ज्येष्ठ लेखिका माधवी देसाई यांना श्रद्धांजली वाहणारा मी लिहिलेला लेख. तो १६ जुलै २०१४च्या दिव्य मराठीच्या अंकात प्रसिद्ध झाला होता
. त्या लेखाची जेपीजी फाईल, लिंक्स व मजकूर.
http://
http://
--------------------------
‘तिला’ आकळला स्त्रीवेदनेचा गाभा...
-------------------------
- समीर परांजपे
--------------------
हजारो वर्षांची ‘परंपरा’ असल्याचा पोकळ अभिमान मिरवणार्या हिंदू धर्मव्यवस्थेत स्त्री व कथित शूद्र यांना नेहमीच पशूंपेक्षाही हीन वागणूक दिली गेली. स्त्री ही स्वातंत्र्यास पात्र नाही, असे फाजील तत्त्वज्ञान सांगणारी मनुस्मृती जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या बुरसटलेल्या परंपरेचा धिक्कार केला होता. स्त्री समानता हा केवळ बोलघेवडेपणाचा नव्हे तर तो प्रत्यक्षात आचरण्याचा विषय आहे, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्रातील महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबार्इंपासून ते स्त्रीमुक्ती चळवळीतील विद्यमान विविध विचारवंतांनीही केलेले आहे. इंग्रजांनी 1818 मध्ये मराठ्यांचा पराभव केला व भारताला संपूर्णपणे अंकित केले. ब्रिटिश अमदानीत सुरू झालेल्या प्रबोधनयुगात स्त्रीस्थितीविषयक सुधारणांच्या विचारांची बीजे रोवली गेली. स्त्रीशिक्षणाला आरंभ झाला. त्यातूनच स्त्रियांच्या आत्मचरित्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. शतकानुशतके शोषिताचे जिणे जगलेल्या स्त्रियांच्या वेदनांचे हुंकार त्यांच्या आत्मचरित्रांतून उमटले. त्यामध्ये माधवी देसाई लिखित ‘नाच ग घुमा’ या आत्मचरित्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यादरम्यानच्या कालावधीत जन्मलेल्या तसेच 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बदललेल्या समाज व राजकीय स्थितीचे फायदे व तोटे ज्यांना भोगावे लागले त्या पिढीच्या माधवी देसाई या अस्सल प्रतिनिधी होत्या. 20 व्या शतकाचा उत्तरार्ध व 21 व्या शतकाचे पहिले दशक या प्रदीर्घ कालावधीतील समाजस्पंदने माधवी देसाई यांनी आपल्या ग्रंथांतून समर्थपणे टिपलेली आहेत. अत्यंत सुडौल अशी शब्दकळा लाभलेल्या या लेखिकेची लेखनशैली थेट विषयाला भिडणारी व आपल्या भवतालाची नीटस ओळख करून देणारी होती. या सर्व कसोट्यांवर उतरलेले माधवी देसाई यांचे ‘नाच ग घुमा’ हे स्त्रियांचे आत्मभान व आत्मबळ वाढवण्यासाठी उपकारक ठरले. ललितबंध, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, अनुवाद असे लेखनाचे विविध पोत माधवीतार्इंनी अत्यंत सहजरीत्या हाताळले. त्यांच्या निरीक्षणातून, मांडणीतून वाचकांना नेहमीच काहीतरी वेगळा आशय हाती लागत गेला. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व निर्माते भालजी पेंढारकर व त्यांच्या पत्नी लीलाताई यांची कन्या असलेल्या माधवी देसाई यांच्या आयुष्यपट हा एकरंगी, एकसाची नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला अनेक कंगोरे असतात. मात्र त्या आयुष्यांमध्ये फारसे सांगण्यासारखे काही नसते. माधवी देसाई यांचे आयुष्य मात्र सांगण्यासारख्या असंख्य घटनांनी भरलेले व भारलेले होते की त्यातून त्या अक्षरांचा मोठा संसार मांडू शकल्या.
‘नाच ग घुमा’च्या प्रस्तावनेत त्यांनी जे नमुद केले आहे, त्यातून हे पुस्तक व त्यांच्या लेखनप्रेरणेमागची भूमिका स्पष्ट होते. माधवी देसाई म्हणतात, मी कुणी मोठी लेखिका नाही. पूर्वी पिता अन् पती यांच्या प्रकाशात मला जगानं बघितलं, पण त्या प्रकाशात वावरणार्या मलाही स्वतंत्र व्यक्तित्व असतं, मन असतं, भावना असतात.
कु. सुलोचना भालजी पेंढारकर
सौ. माधवी नरेंद्र काटकर
सौ. माधवी रणजित देसाई
अन् आता फक्त माधवी देसाई!
या सर्व रूपांतील स्त्री...स्वत:ला शोधते आहे. आत्ताच तर ती जरा कुठं निवांत आहे. कारण ‘नाच ग घुमा’चा सभोवतालचा आक्रोश आता बंद झाला आहे. म्हणूनच या आत्मलेखनाला ‘काळोखाची लेक’सारख्या कॅरोलिनासारखं स्वरूप असावं असं मला वाटतं.’
