Thursday, March 13, 2014

महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव (दैनिक दिव्य मराठी - २० ऑक्टोबर २०१२)







१९२६मध्ये दादरमध्ये सुरू झालेला नवरात्रोत्सव हा महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव होता. प्रबोधनकार ठाकरे, रावबहादूर बोले आदी समाजसुधारकांनी पुढाकार घेऊन व पुरोगामी दृष्टिकोन बाळगून सुरू केलेल्या या सार्वजनिक नवरात्रोत्सवाची कहाणी मी या लेखातून मांडली. हा लेख दैनिक दिव्य मराठीच्या २० ऑक्टोबर २०१२च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव


- समीर परांजपे

मुंबईतील दादर विभागात १९२६मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात दलित समाजातील मंडळींनाही मूर्तिपूजा करता आली पाहिजे यासाठी झालेल्या चळवळीला यश आले. त्या वर्षी त्या सार्वजनिक गणेशोत्सवात दलितांनीही मोठय़ा प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. मात्र या घटनेने बिथरलेल्या सनातनी मंडळींनी दादरमधील तो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे १९२६नंतर बंदच केले. (पुढे तीस वर्षांनी समर्थ व्यायाम मंदिराच्या गणेशोत्सवाच्या नावामागेसार्वजनिकया शब्दाची भर टाकून दादरमध्ये पुन्हा हा उत्सव सुरू झाला.) दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सनातन्यांनी कावेबाजपणा करून बंद केल्याची गोष्ट प्रबोधनकार ठाकरे तसेच अन्य सुजाण नागरिकांनाही पसंत पडली नव्हती. या प्रकरणानंतर सनातनी प्रवृत्तींना छेद देण्यासाठी दलितांसह सर्व जाती-जमातीतील गटांना बंधुभावाने समाविष्ट करून घेणार्या आणखी एका सार्वजनिक उत्सवाची गरज प्रबोधनकारांसह अन्य सुधारणावादी लोकांना वाटू लागली. महाराष्ट्राची मुख्य देवता श्री भवानीमाता. तिच्या दरबारात कोणताही जातिभेद न पाळला जाता सर्वांनाच मुक्तद्वार असे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून नवरात्रोत्सव सबंध महाराष्ट्रात घरोघरी व गडागडांवर थाटामाटात साजरा होत असे. पेशवाईच्या काळात या प्रथेमध्ये खंड पडला असे प्रबोधनकार ठाकरे यांचे मत होते. त्यामुळे १९२६मध्येच दादरमध्ये श्री शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा निर्णय लोकहितवादी संघाच्या माध्यमातून घेण्यात आला. हा निर्णय लोकांना इतका आकर्षक वाटला की कुलाबा ते कल्याण,पालघरपर्यंतची मराठमोळी जनता या नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी स्वत:हून पुढे आली. १९२६मध्ये दादरमध्ये सुरू झालेला नवरात्रोत्सव हा महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव होता. ( त्याचा सविस्तर तपशील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्यामाझी जीवनगाथाया पुस्तकात ३१० ते ३१३ या पृष्ठांमध्ये देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९९७मध्ये प्रसिद्ध केलेल्यामाझी जीवनगाथाया पुस्तकाच्या प्रथमावृत्तीचे पुनर्मुद्रण प्रसिद्ध केले आहे.) बंगाल प्रांतामध्येही सार्वजनिकरीत्या नवरात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा असल्याने दादरच्या उत्सवाला देशातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव असे म्हणता येणार नाही. सन १९२६मध्ये बीबी रेल्वे आणि टिळक पूल यांच्यादरम्यान फक्त धुरू हॉलची इमारत होती. बाकी सगळा विभाग मोकळा. पूर्वी तेथे एक तलाव होता. म्युन्सिपालटीने जळालेल्या कोळशाचा कोक आणून तो तलाव बुजवून टाकला. या काळ्या मैदानावर ८० फूट लांब व ६० फूट रुंद मंडप घालण्यात आला होता. या मंडपातील काही भाग भवानीमातेची मूर्ती व घटस्थापनादी धार्मिक व्यवस्थेसाठी आणि बाकीचा भाग सांस्कृतिक कार्यक्रमांच्या व्यासपीठासाठी राखून ठेवण्यात आला. आश्विन शुद्ध प्रतिपदेपूर्वी तब्बल आठवडाभरापासून सर्व जाती-जमातींचे लोक प्रबोधनकारांच्या नेतृत्वाखाली या पहिल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी झटत होते. पितळेचा मोठा पाट, तांब्याचा दोन फूट व्यासाचा घट, ६ फूट लांब वफूट रुंदीचा