Thursday, March 6, 2014

विदेशी शिक्षण, हल्ल्यांचे अवलक्षण

 

अनुज बिडवे या विद्यार्थ्याची दक्षिण आफ्रिकेत वंशद्वेषातून हत्या झाली होती. त्या पार्श्वभूमीवर दैनिक दिव्य मराठीमध्ये ७ जानेवारी २०१२ रोजी मी लिहिलेला लेख

http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-anuj-bidve-dead-in-us-2723233.html

--------

विदेशी शिक्षण, हल्ल्यांचे अवलक्षण 

------

समीर परांजपे 
----------Email Print Comment
अत्यंत हुशार व मेहनती अशी जागतिक स्तरावर प्रतिमा असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशामध्ये हल्ले होण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. वंशविद्वेष हे त्यामागचे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. जागतिकीकरणाच्या युगात अमेरिका, युरोप आदी राष्ट्रांमध्ये शिकून तेथेच नोकरी किंवा व्यवसाय करणा-या भारतीयांचे प्रमाणही वाढलेले आहे. अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीनंतर तेथे व युरोपमधील बहुसंख्य देशांमध्ये बेकारी, आर्थिक कुचंबणा यांनी तेथील स्थानिक नागरिक अधिकच त्रस्त झाले आहेत. त्यांच्या दृष्टीने भारतीय, चिनी असे कोणीही विदेशी हे उपरेच असून ते आमचा रोजगार बळकावितात अशी भावना स्थानिकांच्या मनात घर करून आहे. 
या आर्थिक वैफल्यातून तसेच वंशविद्वेषी भावनेतूनही भारतीय विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. हे हल्लेखोर युवावर्गातीलच असतात हेही लक्षात घ्यायला हवे. दोन-तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थी तसेच नोकरदारांवर हल्ले होण्याचे प्रकार वारंवार घडले होेते. वंशविद्वेषातून असे हल्ले घडल्याचे त्यावेळी होणारे आरोप ऑस्ट्रेलिया सरकारने त्यावेळी नाकारले होते. पण आरोपात काही प्रमाणात तथ्य होतेच. शिवाय भारतीय व अन्य देशांतील विद्यार्थी   ऑस्ट्रेलियातील विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जात असल्याने त्यातून मिळणा-या महसुलाचे प्रमाणही मोठे आहे. ऑस्ट्रेलियाचे विदेशमंत्री हे एका शिष्टमंडळासह अडीच वर्षांपूर्वी भारतात तातडीने आले होते व त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात येईल असे जाहीर केले होते. इतका वेगवान भारतदौरा करण्यामागचा ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्यांचा महत्त्वाचा उद्देश हाच होता की विदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रक्रियेतून मिळणा-या महसुलाला कात्री लागू नये.
या दौ-यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये खूपच घट झाली. त्याची दोन कारणे होती. एकतर ऑस्ट्रेलिया सरकारने खडबडून जागे होत भारतीय व अन्य विदेशी विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलली. तसेच ऑस्ट्रेलियातील स्थानिक नागरिकांना विविध देशांतील विद्यार्थी व लोकांच्या संस्कृतीविषयी माहिती देणारी मोठी जागृती मोहीमच तेथील सरकारने राबविली. त्यातून हे ‘उपरे’ नेमके कोण व ते आपल्या देशात नेमके कशासाठी आले आहेत याचे भान ऑस्ट्रेलियातील स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात आले.
इंग्लंडमधील ग्रेटर मँचेस्टर येथे अलीकडेच मूळ पुणेकर असलेल्या अनुज बिडवे या विद्यार्थ्याची एका वंशविद्वेषी माथेफिरू तरुणाने अगदी जवळून गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने इंग्लंड व भारत दोघेही हादरले आहेत. अनुज बिडवे हा लँकेस्टर विद्यापीठामध्ये शिकत होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना आजही विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा खर्च हा खिशाला परवडणारा नसतो. अनुजच्या कॉलेजच्या दहा हजार पौंड इतक्या फीसाठी त्याच्या आईवडिलांनी आपले घर गहाण ठेवून त्याला परदेशी शिक्षणासाठी पाठविले होते. त्याच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने ते पाहत होते. या पार्श्वभूमीवर त्याच्या हत्येचीच बातमी येऊन पोहोचल्याने त्याच्या आईवडिलांवर केवढे आभाळ कोसळले असेल याची कल्पनाही करवत नाही.

