Wednesday, February 25, 2015

माझ्या (समीर परांजपे) नव्या सहा इ-बुक्सची मुखपृष्ठे व तत्संबंधी माहिती.



माझी नवी सहा इ-बुक्स फेब्रुवारी २०१५मध्ये न्यूजहंट या इ-बुक्स वेबसाइटवर प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या मुखपृष्ठांची छायाचित्रे पुढे देत आहे.
ही पुस्तके ऑनलाइन वाचकांना
http://ebooks.newshunt.com/Ebooks/
या वेबलिंकवर sameer paranjape असा किंवा माझ्या पुस्तकाच्या नावाने सर्च करुन शोधता येतील. पुस्तके मोबाईलवर किंवा टॅबवर वाचायची असल्यास न्यूजहंट अॅप डाऊनलोड करुन मग तेथे त्या ऑनलाइन पुस्तकाचे पेमेंट करुन ती वाचायला मिळतील.
माझ्या सहा पुस्तकांच्या मुखपृष्ठांची छायाचित्रे याप्रमाणे.






Sunday, February 15, 2015

आत्मरंग लोपला! - आत्माराम भेंडे यांना आदरांजली वाहणारा माझा लेख. दै. दिव्य मराठीच्या १५ फेब्रुवारी २०१५च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला.


ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांना आदरांजली वाहाणारा दै. दिव्य मराठीच्या १५ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा हा लेख. त्या लेखाची टेक्स्ट व इ-पेपर लिंक व जेपीजी फोटो सोबत दिले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-article-on-atmaram-bh…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/15022015/0/6/
---
आत्मरंग लोपला!
---
- समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
----
मराठी रंगभूमीवरील फार्सिकल नाटकांचे आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू हे दोन बादशहा. त्यापैकी बबन प्रभू यांनी यापूर्वीच जगाच्या रंगभूमीचा निरोप घेतलेला. दुसरे बादशहा आत्माराम भेंडे हेदेखील नुकतेच ७ फेब्रुवारी रोजी काळाच्या पडद्याआड गेले. मराठी फार्सिकल नाटकांचा आत्मरंग ख-या अर्थाने लोपला. १९६०-७०च्या दशकांत मराठी रंगभूमीवर नानाविध प्रवाह एकवटलेले होते. त्यामध्ये विजय तेंडुलकर, विजया मेहताप्रणीत वास्तववादी नाटकांचा जसा एक सशक्त प्रवाह होता, तसेच आत्माराम भेंडे, बबन प्रभू आदी मंडळींनी पाश्चात्त्य रंगभूमीवरील फार्सिकल नाटकांनी प्रेरित होऊन तो प्रवाह मराठी रंगभूमीवर अधिक सशक्त करण्याचा जणू विडा उचलला होता.
सावंतवाडी संस्थानमधील आरोंदे हे आत्माराम भेंड्यांचे गाव असले, तरी त्यांच्या पूर्वजांची पाळेमुळे ही गोव्याच्या भूमीतच होती. गोव्यामधील कलाकार, गायक आदी सा-या देशभर आपले नाव गाजवत होते. कलेचा हा सुदूर वारसा घेऊनच आत्माराम भेंडे हे लहानपणी आपल्या आई व भावंडांसमवेत मुंबईत आले. १९३०-४०च्या दशकातील मुंबई ही एकीकडे गो-या साहेबाने दिलेल्या कलावारशाचा आनंद उपभोगत होती. दुस-या बाजूला मुंबईत नोकरीधंद्यासाठी आलेला गावोगावचा मराठी माणूस नाटक, चित्रपट आदी कलांतून आपल्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देऊ लागला होता. या सा-याचा परिणाम आत्माराम भेंडे यांच्यासारख्या नाटकप्रेमी माणसावर होणारच होता. कोकणी, मराठी, इंग्लिश, हिंदी अशा चारही भाषा अगदी लहानपणापासूनच परिचित असलेल्या भेंडे यांनी पुढे मराठी, इंग्लिश, हिंग्लिश रंगभूमी गाजवली, ती बहुसांस्कृतिक मूल्याधारित संस्कारांच्या बळावरच... आत्माराम भेंडे यांच्या अभिनयशैलीबद्दल त्यांचे समकालीन अभिनेते आवर्जून सांगत की, भेंडे यांना जबरदस्त टायमिंग सेन्स होता आणि मुद्राभिनयातील कसब वाखाणण्यासारखे होते. भेंडे असे कलाकार होते की, जे विनोदी व गंभीर, खलनायकी वळणाची भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारायचे. कोणतीही भूमिका करताना त्यांच्यातील दिग्दर्शक व कोणतेही नाटक, मालिका दिग्दर्शित करताना त्यांच्यातील अभिनेता जागा असायचा. याचा दुहेरी फायदा त्या कलाकृतीला होत असे.
