ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेणारा मी दैनिक दिव्य मराठीच्या १३ एप्रिल २०१३च्या अंकात लिहिलेला हा लेख. त्याची लिंक.
http://
http://
--------------------------
खलनायकी भूमिकांचा ‘प्राण’
-----------
- समीर परांजपे
-----------
‘आणि प्राण’...चित्रपटाच्या श्रेयनामावलीतील हा उल्लेख सर्वकाही सांगून जायचा. त्या चित्रपटात प्राण यांनी आपली भूमिका कशी रंगवलेली असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहायची. चित्रपट सुरू व्हायचा आणि प्राण आपल्या भूमिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनाचा कब्जा घ्यायचे. नायिकेला छळणारा त्यांचा खलनायक पाहून कधी प्रेक्षक मनातून खूप संतापायचा. ज्या क्षणी नायकाच्या हातून प्राण यांनी रंगवलेल्या खलनायकाचे निर्दालन व्हायचे त्या वेळी हाच प्रेक्षक खुश होऊन जोरजोराने टाळ्याही वाजवायचा. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय खलनायक ( व त्याचबरोबर खलनायकी प्रतिमेमुळे भाबड्या प्रेक्षकांकडून सर्वात जास्त हेटाळणी झालेले) प्राण यांच्याशिवाय दुसरे अन्य कोणीही नसावे.
प्राण यांचे मूळ नाव प्राण किशन सिकंद असे आहे. चित्रपटसृष्टीतील अनमोल योगदानासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदाच्या वर्षी प्राण यांना जाहीर करून केंद्र सरकारने उशिरा का होईना पण या महान कलाकाराचा उचित गौरव केला आहे. प्राण यांची चित्रपट कारकीर्द 65 हून अधिक वर्षांची असून त्यांनी सुमारे 350 हून अधिक चित्रपटांत मुख्यत्वे खलनायक व अन्य प्रकारच्या चरित्र भूमिका साकारल्या आहेत. ‘मजबूर’मधील मायकल या ख्रिश्चन व्यक्तीची भूमिका असो किंवा ‘जंजीर’मधील पठाण शेरखानची भूमिका असो अथवा ‘व्हिक्टोरिया नं. 203’मधील दादामुनी अशोककुमार यांच्याबरोबरची विनोदी भूमिका असो किंवा ‘शहीद’मधील गुन्हेगाराची भूमिका असो अथवा ‘बॉबी’मधील उच्चभ्रू समाजातील एका पित्याची भूमिका असो. ही प्रत्येक भूमिका सजीव करण्यामागे प्राण यांनी अथक परिश्रम घेतले.
फाळणीपूर्वी अखंड भारतातील लाहोर हेदेखील मुंबईप्रमाणेच चित्रपटनिर्मितीचे मुख्य केंद्र होते. मूळ छायाचित्रकार असलेल्या प्राण यांना लाहोर मुक्कामी चित्रपटांत काम करण्याची संधी चालून आली व त्यांनी त्याचे सोने केले. लाहोरमधील काही चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका साकारली व ते चित्रपट लोकप्रियही झाले. फाळणीनंतर 1948 मध्ये प्राण भारतात आले. आल्याआल्याच ‘गृहस्थी’ या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि गृहस्थीबरोबरच बरसात की एक रात, विरहन, चुनरिया, जिद्दी हे त्यांचे चित्रपट आले. या चित्रपटांपैकी बरसात की एक रात, बिरहन हे त्यांचे चित्रपट फाळणीच्या आधी पाकिस्तानात निर्माण झाले होते आणि पाकिस्तानी चित्रपट हिंदुस्थानात येऊन येथे प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांत ते नायक होते. पण लाहोरहून मुंबईला आल्यानंतर मुंबईतील चित्रपटांनी मात्र लाहोरच्या चित्रपटांतील नायकाचा चेहरा एकदम पुसून टाकला आणि त्यांना खलनायकाचा चेहरा दिला.
प्राण हे खलनायक म्हणून ख्यातकीर्त असले तरी एक विचारशील म्हणून त्यांची वास्तवातील प्रतिमा अत्यंत उच्च कोटीची आहे. प्राण मनाने उदार आणि प्रेमळ. त्यांनी अनेकांना निर्हेतुकपणे मदत केली आहे. निर्माते-दिग्दर्शक यांच्यापासून ते स्टंट दृश्य करणारे, फाइटमास्टर, स्पॉट बॉइज, लाइटमन, एक्स्ट्राज इ. अनेकांना प्राण यांनी मदत केली आहे. तसेच जुन्या जमान्यातील नट आणि वयोवृद्ध चरित्र अभिनेत्यांच्या मदतीला ते धावून गेले आहेत. सिने आर्टिस्ट असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातूनही त्यांनी अनेकांना मदत केली. विनोदी अभिनेत्री शम्मी यांनी या संघटनेबद्दल एका मुलाखतीत माहिती दिली होती. ‘द फिल्म (सिने) आर्टिस्ट असोसिएशन’ ही खरे तर कॅरेक्टर आर्टिस्ट असोसिएशन होती. कारण अभिनेत्यांना अनेकदा त्यांचे मानधन मिळायचे नाही. मनमोहन कृष्ण आणि के. एन. सिंग यांच्याप्रमाणेच प्राण हेदेखील या संघटनेचे संस्थापक सदस्य होते. बराच काळ कॅरेक्टर आर्टिस्ट असोसिएशन म्हणून या संघटनेने काम केले. चरित्र अभिनेत्याला मान्य केलेले मानधन मिळाले नाही की ही संघटना निर्मात्यांकडे आग्रह धरी आणि संबंधित चरित्र अभिनेत्याला त्याचे मानधन मिळवून देई. या संघटनेचे प्राण हे अत्यंत सक्रिय सदस्य होते. या संघटनेत त्यांनी खूप काम केले. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर होता. संघटनेच्या निधी उभारण्याच्या अनेक कार्यक्रमांसाठी अनेक कलाकारांचे सहकार्य प्राण मिळवीत असत. त्या काळात जुन्या जमान्यातील कलाकार आणि चरित्र अभिनेते आपल्या भविष्यासाठी काही गुंतवणूक करत नसत. 1960 च्या दशकात राजेंद्रकुमार यांनी आपले उत्पन्न योजनापूर्वक गुंतवले. त्याच्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांचा कित्ता गिरवला. प्राण या महान कलावंताबद्दल अशा अनेक उत्तम गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. खलनायक हा दुष्ट प्रवृत्तींचा मेरुमणी असतो. पण जीव ओतून भूमिका करणार्या प्राण यांनी या खलनायकीत असे रंग भरले की, तो चित्रपटात अनेकदा नायकालाही भारी पडला. प्राण यांच्या कारकीर्दीचे यश, समरसून काम करण्याच्या वृत्तीतच सामावलेले आहे.
--------------
No comments:
Post a Comment