Wednesday, March 12, 2014

तीन पिढय़ांचा प्राण (प्राण यांच्या निधनानंतर १३ जुलै २०१३ रोजी दै. दिव्य मराठीने प्रसिद्ध केलेले विशेष पान. ज्यात मी प्राण यांच्याविषयी प्रमुख लेख लिहिला व पानातील बाकीच्या मजकूराचे संकलनही मीच केले होते.




हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकी भूमिकांचे बेताज बादशहा व प्रख्यात अभिनेते प्राण यांचे २०१३ साली निधन झाले. प्राण यांच्या कामगिरीचा वेध घेणारे विशेष पान दै. दिव्य मराठीने १३ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यातील तीन पिढ्यांचा प्राण हा मुख्य लेख मी लिहिला होता व अन्य लेख व चौकटी यांचे संकलन सर्व मजकूराचे संकलनही केले होते. त्या पानाची जेपीजी फाईल व तो मजकूर इथे दिला अाहे.
-----------
तीन पिढय़ांचा प्राण
----------------
- समीर परांजपे
-------------

प्राण यांनी चाळीस वर्षांच्या आपल्या रूपेरी कारकीर्दीत एका घराण्यातील अनेक कलावंतांच्या पिढय़ा पाहिल्या. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील काही आगळी वैशिष्टय़ांचा वेध घेणारा हा लेख.
-------
सुनील दत्त व नूतन यांचा खानदान’ १९६५ साली पडद्यावर आला होता. या खानदानच्या आधी खानदानया नावाचे दोन चित्रपट पडद्यावर आले होते. या दोन खानदानपैकी १९४२चा खानदानहा प्राणचा चित्रपट. या चित्रपटात ते नायक होते व १९६५च्या खानदानमध्ये खलनायक. प्राण यांच्या चित्रपटांचा विचार करताना एकाच नावाने दोनदोनदा निर्माण झालेले अजून काही चित्रपट आठवतात. एक चित्रपट १९५६चा आनबान. अजितने यात नलिनी जयवंतबरोबर नायकाची भूमिका केली होती. प्राण या चित्रपटात दोघांसमोर खलनायक म्हणून उभे ठाकले होते. त्यानंतर १९७२ला आनबान नावाचा आणखी एक चित्रपट आला. या आनबानमध्ये राजेंद्रकुमार व राखी यांच्यासमोर प्राण यांनी एक चरित्रभूमिका केली होती.
१९५५ला शेखर आणि नलिनी जयवंत यांची भूमिका असलेला एक चित्रपट आला होता चिंगारी. १९८९ला याच नावाचा आणखी एक चित्रपट आला होता. १९५५च्या चिंगारीतील शेखर व नलिनी जयवंत यांचा जमाना तेव्हा संपला होता पण प्राण यांचा जमाना मात्र संपला नव्हता. यामुळे शेखर व नलिनी जयवंत यांच्या जमान्याला मागे टाकून १९८९च्या चिंगारीमध्ये संजय खान व लीना चंदावरकर यांच्याबरोबरही प्राण यांनी भूमिका केली होती. १९५८ला एक चित्रपट आला होता राजतिलक. वैजयंतीमाला, पद्मिनी व जैमिनी गणेशन यांची या चित्रपटात भूमिका होती. त्यांच्यासोबत प्राण या चित्रपटात होते. त्यानंतर 1१९८४ला अजून एक राजतिलक आला होता. वैजयंतीमाला, पद्मिनी यांचा जमाना तेव्हा संपलेला होता पण प्राण यांचा जमाना संपला नव्हता. धर्म़ेंद्र, हेमामालिनी, रीना रॉय यांच्याबरोबर १९८४च्या राजतिलकमध्ये ते होते.
प्राण यांनी दोनदोन चित्रपटांत त्यांनी केलेल्या एकाच भूमिकेच्या काही आठवणी अशाच स्मरणीय आहेत. १९४२ला खानदान हा प्राण याचा चित्रपट आला. तो लाहोरला निर्माण झाला होता. फाळणीनंतर प्राण १९४८ साली भारतात आले. आल्याआल्याच गृहस्थी या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि गृहस्थीबरोबरच बरसात की एक रात, विरहन, चुनरिया, जिद्दी हे त्यांचे चित्रपट आले. या चित्रपटांपैकी बरसात की एक रात, बिरहन हे त्यांचे चित्रपट फाळणीच्या आधी पाकिस्तानात निर्माण झाले होते. आणि पाकिस्तानी चित्रपट हिंदुस्थानात येऊन येथे प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांत ते नायक होते. पण लाहोरहून मुंबईला आल्यानंतर मुंबईतील चित्रपटांनी मात्र लाहोरच्या चित्रपटांतील नायकाचा चेहरा एकदम पुसून टाकला. आणि त्यांना खलनायकाचा चेहरा दिला.
१९४८च्या जिद्दी’, ‘गृहस्थीचुरनियाया तीन चित्रपटांतून मुंबईच्या चित्रपटांतील त्यांच्या खलनायकाची वाटचाल येते सुरू झाली. या वाटचालीत आपल्या खलनायकाला अन्य कोणाचाही पर्याय सापडू नये असा आपला एक डरावना चेहरा त्यांनी येथे निर्माण केला होता. यामुळेच 1948चा गृहस्थीहा चित्रपट १९६३ साली घर बसा के देखोया नावाने नव्याने निर्माण झाला तेव्हा तिवारी, बी. एम. व्यास, मदनपुरी, अन्वर हुसेन, सिद्धू यांसारखे काही खलनायक आपल्या चित्रपटात उदयाला आले असले तरी या चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर साहू यांच्या डोळ्यांसमोर या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी यापैकी एकाही खलनायकाचा चेहरा आला नाही१९४८च्या गृहस्थीमधील प्राण यांच्या खलनायकाचा चेहराच त्यांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा आला आणि या भूमिकेत १९६२च्या घर बसा के देखोमध्ये त्यांनी त्यांना पुन्हा रिपीट केले. त्यांचे हे रिपिटेशन म्हणजे त्यांच्या एका गाजलेल्या भूमिकेचा त्यांनी दिलेली आणखी एक रिटेक होता.
