Monday, March 10, 2014

सोबती माझी गझल ( गझलनवाझ भीमराव पांचाळे यांची मी घेतलेली प्रदीर्घ मुलाखत - दैनिक दिव्य मराठी - २०१३चा दिवाळी अंक)


सोबती माझी गझल
----------------------------
गझलनवाझ भीमराव पांचाळे यांची प्रदीर्घ मुलाखत मी शब्दांकित केली होती. हे मुलाखतवजा मनोगत दैनिक दिव्य मराठीच्या २०१३च्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाले होते. तो लेख मी पुढे दिला आहे.
----------------------------



सोबती माझी गझल
----------------------------
- भीमराव पांचाळे
--------------
(मुलाखत - समीर परांजपे)
स्वरांची थांबली दिंडी तुझ्या दारी तुझ्यासाठी
कधीपासून शब्दांची सुरु वारी तुझ्यासाठी
स्वरांची जादू खूप निराळी असते. स्वरांना स्वत:चे रंगरुपही असते. ते सार्वकालिक व सर्वव्यापी असतात. अनेक रागांचा बारकाईने विचार केला तर या विधानातील सत्यता पटेल. आपण पहाडी रागाबाबत बोलूया. हिमालय पर्वतातील निसर्गसौंदर्य तेथील लोकसंस्कृतीतून आलेली गाणी मनाला मोहिनी घालतात. हिमालयाच्या कुशीतील गाणी असोत किंवा माझे बालपण ज्या सातपुडय़ाच्या परिसरात गेले तेथील गाणी हे सर्व स्वरधन तुम्हाला पहाडी रागात बांधलेले आढळून येईल. ही प्रक्रिया इतकी स्वाभाविकरित्या झालेली असते की, आपणही आश्चर्यचकित व्हावे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील आष्टगाव हे माझे मुळ गाव. शंकराची पत्नी पार्वती हिला आमच्याकडे मरीमाय, इनामाय अशी अनेक नावे आहेत. इनामाय देवीचा उत्सव सुमारे अडीच दिवस चालायचा. या देवीची मूर्ती तयार करण्यासाठी विशिष्ट ठिकाणच्या शेतातूनच माती आणायची, तिची मूर्ती बनवायची असे सगळे सोपस्कार ठरलेले असायचे. या अडीच दिवसांत तिच्या उत्सवाचे जे जे सर्व विधी असतील त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक खास गाणे होते. गावातला भक्तिभाबडा महिलावर्ग ही गाणी म्हणायच्या. या गाणी म्हणण्यात कधी खळ पडायचा नाही. आष्टगावातील गाण्याचे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होत होतेमाझ्या आईवडलांचा आवाजही मधुर होता. विशेषत: आईचा स्वर स्वर्गीय होता. भल्या पहाटे ती जात्यावर दळणासाठी बसली की, अभंग,ओव्या गात असे. सकाळी मी उठायचो ती तिच्याच स्वरांची सोबत घेऊन. या स्वरांनी जाग यायची आणि सरकत सरकत जाऊन तिच्या मांडीवर डोके ठेवून परत गाढ झोप लागायची. माझ्या आईकडून सातपुडय़ाच्या परिसरातील लोकगीतांचे संस्कारही माझ्यावर खोलवर झालेले आहेत.
महादेवा जातो गा...देवा रे माया
नदीले मोठा पूर गा
नदीले मोठा पूरं...कसा येंगू चौऱयागडं
अशी महादेवाची गाणी तर माझी आई खूपच छान गायची.
