Monday, December 26, 2016

मेरा नाम (सपनों का) सौदागर- राज कपूरच्या मेरा नाम जोकर चित्रपटाबद्दल लेख - दै. दिव्य मराठी २५ डिसेंबर २०१६ - समीर परांजपे







दै. दिव्य मराठीच्या रसिक या पुरवणीमध्ये दि. २५ डिसेंबर २०१६ रोजी मी लिहिलेला हा लेख व त्याची जेेपीजी फाइल.
-------------
स्लग : नॉस्टेल्जिया
-------------------
बायलाइन : समीर परांजपे
-------------------
हेडिंग : मेरा नाम (सपनों का) सौदागर
------------------
इंट्रो : ‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूरचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. आयुष्यभर ‘मिसअंडरस्टुड मास्टरपीस'चा मळवट भरून आपले सौभाग्य अजमावत राहिला. अगदी गेल्या १४ डिसेंबरला राज कपूरच्या ९२व्या वाढदिवशी या चित्रपटाचा विशेष खेळ मुंबईत झाला, तेव्हाही हाच माहोल होता. मात्र, ‘मेरा नाम जोकर’मध्ये मरिनाची भूमिका साकारलेली रशियन कलावंत सेनिया रिबिनिका या वेळी हजर होती, आणि तिच्या त्या निळ्याशार डोळ्यांत केवळ कृतज्ञता आणि कौतुक झळकत होते...
------------------
ब्लर्ब : ज्या ‘मेरा नाम जोकर’ने कपूर घराण्याला कर्जाच्या खाईत लोटले, तोच चित्रपट १९९० सालानंतर आर. के. फिल्म्सला खूप पैसे मिळवून देतो आहे.
------------------
‘जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही हम थे जहाँ, अपने यहीं दोनो जहाँ, इस के सिवा जाना कहाँ...' हे सगळे सांगतोय एक विदूषक... राजू त्याचे नाव... तोच स्वत: दु:खात ग‌ळ्यापर्यंत बुडालेला. तरीही त्याला हसवायचे आहे, आम जनतेला. त्यातूनच तो स्वत:मागच्या कटकटी विसरण्याचा मार्ग शोधतोय... मग त्याने तोंडाला रंग लावलाय. रंगीत आवरणाने नाक मस्त फुगीर केलेय. डोक्यावर शंकूच्या आकाराची चित्रविचित्र रंगांनी मढलेली टोपी घातलीय. वेषही असाच बावळा ठेवलाय... राजू बन गया सर्कशीतला जोकर...! वास्तवातला राज कपूर या राजू जोकरच्या रूपात प्रेक्षकांना खूप काही सांगू पाहात होता... १९७० सालातली ही गोष्ट... पण ‘सपनों के सौदागर’ राज कपूरचा हा अलग प्रयत्न प्रेक्षकांनी मनावर घेतलाच नाही. ‘मेरा नाम जोकर' हा चित्रपट दणकून सणकून आपटला. या चित्रपटाच्या निर्मितीत राज कपूरने अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. अपयशामुळे अख्ख्या कपूर खानदानाला कर्जबाजारी व्हायची पाळी आली... पण राज कपूरच तो... रडला, पण खचला नाही. तो पुन्हा उभा राहिला. अडनिड्या, अवखळ वयातली प्रेमकहाणी असलेला ‘बॉबी' चित्रपट त्याने बनविला. तो आवडला प्रेक्षकांना. पुन्हा पैशाच्या राशी आर. के. बॅनरच्या तिजोरीत धो धो जमा झाल्या. राज कपूरची मान पुन्हा ताठ झाली. पण... हृदयात त्याच्या शेवटपर्यंत कळ येत असे. ती असे ‘मेरा नाम जोकर’ची...का आवडला नाही लोकांना तो? हा प्रश्न राज कपूरच्या मनाला भुंग्यासारखा पोखरत असे.
चित्रपटसृष्टी असेच अजब, अतर्क्य रसायन आहे. कधी अमृत बनते, कधी अॅसिड... १९७०मध्ये ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाचा सीन सुरू होता. २०११मध्ये ट्रान्सफर सीनही पुढे आला.
भारतीय अांतरराष्ट्रीय फिल्म अकादमी (आयआयएफए) आणि टोरोंटो अांतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव (टीआयएफएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने टोरोंटो येथे ‘राज कपूर रेट्रोस्पेक्टिव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले. त्या प्रसंगी राजसाहेबांचे सुपुत्र अभिनेते दिग्दर्शक रणधीर कपूर प्रमुख पाहुणे. समारंभात रणधीर बोलून गेले, ‘ज्या ‘मेरा नाम जोकर’ने कपूर घराण्याला कर्जाच्या खाईत लोटले, तोच चित्रपट १९९० सालानंतर आर. के. फिल्म्सला खूप पैसे मिळवून देतो आहे. विशेष कार्यक्रमप्रसंगी किंवा टेलिव्हिजनवर जेव्हा जेव्हा हा चित्रपट दाखविला जातो, तेव्हा आम्ही खूप कमाई करतो... पैशाच्या दृष्टीनेही आता ‘मेरा नाम जोकर’ एक यशस्वी चित्रपट बनला आहे. आज राज कपूर असते तर त्यांना आपल्या या चित्रपटािवषयी असलेला अभिमान आणखी दुणावला असता...'
या साऱ्या गतप्रसंगांची आठवण राज कपूरप्रेमींना होणे साहजिक होते, कारण तो दिवसही तसाच होता... १४ डिसेंबर. राज कपूर आज हयात असते तर यंदा या दिवशी त्यांचा ९२वा वाढदिवस असता. ‘मेरा नाम जोकर’मधला राजू जोकर म्हणतो, ‘ये मेरा गीत जीवन संगीत, कल भी कोई दोहरायेगा, जग को हँसाने बहरूपिया, रूप बदल फिर आयेगा.' सच्चे रसिक कधीच काही विसरत नाहीत. ‘मेरा नाम जोकर’मध्ये आहे, सारा सर्कस माहोल. सर्कशीतील ट्रॅपिझ खेळाडूंच्या भूमिकेसाठी राज कपूर यांनी खास रशियाहून त्या वेळी कलावंत बोलावले होते. त्यातीलच एक होती सेनिया रिबिनिका... यंदा तिलाच खास मुंबईत पाचारण करण्यात आले. राज कपूरच्या वाढदिवशी ‘मेरा नाम जोकर’चा खास खेळ आयोजिण्यात आला. त्याला उपस्थित असलेल्या रणधीर, ऋषी, राजीव कपूर यांच्या साक्षीने सेनिया रिबिनिका खूप खूप बोलली या चित्रपटाबद्दल.
सेनिया बोलली, त्यापेक्षा तिचे निळेशार डोळे जास्त बोलत होते. ‘मेरा नाम जोकर’च्या सोनेरी लडी उलगडताना ती सांगू लागली, ‘राजू जोकरची आई मरते, त्या वेळी मला रडण्याचे दृश्य द्यायचे होते. खूपच कष्ट घ्यावे लागले मला ते दृश्य करण्यासाठी. अशा वेळी राज कपूर यांच्यातील दिग्दर्शकाने कंबर कसली. माझ्या आतपर्यंत त्यांनी त्या रुदनाची अभिव्यक्ती पोहोचवली आणि मी घळाघळा रडले कॅमेऱ्यासमोर... निव्वळ नैसर्गिक अभिनय होता तो... असे एक नाही, अनेक अनुभव आहेत माझ्यापाशी या चित्रपटाचे.' सेनिया सांगता सांगता मध्येच थांबली. दीर्घ श्वास घेतला तिने. पुन्हा आठवणींच्या धुक्यात हरवली.
‘मेरा नाम जोकर’चा खास खेळ झाला गेल्या १४ डिसेंबरला. ती जागा होती, मुंबईतील पेडर रोडवरील ‘रशियन सेंटर ऑफ सायन्स अॅण्ड कल्चर’ची. इमारतीला सर्वत्र साऊंड प्रुफ खिडक्या. त्यामुळे आतला आवाज बाहेर नाही. बाहेरचा आतमध्ये नाही. पण तिथे त्या दिवशी जमलेल्या रसिकांच्या मनात राज कपूरच्या अभिनयाचा जो नाद घुमत होता, तो तेथे हजर असलेल्या सर्वांनाच ऐकायला येतच होता... सेनिया रिबिनिकाचे आता वय आहे ७४. ती व्हीलचेअरवरुनच वावरते कधीकधी. बायका आपले वय जरा कमीच सांगतात, असे म्हणतात. पण आपण ते थोडे वाढवू. सेिनया पाऊणशे वयोमानाची आहे, असे ढोबळ विधान करू. वृद्धत्वामुळे शारिरिक हालचाली मंदावल्या आहेत पण तिच्या मनाच्या उत्साहाचे वय मात्र पंचविशीचे असावे, असे कोणीही म्हणेल. आता ती पुन्हा सर्कशीतील ट्रॅपिझवर जाईल व खेळ सुरू करेल, असा एकंदरीत तिच्या वागण्यातील नूर होता. तिच्यासाठी राज कपूर म्हणजे राजू. ती संपूर्ण कार्यक्रमभर ‘राजू राजू’ म्हणतच त्या महान माणसाबद्दल बोलत राहिली. रशियन माणसांपैकी काही जणांचे इंग्रजी असते बरे, पण आपल्याला कळायला जरा कठीण. सेनियाचे इंग्रजी बोलही असेच कान टवकारून समजून घेण्याच्या लायकीचे. त्या बोलांतून झिरपणारे राजू कौतुक विलक्षणच.
तिला घरचे सगळे लाडाने म्हणतात साना. साना शब्दाचा अर्थ श्रद्धा. ती त्याच भावाने राज कपूरविषयी बोलत होती. "मेरा नाम जोकर' झळकला, तो पडला, पण त्याने माझ्या ओंजळीत दान घातले, ते चाहत्यांच्या हजारो पत्रांचे. त्या चित्रपटातील माझ्या भूमिकेचे धो धो कौतुक केले साऱ्यांनी. चित्रपटाची लांबी जरा मोठीच होती. कदाचित इतका वेळ तग धरणे प्रेक्षकांना शक्य झाले नसेल. चित्रपट पडला.
सेनिया रिबिनिकाला शोधले कसे राज कपूरने? गमतीशीरच कहाणी आहे ती. मरिना या ट्रॅपिज आर्टिस्टच्या भूमिकेसाठी राज कपूर सुयोग्य कलाकाराच्या शोधात होता. त्याला हवी होती परदेशी युवती. रशियामध्ये गेल्यानंतर विविध सर्कशींच्या तंबूत राज कपूर फेऱ्या मारायचा. सर्कशीचे खेळ मन लावून बघायचा. त्यातच एकदा राज कपूर बोल्शेई बॅले बघायला गेला. त्यात काम करणारी सेनिया त्याच्या डोळ्यांत भरली. हीच ती ‘मरिना’. राजच्या मनाने कौल दिला. मुळात सेनियाला चमकाबिमकायची फारशी आवड नव्हतीच. तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असलेली बहीण एलिना ही खरेतर त्या काळातील सेलिब्रिटी कलाकार. पण बॅले पाहिल्यानंतर राज कपूरला मलाच भेटावेसे वाटले. त्याने मला भूमिका देऊ केली. तो माझा होता दुसरा चित्रपट. त्याआधी एका चित्रपटात काम केले होते मी. ‘मेरा नाम जोकर’सहित आजवर किमान १५ ते १६ चित्रपटांत भूमिका केल्या आहेत मी. त्यातील काही रशियन चित्रपट आहेत. पण सर्वात आवडती माझी भूमिका कोणती तर ती ‘मेरा नाम जोकर’मधील मरिनाचीच.
मरिना आणि राजू जोकरचा एक किसिंग सीन आहे चित्रपटात. १९७०चा माहोल लक्षात घेता, हे म्हणजे क्रांतिकारकच. पण किसिंग सीनचे काही अप्रूप सेनियाला नव्हते. बॅले करताना ते जोडपे एकमेकांना शरीरस्पर्श करतेच करते. ती स्पर्शाची जाणीव अभिव्यक्तीच्या क्षितिजावरील उगवता तारा बनते. वासनेचा वडवानल नाही पेटत त्यातून. सेनियालाही तेव्हा असेच वाटले अगदी.
ती खरे तर बॅलेत काम करणारी. तिला राज कपूरने सर्कशीत ट्रॅपिझचे खेळ करणारी कलाकार बनवून टाकले चित्रपटात. हा बदल तिला पचवणे सुरुवातीला जरा कठीणच गेले. सगळे काम सोडून रशियाला जायची इच्छा व्हायची. पण जिद्द आड यायची. अशातूनच मरिना साकारली गेली मेरा नाम जोकरमध्ये. या चित्रपटातील तिची भूमिका पाहून काही अन्य निर्मात्यांनी तिला आपल्या चित्रपटांत भूमिका देण्यासाठी बोलणी सुरु केली होती. पण नंतर माशी कुठेतरी शिंकली. तिला भारतात काही फारसे काम मिळाले नाही. ती परतली पुन्हा रशियामध्ये. काही फुटकळ भूमिका करुन वयाच्या ४०व्या वर्षी तिने निवृत्ती पत्करली! चाळीशीत माणूस पुन्हा जवान होतो मनाने आणि या बाईचे सारे उलटेच. तिचा नवरा लवकर वारला. तिचा मुलगा एगिन हा अभिनेता आहे.
मरिनाच्या भूमिकेनंतर राज कपूर इतका खूश झाला की, त्याने सेनियाला एक सोन्याची अंगठी भेट दिली. भारतीय शिष्टमंडळ मॉस्को फिल्म फेस्टिव्हलला गेले होते त्या वेळची ही गोष्ट. अंगठी देतोय, ही पर्सनल गिफ्ट आहे, हे सेनियाला सांगायला राज कपूर लाजत, संकोचत होता. त्याने कधीही सेनियाला पत्रे वगैरे लिहिली नाहीत, पण तिचा अभिनय त्याने कायमच लक्षात ठेवला. तिनेही त्याला लक्षात ठेवले अगदी त्या सोन्याच्या अंगठीसकट.
ख्वाजा अहमद अब्बास यांच्या लेखणीतून उतरलेली ‘मेरा नाम जोकर’ची कहाणी पडद्यावर येण्यासाठी तब्बल सहा वर्षे निर्मितीच्या चक्रात गुरफटलेली होती. व्यावहारिकदृष्ट्या आर. के. फिल्म्सला खड्ड्यात घालणारा हा चित्रपट लौकिकाच्या दृष्टीने मात्र आकाश व्यापून टाकणारा ठरला. एक क्लासिक फिल्म आयुष्यभर ‘मिसअंडरस्टुड मास्टरपीस'चा मळवट भरून आपले सौभाग्य अजमावत राहिली. राहणार आहे. त्यातील अनेक कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. काही मागे उरलेत. या सर्वांच्या मनात एकच भावना होती, ‘कल खेल में हम हों न हों, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा...'
"मेरा नाम जोकर'चा विशेष खेळ पाहून परतताना अशीच भावविभोर अवस्था प्रेक्षकांचीही झाली होती. १४ डिसेंबर १९२४ रोजी राज कपूरचा जन्म झाला. १४ डिसेंबर २०२४ रोजी राज कपूरची जन्मशताब्दी साजरी होईल... त्या दिवशीही ‘मेरा नाम जोकर’चाच झेंडा पुन्हा खांद्यावर घेऊन येण्याचे काही जणांनी या विशेष खे‌ळाच्या वेळीच ठरवून टाकले. ‘सपनों का सौदागर’ असे राज कपूरला म्हणतात ते अशाच गोष्टींमुळे...

