Thursday, March 6, 2014

मराठीची 'आफ्रिकन सफारी'

 

 दै. दिव्य मराठीच्या २३ फेब्रुवारी २०१३च्या अंकात मी आफ्रिकेतील मराठी माणसांवर लिहिलेल्या लेखाची लिंक.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-rasik-article-on-marathi-african-safari-4189445-NOR.html

------

मराठीची 'आफ्रिकन सफारी' 

---

- समीर परांजपे 
----

Email Print Comment
मराठीची 'आफ्रिकन सफारी'
आफ्रिकेच्या पूर्व भागावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते. ते अधिक मजबूत करण्यासाठी मोम्बासा बंदरापासून ते लेक व्हिक्टोरियाच्या काठी किसुमू या शेवटच्या स्थानकापर्यंत अशा सुमारे 660 मैल लांबीच्या रेल्वे प्रकल्पास 1896मध्ये प्रारंभ झाला. ‘युगांडा रेल्वे’ नावाने ओळखल्या गेलेल्या या प्रकल्पाच्या बांधणीसाठी भारतातून त्या वेळी सुमारे 32 हजार मजुरांना आफ्रिकेत नेण्यात आले होते. त्यामध्ये गुजरात, पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रातील कोकण, सांगली, सातारा भागातील मजुरांचाही समावेश होता. किंबहुना याच प्रकल्पामुळे मराठी माणसांची पावले पूर्व आफ्रिका भागात उमटली. युगांडा रेल्वेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारतातून आलेल्या मजुरांपैकी 6724 जणांनी आफ्रिकेतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यात काही मराठी कुटुंबेही होती.
जोमो केन्याटा हे स्वतंत्र केनियाचे पहिले अध्यक्ष बनले. त्या वेळी पं. नेहरूंनी औंधचे संस्थानिक अप्पासाहेब पंत यांची भारताचे केनियातील राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. आज केनियाची राजधानी नैरोबी येथे महाराष्ट्र मंडळाची स्वत:च्या मालकीची जी इमारत दिसत आहे, ती अप्पासाहेब पंत यांच्याच प्रयत्नांमुळे उभी राहिली आहे. या वास्तूसाठी केनिया सरकारने महाराष्ट्र मंडळाला जागा देऊ केली होती. नैरोबीनंतर महाराष्ट्र मंडळाची दुसरी स्वत:ची वास्तू उभी राहिली, ती लंडनमध्ये. नैरोबीमध्ये महाराष्ट्र मंडळाची जी वास्तू आहे, त्यामध्ये असलेले निवासी गाळे व सभागृहाचे येणारे भाडे हे त्या मंडळासाठी कायमस्वरूपी उत्पन्न झालेले आहे. केनियातील इतर शहरांमध्ये राहत असलेल्या मराठी माणसांनीही आता मराठी मंडळे आपापल्या शहरात स्थापन करायला सुरुवात केली आहे.
अलीकडे, दक्षिण आफ्रिकेत उद्योग-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या राजीव व डॉ. शार्दुली तेरवाडकर या दांपत्याने जोहान्सबर्ग येथे मराठी मंडळींना एकत्र आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. राजीव तेरवाडकर व त्याच्या काही मित्रांनी एकत्र येऊन 2004मध्ये जोहान्सबर्ग येथे मराठी मंडळाची स्थापना केली. हे दक्षिण आफ्रिकेतील पहिले अशा स्वरूपाचे मंडळ. त्याचे आता अनेक मराठी सदस्य आहेत. या सर्वांनी महिन्यातून एकदा-दोनदा एकत्र येऊन मराठी संस्कृतीशी नाळ जोडणारे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यातूनच मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्यही आपसूक होत गेले. या कार्याचे महत्त्व ओळखून दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमधील मराठी मंडळींनीही 2009मध्ये त्या शहरात मराठी मंडळ सुरू केले. दरम्यान, त्या आधी 2008मध्ये मराठी मंडळ साऊथ आफ्रिका या नावाने नोंदणी होऊन मंडळाची अधिकृत कार्यकारी समितीही स्थापन