आंध्र प्रदेशचे
दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी आपल्या
कारकिर्दीत जे काही नाव कमावले होते, त्याउलट आपल्या अल्प राजकीय
कारकिर्दीत त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या नावाला बट्टा लावला आहे. बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी जगनमोहन रेड्डी यांना ११ जून २०१२पर्य़ंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश हैदराबाद
येथील सीबीआय न्यायालयाने दिला होता. त्यांच्या राजकीय वाटचालीवर
दै. दिव्य मराठीच्या ४ जून २०१२च्या अंकात मी हा लेख लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
जगनमोहन रेड्डींचे
होणार काय?
- समीर परांजपे
आंध्र प्रदेशचे
दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी आपल्या
कारकिर्दीत जे काही नाव कमावले होते, त्याउलट आपल्या अल्प राजकीय
कारकिर्दीत त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या नावाला बट्टा लावला आहे. बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी जगनमोहन रेड्डी यांना ११ जून २०१२पर्य़ंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश हैदराबाद
येथील सीबीआय न्यायालयाने दिला.
जगनमोहन यांनी असे दिवे तरी काय लावले
आहेत?
कर्नाटकातील संदूर
येथे एक छोटीशी पॉवर कंपनी जगनमोहन रेड्डी यांनी १९९९-२००० या कालावधीत सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी या कंपनीचा
विस्तार इशान्येकडील राज्यांमध्येही केला. २००४ साली
वाय. एस.
राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे
मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळात जगनमोहन यांचे उद्योगसाम्राज्यही झपाटय़ाने विस्तारत
गेले. त्यानंतर त्यांनी सिमेंटनिर्मिती, पायाभूत स्विधाक्षेत्र,
प्रसारमाध्यमे या क्षेत्रांमध्येही
मोठी गुंतवणूक करायला प्रारंभ केला. केवळ यशस्वी उद्योजक म्हणूनच नव्हे तर एक यशस्वी राजकारणी म्हणूनही पुढे येण्यासाठी
जगनमोहन यांनी हातपाय मारायला सुरुवात केली ती २००४च्या
अखेरीपासूनच. कडापा लोकसभा मतदारसंघातून खासदार बनण्यासाठी त्यांची
धडपड सुरु होती मात्र त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाने त्यांचे सारे मनसुबे उधळून लावले
होते. त्यानंतर कडापा येथून खासदार होण्यासाठी त्यांना तब्बल
पाच वर्षे वाट पाहावी लागली. पण ही संधी मिळाली ती एका दुर्दैवी घटनेमुळे. २००९ सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये एका हेलिकॉप्टर घटनेत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची जगनमोहन
यांची मनिषा होती. त्यांना आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षातल्या
बहुतांश आमदारांचा पाठिंबाही होता. मात्र काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी यावेळीही जगनमोहन यांना धूप घातली नाही.
त्यामुळे निराश झालेल्या जगनमोहन यांनी २०१०च्या
प्रारंभीपासून ‘बंडोबा’चे रूप
धारण केले. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अकस्मात अपघाती
निधनाने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचा मुलगा म्हणून मीच कसा लायक राजकीय
वारसदार आहे हे मतदारांच्या मनावर ठसविण्यासाठी त्यांनी ‘ओडापरू
यात्रा’ आयोजित केली होती. या
यात्रेदरम्यान जगनमोहन आंध्र प्रदेशातील विविध गावांमध्ये फिरले. लोकांशी थेट संवाद साधला.