Monday, December 12, 2016

डॉ. रमेश प्रभू यांच्यावरील खटल्यात साक्षीदार म्हणून उभा राहिलो तेव्हा....समीर परांजपे


 (सोबत दिलेल्या छायाचित्रात उजवीकडील डॉ. रमेश प्रभू.)
-------------
डॉ. रमेश प्रभू यांच्यावरील खटल्यात साक्षीदार म्हणून उभा राहिलो तेव्हा....
----------------------------------------
- समीर परांजपे
---
शिवसेनेचे माजी आमदार व मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांचे निधन झाले. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रमेश प्रभू यांचे ११ डिसेंबर २०१६ रोजी रविवारी सकाळी ६.२० वाजता निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी १९८७-८८ मध्ये मुंबईचे महापौरपद भूषवले होते. डॉ. प्रभू हे प्रथम १९७३ साली पार्ल्यातून नगरसेवक झाले. तसेच १९८५ ते १९९२ या काळात ते पार्ले येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९८७ साली आमदार हंसराज भुग्रा यांचे निधन झाल्यावर पार्ले विधानसभा मतदार संघात विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार करुन मते मागितली होती. ती देशातील अशी पहिलीच निवडणुक की ज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रचार करुन निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार जिंकला होता. रमेश प्रभू यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कुंटे उभे होते. ते हरले. प्रभू यांच्या विजयाला प्रभाकर कुंटे यांनी न्यायालयात आव्हान दिले. नेमका त्या खटल्याशी माझा संबंध आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलेपार्ले येथे जे हिंदुत्वाचा प्रचार करणारी भाषणे केली. त्यातील एका भाषणाचे वृत्तांकन मी दै. नवाकाळसाठी केले होते. १९८७ साली दहावी परीक्षा नुकतीच दिली होती. दादरहून गिरगावला नवाकाळ कार्यालयात जायचो. निळुभाऊ खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली थोडेफार लिहायचो. ते देतील ती पुस्तके वाचायचो. त्यावेळी प्रॅक्टिकल सोशॅलिझम हा त्यांनी मांडलेला विचार फार जोरात होता. एक दिवस निळुभाऊ म्हणाले की, नाना मुसळे (हे नवाकाळमध्ये ज्येष्ठ वार्ताहर होते. ते महापालिकेचे वृत्तांकन करीत असत.) यांच्याबरोबर विलेपार्लेला जा. तिथे आज सायंकाळी बाळासाहेबांचे भाषण आहे. मी नानांबरोबर गेलो. साधारण रात्री आठ वाजता शिवसेनाप्रमुखांचे भाषण सुरु झाले. माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनो, मातांनो अशी सुरुवात करुन त्यांचा वाक्प्रपात सुरु झाला. त्या भाषणाने प्रभावित झालो त्या वयात...दुसऱ्या दिवशी सकाळी नवाकाळ कार्यालयात येऊन मला जशी जमली तशी बातमी लिहून काढली. आणि निळुभाऊ खाडिलकरांकडे तपासायला दिली. दुपारी नाना मुसळे आले व त्यांनीही त्या सभेची त्यांची बातमी दिली. नाना मुसळे यांचीच बातमी छापून येणार हे नक्कीच होते. कारण ते स्टाफवर होते व अनुभवी होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७लाच मला आजीने उठवले. समीर, तुझ्या नावाने बातमी छापून आली आहे. बघ. मी डोळे चोळतच नवाकाळचा अंक पाहिला. हिंदुत्व हाच आमचा श्वास - बाळासाहेब ठाकरे असे त्या बातमीचे हेडिंग होते. आणि हेडिंगखाली समीर परांजपे यांजकडून असे छापून आले होते. मी ते सारे दहा दहा वेळा पाहिले. त्या दिवशी दुपारी नवाकाळ ऑफिसमध्ये गेलो निळुभाऊ खाडिलकरांचे आभार मानायला पण ते बाहेर गेलेले होते. ही माझ्या आयुष्यात मी केलेली व नावासह छापून आलेली पहिली बातमी.
त्यानंतर काही महिन्यांतच प्रभाकर कुंटे यांनी डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. विलेपार्लेच्या त्या पोटनिवडणुकीत ज्या ज्या बातमीदारांनी बातम्या दिल्या होत्या. त्या सर्वांच्या नावे मुंबई उच्च न्यायालयाने समन्स जारी केले. मला दादरच्या पत्त्यावर समन्स येताच मी पहिल्यांदा सावरकर स्मारकात धाव घेऊन प्रख्यात पत्रकार दि. वि. गोखले यांची भेट घेतली. गोखले म्हणाले चिंता नको. त्यांनी मला न्यायालयात साक्ष देणे वगैरे म्हणजे काय ते समजावून सांगितले. प्रत्यक्ष साक्ष देण्याच्या दिवशी न्या. भरुचा यांच्या न्यायालयात समोर साक्षात शिवसेनाप्रमुखांसह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते बसलेले होते. माझे नाव पुकारले जाताच मी साक्षीदाराच्या कठड्यात उभा राहून विलेपार्ले येथे शिवसेनाप्रमुखांची सभा कशी झाली त्याचे वृत्तांकन मी कसे केले याचे इतिवृत्त सांगितले. संपूर्ण साक्ष झाल्यानंतर न्या. भरुचा यांनी विचारले की, तू खरच ही बातमी कव्हर केली होतीस? मी हो म्हणून ठामपणे सांगितले. त्या खटल्यातील सर्वात लहान वयाचा साक्षीदार मीच होतो. ही साक्ष झाली तेव्हा मी अकरावी इयत्तेत प्रवेश घेतलेला होता.
हिंदुत्वाचा विचार मला पहिल्यापासूनच कधीही पटला नाही. त्यामुळे या साक्षीतही मी हिंदुत्वाच्या विरोधात माझ्या त्यावेळच्या आकलनाप्रमाणे टीकाच केली. माझ्याप्रमाणेच अनेक पत्रकारांचीही साक्ष त्यावेळेला झाली. त्यानंतर काही वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने रमेश प्रभू यांचा विजय रद्दबादल केला. प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही प्रभू हरले. मी ज्या न्यायालयीन दालनात साक्ष दिली त्या दालनाचे महत्व पुढे कळाले. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला होता. त्यावेळी त्यांची केसही मुंबई उच्च न्यायालयाच्या याच दालनात चालली होती. तशी स्मृतिपट्टिका आता या दालनाबाहेर लावण्यात आली आहे. एका निवडणुकीमुळे इतक्या अनेक गोष्टींशी संबंध आला. त्यानंतर मात्र एक ठरविले कोणत्याही गोष्टींना ठामपणे समोर जायचे. कोणत्याही धमकी, दटावणीला घाबरायचे नाही. आदराने दोन पावलाने मागे जायचे पण ते दोनशे पावले पुढे जाण्यासाठी. यामुळेही प्रभू खटला लक्षात राहिला.
११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हिंदुत्वावर निवडणूक लढवून आमदार झाल्याबद्धल त्यांना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षांची मतदान आणि निवडणूक लढवण्यास बंदी घातली. पुढे डॉ. रमेश प्रभूही शिवसेनेत अप्रिय झाले. ते शिवसेना सोडून मनसे मध्ये गेले. मात्र त्यानंतरही डॉ. प्रभू जेव्हाजेव्हा भेटत त्यावेळी पांढऱ्या सफारी सुटमधील त्यांचे हसरे व्यक्तिमत्व लुभावणे वाटत असे. अत्यंत मृदूभाषी असा हा नेता. आपल्या राजकीय कारकिर्दीवर हिंदुत्वाची मोहर उमटवूनच ते वावरत होते. त्याचा त्यांना अभिमानही होता...आता ते या लौकिक जगातून पारलौकिकतेत विलिन झाले आहेत...
प्रभू आता प्रभूपाशीच गेले...

