किल्ले रायगडचे `चौफेर’ अभ्यासक सुरेश वाडकर या लेखाचा मुळ भाग
किल्ले रायगडचे `चौफेर’ अभ्यासक सुरेश वाडकर या लेखाचा उर्वरित भाग.
छत्रपती शिवरायांची
राजधानी असलेल्या किल्ले रायगडचा अभ्यास आत्तापर्यंत ऐतिहासिक अंगानेच करण्यात
आला. मात्र किल्ले रायगडच्या कहाणीसा त्याच्या परिसरात नैसर्गिक, भौगोलिक
घटकांमुळेही पुर्णत्व आलेले आहे. या काहीशा दुर्लक्षित घटकांचाही सांगोपांग अभ्यास
करुन महाराष्ट्रातील काही हजार लोकांना गड-किल्ल्यांचे अभ्यासक सुरेश वाडकर यांनी
किल्ले रायगडाचे सम्यक दर्शन घडविले आहे. सुरेश वाडकर यांची ही चित्तरकथा सांगणारा
लेख मी दैनिक सामनाच्या २१ फेब्रुवारी १९९९च्या अंकात लिहिला होता. या लेखाचे
जेपीजी फोटो वर दिले आहेत.
किल्ले रायगडचे `चौफेर’ अभ्यासक सुरेश वाडकर
इतिहासाचे लेखन व
दर्शन आधुनिक काळात विविध सहाय्यकारी विषयांचा आधार घेऊन केले जाते. एखादी वास्तू
निर्माण होणे वा त्या वास्तूत काही ऐतिहासिक घडामोडी घडणे यामागे अनेक सामाजिक,
सांस्कृतिक संदर्भ असतात. त्या सर्वांचा संयुक्त व साकल्याने विचार करणे ही
सध्याची अभ्यासपद्धती आहे. या चौकटीतच छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडचाही
विचार करावा लागतो. रायगडाचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही. परंतु १४३६मध्ये
दुसर्या अल्लाउद्दीन बहामनीने हा किल्ला जिंकून घेतल्याची प्रथम नोंद आहे.
१६५६च्या सुमारास चंद्रराव मोरेंकडून रायगड जिंकून घेतल्यावर शिवकाळात या गडाचे
भाग्य उजळले. १६६२मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडची स्वराज्याच्या राजधानीसाठी निवड
केली. त्यासाठी रायगडवर सुमारे ३५० वास्तूंचे बांधकाम करविले. रायगडावर १६७४ साली
शिवरायांचा झालेला राज्याभिषेक व या किल्ल्यावर शिवरायांचे झालेले निर्वाण या
दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहेत. या सर्व
पुण्यस्मृतींना उजाळा देण्यासाठी रायगडचा इतिहास लिहिण्याचे प्रयत्न आजवर अनेकांनी
केले. पण दुर्देवाने त्यांच्या लेखनाची मर्यादा ही केवळ शिवकाळातील रायगडाचे
महत्त्व या मुद्याभोवती घुमत राहिली. रायगड या वास्तूचा विचार करताना, या वास्तूचा
भोगोलिक परिसर, तेथील वन्य व वनस्पती जीवन, त्या परिसरातील लोकसंस्कृती,
त्यांच्याकडील विविध ऐतिहासिक दस्तऐवज यांचा सुक्ष्म वेध घेण्याचे प्रयत्न कोणीही
केले नाहीत.
या सर्व घटकांमधून
रायगड वास्तू म्हणून साकारते, तो इतिहास लिहायचा प्रयत्न कोणीही करीत नसले तरी
ऐतिहासिक माहितीबरोबर रायगड परिसरातील अन्य सहाय्यकारी गोष्टींची माहिती संकलित
करण्याचा प्रयत्न एक व्यक्ती निष्ठापूर्वक करीत आहे. ती म्हणजे सुरेश वाडकर. सुरेश
वाडकर हा तुमच्या-आमच्यासारखाच सामान्य माणूस. गेली वीस वर्षे कलरकेम या कंपनीत
काम करुन स्वेच्छानिवृत्ती पत्करलेल्या सुरेश वाडकरांना लहानपणापासून रायगडाचे
माहात्म्य सारखे खुणावत होते. रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून वेळ काढून सुरेश वाडकर
रायगडावर जात. तेथील वास्तू, वातावरण निरखत...पण १९९० सालानंतर .निरीक्षणाला एक
वेगळा आयाम मिळाला. या कामी त्यांना मदत झाली पुरातत्त्व अधिकारी व स्थानिक
लोकांची.
