भारताची
१९४७ साली फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानमधून
भारतामध्ये अनेक लोक परत अाले तरीही असंख्य जणांनी पाकिस्तानमध्येच राहाणे
पसंत केले. पाकिस्तानातील एक मुख्य शहर कराची व मुंबई या दोन्ही शहरांमध्ये
खूप साम्य अाहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात कोकणातून अनेक मराठी माणसे
रोजगारासाठी कराचीत जाऊन तेथे स्थायिक झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
बहुसंख्य मराठी माणसे परत अाली पण काही मराठी कुटुंबे कराचीमध्येच राहिली.
पाकिस्तानातील या मराठी कुटुंबांचे विद्यमान विश्व काय आहे याचा शोध शक्य
तितक्या मार्गांनी घेऊन त्यावर एक संशोधनपर लेख मी दै. दिव्य मराठीच्या
२०११च्या दिवाळी अंकात लिहिला होता. तो लेख पुढे दिला अाहे.
----------------------------
लेखाचे हेडिंग -
कराचीतील मराठी
विश्व
---------------------------------
- समीर परांजपे
sameer.p@dainikbhaskargroup.com
-----------------------------------------
पाकिस्तानातील कराची शहरात मराठी माणसांच्या वंशजांनी २०११ साली साजरा केलेल्या दीड दिवसांच्या गणेशोत्सवाचे हे छायाचित्र. पाकिस्तानात सध्या किमान तीन हजार मराठी कुटुंबे अजूनही राहातात. |
पाकिस्तानातील कराची शहरात मराठी माणसांच्या वंशजांनी २०११ साली साजरा केलेल्या दीड दिवसांच्या गणेशोत्सवाचे हे छायाचित्र. पाकिस्तानात सध्या किमान तीन हजार मराठी कुटुंबे अजूनही राहातात. |
पाकिस्तानातील कराची शहरात मराठी माणसांच्या वंशजांनी २०११ साली साजरा केलेल्या दीड दिवसांच्या गणेशोत्सवाचे हे छायाचित्र. पाकिस्तानात सध्या किमान तीन हजार मराठी कुटुंबे अजूनही राहातात. |
कराचीतील प्रख्यात उद्योगपती आप्पासाहेब मराठे - फाळणीनंतर यांनी मुंबईत नव्याने सुरूवात करून मराठे उद्योग उभारला. यांचाही माझ्या लेखात सविस्तर उल्लेख आहे. |
--------------------
कराचीतील मराठी विश्व
---------------------
- समीर परांजपे
sameer.p@dainikbhaskargroup.com
--------------------------
यंदाच्या वर्षी
गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्र,
बृहन्महाराष्ट्र व संपूर्ण देशात, परदेशांत जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे, स्थिरावला आहे त्या भागातून हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाल्याच्या बातम्या
येत होत्या. अमेरिका, युरोप, आफ्रिका आदी देशांत जिथे मोठय़ा प्रमाणांवर भारतीय
विशेषत: मराठी लोक आहेत तेथून गणेशोत्सवाची खबरबात
ही येणे ही अजिबात नवलाईची गोष्ट नव्हती. मात्र यंदा गणेशोत्सवाच्या
तिसर्या दिवशी पाकिस्तानच्या डेली
टाईम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी व तिच्यासमवेतच्या छायाचित्रांनी उत्सुकता नक्कीच
ताणली गेली. ती बातमी होती पाकिस्तानमधील मराठी लोकांनी कराचीतील
एका मंदिरात अगदी विधीवत साजरा
केलेल्या दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची...1947 साली फाळणीनंतर पाकिस्तानातील
सिंध,
कराची, हैदराबाद, क्वेट्टासारख्या शहरांमध्ये वास्तव्य करणारी बहुसंख्य
मराठी माणसे ही भारतात परतली होती.पाकिस्तानमध्ये
आता मराठी माणूस असणे शक्यच नाही अशी या महाराष्ट्रदेशी अनेकांची समजूत आहे. तिला जबरदस्त धक्का देणारी
ही बातमी होती. मुस्लिम दहशतवाद्यांचे नंदनवन, धार्मिक कट्टरपंथीयांचा सुळसुळाट असलेला प्रदेश म्हणजे
पाकिस्तान अशी जगभरात या देशाची प्रतिमा असताना तिला छेद देणारी ही अघटित अशी बातमी कशी काय प्रसिद्ध
झाली? की यातही काही कट आहे अशी शंका मनात एक क्षण डोकावली. पण पाकिस्तानबाबत मनात
असलेल्या सगळ्या शंका-कुशंकांचे मळभ बाजूला सारून स्वच्छ नजरेने त्या
देशाचा इतिहास व वर्तमानाकडे
बघण्याचे ठरविल्यावर एक नितळ,
पारदर्शी असे मराठी विश्व समोर साकारले. कराची,
लाहोरसारख्या शहरांमध्ये 1947 पर्यंत सुमारे 40 हजार
मराठी कुटुंबे राहात होती. फाळणीनंतरही सध्या तीन हजार मराठी लोक
पाकिस्तानात वास्तव्य करून आहेत अशी आकडेवारी समजल्यानंतर पाकिस्तानमधील मराठी विश्वाचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांचा समाजशास्त्राeय अंगाने
वेध घ्यायचे ठरविले. त्यामुळे या विश्लेषणात पाकिस्तानातील
राजकारणाचा भाग अगदी अल्प येणार असून तेथील मराठी माणसांच्या सामाजिक जीवनाचे पदर अधिक
उलगडून दाखविण्याचा प्रयत्न असेल.
त्यासाठी विविध संदर्भग्रंथांचा तसेच
त्यातील उतार्यांचा आधार
घेतलेला असून योग्य त्या ठिकाणी त्याचे निर्देशन करण्यात येईल. त्याशिवाय काही नव्या माहितीची भर प्रत्यक्ष
कराचीमध्ये राहिलेल्या मराठी माणसांच्या सविस्तर मुलाखती घेऊन इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भारताची फाळणी होण्याआधी
अस्तित्वात असलेल्या मुंबई प्रांतामध्ये सिंधचाही समावेश होता. फाळणीनंतर हाच सिंध पाकिस्तानमध्ये
समाविष्ट झाला. पूर्वीच्या मुंबई प्रांताचा विचार केला तर सिंधमधील
कराची हे मोठे शहर आपली स्वत:ची शान व आब राखून होते.
पाकिस्तानच्या निर्मितीनंतर कराचीला
राजधानीचा दर्जा मिळाला होता. पण ऑक्टोबर 1959 मध्ये रावळपिंडीला सरकारी कचेऱया हलविण्यात आल्या. 2 ऑगस्ट 1960 सालापासून रावळपिंडी ही पाकिस्तानची
राजधानी बनली. सध्याचे इस्लामाबाद हे राजधानीचे शहर हे रावळपिंडी
जवळच आहे. इस्लामाबाद हे अत्यंत देखणे असून रावळपिंडी हे गलिच्छ आहे. ही दोन्ही शहरे पाकिस्तानातील पंजाब
प्रांतात असून, पाकिस्तानच्या राजकारणावर पंजाब्यांचे वर्चस्व असून त्यामुळे सिंध प्रांतातील
कराचीवर कायमच नावडतीचे जिणे आले
आहे. कलाची ओ बुन या नावापासून बनलेले कराची हे सर्वात मोठे
शहर. एकमेव मोठे बंदर. हब नदीच्या मुखाजवळ खराकला हे लहानसे बंदर होते. 1725 च्या
आसपास ते गाळाने पूर्णपणे भरलेले होते म्हणून तेथील
वस्ती कलाची ओ कुनला हलली.
1843 मध्ये सिंधमध्ये ब्रिटिशांनी
पाऊल टाकले आणि सर चार्ल्स नेपिअरच्या
प्रयत्नाने कराचीची भरभराट सुरू झाली. 1935च्या कायद्याने कराचीचा
समावेश असलेला सिंधचा भाग मुंबई
प्रांतापासून वेगळा केला गेला.
तोपर्यंत कराची नगरपरिषदेचे कामकाज
मोडी लिपीतून चालत असे. 1960 मध्ये सिंधचे महत्त्व कमी व्हावे या एकमेव उद्देशाने पाकिस्तानातल्या
पंजाबी राज्यकर्त्यांनी ही राजधानी पळवून रावळपिंडीला
नेली. पण त्यांचा तो उद्देश काही यशस्वी झाला नाही. कराचीचे महत्त्व अबाधित राहिले व तिची पाकिस्तानची
आर्थिक राजधानी म्हणून असलेली विशेष ओळख ही देखील कायम राहिली. (संदर्भ पुस्तकाचे नाव - पाकिस्ताननामा, लेखक - अरविंद
व्यं. गोखले, पृष्ठ क्रमांक - 38 ते
39).