Sunday, December 4, 2016

आंबेडकरी चळवळीची कव्वालीयात्रा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी - ४ डिसेंबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या दि. ४ डिसैंबर २०१६च्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये शाहीर विठ्ठल उमप यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने मी लिहिलेला हा लेख. या लेखाची वेबपेज व टेक्स्ट लिंक तसेच जेपीजी फाइल व मजकूर पुढे दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-rasik-article-in-marathi-5473432-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/04122016/0/6/
---------------
आंबेडकरी चळवळीची कव्वालीयात्रा
----------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
प्रख्यात इतिहासकार न. र. फाटक यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. पण त्यांनी लिहायला घेतलेले ‘मुंबई नगरी’ हे पुस्तक त्यांच्या निधनामुळे अपूर्णच राहिले. पुढे त्यात काही भर घालून ते पुस्तक त्यांच्या मुलाने पूर्ण केले. प्रख्यात संगीतकार सुधीर फडके यांचे ‘जगाच्या पाठीवर’ हे आत्मचरित्रही त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकले नव्हते. लेखकाच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेले पुस्तक, असे एक स्वतंत्र दालनच मराठी साहित्यात निर्माण झालेले आहे. त्यात अनेक उत्कृष्ट पुस्तके आहेत. त्याच पंक्तीतले एक पुस्तक म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलेले ‘जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास’.
विठ्ठल उमप हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत ते १९६० सालापासून. ते वयाच्या आठव्या वर्षापासून गायनकलेत रुजू झाले. पहिल्यापासून ते शाहिरी कार्यक्रम करत होते. त्यांची हजारच्या वर ध्वनिमुद्रित गीते अाहेत. विठ्ठल उमप म्हणजे ‘जांभुळाख्यान’, असे समीकरण मराठी माणसाच्या मनात घट्ट रुजलेले आहे. आकाशवाणी, दूरदर्शनपासून चित्रपटांपर्यंत त्यांची गायक, अभिनेता म्हणून अत्यंत वैभवी कामगिरी आहे. उमप हे आंबेडकरांचे सच्चे अनुयायी. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी माझी वाणी भीमचरणी, माझी आई भीमाई हे गीतसंग्रह लिहिले. त्यांचा अजून एक विशेष म्हणजे, ते गझल, कव्वालीचे निस्सीम भक्त व भोक्ते होते. त्यातून त्यांनी ‘उमाळा’ हा गजलसंग्रहही लिहिला होता. उर्दूची नजाकत विठ्ठल उमपांच्या नसानसात भिनलेली होती. त्यामुळे त्या भाषेच्या संगतीने येणारे जे संगीताविष्कार आहेत, त्यांचा ध्यास त्यांना लागला होता. कव्वालीप्रेमही त्यातूनच आले.
२६ नोव्हेंबर २०१० रोजी विठ्ठल उमपांचे निधन झाले. या घटनेला नुकतीच २६ नोव्हेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण झाली. हे आठवणींचे पुस्तक त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होण्याचा योग नव्हता. परंतु गेल्या आॅगस्ट महिन्यात त्यांचा पुत्र संदेश याने पुढाकार घेतला व सुगावा प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत विलास वाघ यांनी म्हटले आहे की, ‘शाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली यांनी हा गायनप्रकार दर्ग्यातून आंबेडकरी चळवळीत आणला. कव्वालीने आंबेडकरी चळवळीत प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले आहे. नंतर गायक मंडळींनी आंबेडकर जयंती उत्सवात कव्वालीचा उपयोग करायला सुरुवात केली. विठ्ठल उमप यांचे मोठमोठ्या कव्वालांंच्या सोबत कव्वालीचे सामने होत असत. ते शीघ्र कवी होते. उत्तर देण्यासाठी त्वरित काव्यरचना करीत असत.’ शाहीर उमपांमधील कव्वालाचे वर्णन यापेक्षा अधिक समर्पक शब्दांत होऊ शकत नाही.
‘जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास’ या पुस्तकाची सुरुवात होते ती विठ्ठल उमप यांच्या बालपणीच्या दिवसांपासून. दादर पूर्वेला नायगावच्या बीडीडी चाळ क्र. १३ मध्ये त्यांचे बालपण गेले. आजूबाजूचे वातावरण असे होते की, लोककलांच्या माहोलमध्येच ते मोठे झाले. १९२५पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिचळवळीला जोर चढला होता. त्या वेळी त्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शाहीर भीमराव कर्डक पुढे आले. त्यांनी भीमजलसा काढला. तो पहिला आंबेडकरी जलसा. त्या मागोमाग आडांगळे, घेगडे, गायकवाड, कांबळे, भोसले अशा जलसाकारांचे फड उभे राहिले. ब्राह्मणांनी दलितांवर शतकानुशतके जे अत्याचार केले, त्यांना वाचा फोडण्याचे काम या जलशांतून होत असे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची माहितीही त्यात मिळे. मात्र परिस्थिती आपल्या गतीने बदलत असते. सिनेमाच्या उडत्या गीतांनी जनसमुदायाला वेड लागले. विठ्ठल उमप हे सारे परिवर्तन सजगतेने पाहात होते. जलसा मागे पडून आंबेडकरी विचारांच्या प्रचारासाठी नव्या उमेदीचे तरुण गायक, कवी पुढे आले. त्यांनी जलशाचा ढंग बदलला, त्याला कव्वालीचा पेहराव दिला. कव्वाली हा प्रकार फार पूर्वी रुजविला अजमेरचे हजरत ख्वाजा गरीब नवाज यांनी. त्यानंतर अमीर खुसरोने कव्वालीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. या कव्वाली यात्रेत ख्वाजा, खुसरो यांचे गानवारसदार बनले विठ्ठल उमप. या वाटचालीत त्यांचे सहप्रवासी होते ते म्हणजे गोविंद म्हशीलकर, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, कृष्णा शिंदे, किसन खरात, भिकाजी भंडारे, काशिनाथ शितोळे, राजेश जाधव, नवनीत खरे, दत्ता जाधव, प्रतापसिंग बोदडे आणि असे बरेच... त्यातील काही प्रसिद्ध झाले, काहींचे नाव तितके पुढे आले नाही. परंतु या सर्वांची कव्वालीवर नितांत श्रद्धा होती. कव्वालीच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची विलक्षण तळमळ होती.
विठ्ठल उमप लिखित या पुस्तकात अशा कव्वालांबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या आठवणी जागविण्यात आल्या आहेतच; शिवाय नामांतरासारख्या आंदोलनामध्ये कव्वालीने कशी साथ दिली, याचे वर्णन या पुस्तकात त्याच धगधगत्या शब्दांमध्ये येते. मुंबईच्या राणीच्या बागेतील शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह येथे श्रावण यशवंते यांच्या साहाय्यार्थ त्यांच्या मित्रांनी तिरंगी कव्वालीचा सामना आयोिजत केला होता. त्यात विठ्ठल उमप, रंजना शिंदे, शीलादेवी असे तीन गायक सहभागी झाले होते. गीत, गजल, खमसा, विनोदी गाणी या गानप्रकारापलीकडे तोवर मराठी कव्वाली गाण्यात मुक्तछंद हा काव्यप्रकार आलेला नव्हता. तो विठ्ठल उमपांनी या कव्वाल सामनाच्या माध्यमातून प्रथमच पेश केला. त्याचा मासला असा-
कल्याणच्या बाजारात कांदे विकतो
काळ्या चौकटीत डांबू नका
खर सांगतो रोकडेंना विचारा
विद्यानंदाची शपथ
हृदय धडधडतं
‘जज’ साहेब
आपण पंडित आहात, न्याय करा....
विविध माणसांच्या आठवणींतून हे किस्से पुढे खुलत जातात. उमपांची लेखनशैली धारदार आहे. त्याबरोबरच ती कधीकधी मिश्कील रूप धारण करते. कव्वाली गायकांतील उमपांचे एक सहचर म्हणजे आप्पा कांबळे. दिलखुलास वृत्तीचे, दिलदार बाण्याचे, शीघ्र गीते लिहिणारे, लोकगीतांची परंपरा जपणारे कव्वाल म्हणजे आप्पा कांबळे, असे वर्णन विठ्ठल उमपांनी त्यांच्यावरील लेखात केले आहे. त्यांच्यात नेहमी काव्यजुगलबंदी होत असे. आप्पा कांबळे यांचे लोकप्रिय गीत होते, ‘दार उघड आता दार उघड’. एका बाईचा नवरा दारू पिऊन आलाय. तो दारावर थाप मारून दार उघड, दार उघड, असं ओरडतोय. बाई दार उघडत नाही. शेजारचा एक मित्र त्याला सांगतोय, काय आलास ना कोणाचा मार खाऊन? ती दार उघडत नाही. अशा गीतांतून सामाजिक स्थितीबद्दलही प्रखर भाष्य केले जात असे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दोन-एक वर्षांनी बाबांचे निष्ठावंत कार्यकर्ते बी. सी. कांबळे व आर. डी. भंडारे यांच्यात मतभेद निर्माण झाले. दख्खनस्थ मंडळी भंडारे यांच्याबरोबर, तर कोकणातील दलित मंडळी बी. सी. कांबळे यांच्यासोबत होती. मुंबईतही दुहीचा वणवा पेटला होता. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या लेकरांनी आपापसात भांडू नये म्हणून विठ्ठल उमप यांच्यातील कवी, शाहीर, कव्वाल जागा झाला होता. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तो आपल्या दलित बांधवांच्या कल्याणासाठीच. त्या वेळी महाराष्ट्रातील विविध भागांतील एकमेकांचा दुस्वास करणाऱ्या दलित बंधूंना या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण करून देण्यासाठी विठ्ठल उमपांची लेखणी सांगू लागली...
‘मजेदार गोष्ट ऐका या पुराणाची
महाभारत आणि या रामायणाची
कथा ऐका हो या रक्तमिश्रणाची
भानगड ऐका तुम्ही या पुराणाची
मी हिंदू धर्मात मरणार नाही...’
माटुंगा लेबर कॅम्पमधील दिवसांपासून ते त्यांना भेटलेल्या रसिकांपर्यंत अनेकांच्या आठवणी या पुस्तकात विठ्ठल उमपांनी लिहिल्या आहेत. कोणतीही चळवळ म्हटली की ती केवळ भाषणबाजीतून फोफावत नाही. गाणी, कविता, लोककला यांच्या अाविष्कारातून या चळवळीला अनेक धुमारे फुटतात. आंबेडकरी चळवळीलाही असेच जे धुमारे फुटले त्यापैकी आंबेडकरी कव्वालांचे एक प्रकारचे आत्मचरित्र म्हणजे विठ्ठल उमपांचे हे आठवणीवजा पुस्तक आहे. आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, जिज्ञासू वाचक यांच्यासाठी उमप यांच्या सुरेल आठवणींचा खजिना उत्तम संदर्भस्रोत ठरू शकतो. मिळवून वाचावे, असेच हे पुस्तक आहे.
जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास
लेखक : लोकशाहीर विठ्ठल उमप
प्रकाशक : सुगावा प्रकाशन
पृष्ठसंख्या : २०४, मूल्य : २००/-
--------

Monday, November 7, 2016

पाकिस्तानचे नापाक इरादे - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी - २ नोव्हेंबर २०१६


दै. दिव्य मराठीच्या २ नोव्हेंबर २०१६च्या अंकात प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला हा लेख व त्याची जेपीजी फाइल.
-----------
पाकिस्तानचे नापाक इरादे
------------
- समीर परांजपे
----------------
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर रोजी पूंछ १८ सप्टेंबर रोजी उरी येथे भारतीय लष्करावर जे हल्ले चढवले त्यामुळे पाकिस्तानविषयी भारतात तीव्र संताप निर्माण झाला होता. त्याचीच परिणती २९ सप्टेंबरच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत शिरून सर्जिकल स्ट्राइक करण्यात तेथील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात झाली. या घटनाक्रमानंतर या दोन देशांतील वाढलेला तणाव अजूनही कमी होण्याची चिन्हे नाहीत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पाकिस्तानच्या कलाकार, गायक, तंत्रज्ञांना भारतीय चित्रपटांत कामे देण्यावर इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने बंदी घातली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यावर तसेच भारतीय मालिका, संगीताचे कार्यक्रम पाकिस्तानी दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित करण्यावरही बंदी घातली. गेल्या ६९ वर्षांतील पाकिस्तान भारताच्या संबंधांमध्ये अनेक चढउतार आले आहेत. काही युद्धेही झाली आहेत. या युद्धांमध्ये भारताकडून आपला कायमच पराभव झाला हा सल पाकिस्तानला नेहमी बोचत असतो. तो सध्या तणावाच्या काळातही तीव्रतेने दिसत आहे. शस्त्रसंधीचा, दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचा पाकिस्तानने नेहमीच भंग केला आहे. सध्याच्या तणावाच्या दिवसांत पाकिस्तानी लष्कराची मजल मंगळवारी काश्मीरमधील पूंछ भागातील बालाकोट भाग सांबा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात भारतीय नागरी वस्त्यांवर गोळीबार करण्यापर्यंत गेली. या कृत्याबद्दल पाकिस्तानी लष्कराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले असले तरी दिवाळीच्या दिवसांतच अशा पद्धतीने मुद्दामहून नागरी वस्त्यांवर हल्ले करण्यामागे पाकिस्तानचा निश्चितच कुटिल हेतू होता. सोमवारीही पाकिस्तानने भारतीय हद्दीतील लष्करी चौक्या नागरी वस्त्यांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान महिला ठार झाले होते, तर काही जवान जखमी झाले होते.
भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यापासून पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांत वाढ झालेली आहे. भारताने पाकिस्तानची प्रत्येक आघाडीवर चाणाक्षपणे कोंडी करायला प्रारंभ केल्याने त्या देशाचे सत्ताधारी लष्कर अस्वस्थ आहे. पाकिस्तानचे नाक दाबण्यासाठी सिंधू नदीचे पाणी हे मोठे हत्यार भारताच्या हाती आहे. काश्मीरमधील दहशतवाद्याचा युवा नेता म्हणून गौरव करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे संयुक्त राष्ट्रांमधील भारतविरोधी भाषण सपशेल फसले होते. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे अमेरिकेनेही एक प्रकारे समर्थनच केल्याने पाकिस्तानच्या अंगाचा तिळपापड झाला होता. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली उपद्रवशक्ती दाखवण्याची संधी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानसह काही देशांनी वारंवार साधली आहे. त्याचाच पुन:प्रयोग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर भागात नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी लष्कर हल्ले चढवत अाहे. त्याच्या आडून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करायची हा पाकिस्तानचा नेहमीचा पवित्रा काश्मीरच्या सीमावर्ती भागात लावलेल्या कॅमेऱ्यांमुळे उघडकीस आला. तेथेही पाकिस्तान उघडे पडले.
सीमेवरती या कारवाया सुरू असताना पाकिस्तानचे हस्तक भारतातील विविध प्रांतांतही सक्रिय झाले होते त्यांना पाकिस्तानच्या भारतातील दूतावासाकडून मदत मिळत होती. पाकिस्तानातील दूतावासातील एक कर्मचारी महमूद अख्तर याला भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती असलेल्या कागदपत्रांसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला भारत सोडून जाण्याचा आदेश सरकारने दिला. या कारवाईबद्दल पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कांगावा केला तरी सत्य उजेडात आल्याशिवाय राहिले नाही. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयमधून महमूद प्रतिनियुक्तीवर पाकिस्तानच्या भारतातील दूतावासात आला होता. तो मूळचा पाकिस्तानी लष्करातील बलुच रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होता. महमूद अख्तरने भारतीय तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार त्याच्या या हेरगिरीमध्ये पाकिस्तानी दूतावासातील अजून चार अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली होती. आता या चारही अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावण्याचा विचार पाकिस्तानने चालवला आहे.
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्यावर बीएसएफच्या जवानांनी गेल्या ११ दिवसांत पाच हजार तोफगोळे डागले आहेत ३५ हजारांहून अधिक गोळ्या डागल्या आहेत. या कालावधीत पाकिस्तानने ६० वेळा शस्त्रसंधीचा भंग करण्याचे प्रकार घडले. या सगळ्यांतून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की भारतातील पाकिस्तानच्या कारवाया यापुढील काळातही वाढत जातील. भारताने आता अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
(paranjapesamir@gmail.com

रावणबाबा की जय! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी - ३० ऑक्टोबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या ३० अॉक्टोबर २०१६च्या रसिक पुरवणीमध्ये मिथक या संकल्पनेभोवती फिरणारे तीन लेख मी लिहिले. त्यापैकी हा एक लेख...त्याची लिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-rasik-araticle-temple…
--
रावणबाबा की जय!
-----------
- समीर परांजपे
---