इंडियन नॅशनल थिएटर या नामवंत संस्थेतून आत्माराम भेंडे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आयएनटीमधून भेंडे यांनी विविध प्रकारच्या नाटकांत कामही केले, आणि काही नाटके दिग्दर्शितही केली. ख्यातनाम साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या तीन एकांकिका एकत्र करून 'वेड्यांचा चौकोन' हे एक नाटक लिहिले होते. या नाटकातील विनोद फार्सिकल पद्धतीचा आहे, असे गंगाधर गाडगीळांनी या नाटकाच्या निवेदनात आवर्जून लिहिले होते. आयएनटीमध्ये सक्रिय असणा-या आत्माराम भेंडे यांनी काही कारणास्तव हे नाटक भारतीय विद्याभवनच्या मराठी विभागातर्फे करायला घेतले. ‘सशाची शिंगे’ या आयएनटीकडून केलेल्या नाटकानंतर लगेचच 'वेड्यांचा चौकोन' हे नाटक करायला मिळणे, ही आत्माराम भेंडे यांना सुर्वणसंधीच वाटली होती. १९५८मध्ये इंडियन नॅशनल थिएटरतर्फे ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे नाटक करताना प्रेक्षकांना एक ध्वनिमुद्रित निवेदन ऐकविले जाई. ‘अभिनेते गणपतराव जोशी करीत असत त्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ या फार्सचा उल्लेख करून फार्सची मराठी रंगभूमीवरील परंपरा खंडित होऊ नये, म्हणून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा आमचा प्रयत्न आहे', असे आत्माराम भेंडे या निवेदनात आवर्जून सांगत असत. शिवाय या नाट्यप्रकाराला भेंडे यांनी नाटक म्हणण्याचे टाळले. सुरुवातीपासूनच त्याचा फार्स असा उल्लेख केला. त्यानंतर आत्माराम भेंडे यांनी गाजविलेले नाटक म्हणजे, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई.’ जसे चित्रपटात सिक्वेल काढला जातो तसेच "झोपी गेलेला जागा झाला' या नाटकाचा ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हा सिक्वेल होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दिनूच्या सासूबाई राधाबाई करताना प्रमुख पात्रांची नावे ‘झोपी...'तीलच घेतलेली होती, इतकेच नव्हे तर काही ठिकाणी कथानकातही हे तेच लोक आहेत, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. १९७३च्या ऑगस्ट महिन्यामध्ये आत्माराम भेंडे यांनी पूर्णिमा या संस्थेतर्फे ‘पळा पळा कोण पुढे पळे तो' हा फार्स सादर केला. "पिलूचं लग्न' हा फार्सही असाच गाजला.
आत्माराम भेंडे यांचे व्यक्तिमत्त्व केवळ कलाकार, दिग्दर्शकाचेच नव्हते, तर या नाट्यसाधनेसाठी ते नेटके वाचनही करीत. नाट्यशास्त्रात खूपच मोलाची समजली जाणारी रशियन नाट्यतज्ज्ञ स्टानिस्लाव्हस्की यांची पुस्तके वाचून भेंडे त्यावर मनन-चिंतन करीत असत. भूमिकेत अवहगान करण्याबाबत स्टानिस्लाव्हस्की याने केलेल्या विश्लेषणाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आत्माराम भेंडे यांनी केलेली चिकित्सक झटापट हा त्यांच्यातील अभ्यासकाचा आविष्कार होता. फार्सिकल नाटके हा त्यांच्या रंगाभिनयाचा एक आविष्कार होता. त्याशिवाय मन पाखरू पाखरू, प्रिती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी अशा नाटकांमधून भेडेंनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. हिंदी, मराठी, हिंग्लिश नाटकांमधून भेंडे नव्या पिढीबरोबर तितक्याच ताकदीने उभे राहिले. भरत दाभोळकर यांच्या हिंग्लिश नाटकांत कामे करताना बहुसांस्कृतिकत्वाचा बाज भेंडेंनी ज्या अचूक रीतीने पकडला होता, त्याला तोड नव्हती. त्यांच्या या आविष्काराची आठवण दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान यांच्यासारखी मंडळी आजही काढतात. आत्माराम भेंडे यांनी दूरदर्शनसाठी काही मालिकांचे दिग्दर्शन केले होते. गेल्या काही वर्षांत जाहिरातपटांमध्ये त्यांनी केलेली कामे, आजच्या पिढीलाही आवडली होती. 'यंदा कर्तव्य आहे' या सिनेमात त्यांनी आजोबांची छोटेखानी भूमिका एकदम चोख बजावली होती. "लगे रहो मुन्नाभाई' या हिंदी सिनेमात त्यांनी साकारलेला 'आत्माराम' सा-यांच्याच काळजाला भिडला होता.