माझे बाबा भजने वडील खूप सुरेल आवाजात गायचे. तुकडोजी महाराजांची भजने त्यांच्या विशेष आवडीची होती. कानावर स्वर पडत होते, त्यातील नाद, लय याने मनाला हुरहुरही लागत होती. मात्र त्यात शास्त्राeय गायकी वगैरे लपलेली असते हे काही त्या लहान वयात मला कळत नव्हते. किंबहुना तसे ज्ञान मिळण्याचे साधनही आष्टगावी नव्हतेच. गाणं म्हणण्याचा आनंद भरपूर उपभोगायला मिळायचा परंतु गायनक्षेत्रात पुढे करिअर वगैरे करता येते अशी काही माहिती तेव्हा नव्हती. आष्टगाव एकदमच खेडेगाव. पूर्वी तिथे शे-दीडशे घरे होती. आता फारतर तीनशे असतील. बाहेरील जगातल्या आधुनिक गोष्टी या गावात पोहोचायला अंमळ उशीरच व्हायचा. गावात रेडिओ कुणाकडेच नसायचा. गावातल्या कुणाकडे लग्नकार्य असेल तर तिथे लाऊडस्पीकरवर गाणी लागायची. टुरिंग टॉकिजमुळे चित्रपटांशी संबंध यायचा. सालबर्डी यात्रेमध्ये तंबुतील तरटांवर बसून मी रंधवा, शाहू मोडक, दारासिंग आदिंचे चित्रपट बघितल्याचे स्मरते.
गावामध्ये अठरापगड माणसे होती. ती आपापले रितीरिवाज पाळायची. त्यातून विविध संस्कृतीचे एक आगळेवेगळे मिश्रण गावाच्या वातावरणात मिसळलेले होते. मला लहानपणापासून वेड होते ते फक्त गाण्याचेच. शाळा, घरची काही कामे या गोष्टीनंतर बाकीचा सगळा वेळ मी घालवित असेन तो गाण्यामध्येच. आईवडलांच्या रुपाने घरात दोन गाते गळे होते तेच माझे पहिले आदर्श. वडील भजन गाण्यासाठी गावच्या पंचक्रोशीत विविध ठिकाणी जात असत. लहानपणापासून मी देखील खंजिरीवर भजने म्हणायला सुरुवात केली. गाणं आणि शिक्षण हा दिनक्रम सुरु होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही माझी प्रेरणा आहे. त्यांच्याप्रमाणेच खुप शिकावे, एखाद्या क्षेत्रात नाव कमवावे असे वाटे. आंबेडकरी विचारांच्या संस्कारांवरच आमचे घर पोसलेले आहे. लहानपणापासून अनेक प्रकारचे कष्ट उपसले, गुर राखण्यापासून शेतात खुरपणी करण्यापर्यंत सर्व कामे केली. त्यावेळी माझ्यासोबत असे ते गाणे. अगदी दिवसाचे चोवीस तास. खानापूरमध्ये तिसरी, चौथी, पाचवी, अंबाडय़ामध्ये सहावी व सातवीसाठी अमरावतीला आलो. अमरावतीने माझ्यावर केलेल्या संस्कारांतून माझ्या भावी आयुष्याचा पाया घडला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या गावातील आदर्श विद्यार्थी गृह या वसतिगृहामध्ये राहात होतो व तेथील ज्ञानमाता शाळेमध्ये शिकत होतो. गावातून गाण्याचे वेड घेऊनच माझी स्वारी येथे आलेली होती. गळ्यात गाणे असल्यामुळे आदर्श विद्यार्थी गृह वसतिगृहामध्ये मी सगळ्यांचा लाडका झालो होतो. या वसतिगृहाच्या अधिक्षकांनी सुचविले त्याप्रमाणे अमरावतीतील गांधर्व विद्यालयात गाणे शिकण्यासाठी मी जायला लागलो. मुळात हे गायन शिकवणी वर्ग मोफत होते. तेथील गुरुजींनी मला मनापासून शिकविले. त्यांनी शिकविलेलीसखी मधुर मधुर मुरली बजायही भूप रागातील चीज आजही आठवणीत ताजी आहे. गायनाच्या परीक्षा मात्र मी दिल्या नाहीत कारण त्यासाठी लागणाऱया फीचे पैसे माझ्याकडे नव्हते. आयुष्यात पुढे जाऊन गायक होईन असे स्वप्न चुकूनही त्यावेळी बघितलेले नव्हते. फक्त गाण शिकायचे इतकेच उद्दिष्ट त्यावेळी होते.