जुने -नवे पौराणिक चित्रपट, मालिका यांमध्ये संस्कृतप्रचुर हिंदी बोलणारे देव तसेच दानवही दिसतात. देव या शब्दाला पर्यायी शब्द ईश्वर, भगवंत असे अनेक आहेत. दानवांनाही राक्षस, असुर, दैत्य असे बरेच काही पर्यायी शब्द आहेत. इतके सारे साम्य असूनही एक मोठा ढोबळ फरक म्हणजे, देव हे सद‌्गुणांचे पुतळे तर दानव म्हणजे दुर्गुणांचा नुसता चिखल. त्यामुळे मालिकांमधील देव एकजात सारे चिकनेचुपडे आणि दानव काळेकभिन्न, कल्ले, केस घनदाट वाढविलेले, लालभडक ओठांचे आणि डोळ्यांचे... दानवांचे सगळेच उग्र... दानव हा शब्द जरा वापरताना अवघडच जातो. आपण त्यांना राक्षस नाहीतर असुर म्हणू... असुर हा त्यातल्या त्यात बरा शब्द. म्हणजेच सुर अर्थातच देव.
पश्चिम बंगालमधील जलपायगुडीतील कॅरॉन टी इस्टेटमध्ये राहणारा बार्गी असुर. तो आहे असुर या अादिवासी जमातीतील. त्यांची असुरी नावाची भाषा असून बार्गी ती भाषा आता रोमन लिपीत लिहितो, असे कळल्यानंतर तर अजून एक धक्का बसलेला असतो. बार्गी हा आदिवासी जमातीतला. त्याचाच सहकारी चाम्रू असुर सांगतो की, आम्ही आजवर कधीच दुर्गापूजा केलेली नाहीये. झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील सखुआपानी गावातील एका वृद्धाची प्रतिक्रिया तर भलतीच वेगळी. तो म्हणतो, ‘नवरात्रीच्या दिवसांत आम्ही काहीही पूजाअर्चा करत नाही. मात्र नववा दिवस संपला की, आमच्या पूर्वजांना नैवेद्य दाखवितो. त्यांचे आभार मानतो की, आम्हाला या दिवसांतही तुम्ही सुरक्षित ठेवलेत.’
असुर जमातीची वस्ती काही राज्यांत आढळते. झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल व अन्य काही राज्यांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. सखुआपानीचा जो वर उल्लेख झाला तिथे असुर जमातीतले सुमारे दोन हजार लोक राहतात. २०११च्या जनगणनेत स्पष्ट दिसले की, झारखंडमध्ये २२,४५९; तर बिहारमध्ये ४,१२९ असुर राहतात. पश्चिम बंगालमधील बीरा येथे महिषासुर स्वर्ण सभा या संघटनेद्वारे महिषासुर दिनाचे आयोजन केले जाते. थाटात उत्सव होतो या दिवशी.
‘महिषासुराचे वंशज आम्ही’ असे गौरवगीत गाताना असुर जमातीचे लोक आढळतील.
महिषासुराला दुर्गादेवीने मारल्याबद्दल नवरात्रीचा उत्सव हिंदू धर्मीय साजरा करतात; पण असुर जमातीसाठी हा कालावधी शोककळेचा असतो. चाम्रू असुरने सांगितले की, मी लहानपणापासून लोकांच्या श्रद्धा व अंधश्रद्धांचे सारे पदर बघत आलोय. पण त्यांच्या आहारी जाऊन कोणी असुर जमातीच्या लोकांवर हल्ले चढविले आहेत, असे आजवर कधीही बघितलेले नाही. पूर्वी जमीनदारी प्रबळ होती. आमच्याकडच्या विष्णुपूर गावचेच उदाहरण घ्या. दुर्गापूजेसाठी लाकडे, विशिष्ट झाडांची पाने आपल्याला आणून द्या, असा जमीनदाराचा सांगावा आम्हाला यायचा. आम्ही जंगलातून हे साहित्य गोळा करून ती तसेच आमची काही हत्यारे पूजेसाठी जमीनदाराला देत असू. नवरात्रौत्सवातील ही दुर्गापूजा सुरू होण्याअगोदरच आम्ही तेथून आमच्या गावात परतायचो.’
चाम्रू असुर राहतात, त्या ठिकाणाहून जवळच आहे बॉक्साइटची खाण. तिथे अिनल असुर हा मजूर म्हणून काम करतो. तोही आपल्या बालपणीच्या आठवणी सांगण्यात रमला, ‘सखुअापानी गावापासून सुमारे दहा किमी लांब असलेल्या जोभी पाथ भागात दुर्गापूजेचा मंडप असायचा. मात्र तिथे जाऊ नको, असे माझ्या वडिलांनी मला बजावले होते. मी कारण विचारले तर आपल्या पू्र्वज महिषासुराला दुर्गादेवीने कसे मारले वगैरे कथा त्यांनी सांगितली. त्यांनी मलाच प्रतिप्रश्न केला होता, ‘तुझी बहीण, भाऊ असे कोणी मारले गेले तर तो दिवस तू उत्सव म्हणून साजरा करशील का?’ मी ‘नाही’ असे उत्तर दिले होते. पण असुर जमातीतील जी किशोरवयीन मुले आहेत, त्यांना या जुन्या कहाण्यांविषयी फारसे माहीत नाही. ममत्वही नाही. सखुआपानी गावापासून जवळच सरकारी शाळा आहे. तिथे असुर व कोरवा जमातीतील सुमारे अडीचशे मुले शिकतात. त्यांनाही या जुन्या गोष्टींशी काही देणेघेणे नाही.’
असुरांमधील अजून एक ठळक नाव म्हणजे रावण. रावण हा प्रत्यक्षात दशग्रंथी व वेदाभ्यासी होता. महान तपस्वी होता. त्याला दुर्बुद्धी झाली आणि त्याने सीतेला पळवून नेले व त्यातून सारे रामायण पुढे घडले. अशी जी कथा सांगितली जाते, ती जनमानसात इतकी रुजलेली आहे की, रामलीलेच्या शेवटी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, तेही हिंदी भाषिक राज्यांत अग्रक्रमाने. दक्षिणेतील राज्यांत मात्र द्रविड लोक रावणाला पूज्य मानतात. त्याची पूजा करतात.
हाच प्रकार उत्तर प्रदेशमधील बिसराख या गावात होतो. आपल्या गावात रावणाचा जन्म झाला, असे गावकरी मानतात. तिथे रावणाचे एक मंदिरही आहे. त्या मंदिराच्या मालकाची गाडी बाहेरच उभी असते. तिच्यावर गुज्जर व रावण या दोघांचीही मोठी स्टिकर चिटकवलेली आहेत. बिसराख गावातील लोक रावणाला खलनायक मानत नाहीत. आपल्या गाड्यांच्या काचांवर ते रावणाचे स्टिकर चिटकवतात, त्याचे नाव लिहितात. तसेच रावण हे नाव व त्याचे िचत्र असलेले टी शर्ट गावकऱ्यांनी बनवून घेतले आहेत. गावात क्रिकेट स्पर्धा होतात, त्या वेळी पोरेटोरे हे टीशर्ट घालून झोकात वावरत असतात. या गावात रामलीला सादर होत नाही. ती एकदा-दोनदा केली गेली तेव्हा गावातील कोणी ना कोणी तरुण दगावतो, असा गावकऱ्यांचा अनुभव आहे. यात अंधश्रद्धेचाही भाग अाहेच, पण त्याकडे गावकरी फार लक्ष देत नाहीत. महिषासुराचा गुणगौरव केल्याच्या प्रकरणावरून गदारोळ माजलेला होता, त्याच्याशी या गावातील लोकांना काही देणेघेणे नव्हते. रावण हा आमच्या दृष्टीने देवताच होता. या श्रद्धेपासून आम्ही कधीच फारकत घेणार नाही, असे बिसराख गावच्या सरपंचानेही ठामपणे सांगितले. गावात रावणाचा एक पुतळा आहे. तो एक महान शिवभक्त होता, असेही गावकऱ्यांचे मत आहे. बिसराख गावातील शिवमंदिरातही रावणाला मानाचे स्थान आहेच. तेथील शिवलिंगाजवळ रावणाच्या वडिलांनीही तपश्चर्या केली होती, असे ते मानतात. भारतातील बहुसंख्य आदिवासी जमाती रावणाला अापला पूर्वज मानतात.
पश्चिम बंगाल, ओदिशा, आसाम, झारखंड येथील सगळ्यात मोठा आदिवासी समूह आहे तो संथाळांचा. त्यांनी तर आपण रावणाचे वंशज आहोत, असे जाहीरच केले आहे. झारखंड-पश्चिम बंगालमध्ये नवरात्र, दसऱ्याच्या दिवसांत रावणोत्सवाचे आयोजन करतात. संथाळ आदिवासी आपल्या मुलाचे नावही ‘रावण’ ठेवतात! झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळण्यास नकार दिला होता.
हिंदू धर्माच्या धारणेपासून आदिवासी परंपरा अनेकदा फटकून वागते. म्हणूनच रावण, महिषासुर आदिवासींच्या दृष्टिकोनातून असुर नसतात, नायक असतात. देशात असेही वैविध्य आहे आणि ते टिकवायलाच हवे.
परंपरा व बदलती जीवनशैली
असुर दिवाळीच्या दिवसांतच सोहराई नावाचा सण साजरा करतात. करंज्याचे तेल पोट, छाती व नाकाला चोळून तसेच काकडी खाऊन ते हा सण साजरा करतात. यामागचे कारण असे की, असुरांचा पूर्वज महिषासुराला जेव्हा दुर्गादेवीने मारले तेव्हा त्याच्या पोट, नाक व छातीतून रक्तस्राव सुरू झाला. म्हणून असुर आपल्या शरीरावरील या अवयवांना करंज्याचे तेल लावतात. काकडी खाल्ली जाते ती मारणाऱ्याचे काळीज आहे, असे मानून. एकेकाळी असुरांच्या गावांमध्ये हत्यारे बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालायचे. काळाच्या ओघात ते आता रोडावले आहे. असे म्हणतात, मगध साम्राज्यातील सैन्याला असुरांनी बनविलेल्या हत्यारांमुळे अनेक विजय मिळवता आले. असुरांनी बनविलेल्या लोखंडाच्या हत्यारांना गंज लागला, असे कधी झाले नाही. सम्राट अशोकाच्या काळात अनेक लोहस्तंभ देशात उभारले गेले. त्यांना कधीही गंज लागलेला नाही, हेही सर्वविदित आहे. असुरांची कामगिरी ही अशी असामान्य होती. असुर जमातीचे लोक कधीही गाईचे दूध पीत नाहीत. गाईचे सारे दूध तिच्या वासरानेच प्यायला हवे, असा त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे ते वासरु सशक्त होते. तो बैल असल्यास शेतीकामात त्याचा पुरेपूर उपयोग होतो. गाय असल्यास तिचाही उपयोग असतोच. असुर जमातीच्या गावांमध्ये आजही चहा किंवा दूध खूपच कमी वेळा प्यायले जाते. त्या ऐवजी तांदळापासून बनविलेले मद्य आनंदाने प्राशन केले जाते. आधुनिकीकरणाने असुर जमातीच्या जीवनशैलीतही काही बदल झाले आहेत. ते अपरिहार्यही होते. असुरांची मुले शाळेत जातात तेव्हा हिंदी किंवा त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेत शिकतात. असुरी भाषेचा त्यांना विसर पडला आहे. असुरांची नावे परंपरेतून आली आहेत. पण शहरात ठेवतात तशी आधुनिक धाटणीची नावे आता असुर आपल्या मुलाबाळांची ठेवू लागले आहेत.

