छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापिले ते तानाजी मालुसरे, मुरार बाजी, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या नरवीरांच्या असीम शौर्याच्या बळावर. या रणवीरांच्या स्फूर्तीदायी कहाण्या आजही प्रत्येकाच्या अंगी वीरश्री चेतवितात. पण इतिहास लेखनामध्ये भावनिक अंगापेक्षा भर द्यावा लागतो सबळ पुराव्यांवर..शिवाजी महाराजांचे प्रमुख शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या ११ पिढीपर्यंतचा इतिहास, तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी अर्पण केलेली कवडय़ांची माळ, मालुसरे घराण्याला किल्लेदारी बहाल केलेल्या पारगडाशी संबंधित अस्सल पत्रे असे पुरावे आता समोर आले आहेत. यासंदर्भात दैनिक लोकसत्तामध्ये मी २३ जानेवारी २००५ रोजी एक लेख लिहिला होता.त्या लेखाची लिंक पुढे दिली आहे. |
तानाजी
मालुसरेंसंदर्भातील ऐतिहासिक साधनांची उपेक्षा!
- समीर परांजपे
|
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य
संस्थापिले ते तानाजी मालुसरे, मुरार बाजी, बाजीप्रभू देशपांडे
यांच्यासारख्या नरवीरांच्या असीम शौर्याच्या बळावर. या रणवीरांच्या स्फूर्तीदायी
कहाण्या आजही प्रत्येकाच्या अंगी वीरश्री चेतवितात. पण इतिहास लेखनामध्ये भावनिक
अंगापेक्षा भर द्यावा लागतो सबळ पुराव्यांवर..शिवाजी महाराजांचे प्रमुख शिलेदार
तानाजी मालुसरे यांच्या ११ पिढीपर्यंतचा इतिहास, तानाजी मालुसरे यांना शिवाजी
महाराजांनी अर्पण केलेली कवडय़ांची माळ, मालुसरे घराण्याला किल्लेदारी
बहाल केलेल्या पारगडाशी संबंधित अस्सल पत्रे असे पुरावे आता समोर आले आहेत.
मालुसरे घराण्याच्या इतिहासाचा नाममात्र उल्लेख सेतुमाधवराव पगडी, डॉ. कमल
गोखले यांनी आपल्या लेखनात केला आहे. मात्र इतर इतिहासकारांनी मालुसरे
घराण्याकडील ऐतिहासिक साधनांकडे अद्याप ढुंकूनही बघितलेले नाही ही आपल्याकडील
इतिहास लेखनाची शोकांतिका आहे.
या ऐतिहासिक साधनांची योग्य चिकित्सा करून
शिवचरित्रात नवी व मोलाची भर घालणे आवश्यक बनले आहे.‘गड आला पण
सिंह गेला’, ‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग
रायबाचे’ अशी चमकदार वाक्ये तानाजी मालुसरे व
त्यांच्या सहकाऱ्यांनी किल्ले कोंडाणावर (नंतरचा सिंहगड) गाजविलेल्या पराक्रमाशी
जोडली गेली आहेत. पण ही सारी शाहिरी परंपरेतून आलेले लालित्य आहे. प्रत्यक्ष
कोंडाण्यावर तानाजी मालुसरे यांनी गाजविलेला पराक्रम व उदयभानूने मराठय़ांना
दिलेली झुंज याचा इतिहासकारांनी कथन केलेला तपशील व तानाजी मालुसरे यांच्यावरील
पोवाडय़ांमध्ये या लढाईचे आलेले वर्णन यात खुपच फरक आहे.तानाजी मालुसरे यांच्या
घराण्यातील ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे हे बेळगावमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक
झाले आहेत. त्यांनी मालुसरे घराण्याशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रे व चिजांबद्दल
माहिती दिली. ही ऐतिहासिक साधने जतन करून ठेवल्याबद्दल सेतुमाधवराव पगडी यांनी
बाळकृष्ण मालुसरे यांचे जाहीर कौतूक केले होते, पण या साधनांच्या चिकित्सेचे काय? हा प्रश्न
अनुत्तरितच राहातो.तानाजी मालुसरे यांना कोंडाणा किल्ला लढविताना वीरमरण आले.
