Friday, March 14, 2014

भटकी कुत्री ही मुंबईकरांसाठी कायमची डोकेदुखी! ( दैनिक सामना - १० जून १९९८)

 भटकी कुत्री ही मुंबईकरांसाठी कायमची डोकेदुखी या लेखाचा मुळ भाग


-----------

भटकी कुत्री ही मुंबईकरांसाठी कायमची डोकेदुखी या लेखाचा उर्वरित भाग.


------------



मुंबईत अाजमितीला सुमारे तीन लाख भटकी कुत्री असून गेल्या वर्षी सुमारे ६९ हजार लोकांना कुत्र्यांनी चावून अापले उपद्रवमुल्य सिद्ध केले. या भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यापेक्षा त्यांना ठार मारणे हाच उपाय अत्यंत प्रभावी असल्याचे मुंबईचा इतिहास तपासला तर लक्षात येऊ शकते असे मत व्यक्त करणारा लेख मी दैनिक सामनाच्या १० जून १९९८च्या अंकात पान क्र. १ वर लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिली अाहे.
-----
- समीर परांजपे
------------
भटकी कुत्री ही मुंबईकरांसाठी कायमची डोकेदुखी!
--------
मुंबईत अाजमितीला सुमारे तीन लाख भटकी कुत्री असून गेल्या वर्षी सुमारे ६९ हजार लोकांना कुत्र्यांनी चावून अापले उपद्रवमुल्य सिद्ध केले. या भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यापेक्षा त्यांना ठार मारणे हाच उपाय अत्यंत प्रभावी असल्याचे मुंबईचा इतिहास तपासला तर लक्षात येऊ शकते. मुंबईतील इंग्रजांच्या दप्तरी नोंदली गेलेली पहिली दंगल १८३२ साली याच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरुन झाली होती. त्याच ऐतिहासिक दाखल्यांचा विचार करुन काही भूतदयावादी लोकांनी अापली भटक्या कुत्र्यांना मोकाट सोडण्याविषयीची भूमिका किती ताणायची हे ठरविण्याची वेळ अाली अाहे.
मुंबईच्या इतिहासावरील गाईड टू बाॅम्बे (लेखक - मॅकलिन), बाॅम्बे इन मेकिंग (बी. एन. मलाबारी), एनिमल्स अँड नेचर आॅफ बाॅम्बे (काॅलिन) अशा १८७२ ते १९१३ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या अकरा-बारा इंग्रजी ग्रंथांत तसेच मुंबईचे वर्णन (लेखक -गो. ना. माडगावकर, पुस्तक प्रकाशनवर्ष - १८६३), तसेच मुंबई नगरी : न. र. फाटक (बृहन्मुंबई महानगरपालिका शताब्दी ग्रंथ -१९८१) या मराठी पुस्तकांत १९व्या शतकातील मुंबईतील भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण झालेली समस्या व त्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी यांचे वर्णन वाचायला मिळते. ते येथे सलगपणाने देत अाहे.
१८१८च्या सुमारास इंग्रज पलटणीतला एक स्मिथ नावाचा सैनिक भटका कुत्रा चावून मेला. मरण्याअाधी त्याने अापल्या मिळकतीतील बरीचशी रक्कम मुंबईतील इंग्रज प्रशासकीय अधिकार्यांच्या हाती सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून सरकारने मुंबई शहरातील भटकी कुत्री मारण्याचा उद्योग हाती घ्यावा अशी त्याची इच्छा होती. त्यानूसार ब्रिटिश सरकारने १८१९ साली मुंबईत भटकी कुत्री मारण्याचा एक कायदा केला. त्यानूसार वर्षातून तीन-चार महिने शहरातील भटकी कुत्री मारण्यास पोलिस व त्यांचे `कुत्रेमारु' मदतनीस कामाला लागायचे. हे काम सुरु करण्याअाधी ब्रिटिश सरकारचे लोक तशा अाशयाच्या जाहिराती मुंबईच्या गल्लीबोळात चिटकवीत असत किंवा सरकारी दवंडी पिटली जाई. मग पोलिस शिपाई व कुत्रेमारु लोक रस्तोरस्ती फिरुन जो भटका कुत्रा दिसेल त्याला ठार मारत असत. त्याबद्दल दर कुत्र्यामागे त्या मारेकर्यास अाठ अाणे बक्षिस देण्यास येत असे.
