Thursday, March 6, 2014

कपूर घराणे, दिलीप कुमार आणि पेशावर

 दै. दिव्य मराठीच्या २२ डिसेंबर २०११च्या अंकात मी लिहिलेला लेख

http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-divya-marathi-editorial-column-2665361.html

----------

कपूर घराणे, दिलीप कुमार आणि पेशावर

समीर परांजपे | Dec 22, 2011, 23:51PM IST
--------

Email Print Comment
भारत व पाकिस्तानमधील तणावग्रस्त संबंधांचा अजिबात स्वप्नाळूपणे विचार न करतादेखील दोन्ही देशांच्या सर्वसामान्य जनतेची हृदये जिंकणारे काही जिव्हाळ्याचे समान बंध जाणवत राहतात. नव्हे, ते मनाला स्पर्शून जातात. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला असला तरी 1947च्या पूर्वी भारताचाच भाग असलेल्या या प्रदेशात अजूनही अनेक भारतीयांची मने अडकून पडली आहेत. याचप्रमाणे पाकिस्तानातील अनेक मंडळी भारताविषयीच्या आठवणींचे कढ काढत राहतात. भारतातील चित्रपट, त्यातील गाण्यांवर भारतीयांनंतर सर्वात जास्त प्रेम केले असेल ते फक्त पाकिस्तानी नागरिकांनीच...ही आठवण येण्याचे कारण पूर्वी भारतात व आता पाकिस्तानात असलेल्या पेशावर येथील किस्सा ख्वानी बाजार भागात बॉलीवूडचे प्रख्यात अभिनेते राज कपूर व दिलीपकुमार यांची पिढीजात घरे असून त्यांना राष्ट्रीय वारसा वास्तूंचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे खैबर-पख्तुनख्वा प्रांताचे माहितीमंत्री मियाँ मुख्तार हुसेन यांनी अलीकडेच जाहीर केले. दिलीपकुमार यांचा वाढदिवस 11 डिसेंबर व राज कपूर यांचा वाढदिवस 14 डिसेंबरला होता. तो मुहूर्त साधून हुसेन यांनी केलेली ही घोषणा या दोन महान अभिनेत्यांच्या दोन्ही देशांतील असंख्य चाहत्यांना सुखावणारी ठरली.
राज कपूर व दिलीपकुमार यांची प्रदीर्घ व यशस्वी चित्रपट कारकीर्द, त्यांची विलक्षण लोकप्रियता सर्वविदितच आहे. त्यामुळे त्या तपशिलात न जाता या दोन्ही अभिनेत्यांचा पाकिस्तानातील पेशावरशी नेमका संबंध काय, यावर अधिक लक्ष केंद्रित करणे उचित ठरेल. पेशावर येथील राज कपूर यांच्या पिढीजात घरासंबंधात बोलताना त्यांचे पिता व महान अभिनेता पृथ्वीराज कपूर यांचा उल्लेख होणे अत्यंत साहजिकच आहे. पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 रोजी पूर्वीच्या ल्यालपूर (आताच्या पाकिस्तानातील फैसलाबाद) जवळील समुंद्री येथे झाला. पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बसेश्वरनाथ कपूर हे पोलिस उपनिरीक्षक होते. बसेश्वर यांची बदली पेशावर येथे झाल्याने कपूर खानदान या शहरात राहायला आले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार (मूळ शब्द किस्सा कहानी, मग त्याचा अपभ्रंश झाला.) परिसरातील डाकी नालबंदी भागात कपूर खानदानाचे पिढीजात घर आहे. पृथ्वीराज कपूर यांचे सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण ल्यालपूर येथील खालसा कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पेशावरमधील एडवर्ड्स महाविद्यालयात झाले. एडवर्ड्स महाविद्यालयातील प्राध्यापक जय दयाळ हे कलाप्रेमी होते. पृथ्वीराज कपूर यांच्यातील अभिनेत्याला पहिली संधी मिळाली ती याच महाविद्यालयात. एडवर्ड्स महाविद्यालयातून पृथ्वीराज कपूर बी.ए. झाले. पृथ्वीराज कपूर यांचे खरे प्रेम नाटकांवरच होते. त्यामुळे पुढे साहजिकच त्यांची पावले नाट्य व चित्रपटसृष्टीकडेच वळली. 