तानाजींच्या पार्थिवावर शिवाजी महाराजांनी
अर्पण केलेली स्वत:ची कवडय़ांची माळ आज बाळकृष्ण मालुसरे यांच्या संग्रही आहे. ही
कवडय़ांची माळ भोसले राजघराण्यातीलच कशावरून? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा
बाळकृष्ण मालुसरे यांनी प्रयत्न केला.सातारच्या महाराणी सुमित्राराजे भोसले
यांना तानाजी मालुसरे यांची ही कवडय़ांची माळ त्यांनी दाखविली. अगदी तशीच
कवडय़ांची माळ सातारच्या भोसले राजघराण्यातील देवघरात पुजेस ठेवली आहे. ही
देवघरातील कवडय़ांची माळ राजपुरुषाने धारण करण्याची आहे. त्यामुळे तानाजी
मालुसरेंच्या वंशजांकडे असलेल्या कवडय़ांच्या माळेचे ऐतिहासिकत्त्व सिद्ध झाले
आहे. मात्र मालुसरेंकडे असलेली ही माळ साक्षात शिवाजी महाराजांनीच तानाजी यांना
अर्पण केली हे सिद्ध करणारा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही हे ही येथे लक्षात
घेण्यासारखे आहे.तानाजी मालुसरे यांची तलवारही बाळकृष्ण मालुसरे यांच्या संग्रही
आहे असा त्यांचा दावा आहे. हा ऐतिहासिक पुरावाही तपासून घेण्याची गरज आहे.
पारगडच्या भवानी देवीला शिवरायांनी अर्पण केलेले ९२ तोळे सोन्याचे दागिने व १२००
तोळे चांदीचे दागिने मालुसरे परिवाराने ट्रस्टच्या माध्यमातून आता जतन केले
आहेत.
किल्ले पारगडाचे उत्तम जतन व्हावे यासाठी
मालुसरेंचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे प्रयत्नशील आहेत.मालुसरे घराण्याचा
इतिहास जोडला गेलाय तो सिंहगडाबरोबरच पारगड या किल्ल्याशीही.कोल्हापूर
जिल्ह्याच्या दक्षिणेस असलेल्या चंदगड तालुक्याच्या पार सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या
सीमेवर पारगड आहे. १६७५ साली या गडाची वास्तुशांत होऊन शिवाजी महाराजांनी तानाजी
यांचा सुपुत्र रायबा मालुसरे याची या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली.
पारगडाची उंची समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट आहे. पारगडाविषयी काही अस्सल
पत्रे बाळकृष्ण मालुसरे यांच्या संग्रही आहेत. त्यातील पहिले पत्र आहे १९
नोव्हेंबर १७८८ चे. पारगड किल्ल्याच्या खर्चासाठी व्यवस्था तालुके डिचोली व
पेडणे यांच्या उत्पन्नातून पुरातन आहे. त्याप्रमाणे आताही ते चालवावे म्हणून
धोंडोकृष्ण नामजाद व कारकून किल्ले पारगड यांनी गोवर्णदोर जंजीरे गोवा यास
पाठविले.सदर पत्रात कोल्हापूरमध्ये फौजे तयार होत आहे परंतू मसलत कोणीकडे आहे हे
कळत नाही हे देखील वृत्त आहे. हे पत्र गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरला लिहिलेले
आहे.फोंड सावंत तांबुळवाडीकर यांनी दादीबाई सावंत वाडीकर यांना सामील होऊन, बंड
माजवून राजे खेम सावंत भोसले, सावंतवाडीकर यांच्या इलाख्यातील महादेवगड, मनोहरगडाच्या
गडकऱ्यांनीही धामधूम माजविली. त्याचा उल्लेख दुसऱ्या एका पत्रात आहे. या