अनुजची हत्या झाल्यानंतर ब्रिटनच्या पोलिस यंत्रणेने दाखविलेली संवेदनक्षमता, त्याचप्रमाणे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांच्यासह अन्य भारतीयांनी बिडवे कुटुंबीयांना तातडीने देऊ केलेले सहकार्य या गोष्टी मनाला दिलासा देणा-या अशाच आहेत. इंग्लंडमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणावर वर्षानुवर्षे राहत असून, तेथे भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने शिकत असूनही त्यांच्यावर वंशविद्वेषातून हल्ले झाल्याच्या घटना खूपच तुरळक प्रमाणात घडल्या आहेत. अनुज बिडवेवर वंशविद्वेषातून हल्ला चढविण्यात आल्याने इंग्लंडमधील स्थानिक युवावर्गातील काही घटकांच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शनही त्यातून घडले. वर्णविद्वेषाची भावना सरकारी पातळीवर कायदे करून संपविण्यात आली असली तरी ती अजूनही काही प्रमाणात जिवंत असल्याचे अमेरिका, दक्षिण आफ्रिकेमध्येही पाहायला मिळते. या सा-या गोष्टी व त्यातून निर्माण होणारे पेचप्रसंग ध्यानी घेऊनच भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण व पुढे नोकरी, व्यवसायासाठी पाऊल टाकले पाहिजे.
भारतातील बहुसंख्य विद्यार्थ्यांची पसंती अमेरिकेलाच असते. 2006 सालामध्ये भारतातून 1 लाख 23 हजार विद्यार्थी परदेशात शिकायला गेले. त्यातील 76 हजार विद्यार्थ्यांनी अमेरिकेत जाणे पसंत केले. अमेरिकेत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांच्या संकुलात स्थानिक युवकांकडून केल्या गेलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये भारतीय विद्यार्थी, प्राध्यापक हे बळी पडल्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत. पुढेही कदाचित घडत राहतील. या हल्ल्यांमागेही आर्थिक वैफल्य, वंशविद्वेष अशी काही कारणे आहेतच. त्यामुळे भारतीय विद्यार्थी कोणत्याही देशात गेले तरी ते तेथे संपूर्ण सुरक्षित असतीलच याची खात्री देता येत नाही. अनुज बिडवे व अन्य अनेक भारतीय विद्यार्थी हे सत्शील प्रवृत्तीचेच आहेत यात काहीच शंका नाही. मात्र भारतातून शिक्षणासाठी, नोकरी व्यवसायासाठी जाणारे सर्वच जण हे सज्जन असतात असे समजण्याचेही काही कारण नाही. मानवी तस्करीच्या माध्यमातून कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व युरोपीय देशांत भारतीयांना नेणा-या काही भारतीय टोळ्यांचा पर्दाफाश दोन वर्षांपूर्वी विदेशातील पोलिस यंत्रणांनी केला होता. भारतीय विद्यार्थ्यांपैकी काहीजण अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतली असल्याची प्रकरणेही समोर आली होती. विदेशात जाऊन असे गैरप्रकार करणा-या भारतीयांना तेथील पोलिस यंत्रणेने जेरबंद केल्यानंतरही कधीकधी या बाबींकडे कानाडोळा करून भारतीय प्रसारमाध्यमे तथाकथित राष्ट्रप्रेमातून दोषी भारतीयांची कड घेऊन बातम्या देण्याचा सपाटा लावतात हीदेखील खटकणारी बाब आहे. भारतीय नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थ्यांनी विदेशातील कायद्याचे नीट पालन करूनच राहायला हवे यावर भर देण्याचे भारतीय प्रसारमाध्यमे कधी कधी विसरतात. अनुज बिडवेसारख्या अत्यंत हुशार विद्यार्थ्याची वंशविद्वेषातून झालेली हत्या ही काळजाला घरे पाडणारी घटना आहेच. मात्र विदेशात राहाणा-या सर्व भारतीयांचा एकत्रितपणे विचार करताना त्यांच्या गुणदोषांचा एकत्रित विचार करूनच प्रसारमाध्यमे व भारतीयांनी मते व्यक्त करायला शिकले पाहिजे.
जागतिकीकरणाच्या युगात जग जवळ आले आहे. अनेक  दर्जेदार विदेशी विद्यापीठे भारतात येण्यास, येथील शिक्षणक्षेत्रात गुंतवणूक करण्यास राजी आहेत. त्यांच्या सहकार्याने भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक उत्तम करण्याकडे आपल्या सरकारने लक्ष द्यायला हवे. त्यातून भारतीय विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षणाच्या संधी मायदेशातच उपलब्ध झाल्या तर   विदेशात महागड्या उच्च शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाणही खूप कमी होईल.
भारतात उच्च शिक्षणाचा दर्जा विदेशातील शिक्षणापेक्षा अजूनही फारसा चांगला नसल्यानेच अनेक विद्यार्थी अमेरिकेसह अन्य देशांत प्रसंगी खिशाला आर्थिक भार सोसवत नसूनही जातात. भारतातील शिक्षणपद्धतीतील दोष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलल्यास भारतीय विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे निराकरण होऊ शकते. अनुज बिडवे याची हत्या जितकी निषेधार्ह आहे तितकीच भारत सरकारची मायदेशातील शिक्षणदर्जा सुधारण्याविषयी असलेली अनास्था हेही निंदनीयच आहे. मूलभूत गोष्टी सुधारल्या तर अनेक गोष्टी सुकर होऊ शकतात. बिडवे हत्या प्रकरणानंतर तरी केंद्र सरकारला जाग येईल का?
--------

No comments:

Post a Comment