अमरावतीमध्ये गायनाचे जे संस्कार झाले त्याच पायावर आज माझ्या गझलगायकीची इमारत उभी आहे. तेथील माल टेकडीवर एक दर्गा असून तेथे नातिया कव्वाल्यांचे कार्यक्रम व्हायचे. सुफी पंथाची महती या कव्वाल्यांमध्ये गायली जायची. रात्री सुरु झालेल्या कव्वाल्यांचे कार्यक्रम अगदी सकाळपर्यंत चालायचे. गोविंदप्रसाद जयपूरवाले, के. महावीर असे दिग्गज गझलायक अमरावतीला यायचे. आपली कला पेश करायचे. त्यांची गायकी ऐकून गझलगायकीबद्दलची माझी गोडी व उत्सुकता आणखी वाढली. लहानपणापासून माझ्या घरात व अमरावतीमध्ये उर्दू भाषेशी विविध प्रकारे संबंघ येत होताच. त्यामुळे शेरोशायरी, गझल यांच्याशी दोस्ताना झाला होता. जसजसे वय वाढू लागले तशी ही मैत्री अधिक गहिरी होत गेली. अमरावतीमध्ये मी नववीत असतानाची गोष्ट आहे. तेथील राजकमल चौकामध्ये एक गड्डा हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये भजी, मिसळ खायला माझे पाय मित्रांसोबत काही वेळेस वळत असत. त्या हॉटेलजवळच सायकल रिक्षावर बसून भरभक्कम देहाचा एक माणूस खणखणीत आवाजात गाताना मी ऐकला.
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही
ती व्यक्ती होती ख्यातनाम कवी सुरेश भट. त्यांची गझल व माझी पहिली भेट झाली ती अशी. दादा इंगळे यांच्याकडून मी सुरेश भटांबद्दल खूप ऐकले होते. गड्डा हॉटेलजवळ सुरेश भट व त्यांच्या चाहत्यांची गझलमैफल ज्यावेळी रंगत असे तेव्हा मी तिथे एका कोपऱयात श्रवणभक्ती करत उभा राही. लहान मुलगा इथे काय करतोय असे म्हणून कोणी मला तेथून घालवून देऊ नये म्हणून घेतलेला हा बचावात्मक पवित्रा होता. गझल मराठीमध्ये इतक्या ताकदीने मांडली जातेय याचा ऐकताना अवर्णनीय आनंद व्हायचा. इतके चांगले ऐकायला मिळत असल्याने त्याचा चांगला परिणाम माझ्या अंर्तमनावर कुठेतरी खोलवर होत होता. त्यातूनच मी नववी-दहावीत असताना चाली बांधायला लागलो होतो, उर्दू शिकायला पण सुरुवात केली. राजकमल चौकातल्या सुरेश भटांच्या मैफलीत मित्रांच्या आग्रहामुळे मी एक दोन वेळा गायलोही. सुरेश भट हे स्वत:तच दंग असल्याने माझ्या सारख्या लहान मुलाच्या गाण्याकडे त्यांनी फार कधी लक्ष दिले नाही. मात्र या गाण्यामुळे अमरावतीतील अनेक लोक माझ्या परिचयाचे झाले होते. त्यात एक होते किशोरदादा मोरे. ते अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते. अमरावतीमध्ये मॅट्रिकचे शिक्षण संपल्यानंतर तेथील वसतिगृहाला रामराम ठोकावा लागणार होता. पुढील महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे असेल तर राहायचे कुठे हा प्रश्न आ वासून माझ्या समोर उभा होता. किशोरदादा मोरे यांनी मला उदार अंत:करणाने आपल्या अकोला येथील घरात आश्रय दिला. अकोल्यामध्ये असलेल्या बाबुजी देशमुख वाचनालयात किशोरदादा देशमुख दरवर्षी नऊ दिवसांची व्याख्यानमाला चालवित असत. त्यानिमित्ताने अनेक दिग्गज साहित्यिक किशोरदादांच्या घरी येत असत. त्यामध्ये ग. दि. माडगूळकर, पु. . देशपांडे, शं. ना. नवरे, . पु. काळे, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, शंकर पाटील, रंगनाथ कुलकर्णी असे अनेक साहित्यिक असत. त्यांच्या गप्पांतून मला अनेक सुंदर गोष्टी कळत होत्या. माझे आईवडिल माझे जन्मदाते आणि समजून घेणारे. मात्र माझी जी जडणघडण झाली ती फक्त किशोरदादांमुळेच.