सुरेश वाडकर आपले
रायगड-जीवन सांगताना हरखतात ` रायगडाच्या पायथ्याचे कोंझर गाव. तेथे १९६७
सालापर्यंत मी शिकत होतो. चौथीत होतो तेव्हा आमच्या घरातूनच रायगडाचे उन्हाळा,
पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतुंतील वेगवेगळे दर्शन घडायचे. शाळेच्या सहलीबरोबर
रायगडावर लहानपणी गेलो होतो तेव्हा माझ्या बुरडे मास्तरांनी या किल्ल्याचा इतिहास
अक्षरश: जिवंत केलेला होता. त्यामुळे रायगडाने तेव्हापासून मला
झपाटले. नोकरीतील सर्व कर्तव्ये नीटसपणे पार पाडताना दुसरीकडे रायगडावर जाऊन येणे
हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय झाला होता. १९९० सालापर्यंत असे चालले होते. या
काळात सर्वसामान्य माणसाला रायगडविषयी जितके ज्ञान असते तितकेच मलाही होते. १७
जानेवारी १९९० पर्यंत रायगडला माझ्या १५२ भेटी झाल्या होत्या. नोकरीतून
स्वेच्छानिवृत्ती पत्करल्यानंतर तर मी मुक्त पाखरु झालो...असाच एकदा रायगडावर
गेलेलो असताना महादरवाजापाशी यवतमाळचे एक वृद्ध जोडपे भेटले. ते गडावरुन खाली उतरत
होते. त्यातील वृद्ध गृहस्थ म्हणाले `एवढ्या उंचावर आलो...आणि दगडधोंडे पाहून परत
चाललोय...’हे उद्गार होते साधे पण अत्यंत जिव्हारी लागले माझ्या...’
वाडकर सांगू लागले ` मनात म्हटले हा छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास असलेला गड...या गडाच्या
यादीने मराठी माणसाची छाती फुलायला हवी...पण त्या वृद्धाचेही म्हणणे थोडेफार खरे
होते. रायगडावरील वास्तूंची नीट देखभाल होत नाही...वर कोणतीही मार्गदर्शिका नाही.
आई-बाप असूनही अनाथाप्रमाणे वाढणार्या मुलासारखी रायगडाची अवस्था बघून मनात कळवळा
दाटला. माझ्या सामान्य कुवतीप्रमाणे मी या स्थितीत सुधारणा करण्यासाठी काय करु
शकतो याचा विचार केला. ठरविले की, रायगडसंदर्भात जी जी ऐतिहासिक माहिती असेल ती
गोळा करायची. त्या माहितीचे संपादन करुन सर्वच जणांना समजेल अशा साध्यासुध्या
भाषेत रायगड लोकांना समजावून सांगायचा आणि हे काम करायचे तेही निरपेक्ष भावनेने.
गो. नी. दांडेकर, निनाद बेडेकर, आप्पा परब, बाबासाहेब पुरंदरे, गोपाळराव चांदोरकर
अशा गड-किल्ल्यांची टाकोटाक माहिती असलेल्या दिग्गजांची मी आधी भेट घेतली. त्यांचे
आकंठ मार्गदर्शन घेतले. अनेक संदर्भग्रंथ वाचले. त्यातून काही ज्ञानकण मिळविले आणि
आता ते रायगड बघायला येणार्यांमध्ये मी वाटतो. ’
सुरेश वाडकर यांनी
रायगडावर हजार वेळा जाण्याचा संकल्प केलेला आहे. या वार्या लिम्का बुक किंवा गिनीज
बुकामध्ये आपला विक्रम नोंदला जावा म्हणून नसून प्रत्येक वारीमागे रायगड
किल्ल्याचा तीनही ऋतूंत वेध घेणे, या वास्तूचे छायाचित्रण करणे हा उद्योग असतो.