आत्माराम भेंडे यांनी आपले नाट्यजीवन व जीवननाट्याविषयी 'आत्मरंग' या आत्मचरित्रात सविस्तर सांगून ठेवलेच आहे. त्यांनी दिग्दर्शन, भूमिका केलेली नाटके, चित्रपट, मालिका, जाहिराती यांची यादी खूप मोठी आहे. कारण, तो सहा दशकांतील त्यांच्या कामगिरीचा व्यापक पट आहे. पण तरीही भेंडेंचा आत्मा एकरूप झाला होता तो अधिकतर नाटकांशीच... आपण नाटक का करतो, हे सांगताना भेंडे म्हणायचे, "समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारी आधुनिक नाटके व इतर नाट्यप्रकार आधुनिक तंत्राने, फायद्याकडे दृष्टी न ठेवता, शक्यतो निर्दोष स्वरूपात रंगभूमीवर आणण्याचा माझा संकल्प असायचा. नाटक हे जनताभिमुख झाल्यासच जनतेचा त्याला आश्रय मिळेल, असा विश्वास आहे. नाट्यप्रकाराचे वेगवेगळे नमुने प्रेक्षकांसमोर ठेवून त्यांचे लक्ष रंगभूमीकडे वेधणे, हा माझा हेतू आहे.' हे नाट्यतत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनातही मुरवलेले आत्माराम भेंडे यांच्या जाण्याने रंगभूमीभक्तांचा आत्मरंग आता लोपला आहे!

Tuesday, February 3, 2015

भारतीय मुशीतला राजकीय विचारवंत रजनी कोठारी - दै. दिव्य मराठीच्या ३ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख.



प्रख्यात राजकीय विचारवंत रजनी कोठारी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचा कार्याचा आढावा घेणारा लेख मी दै. दिव्य मराठीच्या ३ फेब्रुवारी २०१५च्या अंकात मी लिहिला आहे. त्या लेखाची जेपीजी फाईल, टेक्स्ट व वेबपेज लिंक व मजकूर खाली दिला आहे.
----
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/03022015/0/6/
----
भारतीय मुशीतला राजकीय विचारवंत
--------
-समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
---
स्वातंत्र्यपूर्व भारत व स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय स्थिती तसेच राजकीय प्रवाहांची अचूक जाण असणारे जागतिक कीर्तीचे राजकीय विश्लेषक रजनी कोठारी यांच्या निधनामुळे या अभ्यास क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विविध जाती, पंथ, धर्म यांच्यात विभागला गेलेला अन् तरीही एकसंध असलेला भारतीय समाज ही राजकीय विषयांचे अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार यांच्या दृष्टीने खूप अजब अशीच गोष्ट आहे. कोणत्याही समाजवर्तनाला एकच एका सूत्रात बांधणे शक्य होत नाही. विविध क्षेत्रांतील घटनांची प्रतिक्रिया व परिणाम होऊन समाजाचे मत तयार होत असते.
बर्‍याचदा समाज हिणकस व उदात्त असे दोन्ही मतप्रवाह उराशी बाळगून मार्गक्रमण करीत असतो. या वर्तनाला भारतीय समाजही अपवाद नाही. मात्र भारतीय समाजाच्या प्रगतीत वा अधोगतीत येथील विविध जात, धर्म, पंथ असे अनेक घटक आपापली भूमिका बजावत असतात. त्यामुळे भारतीय मुशीचे राजकारण अमेरिका, युरोपीय देशांपेक्षा वेगळे आहे.