पूर्वीच्या काळी
सिंधमधील मुख्य दळणवळणाचे साधन म्हणजे सिंधू नदीमधून येणारी जाणारी गलबते होत. यामुळे सिंधु नदीच्या
मुखावरील शहरे ही बंदरे असत. म्हणूनच सिंधु नदीच्या एका मुखावर असलेले ठठ्ठा
हे शहर ही सिंधची राजधानी
व व्यापाराचे एकेकाळी मुख्य बंदर होते. तसेच शहाबंदर, केटी बंदर इत्यादी शहरे होती. पण सिंधु नदीचा प्रवाह हा ऐतिहासिक काळातसुद्धा बदललेला आहे. सिकंदर बादशाहाच्या स्वारीच्या वेळी सिंधू नदी पुष्कळ
पूर्वेकडे असून ती कच्छच्या आखाताला मिळत असावी व त्याचवेळी कच्छचे रण हे क्षार सरोवर असावे. पण सिंधु नदीचा प्रवाह नंतर बदलून पश्चिमेकडे वळला. सिंधूचा प्रवाह वारंवार बदलत आला आहे, इतकेच नव्हे तर सिंधु नदीच्या काठची माती वारंवार कोसळते व म्हणून सिंधू नदीमधून
गलबतांची वाहतूक फार धोक्याची वाटत
असे. म्हणून नदीच्या मुखाखेरीज स्वाभाविक बंदर असलेले ठिकाण
हिंदी व्यापार्यांना हवे होते. कराची हे ठिकाण हे अरबी समुद्रातील नैसर्गिक बंदर आहे. पण दोनशे वर्षांपूर्वी त्याचा मागमूसही नव्हता. नंतर त्याचा शोध
लागला व हिंदी व्यापारी कराची बंदराला आपला माल नेऊ लागले व मग तेथून उंटावरून सिंध प्रांतामध्ये अन्यत्र
नेआण होऊ लागली. सिंधमध्ये ब्रिटिश अंमल सुरु होईपर्यंत कराची हे
मोठे शहर व प्रख्यात बंदर बनलेले नव्हते. कारण सन 1847 मध्ये कराचीची वस्ती अवघी 14000 इतकी होती. तीच सन 1933 मध्ये 26,35,65 इतकी झाली. इतके
हे शहर व बंदर अर्वाचीन काळचे आहे. मात्र कराची हे बंदर मुंबई, कोचीनसारख्या बंदरांप्रमाणेच
नैसर्गिक, सोईस्कर व सुरक्षित असे बंदर आहे. कराची बंदर सिंध
प्रांताच्या नैऋत्य टोकाला आहे.
या बंदरापासून अडीच मैलांवर 1910च्या सुमारास प्रत्यक्ष शहर सुरू होत होते. शहराचा विस्तार साधारण चौकोनी होता. कराची
बंदराला केमारी बंदर असेही म्हटले जात असे.त्या काळी नॉर्थ
वेस्टर्न रेल्वे कराचीच्या या दक्षिण भागातून थेट बंदराच्या धक्क्य़ापर्यंत गेलेली होती. शहराच्या पूर्व बाजूस कराचीचे
कॅन्टोनमेन्ट होते व तेथेच कराची कॅन्टोनमेन्ट स्टेशन होते. कराची शहराच्या पश्चिम बाजूस लायरी नदी आहे. पूर्वी ही नदी शहरामधून व बंदरानजिक वाहात असे. म्हणून
लायरी नदीचा प्रवाह पश्चिमेकडे वळवून उपलब्ध झालेल्या
जागेत भराव टाकण्यात आला. कराचीतील वाढत्या मजूर वर्गाकरिता नवीन वस्तीत
घरे बांधण्यात आली. पश्चिम व पूर्व धक्क्य़ांवरून एक नवाच एम्बॅकमेन्ट रोड हा प्रशस्त, सरळ, सपाट रस्ता करण्यात आला. तो पुढे लॉरेन्स नावाच्या रस्त्याला मिळत असे. कराची
शहराचा अपूर्व अलंकार म्हणजे बंदराच्या नैऋत्य दिशेकडून
ईशान्य दिशेने थेट नव्या तुरुंगापर्यंत जाणारा बंदर रस्ता हा होय. या रस्त्याने चौकोनी शहराचे तिकोनी दोन भाग
पडत होते व कराची शहरातील सर्व रस्ते डावी, उजवीकडून
येऊन बंदर रस्त्याला मिळत होते.हा सरळ, स्वच्छ, प्रशस्त, निर्धुळ
रस्ता आश्चर्यकारक आहे. बंदरापासून दीडदोन मैल या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस समुद्राचे निळसर
हिरवट पाणीच पाणी दिसायचे. या रस्त्याने दीडदोन मैल चालल्यानंतर हार्डिंग
पूल लागायचा व मग तेथून शहराला
सुरुवात व्हायची. या परिसरातील मेरीवेदर टॉवर, मॅक्लिऑडरोड असे काही वास्तू व रस्तेविशेष आजही
अनेकांच्या स्मरणात आहेत. कराची शहरात प्रथम प्रवेश करणाऱया प्रवाशाच्या
मनात या शहराची स्वच्छता, त्याची आरोग्यवर्धक रचना,
तेथील सरळ निर्धुळ रस्ते, त्याच्या बाजुची फरसबंदी पायवाटा, त्यावरील वृक्षराजी, ठायी ठायीच्या छोटय़ा बागा व उपवने यांचा विशेष परिणाम व्हायचा. या शहराची व्यवस्था व स्वच्छता युरोपातील
सुधारलेल्या शहरांच्या तोडीचे आहे असे वाटल्यावाचून राहावत नसे. त्याशिवाय जमनलाल नसरवानजी मेहता
यांसारखे नागरिक हिततत्पर व सुधारलेल्या शहरांची माहिती असलेले प्रेसिडेंटव मेयर कराची म्युन्सिपालटीला
कैक वर्ष लाभले. 1932 साली कराची शहरामध्ये मुंबईच्या प्रमाणे ट्रमचे
गुंतागुंतीचे जाळे नव्हते. तेथील एक ट्रम कराचीतील
लाईन बंदर रस्त्याने जाऊन सदर बाजारापर्यंत जाते तर दुसरी लाईन गांधीबाग येथपर्यंत जात होती. भाडे दोन पैशांपासून सहा पैशांपर्यंत असायचे. ट्रम
सर्व्हिस फार स्वच्छ, सोईची व सरळ दोन मोठमोठय़ा रस्त्यांनी
बंदररोड व लॉरेन्स रोड येथे जात होती. त्यातील एक ट्रममार्ग नेपीयन
रोड ते चाकीवाडा व दुसरा ट्रममार्ग
पूर्वेकडे एम्प्रेस मार्केट ते कॅन्टोनमेन्ट रेल्वे स्टेशन अशा दिशेने जायचा. घोडय़ाच्या व्हिक्टोरिया व मोटार टॅक्सीही
त्या काळात कराचीमध्ये मोठय़ा प्रमाणावर होत्या. (सिंध
प्रांताचे वर्णन व वृत्तांत -
गो. चि. भाटे, पृष्ठ क्रमांक - 1 ते
19.)
मुंबई प्रांतात
असलेल्या कराचीला मुंबईहून बोटीने जाणे हा मोठा अनुभव असे. त्या
प्रवासाचे वर्णन लिहिताना गो. चि. भाटे यांनी म्हटले आहे की, ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशनची
आगबोट दर आठवडय़ास सोमवारी सकाळी साडेनऊ-दहा वाजता मुंबईच्या प्रिन्सेस डॉकमधून सुटायची. भाटे
यांनी 1935 साली दोनदा जलमार्गे कराचीवारी केली. त्याबद्दल लिहिताना भाटे यांनी म्हटले आहे की, कराचीला
एकदा आम्ही व्हिटा बोटीने गेलो.
या बोटीत एक गुजराती खानावळ
होती. तेथे जेवण व चहा फराळाचे मिळते. पण आपण बरोबर फराळाचे,
फळफळावळ घेतल्यास, विशेषत: स्टोव्ह घेतल्यास खाण्यापिण्याची सोय होते. मुंबई ते कराची जलप्रवासात कच्छमांडवी व ओखा बंदर ही ठिकाणे
जवळ येईपर्यंत जमीन दिसत नाही.
