मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा विकास कसा झाला, या संस्थेने
कोणते सांस्कृतिक योगदान दिले व या संस्थेमध्ये कालांतराने औदासीन्याचे वातावरण कसे
पसरले, याचा सविस्तर आढावा घेणारे ‘मुंबई मराठी
ग्रंथसंग्रहालय : दि प्राइड ऑफ इंडिया’ हे इंग्रजी
पुस्तक डॉ. प्रदीप कर्णिक यांनी लिहिले आहे. मुंबई मराठी
ग्रंथसंग्रहालयावर त्यांनी केलेल्या पीएच. डी. प्रबंधाचे हे
पुस्तक रूपांतर आहे. या पुस्तकाचे परीक्षण मी दै. दिव्य मराठीच्या १६ सप्टेंबर २०१२च्या अंकात
केले होते. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे चित्र व चरित्र
- समीर परांजपे
प्राचीन भारतामध्ये तीन प्रकारची ग्रंथालये होती. (1) राजेरजवाडय़ांचा
ग्रंथसंग्रह, (2)शिक्षण संस्थांतील ग्रंथसंग्रह आणि (3) मंदिरे, मठ, बौद्धविहार
किंवा स्तूप यासारख्या धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये असलेला ग्रंथसंग्रह. भारतात आधुनिक
शैलीतील ग्रंथालयांची स्थापना युरोपियनांच्या आगमनानंतरच झाली. दि सोसायटी
फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ मध्ये स्थापन झालेल्या
संस्थेने मद्रास व बंगाल प्रांतामध्ये काही ग्रंथालये सुरू केली होती. आज आपल्याला
जी सार्वजनिक ग्रंथालये दिसतात त्यांच्या पूर्वसुरी होत्या स्टेशन लायब्ररीज. देशभरात १८२१ ते १८३५ या कालावधीत
ब्रिटिश नागरिक व लष्करी अधिकाऱयांनी वैयक्तिक वापरासाठी १२ स्टेशन लायब्ररी
सुरू केल्या होत्या. कालौघात पुढे देशभरात अगदी गावपातळीपर्यंत ग्रंथालयांचा
प्रसार झाला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात ललामभूत ठरलेल्या मुंबई
मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना १८९८ मध्ये झाली.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केल्यानंतर त्याच्या धुरीणांनी
पहिले काम केले ते म्हणजे बहुतांश मराठी पुस्तके एका छताखाली जमवण्याचे. पुढच्या काळात
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने समाजातील विविध धुरीणांच्या सहकार्याने आपली अन्य उदात्त
उद्दिष्टेही साध्य केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा विकास
कसा झाला, या संस्थेने कोणते सांस्कृतिक योगदान दिले व या संस्थेमध्ये
कालांतराने औदासीन्याचे वातावरण कसे पसरले, याचा सविस्तर
आढावा घेणारे ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय : दि प्राइड ऑफ
इंडिया’ हे इंग्रजी पुस्तक डॉ. प्रदीप कर्णिक
यांनी लिहिले आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयावर त्यांनी केलेल्या
पीएच. डी. प्रबंधाचे हे पुस्तक रूपांतर आहे. मुंबईच्या रुपारेल
महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रदीप कर्णिक
हे ग्रंथालय क्षेत्रातील एक नेणिवेचे व्यक्तिमत्त्व आहे. या पुस्तकातील
प्रकरणांच्या शीर्षकांवर एक नजर टाकली तरी या पुस्तकाचे स्वरूप स्पष्ट होऊ शकेल.
भारतातील ग्रंथालयांचा
उगम व त्यांचा विस्तार याचा आढावा पहिल्या प्रकरणात घेण्यात आलेला
आहे. त्यानंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय - ऐतिहासिक पार्श्वभूमीचा
आढावा, या ग्रंथालयाची कार्यशैली, मुंबई मराठी
ग्रंथसंग्रहालयातील ग्रंथसेवा, तेथील बौद्धिक कार्य, या ग्रंथालयातील
बिबिलिओग्राफिक सेवा, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व नॉन फॉर्मल शिक्षण, तेथील ग्रंथालयेतर
उपक्रम, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय- संस्कृती व
साहित्यविकास, मुंबई
मराठी ग्रंथसंग्रहालय- यश व अपयश या
प्रकरणांतून प्रदीप कर्णिक यांनी या ग्रंथसंग्रहालयाचे चित्र व चरित्र साकारले आहे. या ग्रंथालयाच्या
विकासाचे काही टप्पे आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर
शाखेने १९४२ मध्ये बालवाचकांसाठी खास ग्रंथ विभाग सुरू केला.