शेवटच्या आर्यांची विस्मयकथा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी - ३० ऑक्टोबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या ३० अॉक्टोबर २०१६च्या रसिक पुरवणीमध्ये मिथक या संकल्पनेभोवती फिरणारे तीन लेख मी लिहिले. त्यापैकी हा एक लेख...त्याची लिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-rasik-article-end-of-…
--
शेवटच्या आर्यांची विस्मयकथा
---
- समीर परांजपे
- Oct 30, 2016, 08:33 AM IST
---
भारताचा प्राचीन किंवा वैदिक काळापासूनचा इतिहास आर्य व अनार्य यांच्या भोवतीच फेर घालताना िदसतो. अनार्य हे मूळ भारतातलेच, हे नक्की झाल्याने त्याबद्दल कोणी प्रश्न विचारताना दिसत नाही. आर्यांच्या मूळ वसतिस्थानाबद्दल मात्र प्रकांडपंडितांची विविध मतांतरे आहेत. हिटलरला आपण आर्यवंशीय असल्याचा विलक्षण अभिमान होता. त्या अभिमानापायी त्याने लाखो ज्यूंचा नरसंहार घडवून आणला. थोडक्यात काय, तर आर्य या शब्दाने आधुनिक काळापर्यंत सर्वांनाच पुरते जखडून ठेवले आहे. आर्य हे युरेशियातून भारतात आले होते, की ते मूळ भारतातलेच होते, असा खल सदासर्वदा चाललेला असतो. डॉ. भीमराव आंबेडकरांनी आर्यांच्या मूळ स्थानाबद्दल १९४६मध्ये मांडलेली मते महत्त्वाची वाटतात. ज्यांनी वैदिक वाङ‌्मय तयार केले ते लोक आर्य वंशाचे असून ते मूळचे भारताबाहेरचे होते. पण त्यांनी भारतावर स्वारी केली. आर्यांचा रंग गोरा होता, अशी काही निरीक्षणे डॉ. आंबेडकरांनी नोंदविली आहेत. मानववंशशास्त्रज्ञांनीही आर्यांबद्दलच्या चर्चेत बरीच भर घातली आहे. या सगळ्याचे सार हेच की, आर्य शब्दामागचे कुतूहल काही केल्या संपत नाही व शमत नाही.
हेच कुतूहल घेऊन अनेक विदेशी पर्यटक, संशोधक यांचे पाय वळतात, जम्मू-काश्मीरचा भाग असलेल्या लडाखमध्ये. लडाखची राजधानी लेहपासून १६३ कि.मी. अंतरावर आहेत धा आणि हानू तसेच दारचिक, गहानू ही गावे... या गावांची वस्ती जेमतेम पाच हजारांचीही नसेल. तेथे राहणारे लोक ओळखले जातात ब्रोगपा किंवा ड्रोगपा या नावाने. भारतात कोणे एके काळी असलेल्या आर्यांचे ते अखेरचे उरलेले वंशज आहेत, असे म्हटले जाते. त्यामुळे ही चार गावेही आर्यांची गावे म्हणूनच जगभरात प्रसिद्ध आहेत... हे लोक आता तिबेटियन बुद्धधर्माचे अनुयायी आहेत. पण त्यांचा भूतकाळ काही अभ्यासकांना व आर्यप्रेमींना स्वस्थ बसू देत नाहीये. कोणी म्हणतात, सातव्या शतकात ते गिलगिट (हा भाग आज पाकिस्तानात आहे) भागातून भारतात आले. कोणी म्हणतो की, भारतावर स्वारी करायला आलेल्या अलेक्झांडरच्या सैनिकांचे ते वंशज आहेत... सर्वसामान्य लडाखी माणसापेक्षा या ब्रोगपा लोकांची चेहरेपट्टी अगदी वेगळी आहे, हे वेगळे सांगायला नकोच.
शुद्ध आर्यवंशाचे लोक शोधण्याच्या वेडाने संजीव सिवन या लघुपटकारालाही झपाटले होते... ‘द अचतुंग बेबी - इन सर्च ऑफ प्युरिटी’ या सिवनच्या लघुपटात त्याचा कॅमेरा ब्रोगपांच्या घराघरांत व मनामनांत शिरला आहे. शुद्ध आर्यवंशापासून आपल्याला अपत्य हवे, असा एक विचार पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषत: जर्मनीमध्ये प्रचलित आहे. या विचाराने झपाटलेल्या जर्मन युवती मग त्यासाठी ब्रोगपा यांच्या गावी येतात. सिवनच्या लघुपटातही अशाच जर्मन युवतीचे चित्रण केलेले आहे. तिचा चेहरा कुठेही दिसत नाही आपल्याला पडद्यावर. पण तिने ज्या ब्रोगपा पुरुषाशी संग केला, तो दिसतो ठळकपणे. त्याचे नाव सेवांग ल्हुनडुप. दारचिक गावात राहणारा. सेवांग म्हणतो, मला तिला मूल द्यायचे आहे शुद्ध आर्यवंशाचे... त्यात मला काहीच खर्च नाही... एक दिवस माझ्यापासून झालेले मूल जर्मनीहून इथे येईल. आणि मला जर्मनीला घेऊन जाईल... सिवनचा लघुपट जगभर प्रदर्शित झाला. तसे सेवांगचे नाव झाले. त्याच्याप्रती लोकांना असलेला आदरही वाढला. ही जी जर्मन युवती होती तिने सेवांगला मोबदला पैशांत दिला नाही. तर सेवांगच्या कुटुंबीयांना तिने खूप वेगवेगळ्या भेटी आणल्या होत्या. त्यांनाही खूश ठेवण्याचा तिचा प्रयत्न होता!
गोरेगोमटे, निळे डोळे, गालाची हाडे चांगलीच वर आलेली, धारदार नाक, तीव्र बुद्धिमत्ता अशी सारी लक्षणे ब्रोगपा पुरुषांमध्ये आढळतात. जर्मन युवती आशक होतात याच वैशिष्ट्यांवर. येथील पुरुषांशी शरीरसंबंध राखून जर्मन युवती गर्भवती होतात. त्यांना जे अपत्य होते ते त्यांच्या मते असते शुद्ध आर्यवंशीय. या विलक्षण प्रकारातून ब्रोगपांच्या गावांमध्ये ‘प्रसूती पर्यटनालाही’ चालना मिळाली आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न आहेच, शिवाय विदेशी युवतींना माता बनविण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे मोलही ब्रोगपा पुरुषांना डॉलरमध्ये मिळते.
या विचाराबद्दल एका जर्मन तरुणीला लघुपटात सवाल विचारला जातो तेव्हा ती म्हणते, मी अजिबात चुकीचे वागत नाहीये. मला जे हवेय त्याचे पैसे मोजते मी. ब्रोगपा पुरुषांनाही आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांची चांगलीच जाणीव झाली आहे. ते राहतात त्या गावांच्या परिसराला जगभरात आर्यन व्हॅली म्हणून ओळखले जाते. मध्य आशियातून आर्य लोक हजारो वर्षांपूर्वी भारतात आले, असा सिद्धांत मॅक्समुल्लर या जर्मन विचारवंताने मांडला होता... त्याचाही आधार आर्यन व्हॅलीमध्ये येणाऱ्या जर्मन युवतींना असतोच. मात्र या सिद्धांताला पाठबळ देणारा ठोस पुरावाच नाही, हे दिसून आले २०११मध्ये. त्या वेळी भारतातील ३० वंशगटांची जनुकीय पाहणी करण्यात आली. ‘भारतात आर्यांनी आक्रमण करून येथील लोकांना िजंकून आपली संस्कृती इथे रुजविली, तसेच आर्य भारताबाहेरून इथे आले होते किंवा आर्य असा काही वंश होता, हे सिद्ध करणारा एकही पुरावा जनुकीय चाचण्यांतून मिळालेला नाही.’ असे मत शास्त्रज्ञ डॉ. लालजी सिंग यांनी व्यक्त केलेय... म्हणजे पुन्हा आर्यांबाबतचा गुंता वाढला...
ब्रोगपांना रीतसर शालेय व उच्च शिक्षण देण्याचेही प्रयत्न सरकारकडून होत आहेत. काही ब्रोगपांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे जो सांस्कृितक फरक त्यांच्या जीवनात निर्माण झाला आहे, त्याचीही छाया त्यांच्या गावांवर दिसते. या जमातीतील लोकांची डीएनए सँपल एका अभ्यासादरम्यान तपासली गेली. पण त्यावरून ते आर्यांचेच वंशज आहेत, हे ठोसपणे सांगता येईना. कारण आर्य म्हणजे नेमके कोण, हेच अजून जनुकीयशास्त्रदृष्ट्या नीटसे ठरविता आलेले नाही. ते काही का असेना, हे वास्तव किंवा अवास्तव आर्यवंशज व त्यांचे वीर्य जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना भुरळ पाडते आहे. त्यामुळे ब्रोगपा जमातीला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे...
ब्रोगपांची बातच निराळी
ब्रोगपांच्या गावांमध्ये जेव्हा कोणताही पर्यटक प्रवेश करतो, त्या वेळी त्याला आपण निराळ्या चर्येच्या लोकांमध्ये आलोय, ही जाणीव लगेचच होते. एखादा ब्रोगपा पुरुष तुमच्याशी बोलायला येतो. आपल्या मोबाइलमधील ब्रोगपा युवतीचे छायाचित्र दाखवितो. तुम्हीही त्या युवतीच्या निळ्या डोळ्यांचे कौतुक करायला लागता...जर्मनीहून पर्यटक येतातच; पण फ्रान्स, आईसलँड, ऑस्ट्रिया, जपान, कोरिया, पोलंड, इस्राएलमधील लोकसुद्धा शेवटच्या आर्यांच्या गावात पायधूळ झाडतात. हा सगळा भाग सीमावर्ती असल्याने ितथे भारतीय लष्कर तैनात आहे. हे जे विदेशी पाहुणे आर्यांच्या गावात येतात, त्यांची प्रवासात गैरसोय होणार नाही, यासाठी लष्करही दक्ष असते. ब्रोगपांची गाणी मुरली मेनन या संशोधकाने ध्वनिमुद्रित केली आहेत. त्यांच्या नृत्याचेही चित्रीकरण केले आहे. ते खूपच वेगळ्या धर्तीचे आहे, असे निरीक्षण मेननने नोंदविले आहे. ब्रोगपांना हिटलरची विकृत आर्यविचारधारा अजिबात मान्य नाही. ते तसे बोलूनही दाखवितात.

द्रौपदीचे वाण - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी ३० ऑक्टोबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या ३० अॉक्टोबर २०१६च्या रसिक पुरवणीमध्ये मिथक या संकल्पनेभोवती फिरणारे तीन लेख मी लिहिले होते. त्यापैकी हा एक लेख...त्याची लिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-rasik-article-of-drop…
--
द्रौपदीचे वाण...
---
- समीर परांजपे
---
असे म्हणतात की, सारे रामायण घडले ते सीतेचे रावणाने अपहरण केल्यामुळेच... महाभारतही घडले, त्यामागील महत्त्वाच्या कारणांपैकी द्रौपदीचा कौरवांनी केलेला अपमान हेदेखील एक कारण होतेच. पांचाल देशाचा राजा द्रुपद याची द्रौपदी ही मुलगी. यज्ञसेनी, सैरंध्री, महाभारती, कृष्णा अशा अन्य नावांनीही द्रौपदीला ओळखले जात असे. द्रौपदीचा विवाह पाच पांडवांशी झाला. बहुपती प्रथेचे प्राचीन काळापासून भारताला माहीत असलेले हे अतिशय परिचित उदाहरण. बहुपती प्रथा ही काही केवळ प्राचीन काळाचीच मिरासदारी नाही. आजच्या आधुनिक जगातही डोळ्यांना सहज दिसू शकतात द्रौपदी... मग त्या ग्रामीण भागातील असोत वा शहरी भागातील... त्यांच्यातील समान धागा एकच की, परंपरेच्या जोखडात त्या पुरत्या अडकलेल्या आहेत. २१व्या शतकात भारत सज्ज होतोय महाशक्ती बनण्यासाठी, पण त्याच्या मातीत अशाही गोष्टी आहेत अजून, हे सत्य नाकारता कसे येईल?
हिमाचल प्रदेशसारखे राज्य हे निसर्गसौंदर्याने नटलेले नंदनवनच. दरवर्षी हजारो पर्यटक येतात या राज्यात हिमालयाच्या कुशीतील आल्हाददायकतेचा अनुभव घेण्यासाठी. काश्मीर धगधगते असल्याने हिमाचल प्रदेशला पर्यटकांची पसंती ही कायमच असते. या राज्यातील सांगला खोरे हा भाग मधुचंद्रासाठी आसुसलेल्या नवदांपत्यासाठी तर स्वप्नसृष्टीच. शिवाय सफरचंदांच्या बागांनी या भागाला आलेली खुमारी वेगळीच. शिमला ही हिमाचलची राजधानी. तेथून सुमारे २०० कि.मी. अंतरावर असलेल्या किन्नोर जिल्ह्यात असलेल्या सांगला खोऱ्यामधील जनजीवन हे पुराणकथांतील पात्रांची जीवनशैली, वर्तन, आदर्श यांच्याशी जोडलेले. रणजीत सिंग व चंदरप्रकाश हे दोन सख्खे भाऊ. त्यांच्यात विलक्षण प्रेम आणि जिव्हाळा. पण अजूनही एक बंध त्यांना एकमेकांशी जोडून ठेवतो, ते म्हणजे या दोन भावांची बायको एकच आहे ती म्हणजे सुनीतादेवी... या दोन भावांपैकी एकाशी तिचे आधी लग्न झाले. त्यानंतर पाच वर्षांनी तिने आपल्या नवऱ्याच्याच सख्ख्या भावाशी लग्न केले. दोन दादल्यांबरोबर एकत्र नांदणे सुरू झाले. सुनीतादेवीशी तिच्या दोन्ही नवऱ्यांनी ज्या रीतीने विवाह केले, तो हिंदू विवाह कायद्यानुसार गुन्हा आहे.
भारतात ब्रिटिशांच्या राजवटीत व नंतरही बरेच कायदे केले गेले. काही कायद्यांचे सकारात्मक परिणाम नक्कीच झाले; पण काही कायद्यांमधून अशा पळवाटा काढण्यात आल्या की, मती गुंग व्हावी. काही वेळेस कायदा असूनही उपयोग होत नाही, कारण कायदाबाह्य गोष्ट संबंधित व्यक्ती, त्यांचा समाज यांनी मान्य केलेली असते. त्यांच्या लेखी तो गुन्हा नव्हे तर योग्य कृती असते. सुनीतादेवीलाही त्यामुळे बहुपती प्रथेचा भाग होताना फार काही अपराधी वाटले नसावे... तिचे तसे बरे चाललेय. तिला या दोन पतीराजांपासून दोन मुली झाल्या आहेत. आपल्यावर प्रेम करणारे दोन नवरे लाभल्याबद्दल ती उलट परमेश्वराचे आभारच मानते.
परंपरेचा प्रवाह तिच्या घरातून असा वाहात राहतो. तिचे घर ज्या ठिकाणी आहे, त्यापासून जवळच बास्पा नदी वाहते. नदीकिनारी सफरचंदाच्या बागा आहेत... या नदीचा ओघ कमी झाला नाही. तसाच सुनीतादेवीच्या जीवनाचा प्रवाहही खळाळता आहे. त्याला बहुपतीत्वामुळे बांध पडलेला नाही.
महाभारतातील द्रौपदीशी आपले काही नाते आहे का? असा प्रश्न येत असेल का सुनीतादेवीच्या मनात? त्याबद्दल खरंच काही सांगता येणे कठीण आहे. तिच्या दोन पतींपैकी रणजीत हा अर्धवेळ पोस्टमनचे काम करतो, तर दुसरा पती चंदन हा किराणा मालाचे दुकान चालवतो. पाच पतींची पत्नी म्हणून द्रौपदीला ‘पांचाली’ म्हटले जात असे. दोन पतींची पत्नी म्हणून सुनीतादेवीला ‘द्विपती’ म्हणायला हरकत नसावी. पण तिच्या पंचक्रोशीत अशा अजून काही द्विपती स्त्रिया आहेत. एक तर सुनीतादेवीच्या नात्यातच आहे. रणजीत, चंदन यांचे दोन मोठे सख्खे भाऊ अमरजीतसिंग व सोवनसिंग. या दोघांनीही एकाच मुलीशी विवाह केला आहे. अशा प्रकारचे विवाह झालेली सुमारे १५ कुटुंबे सांगला परिसरात आहेत. रणजीत, चंदन, अमरजीतसिंग व सोवनसिंग या चौघांना तर काही गोष्टी वारसाहक्कानेच मिळाल्या आहेत. जसे या चौघांना दोन वडील आहेत आणि आई आहे एकच...
किन्नोर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात बहुपती प्रथा ही तेथील जनजीवनाचा अविभाज्य भागच आहे. पण अशी प्रथा का पडली असावी? केवळ महाभारतात द्रौपदीने पाच पांडवांशी लग्न केले म्हणून... पण तसे बिल्कुल नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक समाजकारण, अर्थकारण हे असतेच... किन्नोरमध्ये बहुपती प्रथा रुजली, त्यामागे वारसाहक्काने मिळालेल्या शेतीचे िवभाजन होऊ नये, हा विचार प्रबळ आहे. किन्नोर जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचे एकही प्रकरण सापडणार नाही. या जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ८५७. बहुपती प्रथेला पोषक अशीच ही आकडेवारी आहे. आपल्याला वारसाहक्काने मिळालेली शेतजमीन ही मौल्यवान संपत्तीच आहे, अशी धारणा आदिवासींमध्ये असणे अगदी स्वाभाविक आहे. किन्नोर जिल्ह्यातील आदिवासी जमाती त्याला कशा अपवाद असणार? त्यामुळेच शेतजमिनींचे वाटप होऊन शततुकडे होऊ नयेत, म्हणून जागरूक असलेल्या या लोकांनी बहुपती प्रथेला जवळ केले. दोन पुरुषांनी एकाच स्त्रीशी विवाह करणे, याचा पुढचा टप्पादेखील काही जणांनी गाठलेला दिसतो. किन्नोर जिल्ह्यातील पुह व यांगथांग या अतिदुर्गम भागात चार-पाच भावांनी एकाच महिलेशी सामायिक विवाह केल्याची काही उदाहरणे आहेत. पण या प्रथेमध्येही थोडी सुधारणा होऊन कालांतराने दोन भावांसाठी एक सामायिक पत्नी असे प्रमाण स्थिर झाले आहे.
हमने घर छोडा है...
बहुपती प्रथेचेही काही नियम, गुपिते असतात. जर बहुपतींपैकी एखादा पती सामायिक पत्नीबरोबर रतिक्रीडेत मग्न असेल तर ते इतरांना कळावे, म्हणून तो आपली किन्नोरी टोपी घरातील बेडरुमच्या बाहेर टांगून ठेवतो. ती पाहून इतर पतीराजांना आतील परिस्थितीचा लगेच अंदाज येतो. मग कोणीही त्या खोलीत रममाण झालेल्या दोन जिवांना त्रास द्यायला तिथे जात नाही! बहुपतीत्व आनंदाने स्वीकारणाऱ्या स्त्रियांना काही गोष्टींची मोकळीकही आहे. जसे आपला पती किंवा सहचर कोण असावा, हे निवडण्याचे तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. बहुपती विवाहाला संबंधित महिलेची संमती असली तरच पुढचे पाऊल उचलले जाते. शतकानुशतके या भागात अजून एक प्रथा चालत आली आहे. दारोच फिमू असे तिचे नाव. गावच्या जत्रेतून किंवा सार्वजनिक ठिकाणाहून प्रौढ मुलगा आपल्याला आवडणाऱ्या प्रौढ मुलीला सोबत घेऊन पलायन करतो. त्या मुलाचे नातेवाईक मग त्या मुलीच्या घरी जाऊन लग्नाचा औपचारिक प्रस्ताव देतात. त्या वेळी मुलीच्या नातेवाइकांना फासूर या पेयाने भरलेली एक बाटली दिली जाते. या समारंभाला बोतल पूजा असे नाव आहे. हे सर्व होण्याआधी पळालेल्या जोडप्याने शारीरिक संबंधही प्रस्थापित केलेले असतात. अगदी ‘हमने घर छोडा है’ स्टाइलने...