कुत्रेमारु लोकांनी कुत्र्यांना मारले की, त्यांचे मृतदेह पोलिस फौजदाराला दाखविण्यात येत व मग पोलिस फौजदार त्या लोकांना ठरल्याप्रमाणे इनाम देई. याप्रमाणे रोज दोन गाडे मेलेली कुत्री जमा होत असत. मग ही मेलेली कुत्री पुरण्यात येत किंवा सुनसान जागी रस्त्यावर आडोशाला टाकून दिली जात. सुमारे १८२८च्या सुमारास कुत्र्यांचे मृतदेह दाखवायचा त्रास नको म्हणून लोकांनी कुत्रे मारावे व त्यांच्या निव्वळ शेपट्या दाखवून इनाम घेऊन जावे असा फतवा ब्रिटिश अधिकार्यांनी काढला. पण लोकही हुशार होते. कुत्र्यांना मारण्याचे काम करणारे लोक भटक्या कुत्र्यांच्या फक्त शेपट्याच कापून त्यांना सोडून देत व नंतर हे लोक शेपट्या दाखवून इनाम मिळवित. मुंबईत अशा बिनशेपट्यांच्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने पोलिस फौजदाराच्या हा सारा कांगावा लक्षात येऊन त्याने ही `शेपटी दाखवा, इनाम मिळवा' पद्धतच बंद केली. मग पुन्हा कुत्र्यांचे मृतदेह पोलिस चौकीवर अाणायचा हुकुम झाला.
१८३०च्या सुमारास सर जमशेदजी जिजीभाई, शेठ मोतीचंद खेमचंद, शेठ देवीदास मनमोहनदास व कित्येक पारशी व दक्षिणी महाजन या सर्वांनी मिळून इंग्रज सरकारकडे अर्ज केला. भटक्या कुत्र्यांना मारु नका अशी विनंती या अर्जात करण्यात अाली होती. मुंबईतील भटक्या कुत्र्यांनी दुसर्या ठिकाणी नेऊन सोडावे अशी मागणी या `भूतदयावादी' अर्जात करण्यात अाली होती. ही मागणी सरकारने मान्य केली. त्यानूसार मुंबईतच एक वखार भाड्याने घेऊन त्यात भटक्या कुत्र्यांना ठेवण्यात येऊ लागले व त्यापैकी काही कुत्र्यांना जहाजात घालून अन्य ठिकाणी सोडण्यात येत असे. मात्र प्रत्येक कु्त्रा मारण्यासाठी आठ आणे इतके बक्षिस मिळत असल्याने हे काम करणारे पोलिस शिपाई व कुत्रामारु लोक यांनाही जरा लोभ सुटला होता. हे लोक मुंबईती रहिवाशांच्या घरात पाळलेले कुत्रेही अनेकदा पकडून मारायचे. त्यामुळे स्थानिक जनतेत असंतोष  पसरलेलाच होता.
६ जून १८३२ रोजी मुंबईच्या पारशीवाड्यात काही पोलिस शिपाई व कुत्रेमारु लोक शिरले. त्यांनी बळजबरीने काही पारशी लोकांच्या घरातून पाळलेली कुत्री पकडली व ठार मारली. हे सुरु असताना  काही पारशी तरुणांनी एकत्र जमून त्या शिपायांशी हुज्जतही घातली. पण ऐकतो कोण?  या घटनेने मुंबईतील पारशी दुखावले गेले. पारशी लोक कुत्र्याला पवित्र मानतात व उत्तरक्रियेच्या कार्यात कुत्रा या प्राण्याचे पारशांत महत्त्व अाहे. त्यामुळे ७ जून १८३२ला मुंबईत हरताळ पाळून भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर कुलाब्याला असलेल्या इंग्रज सैन्यातील पलटणींचे दाणापाणी बंद करावे असा निश्चय पारशी समाजातील शे-सव्वाशे तरुणांनी केला. ७ जून १८३२ रोजी सकाळपासून फोर्ट विभागातील तत्कालीन मुळ मुंबईत पारशी तरुणांनी धुमाकूळ घातला. आंदोलक पारशी तरुणांनी फोर्ट भाग व फोर्टबाहेर राहाणार्या लोकांशी सल्लामसलत करुन त्यांना सर्व बाजार बंद ठेवायला लावले. काही खाटिक कुलाब्याला इंग्रज सैन्यासाठी घेऊन जात असलेले मांस, त्यांच्या हातातून हिसकावून पारशी दंगेखोरांनी रस्त्यावर फेकून दिले. काही ख्रिश्चन मंडळी पाव-लोणी घेऊन चालले होते. त्यांच्याकडूनही या चीजा हिसकावून पारशी तरुणांनी तो फोर्टभोवतीच्या खंदकात फेकून दिला. मुंबईत तेव्हा अस्तित्वात असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायधीशांची बग्गी रस्त्याने चाललेली असताना तिच्यात दोन मेलेल्या घुशी पारशी दंगेखोरांनी टाकल्या.