अमरावतीला शाळेत शिकण्याबरोबरच गांधर्व विद्यालयातही गाण्याचे जे मी धडे गिरवत असे त्या गुरुजींनी मला पंडित दिनकरराव उर्फ भैयासाहेब देशपांडे यांच्याकडे शिकायला जा असा सल्ला दिला होता. अमरावती सोडून अकोल्याला येण्याआधी मी भैय्यासाहेबांकडून खूप शिकून घेतले. त्याबरोबरच चौफेर वाचनही सुरु केले होते. अकोल्याला पं. एकनाथबुवा कुलकर्णी यांच्याकडे शिकताना ते आपल्यासोबत मला गायला लावायचे. चंद्रकंस नावाच्या रागाची चीजजो बना रे ललैयाचा तासनतास रियाज करुन घेत होते. पण राग काही मला नीट मांडता येत नव्हता. एक दिवस अचानक मला त्या रागाचे नोटेशन गवसले. त्यानंतर कुठेही काहीही अडले नाही. नोटेशनही अगदी सहजपणे जमायला लागले. लहानपणापासून गीतांना चाली लावायचा जो नाद मला लागला होता त्यातून मला जणू नादब्रह्मच गवसले होते. अकोल्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी किशोरदादा मोरेंकडे राहात असताना बडे गुलाम अली खाँ साहेब, किशोरी आमोणकर, सलामत नजाकत, आमीर खाँ, मेहदी हसन अशा सगळ्यांच्या एलपी, ईपी, सेव्हंटी एट आरपीएमच्या रेकॉर्ड मी ऐकायचो. सिनेमासंगीताचा मोठा साठा किशोरदादांकडे होता. राज कपूरच्या चित्रपटांतील शंकर जयकिशनने संगीत दिलेली गाणी माझ्यावरही गहिरी जादू करीत होती. महाविद्यालयीन जीवनात गाण्यांच्या स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवित होतो. दुसऱयांची गाणी कॉपी करुन म्हणणे या प्रकाराचा नाही म्हटले तरी मला मनापासून कंटाळा यायला लागला. स्वत:ची कंपोझिशन्स गाण्याचा आनंद काही निराळाच असतो. जयवंत सुळे हा माझा तबलावादक मित्र कायम संगतीला असे. त्यावेळी उ. रा. गिरींच्या अनेक गाण्यांना मी चाली दिल्या होत्या. सुरेश भटांचे जगत मी आलो यालाही चाल लावली होती.
वयाच्या विसाव्या वर्षीच नागपूर आकाशवाणीवर मी ऑडिशन देऊन सिलेक्ट झालो. विशेष म्हणजे मराठी, उर्दू, हिंदी या तीनही भाषांमध्ये माझी निवड झाली होती. माझे गझलगायकीचे अंग या सगळ्या मेहनतीतूनच विकसित झाले आहे. रोज रात्री दहा वाजता रेडिओ पाकिस्तान लावून त्यावरील कार्यक्रम ऐकणे हा छंद जडला होता. एकदा मेहदी हसन यांचीदेखतो दिल के जां से उठता है, ये धुआंसा कहाँ से उठता हैही गझल ऐकली. त्यातील धुवाँ या शब्दाचा त्यांनी ज्या पद्धतीने उच्चार केला होता, त्यातून दिवा विझल्यावर धूर हवेत आळसावल्यागत वर वेटोळे घेऊन जातो असे चित्रच माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. संगीत किंवा स्वर केवळ शब्दाला गोड करण्यासाठी नाहीत. आशयप्रधान गायकी हा संगीताचा प्राण असला पाहिजे. मेहदी हसन यांच्या गझलगायकीतून हे मर्म मला नीट लक्षात आले. एक दिशा मिळाली.