Sunday, August 28, 2016

सुधारणेला मिळाले पाठबळ - समीर परांजपे लेख - दै. दिव्य मराठी २७ ऑगस्ट २०१६

दै. दिव्य मराठीच्या दि. २७ ऑगस्ट २०१६च्या अंकात मी लिहिलेल्या लेखाची वेबलिंक, टेक्स्टलिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-about-haji-ali-dargah-must-allow-women-to-enter-5404199-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/27082016/0/6/
-----
सुधारणेला मिळाले पाठबळ
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून तेथील गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली दर्गा, महालक्ष्मी मंदिर अशा अनेक वास्तू विदेशांतही चिरपरिचित आहेत. त्यातील हाजी अली दर्ग्याच्या ‘मजार’ (गाभारा) भागात महिलांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय सदर प्रार्थनास्थळाच्या न्यासाने २०१२ मध्ये घेतला होता. त्यानंतर हाजी अली दर्ग्याची ओळख काहीशी वादग्रस्त बनली होती. आता ही महिला प्रवेशबंदी अयोग्य असल्याचा निकालच मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने सुधारणावादी विचारांना पाठबळ मिळाले आहे. सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मृत्यर्थ उभारलेला हा दर्गा सुमारे ५८६ वर्षे जुना आहे. या दर्ग्यातील मजार भागापर्यंत महिला जोवर जात होत्या तोपर्यंत कोणालाही काही खटकत नव्हते. मग एकदम चार वर्षांपूर्वी नेमके असे काय झाले की, धार्मिक तत्त्वांचा आधार घेत दर्ग्याच्या मजार भागात महिलांना प्रवेश करण्यास हाजी अली न्यासाने बंदी घातली? याचे न्यासाने न्यायालयात दिलेले उत्तर असे की, ‘पुरुष संताची कबर असलेल्या मजार भागात महिलांना प्रवेश देणे हे इस्लामी तत्त्वांनुसार घोर पाप समजले जाते. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम २६ मधील तरतुदींनुसार, धार्मिक संदर्भातील बाबींचे निर्णय, त्याच्याशी संबंधित प्रकरणांबाबत स्वनिर्णय घेण्याचा मूलभूत अधिकार हाजी अली दर्गा न्यासाला मिळालेलाच आहे.’ मुंबई उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद अर्थात फेटाळून लावला.
याचे महत्त्वाचे कारण असे की, ज्या भारतीय राज्यघटनेचा हवाला हाजी अली न्यासाने दिला त्याच राज्यघटनेच्या कलम १४ (आयुष्य जगण्याचा अधिकार), कलम १५ (भेदभावाला प्रतिबंध करणे), कलम २५ (धर्मपालनाचा अधिकार) यातील तरतुदींचा दर्ग्याने घातलेल्या प्रवेशबंदीमुळे भंग होत होता. त्यामुळे ही प्रवेशबंदी न्यायालयात टिकली नाही. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले तरी तिथेही मुंबई उच्च न्यायालयाचाच निर्णय कायम राहील अशी शक्यता कायदेतज्ज्ञांना वाटते आहे.
हाजी अली दर्गा न्यासाच्या निर्णयाविरोधात निकाल देऊन कायद्यापुढे व्यक्ती व कोणताही धर्म किंवा धार्मिक तत्त्व हे मोठे नाही हेही न्याययंत्रणेेने दाखवून दिले. धार्मिक बाबींसंदर्भात न्यायालय जे क्रांतिकारक निकाल देते त्याची अंमलबजावणी सरकारने प्रभावीरीत्या केली तर त्या निर्णयाचा परिणाम समाजमनावर खोलवर उमटतो. तलाक घेतलेल्या पतीपासून पोटगी मिळविण्याचा मुस्लिम महिलेला अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १९८५ मध्ये शाहबानो प्रकरणात दिला होता. या निकालाला धर्ममार्तंडांनी प्रखर विरोध केल्यानंतर केंद्रातील तत्कालीन राजीव गांधी सरकारने मुस्लिम महिला (तलाक प्रकरणात संबंधित महिलेच्या हक्कांचे रक्षण) कायदा १९८६ मध्ये संमत केला व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रभावहीन केला! हाजी अली न्यासासंदर्भात दिलेल्या न्यायालयीन निकालाची वासलातही शाहबानो प्रकरणाप्रमाणेच सरकार लावणार नाही ना? अशी शंकाही मनात तरळली. भारतीय राज्यघटनेने स्त्री व पुरुष यांना समान दर्जा दिलेला आहे. त्यामुळे पुरुषांना जे घटनादत्त अधिकार आहेत ते सर्व स्त्रियांनाही मिळाले पाहिजेत या मागणीत वावगे असे काहीच नाही. मात्र कोणत्याही धर्मातील कट्टरपंथीय हे स्त्रीला नेहमी दुय्यम वागणूक देताना आढळतात. म्हणूनच केरळचे शबरीमला मंदिर, शनिशिंगणापुरातील चौथरा आणि हाजी अली दर्ग्यातील मजार भागात महिलांना प्रवेश मिळावा अशा मागण्या विविध धर्मांतून उमटल्या. हिंदू धर्मातील काही सण-प्रथांवर न्यायालयाने अंकुश लादले की हिंदुत्ववादी नेहमी म्हणतात, इस्लामसहित बाकीच्या सर्व धर्मांचे लाड केले जातात, पण हिंदू धर्माची गळचेपी होते. आता हाजी अली दर्ग्यातील मजार भागात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून जे मुस्लिम सुधारणावादी लोक, संघटना संघर्ष करीत आहेत हा महत्त्वाचा बदल आहे. हमीद दलवाईंसारख्या समाजसुधारकांना मुस्लिम समाजातून तीव्र विरोध झाला तरीही त्यांनी आखून दिलेल्या सुधारणा मार्गावर मुस्लिम समाजातील सुधारणावादी आज काम करत आहेत. हाजी अली दर्ग्यासंदर्भातील न्यायालयीन निकालामुळे हाती आलेली ऐतिहासिक संधी सर्वच धर्मातील सुधारणावाद्यांनी गमावू नये. स्त्रीचा सन्मान राखण्याच्या लढ्यास भक्कम पाठिंबा देणे हे पाऊल धर्मनिरपेक्ष भारत घडविण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
(लेखक दै. दिव्य मराठीच्या मुंबई कार्यालयात
उपवृत्तसंपादक आहेत.)

Tuesday, August 16, 2016

दिखाऊ नव्हे टिकाऊ योजना हव्यात! - दै. दिव्य मराठीच्या १५ ऑगस्ट २०१६च्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख



दै. दिव्य मराठीच्या १५ ऑगस्ट २०१६च्या अंकामध्ये संपादकीय पानावर मी लिहिलेला हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाची वेबपेजलिंक, टेक्स्ट व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/16082016/0/6/
----
दिखाऊ नव्हे टिकाऊ योजना हव्यात!
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
स्लग - प्रासंगिक
----
पूर्वसुरींनी राज्यशकट नीट व सनदशीर मार्गाने हाकलेला असला तर भव्यदिव्य कामे करण्यासाठी प्रशासकीय व धोरणात्मक पाया आपसूकच मजबूत झालेला असतो. पण तसे नसेल व निव्वळ भव्यदिव्य काहीतरी करतोय असा आभास निर्माण करुन जनतेचे डोळे दिपवायचे असतील तर त्याला बनचुका राज्यकारभार केला तरी चालतो. समाजातील दुर्बल घटकांसाठी आम्ही काहीतरी विशेष करीत आहोत असे भासविणाऱ्या बातम्या राज्यकर्त्यांकडून व्यवस्थित पेरल्या जातात. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची विशेष योजना राबविण्यात येईल. ही कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्त्यांचा यामध्ये विकास करण्यात येणार असून त्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त अशीच एक आकर्षक घोषणा बडोले यांनीच एक वर्षापूर्वी जाहीर केली होती. ती म्हणजे राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेले एक गाव निवडून त्या गावाची स्मार्ट गाव म्हणून निर्मिती करण्यात येणार होती. या गावांत सर्व सोयीसुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार असून राज्यस्तरावर या गावातून उत्कृष्ट गावाची निवड करून त्या गावाला पुरस्कार देणार होता. वर्षभरापूर्वीच्या या घोषणेची अंमलबजावणी कुठवर आली हे कळायला काही वाव नाही. तेवढ्यात पुन्हा अजून एक नवीन योजना जाहीर करुन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा आव आणला जात आहे.
देशभरात शंभर स्मार्ट शहरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राखले आहे. मात्र ही स्मार्ट शहरे उभारण्यासाठी त्या भागाचा आधीपासून जो थोडाफार नीट विकास व नगरनियोजन असणे आवश्यक आहे त्या आघाडीवर अनेक शहरे मार खात आहेत. कशीही आडवी-तिडवी पसरलेली व कसलेच नीट नियोजन नसलेली शहरे भारतात मोठ्या संख्येने आहेत. देशात शहरीकरणाचा वेग मोठा असून ग्रामीण भागातही त्याचे पडसाद उमटत आहेत. त्याशिवाय एक गोष्ट नीट ध्यानात ठेवली पाहिजे की, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही जातीपायी होणारे भेदाभेद अधिक तीव्र आहेत. जातीअंताचा विचार करुनच गावांतील अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्तीिवकासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातील १० टक्के निधी हा अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षापासून हा निधी या घटकांसाठी कधीही पूर्णपणे खर्च न करता तो अन्य योजनांकडे वळता करण्यात येतो असा आक्षेप भारताचे महालेखापरिक्षक (कॅग ) तसेच लोकप्रतिनिधींच्या लोकलेखा समितीने राज्य सरकारवर घेतला आहे. हा निधी अनूसुचित जातींच्या योजनांसाठी देण्याची आर्थिक वर्षाच्या अखेरीला देण्याची खेळी वित्त विभाग नेहमी खेळतो. त्यानंतर एक दोन महिन्यांच्या कालावधीत हा निधी संबंधित योजनांवर खर्च करणे शक्य नसल्याने तो अन्य योजनांकडे वळविला जातो. हा सगळा ढिसाळ कारभार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने महाराष्ट्रात केला. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. गावामध्ये पंचायतींच्या हातात सर्वच अधिकार देऊ नका कारण त्यामुळे गावातील सवर्ण वस्त्यांमध्येच सुधार कामे जास्त होत राहातील व दलित वस्त्यांमध्ये विकास खूपच कमी गतीने होईल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. राज्यातील सुमारे ४० हजार गावांत दलित वस्त्या आहेत. त्यांची स्थिती बघितली तर डॉ. आंबेडकर किती दूरदर्शीपणे विचार करीत होते याचा प्रत्यय येतो. निवडक १२५ गावांतील अनुसूिचत जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करुन त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा आदेश राज्य शासनाने काढला आहे. पण त्यापेक्षा अनुसूचित जातींची असलेला निधी त्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी प्रामाणिकपणे खर्च केल्यासही बऱ्यापैकी विकास साधता येईल. जनतेला दिखाऊ नव्हे टिकाऊ योजनांची गरज आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या दिशेने राज्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करायला हरकत नाही.
(लेखक उपवृ्तसंपादक आहेत.)