प्रथम आगबोट कच्छमांडवीस जाते. त्याला साधारण
चोवीस तास लागतात. कच्छ मांडवीनंतर ही आगबोट कच्छ आखाताच्या दक्षिणेस असलेल्या ओखा बंदरात जाते. म्हणजे मुंबईहून
निघाल्यानंतर दोन दिवसांचा प्रवास करून जलमार्गे कराचीच पोहोचता येत असे. कराची भेटीत गो. चि. भाटे यांची सिंध प्रांतात स्थायिक झालेल्या काही
मराठी माणसांशी भेट झाली. त्याचे वर्णन त्यांनी आपल्या सिंध प्रांताचे
वर्णन व वृत्तांत या पुस्तकात केलेच आहे. क्वेट्टा शहरामध्ये कधीकाळी
वास्तव्य केलेले डॉ. रामजी खानोलकर भाटे यांना
भेटले होते. कराचीच्या त्यांच्या प्रथम गलबत प्रवासाची आठवण
खानोलकर यांनी भाटे यांना सांगितली
होती. खानोलकर हे पुढे धरणीकंपामध्ये वारले अशी माहिती पुढे भाटे
देतात. कराचीमध्ये लायरी
नदीच्या तीरावर
कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमासाहेब यांची छोटीशी छत्री व सभोवार बाग होती. या ठिकाणच्या दुरुस्तीस
कोल्हापूर दरबारकडून दरसाल
500 रुपये मिळतात अशी माहिती भाटे
यांना कळली. कराचीजवळील शिकारपूर
म्युन्सिपालटीचे चीफ ऑफिसर जोशी यांच्या बरोबरीने भाटे यांनी या शहराचा दौरा केला होता. शिकारपूर येथे सुमारे
1935 साली बांधण्यात आलेली अत्याधुनिक
वैद्यकीय सोयीसुविधांनी युक्त अशी रुग्णालयाची इमारत, जुन्या शिकारपूर शहराचा भाग असे भाटे यांनी पाहिले. कराचीमध्ये भ्रमंती करीत असताना गो. चि. भाटे हे तेथील सदर बाजारापर्यंत ट्रमने गेले व
मग पायी बंदररोड एक्स्टेन्शन म्हणून जो त्या काळी नवा रस्ता व नवी वस्ती
झाली होती ती त्यांनी पायीच पाहिली. या बाजूला 1933 सालापासून नवे बंगले बांधले गेले होते. त्यातील एक बंगला भाटे यांनी बारकाईने पाहिला. तो
बंगला कराचीच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल
गोखले यांचा होता. हा बंगला दोन रस्त्यांच्या कोपऱयाला असून बंदररोड एक्स्टेन्शनच्या अखेरीस होता. तसेच तो उंटवटय़ाच्या जागेवर
आहे. त्यामुळे हा बंगला फार उठावदार दिसतो. गोखले यांच्या बंगल्याचे भाटे यांनी याप्रमाणे वर्णन
केले आहे ‘गोखले यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर
द्राक्षाचा वेल चढविलेला आहे. बंगल्यासमोर छोटी
पण सुबक रचनेची बाग आहे. बागेत छोटीशीच पुष्करणी असून त्यात तांबडे मासे
आहेत. बंगल्यात प्रवेश
केल्यानंतर डाव्या हाताला बसावयास बाक आहे पण त्याचे खाली भुयार असून बाकाची फळी वर केली की जिन्याची
वाट आहे असे कळून आम्हाला बंगल्याच्या रचनेचे मोठे नवल वाटले.’ कराची शहरामध्ये बंदर रस्त्यावर
असलेले नारायण जगन्नाथ वैद्य हे हायस्कूल होते. या
हायस्कूलच्या कंपाऊंडला लागूनच खालिकादिन सार्वजनिक
वाचनालय व शहराचा सार्वजनिक मोठा हॉल आहे. ही
इमारत व हा हॉल प्रेक्षणीय आहे. या इमारतीसमोर लोकमान्य टिळकांचा छोटासा संगमरवरी पुतळा बसविला असल्याचा उल्लेख
गो. चि.
भाटे यांनी आपल्या
सिंध प्रांताचे वर्णन व वृत्तांत या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 18वर केला आहे.
कराचीमध्ये महाराष्ट्रातील
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ या भागांतील मराठी माणसांबरोबरच सिंधी, मुस्लिम, गुजराती, बोहरी, पारशी, कोकणी मुस्लिम, बेनेइस्राएली, गोवेकर ख्रिश्चन असे अनेक लोक वास्तव्यास होते. मराठी माणूस हा सिंधमध्ये शंभर वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करून आहे. 1843 मध्ये इंग्रज सेनानी सर चार्ल्स
नेपिअर यांच्या नेतृत्वाखाली सिंधचे राजे अमीर यांचा पराभव करून हा प्रांत मुंबई इलाख्याला जोडला. त्यावेळी सिंध प्रांत मागासलेला होता. त्याचवेळी
पुणे जिल्ह्यातील शिरुर या भागात भयंकर दुष्काळ पडल्याने तेथील
काही मराठी मंडळींनी पोटापाण्यासाठी सिंध प्रांतात स्थलांतर केले. ही मंडळी प्रामुख्याने कराची शहर व परिसरात स्थिरावली. कारण हे सर्वात सुरक्षित बंदर असल्याने या बंदराचा विकास सुरु झाला होता आणि
दळणवळणाच्या दृष्टीने
सिंध प्रांतातील हे सर्वात सोईस्कर ठिकाण होते. त्याआधी
राघोबादादा लाहोरपर्यंत पोहोचलेले होते, मात्र कच्छचे रण आडवे आल्याने मराठे हे सिंध प्रांत नजिक असूनही तेथे गेले
नाहीत. नाहीतर त्याचवेळी मराठी
माणूस व भाषा यांची पावले सिंध प्रांतामध्ये उमटली असती. पश्चिम
महाराष्ट्रापाठोपाठ कोकणातील माणूसही
कराचीमध्ये स्थलांतरित होऊ लागला.
सावंतवाडी संस्थानातील गोपाळराव सावंत
आणि त्यांचे बंधू हे
या लोकांचे मार्गदर्शक ठरले. यानंतर ब्रिटिश लष्करातील मराठा जवानांनी निवृत्तीनंतर
कराचीमध्ये राहाणे पसंत केले. हळूहळू या मंडळींनी आपापले आप्तस्वकीय बोलाविले. मराठी
भाषा कराचीमध्ये कानी पडू लागली. मुंबई प्रांताला सिंध जोडलेला असल्याने विविध खात्यांतील अधिकारी मुंबईहून
कराचीमध्ये नेमले जात. त्यामध्ये बांधकाम, शिक्षण, आरोग्य, बंदर, कायदा-कर्मचारी या विभागांचे कर्मचारी असत. कराचीला व्याप
वाढत असल्याने तेथे
अनेक छोटय़ामोठय़ा कंपन्या, पेढय़ा आल्या होत्या. तेथेही
नोकऱया उपलब्ध होऊ लागल्या. सक्कर धरणाचे मुख्य
अभियंता भिडे होते. शिक्षणतज्ञ दत्तात्रय वासुदेव अणावकर, मीठ शुद्ध करण्याचा कारखाना काढणारे
आत्माराम भास्कर पंडित, शार्क माशाचे तेल काढणारे एस. पी. मराठे, बिस्किट
कारखानदार साठे, दुधाचा व्यवसाय करणारे काशीराम मोटे, जहाजे
दुरुस्ती करणारे गोपाळराव भोसले,
सोडालेमन कारखानदार रावजी
बाबाजी राणे, हॉटेलचालक महादेवराव केरकर, सुवर्णकार राजाराम चिंदरकर, छापखाना चालविणारे मालवणकर
आणि नारायण मंडरा, डॉ. रामजी खानोलकर अशा कराचीतील
अनेक मराठी व्यावसायिकांची
यादी देता येईल.