रेशमी भगवा ध्वज, घटस्थापनेच्या आजूबाजूच्या  सजावटीसाठी रंगीबेरंगी पडदे असे सारे साहित्य जमा झाले. त्याची नीट मांडणीही झाली. भवानीमातेची मूर्ती कोणत्या प्रकारची असावी, असा प्रश्न उभा राहिला. त्यावरही तोडगा निघाला. एका सिनेमा कंपनीने चित्रकार रविवर्माच्या कालीदेवी तांडवनृत्याचा एक मोठा कटआऊट फ्लॅट पूर्वी तयार केलेला होता. तो आणून घटाच्या मागे भवानीची मूर्ती म्हणून उभा करण्यात आला. या मंडपात ठेवण्यासाठी पुरुषभर उंचीच्या दोन लखलखीत समयाही आणण्यात आल्या. त्यांच्यासाठी लागणाऱया वातींचीही व्यवस्था झाली. त्यानंतर गिरगावातील मुगभाटातल्या वाजंत्री मंडळींनी या सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या मंडपात सकाळ-संध्याकाळ सनई-चौघडय़ाच्या पाळ्या पत्करल्या. दादरच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे अध्यक्षपद रावबहादूर बोले यांनी स्वीकारले होते. या नवरात्रोत्सवात आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी मंडपात भगवा ध्वज उभारण्याचा मान दलित समाजातील आमदार सोळंकी यांना देण्यात आला. त्यानंतर घटस्थापनेचा विधी हा दलित समाजातील दांपत्याकडून करविण्यात आला. हे सारे पूजाविधी दादरचे विख्यात पालयेशास्त्री यांनी यथाशास्त्र मंत्रोच्चारांनी पार पाडले. कविवर्य वसंत बिहार ऊर्फ जोशी यांनी जगदंबेच्या केलेल्या आरतीचे आबालवृद्धांनी एका सुरात गायन केले. आरती संपल्यानंतर अनेक भाविकांनी भवानीमातेच्या मूर्तीला शेवंतीचे प्रचंड हार अर्पण केले. दादरमध्ये १९२६मध्ये सुरू झालेल्या या सार्वजनिक नवरात्रोत्सवात दररोज रात्री होणार्या सांस्कृतिक कार्यक्रमांना काही हजार लोक उपस्थित राहायचे. ब्राह्मणेतर समाजातील वक्ते, गायक, कवी, शाहीर, प्रवचनकार, कीर्तनकार यांचाच कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला होता. भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणाऱया माळी समाजातील यमुनाबाई घोडेकर यांचे झालेले व्याख्यान हा तर चर्चेचा विषय ठरला. या बाई काय व्याख्यान देणार, असा काही संकुचित वृत्तीच्या लोकांचा सवाल होता. कपाळावर कुंकवाची लांबलचक रेघ, डोळे किंचित चकणे, एक साधे जाडेभरडे लुगडे-चोळी नेसलेल्या, माथ्यावर पदर घेतलेल्या यमुनाबाई यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. उच्चार खणखणीत, स्वच्छ वाणी, विवेचनाचा पहाडी झपाटा यामुळे पहिल्या पाच-दहा मिनिटांतच यमुनाबाइभच्या वक्तृत्वाची श्रोत्यांवर छाप पडली. जीवनविषयक बाबींवर यमुनाबाइभनी सुमारे तीन तास व्याख्यान दिले. १९२६मध्ये दसऱयाच्या शिलंगणाच्या स्वारीची मिरवणूक काढायला पोलिस परवानगी देत नव्हते. कारण अशी मिरवणूक याआधी दादर परिसरात कधी निघाली नव्हती. रावबहादूर बोले, केळुसकर मास्तर, नवलकर वकील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन अखेर परवानगी मिळाली. जगदंबेची महापूजा व सार्वजनिक आरती झाल्यानंतर शिलंगणाची स्वारी निघाली. संपूर्ण दादरमध्ये ही मिरवणूक फिरून आली. रावबहादूर बोले यांच्या हस्ते सुवर्णपूजन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांसमोर छोटेसे भाषण केले. शिलंगणाच्या या स्वारीनंतर महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा समारोप झाला. प्रबोधनकार ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हा नवरात्रोत्सव १९२९पर्यंत चालवला. पुढे आजारपणामुळे ते दादरहून काही काळ कर्जतला गेले. त्यानंतर दादरचा हा सार्वजनिक नवरात्रोत्सव खांडके चाळीतील मंडळी नियमितपणे सालोसाल साजरा करीत आली आहेत. १९२६च्या महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे लोण पुढे मुंबई व महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्रभर पसरले. सद्य:स्थितीत सार्वजनिक नवरात्रोत्सव फक्तसाजराहोतो; पण पूर्वी त्याचे जे निर्भेळ सांस्कृतिक स्वरूप होते, त्याला मात्र पुरते ग्रहण लागले आहे.

sameer.p@dainikbhaskargroup.com

No comments:

Post a Comment