Thursday, March 13, 2014

संयुक्त महाराष्ट्र सभा! ( दै. दिव्य मराठीने महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०१२ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष पुरवणीतील लेख)




संयुक्त महाराष्ट्र सभा!
--------------

संयुक्त महाराष्ट्रासाठी अांदोलन उभे राहाण्याच्या अाधी, तसेच ६ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेसाठी सभा होण्याच्या ही सोळा वर्षे अाधी, महाराष्ट्रातील काही विचारवंतांनी १९४०मध्ये संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याचा घाट घातला होता. त्या संदर्भात १९४०मध्ये `ज्योत्स्ना' या मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये एक निवेदन तसेच `पंचवीस वर्षानंतरचा महाराष्ट्र' हा परिसंवादही प्रसिद्ध करण्यात अाले होते. या दुर्लक्षित ऐतिहासिक मोलाच्या संदर्भावर दृष्टिक्षेप टाकणारा लेख मी दै. दिव्य मराठीने महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०१२ रोजी काढलेल्या विशेष पुरवणीत लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल  व संयुक्त महाराष्ट्र सभेच्या निवेदनाचे छायाचित्र वर दिले आहे.
-------------

- समीर परांजपे
-----------

भारताला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळेल की नाही किंवा कधी मिळेल याची पुसटशी कल्पनाही नसताना, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अांदोलन होईल असे कुणाच्याही स्वप्नात अाले नसतानाही अनेक भागांमध्ये विखुरलेला महाराष्ट्र एकत्र करुन मराठी भाषिकांचे एक राज्य स्थापन केले जावे अशी स्वप्ने मराठी माणसांतील काही विचारवंतांना पडू लागली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची मागणी जोर धरु लागल्यानंतर ६ फेब्रुवारी १९५६ रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली एस. एम. जोशी यांनी निमंत्रण दिलेल्या महाराष्ट्रातील मुख्यत: विऱोधी पक्षनेत्यांचीा व निवडक कार्यकर्त्यांची सभा भरली. त्यातून संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. या समितीने केलेल्या अवितरत संघर्षातून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली हा इतिहास अाहे. मात्र ही समिती एकदम स्थापन झाली असे नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात विविध प्रकारे मंथन करण्याची प्रक्रिया अाधीपासूनच सुरु झाली होती, याची साक्ष देणारा एक पुरावा अाहे. १९४०मध्ये`ज्योत्स्ना' या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या दिवाळी अंकामध्ये संयुक्त महाराष्ट सभा स्थापन करण्याविषयी त्या वेळच्या विविध नामवंतांनी `महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती' या शीर्षकाखाली प्रसिद्ध केेलेले निवेदन उद्बोधक अाहे. त्याचप्रमाणे १९४०नंतर २५ वर्षांनी म्हणजेच १९६५मध्ये महाराष्ट्राचे स्वरुप कसे असेल, या विषयी या दिवाळी अंकात एक परिसंवाद प्रसिद्ध करण्यात अाला असून त्यात अनेक नामवंतांचे लेख अाहेत.
`ज्योत्स्ना'च्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्त महाराष्ट्र सभेच्या निवेदनाखाली दा. वि. गोखले, गं. त्र्य. माडखोलकर, शं. न. अागाशे, डाॅ. शिवाजीराव पटवर्धन, श्री. शं. नवरे, दि. बा. दिवेकर, रा. न. अभ्यंकर, पां. र. अंबिके, त्र्यं. वि. पर्वते, मा. दि. जोशी, सूं. मे. बुटाला, ग. वि. पटवर्धन या त्या काळच्या नावाजलेल्या लोकांच्या स्वाक्षर्या अाहेत. या निवेदनामध्ये नमुद करण्यात अालेले उद्दिष्ट थोडक्यात याप्रमाणा अाहे. `मराठी भाषा बोलणार्या सलग प्रदेशाकरिता म्हणजे संयुक्त