मोठय़ा संख्येने
महाराष्ट्रीय मंडळी असल्यामुळे गणेशोत्सव आणि नाटकवेड हे कराचीमध्येही होतेच. मुंबईहून देखील अनेक कलाकार
कराचीत कार्यक्रम करण्यास आमंत्रित केले जात. मोठय़ा
प्रमाणात शिक्षणसंस्थाही या मंडळींनी चालविल्या. आजही कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा मुंबई, सिंधुदूर्ग जिल्ह्यात चालविल्या जातात. त्यावेळी कराचीत मराठी मुलींच्या शिक्षणाची व्यवस्थित सोय करण्यात आलेली होती. प्रार्थना समाज मराठी मुलींची
शाळा या नावाने अशी पहिली शाळा काढण्यात आली होती. कराचीमध्ये
असलेल्या असंख्य चाळींपैकी
काही चाळी अणावकर कंपाऊंड या वस्तीत होत्या. या
चाळींचा मालक कोणी अणावकर होतो म्हणून हे नाव पडले
नव्हते, तर त्या ठिकाणी वस्तीला असणारी बहुतेक कुटुंबे
ही सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या अणाव
गावची मूळ रहिवासी होती. त्यावरून हे नाव पडलेले होते. मुंबईत दादरमध्ये असणारी अंबाजी दादाजी (ए. डी.) परब यांचा फोटो स्टुडिओ
याच अणावकर कंपाऊंडमध्ये काही काळ होता. पंखा लाईन्स हीदेखील
महाराष्ट्रीय लोकांची वस्ती असलेला भाग होता. तेथे
घरांच्या बांधणीत खजुराच्या झाडाच्या
मोठमोठय़ा झावळ्या
म्हणजे पंखे वापरले होते म्हणून या वस्तीला नाव पडले होते पंखा लाईन्स. त्यावेळी कराचीच्या बर्न्स
रोडवर ब्राम्हणवाडा होता. त्याचा उल्लेख ना. सी. फडके यांच्या एका कादंबरीत आढळतो. सिंध प्रांतात भरभराट
पावलेल्या महाराष्ट्रीय मंडळींची माहिती देणारी एक पुस्तिका वि. मा. परब यांनी प्रकाशित केली होती. या छोटेखानी पुस्तिकेत त्यांनी त्या काळी कराचीमध्ये कार्यरत असलेल्या अनेक
मराठी संस्थांचा उल्लेख केलेला आहे. श्रीदेव रवळनाथ फंड (मातोंड) कराची, बालमोहन गोफ व टिपरी मंडळ, मराठा ज्ञाती मंडळ, महादू हिंदु स्मशान
फंड, श्रीरामेश्वर प्रासादिक मंडळ, गुराखी
धर्मार्थ फंड, श्री शिवाजी व्यायाम शाळा, सावंतवाडी बहुजन
समाज, पंखालाईन गायन समाज इ. संस्थांचा
उल्लेख या पुस्तिकेत आहे. (संदर्भ लेख - कराचीचा विध्वंस
: पाकिस्तान फुटीच्या मार्गावर, लेखक
- सुहास फडके, कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी
अंक - 1999).
कराचीमध्ये शैक्षणिक
क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱया मराठी माणसांमध्ये नारायण जगन्नाथ वैद्य यांचे
नाव अग्रक्रमाने घ्यावे
लागेल. वैद्य यांच्यावर ब्रिटिश सरकारने सोपविलेल्या कामगिरीबद्दल
एका पुस्तकात म्हटले आहे. ‘ In the year 1868, the Bombay Presidency assigned Narayan
Jagannath Vaidya to replace the Abjad used in Sindhi, with the Khudabadi script; The script was decreed a standard script by the Bombay Presidency thus inciting anarchy in the Muslim majority region. A powerful unrest followed, after which Twelve Martial Laws were imposed by the British authorities.’ १८५२ साली
सर बार्टल फ्रिअर यांनी कराचीमध्ये स्थापन केलेल्या
शाळेला पुढे याच नारायण जगन्नाथ वैद्य यांचे नाव देण्यात आले. कराचीमधील मोहम्मद अली जिना मार्गावर सईद
मंझिलच्या जवळ नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूलची इमारत मोठय़ा डौलाने उभी आहे. प्रख्यात सिंधी
लघुकथाकार व नामवंत वृत्तपत्र स्तंभलेखक अमर जलील यांच्यासारखे नामवंत त्यांच्या शालेय जीवनात या शाळेत
शिकत होते. नारायण जगन्नाथ वैद्य या मराठी माणसाच्या शिक्षणकार्याविषयी
कराचीकरांच्या मनात आदरभाव असल्याने
फाळणीनंतरही या शाळेचे नाव बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे
कराचीमध्ये मराठी
माणसाच्या कर्तृत्वाची
मोहोर अशारितीने कायमस्वरूपी दिमाखदारपणे उभी आहे.
कराचीमध्ये
म्युनिसिपल बोर्डाच्या तसेच
सरकारी, खासगी शाळाही होत्या. त्यामध्ये
मराठी शिक्षकांची संख्याही लक्षणीय होती. म्युनिसिपल शाळा, एनजेव्ही शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन कराचीमध्ये ‘फुटाणा’ क्लब स्थापन केला होता. महाराष्टाबाहेर
मराठी माणसांनी एक त्र येण्यासाठी काही निमित्त हवे होते ते या फ टाणा क्लबमळे तेथील
मराठी शिक्षकांना मिळू
लागले. काव्य, शास्त्र, विनोद यावर या फुटाणा क्लबचा भर होता. त्याचे
एक सदस्य असलेले अनंत हरी लागु यांनीदेखील
कराचीची मनोभावे सेवा केली होती. अनंत हरी लागू व
त्यांचे पिता हरी लक्ष्मण लागू (
हरी लक्ष्मण लागू हे कराची येथील
डी. जे.
सिंध कॉलेजमध्ये मॅथेमॅटिक्स आणि
संस्कृतचे प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.) या दोघा पितापुत्रांनी
सिंध प्रांताची मनोभावे सेवा केली होती. अनंत हरी लागू ह्यांनी डी. जे. सिंध कॉलेजमधून बी. ए.ची पदवी संपादित केली व
कराची येथील म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या
शालेय शिक्षण बोर्डामध्ये ते प्रथम शिक्षक व नंतर शिक्षण खात्याचे सुपरवायझर होते. फाळणीनंतर ते सिंधचे
शिक्षण प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. अनंत
हरी लागु यांचा जन्म 17 सप्टेंबर
1891 रोजी झाला. एका
साहित्यप्रेमी अशा मराठी कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांनी मराठीवर प्रभुत्व गाजविले. त्यांच्या कारकिर्दीची
सुरुवात कराची येथील नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूलमध्ये मराठीचे अध्यापक म्हणून झाली. नारायण जगन्नाथ वैद्य हे त्याकाळचे सिंध प्रांतातले एज्युकेशनल इन्स्पेक्टर
होते व त्यांचेच नाव त्या शाळेला देण्यात
आले आहे. सिंध प्रांताचे मुंबईशी असलेले नाते हे मराठी भाषिक
लोकांच्या माध्यमातून जोडले गेले आहे व हे नाते
जवळजवळ शंभर वर्षांइतके जुने आहे.
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या नात्याने
खुद्द अनंत हरी लागु यांचे
मराठी, उर्दु, गुजराती, सिंधी, इंग्रजी या भाषांवर विलक्षण प्रभुत्व होते. सिंध प्रांताचा इतिहास व भुगोल या विषयांवर
त्यांनी विविध भाषांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहिलेली होती. सिंध सरकारने चालू केलेल्या साक्षरता
मोहिमेमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. खुद्द कराचीमध्ये ही मोहिम
यशस्वी करण्यासाठी त्यांनी आपले सर्व
कसब पणाला लावले होते. नंतरच्या काळात ते कराचीतील ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल
म्हणून
काम करत होते व
त्यांच्या कामाची कराची कॉर्पोरेशनने प्रशंसा केली होती. फाळणीनंतर
उर्दु भाषिकेतर शिक्षकांनी जेव्हा भारतात स्थलांतर
केले तेव्हा स्वत: अनंत हरी लागु यांना मात्र पाकिस्तान सोडून जाण्याची
परवानगी देण्यात आली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांच्या जीविताच्या संरक्षणाची हमीही त्यांना देण्यात आली
होती. लागु यांच्या निवासाची
सोय एका मुस्लिम कुटुंबात करण्याचे कराचीतील मुख्य अधिकाऱयांनी ठरविले. फाळणीच्या अत्यंत तणावग्रस्त
वातावरणातही लागु यांनी आपल्या संयमी व मृदू स्वभावाने सर्व संकटांवर मात केली. निवृत्त शिक्षकांच्या पेन्शनची
सोय कशी करता येईल ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. स्थलांतरित
शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न जेव्हा भारतीय
सरकारच्या अख्यत्यारीत उपस्थित झाला तेव्हा प्रत्येक शिक्षकाच्या नोकरीची किती वर्षे धरायची हा मुद्दा
चर्चेत आला. पण तेथेही सरकारने लागुंची प्रमाणपत्रे अधिकृत
मानली व अशा कराचीतून भारतात स्थलांतरित
झालेल्या सर्व शिक्षकांना फायदा झाला. लागु-लालवाणी पेन्शनसूत्राला त्यावेळेस सरकारने मान्यता दिली. या सूत्रानूसार स्थलांतरित शिक्षकांच्या शेवटच्या प्रमाणपत्रावर, स्वत:च्या मृत्युपूर्वी फक्त तीन दिवस आधी लागु यांनी
स्वाक्षरी केली होती. मृत्युपूर्वी तीन दिवस आधी ते काही कामानिमित्ताने
मुंबईबाहेर गेले होते. चौथ्या दिवशी ते मुंबईत परतले. अनंत हरी लागु यांचे 21 मे
1968 रोजी निधन झाले. मराठी व सिंधी समाजाच्या एकीचे
ते प्रतिक होते.
