Thursday, March 6, 2014

...अन् भविष्य पोरके झाले!


 
ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांना आदरांजली वाहाणारा लेख मी दैनिक दिव्य मराठीच्या २१ आँगस्ट २०१३च्या अंकात लिहिला होता. 
 ------------------
...अन् भविष्य पोरके झाले!
-------------
- समीर परांजपे
sameer.p@dainikbhaskargroup.com
--------------
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाशी विलक्षण समरस झालेले म्हणजे जयंतराव साळगावकर एक चालताबोलता सांस्कृतिक कोशच होते. त्यांना ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा ठाऊक होत्या. माणसांनी ज्योतिषशास्त्रावर अवलंबून राहू नये असे ते नेहमी सांगत. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या निधनाने आता हे भविष्यही पोरके झाले आहे!
-------
देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली त्या आधीची दोन दशके व स्वातंत्र्योत्तर सहा दशके अशा विशाल कालपटातील सामाजिक स्पंदने प्रत्यक्ष अनुभवलेले व या स्पंदनांना नवे आयाम देणारे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या निधनाने एक समाजहितैषि व्यक्तिमत्त्व कायमचे हरपले आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथे एक फेब्रुवारी 1929 रोजी जन्मलेल्या जयंतराव साळगावकरांचे आयुष्य काठिण्यातून घडलेले होते. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण संस्कृत पाठशाळेत झालेले होते. धर्मशास्त्र, ज्योतिष व पंचांग या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेली कामगिरी अनन्यसाधारण अशीच आहे. जयंतराव साळगावकर म्हणजे कालनिर्णय दिनदर्शिका हे समीकरण महाराष्ट्राच्या भावजीवनात इतके खोलवर रुजलेले होते की, जवळजवळ सर्वच मराठी कुटुंबांच्या घरात त्यांच्या या दिनदर्शिकेने हक्काचे स्थान मिळविले होते.
पंचांग व दिनदर्शिका यांचा सुयोग्य मेळ साधून साळगावकरांनी ‘कालनिर्णय’ दिनदर्शिका तयार केली. पूर्वीच्या काळी विविध कंपन्या इंग्रजी कालगणनेप्रमाणे दिनदर्शिका तयार करीत असत. कालनिर्णय तयार करताना साळगावकरांनी तिचे स्वरूप इंग्रजी महिन्यांनुसारच ठेवले असले तरी मराठी सणवार, परंपरा, साहित्य, खाद्यपदार्थ यांच्याविषयी उत्तम माहिती देणारे लेख या दिनदर्शिकेच्या पानांच्या मागील बाजूस छापण्याची प्रथा सुरू केली. मराठी मानसिकतेला रुचेल, पचेल असे स्वरूप असलेल्या या दिनदर्शिकेचे ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ या वाक्याने घराघरात स्वागत होऊ लागले. कालनिर्णय कालांतराने नऊ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले.संबंधित भाषिकांची जीवनशैली व प्रथा यांचा मेळ घालणाऱया कालनिर्णयचा खप काही कोटी प्रतींच्या घरात गेला. कालनिर्णयला इतके मोठे व्यावसायिक यश मिळण्यामागे जयंतराव साळगावकर व त्यांच्या पुत्रांची दूरदृष्टी व अफाट मेहनत कारणीभूत होती.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा पारंपरिक ज्योतिष कथनपद्धतीवर विश्वास होता. त्यानुसारच त्यांनी कालनिर्णय दिनदर्शिकेची रचना केली होती. धनुर्धारी मासिकात मालवणचे वसंत लाडोबा म्हापणकर हे प्रख्यात ज्योतिषी वार्षिक भविष्य लिहीत असत. त्यांचे भविष्य विलक्षण लोकप्रिय होते. म्हापणकरांच्या शैलीचा साळगावकरांवर मोठा प्रभाव होता.
साळगावकरांना धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक विषयांमध्ये त्यांना विलक्षण रस होता. त्यांचे या विषयांवरील दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. देवदेवता आणि संतसाहित्याच्û त्û गाढे अभ्यासक होत्û. ज्ञान्ûश्वर, तुकोबा यांच्यापासून रामदासस्वामींपर्यंत अन्ûक संतांविषयीच्या माहितीचा संदर्भकोश त्यांनी लिहिल्ûला आहे. गणेश हे त्यांचे आराध्यदैवत होते. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करण्याच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साधारण तीन दशकांच्या काळात या गणेशोत्सवामध्ये अनेक कुप्रथा निर्माण झाल्या. रोंबासोंबा नृत्याविष्काराने गणेशोत्सव साजरे होऊ लागले. गणेशोत्सवामागील मूळ हेतू लोप पावत चालल्याचे पाहून अस्वस्थ झालेल्या साळगावकरांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणून या उत्सवाचे विधायक रूप कायम राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही लाभले.
जयंतराव साळगावकर यांची साहित्यसंपदाही मोठी आहे. सुंदरमठ (रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी), देवा तूचि गणेशु (श्रीगणेशाचा इतिहास आणि स्वरूप), धर्म-शास्त्रीय निर्णय या ग्रंथांचे संपादन व लेखन साळगावकर यांनी केले होते. सगुण-निर्गुण, देवाचिये द्वारी, दूर्वाक्षरांची जुडी, गणाधीश जो ईश, रस्त्यावरचे दिवे, भाव तोचि भगवंत असे त्यांचे अनेक ग्रंथही वाचकप्रिय ठरले होते.
पारंपरिक पंचांगांमध्ये असलेल्या अनेक गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत. त्या काढून टाकून पंचांग बनविली गेली पाहिजेत अशी ठाम भूमिका साळगावकरांनी घेतलेली होती. सोलापूरचे पंडित धुंडिराजशास्त्राe दाते यांच्यानंतर सर्वात महत्त्वाचे पंचांगकर्ते म्हणून साळगावकर यांच्याकडे पाहिले जात होते. ज्योतिषशास्त्रातील एखाद्या मुद्दय़ावर ज्योतिषांमध्ये काही तात्त्विक मतभेद झाले तर त्यावर साळगावकरांनी सुचविलेला तोडगा अंतिम मानला जात असे. मराठी उद्योजकांनी स्वबळावर पुढे आले पाहिजे हा विचार मनाशी बाळगून मराठी व्यापारी पेठेचे आयोजन करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यात साळगावकर अग्रभागी होते. हिंदू धर्माविषयी त्यांना अभिमान जरुर होता पण त्यातील अनिष्ट प्रथांचे समर्थन त्यांनी कधीही केले नाही. देशातील अन्य धर्मांविषयीही त्यांची भूमिका सहिष्णुतेची होती. साहित्य, कला यांच्यात विलक्षण रस असलेले जयंतराव प्रभावी वक्तेदेखील होते. अनेक सामाजिक उपक्रमांना साळगावकरांनी उदारहस्ते मदत केली होती. पण ते बऱयाचदा गुप्तदान असे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाशी विलक्षण समरस झालेले जयंतराव साळगावकर एक चालताबोलता सांस्कृतिक कोशच होते. त्यांना ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा ठाऊक होत्या. माणसांनी ज्योतिषशास्त्रावर अवलंबून राहू नये असे ते नेहमी सांगत. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या निधनाने आता हे भविष्यही पोरके झाले आहे!

No comments:

Post a Comment