२१ व्या शतकातही भारताला
सर्वात अधिक धोका पाकिस्तान व चीन या दोन शेजारी राष्ट्रांचा आहे. चीन व
पाकिस्तानने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे भारताला अापल्या संरक्षण खर्चात वाढ
करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन तत्कालीन केंद्रीय परराष्ट्रमंत्री जसवंत
सिंह यांनी आपल्या `डिफेन्डिंग इंडिया' या
पुस्तकात केले होते. त्या संदर्भातील माझा लेख दै. सामनाच्या १६ जानेवारी १९९९च्या
अंकात प्रसिद्ध झाला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
भारताला सर्वाधिक धोका
पाकिस्तान, चीनपासूनच!
तत्कालीन परराष्ट्रमंत्री
जसवंत सिंह यांचे रोखठोक प्रतिपादन
- समीर
परांजपे
२१ व्या शतकातही भारताला
सर्वात अधिक धोका पाकिस्तान व चीन या दोन शेजारी राष्ट्रांचा आहे. चीन व पाकिस्तानने
घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे भारताला अापल्या संरक्षण खर्चात वाढ करण्याशिवाय
पर्याय नाही असे प्रतिपादन तत्कालीन केंद्रीय परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी
आपल्या `डिफेन्डिंग इंडिया' या
पुस्तकात केले होते.
भारताला स्वातंत्र्य
मिळून अनेक वर्षे लोटली. या कालावधीत देशाचे परराष्ट्र धोरण व संरक्षण व्यवस्था
कशी प्रगत होत गेली व या वाटचालीत कसे मोठे दोष राहून गेले याचे अभ्यासपूर्ण
विश्लेषण मॅकमिलनतर्फे प्रसिद्ध झालेल्या `डिफेन्डिंग
इंडिया' या पुस्तकात जसवंत सिंह यांनी केले होते. जसवंत सिंह
हे संरक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत. याआधी जसवंत सिंह यांची `नॅशनल सिक्युरिटी : अॅन आऊटलाईन आॅफ अवर कन्सर्स' व `शौर्य तेजो' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
`डिफेन्डिंग
इंडिया' या पुस्तकातील `डिफेन्स
स्पेंडिंग अँड फोर्स स्ट्रक्चरिंग' या प्रकरणात
भारत-पाकिस्तान आणि भारत - चीन या देशांदरम्यानच्या संरक्षण व्यवस्थेचा
अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. (पृष्ठ क्रमांक २४१ ते २४७) भारताने पाच
अणुचाचण्या पोखरण येथे केल्यानंतर पाकिस्तानने सहा अणुचाचण्या करुन त्याला
प्रत्युत्तर दिले. या स्फोटानंतर चीन हा भारताचा मुख्य शत्रू आहे असे विधान
तत्कालीन संरक्षणमंत्री जाॅर्ज फर्नांडिस यांनी केले होते. या सर्व घटनांनी आशिया
खंडात तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भारत-चीन-पाकिस्तान या `प्रेमत्रिकोणाचा' जसवंत सिंह यांनी आपल्या पुस्तकात
विचार केला होता.
जसवंत सिंह यांनी
पाकिस्तान -भारताच्या संरक्षण व्यवस्थांचा तौलनिक अभ्यास करताना म्हटले अाहे की, १९६२च्या युद्धानंतर १९६५मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात भारताला
संरक्षणावर मोठा खर्च करावा लागला. १९६३मध्ये एकूण आर्थिक उत्पन्नातील ४.४ टक्के
इतका भाग भारताने संरक्षण व्यवस्थेवर खर्च केला. पाकिस्तानचे एकूण आर्थिक उत्पन्न
१९६३मध्ये २३ अब्ज डाॅलर इतके असले तरी या देशाने आपल्या संरक्षणावर एकूण आर्थिक
उत्पन्नाच्या ५ टक्के इतका खर्च केलेला होता. १९६५मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या
काळत पाकिस्तानचा त्यानंतर संरक्षण खर्च ९ टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर
सर्वसाधारण स्थिती असतानाही १९८८-८९ मध्ये बेनझीर भुत्तो पंतप्रधान असतानाच्या
काळात पाकिस्तानच्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी ८.५६ टक्के भाग हा संरक्षणावर खर्च
करण्यात अाला. १९८०च्या दशकात संरक्षण खर्चावरील पाकिस्तानची टक्केवारी ७.५
टक्क्यांच्या दरम्यान होती. पाकिस्तानचे भौगोलिक स्थान हे भारतापेक्षा कमी आकाराचे
असूनही या देशाचा संरक्षण खर्च मात्र वाढता आहे.
भारताच्या एकूण आर्थिक
उत्पन्नापैकी भारताने १९६९-७०मध्ये २५.६३ टक्के इतका भाग संरक्षणावर खर्च केलेला
होता. तो १९७९-८०मध्ये १९.१९टक्के तर १९९१-९२ १४.४५ टक्के इतक्या प्रमाणावर आला.
१९९७-९८मध्ये फक्त १५.३ टक्के इतका भाग संरक्षणावर भारताने खर्च केलेला आहे.