रेव्हरंड टिळक यांच्या
निधनानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक या मुंबईमध्ये एका मिशनच्या सेवाकार्यात सक्रिय झाल्या. थोडक्यात नोकरी करू लागल्या. मात्र तेथे त्यांना काही
फार चांगले अनुभव आले नाहीत. शेवटी आयुष्य जिथे वाट
दाखविल तिथे जावे असा विचार करून शहाबाई मिसाळ यांच्या कन्या डॉ. ताराबाई यांच्या विनंतीनूसार लक्ष्मीबाई
तीन वर्षांच्या वास्तव्यासाठी कराचीस रवाना झाल्या. त्यासंदर्भातील
आठवणी लक्ष्मीबाई टिळकांनी आपल्या
‘स्मृतिचित्रे’ या
पुस्तकामध्ये सविस्तर लिहिल्या आहेत. त्यातून 1935 पर्यंतच्या कराचीतील वातावरण कसे होते
हे नजरेसमोर उभे राहाते. लक्ष्मीबाई टिळकांच्या बरोबर असलेल्या रुथ व बेबी
यांना अनुक्रमे
प्रति महिना 130 रुपये व 150 रुपये पगार मिळवून देणारे
काम डॉ. ताराबाई यांनी निश्चित केले होते. त्याचप्रमाणे कराचीमध्ये प्रति
महिना तीस रुपये भाडय़ाचे घरही त्यांच्यासाठी ताराबाईंनी घेतले होते. कराची ते मुंबई या जलप्रवासाची माहिती
देताना लक्ष्मीबाई टिळकांनी म्हटले आहे की, मुंबई
सोडल्यानंतर प्रथम द्वारका लागली. कच्छ मांडवी बंदराचा
टप्पा त्यानंतर पार केला. प्रवासास सुरुवात केल्यानंतर तिसऱया दिवशी पहाटे
कराची बंदर गाठले. लक्ष्मीबाई टिळक कराचीच्या वातावरणासंदर्भात लिहितात ‘ कराचील भेदभाव, स्पृश्यास्पृश्य वगैरे काहीही भानगडी नाहीत. जेवायला बसायचे झाले तर सारे एका रांगेने बसत. या
शहरामध्ये हिंदु बायका या मुस्लिम बायकांप्रमाणे
गोषात वावरतात. कराचीमध्ये जी मराठी व अन्य ओळखीची माणसे होती
ती आवर्जून
लक्ष्मीबाई टिळक
व त्यांच्या कुटुंबीयांना आवर्जून सहकार्य करीत असत. कराचीमध्ये
मुंबईहून मराठी चित्रपट व नाटके आणून त्यांचे
खेळ केले जात असा उल्लेख आढळतो.
स्मृतिचित्रेमध्ये लक्ष्मीबाई टिळकांनी
असा उल्लेख केला आहे की, एकदा कराचीमध्ये सिंहगड हा चित्रपट आला होता. तो
चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात लागला होता याविषयी लक्ष्मीबाईंनी
काही लिहिलेले नाही मात्र त्या सहपरिवार हा चित्रपट बघायला गेल्या. मुलांच्या मनावर सिंहगड या
चित्रपटाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे लक्ष्मीबाई टिळक यांचे निरीक्षण आहे.
कराचीमध्ये अनेक
मराठी व्यावसायिक होते, त्यांची त्रोटक माहिती हाती लागत असली तरी त्यामुळे
त्यांच्याविषयीचे
पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही.
कराचीमधील मराठी व्यावसायिकांमध्ये
सखाराम पुरुषोत्तम मराठे उर्फ आप्पासाहेब मराठे
हे नाव अग्रगण्य होते. आप्पासाहेब यांचे पुतण्या शंकर कृष्णाजी मराठे
यांनी एका लेखामध्ये त्यांच्या उद्योजकीय
कर्तृत्वाचा सविस्तर आढावा घेतला आहे. तो तपशील विस्ताराने जाणून
घेतल्यास 1947 पूर्वी कराचीतील मराठी
व्यावसायिकांना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले होते याची कल्पना येऊ शकते. आप्पासाहेब मराठे
यांचे जन्मशताब्दीवर्ष गेल्या
18 जूनला संपले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले गावामध्ये आप्पासाहेब मराठे
यांचा जन्म झाला. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुंबई
येथील पी. शाह अँड कंपनी या दुकानात नोकरीला
लागले. काही वर्षांनी सदर कंपनीच्या मालकांनी कराची-सिंध येथे शाखा स्थापन केली व तेथे आप्पासाहेबांची
मॅनेजर म्हणून नेमणूक करण्यात आली. ही कंपनी मोटरबस बॉडीला
लागणारी फिटिंग्ज, रेक्झीन
क्लॉथ, वॉटरप्रुफ कॅनव्हास, कुशन स्प्रिंग्ज वगैरे वस्तूंचा विक्रीव्यवसाय
करीत असे. आप्पासाहेबांच्या कुशल मार्गदर्शनामुळे
तो धंदा भरभराटीला येऊन काही वर्षांतच ते कराचीला स्थिरस्थावर झाले. त्यानंतर आप्पासाहेबांनी फेअरडील फार्मसी
या नावाने केमिस्ट दुकान काढले व अल्पकाळात नावारुपाला आणले. द सिंध इंडस्ट्रियल
अँड फार्मास्युटिकल कंपनी लि.
या कंपनीची मराठे यांनी स्थापना केली. या कंपनीचे मुख्य कार्यालय कराची
येथे होते व फॅक्टरी मलीर या उपनगरात होती. ही
कंपनी ‘सिपॉल’ या ब्रँड नावाने शार्क
लिव्हर ऑईल या व्हिटॅमिनयुक्त
औषधाचे उत्पादन करीत असे. हे उत्पादन बनविण्यामागची थोडक्यात कथा अशी आहे. त्या काळात कॉड
लिव्हर ऑईल या नावाचे व्हिटॅमिनयुक्त औषध परदेशातून भारतात मोठय़ा प्रमाणात आयात होत असे. त्यावेळी दुसरे महायुद्ध जोरात चालू होते. त्यामुळे
या औषधाची आयात बंद करावी झाली व ते मिळेनासे झाले, पण मागणी तर खूप होती.
आप्पासाहेब मराठे यांनी परिस्थिती
नेमकी हेरून, आपल्या देशात हे
औषध बनविले पाहिजे
असा निग्रह केला. खूप खटपट, अभ्यास
व सर्वेक्षण केले असता असे लक्षात आले की, भारताच्या पश्चिम
किनाऱयावर जामनगर, पोरबंदर, ओखा
वगैरेच्या सागरक्षेत्रात शार्क नावाचे मोठे मासे विपुल प्रमाणात उपलब्ध
असून त्याचे तेल हे परदेशातून आयात होणाऱया कॉड लिव्हर ऑईल इतकेच गुणसंपन्न आहे. याप्रमाणे कराची
मलीर येथील फॅक्टरीत तयार केलेल्या सिपॉलचा खप अर्थातच त्याकाळी बराच मोठा झाला.
कराचीला 1947च्या आधी काही हजार मराठी माणसे राहात होती. ब्राम्हण सभा, कराची महाराष्ट्रीय मित्रमंडळ वगैरे सामाजिक संस्था
होत्या. काही शिक्षणसंस्था व त्यांची हायस्कूल होती. या प्रत्येक संस्थेशी आप्पासाहेबांचा निकटचा संबंध होता. उद्योगधंद्यात व्यस्त असूनही ते या सार्वजनिक कामांना वेळ देत असत. त्यामुळे आप्पासाहेबांच्या
सल्ल्यांसाठी व मार्गदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा कराचीतील मराठे यांच्या घरी राबता
असे. आप्पासाहेब मराठे
यांचे पुतणे शंकर कृष्णाजी मराठे आपल्या आठवणीवजा टिपणांत लिहितात, ‘ मी त्या वेळेला शालेय विद्यार्थी
होतो. माझे बरेचसे माध्यमिक शिक्षण कराची येथील एनजेव्ही हायस्कूलमध्ये
झाले. आप्पासाहेबांचा
एख मुलगा आणि एक मुलगी अनुक्रमे सुरेश व विमल. सुरेश
मराठे याची मुंज कराचीच्या ब्राम्हण सभेमध्येच झाली. मला आप्पासाहेबांनी वेंगुर्ल्याहून कराचीला नेले होते. कराचीमध्ये सर्व काही ठाकठीक सुरु असताना 1947च्या ऑगस्टमध्ये भारताची फाळणी झाली. कराची- सिंध पाकिस्तानात समाविष्ट झाले. उत्तर
भारतातून, मुख्यत्वे पंजाबमधून मुस्लिमांचे लोंढे कराचीमध्ये येऊन थडकू लागले. त्यांना मिळालेल्या पाकभूमीत हिंदू नको होते. हे मुस्लिम निर्वासित होऊन जसे पाकिस्तानात आले, त्याचप्रमाणे
पाकिस्तानमधील हिंदूंनी भारतात निघून जावे
अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे कराचीतील हिंदु कुटुंबांवर हल्ले करणे, खून, मारामार्या, हिंदूंच्या मालमत्तेची
नासधूस, आग लावणे व नंतर नंतर दररोज लुटमारीचे प्रकार नित्य
घडू लागले. दिवसेंदिवस तेथे राहाणे हे
अशक्य झाले. म्हणून आप्पासाहेब मराठे यांनी आम्हा सर्वांना
मुंबईला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 1947च्या सप्टेंबर महिन्यात आप्पासाहेब मराठे यांच्या पत्नी
तसेच सुरेश, विमल व मी कराचीहून बोटीने मुंबईस आलो. त्यावेळी मी 16 वर्षांचा होतो.’
