Sunday, March 23, 2014

दक्षिण सुदानमधील दीन... दिव्य मराठी - २४ मार्च २०१४




आफ्रिका खंडातील सुदान या देशातून गेल्या वर्षी फुटून स्वतंत्र देश म्हणून जन्माला आलेल्या दक्षिण सुदानमध्ये सध्या हिंसाचाराने अधिक उग्र स्वरुप धारण केले असून तेथील नागरिकांची कशी ससेहोलपट सुरु आहे याचे विश्लेषण करणारा मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या २४ मार्च २०१४च्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. या लेखाच्या टेक्स्ट व इ-पेपरची लिंक तसेच लेखाची जेपीजी फाईल व टेक्स्ट पुढे देत आहे.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-south-sudan-by-sameer-paranjpe-divya-marathi-africa-4557747-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/23032014/0/4/
-----
दक्षिण सुदानमधील दीन...
-------------
- समीर परांजपे
--------------
एम्मा. तिचे वय आहे अवघे १७ वर्षांचे. आफ्रिकेतील दक्षिण सुदान या नव्या देशातील यादवी युद्धात तिचे आईवडील बेपत्ता झाले आहेत. सुदानमध्ये परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, एम्मासारखे हजारो लोक आपला जीव वाचवण्यासाठी युगांडामध्ये पळून गेले. युगांडामध्ये हे लोक आश्रयछावण्यांमध्ये राहत आहेत. तेथील त्यांचे जगणे किडामुंगीसारखेच झाले आहे. पाठी भीषण भूतकाळ लागलेला अन् भविष्यही अंधारात. एम्मा ही त्या लोकांचीच प्रतिनिधी आहे. ती व तिचे भाऊ हे युगांडामध्ये पळून आले. जीव बचावला; पण पोट भरण्याची विवंचना कोणालाच सुटलेली नाही. एम्माच्या हाती सध्या ठोस असा रोजगार नाही. दक्षिण सुदानमधील युद्धधुमश्चक्रीत असंख्य मुलांप्रमाणे एम्माचेही शिक्षण अर्ध्यावरच सुटले आहे. युगांडामध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी हाती जे दामाजीपंत पाहिजेत, त्याचीही तिच्याकडे वानवा आहे. पोटालाच जिथे धड मिळत नाही तिथे पुढच्या इयत्तांची बुकं शिकण्याची चैन कोणाला परवडणार? मात्र, एम्माचे मन शिक्षणाकडे नेहमीच धाव घेते. युगांडातील आश्रयछावणीत ती तिच्या धाकट्या भावांबरोबर राहते. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी इतक्या लहान वयात तिच्यावरच येऊन पडली आहे. पण एम्माने जिद्द सोडलेली नाही. ती म्हणते, ‘मला अकाउंटंट बनायचे होते. त्यासाठी मी मन लावून शिकत होते; परंतु सुदानमधील परिस्थितीने माझ्या स्वप्नांवर असा घाला घातला, की त्यातून मी अजून पुरती सावरू शकलेले नाही.’
एम्माप्रमाणे कॅथरिन या मुलीची कहाणीही काहीशी अशीच आहे. दक्षिण सुदानमधून आपल्या भावंडांसह जीव मुठीत धरून तिने युगांडाची वाट धरली. या धावपळीत तिची आपल्या आईशी ताटातूट झाली. आज काही महिने लोटले तरी तिच्या आईचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. आपली आई सुदानमध्ये कुठे असेल? का ती या जगातच आता नाहीये? असे अनेक प्रश्न कॅथरिनला छळत आहेत. ती एम्माच्या समवयस्क म्हणजे १७ वर्षे वयाचीच आहे. दक्षिण सुदानमधून युगांडातील अदजुमानी भागामध्ये जे लोक आश्रयाला आले आहेत, त्यांच्या निर्वासित छावण्यांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांचा तुटवडा आहे. त्यामुळे रोजचा दिवस भयंकर हालअपेष्टा सहन करूनच व्यतीत करावा लागणे या निर्वासितांच्या नशिबी आले आहे. अदजुमानी भागामध्ये सुदानमधून सुमारे ४७ हजार निर्वासित आल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. दक्षिण सुदानमधील विरोधी पक्षनेता रिक मॅचर याच्याशी स्वामीनिष्ठ असलेले लष्करी सैनिक व त्या देशाचे अध्यक्ष सॅल्वा किर यांना भक्कम पाठिंबा देणा-या लष्करी सैनिक यांच्यात वारंवार सशस्त्र संघर्ष गेल्या