करण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेविषयी खूप काही सांगणारे ‘दक्षिण आफ्रिका- एक सप्तरंगी संस्कृती’ हे एक पुस्तक डॉ. शार्दुली तेरवाडकरने दोन वर्षांपूर्वी लिहिले आहे. दक्षिण आफ्रिकेतील मराठी विश्वाविषयी शार्दुली तेरवाडकरने सांगितले की, इथे जे मराठी लोक वर्षानुवर्षे राहतात व ज्यांची मुले दक्षिण आफ्रिकेतच जन्माला आली आहेत, अशी मुले मराठी संस्कृतीचे रोजच्या जगण्यात अनुकरण करतील वा शुद्ध मराठीत बोलत असतील असे होणार नाही. मात्र, जी मराठी कुटुंबे दक्षिण आफ्रिकेत तात्पुरती वास्तव्य करून आहेत, ती आपल्या मुलांना मराठी भाषा नीट आली पाहिजे, त्यांना मराठी सणवार, खाद्यपदार्थ, संस्कृती यांची नीट माहिती असलीच पाहिजे, याविषयी कमालीचे सजग असतात. त्यासाठी ते आपल्या मुलांशी घरात नेहमी मराठीतच बोलतात. त्यामुळे ही कुटुंबे जेव्हा पुन्हा भारतात परततात, त्या वेळी त्यांच्यासमोर मुलांना मराठी न येण्याबाबत फारशी अडचण राहात नाही. जेव्हा मुले लहान असतात त्या वेळी भारतातून नेलेल्या मराठी पुस्तकांतून या भाषेची ओळख पालक त्यांना करून देतात. त्यांना मराठीत लिहायला प्रोत्साहित करतात. या सगळ्या गोष्टींमुळेही मराठी भाषा दक्षिण आफ्रिकेतील मराठी मंडळी तितक्याच स्वच्छपणे बोलताना आढळतील. मराठी संस्कृती नेमकी कशी आहे,   याची ठळकपणे ओळख व्हावी यासाठी जोहान्सबर्ग येथे राजीव तेरवाडकर यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2012 या कालावधीत मराठी चित्रपटांचा महोत्सवही आयोजण्यात आला होता. त्यामध्ये काकस्पर्श, हरिश्चंद्राची फॅक्टरी, मी सिंधुताई सपकाळ, वळू, खेळ मांडला, नटरंग, मुंबई-पुणे-मुंबई, गोळाबेरीज, जनगणमन, झेंडा, देऊळ हे चित्रपट दाखवण्यात आले. आफ्रिका खंडात आयोजलेला हा अशा प्रकारचा पहिलाच मराठी चित्रपट महोत्सव होता. त्याला दक्षिण आफ्रिकेतील मराठी मंडळींनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
मुळात, 19व्या शतकाच्या पूर्वार्धापासून आफ्रिका खंडामध्ये मराठी माणसांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले, ते सर्वप्रथम मॉरिशस या देशामध्ये. 1834मध्ये या देशात खर्‍या अर्थाने भारतीय स्थायिक होण्यास प्रारंभ झाला. गुलामगिरी प्रथेवर बंदी आल्यानंतर ब्रिटिश वसाहतींमधील शेते, उद्योगांमध्ये काम करण्यासाठी आफ्रिकी गुलामांचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे मॉरिशसमध्ये गोर्‍या मालकांच्या उसाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी भारतातून मजूर नेण्यात आले. या मजूरभरतीसाठी भारतात कोलकाता व मद्रास ही महत्त्वाची केंद्रे होती. हिंदी भाषिक हे मुख्यत्वे कोलकाता केंद्रातून तर तामिळ, तेलुगु भाषिक मजुरांची भरती ही मद्रासहून होत असे. मॉरिशसला त्या वेळी मजूर म्हणून गेलेले मराठी स्थलांतरित हे पुणे, सातारा, रत्नागिरी व कोकणातील अन्य ठिकाणचे होते. मॉरिशसच्या ब्लॅक रिव्हर डिस्ट्रिक्ट, ले व्हॅल, रिचे-एन-ऐऊ या जिल्ह्यांत प्रामुख्याने या मराठी मजुरांच्या वसाहती होत्या. मजुरीचा करार संपल्यावर मॉरिशसमध्ये असलेल्या मराठी लोकांनी तिथेच जमिनी विकत घेतल्या व आपल्या मालकीची घरे बांधली. मॉरिशसमध्ये आलेल्या मराठी मजुरांची पहिली पिढी ही काबाडकष्ट करून स्वत:ला त्या देशात स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या धडपडीत होती.
