अवतरण असे...
राष्ट्रदेवीच्या मंदिरी; भटशुद्र समान दोन्ही...
भेदाभेद सोडावे; रुढीचे पाश तोडावे...
शाहूचा हा असे बाणा; शिवाजी शाहूला माना...
सार्वजनिक
गणेशोत्सवाच्या इतिहासात जातीभेद गाडून टाकण्यासाठी वेगळ्या वाटेने
जाणार्या या प्रवाहांचे स्मरण होणे आवश्यक होते म्हणून हा सारा लेखनप्रपंच
केला.
No comments:
Post a Comment