प्राण यांनी आपल्या एका गाजलेल्या भूमिकेचा असाच आणखी एक रिटेक दिला१९५१ला त्यांचा एक चित्रपट आला होता. ‘मालकीन’. त्या काळातला आपल्या चित्रपटातला एक हास्यअभिनेता गोप या चित्रपटाचा निर्माता होता१९४९च्या पतंगाया चित्रपटानंतर त्याची व याकूबची जोडी आपल्या चित्रपटातील एक विनोदी जोडी म्हणून चांगलीच लोकप्रिय ठरली होती. आपल्या या जोडीची लोकप्रियता कॅश करण्यासाठी गोपने आपल्याबरोबर याकूबलाच घेऊन हा चित्रपट निर्माण केला होता आणि त्या दोघांबरोबर प्राण यांनी या चित्रपटात खलनायक रंगविला होता. त्या काळात हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. गोपचे बंधू राम कमलानी यांनी १९६६ साली हा चित्रपट बिरादरीया नावाने नव्यानेच निर्माण केला. गोप या याकूब हे दोघेही तेव्हा आपल्यात राहिलेले नव्हते. यामुळे मालकीनमधील त्यांची जागा बिरादरीत मेहमद व कन्हैयालाल यांनी घेतली होती. पण प्राण यांच्या खलनायकाची जागा घेणारा अन्य कोणीही कलावंत तेव्हाही आपल्या चित्रपटात नव्हताच. यामुळे मालकीनमधील दुर्गा खोटे, सज्जन, नुतन यांची जागा बिरादरीत ललिता पवार, शशी कपूर, फरियाल यांनी घेतली असली तरी प्राण यांची जागा मात्र कोणाला घेता आली नव्हती. ‘मालकीनमधील आपल्या भूमिकेचा आणखी एक रिटेल त्यांनी बिरादरीत दिला होता.
प्राण यांनी चाळीस वर्षांच्या आपल्या रूपेरी कारकीर्दीत एका घराण्यातील अनेक कलावंतांच्या पिढय़ा पाहिल्या. महाराष्ट्र शासनाने त्यांना राज कपूर पुरस्कार देऊन प्राण यांना सन्मानित केले आहे, पण १९३९ला यमलाजटया पंजाबी चित्रपटाद्वारा चित्रपट व्यवसायातील प्राण यांची वाटचाल सुरू झाली, तेव्हा राज कपूरचा उदय चित्रपट व्यवसायात झालेला नव्हता. तो जमाना राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर यांचा होता. यांच्याबरोबर प्राणनी राजकुमारमध्ये भूमिका केली होती.
१९४७ला कपूर घराण्यातील दुसऱया पिढीची वाटचाल राज कपूरबरोबर आपल्या चित्रपटात सुरू झाली. या वाटचालीत राज कपूरपाठोपाठ शम्मी कपूर व शशी कपूर हे कपूर घराण्यातील आणखी दोन कलाकार चित्रपटांत उदयाला आले. प्राणनी कपूर घराण्यातील या दुसऱया पिढीचा जमानादेखील पाहिला आणि या पिढीबरोबर काही चित्रपटात भूमिकादेखील केल्या. राज कपूरबरोबर ते आह’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘चोरीचोरीयासारख्या काही चित्रपटात चमकले. ‘बॉबीत त्याच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी भूमिका केली. शम्मी कपूर यांच्या ऍन इव्हिनिंग इन पॅरिस’, ‘ब्रह्मचारीयासारख्या अनेक चित्रपटांत प्राण यांनी खलनायक रंगविला होता. ‘तुमसा नाही देखात शम्मी कपूरबरोबरची प्राण यांची खलनायकगिरी खऱया अर्थाने सुरू झाली. नासीर हुसेन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटाची कथा त्यांनी त्यानंतर जब प्यार किसीसे होता है’, ‘फिर वही दिल लाया हूँया चित्रपटात रिपीट केली. ती रिपीट करताना तुमसा नहीं देखातला शम्मी कपूरचा नायक या दोन्ही चित्रपटांत त्यांनी बदलला होता. ‘तुमसा नही देखातल्या शम्मी कपूरच्या नायकाची जागा जब प्यार किसीसे होता हैमये देव आनंदने घेतली होती, तर फिर वही दिल लाया हूँत जॉय मुखर्जीने. पण नायक बदलताना तुमसा नहीं देखातला प्राण यांचा खलनायक काही नासीर हुसेननी या दोन्ही चित्रपटात बदलला नव्हता. ‘तुमसा नही देखामधील शम्मी कपूरबरोबरचा आपला खलनायक प्राण यांनी जब प्यार किसीसे होता हैमध्ये देव आनंद व फिर वही दिल लाया हूँमध्ये जॉय मुखर्जीबरोबर जसाच्या तसा साकार केला.
