प्रख्यात कवी ग्रेस यांच्या `बाई! जोगियापुरुष' या पुस्तकाचे परीक्षण मी दिव्य मराठीच्या ११ आॅगस्ट २०१३च्या रविवार पुरवणीत केले होते. त्या लेखाची ही लिंक आणि जेपीजी फाईल.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-meaningful-weaves-4345144-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/11082013/0/5/
------------
अर्थवाही पारा!
----------------
- समीर परांजपे
------------
वा-याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे करुण डोळे उभे की, सांज निळाईतले...
या दोन ओळी कानावर येतात. त्या आपल्या मनाचा ठाव घेतात. भवतालचा निसर्ग, पशूपक्षी, सांज निळाईतली कातरता एकाच काव्यसूत्रात गुंफली जाते आणि आपल्यासमोर उभी राहून म्हणते, ‘मला कवेत घे.’ रसिकाला पडणारी ही काव्यमिठी जहरी नसते, पण काहीशी लहरी असते. वा-याच्या लहरीवर जसे परागकण स्वत:ला अलगद स्वैर सोडून देतात, जिथे रुजती भूमी मिळेल तिथे अंकुराची निर्मिती करतात, तसेच या भावविभोर कवितेचेही आहे. तिच्यामध्ये हा प्रतिभेचा अंकुर रुजविणारा परागकण म्हणजे कवी ग्रेस. माणिक गोडघाटे म्हणजेच ग्रेस. माणिकासारखी लखलखती काव्यप्रतिमा आणि भावनांचा गोड कल्लोळ ज्याच्यात समावून गेलाय असा हा कवी.
‘जशी धोब्याची मऊ इस्तरी, तलम फिरावी सुतावरुनी, फाल्गुनातील चंद्रकोर तशी, मलिन मनाच्या धाग्यांवरुनी’ असे म्हणणा-या कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्याशी ग्रेस यांचे कविरक्ताचे नाते होते. ‘मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुस-या पिढीतील प्रमुख कवींमध्ये ग्रेस यांची गणना होते.’ असा एक कप्पा समीक्षकांनी ग्रेस यांच्यासाठी तयार केला खरा, पण ग्रेस आणि मर्ढेकर हे अशा समीक्षेपलीकडे दशांगुळे उरणारे आहेत. या कविरक्ताच्या नात्याची पुन्हा याद आली ती ‘बाई! जोगियापुरुष’ हा ग्रेस यांचा काव्यसंग्रहपाहिल्यानंतर.
प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी या कवितासंग्रहाचे केलेले मुखपृष्ठ अर्थवाही आहे. जांभळा, काळा, केशरी, लाल या रंगांनी लिंपलेले हे मुखपृष्ठ ग्रेस यांच्या कवितेतील अनादी पुरुषाला साद घालते. त्याचबरोबर मुखपृष्ठाच्या उर्ध्वरेषी जे चिमुकले मातीचे भांडे दिसते, ते बाईमाणसाच्या सर्वव्यापकतेचे दर्शक आहे. सारे जग तिच्यात सामावलेले आहे, तरी अनादी व्यवस्थेने तिला चिपट्यामापट्याचेच आकारमान दिलेय, असे सूचन या मुखपृष्ठातून मार्मिकपणे होते. समाजाने बाईमाणसाची जी अवहेलना केली त्यावर कवितेच्या माध्यमातून ग्रेस यांनी आक्षेप नोंदविले आहेत. हे आक्षेप उग्र भाषेत, क्रांतिकारी तत्त्वज्ञानाची आग ओकणारे नसतील. कदाचित दुर्बोध शब्दांच्या धारेतून हा संताप संयतपणे आपली वाट काढत असेल, पण ‘बाई! जोगियापुरुष’च्या काही कवितांतून ही जाणीव नेमकेपणाने व्यक्त होते. कवितेतील अर्थवाहीपणा तसेच त्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ हे अनेकदा ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ असे असते. पण या काव्यसंग्रहाच्या बाबतीत हे दोन्ही घटक ‘अढळ ध्रुवासारखे’ जुळून आलेले आहेत. त्यामुळे काव्यरसिकांच्या मनात भावनांचे ध्रुवीकरण होण्याचा धोका टळून वाचनाचा एकसंध परिणाम अनुभवता येतो.
1958 पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली. इन्ग्रिड बर्मन या अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटे यांनी ‘ग्रेस’ हे साहित्यिक नाव धारण केले. ‘दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस’ या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी ‘शी इज इन ग्रेस’ असे वाक्य येते. ‘हा बोलपट पाहात असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे माणिक गोडघाटे यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धुळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला. तिचे ऋण आठवत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले.’ असे ग्रेस यांनी लिहून ठेवले आहे. ग्रेसचे हे अक्षरवळण कसे घडत गेले, लोकांना कसे भुरळ घालत गेले, याचे ओझरते दर्शन ‘बाई! जोगियापुरुष’ या काव्यसंग्रहात प्रारंभीच घडते. 1958 ते 1961 या काळात ग्रेस यांनी लिहिलेल्या कवितांपैकी निवडक 28 कविता देण्यात आलेल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता’ ही ग्रेस यांची कविता चिरपरिचित आहे. पाऊस हा संदर्भ घेऊन त्यांनी अजून लिहिलेली एक कविता अशीच नादमय आहे. ‘झाली कोवळी वाटुली’ शीर्षकाच्या या कवितेच्या पहिल्या चार ओळी अशा आहेत...