भारताच्या संरक्षण खर्चात ही जी सातत्याने कपात होत गेली ती पाकिस्तान व चीन यांचा
संरक्षण खर्च बघता निराशाजनक आहे अशा स्पष्ट अभिप्राय जसवंत सिंह यांनी `डिफेन्डिंग इंडिया' या आपल्या पुस्तकात व्यक्त केला
होता. त्यांनी म्हटले होते की, १९६२ व १९६५च्या युद्धानंतर
भारताने आपली संरक्षण व्यवस्था अद्ययावत करण्याकडे लक्ष पुरविलेले असले तरी
त्याच्या संरक्षण खर्चाची विभागणी ही चीन व पाकिस्तानच्या रोखाने होते.
जागतिकीकरणाच्या काळात चीन सध्या शांत असल्यासारखा वाटत असला तरी आशिया खंडातील
राजकारणावर पकड मजबूत करण्याची आकांक्षा चीनला स्वस्थ बसू देणार नाही. दुसर्या
बाजूला पाकिस्तानने भारतालाच लक्ष्य करुन आपली संरक्षण तयारी सुरु ठेवली आहे.
भारत व चीन यांच्या
संरक्षण व्यवस्थांचा तौलनिक अभ्यास करताना जसवंतसिंग यांनी म्हटले होते की, १९५६ ते १९६२ या कालावधीत चीनने आपल्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी ९.७ अब्ज
डाॅलर इतका खर्च संरक्षण व्यवस्थेवर केला व नंतर तो १३.७ अब्ज डाॅलरपर्यंत वाढवत
नेला. १९७०मध्ये सोव्हिएत युनियनबरोबर असुरी नदी प्रश्नावर जो संघर्ष झाला,
त्याच्या परिणामी चीनचा संरक्षण खर्च १९७४मध्ये ३२.३ अब्ज डाॅलर
इतका वाढला. दोन हजार सालापर्यंत चीन हा जागतिक संरक्षण व्यवस्थेत बलाढ्यतेच्या
दृष्टीने चौथ्या वा पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकाविण्याची शक्यता होती व झालेही
अगदी तसेच.
भारताला चीन व
पाकिस्तानपासून संरक्षणदृष्ट्या असलेले धोके एकविसाव्या सहस्त्रकातही कायम राहाणार
आहेत. अमेरिका ही एकविसाव्या सहस्त्रकात `डाॅमिनन्ट'
घटक राहाणार असल्याचे स्पष्ट करुन जसवंत सिंह यांनी म्हटले होते की,
एकविसाव्या सहस्त्रकात जागतिकीकरणाच्या काळात एखादे राष्ट्र
दुसर्यावर शस्त्रास्त्रांनी हल्ला न करता माहिती-तंत्रज्ञानशास्त्राच्या आधारे
युद्ध खेळून नामोहरम करु शकते. भारत आज जो संरक्षण व्यवस्थेवर खर्च करतोय त्याचे
प्रमाण वाढतच राहिल. परंतु दोन राष्ट्रांमध्ये परस्परांच्या सुरक्षेची काळजी
घेण्याविषयी `करार' होण्याची एखादी नवी
प्रथाही अस्तित्त्वात येऊ शकते.
भारताने १९७४ साली
अणुचाचण्या पोखरण येथे घडविल्या. त्यानंतर अणुशक्तीच्या क्षेत्रात भारताने बरीच
प्रगती साधली. जागतिक स्तरावर अणुशस्त्रविहिन विश्व निर्माण करण्यासाठी काही
देशांनी मोहिम सुरु केली असली तरी, या
क्षेत्रात काही देशांकडे प्रचंड प्रमाणात अण्वस्त्रे आहेत. काही देशांकडे
अण्वस्त्रांचा कमी साठा आहे किंवा काहीच साठा नाही अशीही स्थितीही आहे. या आहे रे
आणि नाही रे च्या विषम परिस्थितीत अण्वस्त्रविहिन विश्व ही संकल्पना साकार होण्यात
खूपच अडथळे येतील. या संकल्पनेसाठी भारताने संपूर्ण सहकार्य द्यावे, पण त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेच्या आड जर ही स्थिती येत असेल तर कोणतीही
तडजोड करु नये, असे जसवंत सिंह यांनी `डिफेन्डिंग
इंडिया' या पुस्तकात `द फ्युचर'
या प्रकरणात म्हटले आहे. (पृष्ठ क्रमांक २९१)
केंद्रीय
मंत्री जसवंत सिंह यांनी लिहिलेले `डिफेन्डिंग
इंडिया' हे भारताच्या परराष्ट्रनीती व संरक्षण व्यवस्थेचा
विचार करणारे पुस्तक अभ्यासकांमध्ये वादळे निर्माण करणारे ठरले. संशोधन पद्धतीचा
सुयोग्य वापर, नकाशे, सूची यांचा
अंतर्भाव असलेले `डिफेन्डिंग इंडिया'हे
पुस्तक मुळातून वाचण्यासारखे आहे.
No comments:
Post a Comment