Tuesday, March 11, 2014

ग्रंथ दिन `जागतिक' हवा की `अगतिक'? ( दै. दिव्य मराठी - २३ एप्रिल २०१३)

23 एप्रिल रोजीच जागतिक ग्रंथदिन का साजरा होतो याचे मूळ काही घटनांमध्ये दडलेले आहे. जगद्विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिन 23 एप्रिल रोजी असून त्यानिमित्त दरवर्षी या दिवशी ग्रंथविषयक कार्यक्रम आयोजिण्याची प्रथा रूढ झाली. त्यानिमित्त ग्रंथविश्वाचा धांडोळा घेणारा हा लेख २३ एप्रिल २०१३ रोजी दै. दिव्य मराठीच्या अंकात लिहिला. त्या लेखाची ही लिंक.
--------------------
ग्रंथ दिन `जागतिक' हवा की `अगतिक'?
---------------
- समीर परांजपे
--------------
23 एप्रिल रोजीच जागतिक ग्रंथदिन का साजरा होतो याचे मूळ काही घटनांमध्ये दडलेले आहे. जगद्विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिन 23 एप्रिल रोजी असून त्यानिमित्त दरवर्षी या दिवशी ग्रंथविषयक कार्यक्रम आयोजिण्याची प्रथा रूढ झाली. 23 एप्रिल या तारखेचे महत्त्व ग्रंथजगताला अजून एका दृष्टीने आहे. 17 व्या शतकातील प्रख्यात स्पॅनिश नाटककार, कवी व कादंबरीकार मिग्युल दे सेर्व्हांटेस सावेड्रा यांचा 22 एप्रिल 1616 रोजी मृत्यू झाला व त्याचे दफन 23 एप्रिल रोजी करण्यात आले. या घटनेचे स्मरण ठेवून स्पेनमधील ग्रंथविक्रेत्यांनी मिग्युलच्या स्मरणार्थ 23 एप्रिल 1923 रोजी ग्रंथदिन पाळला.
या ग्रंथदिनाला जागतिक स्वरूप आले ते युनेस्को या संस्थेच्या एका निर्णयामुळे. ग्रंथांचे वाचन, प्रकाशन व त्यांच्या स्वामित्वहक्काविषयी (कॉपीराइट) मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण व्हावी याकरिता प्रोत्साहन देण्याकरिता 23 एप्रिल 1995 या दिवसापासून दरवर्षी जागतिक ग्रंथ तसेच स्वामित्वहक्क दिन पाळण्याचा निर्णय युनेस्कोने घेतला. जागतिक ग्रंथदिन हा 23 एप्रिलला साजरा करण्यात येत असला तरी काही देशांमध्ये तो तिथल्या मोसमाप्रमाणे वेगळ्या दिवशीही साजरा केला जातो. उदाहरणार्थ आयर्लंड या देशामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रंथदिन आयोजिला जातो. स्वीडनमध्ये मोसमाचा अदमास लक्षात घेऊन दरवर्षी 13 एप्रिल रोजी ग्रंथदिन साजरा केला जातो. दस्तुरखुद्द इंग्लंडमध्ये जागतिक ग्रंथदिन हा दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या गुरुवारी साजरा होतो. ईस्टर स्कूल सुट्ट्यांमध्ये कोणतेही अडथळे नकोत, त्याचप्रमाणे 23 एप्रिल हा इंग्लंडमध्ये राष्ट्रीय संत दिवस म्हणजेच सेंट जॉर्ज दिन म्हणूनही पाळला जातो. त्यामुळे एकाच दिवशी ब-याच कार्यक्रमांची सरमिसळ नको या हेतूने इंग्लंडने वेगळ्या दिवशी ग्रंथदिन साजरा करण्याची परंपरा आपल्या देशात रूढ केली. भारतात मात्र 23 एप्रिल याच प्रमाण तारखेला जागतिक ग्रंथ दिनाचे कार्यक्रम होतात. हे सगळे वैविध्य अशासाठी सांगितले की, प्रत्येक दिनाच्या बाबतीत अनेकांच्या ढोबळ कल्पना असतात, पण या कल्पनांना छेद देणारे कंगोरे समोर आणले की  ज्ञानात थोडी अधिक भर पडते.