भारतीय समाजाच्या राजकीय वर्तनाचे नेमके आकलन रजनी कोठारी यांना झालेले होते. हस्तिदंती मनोर्‍यात बसून सखोल विचार करणार्‍या विचारवंतांचे एक जग आहे आणि त्यांचा पवित्रा काही प्रमाणात बरोबरही आहे. याचे कारण लोकांत फार मिसळल्याने आपल्या विचारांतील तटस्थता गमावण्याचा धोका अशा मनोवृत्तीच्या विचारवंतांना नेहमी वाटत असतो. लोकांत मिसळणारे व लोकांपासून विलक्षण अलिप्त राहणारे या दोन्ही प्रकारच्या विचारवंतांमधील मध्यममार्ग राजकीय तज्ज्ञ रजनी कोठारी यांना पसंत होता. केवळ लोकानुनयी धोरणे, लोकभावना यांचाच अभ्यास करून कोणताही राजकीय सिद्धांत मांडता येत नाही, तर विविध कालखंडात साधर्म्य वाटणार्‍या परिस्थितीत समाज राजकीयदृष्ट्या त्याच त्याच पद्धतीने वागला का, त्यातून राजकारणाने कुठले वळण घेतले याचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे रजनी कोठारी यांना महत्त्वाचे वाटत असे.
राजकीय प्रवाह व समाजाचा विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने त्यांचा एकत्रित अभ्यास व्हावा, असेही त्यांचे मत होते. त्यातूनच रजनी कोठारी यांनी ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ (सीएसडीएस) ही संस्था स्थापन केली होती. समाजशास्त्र व मानव्यशास्त्रांमध्ये प्रगत संशोधन करण्यासाठी ही संस्था त्यांनी उभारली होती. रजनी कोठारी यांचा पिंड हा कार्यकर्ता विचारवंताचा होता. अभ्यासकाच्या विचारमांडणीला एक शिस्त व परीघ असतो. त्या परिघाच्या बाहेरही अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा विचार अभ्यासकाने निराळ्या अंगाने करणे अपेक्षित असते. तिथे त्याचे कार्यकर्तापणही कामाला येते. रजनी कोठारी यांनी स्थापन केलेल्या सीएसडीएस या संस्थेने अशाच प्रकारचे काम उभे केले होते. सामाजिक चळवळींचे बहुशाखीय दृष्टिकोनातून विश्लेषण करणे ही सीएसडीएसची खासियत आहे. आपल्या संस्थापकाच्या गौरवार्थ लोकशाहीच्या अभ्यासासाठी सीएसडीएसने २००४ मध्ये रजनी कोठारी अध्यासनाची स्थापना केली. २० नोव्हेंबर २०१२ रोजी सीएसडीएसला तेव्हा पन्नास वर्षे पूर्ण झाली.
सीएसडीएसच्या माध्यमातून या कालावधीत रजनी कोठारी यांनी राजकीय विश्लेषणाला नवा आयाम देण्याचे जे मोठे कार्य केले होते त्याचा संस्थेच्या सुवर्णमहोत्सवात धांडोळा घेण्यात आला. रोमिला थापर, टी. एन. मदन, घनश्याम शहा, जी. एस. ओबेरॉय, सुरेश शर्मा, हरबन्स मुखिया, आशिष नंदी, सुधीरचंद्र यांसारख्या जाणत्या अभ्यासकांची प्रभावळ सीएसडीएसशी जोडली गेली ती केवळ रजनी कोठारी यांच्या विजिगीषू वृत्तीमुळेच.
रजनी कोठारी हे उजव्या विचारसरणीचे पाईक होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचे राजकारण हे डावी व समाजवादी विचारसरणी यांच्या मिश्रणाला प्रमाण मानून करण्यात येत होते. नेहरूवाद हा याच विचारांचा अाविष्कार होता. नेहरूवादाने भारलेल्या पिढीचे रजनी कोठारी हे प्रतिनिधी होते, परंतु त्यांचा नेहरूंबद्दल आंधळा भक्तिभाव नव्हता. पं. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत ज्या उत्तम गोष्टी घडल्या त्यांचे रजनी कोठारी यांनी जसे कौतुक केले आहे तसे नेहरूंच्या घोडचुकांचे कोठारी यांनी कधीही समर्थन केले नाही. देशाचा कारभार हा एकाच राजकीय घराण्याच्या हातात असू नये अशी त्यांची आग्रही भूमिका होती. मात्र असेच मत मांडत असलेल्या संघ परिवार किंवा भाजपच्या विचारसरणीशी कोठारी यांची नाळ कधीही जुळली नाही.