माझ्या सांगितिक अभिव्यक्तीच्या सगळ्या शक्यता गझलमध्येच आहेत हे मला जाणवत होते. माझी गायनप्रकृती ही गझलचीच होती. गझलमधील शेराच्या दोन ओळीत आशय ठासून भरलेला असतो. गझल लिहिण्याची नजर माझ्याकडेही होती मात्र कधी तसे प्रयत्न हातून झाले नाहीत हेही खरेच. मराठीमध्ये उत्तम गझल लिहिली जात होती. आशय व तंत्राच्या दृष्टीनेही ती खूप प्रगल्भ आहे. त्यामुळे त्या गझला गाण्यातच मी जास्त रमलो, सुखावलो. गझल प्रकाराचा बऱयापैकी अभ्यास झाल्याने ही गोष्ट केवळ साकी, शराब, हुस्नोशबाब यांच्यापुरतीच मर्यादित नाही याचेही पुरते भान मला आलेले होते. गझलचा एकुण आवाका बघितला तर साकी कमी आहे. शराब तर आणखीनच कमी आहे. ‘सुखन अज् माशूक गुफ्तनम्हणजे आपल्या प्रियकराशी केलेला संवाद ही गझलची व्याख्याच आहे. पण गझलेत उच्छृंखलता नाही. प्रेम हा तिचा स्थायीभाव आहे. गझल जसजशी प्रगल्भ होत गेली तसतशी तिच्यात सामाजिक आशयही सामावला गेला. मराठी गझलेत तर सामाजिक आशय मोठय़ा प्रमाणात आढळतो.
अकोल्याला शाळेच्या एका मोठय़ा वर्गात माझ्या आयुष्यातील पहिली गझल गायनमैफल झाली ती 1972 साली. त्यावेळी साठ ते सत्तर रसिक उपस्थित असतील. त्या मैफलीत मी सुरेश भटांचीजगत आलो मी असा की...’ तसेचआसवांनो माझिया डोळ्यांतून वाहू नका...’ व उ. रा. गिरी यांच्यासोडून चाललेले माझे मलाच गाणे, मी मैफिलीत उरलो वर्ज्य स्वराप्रमाणेदोघांतली कहाणी दोघांत राहू दे, मिटवून चांदण्यांचा अध्याय देवू देअशा रचना पेश केल्याचे आठवते. या मैफिलीनंतर मंदगतीने का होईना माझा गझलगायन प्रवास पुढे सरकू लागला. गणपती उत्सव असो की सांस्कृतिक कार्यक्रम, कॉलेजची गॅदरिंग, पुण्यतिथी अशा विविध प्रसंगी माझे गायन सुरु झाले. आकाशवाणीच्या निमित्ताने नागपूर व महाराष्ट्राबाहेरही दौरे सुरु झाले. अमरावतीला असताना सुरेश भटांची ओळख झालेली होती. त्यांना मी लावलेल्या चाली ऐकवायचो. तेही बहुमोल सुचना करायचे. अकोल्यात बी.कॉम.झाल्यानंतर तसेच मराठी आणि हिंदी साहित्यात अतिरिक्त पदव्या मिळविल्यानंतर चार वर्षे मास्तरकी केली. त्यानंतर बँकिंगची परीक्षा देऊन मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झालो. नियती तुमच्याकडून अनेक गोष्टी करवून घेत असते. मुंबईत सूरसिंगार स्पर्धेत मला सुगम संगीताचा विशेष पुरस्कार साक्षात राज कपूर यांच्या हस्ते मिळाला. ती माझी मुंबईत यायची पहिलीच वेळ होती. तेव्हापासून मुंबईत दाखल व्हायचे मला वेध लागले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाळापूर शाखेतून पुढे माझी बदली नागपूरला झाली. या मुक्कामात सुरेश भटांशी स्नेह अधिक गाढ झाला.