त्यामुळे रायगडाच्या ऐतिहासिक माहितीबरोबरच अन्य माहितीही वाडकरांकडे विपुल
प्रमाणात गोळा झाली. हे वेगळे रायगडदर्शनही तितकेच मोहक आहे. रायगडावर सर्वात
प्रेक्षणीय निसर्गउत्सव असतो. पावसाळ्याच्या दिवसांत जून ते सप्टेंबर (गणपती
आगमनाच्या अगोदरपर्यंत) या कालावधीत किल्ले रायगडावर तुफान पर्जन्यवृष्टी होत
असते. पावसाचे सपकारे, धुक्याचे दाट दहिवर यातून एखाद्याला आपण स्वर्गलोकी संचारत
असल्याचा भास रायगडवर फिरताना होतो. रायगडच्या डोंगरकड्यांवरुन वाहणारे धबधबे हे
प्रेक्षणीय असतात.
रायग़ड परिसरातील
पक्ष्यांचे जीवनही इतिहास व निसर्गप्रेमी व्यक्तीला भुरळ पाडते. रायगडावर नेहमी
आढळणारा एक पक्षी आहे त्याचे नाव आहे मलबार व्हिसलिंग थ्रश. हा आकाराने
बुलबुलपेक्षा मोठा असतो. कोबाल्ट ब्ल्यू रंगाच्या या पक्ष्याची सतत हालचाल सुरु
असते. अंग दबकून पुन्हा उंचावायचे असा याचा तोरा असतो. हवेत स्वच्छंदपणे शीळ घालत
विहरणारा मलबार व्हिसलिंग थ्रश या पक्ष्याचे वास्तव्य बहुधा रायगडावरील ऐतिहासिक
जुन्या इमारतींच्या सान्निध्यात असते. याच जातकुळीतला दुसरा पक्षी ब्ल्यू राँक
थ्रश हादेखील रायगडाच्या अंगाखांद्यावर खेळतो. याचा आकार लहान, पण रुपाने हा
तेजस्वी निळाईचा असतो. हाही शीळ घालण्याच्या सवयीचा गुलाम आहे. तिसरा पक्षी म्हणजे
कोतवाल. हा कोतवाल पक्षी तुम्हाला कुठूनही ओळखता येतो. याची शेपटी लांब व
दुभंगलेली असते.
वाडकरांच्या मते
रायगड परिसरात १९६७ पूर्वी अतिशय गर्द रानवट होती. गडाच्या परिसरातील
गावकर्यांकडून जंगलतोडी मोठ्या प्रमाणावर व्हायची. परिणामी रायगडाचा माथा व
परिसरातील झाडांची संख्या कमी होऊ लागली. आज अनेक गिर्यारोहक रायगडाला सुमारे १५
कि.मी. अंतराची प्रदक्षिणा घालतात. रायगडाच्या कडेकपारीतून हिंडतात. रायगडाच्या
प्रदक्षिणेच्या मार्गात अनेक औषधी वनस्पती आहेत. त्यात प्रमुख आढळते माकडीचे झाड.
या झाडाला लिंबासारखी फळे येतात. या झाडाच्या पानांचा रस न तापविलेल्या दुधातून
घेतल्यास पोटातील कृमी मरतात असे म्हटले जाते. दुसरी वनस्पती म्हणजे पांगार. या
पानांचा रस हा जंतुनाशक आहे. पांगारीच्या मुळ्या वाटून केसांना लावल्या तर
डोक्यातील उवा मरतात. कातरीच्या पानांची निरगुडीही येथे बघायला मिळते. या
वनस्पतीच्या लेपाने पायाला असलेली सूज उतरुन रक्तपुरवठा सुरळीत होतो. अशा उपकारक
तसेच अपायकारक वनस्पतींची नोंदही निसर्गप्रेमींनी घ्यायला हवी. रायगडावर आढळणार्या
विषारी वनस्पतींमध्ये रामेटा प्रमुख आहे. हिच्या खोडाचा रस अंगाला लागला तर तत्काळ
फोड येतात. डोळ्यात हा रस गेला तर डोळे बटाट्यासारखे सुजतात. दातपडी म्हणून दुसरी
वनस्पती मजेशीर आहे. तिच्या काडीने दात घासले तर दातच हातात पडून येतात असे म्हटले
जाते! खरे खोटे माहित नाही!