रजनी कोठारी यांनी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये अध्यापक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. तेथे कार्यरत असताना कोठारी यांनी ‘फॉर्म अँड सबस्टन्स इन इंडियन पॉलिटिक्स' ही सहा मुद्द्यांवर आधारित राजकीय मीमांसा करणारी निबंधमाला ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’मध्ये लिहिली होती. हे वर्ष होते १९६१. हे त्यांचे लेखन त्या काळात खूप गाजले होते. रोमेश थापर संपादित करीत असलेल्या सेमिनार या नियतकालिकातही कोठारी पुढे लिहीत असत. राजकीय विश्लेषणातील त्यांची ही सखोलता बघून प्रा. श्यामाचरण दुबे यांनी रजनी कोठारी यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट या संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून बोलावले. मात्र त्यानंतर ते दिल्लीला परतले. सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेची स्थापना केल्यानंतर रजनी कोठारी यांच्यातील कार्यकर्ता विचारवंताच्या आगळ्यावेगळ्या प्रवासाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. सामाजिक शास्त्रांतील मूलभूत संकल्पनांचा परिघाबाहेर जाऊन विचार करून लेखन करणे ही या सीएसडीएसची खासियत होती. काँग्रेस हा एक पक्ष नसून ती पद्धती आहे, असा दृष्टिकोन घेऊन १९७० मध्ये रजनी कोठारी यांनी लिहिलेले ‘पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक वस्तुनिष्ठ अभ्यासाचे मोठे उदाहरण आहे. कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स, फुटस्टेप्स इन टू द फ्यूचर या त्यांच्या पुस्तकांतून भारतीय राजकारणातील धुमारे वाचकांना विश्लेषक नजरेने पाहता आले.
नेहरूंपेक्षा इंदिरा गांधी यांचे राजकारण रजनी कोठारी यांना अधिक भावले होते. १९७० च्या दशकाच्या प्रारंभी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना गुजरातमध्ये भ्रष्टाचाराविरोधातील नवनिर्माण आंदोलनाने उसळी घेतली होती. त्या वेळी गुजरातचे तत्कालीन राज्य व केंद्र सरकार यांच्यामध्ये बोलणी घडवून आणण्यासाठी रजनी कोठारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण अखेर इंदिरा गांधी यांनी गुजरातचे सरकार बरखास्त केले. इंदिरा गांधी यांच्या राजकारणात कालांतराने संजय गांधी यांचा प्रवेश झाला. संजय गांधी यांच्या अनेक उद्योगांनी अस्वस्थ झालेल्या इंिदरा गांधी निकटवर्तीयांत रजनी कोठारीही होते.
कोठारी यांनी काँग्रेसशी नाळ तोडून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाची कास धरली. आणीबाणीच्या काळात मात्र कोठारी राजकारणापासून अलिप्त होऊन कार्यकर्त्याच्या भूमिकेत स्थिरावले. कार्यकर्ता, विचारवंत, बुद्धिमंत यांच्यात सहज संवाद घडावा या उद्देशाने रजनी कोठारी यांनी १९८० मध्ये ‘लोकायन’ नावाच्या संस्थेची स्थापना केली. धर्म, राजकारण, आरोग्य, शेती, शिक्षण यांच्यातील सकारात्मक बदलांबाबत या संस्थेत झालेली चर्चा खूपच मोलाची आहे. सिटिझन्स फॉर डेमोक्रसी, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थांशीही ते संलग्न होते. या सार्वजनिक जीवनातील आठवणी त्यांनी आपल्या ‘मेमॉयर्स : अनइझी इज द लाइफ ऑफ माइंड’ या पुस्तकात ग्रंथित केल्या आहेत.
भारतीय राजकारणाचा बाज ज्याला समजून घ्यायचा आहे त्याने रजनी कोठारी यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ डेव्हलपमेंट, टुवर्ड्स ए जस्ट वर्ल्ड, रिथिंकिंग डेव्हलपमेंट : इन सर्च ऑफ ह्यूमन अल्टरनेटिव्हज, ट्रान्सफॉर्मेशन अँड सर्व्हायव्हल : इन सर्च ऑफ ह्यूमन वर्ल्ड ऑर्डर आदी पुस्तके मिळवून वाचायला हवीत. भारतीय राजकारण कोणत्या मातीतून घडलेय याचे चौफेर भान जितके रजनी कोठारी यांच्या लिखाणात दिसायचे तितके खूपच कमी लोकांमध्ये दिसते. म्हणूनच रजनी कोठारी हे अस्सल भारतीय मुशीतले राजकीय विचारवंत होते असे म्हणायचे ते त्याचसाठी.