Sunday, August 14, 2016

श्वान संहितेची आवश्यकता - दै. दिव्य मराठी १३ ऑगस्ट २०१६. माझा प्रसिद्ध झालेला लेख.



१३ ऑगस्ट २०१६च्या दै. दिव्य मराठीच्या संपादकीय पानावरील प्रासंगिक सदरासाठी मी पुढील लेख लिहिला होता. त्याचा मजकूर, टेक्स्ट लिंक, वेबपेज लिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-sameer-paranjpe-write-editorial-columns-on-dog-issue-in-maharashtra-5395047-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/13082016/0/6/
-----
 श्वान संहितेची आवश्यकता
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
मुंबईसह राज्यातील लहान मोठ्या शहरांमधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येची कारणे शोधणे व उपाययोजना सुचविणे या दोन हेतूंसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. यासंदर्भातील राष्ट्रीय आकडेवारी लक्षात घेतली तर देशात दर साठ माणसांमागे एक कुत्रा असे प्रमाण आहे. गाव असो वा शहर तेथे पा‌ळीव व भटके अशा दोन्ही प्रकारचे कुत्रे आढळतात. पाळीव कुत्र्यांमुळेही सर्वसामान्य नागरिकांना त्रास भोगावा लागतो परंतु त्याचे प्रमाण भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाइतके भीषण नाही. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरात सुमारे ३५ हजार भटकी कुत्री असावीत असा एक अंदाज आहे. नाशिक, अकोला, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरसारख्या अन्य शहरांतही भटक्या कुत्र्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे. पुणे शहरामध्ये हीच संख्या ५० हजाराच्या आसपास आहे. मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या २ लाखांच्या पुढे गेली असावी असा अंदाज आहे. २०१२ च्या अहवालानुसार, भारतात किमान २० हजार रेबिजची प्रकरणे समोर येतात तर, मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे.मुंबईत २०११ पासून २०१४च्या एप्रिलपर्यंत तब्बल २ लाख ७५ हजार ६३२ जणांना या भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी ६७ जण मरण पावले. शहरे असो वा गावे तेथे अनेकवेळा पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडतात. नाशिकमध्ये लहान मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने तो मरण पावल्याची घटना अलीकडेच घडली आहे. भटक्या कुत्र्यांना ठार न मारता त्यांचे निर्बिजीकरण करुन त्यांची संख्या आटोक्यात अाणा असा आदेश न्यायालयाने िदला. त्यामुळे विविध महापालिका, नगरपालिकांमधील भटकी कुत्री पकडणाऱ्या विभागांची अवस्था दात काढलेल्या सिंहासारखी झाली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेमधील डॉग स्क्वॉड विभागाकडे कशी अपुरी साधनसामुग्री व मनुष्यबळ आहे याची कहाणी दिव्य मराठीनेच प्रसिद्ध केली होती. प्राणीप्रेमी केंद्रीय मंत्र्यांना भटक्या कुत्र्यांची झळ खूप कमी लागते. त्यांचा खरा त्रास सामान्य माणसांना भोगावा लागतो. पुण्यात पीएपी या संस्थेने २०१४ ते २०१६ दरम्यान १३९२७ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. मात्र ही कुत्री माणसांना चावणारच नाहीत याची खात्री ब्रह्मदेवही देऊ शकत नाही. त्यामुळे भटकी कुत्री ही सामाजिक तणावाचेही कारण बनत आहेत. या कुत्र्यांमुळे जशी भूतकाळात समस्या उद्भवली होती तशी भविष्यातही ती उदभवू शकते.
मुंबई सरकारच्या दप्तरी अधिकृतपणे मुंबई शहरातील ज्या पहिल्या दंग्याची नोंद झाली तो दंगा १८३२ साली घडला. कारण होते भटकी कुत्री! कंपनी सरकारने मुंबईतील सर्वच बेवारशी कुत्री ठार मारण्याचा आपल्या गोर्या सैनिकांना हुकुम दिला. या कामी बक्षिसादाखल प्रत्येक कुत्र्यामागे आठ आणे देण्याचेही जाहीर करण्यात आले. प्रारंभी मारलेली कुत्री पोलिस ठाण्यात दाखवून त्यांच्या संख्येनूसार बक्षिसी गोऱ्या शिपायांना दिली जात असे. पण पुढे मारलेली कुत्री वाहून आणणे जिकिरीचे होऊ लागले. त्यामुळे मारलेल्या कुत्र्यांची केवळ कापलेली शेपटी दाखवून बक्षिसी देण्याचे धोरण कंपनी सरकारने अमलात आणले. पण गोरे सोजिर भलतेच हुशार! ते बेवारशी कुत्र्यांना न मारता केवळ त्यांच्या शेपट्या कापून पोलिस ठाण्यात हजर करु लागले व खिसे गरम करुन घेऊ लागले! अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच ही `शेपटी’ची सवलतही बंद करण्यात आली! तत्कालीन हिंदू व पारशी समाजात गोऱ्या शिपायांच्या श्वान हत्या मोहिमेने संतापाची लाट उसळली. पारशी हे धार्मिकदृष्ट्या कुत्र्यांना पवित्र मानतात, तर हिंदु लोक हे भूतदयावादी. त्यामुळे १८३२ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारास फोर्टातल्या (कोटातल्या) हिंदू व पारशी संमिश्र लोकवस्तीच्या भागात दोन गोरे सोजिर बेवारशी कुत्र्यांना मारण्याच्या मोहिमेवर हिंडत असताना हिंदू व पारशी जमातीतील तरुणांचा या गोष्टीमुळे इतके दिवस मनात दबलेला राग अचानक उफाळून आला व त्यांनी दंगल सुरु केली. इतिहासातील अशा घटनांमधून सर्वांनीच शिकायचे असते. भटक्या कुत्र्यांची समस्या संपवायची असल्यास तत्वांचा बागुलबुवा न करता व्यवहारी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत.
(लेखक उपवृत्तसंपादक आहेत.)
----

Monday, August 8, 2016

अनंताचि पीएच.डी. सदा पाहे... - डॉ. अनंत गुरव याच्या वरील माझा लेख.


अनंताचि पीएच.डी. सदा पाहे...
----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
(या लेखासोबत अनंत गुरव याचे छायाचित्र व त्याचे पीएच. डी. प्रमाणपत्र यांची छायाचित्रे दिली आहेत.)
----
प्रबोधनकार ठाकरे हे संपादक असलेल्या `प्रबोधन' या नियतकालिकावर देशात पहिल्यांदा ज्याने पीएचडी केली तो माणूस...
या गोष्टीमुळे विद्वत्तेच्या क्षेत्रात आता तो खूपच महत्वाचा झालाय असा माणूस...
तरीही तो मित्र आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाचा....
आश्चर्य वाटते कधी कधी...
त्याचे नाव अनंत गुरव.
तो आहे एका गिरणी कामगाराचा मुलगा...
त्याचे लहानपण व थोडे जाणतेपण गेले डिलाइल रोडवरील सोराबजी चाळीत.
त्याच्या त्या घरी मी गेलोय.
सुमारे अडीचशे फुटांची खोली. खोलीत वर एक माळा...
त्या खोलीत स्वयंपाकघराचा ओटा डावीकडे. त्याच्या पुढे मोरी.
उजव्या अंगाला एक खाट, कपाट.
भिंतींना पोपटी रंग दिलेला. तोही काही ठिकाणी उडालेला.
मी अनंत गुरवच्या या घरी तीन-चारदा राहिलो असेन. दोनदा रात्री मुक्कामाला. एकदा सकाळी गेलेलो व एकदा दुपारी.
म्हणजे सारे प्रहर बघितले या खोलीचे.
अनंतचे वडील महादेवराव गिरणीकामगार. अनंतची आई सौजन्यमूर्ती होती.
नऊवारी पातळ ल्यालेली. कपाळावर मोठे कुंकु, गव्हाळ वर्णाची, कुडी बारीक.
तिच्या हातच्या पदार्थांना न्यारी चव होती. भाकरी, ठेचा वगैरे हे पदार्थ मला तसे दुर्मिळच. ते सगळे पदार्थ मी अनंतच्या आईच्या हातचे खाल्लेत त्याच्या घरी.
अनंत मला भेटला रुईया महाविद्यालयात.
तेव्हा तो एम. ए. करीत होता. मुळात तो प्रिटिंग टेक्नॉलॉजी या विषयात डिप्लोमा केलेला.
इंडियन एक्स्प्रेसच्या छापखान्यात काम करताना त्याच्या मनाने घेतले की, आपणही पांढऱ्यावर काळे करायचे म्हणजे वर्तमानपत्रात लिहायचे.
त्याला ग्रॅज्युएट व्हायचे होते. आला पठ्ठा रुइयामध्ये. तो इथे आला तेव्हा त्याचे वय उलटून गेले होते पदवीधर झालेल्या मुलाइतके.
तरीही अनंतने मनाचा हिय्या केला. कॉलेज करायला लागला व नंतर नोकरीही.
बी.ए. झाला. एम. ए. झाला....
रुइयामध्ये शिकत असताना उत्तम वक्ता म्हणून त्याचे नाव गाजू लागले.
भूषण गगरानी जेव्हा आय. ए. एस. झाले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील पहिली जाहीर मुलाखत झाली रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर.
मुलाखतकार होता अनंत गुरव.
अनंतचे त्याच्या विशी-तिशीतले फोटो बघितले तर तो थेट अमोल पालेकरसारखा दिसतो.
त्याला तसे अनेक जण बोलतातही. मी ही बोलून घेतो.
अनंतचा एक किस्सा भन्नाट आहे.
तो रुइयाच्या एका हाइकला येण्यासाठी आला. हाइकसाठी जमा झालेले बाकीचे सारे लोक चक्रावले. कारण अनंत आला होता सफारी सुटात-बुटात आणि हातात प्रवासाला निघतात तशी बॅग घेऊन...
गंमतीचा भाग सोडा. पण हाइक असो वा कॉलेज जीवन हे सारे पहिल्यांदाच त्याला महद्कष्टाने अनुभवायला मिळत होते.
त्यामुळे त्याच्यात प्रत्येक अनुभवानंतर बदल होत होता.
हे सारे मुंबईतलेच वातावरण आहे. तो ही मुंबईतलाच.
पण हे अनुभवविश्व वेगळे होते पूर्णपणे त्याच्यासाठी.
त्याला माझ्यासारखेच अखेर भिकेचे डोहाळे लागले...हाहाहा
अनंत गुरव पत्रकार झाला. दै. सामना, लोकमत अशा अनेक वृत्तपत्रांत विविध ठिकाणी त्याने नोकरी केली.
आता तो दै. सामनाच्या मुंबई कार्यालयात संपादकीय विभागात कार्यरत आहे.
तो मला आवडतो कारण तो मुळातून अभ्यासू आहे.
१९९५-९६ची गोष्ट असेल. तो मुंबई व महाराष्ट्रातील विविध ग्रंथालयांवर विश्व ग्रंथालयांचे नावाचा स्तंभ दै. सामनाच्या उत्सव पुरवणीत लिहित होता. त्याचे पुढे त्याच नावाने पुस्तक डिंपल प्रकाशनने प्रसिद्ध केले.
अनंत गुरवचे हे पहिले पुस्तक. आणि त्याच्या अख्ख्या खानदानात पुस्तक लिहिणारा तो पहिलाच.
तसेच त्याच्या अख्ख्या खानदानात पीएचडी करणाराही तो आता पहिलाच आहे.
`केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन या नियतकालिकाचा अभ्यास' या विषयावर अनंत गुरवने डॉ. विद्यागौरी टिळक या अनुभवी शिक्षक व गाईडच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठातून नुकतीच पीएच.डी. मिळवली.
त्याचा अभिमान त्याच्यापेक्षाही मला अधिक वाटला.
गिरणीकामगाराचा मुलगा हे काही कमी पात्रतेचे लक्षण नाही.
तसेच पीएचडी कोणीही करतो पण अत्यंत गहन विषयावर समाजाला उपयोगी पडेल अशा अंगाने पीएच.डी. करणारे खूप कमी लोक असतात.
अामचा डॉ. अनंत गुरव त्यापैकी एक आहे.
अनंतबद्दल अजून एक गोष्ट मला नुकतीच कळलीये ती डॉ. हरि नरके यांचे तरुणपणीचे छायाचित्र बघून.
नरके यांनी फेसबुकवर आपले हे छायाचित्र अपलोड केले तेव्हा मी त्याखाली लिहिले की अमोल पालेकरांसारखे दिसता.
अनंत गुरवही अमोल पालेकरसारखाच दिसायचा त्या वयात. आता तो पन्नाशीला येऊन ठेपलाय.
हे दोन्ही अमोल पालेकर अतिशय कठीण परिस्थितीतून वर आलेले आहेत. दोन्ही डॉक्टर झाले आहेत. पीएच.डी. वाले!
पुण्यात ते दोघे एकमेकांना जेव्हा भेटतीलही तेव्हा हे दोन अमोल पालेकर एकमेकांशी भाई-भाई (बडा भाई- छोटा भाई) म्हणून भेटावेत अशी इच्छा.
ठेविले अनंते तैसेचि राहावे.
ही अभंगातील एक ओळ. ती आपल्यासाठीच असावी असे आळशी माणसांना वाटते असे म्हणतात.
आमचा डॉ. अनंत गुरव तर आहे कोणतीही परिस्थिती स्वप्रयत्न व स्वकष्टाने बदलणारा.
त्याच्यासाठी दुसऱ्या एका ओळीत बदल करावासा वाटतो.
अनंताचिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे...
त्यामध्ये बदल करुन
अनंताचि पीएच.डी. सदा पाहे असा समीर बोरिवलीत आहे....
असे म्हणावेसे वाटते...
अनंताचे झाड असेच बहरो...
सिनिअर अमोल पालेकर डॉ. हरि नरके तुम्ही हे सारे वाचले आहेत ना?
(या लेखासोबत अनंत गुरव याचे छायाचित्र व त्याचे पीएच. डी. प्रमाणपत्र यांची छायाचित्रे दिली आहेत.)