माधवी देसाई यांच्या या मनोगतातून त्या लेखिका व व्यक्ती म्हणून कधीही आत्ममग्न नव्हत्या, तर स्त्रीचे आत्मभान जपणार्या होत्या हे ठळकपणे अधोरेखित होते. रमाबाई रानडे यांनी लिहिलेले ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’, लक्ष्मीबाई टिळक लिखित ‘स्मृतिचित्रे’, कविवर्य माधव ज्युलियन यांच्या पत्नी लीलाबाई पटवर्धन यांचे ‘आमची अकरा वर्षे’, लीलावती भागवत यांचे ‘वाट वळणावळणाची’, सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’, शांताबाई कांबळे यांचे ‘माज्या जल्माची चित्तरकथा’, पार्वतीबाई भोर यांचे ‘एका रणरागिणीची हकीकत’, ऊर्मिला पवार यांचे ‘आयदान’, कमल पाध्ये यांचे ‘बंध अनुबंध’, विमल गोरे यांचे ‘तीन दगडांची चूल’, वैशाली परदेशी नाईक यांचे ‘उभी राहिलेच’, सुशील पगारिया यांचे ‘मी न कुणाची’, हिरा पवार यांचे ‘सांगायची गोष्ट म्हणजे’ अशी अनेक स्त्री आत्मचरित्रे ही मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली आहेत. या सगळ्यांमध्ये ‘नाच ग घुमा’चे वैशिष्ट्य असे की, माधवी देसार्इंनी स्त्रियांचे पारंपरिक व आधुनिक विश्व यांचा योग्य मेळ साधून आपल्या जीवनाकडे पाहिले. नियतीने जे जे स्वीकारायला लावले त्याचा न कुरकुरता स्वीकार केला. त्या घटनांतून नवीन अर्थ शोधायचा प्रयत्न केला व ते शब्दबद्ध करताना स्वत:चे म्हणून एक जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रसविले. स्वत:शीच चालणारा हा खेळ प्रसंगी जीव गुदमरायला लावणारा ठरू शकतो याची त्यांना पूर्ण जाणीव होती. वेळप्रसंगी अशी घुसमट झालीही. पण त्यातून सोडवणूक करून घेण्याचा मार्ग होता तो म्हणजे लेखनाचा. ‘नाच ग घुमा’ लिहून पूर्ण झाल्यानंतर त्या स्वस्थचित्त बसल्या नाहीत. त्यांच्या बहुप्रसवा लेखणीतून साकारलेल्या पुस्तकांची नावे घेतली तरी त्यांच्या बहुपेडी प्रतिभेची साक्ष पटते. असं म्हणू नकोस, भारत माझा देश आहे, धुमारे, फिरत्या चाकावरती, गोमन्त सौदामिनी, हरवलेल्या वाटा, कांचनगंगा, कथा सावलीची, किनारा, नकोशी, नियती, परिचय, प्रार्थना, सागर, सीमारेषा, शाल्मली, शुक्रचांदणी, सूर्यफुलांचा प्रदेश, स्वयंसिद्ध आम्ही, विश्वरंग, नाच ग घुमा अशा त्यांच्या पुस्तकांवर नजर टाकली तर त्यातील विषयांचे व लेखनबंधांचे वैविध्य सहजी जाणवते. ‘गोमन्त सौदामिनी’ या पुस्तकामध्ये गोव्यातील 100 कर्तबगार महिलांचे विश्व माधवी देसाई यांनी उलगडून दाखवले होते.
जीवनचक्राने त्यांना कोल्हापूर, गोवा, कल्याण, कोवाड, बेळगाव अशा विविध ठिकाणी नेले. पण हे चक्रच इतके भिरभिरते होते की त्यांना कोणत्याच ठिकाणी म्हणावे तसे स्थैर्य लाभले नाही. कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओच्या आवारात गेलेले बालपण, त्या शहरातील आठवणींनी मनात धरलेला फेर ओसरत नाही तोच नरेंद्र काटकर यांच्याशी झालेल्या विवाहाने माधवीताईंचे आयुष्य बदलले. नरेंद्र काटकरांच्या निधनानंतर प्रख्यात साहित्यिक रणजित देसाई यांच्याशी झालेल्या पुनर्विवाहानंतर एक वेगळाच आयुष्यक्रम सुरू झाला. रणजित देसार्इंपासून घटस्फोट घेतल्यानंतर माधवी देसाई यांना आयुष्याची आणखी निराळी छटा दिसली. आयुष्य हे कॅलिडोस्कोपसारखे असते ही जाणीव त्यांच्या सर्व लेखनातून दिसते. त्या पाठी याच अनुभवांची शिदोरी होती. प्रख्यात वडील तसेच पती यांच्या वलयात स्वत:ला हरवू न देता आपले स्वत्व जपलेल्या माधवी देसाई यांचे समाजभान व नात्यांच्या कोवळिकीची समज परिपक्व होती. स्त्रीवेदनेच्या हुंकाराला अर्थ देणार्या माधवीताई पंचत्वात विलीन झाल्या; पण त्यांचे अक्षरसाहित्य हे नेहमीच स्त्रीत्वाचे माहात्म्य परंपरावादी समाजाच्या मनावर बिंबवण्याचे काम करत राहील.
sameer.p@dainikbhaskargrou
No comments:
Post a Comment