महाराष्ट्राकरिता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटीमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रदेश विभागला गेला असल्यामुळे उपर्निदिष्ट संस्थेसारख्या मध्यवर्ती संस्थेची स्थापना होऊ शकली नाही असे दिसते तथापी, यापुढील काळ निराळा असल्यामुळे व विशेषत: हिंदी फेडरेशनचा भाषावर प्रांतरचना हाच मुख्य पाया राङणार असल्याने संयुक्त महाराष्ट्राकरिता अधिकारवाणीने बोलू शकणार्या एका स्थिर पायावरील मध्यवर्ती संस्थेची जरुरी अाहे. याच हेतूने अाम्ही `संयुक्त महाराष्ट्र सभेची' स्थिर पायावर संस्थापना करण्याची उपक्रम हाती घेतला असून या कामी शक्य ते साहाय्य देण्याबद्दल सर्व महाराष्ट्रीयांना सविनय विनंती करतो अाहोत.'
या निवेदनात प्रस्तावित संयुक्त महाराष्ट्र सभे्ची वैशिष्ट्ये, पंचवार्षिक कार्यक्रम, संयुक्त महाराष्ट्र सभेची घटना व नियम तसेच सभासदांसाठी वर्गणीच्या रकमेचा तक्ता असे सारे काही तपशीलवार देण्यात आले अाहे. संयुक्त महाराष्ट्र सभेसंदर्भातील या निवेदनाचा सर्वात महत्त्वाचा भाग हा तिच्या योजना, वैशिष्ट्य या धोरणाचा अाहे. विद्यमान स्थितीनूसार संयुक्त महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय स्थितीचा विचार केला तर त्याचे (१) महाविदर्भ, (२) मराठवाडा, (३) देश, (४) कोकण, (५) मुंबई शहर असे पाच स्वतंत्र विभाग सहजच पडतात. या पाच विभागांत त्यांचे स्थानिक वैशिष्ट्य् शक्य तितके कायम ठेवून `संयुक्त महाराष्ट्राचा' एकसूत्रपणा वाढविणारी कार्ये (उ.दा. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, संयुक्त महाराष्ट्राची अार्थिक व अौद्योगिक पाहणी, संयुक्त महाराष्ट्र परिषद इ.) करणे व या पाच विभागांत स्नेहसंबंध संवर्धित होऊन भावी फेडरेशनमध्ये सर्वांचा एक मध्यवर्ती घटक कोणत्या पद्धतीने करावा त्याची योजना मुक्रर करणे इ. उद्देशांनी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना व संवर्धन करण्याचे अाम्ही योजले अाहे.' संयुक्त महाराष्ट्र सभेचे वैशिष्ट्य या मुद्याखाली सदर निवेदनात म्हटले अाहे `प्रस्तावित संयुक्त महाराष्ट्र सभेचे `भिक्षा' उर्फ झोळी हे इतर संस्थांप्रमाणेच साधन राहिल: परंतु त्याशिवाय संस्थेच्या चालकत्त्वासाठी क्रमाक्रमाने निरनिराळे उद्योगधंदे उभारुन त्यातून निष्पन्न होणार्या फायद्यावर ही संस्था अापला योगक्षेम चालू ठेवील. स्वत:करिता ज्या अात्मीयतेने अापण खपतो त्या अात्मीयतेने सार्वजनिक संस्थांकरिता खपणार्या नि:स्वार्थी व लायक कार्यकर्त्यांची महाराष्ट्रात मुळीच वाण पडणार नाही. प्रश्न अाहे तो फक्त सामग्रीच्या जुळणीचा व तज्ज्ञ मार्गदर्शनाचा. पैकी पहिली संयुक्त महाराष्ट्र सभेच्या संघटनेने साधणार असून दुसरीची सभेला त्या त्या धंद्यातील तज्ज्ञांकडून हक्काने अपेक्षा करता येईल.' संयुक्त महाराष्ट्र सभेच्या धोरणाबद्दल या निवेदनात म्हटले अाहे, `संयुक्त महाराष्ट्र सभेचे धोरण सर्वसंग्राहक स्वरुपाचे राहणार असून हिंदी राजकारणातील विविध पंथांच्या महाराष्ट्रीयांनी सभेचे कामी भाग घेण्यास कोणताही प्रत्यवाय येणार नाही. तसेच कोणत्याही संस्थेच्या अाघाडीवरील राजकारणामध्ये अगर संघटनेमध्ये सभा भाग घेणार नाही. तथापि, सभेच्या विविध चळवळी करताना कोणती तरी सामान्य राजकीय व आर्थिक दृष्टी अंगिकारण्याचे भागच असल्यामुळे साधारणपणे इंग्लंडच्या मजूर पक्षाच्या धोरणातून प्रतीत होणारी समाजवादी दृष्टी सभा अापल्या कारभारात ठेवील.'