हा सर्व दंगा त्या दिवशी दुपारी दोन-अडीचपर्यंत सुरु होता. शेवटी टाऊन मॅजेस्ट्रिटने इंग्रज सैनिकांच्या दोन पलटणी बोलावून त्यांना पारशी दंगेखोरांवर गोळीबार करायला लावला. त्यात दोन-तीन जण मेले. सुमारे पन्नास साठ जणांना पकडण्यात अाले. भटक्या कुत्र्यांच्या रक्षणासाठी काहीजणांनी केलेल्या दंगलीच्या उपद्व्यापामुळे त्यांना अडीच ते पाच वर्षे कालावधीच्या कारावासाच्या शिक्षाही सुनावण्यात अाल्या. यामुळे नंतर काही वर्षे पारशांवर इंग्रज नाराज होते. भटक्या कुत्र्यांमुळे हा उत्पात घडल्यानंतर इंग्रज प्रशासनाने मुंबईत १८३२नंतर कुत्री धरण्यासाठी बैलगाड्यांवर मोठमोठे पिंजरे लावून फक्त भटकी कुत्रीच पकडण्यासाठी पोलिस शिपायांना फिरायचा अादेश दिला. नंतर पकडलेली कुत्री चुपचापपणे मारली जात असत. १८६०च्या दशकात पन्नास जातींची कुत्री होती. १८६२च्या नोव्हेंबर महिन्यात एक मोठाला कुत्रा भाटिया व्यापार्याने तेव्हा ५०० रुपयाला विकत घेतल्याची नोंद अाहे. १८७० ते १९२० पर्यंतच्या कालावधीत मुंबईत सरासरी १० ते १२ हजार भटकी कुत्री होती अशीही नोंद आहे. यावेळी सर्वसाधारण वर्गातला कुत्रा पाच-सहा रुपयांना विकत मिळे तर शिकारी कुत्रे अरबस्तानातून अापल्याकडे अाणण्यात येत असे.
१९७२ सालामध्ये लंडन शहरातही भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या डोकेदुखी बनली होती. तेव्हा लंडनच्या महानगरपालिकेने कुत्रे मारायची मोहिम काढली. तेव्हाही काही भूतदयावादी लोकांनी आता सुरु अाहे तसाच विरोध चालविला होता. पण तेव्हा राॅड्रिक्स कॅमेरुन नावाच्या जैवतज्ज्ञाने लंडन टाइम्समध्ये पत्र लिहून असे निदर्शनास अाणले की, `माणूस वगळता अन्य सर्व प्राण्यांची जननक्षमता थोड्याफार फरकाने अधिक अाहे. त्यामुळे लंडनमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते यात काही आश्चर्य नाही. या कुत्र्यांचे नसबंदीकरण केले गेले तरी त्याला मर्यादा अाहेत. शहरी जीवनाला अपायकारक ठरणारी ही भटकी कुत्री ठार मारणे हा उत्तम उपाय अाहे'. या पत्रानंतर लंडनमध्ये भटकी कुत्री या विषयावर साधकबाधक चर्चा होऊन पकडलेल्यांपैकी ८० टक्के भटकी कुत्री मारणे व शक्य झाल्यास २० टक्के कुत्र्यांची नसबंदी करणे असे प्रमाण लंडन प्रशासनाने ठरविले व ते अाजही लंडनची महानगरपालिका पाळत अाहे.
मुंबई महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांनी तीन लाख कुत्र्यांपैकी फक्त पाच हजार कुत्र्यांची नसबंदी केली. ती २५ हजारांपर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु यामुळे प्रश्न सुटणार नाही. शहरातले भोंगळ भूतदयावादीही भटक्या कुत्र्यांच्या संख्यानियंत्रणावर योग्य उपाय न सांगता गोंधळ वाढवित अाहेत. पूर्वी मुंबई महानगरपालिका वीजेच्या धक्क्याने भटक्या कुत्र्यांना मारायची व त्यांची संख्या नियंत्रणात ठेवायची. हाच उपाय प्रभावी असून तो त्वरित अंमलात अाणावा अशी शहरातील काही प्राणीशास्त्रज्ञांचीही मागणी अाहे.
------

No comments:

Post a Comment