मॉरिशसमधील मराठी माणसांच्या दुसर्‍या पिढीला मात्र शिक्षण व अधिक संपन्न आयुष्याची आस लागली होती. त्यातून व्हाकोस, कुरेपीप, क्वात्रे बोर्नस, बेऊ बसीन तेथे वसलेल्या मराठी लोकांनी लोकांनी आपला व परिसराचा विकास करण्याकडे चंग बांधला. मॉरिशसमध्ये जिथे जिथे मराठी वस्ती होती तिथे तिथे सभा व मंदिरे स्थापन करण्यात आली. सध्या मॉरिशसमध्ये मराठी भाषकांच्या 50हून अधिक नोंदणीकृत संस्था आहेत. त्यापैकी 48 संस्था मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनच्या नेतृत्वाखाली एकवटल्या आहेत. मराठी भाषकांचे हे विस्तारलेले वर्तुळ बघूनच कदाचित मॉरिशसच्या कला व संस्कृती मंत्रालयाच्या वतीने मराठीसह दहा भाषांमधील नाटकांसाठी राष्ट्रीय नाट्यस्पर्धा आयोजित करण्यास प्रारंभ झाला. आजही या नाट्यस्पर्धांमध्ये मॉरिशसमधील मराठी माणसे उत्साहाने सहभागी होत असतात.
तत्पूर्वी मॉरिशसमधील विविध भाषांच्या संवर्धनाकरिता तेथील सरकारने एक धोरण आखले. त्या अंतर्गत ‘मराठी कल्चरल ट्रस्ट’चीही तेथील सरकारने स्थापना केली. मराठी संस्कृती टिकवण्यासाठी तसेच नवे आयाम देण्यासाठी नवीन कलाकारांना या ट्रस्टमार्फत प्रोत्साहन देण्यात येते. त्याशिवाय तबला कोर्सेस, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, पाळणागीत आदी विषयांवर डीव्हीडी बनवून ती मॉरिशसमधील मराठी माणसांना वितरित करण्यात येते. त्या देशातील मराठी भाषिक क्रियोळ, फ्रेंच व इंग्लिश भाषेचा वापर करतात. मराठी भाषा टिकावी म्हणून मराठी साहित्य परिषद, मराठा मंदिर या तेथील संस्थांतर्फे मोफत अभ्यासक्रम, शिकवणीची सोय केली जाते. 1965 पासून ओरिएंटल भाषा प्राथमिक स्तरापासून मॉरिशसच्या शाळांतून शिकवल्या जातात. मराठीही त्यात आहे. त्याशिवाय द्वितीय, तृतीय स्तरावरही मराठी शिकवली जाते. मॉरिशसमध्ये मराठी भाषेत पीएचडी केलेला एक संशोधकही आहे. 1998मध्ये  सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी स्पीकिंग युनियनची स्थापना केली आहे. 1989मध्ये पहिली जागतिक मराठी परिषद मुंबईत झाली. तिला मॉरिशसच्या तत्कालीन महिला कल्याणमंत्री शीलाबाय बापू प्रमुख पाहुण्या होत्या. प्राथमिक शिक्षणाच्या स्तरापासून मराठी या मातृभाषेत शिक्षण द्यावे, अशी मागणी मॉरिशसमधील मराठी भाषिकांकडून (या देशातील 68 टक्के जनता ही भारतीय वंशाची आहे. त्यातील 18 टक्के लोक हे मराठी भाषिक आहेत.) करण्यात येत होती. त्याचाच परिणाम असेल, पण महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या ‘स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस’ या संस्थेने मॉरिशसमधील विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करण्याचे काम पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख मनोहर जाधव यांच्यावर सोपवले. याशिवाय मॉरिशस सरकार आपल्या मराठी नागरिकांना मराठीतून उच्च शिक्षण देण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे.
आफ्रिका खंडाचा मोठा विस्तार लक्षात घेता तेथील टांझानिया, युगांडा, केनिया, नायजेरियासह आणखी कोणकोणत्या देशांमध्ये नेमकी किती मराठी मंडळी सध्या वास्तव्य करून आहेत, याचा अचूक आकडा जरी हाती नसला तरी ही मंडळी मराठी भाषा व संस्कृती मनापासून जपत स्वत:चे जगणे अधिक समृद्ध करत आहेत, हेही विशेष म्हणायला हवे.
   paranjapesamir@gmail.com

No comments:

Post a Comment