Thursday, March 6, 2014

गतस्मृतींचा इराणी चायखाना ( इराणी हाॅटेलांवरील लेखमालेचा पहिला भाग.)




 इराणी हाॅटेलांचे महात्म्य व त्यांची सद्यस्थिती याबद्दलची एक मालिका आज, २३ फेब्रुवारी२०१४ पासून मी दै. दिव्य मराठीच्या रसिक या रविवारच्या पुरवणीत सुरु केली आहे. त्या मालिकेतील प्रसिद्ध झालेल्या पहिल्या लेखाची जेपीजी फाईल. या लेखाच्या पानाची लिंक व टेक्स्ट मजकूर.
--------
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sameer-paranjpe-article-about-irani-tea-4529897-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/23022014/0/4/
 -

मुंबईच्या ग्रँट रोड पश्चिम परिसरात १९१२ साली सुरु झालेले म्हणजे आता तब्बल १०२ वर्षांचे झालेले बी. मेरवान अँड कंपनी हे इराणी हाॅटेल येत्या मार्चमध्ये बंद होत आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद या तीन शहरांमध्ये इराणी हाॅटेलांनी त्या शहरांच्या संस्कृतीमध्ये पानी कम चाय इतकीच लज्जत वाढविली. या इराणी हाॅटेलांच्या संगतीने मुंबईमध्ये अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक घडामोडी घडल्या. बदलत्या काळानूसार ही इराणी हाॅटेलही अस्तंगत होत चालली आहेत.
----------------
गतस्मृतींचा इराणी चायखाना
---------------------------------------
- समीर परांजपे
 