भारतीय भाषांमधील साहित्यनिर्मितीची परंपरा प्राचीन व उच्च आहे :
भारतामध्ये अनेक बाबतीत विविधतेमध्ये एकता आहे. भारतीय भाषांमध्ये साहित्यनिर्मितीची उच्च परंपरा आहे. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे साहित्य प्रसवणा-या अनेक साहित्यिकांनी या मातीत जन्म घेतला आहे. वैदिक काळापासून ते आजपावेतो याचे अनेक दाखले आपल्याला या दृष्टीने मिळू शकतील. ब्रिटिश राजवटीच्या उण्यापु-या 150 वर्षांच्या कालावधीत आधुनिक ज्ञानाची कवाडे भारतातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर खुली झाली. विविध ज्ञानशाखांमध्ये इंग्रजीतून करण्यात आलेल्या उत्तमोत्तम ग्रंथलेखनाने भारतातील वाचकांचे डोळे त्या काळात दिपून गेले नसते तरच नवल.
अँग्लो इंडियन साहित्य : ब्रिटिश अमदानीत इंग्रजी साहित्यातील अव्वल साहित्यिकांचे ग्रंथ वाचून त्याच प्रकारचे साहित्य भारतीय भाषांमध्ये आले पाहिजे अशी प्रेरणा 19 व्या शतकातील अनेक भारतीय ग्रंथकारांनी घेतली. त्यातून इंग्रजी साहित्यकृतींचे भारतीय भाषांतील अनुवाद मोठ्या प्रमाणावर सिद्ध होऊ लागले. तसेच आपल्या देशातील भाषांतून विविध विषयांवर ग्रंथलेखन करण्यास चालना मिळाली. दुस-या बाजूस काही भारतीय लेखक त्या काळात इंग्रजीतूनही लेखन करू लागले. अशा साहित्याला अँग्लो इंडियन साहित्य म्हणण्याची प्रथा रूढ झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारतीय लेखकांनी इंग्रजी ग्रंथ लिहिण्याचा प्रवाह पूर्वीइतकाच सशक्त राहिलेला आहे. आजच्या युवा पिढीत विलक्षण लोकप्रिय असलेल्या चेतन भगतपर्यंत आता हा प्रवाह येऊन पोहोचलेला आहे.
दक्षिण भारतीय राज्यांमध्ये स्वत:च्या मातृभाषेविषयी असलेले प्रेम व त्यातून फुललेली अस्मिता ही काहीशी अंगावर येणारी असते. भाषा व प्रांताच्या अस्मितेचे राजकारणही तेथे जोरात चालते. त्याचे काही दुष्परिणाम असले तरी सुपरिणामाचा भाग असा की, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होत आली आहे. या ग्रंथांची विक्रीही तडाखेबंद होते. तेथील भाषिक वृत्तपत्रांचा खपही विक्रमी असून ती आपापल्या भाषेच्या ग्रंथविक्री व्यवहाराला भक्कम पाठबळ पुरवितात. खासगी वा सरकारी पाठिंब्याने दक्षिणी भाषांमध्ये स्थापन झालेल्या साहित्य संस्थांचा पायाही भक्कम असतो. त्यांच्यातर्फे राबवल्या जाणा-या  साहित्यविषयक उपक्रमांची संख्याही मोठी असते. भारताची राष्ट्रभाषा हिंदीमध्येही लक्षणीय संख्येने ग्रंथ प्रकाशित होत असतात. हिंदी भाषिक राज्यांमधील वाचकांची संख्याही मोठी असल्याने हिंदी पुस्तकांना मागणी बरीच असते. या पार्श्वभूमीवर मराठी ग्रंथव्यवहाराचा विचार केला तर फार हताश होण्यासारखी परिस्थिती नक्कीच नाही.