१९४५ ते १९७६ या कालावधीत
कुलाबा ते गोरेगाव या पट्टय़ामध्ये ग्रंथसंग्रहालयाच्या ९ शाखांनीही असेच
बालविभाग सुरू केले. मराठी भाषेचा अभ्यास व संशोधनासाठी या ग्रंथालयाने १९४८ मध्ये मराठी
संशोधन मंडळ हा स्वायत्त विभाग सुरू केला. कालांतराने
मराठीमध्ये पीएच.डी. तसेच एम. ए. करण्यासाठी
या विभागात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास मुंबई विद्यापीठानेही मान्यता दिली. १९५८ मध्ये इतिहास
संशोधनासाठी इतिहास संशोधन मंडळ हा विभाग मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने स्थापन केला. या ग्रंथालयाच्या
अनेक शाखाही मुंबई शहरातील कामगार वस्त्या, मध्यमवर्गीयांच्या
वस्त्या, झोपडपट्टय़ांचे विभाग अशा विविध ठिकाणी स्थापन झाल्या
व तेथील लोकांच्या वाचनाची भूक भागवू लागल्या. दरवर्षी किमान
हजार मराठी पुस्तके प्रकाशित होतात. हे प्रमाण लक्षात घेतले तर या ग्रंथालयाच्या
मध्यवर्ती शाखेमध्ये एक लाख तीस हजारांहून अधिक मराठी पुस्तकांचा आजमितीला संग्रह आहे, ही प्रशंसनीयच
बाब आहे.
१९२० ते १९८० या कालावधीचा
आढावा घेतला तर त्या वेळी ग्रंथसंग्रहालयातर्फे ११ विविध व्याख्यानमाला
आयोजिल्या जात होत्या. त्यामध्ये ९ व्याख्यानमाला
वार्षिक स्वरूपाच्या होत्या, तर अन्य २ व्याख्यानमालांना कालबंधन नव्हते. त्या दोनपैकी डी. डी. कोसंबी स्मृती
व्याख्यानमालेत धर्म व तत्त्वज्ञान या विषयांवर विचारमंथन केले जाते. तर वि. स. खांडेकर स्मृती
व्याख्यानमालेत साहित्य व साहित्यसमीक्षा या विषयांवर तज्ञांची भाषणे आयोजिली जातात. विज्ञानाचा
प्रसार करणे, औषधे, आरोग्य या संदर्भात जागृती निर्माण करणे, ऐतिहासिक पार्श्वभूमी
समजून घेणे, सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करणे, नाटक व अन्य
परफॉर्मिंग आर्ट्सच्या सखोल आकलनासाठी अन्य ९ व्याख्यानमालांमध्ये
तज्ञांची भाषणे आयोजिली जातात.
१९५८ मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने कला मंडळ
हा विभाग सुरू केला. त्यातून नाटक, नृत्य, संगीत, लोककला, जादूचे प्रयोग, नकला आदी गोष्टी
सादर करणार्यांना प्रोत्साहन देण्यात येत असे. त्याचप्रमाणे
रंगभूमी या विषयावर वार्षिक व्याख्यानमालाही १९५८ पासून सुरू
करण्यात आली. १९८४ पर्यंत कला मंडळातर्फे विविध कलात्मक गोष्टींचे
शिक्षण देणारे काही कोर्सेसही चालवण्यात येत असत. कला मंडळाचे
सारे कार्यक्रम नायगाव येथील ग्रंथसंग्रहालयाच्या खुल्या नाटय़गृहात होत असत. मुंबई मराठी
ग्रंथसंग्रहालयाच्या तोवर ४० शाखा कार्यरत झालेल्या होत्या.
ग्रंथसेवा देण्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक
उत्थानासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाकडून विविध उपक्रम
यशस्वीपणे राबवले जात होते. ग्रंथसंग्रहालयाचा
नायगाव येथील संदर्भ विभाग हा तमाम संशोधकांसाठी मोठा आधारस्तंभ बनला होता. या नेत्रदीपक
प्रगतीला मग अचानक घरघर का लागली? आर्थिक अस्थैर्य, संकुचित मनोवृत्तीच्या
माणसांनी संस्थेतील महत्त्वाची पदे बळकावणे, कर्मचाऱयांना
मिळणारे अपुरे वेतन, युनियनबाजी अशा अनेक कारणांमुळे जर्जर झालेले
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आजही उभे आहे, ग्रंथसेवा देत
आहे, पण त्यामध्ये पूर्वीची चमक नाही.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय : दि प्राइड ऑफ
मुंबई
लेखक - डॉ. प्रदीप कर्णिक, प्रकाशक - डिंपल पब्लिकेशन
पृष्ठे - २४८, मूल्य - २६० रुपये
sameer.p@dainikbhaskargroup.com
No comments:
Post a Comment