Thursday, August 4, 2016

रेल्वेच्या खासगीकरणाचा मंदावलेला वेग - दै. दिव्य मराठी ४ ऑगस्ट २०१६ - मी लिहिलेला लेख.



दै. दिव्य मराठीच्या ४ ऑगस्ट २०१६च्या अंकात संपादकीय पानावर प्रासंगिक या सदरात मी लेख लिहिला आहे. त्या लेखाची वेबपेज, टेक्स्ट लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-about-railway-privatisation-by-samir-paranjape-5388228-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/04082016/0/6/
---
रेल्वेच्या खासगीकरणाचा मंदावलेला वेग
----
- समीर परांजपे
paranjapesamir.gmail.com
------
जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक असलेली भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारतर्फे संचालित केली जाते. २०१४-१५ या वर्षात भारतीय रेल्वेने ८ अब्जांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली. म्हणजेच रेल्वेने रोज सरासरी २ कोटी ३० लाख प्रवाशांची ने-आण केली. (त्यातील निम्मे प्रवासी मुंबईतील अन्य भागांतील लोकल सेवेने प्रवास करणारे आहेत.) जगात कोणत्याही रेल्वेला प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतूक करून जास्त नफा मिळतो. भारतीय रेल्वेच्या महसुली उत्पन्नातील वाढ गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वात कमी प्रमाणात झाली ती २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये. रेल्वेच्या महसुली उत्पन्नामध्ये तीन पंचमांश वाटा हा मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आहे. २०१४-१५ मध्ये मालवाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात ४ ते ५ टक्के वृद्धी झाली होती. ती २०१५-१६ मध्ये तितकीशी होऊ शकली नाही. या सगळ्या गोष्टी भारतीय रेल्वेमध्ये अनेक बदल करण्याची गरज असल्याचेच सूचना करतात.
जागतिकीकरणाच्या जमान्यात खासगीकरण हा एक सशक्त पर्याय उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्यास मोदी सरकारमधील काही घटक नक्कीच अनुकूल आहेत, मात्र या प्रक्रियेला जनतेतून मोठ्या प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-अहमदाबाद यादरम्यान २०२३ पर्यंत बुलेट ट्रेन धावेल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. बुलेट ट्रेन यायची तेव्हा येईल, पण सध्या देशातील सर्वात जलद गाडीचा मान टॅल्गो ट्रेन मिळवू पाहत आहे. दिल्लीवरून ‘ट्रायल’च्या ट्रॅकवर धावत मुंबईत दाखल झालेल्या या ट्रेनचा प्रतिताशी वेग १५० पर्यंत जाऊ शकतो. पण प्रवासाच्या अडथळ्यांच्या शर्यतीत तो १३० किमीपर्यंत मर्यादित राखावा लागला. तरीही तो वेग राजधानी एक्स्प्रेसपेक्षा जास्त होता. जगातील कोणतीही खासगी कंपनी भारतात खासगी रेल्वे चालवू शकेल. मात्र ही रेल्वे असेल अत्याधुनिक लॅटिव्हेशन तंत्रज्ञानाने (मॅग्लेव्ह रेल्वेप्रमाणे) चालणारी. खासगीकरणाला होणारा विरोध लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने हा वेगळा मार्ग शोधून काढला. लॅटिव्हेशन तंत्राने चालणाऱ्या रेल्वेसाठी गाड्या, फलाट, रूळ, सिग्नल, कर्मचारी वर्ग, यंत्रणेची देखभाल, व्यवस्थापन यासाठी येणारा सारा खर्च हा खासगी कंपनीनेच करायचा अाहे. प्रवासी भाडे इतक्या प्रमाणात आकारण्यात येईल की ज्याने प्रवाशांची आर्थिक पिळवणूकही होणार नाही व खासगी कंपन्यांना पुरेसा फायदाही मिळेल. असे प्रस्ताव असतात चांगले, पण ती यंत्रणा प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यात जे गुंते निर्माण होतात ते सोडविण्यासाठीही आपल्या यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे सुरू झाली, पण तिच्याबाबतचे काही घोळ अजूनही संपलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला मुंबईतील लोकल रेल्वे यंत्रणेवर प्रचंड प्रवासी संख्येचा जो ताण पडतो तो हलका करण्यासाठी रेल्वेने नव्हे, तर एमएमआरडीएने खासगी कंपन्यांच्या सहकार्याने दोन वर्षांपूर्वी मेट्रो रेल्वे सुरू केली. तिला पहिल्या दिवसापासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई मेट्रो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीची अाहे. या रेल्वेच्या तिकिटांचे दर जी पावले उचलायला हवीत त्याबाबत दिरंगाई होत आहे. याच्या परिणामी मुंबई मेट्रोला दरवर्षी ३०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. कोलकाता, दिल्ली, मुंबई, बंगळुरू जिथे जिथे मेट्रो रेल्वे सुरू झाली किंवा काही ठिकाणी मोनो रेल्वे सुरू झाली तिथे तिथे सरकारी यंत्रणेतील शुक्राचार्यांमुळे खूप अडचणी निर्माण झाल्या. ही उदाहरणे वेगळ्या रेल्वे यंत्रणांची असली तरी देशातील खरी स्थिती दाखविण्यासाठी पुरेशी प्रातिनिधिक आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आपली जमीन किती भुसभुशीत आहे याचा अाधी अंदाज घेणे गरजेचे आहे. रेल्वे यंत्रणेच्या कामांमध्ये खासगी कंपन्यांना केंद्र सरकारने २०१२ पासून मोठा वाव दिला असला तरी रेल्वेचे आवश्यक असलेले संपूर्ण खासगीकरण हे खूपच दूरदृष्टीने करायला हवे. कारण त्यात काही लाख कर्मचाऱ्यांचे भवितव्यही गुंतलेले आहे.
(लेखक दै. दिव्य मराठीच्या मुंबई कार्यालयात उपवृत्तसंपादक आहेत.)

Monday, August 1, 2016

नेमेचि येणारे पूर... दै. दिव्य मराठी १ ऑगस्ट २०१६ मधील माझा लेख



दै. दिव्य मराठीच्या १ ऑगस्ट २०१६ रोजीच्या अंकात नेमचि येणारे पूर हा लेख मी लिहिला आहे. त्या लेखाचा मजकूर, टेक्स्ट लिंक, वेबपेज लिंक, जेपीजी फाइल मी सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-on-flood-by-sameer-paranjape-5385955-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/01082016/0/6/
---
नेमेचि येणारे पूर...
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
बिहार, आसाम, पश्चिम बंगाल तसेच मेघालय अशा काही राज्यांमध्ये नद्यांना पूर येऊन मोठी जीवित व वित्तहानी होणे हा दरवर्षीच्या पावसाळ्यातील नित्यक्रम झालेला आहे. यंदाही हेच चित्र आहे. बिहारपेक्षा यंदा आसाममध्ये पूरस्थिती गंभीर असल्याने तिचा आढावा घेण्यासाठी साक्षात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हवाई पाहणी केली. पूरग्रस्त भागातील २८ जिल्हे व तेथील ३० लाख लोकांना या नैसर्गिक संकटाचा तडाखा बसला आहे. या पुरात ज्यांचा बळी गेला त्यांच्या वारसदारांना आसाम सरकारतर्फे प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचीही घोषणा झाली. हे सारे सरकारी उपचारांप्रमाणे पार पडले. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, “पूर ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे जाहीर करणे हा काही त्या समस्येवर उपाय नाही. या आपत्ती रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत याचा विचार करणे हे या घडीला अधिक महत्त्वाचे आहे.’ तसे पाहिले तर या मुद्द्यात काहीही नावीन्य नाही. नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती आल्यास त्या वेळी त्यात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ)ची २००५मध्ये स्थापना झाली. आसामप्रमाणेच बिहारही पुराच्या तडाख्याने बेजार आहे. २००८ साली बिहारमधील कोसी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या सुमारे १ लाख लोकांना एनडीआरएफ जवानांनी सुरक्षित स्थळी हलविले. या जवानांच्या कार्याने प्रभावित होऊन बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनडीआरएफचे केंद्र बिहारमध्ये उभारण्यासाठी सुमारे ६५ एकर जमीन एनडीआरएफला देऊ केली होती. यंदाच्या पावसाळ्यातही पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफचे जवान कामाला लागले आहेत. मूळ प्रश्न हा आहे की, दरवर्षी लष्कराकडून, लोकांकडून आपतग्रस्तांना होणारी मदतही पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करण्याबाबतचा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही.
२००८ साली बिहारमध्ये कोसी नदीला आलेल्या पुरामुळे ५०० जण मृत्युमुखी पडले होते तर ३५०० लोक बेपत्ता झाले होते. नेपाळमध्ये नदीच्या पुराला रोखण्यासाठी असलेल्या कोसी बॅरेज या यंत्रणेमध्ये अनेक दोष असल्यानेच त्याचा तडाखा थेट बिहारलाही बसला होता. या बॅरेजची वर्षानुवर्षे नेपाळने दुरुस्तीच न केल्यामुळे कोसी नदीला मोठा पूर आला होता. हिमालयामध्ये तिबेट परिसरात उगम पावणारी कोसी नदी ही पुढे नेपाळमधून बिहारमध्ये वाहत येते. बिहारमध्ये नद्यांचे असलेले प्रवाह तसेच सुमारे १६ नद्यांची असलेली खोरी यामुळे या प्रदेशात पूर आला की परिस्थिती गुंतागुंतीची बनते. देशातील अन्य राज्यांतही पूराची समस्या सतावते. नद्यांवर धरणे, कालवे बांधून, वेळप्रसंगी नद्यांचा प्रवाह काही ठिकाणाी बदलून पाण्यासाठी आसुसलेली भूमीही सुजलाम सुफलाम केल्याची उदाहरणे जगात सापडतात. नद्यांना पूर येऊ नये िकंवा पुरापासून फार नुकसान होऊ नये ही दोन्ही उद्दिष्टे व अन्य कल्याणकारी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून भारतातही नद्या जोडणी प्रकल्प हाती घेण्याचा विचार मांडला गेला. अगदी १९ व्या शतकात अॉर्थर कॉटन या अभियंत्याने भारतातील काही प्रमुख नद्या जोडून त्याद्वारे भारताचा दक्षिणपूर्व भाग म्हणजे आताचा आंध्र प्रदेश व ओरिसा येथील दुष्काळग्रस्त भागांपर्यंत या नद्यांचे पाणी पोहोचविण्याची योजना तयार केली होती. त्यानंतर १९७० साली धरणबांधणीतले तज्ज्ञ डॉ. के. एल. राव यांनी नॅशनल वॉटर ग्रीड ही संकल्पना मांडली होती. उत्तर भारतात दरवर्षी नद्यांना पूर येतात. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये काही नद्यांना बाराहीमहिने कमी पाणी असते. ब्रह्मपुत्रा व गंगा नदीचे जादा पाणी हे दक्षिण भारतामध्ये नेण्याच्या दृष्टीने नद्या जोडणी प्रकल्प हाती घ्यावा, असे त्यांनी सुचविले होते. १९८० साली केंद्रीय जलस्रोत खात्याने नद्या जोडणी प्रकल्पाबाबत एक अहवालही तयार केला होता. १९८२ सालीही या दिशेने थोडीशी हालचाल झाली होती. पण त्यानंतर १७ वर्षे हा सारा प्रश्न बासनात पडून होता. १९९९ साली अटलबिहारी वाजपेयींच्या काळात नद्या जोडणी प्रकल्पाला घुगधुगी प्राप्त झाली. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वाजपेयी सरकारची नद्या जोडणीबाबतची भूमिका ध्यानात ठेवून भविष्यात त्याच्याशी सुसंगत पावले टाकली पाहिजेत.
(लेखक दै. दिव्य मराठीच्या मुंबईतील माहिम येथील संपादकीय कार्यालयात उपवृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत.)