------------------------
‘क्या चाहिए?’
‘क्या है खानेमे?’
‘ऑम्लेट-पाव, भुर्जी, खिमा, चिकन-मटण पॅटिस, मावा केक, पुडिंग, पेस्ट्री, व्हेज रोल, वॉलनट बिस्किट्स, आलू टोस्ट, जॅम रोल, लेमन टी ब्रेड, जाम कुकीज, पीनट बटर कुकीज, ब्रुनमस्का, बनमस्का, खारी बिस्कीट...!!!’ एवढे सांगूनही वेटर दमत नाही...
ऐकणाराही न दमता नेहमीची परवलीची ऑर्डर देतो, ‘एक पानी कम चाय... मावा केक भी लाना।’
आठवड्यातले सातही दिवस सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत साधारण हाच संवाद तिथे ऐकायला मिळतो. फक्त गिर्‍हाईक व ऑर्डर घेणारा वेटर हीच पात्रे काय ती अधूनमधून बदलतात. थकले-भागलेल्यांचे, टाइमपास करू इच्छिणार्‍यांचे, कोलाहलातही शांतता शोधणार्‍यांचे हक्काचे ठिकाण असते ते... दॅट इज नन अदर दॅन इराणी रेस्टॉरंट्स ऑफ मुंबई!
इराणी हॉटेलचे नाव काढले की, प्रत्येकाच्या स्मृती टक्क जाग्या होतात. पक्का मुंबईकर तर कुलाबा कॉजवेवरील लिओपोल्ड या इराणी हॉटेलपासूनच मनातल्या मनात भ्रमंती करायला लागतो. फोर्टमधील याझदानी बेकरी, कयानी अँड कंपनीचे हॉटेल, मरीन लाइन्सच्या धोबी तलाव येथील सासानियन रेस्टॉरंटकडे धाव घेण्याआधी ब्रेबॉर्न स्टेडियमसमोरच्या स्टेडियम रेस्टॉरंटमध्ये त्याचे मन काही काळ घुटमळते. त्यानंतर तो ग्रँट रोड पूर्वेला स्टेशनसमोरच असलेल्या मेरवान इराण्याकडील मावा केकची चव अजूनही आपल्या जिभेवर रेंगाळतेय, याची खात्री करून घेत पुढे सरकतो. ताडदेव वगैरे भागातील त्यातल्या त्यात बर्‍या इराणी हॉटेल्सची आठवण काढत मुंबईकराचे मन पुढे घरंगळत जाते ते दादर पूर्वेच्या हिंदू कॉलनी रेस्टॉरंट, माटुंग्याच्या किंग्ज सर्कलच्या कुलार अँड कंपनी रेस्टॉरंटकडे. इराणी हॉटेलांची धाव कुठवर, तर शक्यतो जुन्या मुंबईच्या माहिम व शीव या सीमारेषेपर्यंत. वांद्र्यात इराणी हॉटेलच्या खाणाखुणा आढळतात, पण त्याही तुरळक. अंधेरीत एखादे किंवा आणखी थोडे पुढे कुठे तरी एखादे इराणी हॉटेल तुरळक आढळेलही... हे सगळे आठवत मुंबैकराची नजर काहीतरी शोधत राहते... कुठे गेला तो शिवाजी पार्क कोपर्‍यावरचा कॅफे आझाद इराणी... खाण्यापिण्याचे साम्राज्य पसरवणारे पण आता आपले राज्य गमावून बसलेले नाक्यानाक्यावरचे असे अनेक इराणी बादशाह मुंबैकराला आठवू लागतात. ग्रँट रोडचे मेरवान इराणी हॉटेलही आता येत्या मार्चमध्ये बंद होणार, या बातमीने त्याचे मन हेलावते...
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या चार वर्षांनंतरची आकडेमोड बघितली तर त्या वेळी मुंबईतील नाक्यानाक्यांवर उघडल्या गेलेल्या इराणी हॉटेलची संख्या होती तब्बल साडेतीनशे! मात्र, सध्या मुंबईमध्ये अस्सल इराणी हॉटेलांची संख्या उरली आहे उणीपुरी पंचवीस! म्हणजे आता ही हॉटेल्स हेरिटेज वास्तू म्हणून मिरवायला मोकळी झाली, इतकी मॅच्युअर झालीत... कारण या प्रत्येक हॉटेलचे सरासरी वय आहे किमान शंभर वर्षे...
इराणमध्ये कजार राजवटीच्या काळात (सन 1794 ते 1925) याज्द, केरमन प्रांतातील इराणी झोरोस्ट्रियन नागरिकांचा धार्मिक छळ होत होता. कजार राजवटीच्या पहिल्या शंभर वर्षांत तर या छळाची परमावधी झाली होती. त्याला कंटाळून इराणी झोरोस्ट्रियन आपल्या देशातून पलायन करून दुसर्‍या देशांत स्थायिक होत होते. त्यापैकी अनेक जणांचे पाय भारताकडे वळले. इराणी झोरोस्ट्रियनना भारतात तीनच शहरे अधिक भावली ती म्हणजे मुंबई, पुणे आणि हैदराबाद... त्यातल्या त्यात मुंबई जास्त. भारतात इंग्रजी राजवट स्थिरावल्यानंतर इराणी झोरोस्ट्रियनांमधील मुळातच असलेल्या उद्यमशीलतेला अधिकच बहर आला. हे लोक पहिल्यापासूनच कामसू. पारश्यांनी बँकिंग, व्यापार, उद्योगांत आपले बस्तान बसवले; तर इराणी झोरोस्ट्रियनांनी बेकिंग आणि मॉडर्न कॅफे रेस्टॉरंट सुरू करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. वेगळ्या अर्थाने त्यांनी इराणची चायखाना संस्कृती मुंबई व आणखी एक-दोन शहरांमध्ये रुजवली.