माझ्या श्रावण नभात
रुप सावळे सावळे
आणि मेघांच्या राउळी
टाळ मृदुंग नादले
कवी ग्रेस यांच्या शोध, हाका, विठू, तळापाशी, माझ्या पावन क्षणांनो, जळे पान्ह्यांत पदर, अंतराय, प्राक्तन, ओल, वेणी, बंध, वरदान, अपरात्र, मरण, व्याप, अभिषेक, दु:ख होऊ दे विराट, घावांतले देव, थडगे, तीन कविता, कळशी, एकपण, कडा, दु:ख या कविता आपण जसजशा वाचत जातो, तसे कवीच्या अंतर्मनाशी सुखदु:ख, कारुण्य, त्वेष, नेणीव, उणीव यांचे व्यापक दर्शन रसिकाला होत जाते. दुर्बोधतेचा अबोध उंबरठा ओलांडून कवी आपल्या मनात घर करतो.
‘बाई! जोगियापुरुष’ कवितासंग्रहाचे पुढचे वळण आहे ग्रेसने केलेल्या पाऊससंध्येच्या अभिषेकाचे... त्याची विभागणी अभिषेक पहिला, अभिषेक दुसरा, अभिषेक तिसरा अशी केलेली आहे.
अभिषेक पहिलातील इंग्रजी कवितेमध्ये ग्रेस यांच्यातील कवी म्हणू लागतो...
The Village
Since every town is a part
of ancient village;
Do not count the clouds,
Do not arrange the raindrops!
You know, my beloved?
twilight is a sovereign
arranger of my prayers,
this is my nearest church
and rest of the world
is my farthest God!
ग्रेस कर्करोगाशी झुंजत होते. थोडीथोडकी नव्हे तब्बल तीन वर्षे. त्यात अखेर कविराजाने निसर्गेच्छेपुढे मान तुकवली. वयाच्या 75व्या वर्षी ग्रेस यांचे पुण्यात निधन झाले. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले असताना, कर्करोगामुळे शरीर विकल होत असतानाही त्यांची प्रतिभा मात्र नवनवोन्मेषशाली रंगबरसात करतच होती. त्यांनी लिहिलेल्या कविता हॉस्पिटलमधील संध्याभिषेक या विभागात देण्यात आलेल्या आहेत. त्यातील संध्यास्तोत्र कवितेत ग्रेस म्हणतात,
देवांच्या भिरभिर हाका
चालले नदीचे पाणी;
झाडांचे झुलते पूल
पक्ष्यांची मंद निशाणी
‘बाई! जोगियापुरुष’ काव्यसंग्रहाची संपूर्ण मांडणीच ग्रेसच्या शब्दकळेसारखी नेटकी आहे. माझे रामायण, आईबाईच्या द्विदल कविता, पंचतत्त्वाची साऊलगाणी : हॉस्पिटलमधली, साऊलस्वयंवर, माझ्या धर्मक्षेत्रातील प्रेषिताची साऊलगाणी, तीन बाया, तीन व्यासकन्या, वा-याचे उगमस्थळ, गंजलेल्या खिळ्यांची कहाणी, साँग्स ऑफ द बॅलन्सिंग स्टोन्स..., कविता (1990 ते 2011) या अन्य 11 विभागांतून ग्रेस यांच्या सुमारे 72 कविता देण्यात आलेल्या आहेत.
जोगियापुरुष : 1 आणि जोगियापुरुष : 2 या कविता ग्रेस यांचे भावविश्व किती व्यापक होते याचे निवळशंख दर्शन घडवितात. ‘जोगियापुरुष : 2’मध्ये ते लिहितात-
बाई! जोगियापुरुष
आला भिक्षेसाठी दारी;
त्याचा कमंडलू काळा
हाती सोनियाची झारी...
बाई! जोगियापुरुष
तीक्ष्ण देई ललकारी;
जशी अशुभाची वार्ता
येई मुलीच्या माहेरी
ग्रेस यांच्या कविता पा-यासारख्या आहेत. पारा तळहातावर टिकत नाही. ग्रेस जे सांगू पाहतात, ते तळहातावर झेलण्यासारखे नसतेच मुळी... ते मनातील मापकात एखाद्या पा-याप्रमाणे बंदिस्त करून ठेवावे लागते. मनाचे हिंदोळे जसे येतात तसे या काव्यार्थाच्या मापकातील अर्थवाही पारा वरखाली होतो व अर्थाचे नेमके तपमान किती, याचे निदर्शन करतो. ‘कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा प्रश्न लोक करतात; पण माझी जगण्याची एक त-हा आहे. मी आपल्याच त-हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. स्वगतामध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो, तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते. पण हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञानही मिरवित नाही. ज्ञानर्षीचा अवमानही करत नाही. मी शब्दकोशांना नवे शब्द देणारा आहे.’ असे ग्रेस यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. नेमके याच उद्गारांचे प्रतिनिधित्व ‘बाई! जोगियापुरुष’ हा काव्यसंग्रहही करतो. व ग्रेस यांच्या आधीच्या काव्यसंग्रहांशी आपले नाते घट्ट करतो. ग्रेसचा ‘कवितेचा पाठ’ आपणही म्हणू लागतो...
कवितेची देवा अशी करावी बांधणी
निद्रेखालून चांदणी हसताना
तिला द्यावा कौल हाक फोडुनिया बोल
राघू मैनेला सखोल जसा करी...
--
पुस्तकाचे नाव - बाई! जोगियापुरुष
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठसंख्या - 145, मूल्य - 200 रुपये
No comments:
Post a Comment