शंकर कृष्णाजी मराठे
आपल्या टिपणांत पुढे लिहितात,
‘ कराची ते मुंबई जलप्रवास हे एक
दिव्यच होते. एक महान कटू अनुभव
होता. माणसे व त्यांचे सामान याने बोट खचाखच भरलेली होती. बायका, मुले, तरुण, वयस्क, अतिवृद्ध सर्वच होते.
मराठी, सिंधी, गुजराती व अन्य लोक कराचीतील वर्षानुवर्षांचा संसार, घरदार सोडून, थोडेफार सामान घेऊन दु:खद अंत:करणाने
निघाले होते. सर्वचजण निर्वासित, समदु:खी. आम्ही सामानाच्या ढिगाऱयावर
कसेबसे बसून कराची ते मुंबई हा प्रवास केला. एकंदर
परिस्थिती भयानक होती.’ मराठे कुटुंबीय सुखरूप
मुंबईस पोहोचले, पण आप्पासाहेब मराठे हे कराचीतच होते. लगेचच तिथून निघणे शक्य नव्हते कारण मोठा
पसारा पाठी होता. तो आवरण्यासाठी खंबीर मनाने ते तिकडे राहिले. कराचीतील आपली सर्व मालमत्ता विकली
असता त्यांच्या हाताला रुपयी दोन आणे लागले. ते
स्वीकारून जानेवारी 1948मध्ये मुंबईत
सुखरूपपणे परत आले. कराचीमध्ये सर्वस्व गमावलेले असल्याने आता मराठे यांनी पुन्हा नव्याने सार्या
गोष्टींची जुळवणी केली. मुंबईत आल्यावर आप्पासाहेब मराठे यांनी सचिन अँड कंपनीची स्थापना केली. सरकारी खात्याना लागणारे
निरनिराळे साहित्य, मुख्यत्वे इंजिनिअरिंग क्षेत्रातले, पुरवठा करण्याचे काम या कंपनीद्वारे सुरु केले. अल्पकाळात अप्रुव्हड गव्हर्मेन्ट सप्लायर्स म्हणून ते नावारुपाला आले. याशिवाय मुंबईतील लोहार चाळीमध्ये व्ही. रमेश अँड कंपनी नावाचे हार्डवेअर अँड टुल्सचे दुकान होते, त्यांच्याकडेही आप्पासाहेब भागीदार म्हणून
काम पाहू लागले. वांद्रे येथे एक वर्कशॉप शेड घेऊन शासनाला लागणाऱया
काही वस्तूंचे उत्पादन सुरु केले. स्वत:चे प्रॉडक्ट म्हणून जहाजाला लागणाऱया शिप लाईट्सचे
एकमेव उत्पादक ते होते असे म्हणण्यास हरकत नाही.
स्विफ्ट प्रायव्हेट
लिमिटेड या कंपनीची स्थापना करून तसेच रॅलीज (आय) लिमिटेड या कंपनीची एजन्सी घेऊन मराठे यांनी आपला
उद्योगविस्तार सुरुच ठेवला. रॅलीज कंपनीचे फॅन्स व वोह ब्रँड इलेक्ट्रिक हँड
टूल्स त्या जमान्यात खूप लोकप्रिय
होती. त्यानंतर आप्पासाहेब मराठे यांनी प्रभादेवी येथे मराठे
उद्योग भवनची मोठी वास्तू उभारून अनेक मोठमोठय़ा
कंपन्याना लागणारे स्पेअर पार्ट बनविण्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे
स्विफ्ट ऑफसेट प्रिटिंग मशिनची
निर्मितीही नंतर आप्पासाहेबांनी केली. इतक्या कर्तृत्ववान मराठी
उद्योगपतीने कराचीहून परत आल्यानंतर मुंबईत
पुन्हा आपले उद्योगसाम्राज्य उभे केले याचा आदर्श आजच्या मराठी उद्योजकांनी निश्चितच ठेवला पाहिजे. फाळणीच्या प्रसंगाचा सामना करून भारतात परतलेल्या मराठी उद्योजकांपैकी सर्वच
जण आप्पासाहेब मराठे
यांच्याप्रमाणे भारतात उद्योगव्यवसायात पुन्हा ठामपणे उभे राहिले असे मात्र घडले नाही. तेथून आलेले अनेक
मराठी उद्योजक पुढे स्वतंत्र व्यावसायिक म्हणून फारसे यशस्वी ठरले नाहीत. त्याचप्रमाणे फाळणीनंतर पाकिस्तानातून
भारतात निर्वासित झालेले सिंधी बांधव हे पुढे जगभर पसरले. उद्यमशील
वृत्तीमुळे त्या सिंधींपैकी
काही जण पुढे काही वर्षांत कोटय़धीशही बनले. मात्र
कराचीतला सर्वसामान्य मराठी माणूस हा फाळणीनंतर मुंबईत
येऊनही नोकरीच्या शोधात वणवण फिरत राहिला...
1947ला फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात परतलेला मराठी
माणूस हा मुंबई, पुणे व देशभरात जिथे रोजगाराची उत्तम
संधी मिळेल तिथे स्थलांतरित झाला.
फाळणीनंतर पाकिस्तानात थोडीतरी मराठी
माणसे तिथेच राहिली का हा प्रश्न
सतत मनात येत असे. त्यातच यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या तिसर्या
दिवशी पाकिस्तानच्या ‘डेली टाइम्स’ या दैनिकात तिथे साजऱया झालेल्या दीड दिवसांच्या
गणेशोत्सवाची बातमी झळकली व बरेचसे
चित्र स्पष्ट झाले. पाकिस्तानात फाळणीनंतरही जी थोडीथोडकी मराठी माणसे
मागे राहिली ती कनिष्ठ मध्यमवर्गातील
होती. त्यात काही कोकणी मुस्लिम कुटुंबेही होती. मोलमजूरी करणाऱया या कुटुंबांचे पोट तळहातावर होते. फाळणी झाल्यानंतरही पाकिस्तानात त्यांना रोजगार उपलब्ध होत होता. त्यामुळे भारतात जाऊन
असा रोजगार मिळेलच
याची फारशी खात्री नसलेली मराठी कुटुंबे पाकिस्तानातच राहिली व तेथलीच होऊन गेली. काही मराठी कुटुंबांनी नंतर धर्मांतरही केले. असे
असले तरी त्यांची मराठी भाषा,
महाराष्ट्र, भारत यांच्याशी नाळ तुटली नाही. फाळणीनंतर पाकिस्तानातच राहिलेल्या मराठी कुटुंबीयांच्या पहिल्या पिढीने आपले
मराठीपण नीटपणे जपले. पण त्यानंतरची दुसरी पिढी ही पोटापाण्याच्या चक्रात उर्दु भाषेकडे वळली. घराबाहेर उर्दु भाषेशी जवळीक दाखवित असताना
घरात मात्र त्यांनी मराठीत किमान बोलणे कायम ठेवले. या
सर्वांचीच परिणती कराचीतील क्लिफ्टन
रोडवरच्या फाळणीनंतरही दरवर्षी महादेव मंदिरात दीड दिवसांचा का होईना गणेशोत्सव साजरा करण्यात झाली. या बातमीमध्ये जे म्हटले आहे ते सविस्तरपणे इथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही.या बातमीत म्हटले
आहे ‘ पाकिस्तानातील कराची शहरातल्या क्लिफ्टन रोडवरील महादेव
मंदिरात गेल्या 31 ऑगस्टच्या दुपारपासून
‘मराठी हिंदूंनी’ जमायला
सुरुवात केली. गेल्या 1 सप्टेंबर
रोजी गणेशचतुर्थी असल्याने त्या दिवशी पहाटेपासूनच
हे मंदिर मराठी भाविकांच्या गर्दीने फुललेले होते. महादेव
मंदिराच्या आवारात एक मंडप उभारण्यात
आला होता. त्यामध्ये गणेशमूर्ती ठेवण्यात आली होती. अत्यंत साजिरी अशा या गणेशमूर्तीसमोर नेवैद्य म्हणून
खोबरे, केळी,
सफरचंद, आंबे
अशी विविध फळे ठेवलेले होती तसेच गोडाधोडाचे काही पदार्थही होते. गणपतीला अत्यंत प्रिय असणारे मोदकही या नेवैद्यात होते! त्याचप्रमाणे गणरायाला दुधाचाही नेवैद्य दाखविण्यात आला
होता. पूजेच्या वेळी 21 लाडूंचा
नेवैद्य दाखविणे अत्यंत आवश्यक असते अशी माहिती पाकिस्तानातील पुजारी
मोहन गायकवाड यांनी दिली. गायकवाड हे मराठी असून त्यांचे पूर्वज हे पाकिस्तानातच
स्थायिक झाले होते. मोहन गायकवाड यांनी सांगितले की, भारतात विशेषत: महाराष्ट्रात गणेशोत्सव
10 दिवस साजरा होतो, मात्र पाकिस्तानात मात्र तो फक्त दीड दिवस साजरा होतो. या गणेशोत्सवात पाकिस्तानातील मराठी तसेच हिंदू माणसे
ही महादेव मंदिरात दरवर्षी होणाऱया या गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होतात. गणपतीची या दीड दिवसात आरत्या
व षडोपचारे पूजा करण्यात येते.
