Tuesday, March 11, 2014

सजग इतिहासकार (दै. दिव्य मराठी - १२ फेब्रुवारी २०१२)



ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुंबईचा विकास केल्यानंतर तिने जागतिक शहर होण्यापर्यंत जी मजल मारली, तिच्या पोटात जी विविधरंगी संस्कृती सामावलेली आहे, तिचा अत्यंत डोळसपणे वेध घेण्याचे काम शारदा द्विवेदी यांनी केले. त्यामुळे विद्यमान काळात मुंबईचा इतिहास असे म्हटले की सर्वप्रथम नाव आठवायचे ते शारदा द्विवेदी यांचेच...त्यांना अादरांजली वाहणारा हा लेख मी दै. दिव्य मराठीच्या १२ फेब्रुवारी २०१२च्या अंकात लिहिला होता. त्या लेखाची ही लिंक.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sharada-dvivedi-name-meena-datatrya-joshi-2853379.html
------------------
सजग इतिहासकार
------------
- समीर परांजपे
------------
इतिहास लेखनामध्ये स्थानीय इतिहास अशी एक शाखा आहे. एखादे गाव, शहर विकसित होताना त्यामध्ये जे विविध बदलत घडत जातात, त्यांच्या दंतकथा, म्हणी, अधिकृत सरकारी कागदपत्रे, लोकांचा परस्परांमधील पत्र्यव्यवहार अशा सर्व साधनांचा आधार घेऊन स्थानीय इतिहास लिहिला जातो. मुंबई बेट प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळत असले तरी त्याचे ‘अस्तित्व’ ख-या अर्थाने जाणवून दिले ते ब्रिटिश राज्यकर्त्यांनीच. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुंबईचा विकास केल्यानंतर तिने जागतिक शहर होण्यापर्यंत जी मजल मारली, तिच्या पोटात जी विविधरंगी संस्कृती सामावलेली आहे, तिचा अत्यंत डोळसपणे वेध घेण्याचे काम शारदा द्विवेदी यांनी केले. त्यामुळे विद्यमान काळात मुंबईचा इतिहास असे म्हटले की सर्वप्रथम नाव आठवायचे ते शारदा द्विवेदी यांचेच...
इतिहासकार म्हटला की तो घनगंभीर, खूपच कमी बोलणारा, एकांतप्रिय वगैरे असावा असे चित्र डोळ्यांसमोर येते. शारदा द्विवेदी या मात्र अत्यंत ऋजू स्वभावाच्या, आपल्या विद्वत्तेचे दडपण समोरच्या लोकांवर येणार नाही याची नीट काळजी घेणा-या, तसेच इतिहास संशोधन, लेखन, प्रकल्प आखणीसाठी मदत करण्यात तत्पर होत्या आणि हीच त्यांची खासियत होती.
भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर कायम कॉस्मोपॉलिटन व उदारमतवादी विचारांचे राहिले आहे. ब्रिटिश राजवटीत मुंबई विकसित होत असताना येथे अत्यंत देखण्या वास्तू उभ्या राहिल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही मुंबईमध्ये आजपावेतो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक घटना घडल्या. शहराच्या वास्तुबांधणीत अनेक बदल झाले. मुंबईचे अभिमानस्थळ असलेल्या गिरण्या बंद पडून हे शहर सेवाक्षेत्रातील उद्योगांसाठी प्रमुख केंद्र बनले. शारदा द्विवेदी यांच्यातील सजग इतिहासकार हे सारे बदल बारकाईने टिपत होता. त्यातूनच त्यांनी मुंबईच्या इतिहासावर विविध पुस्तके, शोधनिबंध यांच्या माध्यमातून विपुल लेखन केले. पुराव्याशिवाय कोणतेही ठोस विधान न करणे ही प्रत्येक इतिहासकाराप्रमाणे शारदा द्विवेदींची लेखनशैली असली तरी त्यांच्या लेखनात प्रसन्नतेचा एक शिडकावा होता. जुन्या मुंबईविषयी आठवणी मनात जागवत असताना वास्तू वा गोष्टींची वर्तमानात कशी दुरवस्था झाली आहे, या गोष्टींच्या जपणुकीसाठी कोणती पावले सरकार व सामान्य माणसांनी उचलली पाहिजेत, याची जाणीव त्या लेखनातून करून देत. थोडक्यात, केवळ वैभवशाली इतिहासाचा वारसा सांगण्यातच रमू नका, उज्ज्वल भविष्यकाळात प्रवेश करताना इतिहासाच्या खुणा नीट जपून ठेवण्याची आस मनात असू द्या, अशा वृत्तीनेच शारदा द्विवेदी यांनी आपले सारे लेखन केले. 