मराठीमध्ये गझलची जमीन माधव जुलियन यांनी तयार केली व त्या जमिनीवर गझलचे रोपटे सुरेश भटांनी लावले. सुरेश भट हे मराठी गझलचे गालिब आहेत. मी त्यांना आदराने गझलचे खलिफा म्हणतो. गझल लेखन व गझल गायकीबद्दल मी सुरेश भटांशी तासनतास चर्चा करायचो. एखाद्या गझलेला चाल लावली की त्यांना ऐकवायचो. त्यात त्यांना खटकलेल्या बाबी ते सांगायचे. अजून काहीतरी वेगळे करा म्हणायचे. भटांचा एका विशिष्ट रागासाठी आग्रह असायचा. मला एखाद्या गझलसाठी अमूक एक राग ओढूनताणून आणणे मुळीच आवडायचे नाही. नागपूरमध्ये मी गझलसंदर्भातील अनेक पुस्तके वाचायला सुरुवात केली. आईना--गझल हे पुस्तकही अभ्यासले. अनेक कवींना गझल लिहायची असते पण अनेकांना हे काम कठीण वाटते. रदिफ म्हणजे काय, काफिया म्हणजे काय हे या कवींना कळायला हवे असे मला वाटत असे. त्यावेळी मराठी साहित्यविश्वात गझलेच्या विरोधातच वातावरण होते. गझलेवर घेण्यात येणाऱया आक्षेपांना सुरेश भट सडेतोड उत्तरे देत होते. विरोध मोडून काढीत होते आणि त्याचबरोबर गझलचा प्रचार -प्रसारही करीत होते. या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा असे मला त्यावेळी वाटत असे. आकाशवाणीवर होणारे कार्यक्रम व गझलेमुळे मिळालेला मित्रपरिवार हे सगळे असतानाही नागपूरमध्ये मी फार रमलो नाही. मुंबई सारखी खुणावत होती.
मुंबईत राहायला आल्यानंतर आकाशवाणीमध्ये कार्यक्रमांसाठी जायला लागलो. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये सुरेश भटांचा गझलवाचनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमादरम्यान सुरेश भटांनी अचानक मला व्यासपीठावर बोलावले. वाद्यांची साथसंगत नसतानाही गझल म्हणून दाखविण्याची फर्माईश केली. ‘तू नभातले तारे’, ‘नाही म्हणावयाला आता कसे करुयाअशा गझला मी सादर करत गेलो. त्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. या रसिकांमध्ये दूरदर्शनचे निर्माते अनिल दिवेकर होते. त्यांनी माझ्या मराठी गझलगायनाचा पहिला कार्यक्रम दूरदर्शनवर केला. त्यापासून तेथे कार्यक्रमांचा सिलसिला सुरु झाला. दूरदर्शनचे दुसरे एक निर्माते अरुण काकतकर यांनी शब्दांच्या पलीकडले मध्ये सुरेश भट व माझा संयुक्त कार्यक्रम केलात्यामुळे खूप लोकप्रियता लाभली. दुसऱया बाजूस आकाशवाणीवरही माझ्या कार्यक्रमांची संख्या वाढली. माझ्या मराठी गझलगायनाचा कारवाँ असा पुढे जात असतानाच दुसऱया बाजूला स्टेट बँकेतील मुंबईतील नोकरीही सुरुच होती. याच काळात माझ्या गझलेच्या आयुष्याला दोन भक्कम आधार मिळाले ते म्हणजे माझे मित्रवर्य अशोक भगत आणि माझी पत्नी सौ. गीता यांच्या रुपाने. मुंबईच्या मुक्कामात पु. . देशपांडे, निळू फुले अशा अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. पुलंनी एनसीपीएमध्ये माझी गझलगायनाची खास मैफिलही आयोजित केली होती. त्याचप्रमाणे कमलाकर सोनटक्के यांनी वरळीच्या नेहरु सेंटरमध्येही माझा कार्यक्रम केला. तोही अविस्मरणीय असाच झाला होता. मुंबई आकाशवाणीच्या प्रसारणाला साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आकाशवाणीने माझा गझलगायनाचा विशेष कार्यक्रम आयोजिला होता.
आकाशवाणीच्याच नरिमन पॉइभट येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते यशवंत दत्त यांनी केले होते. पुढे शंभराहून अधिक मैफिलींमध्ये आम्ही एकत्र होतो.