दीड दिवसानंतर या गणेशमूर्तीचे कराचीच्या
समुद्रात विसर्जन केले जाते.’ बातमीतला हा तपशील वाचून एकदम विश्वास बसत नाही, पण
ही वस्तुस्थिती आहे. आपल्या तथाकथित
वैदिक संस्कृतीत ब्राम्हणांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास किंवा ज्ञानाचा कोणताही उच्चार करण्यास दलितवर्गाला
मनाई केली होती. गेल्या पाच हजार वर्षांपासून घातलेल्या या मानवद्रोही
बंधनांवर काळानेच सुड उगविल्याचे
एक उदाहरण या मोहन गायकवाड यांच्या रुपानेच समोर आले. त्यांच्याबाबत
चौकशी केली असता अशी माहिती
कळली की, भारतीय संस्कृतीत वैदिक परंपरा जपण्यापासून दलितवर्गाला
मुद्दामहून लांब ठेवण्यात आले
होते, त्याच परंपरेचे जतन करण्याची कामगिरी बहुधा नियतीने मोहन
गायकवाड यांच्यावर टाकली असावी. मोहन गायकवाड हे दलित समाजातले असून पोटापाण्यासाठी, उपजिविकेसाठी का होईना त्यांनी पुजाविधीचे शास्त्र
शिकून पुजा करण्यास सुरुवात केली.
गेली 42 वर्षे
ते पाकिस्तानातील हिंदु कुटुंबांमध्ये पुजाविधी करतात
तसेच गणेशोत्सवामध्ये पुजारी म्हणूनही सक्रिय असतात. काळाने
सनातनी मुल्यांवर उगविलेला हा एक
प्रकारचा सूडच म्हणायला हवा. पाकिस्तानमधील कराची, लाहोर, हैदराबाद अशा ठिकाणी सध्या सुमारे तीन
हजार मराठी माणसे राहात असावीत असा एक प्राथमिक अंदाज आहे. या
मुळ मराठी माणसांमध्ये हिंदुधर्मीय
व कोकणी मुस्लिमही आहेत. पाकिस्तानातील मराठी लोकांच्या फाळणीनंतरच्या पिढ्यांनी तेथील वातावरणाशी
कसे जुळवून घेतले, त्यांना आपली मराठी भाषा कितपत आठवते, ते आपल्या घरांमध्ये मराठी भाषेत व्यवहार
करतात का, त्यांच्या भावी पिढीला आपल्या पूर्वजांच्या महाराष्ट्राविषयी
जाणून घेण्याची आस अजूनही आहे का, मराठमोठय़ा स्त्राeची एक जीवनशैली असते. तिची
याद पाकिस्तानातल्या मराठी कुटुंबातील स्त्रियांना
येत असेल का असे अनेक प्रश्न मनात उभे राहातात. पाकिस्तानातील
मराठी माणसांच्या गेल्या तीन पिढय़ांतील
ज्या व्यक्तिंनी त्या देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असेल त्याचा तपशील कुठे मिळू
शकेल? पाकिस्तानातील मराठी कुटुंबे किंवा अन्य व्यक्ती हे आपल्या
महाराष्ट्रातील नातेवाईकांना तेथून
भेटायला येत असतील त्यावेळी इथून जाताना सोबत घेऊन गेलेल्या आठवणींनी त्यांना गदगदून येत असेल
का असे प्रश्नही उद्भवतात. अर्थात पाकिस्तानातील मराठी विश्व काल, आज व उद्या असा आढावा घेण्यासाठी
एखादा संशोधन प्रकल्पच हाती घ्यायला हवा. त्यासाठी पाकिस्तानमध्ये
प्रत्यक्ष जाऊन अनेक संशोधन साधने धुंडाळावी
लागतील. तेथील मराठी परिवारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घ्याव्या
लागतील. अर्थात हा
सगळा पुढचा मामला
आहे. सध्यातरी अनेक पुस्तकांतून पाकिस्तानच्या कराची शहरातले
जे मराठी विश्व गवसले त्याचा वेध घेण्याचा
प्रयत्न केला आहे. लाहोर, क्वेट्टा, हैदराबाद, इस्लामाबाद, रावळपिंडी, बलुचिस्तान येथे मराठी कुटुंबे अजूनही
वास्तव्य करून आहेत का याचाही शोध घ्यावा लागेल. हे
लक्ष्य तितकेसे सोपे नाही,
----------------------------------------------------------------------
कराचीतील मराठी माणसांवर मी दै. दिव्य मराठीच्या २०११च्या दिवाळी अंकामध्ये लेख लिहिला होता. त्या लेखातील माहितीपेक्षा वेगळी व उत्तम माहिती दै. महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार प्रगती बाणखेले यांनी प्रत्यक्ष कराचीमध्ये जाऊन तेथील मराठी माणसांशी संवाद साधून आपल्या खास बातमीत नमुद केली होती. ही बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये ३ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाली. त्या बातमीची लिंक व मजकूर पुढे देत आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/international/marathi-families-in-pakistan/articleshow/26757396.cms?
----
पाकिस्तानातही ‘मराठीशाही’
Dec 3, 2013, 03.30AM IST
कराचीतील मराठी माणसांवर मी दै. दिव्य मराठीच्या २०११च्या दिवाळी अंकामध्ये लेख लिहिला होता. त्या लेखातील माहितीपेक्षा वेगळी व उत्तम माहिती दै. महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार प्रगती बाणखेले यांनी प्रत्यक्ष कराचीमध्ये जाऊन तेथील मराठी माणसांशी संवाद साधून आपल्या खास बातमीत नमुद केली होती. ही बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये ३ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाली. त्या बातमीची लिंक व मजकूर पुढे देत आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/international/marathi-families-in-pakistan/articleshow/26757396.cms?
----
पाकिस्तानातही ‘मराठीशाही’
Dec 3, 2013, 03.30AM IST
प्रगती बाणखेले, कराची
भोसले, जगताप, जाधव, सांडेकर, दुपटे... या आडनावांच्या माणसांची भेट कराचीत होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तसे घडले खरे. कराची प्रेस क्लबच्या निमंत्रणावरून पाकिस्तानभेटीवर गेलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना या मराठी मंडळींना भेटण्याची संधी मिळाली. स्थानिक पत्रकारांकडून मिळवलेल्या फोन नंबरवर मराठीतून बोलल्यावर पलीकडून आनंदातिशयाने प्रतिसाद आला आणि ही मराठी मंडळी थेट भेटायलाच आली. त्यांच्याबरोबर संवाद साधताना 'आम्ही इथे अगदी मजेत आणि सुरक्षित आहोत. नोकरी व्यवसाय उत्तम चाललेत', अशीच भावना त्यांनी व्यक्त केली.