१९६१च्या चार दीवारीपासून शशी कपूरने नायक म्हणून आपली वाटचाल तेथे सुरू केली. त्याच्या या वाटचालीत प्राणनी बिरादरी’, ‘चोरी मेरा काम’, ‘शंकरदादा’, ‘दो मुसाफिर’, ‘फाँसीयासारख्या काही चित्रपटांत त्याच्याबरोबर भूमिका केली. पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर प्राण राज, शम्मी व शशी या कपूर घराण्यातील दुसऱया पिढीबरोबर येते भूमिका करीत असताना रणधीर, ऋषी व राजीव या राजपुत्रांची कपूर घराण्यातील तिसऱया पिढीची वाटचाल सुरू झाली. १९७३चा रिक्शावालारणधीर कपूरने नायकाची भूमिका केलेला कल, आज और कलनंतरचा दुसरा चित्रपट. या चित्रपटात प्राण त्याच्याबरोबर होते. ऋषी कपूरचा पहिला चित्रपट बॉबी’ १९७३ला रिक्शावालाबरोबर पडद्यावर आला होता. त्यातही प्राण होतेच. त्यांचा एकमात्र अपवाद वगळता कपूर घराण्यातील तीन पिढय़ांबरोबर भूमिका करायचे हे भाग्य अन्य कोणाही अभिनेत्याला येते लाभले असेल असे वाटत नाही. यामुळे तीन पिढय़ांचा प्राण अशीच प्राण यांची ओळख आपल्याला करून द्यावी लागेल.
तीन पिढीतील कपूरांच्याबरोबर भूमिका करीत असताना चित्रपट व्यवसायातील काही घराण्यांच्या दोन-दोन पिढय़ाही त्यांनी पाहिल्या आणि या दोन पिढय़ांच्याबरोबर भूमिकाही केल्या. प्राण यांच्याबरोबर भूमिका करणाऱया दोन  पिढय़ांतील कलावंतांचा विचार करत असताना हमखास आठवते ती चित्रपट व्यवसायातील मायलेकीची एक जोडी, नस्सीम व सायराबानोची. या जोडीतील लेकीचे म्हणजे सायराबानूचे जंगली’, ‘झुक गया आसमान’, ‘आयी मिलन की बेला’, ‘आदमी और इन्सानयासारखे काही जुने चित्रपट आजही टीव्हीच्या निरनिराळ्या चॅनल्सवरून अधूनमधून दाखवले जातात. त्यामुळे आजच्या पिढीतील प्रेक्षकांनादेखील ती तशी माहीत आहे. हेच आपल्याला तिची आई नस्सीमबानू हिच्या बाबतीत काही म्हणता येणार नाही. कारण तिच्या चित्रपटांपैकी 1१९३९चा पुकारहा एकदम जुना चित्रपट वा १९५७चा नौशेरवान--आदिलहा शेवटचा चित्रपट अधूनमधून टीव्हीच्या एखाद्या चॅनेलवर दाखवला जातो. कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यातील या चित्रपटाविषयी आजच्या पिढीतील प्रेक्षकांना अजिबात आकर्षण वाटण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही पिढी या चित्रपटाकडे ढुंकूनही पाहत नाही. नस्सीमबानूचे नाव यामुळेच आजच्या पिढीतील प्रेक्षकांना माहीत असण्याची शक्यता नाही. पण चाळीस-पन्नासच्या दशकात ती आपल्या चित्रपटातील एक सौंदर्यसम्राज्ञी होती. तिच्या या सौंदर्यसम्राज्ञीपदाच्या युगातच प्राण यांनी आपल्या चित्रपटात व्हिलनगिरी सुरू केली. तिची भूमिका असलेल्या सिंदबाद दे सेलर’, ‘बागीया चित्रपटांत त्यांनी व्हिलन रंगवला.
पन्नासच्या दशकात मेहमूदचे वडील मुमताजअली आपल्या चित्रपटातील एक हास्यअभिनेते होते. प्राणनी पन्नासच्या दशकात संगीताया चित्रपटात त्यांच्याबरोबर भूमिका केली व साठच्या दशकात बिरादरी’, ‘साधू और सैतानयासारख्या काही चित्रपटांत मेहमूदबरोबर, ‘मिस इंडिया’, ‘अदालत’, ‘चोरी चोरीया चित्रपटांत ते नर्गीसबरोबर व्हिलन म्हणून दिसले. तर कुंदन’, ‘खानदान’, ‘मिलनयासारख्या काही चित्रपटांत तिचे पती सुनील दत्त यांच्याबरोबर त्यांनी व्हिलनगिरी केली. ‘मेरा फैसला’, ‘मोहब्बत के दुश्मनया चित्रपटात संजय दत्तबरोबर भूमिका करून प्राणनी आपली वाटचाल चालूच ठेवली. ‘नया जमाना’, ‘झील के उस पार’, ‘जुगनूयासारख्या काही चित्रपटात त्यांनी धर्म़ेंद्रबरोबर भूमिका केली आणि त्यानंतर पाप की दुनिया’, ‘निगाहेया चित्रपटात धर्म़ेंद्रपुत्र सनीबरोबरदेखील, वयपरत्वे प्राण यांची ही वाटचाल आता थांबलीच, तरीही कपूर घराण्यातील तीन पिढय़ांबरोबर भूमिका केल्यावर या व्यवसायातील अनेक घराण्यांतील दोन पिढय़ांबरोबर भूमिका करणारा अभिनेता म्हणून याची दखल आपल्याला घ्यावीच लागेल.
-------
प्राण यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी
------------------
                          बेईनाम
१९७१                 मोस्ट आऊटस्टँडिंग सपोर्टिंग                      लायन्स क्लब ऑफ मुंबई (कुलाबा)
                          ऍक्टर ऑफ १९७२
१९७२                 बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर ट्रॉफी                          क्रिस्टल असोसिएशन
                          फॉर बेईमान
१९७२                बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर                                  फिल्मफेअर
                          फॉर बेईमान (प्राण रिफ्युज टू
                          ऍक्सेप्ट धिस ऍवॉर्ड)
१९७२-७३            बेस्ट कॅरेक्टर आर्टिस्ट ऍवॉर्ड                       चित्रलोक सिने सर्कल (अहमदाबाद)
१९७३                  बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर                                  लायन्स क्लब ऑफ मुंबई (कुलाबा हिल)
१९७३                 ऍक्टर ऑफ द इयर                                     फिल्मगोअर्स असो.