गझलगायन करता करता 1995-96 साली वाशीला आईना--गझल ही गझलेसंदर्भातील निवासी कार्यशाळा आयोजित केली. त्याकामी मला रवी वाडकर यांची खूपच मदत झाली होती. या कार्यशाळेला प्रख्यात शायर नसीम रिफअतही ग्वाल्हेरहून खास आले होते. दरम्यानच्या काळातभक्तिसागरही भक्तिगीतांची माझे संगीत आणि गाणे असलेली कॅसेट आली. तसेच आणखी काही कॅसेटसाठी मी भक्तिगीते, आंबेडकरी गीतेसुद्धा गायलो. त्यानंतर क्रिसेंडो नावाच्या कंपनीने माझाएक जखम सुगंधीहा माझा गझलगायनाचा अल्बम प्रकाशित केला. पु. . देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेला हा अल्बम रसिकांनी डोक्यावर घेतला. 1985-86च्या सुमारास विलेपार्ले येथे झालेल्या एका कार्यक्रमात सुरेश भटांनी आनंदविभोर होऊन मला गझलनवाझ ही उपाधी बहाल केली. ‘एक जखम सुगंधीया कॅसेटच्या अभुतपूर्व यशाने गझलच्या कार्यक्रमांना अधिक भरभरुन यश मिळू लागले. माझ्या गझलगायकीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पासाठी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये गझलगायनाचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात आम्ही गझल सागर प्रतिष्ठानचे निळुभाऊ फुले यांच्या हस्ते उद्घाटन केले. गझल सागर प्रतिष्ठाच्या वतीने आम्ही नव्वदच्या वर कार्यशाळा व सात अखिल भारतीय मराठी गझल संमेलनेही भरविली. वाईच्या संमेलनात ब्रेल लिपीतला गझलसंग्रह प्रसिद्ध केला. विदर्भाची मराठी गझल, समग्र खावर ही पुस्तके प्रकाशित केली. आत्तापर्यंत चार गझलकारांचे संग्रह तर तीन प्रातिनिधीक संग्रह काढले. गझलचे छंदशास्त्र, गझलविश्व, मराठी गझल - सुरेश भटांनंतर अशी पुस्तकेही प्रकाशित केली. साहित्य संस्कृती मंडळ, चित्रपट महामंडळ ासारख्या महत्त्वाच्या संस्थांवर महाराष्ट्र शासनाने माझी नेमणूक केली होती. मुंबई विद्यापीठात गझल शिकविण्याचेही काम मी केले आहे. साहित्य अकादमीतर्फे पणजीला 2009 साली गझलेवर झालेल्या एका राष्ट्रीय परिसंवादात बीजभाषण देण्याचा बहुमानही मला मिळाला होता. हे सारे गझलच्या चळवळीचे श्रेय आहे. गझलगायकीवर अनेकांनी पीएचडी करायला सुरुवात केली आहे. खावर, सुरेश भट, . रा. गिरींवर का सुरु झाले आहे. या अभ्यासात माझे मार्गदर्शन घेतले जाते. स्त्राe गझलकारांवरही आता अभ्यास होऊ लागला आहे. 2009 सालापासून मी परदेशी जाऊन मराठी गझलगायनाचे कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. अमेरिका, दुबई, शारजा, कुवेत, स्वित्झर्लंड, हॉलंड, बेल्जियम, फ्रान्स अशा अनेक देशांमध्ये मी गायलो आहे.
गझलगायकी हे केवळ गायकी अंदाज पेश करणे नसते. शायरने शेरामध्ये दु:, सुख, करुणा, प्रेम, दया, निराशा यांच्या भावांचे दर्शन घडविलेले असते. ते भाव गायनातून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविणे मला गझलगायनातून अपेक्षित असते. गझलेमध्ये शेराची पहिली ओळ ही त्या विषयाची मांडणी असते. पहिल्या ओळीच्या प्रस्तावनेनंतर दुसरी ओळ काय असेल यासाठी रसिकाला अधीर करावे लागतेउदाहरणादाखल सुरेश भटसाहेबांचाच एक शेर घेऊया. या अप्रतिम शेराच्या पहिल्या मिसऱयात (ओळीत) ते म्हणतात...