आयसीएस अधिका-याची कन्या असलेल्या शारदा द्विवेदी (मूळ नाव मीना दत्तात्रय जोशी) यांनी जगभरातील लोकांना मुंबईच्या इतिहास, वर्तमान व भविष्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला ख-या अर्थाने शिकवले. शारदा द्विवेदी यांनी राहुल मेहरोत्रा या सहलेखकाबरोबर लिहिलेले ‘बॉम्बे : द सिटी विदीन’ हे 1995 साली प्रसिद्ध झालेले कॉफी टेबल बुक वाचकांना मुंबईच्या अंतरंगात घेऊन नेले. त्यांनी लिहिलेली ‘बाणगंगा : सेक्रेड टँक ऑन मलबार हिल’, ‘फोर्ट वॉक्स’, तसेच अगदी अलीकडे लिहिलेले ‘द ताज अ‍ॅट अपोलो बंदर’ ही पुस्तके मुंबई शहराचा अभ्यास करणा-यांसाठी मोलाचा दस्तावेजच आहेत. सात बेटे जोडून आधुनिक मुंबई शहराची निर्मिती होत असताना व्हिक्टोरियन काळात फोर्ट, व्हीटीसह मूळ मुंबईत ज्या देखण्या इमारती उभ्या राहिल्या, त्यांच्या वास्तुवैशिष्ट्यांबद्दल शारदा द्विवेदी यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांच्या आयुष्याची सारी जडणघडणच या शहरात झालेली होती. 
क्वीन मेरी स्कूलमध्ये शिकल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी सिडनहॅम कॉलेजमध्ये घेतले. मुंबई विद्यापीठातून ग्रंथालय शास्त्रामध्ये त्यांनी पदवी संपादित केली होती. मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीच्या सदस्य या नात्याने या शहरातील देखण्या वास्तूंचे उत्तम जतन होण्यासाठी अनेक उपयुक्त सूचना त्यांनी वेळोवेळी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेला केल्या होत्या. या सूचनांचा अत्यंत गांभीर्याने विचार करून त्यावर तत्परतेने निर्णय घेतले जायचे, इतका या क्षेत्रातील द्विवेदींचा अधिकार व दबदबा होता. रतन टाटा यांनी ताजमहाल हॉटेलचा सर्वंकष इतिहास शारदा द्विवेदी यांच्याकडूनच लिहून घेतला होता. मुंबईतील वास्तूंमधील कला वारसा व व्हिक्टोरियन काळातील इमारतींसंदर्भात युडीआरआयच्या युनेस्को नॉमिनेशन डॉसिअरसाठी शारदा द्विवेदी व पुराणवस्तूजतन वास्तूरचनाकार आभा लांबा यांनी अत्यंत मोलाचे काम करून ठेवलेले आहे.
शारदा द्विवेदी यांची मुंबई केवळ फोर्ट, व्हीटी, मलबार हिल, पेडर रोड इथपर्यंतच मर्यादित नव्हती. त्यांना लालबाग, परळमधील श्रमिकांचे जीवन, माहिम, शीवच्या पुढे विस्तारलेल्या मुंबईच्या उपनगरांतील जीवनशैली, पनवेल, कर्जत, डहाणूपर्यंत मुंबई नगरीच्या पडलेल्या छायेमुळे तेथे होणारे नागरी बदल अशा अनेक विषयांत त्यांना इतिहासकार म्हणून रस होता. शारदा द्विवेदी यांनी लिहिलेली अँकरिंग ए सिटी लाइन : द हिस्ट्री ऑफ द वेस्टर्न सबर्बन रेल्वे अँड इट््स हेडक्वार्टर्स इन बॉम्बे, द जहांगीर आर्ट गॅलरी, द व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड यातून त्यांनी जुनी मुंबई जशीच्या तशी वाचकांसमोर उभी केली आहे. त्याशिवाय लाइव्हज ऑफ द इंडियन प्रिन्सेस, रीच फॉर द स्टार्स - द कॉर्पोरेट हिस्ट्री ऑफ ब्ल्यू स्टार लिमिटेड, द ब्रोकन फ्ल्यूट, द महाराजा अशी त्यांची काही पुस्तके, त्या साहित्यातले इतरही प्रकार तितक्याच समर्थपणे हाताळू शकत होत्या याची साक्ष देतात. व्हिक्टोरियन काळातील मुंबईचा इतिहास हाच ज्यांचा श्वास होता, त्या प्रख्यात इतिहासकार शारदा द्विवेदी यांच्या निधनाने आपण एका सच्च्या ‘मुंबैकराला’ मुकलो आहोत, हे खरे.
------------

No comments:

Post a Comment