`ज्योत्स्ना' मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या निवेदनानंतर समाजाने पुढाकार घेऊ संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना केल्याचे वा ती सक्रिय झाल्याचे पुढील काळात अाढळत नाही. असे असले तरी संयुक्त महाराष्ट्राचे अांदोलन व संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना या घटनांच्या मुळाशी संयुक्त महाराष्ट्र सभेच्या स्थापनेच्या संंबंधी झालेल्या हालचाली या कारणीभूत होत्या, हे एक ऐतिहासिक सत्य अाहे. `ज्योत्स्ना'च्या याच दिवाळी अंकात पंचवीस वर्षानंतरचा महाराष्ट्र या परिसंवादात तत्कालीन पत्रकार न.चिं. केळकर, समाजवादी नेते एस. एम. जोशी, प्रख्यात अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, महाराष्ट्र नियतकालिकाचे मुख्य संपादक गो. अ. अोगले, नागपूरमधील काँग्रेसचे पुढारी डाॅ. मो. रा. चोळकर, बॅ. मुकुंदराव जयकर, इतिहासतज्ज्ञ प्रा. न. र. फाटक, लेखक ना. गो. चाफेकर, उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर, समाजशास्त्रज्ञ डाॅ. जी. एस. घुर्ये या त्या वेळच्या नामवंतांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले अाहेत. या लेेखांमध्ये १९६५ सालातील महाराष्ट्र कसा असेल यासंदर्भात काही गृहितकांचा अाधार घेऊन या लेखकांनी अापली निरीक्षणे नोंदविली अाहेत. प्रा. न. र. फाटकांनी अापल्या लेखामध्ये म्हटले अाहे `१९६५ मध्ये महाराष्ट्राला हिंदी राजकारणात मानाचे स्थान राहिल, हे उघड अाहे. तरीसुद्धा भावी महाराष्ट्रीय अाजच्यासारखा असणार नाही, हे लक्षात ठेवणे अावश्यक अाहे. मराठेशाहीची स्वप्ने अाजकालचा महाराष्ट्रीय पाहातो, त्या स्वप्नात रंगतो, त्यांचा अभिमानाने बकवा करतो. भावी महाराष्ट्रीय हा अापण सार्या देशाचे घटक अाहोत याचा विसरु पडू न देता राजकारणाचा विचार करणारा निपजेल असा भरवसा अाहे. '
विद्यमान महाराष्ट्रात वाढलेला जातीविषयक अभिमान, त्यातून निर्माण होणार्या जातवार संघटना, दुसर्याच्या मतस्वातंत्र्याची गळचेपी करणारी वाढत चाललेली अपप्रवृत्ती याचा विचार करता अापण न. र. फाटक यांच्यासारख्या विद्वानांच्या आशावादाचा किती घोर अपमान केला अाहे, हे मराठी माणसासा लक्षात येईल. एस. एम. जोशी यांनी अापल्या लेखात म्हटले अाहे `अापली सामाजिक परिस्थिती समाधानकारक अाहे काय? सर्वत्र जाती-जातींमध्ये वैमनस्य अाहे, स्पृश्यास्पृश्यतेसाठी भेदभाव अाहेत. सर्वत्र अज्ञान अाहे. हे सर्व नष्ट करुन समाजसमतेचे ध्येय अापणास गाठायचे अाहे. मराठी भाषा बोलणार्या सर्व लोकांनी एकत्रित होऊन अापला एक प्रांत बनवावा असे अापणांस कितीतरी मंडळीस वाटते, पण ते होणार कसे? वर्हाडात राहणारे महाराष्ट्रीय लोक मुंबईत राहाणार्या महाराष्ट्रीयांस त्यांच्या गरिबीमुळे कमी लेखतात व त्यामुळे ते त्यांच्याशी एकजीव होण्यास तयार नाहीत. त्यांच्यामधील हा तुटकपणा नाहीसा करुन सर्वांमध्ये आपणास ऐक्याची भावना निर्माण करायची अाहे. अापण एका निश्चयाने अाणि ध्येयाने चंग बांधून कामाला सुरुवात केली, तर येत्या पंचवीस वर्षात (१९६५मध्ये) हे दृश्य अापणास निर्माण करता येईल. ' एस. एम. जोशी यांनी व्यक्त केलेल्या अाशावादाचाही महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर मराठी माणसांनी बर्याच प्रमाणात पराभव केला अाहे. `ज्योत्स्ना' अंकातील या परिसंवागातील अन्य मान्यवरांचे लेखही असेच मननीय अाहेत. १ मे १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. अाज, १ मे रोजी त्या घटनेला ५२ वर्षे पूर्ण झाली अाहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी जे १०५ हुतात्मे झाले, ज्या राजकीय पुढारी, विचारवंतांनी या अांदोलनात अापल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार करण्यास अापण काय केले, याचे तमाम मराठी माणसांनी आत्मपरीक्षण करायला हवे.

No comments:

Post a Comment