रायगडच्या विविध
कडेकपारीतही निसर्गसौंदर्य फुलत असते. अशी नैसर्गिक सजावट रायगडच्या प्रसिद्ध
हिरकणी बुरजाच्या उत्तर भागात, टकमक टोकाच्या दक्षिण व भवानी कड्याच्या दक्षिण
बाजूस खरोल ही वनस्पती करते. सप्टेंबर व आँक्टोबर महिन्यात पुंजक्यापुंजक्याने
फोफावणारी ही वनस्पती डोळ्यांना सुखावते. किल्ले रायगडावरील नगारखान्याकडून वाघ दरवाजाकडे
जाताना, कुशावर्त तलावाकडून खाली उतरलो की जांभळासारखी पाने असलेले झाकमासारखे एक
वैशिष्ट्यपूर्ण झाड लागते. जानेवारी – फेब्रुवारी महिन्यांत या झाडाला बारीक
सुगंधी फुले येतात. साधारणत: गणपतीच्या विसर्जनानंतरच्या दिवसांमध्ये सोनकी
ही तिळासारखी फुले येणारी वनस्पती टकमक टोकाच्या दक्षिण बाजूस मोठ्या प्रमाणावर
दिसायला लागते. रायगडावर असलेली उंबराची झाडे ही तर पक्ष्यांची कुजनस्थानेच आहेत.
उन्हाळा, हिवाळा या मोसमात उंबरावर गोल्डन ओरिओल, ब्लँक नीफ ओरिओल, ब्लँक हेडेड
ओरिओल, पॅरेडाईडज फ्लाय कॅचर, रेड विस्कर्ड बुलबुल, रेड व्हेंटेड बुलबुल, पांढर्या
गालाचा बुलबुल, काँमन आयओरा, मार्शल्स आयओरा, सन बर्ड असे भारदस्त इंग्रजी नावे
धारण केलेले बहुढंगी पक्षी विहरताना दिसतात.
रायगडच्या परिसरात जे जंगल आहे त्यामध्ये अनेक
सर्प आहेत. त्यातील विषारी सर्पांमध्ये धामण, फुरसे, घोणस, मण्यार, हरणटोळ, चापडा
यांचा समावेश होतो. तर बिनविषारी सर्पांमध्ये दिवड, धामण, खापरखवल्या हे असतात.
यातील खापरखवल्या हा करंगळीच्या जाडीचा साप असतो. त्याचे मुख्य भक्ष्य गांडूळ
असते. रायगडच्या पायथ्याशी रानडुक्करांचा वावर खूप आहे. प्रदक्षिणच्या मार्गात
दिंडा ही वनस्पती लागते. तसेच कंदमुळेही मिळतात. रानडुक्करांना कंदमुळे हे अत्यंत
प्रिय खाद्य. त्यामुळे रायगडची प्रदक्षिणा जरा जपूनच करावी लागते कारण नाहीतर
रानडुक्कराशीच गाठ पडायची. याशिवाय रानमांजर, कोल्हे, लांडगे यांचे अस्तित्व आहेच.
वाघोबाची चाहूल या परिसराला लागते पण सुरेश वाडकरांनी आपल्या भ्रमंतीत रायगड
परिसरात अद्यापी वाघोबांना पाहिलेले नाही. पण बिबळ्याचा वावर रायगडहून थोडे लांब
असलेल्या घनदाट जंगलात असल्याचे सांगितले जाते.
रायगडाचा आकार
घोड्याच्या नालेप्रमाणे असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची ८४६ मीटर इतकी आहे.