मराठीमध्ये ललित साहित्यप्रकारातील ग्रंथ प्रकाशित करणारे 250 प्रकाशक : धार्मिक, ज्योतिष, पाककृती आदी विषयांवर ग्रंथ प्रकाशित करणा-या प्रकाशकांची संख्या जमेस धरली तर ती पाचशेच्या वर जाऊ शकते. मराठीतील ललित साहित्यप्रकारातील पुस्तकांची पहिली आवृत्ती ही हजार प्रतींची असते. एखादे पुस्तक वाचकप्रिय झाले तर त्याच्या पुढील आवृत्या दोन हजार, प्रसंगी पाच हजारांचाही टप्पा ओलांडतात. दरवर्षी मराठीमध्ये सुमारे 1200 पुस्तके प्रकाशित होत असावीत असा अंदाज आहे. ज्या वेळेपासून   मराठी ग्रंथप्रकाशन व्यवसाय जन्माला आलेला आहे तेव्हापासून या व्यावसायिकांची ओरड ही असते की, हा व्यवसाय तोट्याचा आहे. कारण मराठी पुस्तकांना वाचकांकडून मोठी मागणी असत नाही तसेच छपाई, कागद यांचे दर वाढत असल्याने पुस्तके प्रकाशित करणे हा कधीकधी आतबट्ट्याचा व्यवसाय होतो. मात्र, असे सगळे निराशाजनक वातावरण रंगविले जात असतानाही दरवर्षी मराठी पुस्तके प्रकाशित होतात. नवनवे प्रकाशक या व्यवसायात प्रवेश करताना दिसतात. मराठी प्रकाशन व्यवसाय हा वित्तीय व प्रशासकीय शिस्त लाभलेल्या उद्योगाप्रमाणे चालवला जात नाही हीच मोठी अडचण आहे. या व्यवसायाचे स्वरूप अजूनही बरेचसे विस्कळीत आहे. अर्थात याला मराठीत नामवंत झालेले काही प्रकाशक नक्कीच अपवाद आहेत. कारण, त्यांनी बदलत्या काळाच्या गरजा ओळखून आपला व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये काही शिस्त राखली आहे. मराठीत दरवर्षी प्रसिद्ध होणा-या पुस्तकांमध्ये वाचकांच्या दृष्टीने दर्जेदार ठरणा-या पुस्तकांना मागणी असतेच, शिवाय त्यातून त्या पुस्तकांच्या लेखकांना चढ्या आकड्यांचे मानधन मिळाल्याचीही उदाहरणे आहेत.
मराठी लेखक कमी अनुभवविश्वावर आपली साहित्यकृती सिद्ध करतात : मराठीतील ललितेतर पुस्तकांचा खप हा कथा, कादंबरी, चरित्रे, आत्मचरित्रे, काव्यसंग्रहांपेक्षा नेहमीच अधिक राहिला आहे. अनुवादित पुस्तकांनाही मराठीत वाढती मागणी आहे. या गोष्टी असल्या तरी मराठीतील राष्ट्रीय व जागतिक स्तराच्या दर्जाचे साहित्य किती निर्माण होते याचा विचार केला तर काहीशी निराशा हाती येते. काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी लेखक खूपच कमी अनुभवविश्वावर आपली साहित्यकृती सिद्ध करतात. काही वर्षे किंवा काही महिने एखाद्या विषयावर संशोधन करून ललितकृती लिहिण्याची मराठी लेखकांमध्ये फारशी परंपरा नाही.