इराण्याच्या हॉटेलात पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे आरसेच आरसे लावलेले. त्या आरशांवर पानाफुलांची वेलबुट्टी रंगवलेली. गोल आकाराची सागवानी लाकडाची टेबले. संगमरवरी दगडाचा पांढरा पृष्ठभाग असलेल्या प्रत्येक टेबलाभोवती मांडलेल्या, गोल आकाराची बैठक असलेल्या व काळे पॉलिश चढवलेल्या सागवानी लाकडापासून बनवलेल्या चार खुर्च्या. प्रत्येक टेबलावर मिरी पावडर, मिठाचे दोन शेकर, पाण्याने भरलेला जग आणि दोन-तीन ग्लास ठेवलेले. अशा जामानिम्यासह इराणी हॉटेलवाला गिर्‍हाइकांच्या स्वागतासाठी सज्ज असतो. या हॉटेलमध्ये गेलात की कधी ते एकदम हाऊसफुल्ल दिसेल, तर कधी एकेका टेबलावर दोन-तीन माणसे किंवा कधी कोणी एकटाच बसलेला दिसेल. खाण्याचेही पदार्थ असेच अबरचबर सदरात मोडणारे. पुष्कळ जुन्या लोकांनी लिहून ठेवलेय, की इराण्याच्या हॉटेलमध्ये एक चहा घेऊन तुम्ही काही तास सहज बसू शकता. इराणी मालकही इतका सहिष्णू, की तो ‘कामाशिवाय बसू नये’ अशी पाटी सहसा लावण्याच्या विरोधातच असायचा. असा माहोल असेल तर गप्पिष्ट, टाइमपासवाले, क्रांती, क्रिएटिव्हिटीच्या चर्चांचे चर्चिल यांना इराणी हॉटेल म्हणजे महापर्वणी वाटली नसेल तरच नवल...
1970च्या दशकापर्यंत तरी मुंबईचा गिरगाव भाग मराठी माणसांचा बालेकिल्ला होता. तेथील स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचे ‘व्हॉईसरॉय’ व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नाव बदललेले ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ हे इराणी हॉटेल हिंदी, मराठी अभिनेते, साहित्यिकांच्या गप्पाष्टकांचा खास अड्डा होता. या हॉटेलमध्ये 1940च्या दशकात दिलीपकुमार बर्‍याचदा येत असत. त्यानंतरच्या काळात अभिनेते बबन प्रभू, लेखक जयवंत दळवींपासून अनेक नामवंत या हॉटेलात अधूनमधून हजेरी लावून जात असत. गिरगावात मौज, मॅजेस्टिक वगैरे सारखे मोठे प्रकाशक आहेत. मुंबई मराठी साहित्य संघ, भारतीय विद्या भवन सारखे नाट्यकर्मींना ऊर्जा देणारे मोठे स्रोत होते. त्यामुळे काहीतरी करायचेय, अशी खुमखुमी असलेले सगळे नवे-जुने कलाकार, रंगकर्मी, तंत्रज्ञ गिरगाव नाहीतर फोर्ट, व्हीटीतल्या इराणी हॉटेलांचा तासन्तास चालणार्‍या क्रिएटिव्ह डिस्कशनसाठी आसरा घ्यायचे. त्या वेळी इराणी हॉटेलात सिग्रेटी विकत मिळत. सिगारेटचे झुरके मारत चहाचा घुटका घेत या चर्चा खूप रंगायच्या. पूर्वी ज्युक बॉक्स असायचे इराणी हॉटेलांमध्ये.
त्यात ठरावीक नाणे टाकून आपले आवडते गाणे ऐकण्याचा शौक अनेक लोक पुरा करताना दिसायचे. मात्र हळूहळू काळ बदलत गेला तसतसा इराणी हॉटेलमधील माहोलही बदलत गेला. काळाने संघर्ष इतका तीव्र केला की, या हॉटेलांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. आजही लोक आवर्जून शोधत शोधत इराणी हॉटेलमध्ये जातात. तिथला ब्रुन, बन मस्का व गर्रर्रर्रम चाय यांचा आस्वाद घेत इराणी साम्राज्याच्या गतकालीन वैभवाच्या आठवणी काढतात... हे साम्राज्य लयाला का जाऊ पाहात आहे. त्यामागचे नेमके कारण काय आहे, असे प्रश्न त्यांच्या मनात रेंगाळतात...
(क्रमश:)
sameer.p@dainikbhaskargroup.com

No comments:

Post a Comment