सध्या पाकिस्तानात तब्बल दोन हजार मराठी माणसे राहतात. त्यातील बहुसंख्य कराचीत आहेत. 'श्री महाराष्ट्र पंचायत कराची' या संस्थेशी ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. परमेश जाधव या संस्थेचे अध्यक्ष. कराचीतल्या 'गझीबा बॉम्बे चाट अँड मसाला डोसा' या भारतीय पदार्थ मिळणाऱ्या मोठ्या रेस्तराँमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. फाळणीच्या आधीपासून अनेक वर्षे ही मंडळी तिथे आहेत. व्यापाऱ्यांसोबत मदतनीस, ड्रायव्हर, हमाल अशा कामांसाठी ही मराठी माणसे मुंबईहून कराचीला पोहचली असावीत. गेल्या शंभरेक वर्षांत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले नाते कायम ठेवले आहे.
' आम्ही पाकिस्तानात सुखी आहोत. नोकरी व्यवसायातही भरभराट आहे. पण , आपल्या माणसांना मात्र भेटावेसे वाटते. कधी जेजुरी-तुळजापूरला जाऊन कुलदैवतेचे दर्शन घ्यायचे असते. हे जाणे-येणे सोपे व्हावे. दोन्ही देशांनी व्हिसा प्रक्रिया सोपी केली , तर हे शक्य होईल. तुम्ही आपल्या मराठी माणसांपर्यंत हा निरोप नक्की पोहचवा ', अशी कळकळीची विनंती पाकिस्तानातल्या मराठी माणसांनी मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना केली.
कराचीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या दिलीप भोसले यांची सासुरवाडी मुंबईतल्या मुलुंडची. त्यांची पत्नी आणि मुली सध्या मुंबईत आल्या आहेत. रवी जगताप यांचे मूळ गाव पुण्याजवळचे खडकी. तर देवानंद सांडेकरांचे वडील मुंबईहून कराचीत आले होते. सांडेकरांना एकदा तरी मुंबईला यायचे आहे. एकदा येण्याचा प्रयत्न केला पण व्हिसा मिळाला नाही , त्यानंतर ते राहूनच गेले. विशाल राजपूतची आई मधुमती खरात मराठी आहे. तर गणेश गायकवाडांचे वडील पापडाचा व्यापार करायला कराचीत आले होते. त्यांची पत्नी पाकिस्तानातच जन्मली वाढली , पण सासू मात्र मुंबईकर आहे. कराचीभर प्रसिद्ध असलेली टेलरिंग फर्म तुळशीराम दुपटे या मराठी माणसाची आहे!
या मुस्लिमबहुल देशात तुम्हाला त्रास नाही का होत , या प्रश्नावर सगळ्यांचे ठाम उत्तर ' नाही ' असे होते. अपवाद म्हणून बाबरी मशिद पाडली तेव्हा दंगली झाल्या. पण , त्यावेळीही या मंडळींना वाचवले ते त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनी , असे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक बंध
नारळी पौर्णिमा , चैत्र पाडवा , दिवाळी , होळी हे सण ही मंडळी अगदी धुमधडाक्यात साजरे करतात. सार्वजनिक गणपती बसवतात. त्याचे विसर्जनही दणक्यात होते. पुरणपोळी आणि मोदकांसह आज महाराष्ट्रातही विस्मरणात गेलेले पुरणाचे कानवले आणि कडकणी हे पदार्थही त्यांच्या घरात होतात.
कोकण कनेक्शन
डॉन या पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या सिद्रा रोघे हिचेही कोकणाशी थेट नाते आहे. तिचे आजी-आजोबा मुरुडजवळच्या रेवदंड्याचे. फाळणीच्या वेळी चांगल्या नोकरीच्या शोधात ते कराचीला आले. पुन्हा कोकणात जाऊन लग्न केले. पाठोपाठ भाऊही कराचीत आला. पुढे भारत दाखवायला रोघे मुलांना घेऊन गेले होते , तेव्हा मात्र खूप संशयाने पाहिले गेले. त्यानंतर मात्र येणे झाले नाही. सिद्राला मात्र संधी मिळाली की , तिचे रूट्स शोधायला रेवदंड्याला यायचे आहे.
भोसले, जगताप, जाधव, सांडेकर, दुपटे... या आडनावांच्या माणसांची भेट कराचीत होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तसे घडले खरे. कराची प्रेस क्लबच्या निमंत्रणावरून पाकिस्तानभेटीवर गेलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना या मराठी मंडळींना भेटण्याची संधी मिळाली. स्थानिक पत्रकारांकडून मिळवलेल्या फोन नंबरवर मराठीतून बोलल्यावर पलीकडून आनंदातिशयाने प्रतिसाद आला आणि ही मराठी मंडळी थेट भेटायलाच आली. त्यांच्याबरोबर संवाद साधताना 'आम्ही इथे अगदी मजेत आणि सुरक्षित आहोत. नोकरी व्यवसाय उत्तम चाललेत', अशीच भावना त्यांनी व्यक्त केली.
सध्या पाकिस्तानात तब्बल दोन हजार मराठी माणसे राहतात. त्यातील बहुसंख्य कराचीत आहेत. 'श्री महाराष्ट्र पंचायत कराची' या संस्थेशी ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. परमेश जाधव या संस्थेचे अध्यक्ष. कराचीतल्या 'गझीबा बॉम्बे चाट अँड मसाला डोसा' या भारतीय पदार्थ मिळणाऱ्या मोठ्या रेस्तराँमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. फाळणीच्या आधीपासून अनेक वर्षे ही मंडळी तिथे आहेत. व्यापाऱ्यांसोबत मदतनीस, ड्रायव्हर, हमाल अशा कामांसाठी ही मराठी माणसे मुंबईहून कराचीला पोहचली असावीत. गेल्या शंभरेक वर्षांत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले नाते कायम ठेवले आहे.
' आम्ही पाकिस्तानात सुखी आहोत. नोकरी व्यवसायातही भरभराट आहे. पण , आपल्या माणसांना मात्र भेटावेसे वाटते. कधी जेजुरी-तुळजापूरला जाऊन कुलदैवतेचे दर्शन घ्यायचे असते. हे जाणे-येणे सोपे व्हावे. दोन्ही देशांनी व्हिसा प्रक्रिया सोपी केली , तर हे शक्य होईल. तुम्ही आपल्या मराठी माणसांपर्यंत हा निरोप नक्की पोहचवा ', अशी कळकळीची विनंती पाकिस्तानातल्या मराठी माणसांनी मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना केली.
कराचीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या दिलीप भोसले यांची सासुरवाडी मुंबईतल्या मुलुंडची. त्यांची पत्नी आणि मुली सध्या मुंबईत आल्या आहेत. रवी जगताप यांचे मूळ गाव पुण्याजवळचे खडकी. तर देवानंद सांडेकरांचे वडील मुंबईहून कराचीत आले होते. सांडेकरांना एकदा तरी मुंबईला यायचे आहे. एकदा येण्याचा प्रयत्न केला पण व्हिसा मिळाला नाही , त्यानंतर ते राहूनच गेले. विशाल राजपूतची आई मधुमती खरात मराठी आहे. तर गणेश गायकवाडांचे वडील पापडाचा व्यापार करायला कराचीत आले होते. त्यांची पत्नी पाकिस्तानातच जन्मली वाढली , पण सासू मात्र मुंबईकर आहे. कराचीभर प्रसिद्ध असलेली टेलरिंग फर्म तुळशीराम दुपटे या मराठी माणसाची आहे!
या मुस्लिमबहुल देशात तुम्हाला त्रास नाही का होत , या प्रश्नावर सगळ्यांचे ठाम उत्तर ' नाही ' असे होते. अपवाद म्हणून बाबरी मशिद पाडली तेव्हा दंगली झाल्या. पण , त्यावेळीही या मंडळींना वाचवले ते त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनी , असे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक बंध
नारळी पौर्णिमा , चैत्र पाडवा , दिवाळी , होळी हे सण ही मंडळी अगदी धुमधडाक्यात साजरे करतात. सार्वजनिक गणपती बसवतात. त्याचे विसर्जनही दणक्यात होते. पुरणपोळी आणि मोदकांसह आज महाराष्ट्रातही विस्मरणात गेलेले पुरणाचे कानवले आणि कडकणी हे पदार्थही त्यांच्या घरात होतात.
कोकण कनेक्शन
डॉन या पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या सिद्रा रोघे हिचेही कोकणाशी थेट नाते आहे. तिचे आजी-आजोबा मुरुडजवळच्या रेवदंड्याचे. फाळणीच्या वेळी चांगल्या नोकरीच्या शोधात ते कराचीला आले. पुन्हा कोकणात जाऊन लग्न केले. पाठोपाठ भाऊही कराचीत आला. पुढे भारत दाखवायला रोघे मुलांना घेऊन गेले होते , तेव्हा मात्र खूप संशयाने पाहिले गेले. त्यानंतर मात्र येणे झाले नाही. सिद्राला मात्र संधी मिळाली की , तिचे रूट्स शोधायला रेवदंड्याला यायचे आहे.
.
No comments:
Post a Comment