रायगडाचे पठार सुमारे ४० हेक्टर असावे. अत्यंत मोक्याच्या जागी, नैसर्गिक तटबंदीने
वेढलेल्या छत्रपती शिवरायांच्या राजधानीत किल्ले रायगडावर भ्रमंती करणार्यांना
अनेक जुन्यापान्या गोष्टी गडावर अवचित मिळतात त्या पावसाळ्याच्या दरम्यानच. सुरेश
वाडकरांचा अनुभव असा की, पावसाळ्यामध्ये रायगडाच्या जमिनीची धुप होते. त्यामुळे
जमिनीत दबून बसलेली शिवराई व अन्य नाणी वर उचकून येतात. रायगडाच्या कोपरींमध्ये
हिंडणार्या एखाद्याला मग ही जुनी ऐतिहासिक नाणी सापडतातही. गडाच्या पायथ्याला वरुन
वाहात येणार्या धबधब्याच्या पाण्यातून नाणी काही वेळा वाहात येतात. आज किल्ले
रायगडावर जी बांधकामे उभी आहेत ती सर्व काळ्या पत्थराची आहेत. गडाच्या पठारावरच
सुरुंग लावून हा पत्थर मिळविला गेला. जेथे खड्डे झाले तेथे ताळमेळाने तलाव
खोदण्यात आले. रायग़ड चहुबाजूंनी फिरल्यानंतर सुरेश वाडकरांनी त्याची विविध
दिशांनी छायाचित्रे टिपण्यास सुरुवात केली. त्यांचा कॅमेरा आहे साधाच, पण करामत
मोठी करतो....
रायगडाच्या या
ऐतिहासिक, नैसर्गिक महत्वाचा अनुभव घेतानाच सुरेश वाडकर यांनी आत्तापर्यंत
महाराष्ट्रतील सुमारे १८ हजार लोकांना रायगडदर्शन घडविले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या
कानाकोपर्यात वाडकरांना ओळखणारा एकतरी माणूस असतोच. शिवकालीन किल्ल्यांकडे
बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी वाडकर हे राज्यातल्या
शाळाशाळांतून रायगडासंदर्भात व्याख्याने देतात. रायगडाच्या भोवती अनेक दंतकथा आजवर
गुंफल्या गेल्या आहेत. त्यातील मुलाच्या ओढीने पोर्णिमेच्या रात्री कडा उतरुन
पायथ्याशी आलेल्या शिवकालीन हिरकणी गवळणीची दंतकथा प्रसिद्ध आहे. त्यामुळे
प्रसिद्ध पावलेला हिरकणी कडा कोणत्याही गिर्यारोहण साधनांशिवाय चढून जाण्यात सुरेश
वाडकरांना यश आले आहे. रायगड या मंतरलेल्या वास्तूतील टकमक कडा हा वाडकरांना
सर्वात प्रिय आहे. रायगड परिसरात प्रवेश करताच सर्वात प्रथम दिसते ते भयावह, थरारक
टकमक टोक. पिनॅकल क्लब या गिर्यारोहण संस्थेच्या कार्यक्रमांतर्गत सुरेश वाडकर या
टकमक टोकावरुन हजार फुट खोल रॅपलिंग करुन मोकळे झाले आहेत तेही एकदा नव्हे तर
दोनदा...रायगडची सुमारे पाच हजार छायाचित्रे सुरेश वाडकर यांनी आजवर टिपलेली आहेत.
सुरेश वाडकरांनी
रायगडावर आजवर जितक्या वार्या केल्या, त्या प्रत्येक वारीत भेटलेल्या व्यक्ती,
घटना, पक्षी, निसर्गरुप यांची ठळक नोंद आपल्या रोजनिशीत त्यांनी करुन ठेवली आहे.
रायगड परिसरात शिवकाळापासून महत्त्वाची ठरलेली काही ऐतिहासिक घराणी विविध गावांतून
नांदताना दिसतात. त्यांचीही इत्यंभूत माहिती वाडकरांकडे आहे.
रायगडावर हजार
वार्या मारण्याचा विक्रम करायचे केवळ डोक्यात न ठेवता, त्या वास्तूच्या ऐतिहासिक,
नैसर्गिक अवस्थांचे भान राखून त्यांची संशोधकी वृत्तीने चिकित्सा करणार्या सुरेश
वाडकरांना तमाम मराठी माणसांनी कुर्निसातच केला पाहिजे.
No comments:
Post a Comment