                          एव्हरेस्ट ऍवॉर्ड
१९७३                 बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर फॉर जंजीर                  बंगाल फिल्म जर्नालिस्ट असो. (कलकत्ता)
१९७३             बेस्ट ऍक्टर हत सीन डेकेट
                          फॉर जंजीर                                                उत्तर प्रदेश फिल्म जर्नालिस्ट असो.
१९७४                ए परफेक्ट ऍक्टर                                       फिल्मगोअर्स असो.
१९७४                 बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर                                  शामा-सुषमा
                          फॉर धर्म
१९७४                 आऊटस्टँडिंग सपोर्टिंग ऍक्टर                      लायन्स क्लब ऍवॉर्डस कमिटी
१९७५                आऊटस्टँडिंग सपोर्टिंग ऍक्टर                      लायन्स क्लब ऍवॉर्डस कमिटी
१९७५                बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर                                  मेहंदी (गुजराथी मंथली)
१९७५-७६            मोस्ट र्व्हसटिल ऍक्टर                                मुंबई फिल्म ऍवॉर्ड कमिटी
१९७६                आऊटस्टँडिंग सपोर्टिंग ऍक्टर                      लायन्स क्लब ऍवॉर्डस कमिटी
१९७७-७८            मोस्ट र्व्हसटिल ऍक्टर                                मुंबई फिल्म ऍवॉर्ड कमिटी
१९७८                बेस्ट कॅरेक्टर ऍक्टर                                   नॉर्थ मुंबई जॅसिज्
१९८०                  आऊटस्टँडिंग मोशन फिक्चर
                          परफॉर्मन्स (प्रेझेंट बाय व वाइस
                          प्रेसिडंड ऑफ इंडिया)                                  शिरोमणी ऍवॉर्ड कमिटी
१९८३-८४             बेस्ट कॅरेक्ट ऍक्टर
                          फॉर लालच                                                पंजाबी कला संगम (नवी दिल्ली)
१९८४                  अभिनय सम्राट
                          (किंग ऑफ ऍक्टिंग)                                   ऑल इंडिया फिल्मगोअर्स असो.
१९८४                 एक्स्ट्रॉऑर्डिनरी स्पेशल ऍवॉर्ड
                          ऍज विझार्ट ऑफ ऍक्टिंग                            मुंबई फिल्म ऍवॉर्डस कमिटी
१९८५                  कलाभूषण                                                 पंजाबी कला संगम
१९८७                 आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स ऑफ
                          द डेकेट                                                     नॉर्थ मुंबई जॅसिज्
नॉट                    विजयश्री ऍवॉर्ड (फॉर इनरिचिंग)
नॉट                    हुमन लाइफ ऍण्ड आऊटस्टँडिंग
                          एन्टरटेन्मेंटस                                           इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी
नॉट                    एक्सलंन्स इन इमोटिव्ह आर्ट                      पंजाब असोसिएशन.
नोन
१९९०                  फॉर फिफ्टी इअर्स इन द इंडस्ट्री                   पंजाब असोसिएशन.
१९९०                 कलारत्न ऍवॉर्ड (फॉर इंप्लेटिंग
                          फिफ्टी ग्लोरिअर इअर्स इन
                          सिनेमा                                                     पंजाबी कला संगम
१९९०                 इन रेकगनेशन ऑफ इनव्हॅल्युबल
                          सर्व्हिसेस टू चॅरिट ऍट द सेलिब्रेशन
                          ऑफ द गोल्डन ज्युबली ऑफ हिज
                          सर्व्हिस ऑफ द फिल्म इंडस्ट्री                     साऊथहॉल लायन्स क्लब, लंडन
१९९०                ऑनर फॉर आऊटस्टँडिंग
                          अचिव्हमेंट इन सिनेमा                               स्लोग ब्राऊच कौन्सिल (युके)
१९९१                 अभिनय सम्राट (फॉर कॉन्ट्रब्युशन
                          टू इंडियन सिनेमा फॉर फिफ्टी इअर्स             इंडियन सिनेगोअर्स ऍकॅडमी
१९९२                  आऊटस्टँडिंग कॉन्ट्रब्युशन टू इंडियन
                          फिल्म इंडस्ट्रीज                                         इम्पा (इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडय़ुर्स असो.)
१९९७                  स्पेशल व्हेटरन्स ऍवॉर्ड
                                                              २०००                   व्हिलन ऑफ द मिलेनियम                         हिरो-होंडा स्टारडस्ट
२०००                   आयकॉन ऑफ द मिलेनियम
                          प्राण द व्हर्सटाइल ऍक्टर                             रूपा फिल्मगोअर्स मिलेनियम ऍवॉर्ड
२०००                  लाईफटाईम ऍचिव्हमेंट ऍवॉर्ड
                          फॉर एक्सलन्स इन सिनेमा                         लक्स-झी सिने ऍवॉर्ड
२०००                 लाईफटाईम ऍचिव्हमेंट ऍवॉर्ड                      स्क्रिन
२००१                  पद्मभूषण                                                   भारत सरकार
२००१                  फेलिसिटेशन (ऑन विनिंग द                      द सिने आर्टिस्ट असो.
