Wednesday, March 12, 2014

सहकार्याचे अायाम (दै. दिव्य मराठी - ८ डिसेंबर २०१२)



भारत व रशिया यांच्यातील बहुअायामी संबंधांना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार्या भारत दौर्यामुळे नवीन अायाम मिळाले. या दौर्याअाधी दै. दिव्य मराठीच्या ८ डिसेंबर २०१२च्या अंकामध्ये मी भारत-रशिया संबंधांबाबत भाष्य करणारा हा लेख लिहिला.त्याची जेपीजी फाईल वर दिली अाहे.
-------------
सहकार्याचे अायाम
---------------
- समीर परांजपे
--------------
भारत व रशिया यांच्यातील बहुअायामी संबंधांना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार्या भारत दौर्यामुळे नवीन अायाम मिळणार अाहेत. अणुसंशोधन या क्षेत्रात भारताला रशियाकडून जे मोलाचे सहकार्य मिळाले अाहे त्याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे तामिळनाडूमधील कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प होय. यातील युनिट क्र. १ मधील रिअॅक्टरसाठी रशियाकडून अणुइंधन प्राप्त झाल्यानंतर लवकरच या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरु होऊ शकेल. सोव्हिएत रशिया व भारतामध्ये नोव्हेंबर १९८८मध्ये झालेल्या करारानूसार अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी एक करार करण्यात अाला. त्यानूसार कुडानकुलम प्रकल्पाच्या उभारणीसाठी २००१मध्ये दोन्ही देशांतील करारानंतर उभारणीस प्रारंभ झाला.
कुडानकुलम प्रकल्पाच्या उभारणीची पूर्वतयारी, अाखणी, बांधकाम देखरेख, यासाठीची उपकरणे, तंत्रज्ञान पुरवणे ही जबाबदारी रशियाकडे होती. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी देशांतर्गतच्या सहकार्याची धुरा भारतीय अणुऊर्जा महामंडळाने स्वीकारली होती. एप्रिल २०१०मध्ये कुडानकुलम प्रकल्पाच्या युनिट क्र. १ मधील रिअॅक्टर हा हीट जनरेटिंग इमिटेशन फ्युएलने सुसज्ज करण्यात अाला. या रिअॅक्टरच्या हायड्राॅलिक चाचण्या याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात यशस्वीरित्या पार पडल्या. जपानमध्ये सुनामी संकटामुळे फुकुशिमा अणुप्रकल्पामध्ये जो हाहाकार माजला त्याची भीती मनात घेऊन कुडानकुलम येथील अणुप्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. त्यांचा विरोध जसजसा तीव्र होऊ लागला तसतसे या प्रकल्पाचे भवितव्य काय, याविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या. या नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर गेल्या मार्चमध्ये कुडानकुलम अणुप्रकल्पाच्या उभारणीचे थांबलेले काम पुन्हा सुरु करण्यास तामिळनाडू सरकारने संमती दिली.
जुलैच्या मध्यास केंद्रीय अणुऊर्जा खाते व भारतीय अणुऊर्जा अायोग यांचे संयुक्त शिष्टमंडळ माॅस्कोला रवाना झाले. कुडानकुलम प्रकल्पातील युनिट क्र. १ मधील रिअॅक्टर सुरु करण्यासाठी व युनिट क्र. २च्या रिअॅक्टरच्या प्रगतीबाबत शिष्टमंडळाने रशियन अधिकार्यांशी चर्चा केली. प्रकल्पातील युनिट क्र. ३ व ४ मधील रिअॅक्टरच्या बांधणीबाबतही रशियाकडून पतपुरवठा होईल. या प्रकल्पांवर घेण्यात अालेल्या अाक्षेपांबाबत तथ्य असेल तर त्याप्रमाणे प्रकल्प अाखणीत सरकारने सुधारणा या करायलाच हव्यात. मात्र, काही वेळेस हा विरोध स्वयंसेवी संस्थांचा बोलविता धनी अमेरिका असल्याचा अाक्षेप घेण्यात येत होता. या स्वयंसेवी संस्थांकडून कायद्यांचेही उल्लंघन झाले होते. त्यामुळे चौकशीतील दोषी स्वयंसेवी संस्थांची मान्यता केंद्रीय गृहविभागाने रद्द केली होती.
या संस्थांना अमेरिका तसेच स्कँडेव्हियन देशांकडून निधी पुरविण्यात येत होता, असेही चौकशीत अाढळून अाले. भारत व रशिया सहकार्यातून उभारण्यात येणार्या कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला अनेक मुद्यांची ढाल पुढे करुन होत असलेल्या विरोधाला हे जे अांतरराष्ट्रीय परिमाण लाभले अाहे, ते अजिबात चकित करणारे नव्हते. भारत व रशिया मैत्रीमध्ये बिबा घालण्याचा प्रयत्न जगातील अमेरिकेसह अनेक बलाढ्य राष्ट्रांकडून नेहमीच होत आला अाहे. कुडानकुलम अणुप्रकल्पासाठी २० जून २०११ रोजी उपकरणे व तज्ज्ञ मंडळी रशियाहून घेऊन येणार्या विमानालाही घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चाही होती. अांतरराष्ट्रीय नियम पाळून प्रकल्प बांधल्याची ग्वाही रशिया व भारताच्या अणुशास्त्रज्ञांनी दिलेली अाहे.
भारतामध्ये वाहतूक व्यवस्थेस वळण लावण्यासाठी रशियाची ग्लोनास ही कंपनी पुढे सरसावली अाहे. या कंपनीने अापल्या ग्लोनास या नेव्हिगेशन सिस्टिमचे दर्शन घडविण्यासाठी व व्यापारी उलाढालीसाठी मुंबईतील वांद्रे या उपनगरात स्वत:चे शोरुम काही महिन्यांपूर्वीच उघडले अाहे. ग्लोनास तंत्रज्ञानयुक्त उपग्रहांचा भारताने वापर सुरु केल्यास त्याचा मोठा फायदा या देशाला विविध प्रकारे होऊ शकेल असा सदर कंपनीचा दावा अाहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, चंदिगढ अादी शहरांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होत अाहे. या शहरांतील प्रवासी वाहतूक सेवा, बसेस, इंटरसिटी बसेसच्या सेवेसंदर्भात प्रवाशांना हवी असलेली माहिती याबाबत ग्लोनास नेव्हिगेशन तंत्रज्ञानाव्दारे उत्तम सेवा देता येऊ शकते. भारतीय रेल्वेचा पसारा मोठा असून त्यासाठी ग्लोनास तंत्रज्ञान खूप उपयोगी अाहे. जीपीएसमध्ये असलेली अॅप्लिकेशन ग्लोनासमध्येही अाहेत. त्यामुळे जीपीएस-ग्लोनास अशी दुहेरी यंत्रणा ही कंपनी भारतामध्ये कार्यान्वित करु शकते. विज्ञान व तंत्रज्ञानाबरोबर इतर अनेक क्षेत्रांत भारत व रशिया यांच्यात असलेले सहकार्य पुढच्या काळातही असेच वृद्धिंगत होत राहिल यात शंका नाही. 

No comments:

Post a Comment