Friday, March 7, 2014

आर. एस. शर्मा :मानवी चेहरा शोधणारा इतिहासकार (दै. दिव्य मराठी - ४ सप्टेंबर २०११)





भारतीय इतिहासकारांच्या मांदियाळीत रामशरण ऊर्फ आर. एस. शर्मा यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांच्या विद्वत्तेचा विलक्षण आदरयुक्त असा दबदबा होता. २० ऑगस्ट२०११ रोजी त्यांचे निधन झाले व इतिहास लेखनाचा एक वेगळा अध्याय संपुष्टात आला. आर. एस. शर्मा यांना आदरांजली वाहणारा लेख मी दै. दिव्य मराठीच्या ४ सप्टेंबर २०११च्या अंकात लिहिला.
-------------
आर. एस. शर्मा :मानवी चेहरा शोधणारा इतिहासकार
-----------
- समीर परांजपे
------------

राजेरजवाडे असोत किंवा लोकशाही तसेच हुकूमशाही देशातील सत्ताधारी, त्यांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना त्या कालखंडातील शेतकरी, कष्टकरी वर्ग, सामान्य माणूस यांना  केंद्रस्थानी ठेवून केलेले इतिहास लेखन हे अधिक सकस व जिवंत असते. त्यामुळे विशिष्ट कालखंडातील ‘खरा’ इतिहास कळण्यास मदत होते. या धाटणीचे इतिहास लेखन भारतात डी. डी. कोसंबी यांनी प्रामुख्याने केले होते. त्यानंतर अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा आपल्या देशात निर्माण झाली. त्या परंपरेचे पाईक असलेल्या प्रमुख इतिहासकारांमध्ये रामशरण ऊर्फ आर. एस. शर्मा यांचे नाव अग्रस्थानी होते. भारतीय इतिहासकारांच्या मांदियाळीत त्यांच्या विद्वत्तेचा विलक्षण आदरयुक्त असा दबदबा होता. २० ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले व इतिहास लेखनाचा एक वेगळा अध्याय संपुष्टात आला.
प्राचीन भारत तसेच मध्ययुगीन काळातील आरंभीचा कालखंड या विषयावरील इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून आर. एस. शर्मा यांची विद्वत्जगतात ओळख होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढचे सारे शिक्षण शर्मा यांनी त्यांना मिळालेल्या विविध शिष्यवृत्त्यांच्या आधारे पूर्ण केले. शर्मा युवावस्थेत शेतकºयांचे नेते पंडित कर्यानंद शर्मा, विद्वत््जन स्वामी सहजानंद सरस्वती, महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या सान्निध्यात आले. त्यांच्या जीवनशैलीचा व विचारांचा विलक्षण प्रभाव आर. एस. शर्मा यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला. सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कठोर संघर्ष करणे व लढा उभारणे आवश्यक आहे या मताचे ते बनले. यातूनच ते साम्यवादी विचारसरणीचे कट्टर पुरस्कर्ते बनले. आर. एस. शर्मा यांच्या बुद्धिवैभवाला खºया अर्थाने झळाळी प्राप्त झाली ते विख्यात समाजसुधारक व पत्रकार डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांच्या सहवासात आल्यानंतर. सिन्हा यांच्याशी वेळोवेळी झालेल्या विचारमंथनातून ग्रामीण भारतातील परिस्थितीचे जळजळीत वास्तव शर्मा यांच्यासमोर उलगडले गेले व डाव्या विचारांच्या चळवळीशी असलेले त्यांचे नाते अधिकच दृढ झाले. साम्राज्यवाद व जातीयवादविरोधी ठाम भूमिका घेऊन हा इतिहासकार आपल्या लेखनातून ठामपणे भूमिका मांडू लागला.
शर्मा यांनी आरा, भागलपूर येथील महाविद्यालयांमध्ये इतिहास या विषयाचे अध्यापन करून ते १९४६ मध्ये पाटणा विद्यापीठाच्या कक्षेतील पाटणा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इतिहासकार म्हणून उत्तम कामगिरी बजाविल्याचे फलित म्हणजे ते पाटणा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख बनले (१९५८ ते १९७३). आपल्या करिअरमध्ये आणखी उंची गाठत ते दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख (१९७३ ते १९७८) बनले. लंडन विद्यापीठातील स्कूल आॅफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज या संस्थेतून शर्मा यांनी आपली पीएचडी पूर्ण केली होती. प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत विविध घडामोडींमुळे भारतातील असलेली शेतीची स्थिती, त्याचे शेतकºयांवर झालेले परिणाम, अनेक राजवटींमधील सामान्य माणसांचे जीवन या विषयाला केंद्रस्थानी मानून शर्मा यांनी इतिहास लेखन केले. त्यांच्या इतिहासलेखनाचा वेध घेणारी व त्यांच्या गौरवार्थ प्रकाशित केलेली त्यांची ‘सोसायटी अँड आयडिऑलॉजी इन इंडिया’, ‘सिलेक्शन ऑफ  एसेज ऑफ आर. एस. शर्मा’ ही दोन पुस्तके अभ्यासकांनी अत्यंत मार्गदर्शक ठरली आहेत. शर्मा यांनी इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचे सुमारे १५ भाषांतून अनुवाद झाले आहेत. त्यांच्या या सा-या पुस्तकांची एकूण संख्या ११५ इतकी होते. भारतामध्ये ख्रिस्तपूर्व १५०० पासून इसवी सन ५००व्या शतकापर्यंतच्या कालावधीत जे सामाजिक बदल होत गेले त्याचा खरा व यथार्थ इतिहास शर्मा यांनी लिहिला. कोसंबी यांनी दाखविलेल्या इतिहासलेखनाच्या मार्गाने पुढे जाऊन शर्मा, इरफान हबीब, रोमिला थापर यांच्यासारख्या साम्यवादी विचारसरणीच्या इतिहासकारांनी इतिहास लेखनात नेत्रदीपक कार्य केले. शर्मा यांच्या इतिहाससंशोधनाबद्दल अमेरिकेतील कट्टर साम्यवादविरोधी विचारसरणी असलेल्या विद्यापीठांमध्येही विलक्षण आदरभाव होता. प्राचीन भारताविषयी केलेल्या प्रगाढ संशोधनाबद्दल आर. एस. शर्मा यांना मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने कॅम्पबेल स्मृती सुवर्णपदक १९८७ च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रदान करून गौरविले होते. त्याशिवाय इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अधिवेशनात १९९२ मध्ये त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे अनेक मानसन्मान त्यांना लाभले. सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी वर्ग, दलित-पीडित, शोषित या वर्गांविषयी खरी कळकळ असलेला हा इतिहासकार आता अनंतात विलीन झाला आहे.
----------------

No comments:

Post a Comment