डिसेंबर महिन्यापासून झडू लागला. हा संघर्ष त्यानंतर इतका उग्र झाला की, त्याला नागरी युद्धाचे स्वरूप आले. त्याची मोठ्या प्रमाणावर झळ दक्षिण सुदानमधील नागरिकांना लागली. मुळात सुदानमधील उत्तर व दक्षिण भागातील दोन आदिवासी टोळ्यांमधील हा संघर्ष खूप जुना आहे. त्याला आता सत्ताझुंजीचे स्वरूपही आले आहे. रिक मॅचर हे न्युअर या टोळीचे तर सॅल्वा किर हे डिंका या आदिवासी टोळीचे प्रमुख नेते. दोन्ही टोळ्या एकमेकांना कायम पाण्यात पाहणा-या. या आधीही या दोन टोळ्यांत भीषण सशस्त्र संघर्ष झाला होता. त्यानंतर काही काळ वातावरण शांत होते. पण गेल्या १५ डिसेंबर रोजी पुन्हा हिंसेचा उद्रेक झाला. डिंका व न्युअर टोळीचे समर्थक विरुद्ध टोळीचे प्राबल्य असलेल्या प्रदेशात घुसून तेथील नागरी वस्त्यांमधील लोकांची छळवणूक करतात. त्या त्रासाला भिऊन दक्षिण सुदानमधील असंख्य लोकांनी युगांडामध्ये आश्रय घेतला आहे.
रिक मॅचर व सॅल्वा किर यांच्यामधील संघर्ष एका शांती करारामुळे काही दिवस थांबला होता. दक्षिण सुदानमधील या यादवी युद्धामध्ये असंख्य लहान मुले परागंदा झाली आहेत. त्यातील काही मुले ही बेपत्ता झाली आहेत. काही मुले आईवडलांपासून दुरावली आहेत, तर काही आईवडील आपल्या मुलांना पारखे झाले आहेत. एखादे वादळ किंवा सुनामी होऊन होत्याचे नव्हते होऊन जावे, तशी या ताटातुट झालेल्यांची भावावस्था झालेली आहे. परस्परांना पाण्यात पाहणारे बलाढ्य लोक एकमेकांविरोधात लढतात; त्यासाठी ते देश, धर्म, सर्वसामान्यांचे जीवन अशा सा-या गोष्टीच ते पणाला लावतात. १९८३ सालापासून सुदानमधील उत्तर व दक्षिण भागातील आदिवासी टोळ्या परस्परांशी लढत आहेत. त्या लढ्यामध्ये सुदानमधील गावेच्या गावे उद्ध्वस्त केली गेली. घरे, उभी पिके जाळली गेली. महिलांच्या अब्रूशी खेळ मांडला गेला. निराधार झालेली कुटुंबे, लहान मुले पोटभर अन्नासाठी वणवण करू लागली.   सुदान असुरक्षित म्हणून शेकडो मैल अक्षरश: चालत जाऊन ही गोरगरीब माणसे युगांडाच्या भूमीवर येऊन विसावली. पोटाला पुरेल इतके अन्न व तहान भागेल इतके पाणी, यालाही मोताद झालेल्या या सुदानवासीयांचे मरणही स्वस्त झाले आहे. कुपोषण, भूसुरुंग किंवा बॉम्ब यांच्या स्फोटांमध्ये गेल्या काही वर्षांत शेकडो लोक मरण पावले. गेल्या वर्षी दक्षिण सुदान हा नवीन देश जन्माला घातला गेला; तरी हिंसाचाराचे हे सत्र यापुढेही सुरू राहील. कारण दोन आदिवासी टोळ्यांनी संघर्षाच्या रूपाने चेतविलेल्या नरमेध यज्ञाचे धगधगते कुंड इतक्यात तरी शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एम्मा असो किंवा कॅथरिन; या मुलींचे कौतुक असे की, दक्षिण सुदानमधील घालमेलीच्या वातावरणात खंबीर म्हणविणारे भलेभले पुरुषगडी ढेपाळले; पण या मुलींनी युगांडातील निर्वासित छावण्यातील लोकांना हिंमत देण्याचे काम चोखपणे बजावले आहे. स्वत:च्या आईवडलांचा थांगपत्ता लागत नसला तरी निर्वासित छावण्यांमध्ये असलेल्या लोकांची त्या स्वत:च्या मात्यापित्याप्रमाणेच सेवा करत आहेत. एम्मा, कॅथरिन यांना वयाच्या सतराव्या वर्षी इतकी जी मॅच्युरिटी आली आहे, त्याला कारण त्यांचे धगधगते सामाजिक, नागरी जीवन आहे. सुदान आज संघर्षाच्या ज्वाळांनी लपेटलेला आहे. हा वडवानल दक्षिण सुदानमधील अजून किती गोष्ट भस्मसात करेल, हे माहीत नाही. मात्र यातून एक गोष्ट टिकून राहिली आहे; ती म्हणजे एम्मा, कॅथरिनसारख्या मुलींच्या मनातील असीम जिद्द, प्रतिकूल गोष्टींवर मात करून उद्याची सोनेरी पहाट पाहण्याची मनिषा बाळगणारी जिद्द. या मुलांना सोनेरी पहाट दाखवणारा दिवस लवकर उगवो!
sameer.p@dainikbhaskargroup.com
------

No comments:

Post a Comment