बंडखोरांपैकी काहींनी सामानगड, पारगड, हेरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी
आश्रय घेतल्याचे उल्लेख आहेत.अशापैकी मनोहरगड परिसरात धामधूम माजविलेले काही
फरारी पारगड परिसरात आले. त्याची माहिती पाठविल्याबद्दल डनलॉप साहेब-पोलिटिकल
एजंट, कर्नाटक यांनी छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब
महाराज यांना १३ जानेवारी १८३७ रोजी पाठविलेले हे पत्र आहे. त्याशिवाय आणखी एक
पत्र आहे आप्पाजी बिन येसाजी मालुसरा, किल्ले पारगड याला जनरल
मन्रोसाहेब यांनी ८ ऑगस्ट १८१८ साली लिहिलेले. हे पत्र पारगड गडकरींच्या नावे
आहे. त्यात गडकरी मजकूर पेशवे अंमलापासून जी मिळकत आजवर देत आले ती यापुढेही
चालविण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. हे पत्र बाळकृष्ण मालुसरेंच्या
संग्रही आहे.करवीर छश्रपती घराण्याच्या इतिहास साधने या ग्रंथाच्या चौथ्या खंडात
लेखांक १९० चे पत्र आहे. त्यावर तारीख तिथी नाही. पारगडाचे हवालदार बाळसावंत
यांनी हे पत्र पाठविले होते. शिवाजी महाराजांनी रायबा याला पारगडाची किल्लेदारी
सोपविताना ‘चंद्रसूर्य असेतो गड जागवावा असा
मजकूर असलेला एक ताम्रपट दिला होता. हा ताम्रपट आप्पाजी बिन येसाजी मालुसरा
याच्याकडून ब्रिटिशांनी जप्त करून तो एनिकेशन ऑफिसमध्ये ठेवल्याचे काही
कागदपत्रांवरून कळते व त्यानंतरच मुंबई सरकारने कागदी सनदा देऊन गडकऱ्यांना पगार
सुरू केला.रायबा मालुसरे यांना मिळालेला हा ताम्रपट सध्या आहे कुठे याचा इतिहास
संशोधकांनी शोध घ्यायला हवा. तसेच खळोबी बिन खंडोजी शेलार, किल्ले
पारगड याला ८ ऑगस्ट १८१८ रोजी मिळालेली सनदही संशोधकांना अभ्यासासाठी उपलब्ध
आहे.
तानाजी मालुसरे यांच्या पत्नीचे नाव
नीराबाई. तानाजी यांना उमा नावाची मुलगी होती. पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे
मालुसरे यांचे मूळ गाव आहे. उमरठमधील कळंबे घराण्यात उमाची सोयरीक जुळविण्यात
आली. उमरठमध्ये आजही उमाचे वंशज नांदत आहेत.पारगडची किल्लेदारी मिळाल्यानंतर
मालुसरे घराणे हे उमरठ सोडून पारगडला स्थलांतरित झाले. आता मालुसरेंचे ११ वे
वंशज बाळकृष्ण नारायण मालुसरे हे व्यवसायानिमित्त बेळगावामध्येच स्थायिक झाले
आहेत. मात्र मालुसरेंचे पारगडवरील घर आजही असित्वात आहे. तानाजी मालुसरे यांची
तलवार, त्यांची कवडय़ांची माळ, पारगडाशी
संबंधित ऐतिहासिक पत्रे यांच्याविषयी इतिहास संशोधक तसेच इतिहासप्रेमींनी
चिकित्सक बुद्धीने बघणे व त्यातून इतिहासाचे नवे धागे शोधणे आवश्यक आहे.
त्यासाठी इच्छुकांनी बाळकृष्ण नारायण मालुसरे, शिवनेरी, ५६४, रघुनाथ
पेठ,अनगोळ, बेळगाव, पिन कोड क्र. : ५९०००७, दूरध्वनी
:- ०८३१-२४८१३७७ किंवा ९८६९००३८७२ येथे संपर्क साधावा.
|
No comments:
Post a Comment