                          पद्मभूषण)
२००१                  फेलीसिटेश (ऑन द ऑकेजन
                          ऑफ द फॉर्टी-थर्ड बैसाखी
                          सेलिब्रेशन इन मुंबई                                    पंजाब असोसिएशन
------------
परोपकारी गृहस्थ
--------------
प्राण मनाने उदार आणि प्रेमळ, त्यांनी अनेकांना निर्हेतूकपणे मदत केली आहे. निर्माते दिग्दर्शक यांच्यापासून ते स्टंट दृश्य करणारे, फाईटमास्टर, स्पॉट बॉईज्, लाईटमन, एक्स्ट्राज इ. अनेकांना प्राण यांनी मदत केली आहे. तसेच जुन्या जमान्यातील नट आणि वयोवृद्ध चरित्र अभिनेते यांच्या मदतीला ते धावून गेले आहेत. सिने आर्टिस्ट असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातूनही त्यांनी अनेकांना मदत केली. विनोदी अभिनेत्री शम्मी यांनी या संघटनेबद्दल एका मुलाखतीत माहिती दिली होती. ‘द फिल्म (सिने) आर्टिस्ट असोसिएशनही खरेतर कॅरेक्टर आर्टिस्ट असोसिएशन होती. कारण अभिनेत्यांना अनेकदा त्यांचे मानधन मिळायचे नाही. मनमोहन कृष्ण आणि के. एन. सिंग यांच्याप्रमाणेच प्राण हादेखील या संघटनेचे संस्थापक सदस्य होते. बराच काळ कॅरेक्टर आर्टिस्ट असोसिएशन म्हणून या संघटनेने काम केले. चरित्र अभिनेत्याला मान्य केलेले मानधन मिळाले नाही की, ही संघटना निर्मात्यांकडे आग्रह धरी आणि संबंधित चरित्र अभिनेत्याला त्याचे मानधन मिळवून देई. या संघटनेचे प्राण हे अत्यंत सक्रिय सदस्य होते. या संघटनेत त्यांनी खूप काम केले. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर होता. संघटनेच्या निधी उभारण्याच्या अनेक कार्यक्रमांसाठी अनेक कलाकारांचे सहकार्य प्राण मिळवीत असत. त्या काळात जुन्या जमान्यातील कलाकार आणि चरित्र अभिनेते आपल्या भविष्यासाठी काही गुंतवणूक करत नसत. १९६०च्या दशकात राजेंद्रकुमार यांनी आपले उत्पन्न योजनापूर्वक गुंतवले. त्याच्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांचा कित्ता गिरवला. मूक-चित्रपटाच्या काळात आणि बोलपटाच्या आरंभीच्या काळात कलाकारांना व्यावहारिक जाण नव्हती. तसेच आजच्यासारख्या व्यवसायात पैसे गुंतवण्याच्या संधी नव्हत्या. त्यामुळे अनेक कलाकारांची स्थिती शेवटी शेवटी हालाखीची झाली. वृद्धापकाळात अनेकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. उदाहरणार्थ ई. बिलिमोरिया. बिलिमोरिया अनेक मुकपटांचे नायक होते. परंतु रुग्णालयाचा खर्च सोसण्याइतका पैसा त्यांच्याकडं उरला नाही. तसेच मुकपटातील अत्यंत गाजलेली अभिनेत्री सुलोचना (खरं नाव - रुबी मायर्स) हिची शेवटी शेवटी किती दुरवस्था झाली होती हे सर्वज्ञात आहे. सुलोचनाने ती यशाच्या शिखरावर असताना अनेकांना मदत केली होती पण तिची दुरवस्था झाली तेव्हा तिला मदत करायला कुणीच पुढे आले नाही. प्राण यांनी तर काही कलाकारांना व्यक्तिश: मदत केली आहे. यासंदर्भात एक साधा कलाकार फजलू यांचे नाव यासंदर्भात घेता येईल. फजलूच्या निधनानंतर संघटनेने त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या मदतीत वाढ केली. तेव्हाच कुठे प्राण यांनी फजलू व त्याच्या परिवाराला वैयक्तिक मदत देणे बंद केले.
-----
तुम्ही आम्हाला भरभरुन दिलेय...
--------------------
- अमिताभ बच्चन
--------
प्रख्यात अभिनेते प्राण यांचे इंग्रजी चरित्र  बनी रुबेन यांनी ‘...अँड प्राणया नावाने लिहिले. (प्रकाशक - हार्परकॉलिन्स पब्लिशर्स इंडिया; प्रथम आवृत्तीचे प्रकाशनवर्ष - २००५). या चरित्रग्रंथाचा मराठीत ‘...आणि प्राणया नावाने प्रसिद्ध झाला.  (प्रकाशक -चिनार पब्लिशर्स; प्रथम आवृत्तीचे प्रकाशनवर्ष - मार्च २००७) या चरित्रग्रंथामध्ये प्राण यांच्याविषयी  सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी लिहिलेला लेखही समाविष्ट केलेला आहे. त्या लेखातील हा संपादित अंश.
---------
काही अभिनेते हे केवळ आदर वाटण्याजोगे नसतात तर त्याही पलीकडे त्यांच्याबद्दल आपल्याला काही तरी वाटत असते. ते खरे म्हणजे आपलेच प्रतिरुप असतात. आपल्या भल्याबुऱया विचारांचा आविष्कार ते करत असतात. मानसिकदृष्टय़ा गुंतागुंतीच्या भूमिकेपासून अगदी साध्यासुध्या माणसाची ते भूमिका करतात. ते म्हणजे आपलेच मोठे रूप असतात.