याचा व्हायचा तो नेमका परिणाम झालाच. जगनमोहन यांची लोकप्रियता वाढली. ही यात्रा काढण्यासाठी
काँग्रेस नेतृत्त्वाने त्यांना परवानगी नाकारली होती. 2010 सालच्या
नोव्हेंबर महिन्यात काँग्रेस नेतृत्त्वाने के. रोसेय्या
यांच्या जागी एन. किरणकुमार यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनविले. जगनमोहन यांच्या दृष्टीने आजवर पडत असलेल्या छोटय़ा छोटय़ा ठिणग्यांतून आता आगडोंब
उसळला होता. जगनमोहन रेड्डी यांनी २९ नोव्हेंबर २०१० मध्ये काँग्रेसशी सारे संबंध तोडून स्वत:चा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जगनमोहन
यांनी युवाजन श्रमिक रुथू काँग्रेस (वायएसआर काँग्रेस) हा स्वत:चा पक्ष मार्च २०११मध्ये
स्थापन करून आंध्र प्रदेशच्या राजकीय आखाडय़ातील काँग्रेस
व तेलुगू देसम या प्रतिस्पर्ध्यांना खुले आव्हान दिले. या
पावलानंतर त्यांच्याकडे एक मोठे राजकीय यश
चालून आले. मे २०११मध्ये कडापा लोकसभा
मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जगनमोहन हे प्रतिस्पर्धी
उमेदवारावर तब्बल पाच लाख मतांची आघाडी घेऊन निवडून आले. त्यानंतर
काही काळाने पुलिवेंदूला विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची आई वाय. एस. विजया यांनी विजय मिळविला होता. जगनमोहन यांच्यावर अजूनही निष्ठा बाळगून असलेल्या काँग्रेसमधील १९ आमदारांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मते दिली. त्यामुळे विलक्षण अडचणीत आलेल्या राज्य सरकारला प्रजा राज्यम व मजलीस या पक्षांच्या
आमदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे टिकाव धरता आला. काँग्रेसची
अब्रू जाता जाता राहिली होती.
गेल्या मार्चमध्ये तिथे सात विधानसभा
जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सहा जागांवर काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा
लागला होता. या पोटनिवडणुकीत जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने
एक जागा जिंकून जणू काँग्रेस व तेलुगू देसम पक्षाला इशाराच दिला. येत्या १२ जून २०१२रोजी आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेची एक जागा व
विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणुका होत असून आंध्र प्रदेशमधील
काँग्रेस सरकार अल्पमतात जाण्याचा स्पष्ट धोका आहे.
जगनमोहन रेड्डी
यांना कुठेतरी रोखणे हे त्यांच्या राजकीय विरोधकांना आवश्यक वाटत होते. वाय. एस. राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री
असताना जगनमोहन यांनी आपल्या व्यवसायामध्ये विविध कंपन्यांनी मोठी गुंतवणूक करावी
यासाठी त्या कंपन्यांवर दबाव आणायला सुरुवात केली होती. त्यातून
स्वत:च्या उद्योगात त्यांनी विविध कंपन्यांकडून सुमारे १२३४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यातून जगनमोहन यांच्या संपत्तीत आणखी ३०० कोटी
रुपयांची वाढ झाली. त्या बदल्यात या कंपन्यांना वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या सरकारकडून मोठय़ा सवलती
मिळाल्याचाही आरोप होत होता. या सगळ्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश आंध्र
प्रदेश उच्च न्यायालयाने १० ऑगस्ट २०११ रोजी
सीबीआयला दिले.
जगनमोहन रेड्डी यांच्या व्यवहारांची चौकशी व्हावी
अशा याचिका काँग्रेसचे मंत्री पी.
शंकरराव, तेलुगू
देसम पक्षाचे नेते येरा नायडू यांनी दाखल केल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानूसार सीबीआयने जगनमोहन यांची घरे तसेच देशातील विविध ठिकाणी
असलेल्या त्यांच्या कार्यालयांवर १८ ऑगस्ट २०११ रोजी धाडी घातल्या. सीबीआयने
आत्तापर्यंत त्यातील २४ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. अगदी वाय. एस. आर. रेड्डी यांच्याशी संबंधित बेहिशेबी संपत्तीच्या अजून एका प्रकरणात आंध्र प्रदेशचे
अबकारी खात्याचे मंत्री मोपिदेवी वेंकटरमणा यांना २४ मे
रोजी अटक करण्यात
आली.
आता जगनमोहन यांनाही
सीबीआयने तुरुंगाच्या गजाआड केले आहे. ११ जून २०१२पर्यंत न्यायालयीन
कोठडीतच राहावे लागणार असल्याने जगनमोहन राज्यात होणाऱया पोटनिवडणुकांत प्रचार करू
शकणार नाहीत हेही स्पष्ट झाले.
मात्र तुरुंगात असतानाही या निवडणुकांच्या
प्रचाराबाबत माहिती जगनमोहन यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पुरविण्यात येत आहे. या निवडणुकांचे घोडामैदान जवळच आहे.
sameer.p@dainikbhaskargroup.com
No comments:
Post a Comment