पाहिले दु:ख मी तुझे जेव्हा...
आणि ही ओळ गाऊन फुलविताना साहजिकच रसिकांच्या मनात एक उत्सुक भाव निर्माण होतो आणि पुढे काय? असा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर पुढच्या ओळीतून एक वैश्विक सत्य अन् सुखी होण्याचा अत्यंत सोपा मार्ग जेव्हा भटसाहेब सहज सांगून जातात तेव्हा आपण दाद देण्यापासून स्वत:ला थांबवूच शकत नाही. त्यांच्या शेरातील दुसरी ओळ आहे...
दु:ख माझे लहानसे झाले...
रसिकांच्या मनात गाठ मारावी लागते आणि मग ती गाठ दुसऱया ओळीत सोडावी लागते. मगच उचंबळून दाद मिळतेगझल गायकाने, शायराने त्याच्याकडे सोपविलेल्या रचनेतील आशयामागे आपल्या स्वरांचं संचित होऊन भक्कमपणे उभे राहाणे, आशयावर स्वरांचा भार होणार नाही किंबहुना तो अधिक बोलका होईल यासाठी दक्ष असणे हीच खरी आशयप्रधान गझलगायकी आहे. हे कुणीही केले तरी त्याला दाद येईलच. हेच मला नव्या गझलगायकांपर्यंत पोहोचवायचे आहे. एखाद्या गझलेला चाल लावतानाही त्यातील शब्दांकडे माझे बारीक लक्ष असते. शब्दांच्या नेमक्या कशा पद्धतीच्या उच्चारणांमुळे रसिकांच्या मनावर योग्य तो परिणाम साधता येईल याचा मी चाल बांधताना विचार करीत असतो.
मराठी गझलचे भवितव्य उज्ज्वल आहे. संमेलने, कार्यशाळा, मुशायरे, परिसंवाद, चर्चाही होत आहेत. गझल ऐकणाऱया रसिकांच्या संख्येतही वाढ होतेय. गझल सागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठी गझलची एक चळवळ उभी राहिल्यामुळे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडतेय आणि ती म्हणजे इतर बोली व भाषांमधील गझलही रसिकांच्या समोर येतेय. उर्दू ज्याप्रमाणे मराठी गझलची जननी आहे तशीच आपली मराठी भाषा देखील वऱहाडी, कोकणी, संस्कृत, अहिराणी, आगरी, गोंडी इ. भाषा व बोलींमधील गझलांची जननी बनली आहे. गझलच्या चळवळीत अजून खूप काम करायची माझ्या मनात उमेद कायम आहे. गझल ही नशा आहे. ध्यास आहे. ते एक मिशन आहे. अनेक नवे गझलकार क्षितिजावर तळपू लागले आहेत. गझलचा ज्यांनी ज्यांनी ध्यास घेतलाय त्यांच्यासाठी गझल गुरुकूल स्थापन करण्याचे माझे स्वप्न आहे. या गुरुकुलात सर्व प्रकारच्या संगीताचे शिक्षण दिले जाईल. शास्त्राeय संगीत, उर्दू भाषा, गझलचा आकृतीबंध असे सगळे विषय या गुरुकुलात शिकविले जातील. चाली बांधणे, काव्याचा अभ्यास, गाण्याचे प्रस्तुतीकरण असे सारे काही इथे माझ्या सोबत राहून करता येईल. गझल गुरुकुलाचा हा प्रकल्प भव्य स्वरुपाचा आहे. मला या प्रकल्पासाठी हवी तशी जागा कुणी देऊ केली तर त्या कामाला मी तत्काळ सुरुवात करेन.
गझल एके गझल असा माझा गझल गायकीचा प्रवास केवळ रसिकांच्या प्रेमामुळेच इतका सुफळ होऊ शकला याची विनम्र जाणीव मला आहे.
श्वास गजल, निश्वास गझल
जगण्याचा विश्वास गझल
द्वेषाची दुनिया बदले
माणुसकीचा ध्यास गझल
-----------------

No comments:

Post a Comment