अभिनेते आपले मित्र असतात. आपल्या जीवनावर त्यांचे मोठे सावट असते. प्राणसाहेब त्यापैकी एक आहेत. चित्रपटरसिकांच्या अनेक पिढय़ांवर त्यांचा प्रभाव पडला आहे. किंबहुना जवळजवळ अर्धशतक आपल्या प्रेक्षकांशी खूप गूढ, जादूई संवाद या कलाकारांना साधला आहे.
प्राण म्हणजे जीवन. आपल्या अप्रतिम कौशल्याने प्राण यांनी सिनेमाला जीवन दिले आहे. प्रेक्षकांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांनी थरथराट निर्माण केला आणि अखेर दुर्जनाचा विजय होत नसतो हा संदेश दिला. रुपेरी पडद्यावरील खलनायकाची भूमिका हे काही फारसे सुखावह किंवा श्रेय मिळवून देणारे कार्य नव्हे. हे कार्य प्राणसाहेब यांनी स्वीकारले आणि ते इतक्या तन्ममयतेने केले की, अवघ्या देशाला त्यांचा हेवा वाटू लागला. खरोखरच हा त्यांच्या यशाचा मानदंड होताप्राण यांना आपल्या मुलाने भेटू नये असे पालकांना वाटायचे. सार्वजनिक समारंभात कधी कधी प्राण यांना बघून लोकांच्या मनात धडकीच भरायती.
हळूहळू प्राण या गोष्टीला सरावले. चित्रपटाच्या प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याच्या शक्तीने ते प्रभावित झाले. मग या महान कलाकाराने चुटकीसरशी आपल्या अभिनयात बदल केला. तितक्याच कौशल्याने आणि प्रतिभेने ते चरित्रकलाकाराच्या भूमिका साकार करू लागले. त्यातून त्यांचा अष्टपैलूपणाच प्रकट झाला.
1960 सालची गोष्ट असेल. मुंबईला मी काही दिवसांसाठी आलो होतो. ‘मला चित्रपटाच्या शूटिंगला घेऊन जाअशी विनंती मी काही कौटुंबिक दोस्तांना केली होती. आर. के. स्टुडिओमध्ये प्राणसाहेब एका पुत्र्याच्या शेडजवळील खुर्चीवर बसून होते. ते अत्यंत नम्र आणि सौजन्यपूर्वक वागत होते. आमच्याबरोबर त्यांनी फोटो काढू दिला. मी त्यांची स्वाक्षरीही घेतली. घरी आल्यावर मला प्रश्न पडला की, खलनायकाची भूमिका करणारी व्यक्ती इतकी चांगली आणि आतिथ्यशील असू शकते?
आता अर्थातच कलाकार करत असलेली भूमिका आणि त्याचं व्यक्तिमत्त्व यात मी गल्लत करत नाही. त्या दिवशी आर. के. स्टुडिओमध्ये मनमोहन देसाई यांच्या छलियाया पहिल्याच चित्रपटाचे शूटिंग चालू होते. पुढे याच मनमोहन देसाइभच्या अनेक चित्रपटांत मी केलेल्या भूमिका गाजल्या.
काही वर्षांनंतर जेव्हा चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरू करण्यासाठी मी मुंबईला आलो. तेव्हा प्राण यांचे चिरंजीव सुनील (टुण्णी) सिकंद याला कायम भेटत असे. तो माझा भाऊ अजिताभ याचा घनिष्ट मित्र होता. एक अभिनेता म्हणून प्राण यांच्याशी माझा पहिला संबंध आला तो जंजीरच्या सेटवर. तोवर प्राण यांनी खलनायकाच्या भूमिका सोडून चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणे सुरू केले होतं. ‘उपकारचित्रपटातील त्यांची भूमिका अत्यंत गाजली होती. खलनायकाची भूमिका करणाऱयाने सदोदित खलनायकाच्याच भूमिका केल्या पाहिजेत असे काही नाही, हे प्राण यांनी सिद्ध केले. त्यांनी एक प्रकारे धडाच घालून दिला. शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीला आरंभ केला तो नकारात्मक भूमिकांनी; पण नंतर ते सुपर हिरो बनले.
जंजीरच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी पोलीस ठाण्याचे दृश्य होते. संतापून मी शेरखानला शिव्या घालतो असा प्रसंग होता. मी काहीसा चाचरतच होतो; पण जेव्हा मी प्राण यांना पाहिले तेव्हा मला धीर आला. कारण जंजीरमध्ये प्राण यांच्यामुळेच मला भूमिका मिळाली होती. ‘परवानाचित्रपटातील माझे काम पाहून ओमप्रकाश यांनी जंजीरच्या चेन्नईमधील निर्मात्यांकडे माझी शिफारस केली होती. प्राण यांनीदेखील असेच केले होते. ‘जंजीरचित्रपटासाठी कलाकारांची नावे ठरवली जात असताना प्राण यांनी माझ्या नावाला पाठिंबा दिला होता.
प्रकाश मेहरा आणि सलीम-जावेद यांच्याबरोबर जंजीरहा माझा पहिलाच चित्रपट होता. तसा मी चित्रपट उद्योगात नवखा होतो. काहीसा धास्तावलेलाच होतो. प्राण यांनी मला खूप मदत केली. त्यांचे वागणे अगदी सहज, अकृत्रिम होते. खरे तर प्राण हे त्या चित्रपटाचे एक मुख्य आकर्षण होते. स्वत:च्या दिसण्याबाबत त्यांनी जी अत्यंत काळजी घेतली, त्याने मी प्रभावित होऊन गेलो होतो. टोप (विग), दाढी, वेशभूषा या प्रत्येक गोष्टीबाबत त्यांनी फार काळजी घेतली होती. त्यामुळे त्याचा मेकअप अगदी परिपूर्ण झाला होता.