1928 मध्ये पृथ्वीराज कपूर मायानगरी मुंबईमध्ये आले आणि मग कायमचे इथलेच झाले. पृथ्वीराज कपूर यांचा विवाह पेशावरमध्ये रामसरनी मेहरा यांच्याशी झाला. त्या वेळी पृथ्वीराज यांचे वय होते 17 वर्षांचे, तर त्यांच्या पत्नीचे वय होते 14 वर्षांचे. भारताचा ‘द ग्रेट शोमन’ असा सार्थ गौरव करण्यात आलेला महान अभिनेता व पृथ्वीराज कपूर यांचा थोरला मुलगा राज कपूर याचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी पेशावरमध्येच झाला. त्यानंतर चारच वर्षांनी पृथ्वीराज कपूर मुंबईला नशीब काढण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर रामसरनी यादेखील 1930 मध्ये मुलाबाळांसह मुंबईत येऊन दाखल झाल्या. कालांतराने पेशावरशी कपूर घराण्याचा संबंध हळूहळू विरळ होत गेला. फाळणीनंतर तर तो संपूर्णच तुटला. पेशावरमधील कपूर घराण्याचे पिढीजात घर भारताच्या फाळणीनंतर त्यांच्या मालकीचे राहणे शक्यच नव्हते. हे घर सध्याच्या मालकांकडून योग्य मोबदला देऊन ताब्यात घेऊन ते राष्ट्रीय वारसा वास्तू म्हणून घोषित करण्याचे पाकिस्तानातील खैबर-पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने ठरवले आहे.
दिलीपकुमार या महान अभिनेत्याच्या पेशावरमधील पिढीजात घरालाही राष्ट्रीय वारसा वास्तूचा दर्जा बहाल करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ अशा शब्दांत गौरवल्या गेलेले तसेच ट्रॅजिडी किंग म्हणून रसिकमान्यता मिळालेले अभिजात अभिनेते दिलीपकुमार हेदेखील मूळचे पेशावरचेच. या शहरातील किस्सा ख्वानी बाजारातील मोहल्ला खुदादाद येथील निवासस्थानी 11 डिसेंबर 1922 रोजी दिलीपकुमार यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मोहंमद युसूफ खान. पेशावरमधील त्यांच्या कुटुंबामध्ये हिंडको ही भाषा बोलली जात असे. दिलीपकुमार यांच्यासह ती सर्व 12 भावंडे होती. दिलीपकुमार यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम सरवार. ते फळांचे व्यापारी होते. त्यांच्या पेशावर व महाराष्ट्रातील नाशिकजवळील देवळाली येथे मोठ्या फळबागा होत्या. 1920च्या दशकाच्या अखेरीस दिलीपकुमार यांचे कुटुंबीय मुंबईला आले व येथेच स्थायिक झाले. पुणे येथील सिरका येथे कँटीन सप्लायर म्हणून दिलीपकुमार यांनी 1940 मध्ये कामाला सुरुवात केली होती असे सांगितले तर आता कोणी सहजासहजी विश्वासही ठेवणार नाही. बॉम्बे टॉकीजचे संस्थापक हिमांशू राय यांच्या पत्नी व अभिनेत्री देविकाराणी यांच्या प्रोत्साहनानेच 1943 मध्ये युसूफ खान याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांनी युसूफ खान याचे दिलीपकुमार असे नामकरण केले. याच दिलीपकुमार   यांनी आपल्या अजोड अभिनयाने चित्रपटसृष्टीत पुढे अनेक दशके गाजवली हे सर्वांनाच ठाऊक आहे. दिलीपकुमार हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे असून ते 2000 पासून पुढे काही वर्षे राज्यसभेचे सदस्यही होते. अतुलनीय अभिनय कामगिरीबद्दल केंद्र सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन 1994 मध्ये गौरवले. मूळ पेशावरचे असलेल्या दिलीपकुमार यांना पाकिस्तान सरकारने निशान-ए-इम्तियाझ हा तेथील सर्वोच्च नागरी किताब देऊन गौरवले होते. एक विलक्षण योगायोग असा की सध्याचा आघाडीचा अभिनेता शाहरुख खान याचेही पिढीजात घर पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजारातील शाह वली कताल भागामध्येच आहे. या घरात शाहरुख खान यांचे वडील ताज मोहंमद यांचा जन्म झाला होता. शाहरुख खान याचे काही नातेवाईक अजूनही या घरात राहतात. शाहरुखचे वडील 1948 मध्ये दिल्लीत आले व भारतातच स्थायिक झाले. शाहरुख खानने आपल्या वडिलांसमवेत पेशावर येथील घराला दोनदा भेट दिली आहे. असे आहे पेशावर व भारतातील दिग्गज अभिनेत्यांचे अतूट नाते.

No comments:

Post a Comment