संपूर्ण वेळ लेखन हाच व्यवसाय पत्करणा-या लेखकांमध्ये पु. भा. भावे, गो. नि. दांडेकर अशी आणखी काही नावे समाविष्ट केली की ही यादी संपते. मात्र, ही परंपरा मल्याळी, तामिळी भाषेमध्ये ब-यापैकी वैभवाला चढली आहे. मराठी लेखकांना प्रकाशकांकडून पुरेसे मानधन न मिळणे हा महत्त्वाचा मुद्दाही आहेच. मात्र, या उणिवाच फक्त न दाखवता त्यांच्यावर मात करून मराठी प्रकाशक व लेखकांनी पुढे जाण्याची गरज आहे. भारतात मराठी ग्रंथव्यवहाराला महत्त्वाचे स्थान असले तरी  ते अव्वल क्रमांकाचे स्थान नाही हे लक्षात घ्यायला हवे.
मराठीला अनुवादित पुस्तकांची गोडी
मराठी भाषेमध्ये अन्य भारतीय भाषांतील अनेक शब्दांचाही समावेश झालेला आहे. त्या भाषांतील उत्तमोत्तम साहित्यकृतींचे मराठीत भाषांतर होण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, खासगी प्रकाशकांकडून तसेच आंतरभारतीसारख्या प्रकल्पांतून प्रयत्न होत असले तरी ते अपुरे पडत आहेत. बहुतांश मराठी प्रकाशक आपल्या उर्जितावस्थेसाठी कायम सरकारी दरबारी डोळे लावून बसलेले असतात ही वृत्तीही त्यांनी आता सोडायला हवी. मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे आक्रमण होत आहे असा सारखा धोशा लावण्याने फारसा फरक पडणार नाही. आपल्यात असलेल्या दुबळेपणावर मात करून मराठी प्रकाशक व ग्रंथव्यवहाराला पुढे जावे लागेल. उत्तमोत्तम लेखकांना हुडकून काढून, त्यांना लेखनातून आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते, असा आत्मविश्वास देऊन लिहिते करावे लागेल. ही प्रक्रिया मराठीत खूपच अभावाने होताना दिसते. महाराष्ट्र शासनाने आपले सांस्कृतिक धोरण जाहीर केले असले, दरवर्षी उत्तम ग्रंथांना पुरस्कार दिले जात असले तरी त्यामुळे मराठी ग्रंथजगताचा दर्जा फारसा सुधारला असे दिसत नाही. मराठी लेखक आपल्या पुस्तकांच्या स्वामित्व हक्कांबाबत जागरूक असले तरी ते प्रकाशकांबरोबर होणा-या आर्थिक व्यवहारांत मात्र मार खाताना दिसतात. अशा अनेक उणिवा बाजूला सारून मराठी लेखक, प्रकाशकांना वाटचाल करायची आहे व अंतिमत: मराठी वाचकांच्या पदरात उत्तम साहित्यकृतींचे दान टाकावयाचे आहे. या प्रयत्नांत जर कसूर झाली तर ‘जागतिक’ ऐवजी ‘अगतिक’ ग्रंथ दिन साजरा करण्याची पाळी लवकरच मराठी ग्रंथविश्वातील लोकांवर येऊ शकते.
सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणा-यात भारत सहावा : जागतिक ग्रंथ तसेच स्वामित्त्वहक्क दिनानिमित्त 23 एप्रिल रोजी जगभरात विविध कार्यक्रम होतील. जागतिक स्तरावरील साहित्याचा दर्जा तसेच ग्रंथविक्रीच्या संदर्भात उदंड चर्चा होतील. जागतिक स्तरावर सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणा-या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक आहे. दरवर्षी सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणा-या देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे 2010 मध्ये नवी पुस्तके व जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या असे मिळून सुमारे 3, 28, 259 पुस्तके प्रकाशित झाली. याच प्रकारातील दरवर्षीची आकडेवारी लक्षात घेतली तर इंग्लंड (206000 पुस्तके), चीन (1,89,295), रशिया (1,23,336), जर्मनी (93,124), स्पेन (86,300), भारत (82537), जपान (78,555), इराण (65,000), फ्रान्स (63690) अशा क्रमाने ही यादी पुढे सरकते.
------------

No comments:

Post a Comment