जंजीरमधील त्यांच्याबरोबरची माझी सर्व दृश्ये कठीण होती. मारामारीची अनेक दृश्ये होती. चुकून ठोसा लगावताना त्यांना इजा तर होणार नाही ना, अशी मला भीती वाटायची. एका दृश्यात तर एका दोरीच्या साहाय्याने आम्हाला भिंत चढून जायचे होते. प्राण हे मेकअप, वेशभूषा करून सर्वांच्या आधी सेटवर हजर राहात. आपला शॉट संपला, तरी ते सेटवर थांबून राहात आणि पुढील शूटिंग काळजीपूर्वक पाहत. या चित्रपटात यारी है इमानहे गाणे फार महत्त्वाचे होते. त्या वेळी प्राण यांनी केलेला अभिनय अत्युत्तम होता.
दुसऱया कुणाच्याही कामात प्राण ढवळाढवळ करत नसत. ते कुणाशी वाद घालत नसत. पटकथेतील एखादा प्रसंग किंवा संवाद बदलावा, अशी मागणी ते कधी करत नसत. तसेच त्यांना संतापलेलेही मी कधी पाहिले नाही. ते आपले काम तत्परतेने पुरे करत आणि निघून जात.
गंगा की सौगंधया चित्रपटाचे ऋषिकेश, हरिद्वार आणि जयपूर इथे बाह्य चित्रीकरण झाले तेव्हा त्यांच्या जीवनाचा एक पैलू माझ्या लक्षात आला. त्यांना उर्दू काव्य आणि साहित्य यांची प्रचंड आवड आहे. क्रीडाक्षेत्रातील ताज्या घडामोडींची माहिती त्यांना असते. एके काळी शिकार करण्याचीही त्यांना आवड होती. शेरोशायरी, लोककथा आणि चावट विनोद यांचा खजिनाच त्यांच्यापाशी आहे. रोज संध्याकाळी फिल्म युनिटमधील सगळे जण एकत्र गप्पा मारत बसले की, प्राण शेरोशायरी त्यांच्यासोबत आणि किस्से सांगून मैफल गाजवणार हे ठरलेलेच. शूटिंग संपल्यावर त्यांची सोबत आनंददायी असे. ते रोज संध्याकाळी स्कॉच व्हिस्कीचा आस्वाद घेत. सिगरेट ओढण्याची त्यांची खास लकब होती. रुपेरी पडद्यावर आणि पडद्याबाहेर त्यांची सिगरेट ओढण्याची लकब ही जणू एक ट्रेडमार्कच बनली होती. ज्या कुणी त्यांची रुपेरी पडद्यावरील कामे पाहिली असतील त्यांना प्राण प्रत्येक भूमिकेत छोटय़ा छोटय़ा कल्पक तपशिलांनी रंगत भरत हे लक्षात येईल. उदाहरणार्थ, ‘जिस देश में गंगा बहती हैया चित्रपटातील त्यांनी भूमिका केलेल्या डाकूची गळ्यावरून हात फिरवायची लकब. आपल्या कारकिर्दीत प्राण यांनी आपले डोळे, आवाज, उच्चार पद्धती, चेहऱयाची लवचिकता आणि देहबोली यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून घेतला. कितीही मोठे संवाद असले तरी त्यांना ते तोंडपाठ असते. हे संवाद अनेकदा शूटिंग होण्यापूर्वी काही क्षण आधीच त्यांच्या हातात दिले जाते. आपल्या विलक्षण स्मरणशक्तीच्या जोरावर ते संवाद बिनचूक म्हणत.
मजबूरमधील मायकल या ख्रिश्चन व्यक्तीची भूमिका असो किंवा जंजीरमधील पठाण शेरखानची भूमिका असो अथवा व्हिक्टोरिया नं. 203’मधील दादामुनी अशोककुमार यांच्या बरोबरची विनोदी भूमिका असो किंवा शहीदमधील गुन्हेगाराची भूमिका असो अथवा बॉबीमधील उच्चभ्रू समाजातील एका पित्याची भूमिका असो. ही प्रत्येक भूमिका सजीव करण्यामागे प्राण यांनी अथक परिश्रम घेतले याची कल्पना येते.
प्राण यांच्याबरोबर अमर, अकबर, अँथनी, कसौटी, मजबूत, डॉन, कालिया, नसीब, नास्तिक, शराबी, अंधा कानून, इन्किलाब या चित्रपटांसह अनेक चित्रपटांत काम करण्याची मला संधी मिळाली. ‘नसीबचित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एका फिरत्या उपाहारगृहाचे लोकेशन होते. या दृश्यासाठी प्राण यांनी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले होते. पंधरवडाभर ते सराव करत होते. आमच्या दोघांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट म्हणजे मृत्युदाता.’ त्यात प्राण यांनी एक छोटीशी; पण लक्षणीय भूमिका केली आहे.
प्राण हे काही तत्त्वे पाळणारे कलाकार आहेत. एखाद्या संवादात किंवा प्रसंगात सामाजिक व नैतिकदृष्टय़ा आक्षेपार्ह बाब असेल, तर ते त्यावर तात्काळ भाष्य करत. ते लेखक किंवा दिग्दर्शक यांच्याबरोबर भांडण करण्याचा पवित्रा घेत नाहीत; पण आपल्या मुद्दा तर्कसंगतदृष्टय़ा ठामपणे मांडतात. त्यामुळे प्रत्येक चित्रपट निर्मात्याला प्राण यांचे स्वभाववैशिष्टय़ माहीत आहे. अमुक एका मर्यादेचे बंधन ते पाळतात याची जाणीव आहे. प्राण कधीही अश्लील किंवा अशोभनीय गोष्ट करणार नाहीत हे त्यांना ठाऊक आहे.
प्राण तसे लाजरेबुजरे. केवळ मित्रांच्या आणि समविचारी सहकाऱयांच्या संगतीतच ते रमायचे, खुलायचे. चित्रपटाच्या सेटवर त्यांनी अनेकदा मला मार्गदर्शन केले आहे. एखाद्या चित्रपटात आम्ही दोघेही काम करत असू आणि एखाद्या टेकमध्ये माझे काम सुधारण्यास वाव असला तर ते नम्रपणे म्हणत, ‘गैरसमज करून घेऊ नकोस; पण अमुक अशा पद्धतीने जर हे केलेस तर ते अधिक उठावदार होईल, नाही का?’ माझ्या टेकने त्यांना समाधान झाले की, ते मला शाबासकी द्यायला विसरायचे नाहीत.
प्राण स्वत:चे चित्रपट पाहत नसत, ही जरा आश्चर्याचीच बाब आहे. ‘जंजीरचित्रपट प्रदर्शित झाल्यावर सुमारे वीस वर्षांनी योगायोगाने त्यांनी तो पाहिला. त्यांनी मला फोन केला आणि मला तुझे काम आवडलेअसे सांगितले. वीस वर्षांनंतर का असेना; पण मला त्यांच्या या शाबासकीचे अप्रूप वाटले.
प्राण यांनी अनेक गाजलेल्या बडय़ा कलाकारांबरोबर चित्रपटांतून कामे केली आहेत. मग राम और श्याममधील दिलीपकुमारबरोबरचे काम असो किंवा जब प्यार किसी से होता हैमधील देव आनंदबरोबरचे काम असो; कथानकात त्यांची हार झालेली असली, तरी एक अभिनेता म्हणून त्यांचा विजय झालेला असतो.
अभिनेता म्हणून व्यावसायिक असणे किती महत्त्वाचे आहे, हे मी प्राण यांच्याकडून शिकलो. प्राण एकही दिवस उशिरा आले नाहीत. त्यांनी खराब हवामान आहे म्हणून कधी शूटिंग रद्द केले नाही. एके दिवशी सेटवर ते काहीसे शांत-शांतच बसून होते. ‘आज तुमचे काय बिनसलेय का?’ अशी दिग्दर्शकाने चौकशी केली, तेव्हा प्राण अगदी शांतपणे म्हणाले की, ‘माझ्या बंधूचे थोडय़ाच वेळापूर्वी निधन झाले, पण शूटिंग रद्द होऊ नये अशी माझी इच्छा होती. अखेर जीवनरहाटी चालू राहिली पाहिजे.’
त्यांच्या जवळच्या मित्रांमध्ये सतीश भल्ला आणि यश जोहर यांचा समावेश आहे. प्राण यांच्या आवडी-निवडी शाही आणि रंगेल नाहीत. ते स्वाभिमानाने आयुष्य जगले. कधी कुणाकडे त्यांनी काही खास मेहरबानी करण्याची विनंती केलेली मी पाहिली नाही. किंबहुना ते ठाम निष्ठा आणि मूल्य पाळणारे होते.
त्यांची पात्रता असूनही अनेक अधिकृत सन्मान आणि पुरस्कार त्यांना दिले गेले नाहीत. त्यांच्यासारख्या कलाकाराचे अमेरिका, युरोप व अन्यत्र अमाप कौतुक झाले असत; पण प्राण यांना आपल्या देशात जेवढी मान्यता व सन्मान मिळायला हवा होता तेवढा मिळाला नाही. आशय आणि तंत्र याबाबत चित्रपटात बदल होतील; परंतु भारतीय चित्रपटाच्या इतिहासात प्राण यांनी जे अमूल्य योगदान केले आहे, ते कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. प्राणसाहेब, तुम्ही आम्हाला इतके भरभरून दिले आहे की त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला काहीच दिले नाही. प्राणसाहेब तुम्ही आमचे स्फूर्तिदाते आहात!
----
किस्से प्राणसाहेबांचे...
-------------
हसता हसता पुरेवाट झाली...
------------------
- विनोदी अभिनेता देवेन वर्मा
आ जा मेरी जान (१९९३) या चित्रपटाचं गोव्यात शूटिंग चालू होतं. या गूढ चित्रपटात मी सरप्राईजखलनायक असतो. त्या दिवशीआम्ही बाह्य चित्रीकरण करत होतो. आमच्या पंचतारांकित हॉटेलपासून खूप लांब शूटिंग चालू होतं. अगदी क्लायमॅक्सचं दृश्य होतं. जेव्हा शुटिंगचा गाशा गुंडाळण्यात आला, तेव्हा माझ्या शर्टावर आणि कोटावर फिल्मी रक्ताच्याचिळकांडय़ा उडालेल्या होत्या. मी अगदी थकलेलो होतो आणि मला हॉटेलवर जाऊन स्नान करावंसं वाटत होतं. त्याच अवतारात मी हॉटल गाठलं. हॉटेलच्या लाऊंजमध्ये प्राणसाहेब बसले होते. त्यांना पाहाताच जणू काही आत्ताच कुणी मला गोळी मारली आहे असा अभिनय मी केला. मी प्रॅक्टीकल जोक करतोय हे प्राण यांच्या लक्षात आलं. ते लगेच ओरडले अरे याला कुणीतरी गोळी घातली आहे.’ त्यावेळी काही परदेशी स्त्रिया तिथं बसलेल्या होत्या. त्या किंचाळत इकडे तिकडे पळू लागल्या. प्रसंगच इतका विनोदी होता की, त्यानंतर माझी व प्राणची हसता हसता पुरेवाट झाली.’





No comments:

Post a Comment