Sunday, March 16, 2014

शिवकालीन शस्त्रास्त्रांचे `ध्येयासक्त’ संग्राहक (दैनिक सामना - २८ फेब्रुवारी १९९९)

शिवकालीन शस्त्रास्त्रांचे `ध्येयासक्त’ संग्राहक या लेखाचा मुळ भाग






शिवकालीन शस्त्रास्त्रांचे `ध्येयासक्त’ संग्राहक या लेखाचा उर्वरित भाग




जगातील शस्त्रास्त्रांच्या इतिहासात `मराठा खानदानाची शस्त्रे असा स्वतंत्र विभागच आहे. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचे हे उदाहरण आहे. मराठा खानदानाची शस्त्रे जमविणारे व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समाजाला पटवून देणारे वैयक्तिक शस्त्रसंग्राहक महाराष्ट्रात फारच कमी आहेत. त्यांच्यापैकीच एक गिरीश लक्ष्मण जाधव यांनी त्यांचा शस्त्रसंग्रह व शस्त्रज्ञानाविषयी सांगितलेल्या चार `उपजत गोष्टी या लेखात मांडल्या आहेत. हा लेख मी दैनिक सामनामध्ये २८ फेब्रुवारी १९९९ रोजी लिहिला होता.

शिवकालीन शस्त्रास्त्रांचे `ध्येयासक्त संग्राहक

-  समीर परांजपे
कोणत्याही समाजाची अस्तित्वप्रणाली ही त्या जनसमुहाची सुसंस्कृतता व शौर्यता या दोन घटकांवर आधारित असते हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे. आपल्या देशात आधीपासून नांदणार्या द्रविड संस्कृतीवर आर्यांनी शस्त्र व विचार यांनी कुरघोडी केली हे सर्वविदितच आहे. पुरातन काळापासून असा चालत आलेला संघर्ष व शस्त्रांचा परस्परपूरक संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळातही पाहावयास मिळतो. शिवरायांच्या मराठी फौजेकडील शस्त्रे व पाश्चिमात्यांकडील तत्कालीन आधुनिक शस्त्रे यांच्यातील जो तंत्र व विचारसंघर्ष झालेला आहे, त्याचा आंतरशाखीय अभ्यासपद्धतीचा अवलंब करीत फारसा विचार झालेला नाही. रुढार्थाने जे इतिहासकार नाहीत पण शिवकाळातील शस्त्रास्त्रांच्या स्वरुपाविषयी ज्यांना एक जबरदस्त आकर्षण आहे, अशा गिरीश जाधव यांनी या अंगाने स्वत:ची काही निरीक्षणे जरुर नोंदविली आहेत.
मुंबईतील कुर्ला हे मध्य रेल्वेच्या मार्गावरील उपनगर. तेथे अवघ्या दोन खोल्यांच्या छोटेखानी विश्वात नांदतो गिरीश लक्ष्मण जाधव यांचा संसार. पत्नी, मुले यांच्यासोबत गिरीश जाधवांचे आयुष्य धारदार केले आहे ते त्यांनी जमविलेल्या शिवकाळातील विविध शस्त्रास्त्रांनी. त्यांच्या भांडारात आहेत १८ तलवारी, ८ भाले, २ गुप्त्या, तलवारींच्या ५० विविध मुठी, १९ कट्यारी व सुरा, खंजीर, जंबिया, बिचवा, बर्ची, वाघनखे अशी सुमारे २५ लहान हत्यारे, जुने बाण, तोफेचे गोळे...शिवकाळातील शस्त्रांचे दालन खुलविणारे गिरीश जाधव आहेत तुमच्या आमच्यासारखेच नोकरदार. ते सांगू लागतात ` माझे घराणे कोल्हापूर परिसरातील...लहानपणापासून वडील लक्ष्मण जाधव यांनी शिवरायांच्या वीरकहाण्या ऐकवून माझे मन जोजविलेले...माझे गाव जयसिंगपूरपासून जवळच संताजी घोरपडे यांची समाधी आहे. धनाजी जाधवांची समाधी, प्रतापराव गुजरांची समाधी, कोल्हापूरातील छत्रपतींची गादी, ऐतिहासिक पन्हाळा किल्ला, शिवा काशीद व समरवीर बाजीप्रभूंची समाधी अशा गोष्टींनी माझा भाग चौफेर सजलेला असल्याने मराठा इतिहासाविषयी अभिमान निर्माण होणे स्वाभाविकच होते. त्यातही शिवकाळातील शस्त्रांविषयी मला विशेष ममत्व होते.
१९८० सालापासून गिरीश जाधवांच्या शस्त्रास्त्रसंग्राहकीला खरे वळण मिळाले ते पुण्यामध्ये राहात होते तेव्हा. पुण्यामध्ये जाधवांना मिळाली एक कट्यार. ही कट्यार त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दाखविताच ती शिवकाळातील असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांकडून शस्त्रसंग्रहाच्या छंदाची दिक्षाच गिरीश जाधवांनी घेतली. त्यानंतर आजपावेतो गिरीश जाधवांनी खूप कष्टाने आपल्याकडील शस्त्रसंग्रह वाढविला. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचे आशिर्वाद लाभले. अनेक मित्रांनी कौतुक केले. पुणे, मूंबई, सातारा, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद अशा शहरांतील जुन्या-पुराण्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा आजवर गिरीश जाधव शोध घेत आले आहेत. त्यांची तळमळ बघून बर्याचजणांनी ही शस्त्रे त्यांना भेट म्हणून दिली आहेत. हा संग्रह वाढवितानाच या शस्त्रास्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व काय, याचाही विविध संदर्भग्रंथांचे वाचन करुन जाधवांनी सखोल अभ्यास केला आहे.
जाधवांनी सांगायला आरंभ केला `माझ्या निवेदनाचा सारा मुलाधार आहे शिवकाळ. यापूर्वी बहामनी राजवटीची शकले होऊन कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही व मुघल साम्राज्य निर्माण झाले होते. या चार रिपूंचा सामना करीत शिवरायांनी आपले साम्राज्य निर्माण केले. सह्याद्रीच्या कडेकपाकीत दुर्गम किल्ल्यांच्या सहाय्याने उभारलेल्या स्वराज्यासाठी झटणार्या मराठा फौजेतील सैनिक हे अत्यंत काटक व गनिमी काव्याने लढणारे असत. त्यामुळे शिवरायांच्या लढायांमध्ये हत्ती, घोडे, तोफा, रथ यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे फारसे दिसत नाही. याउलट मुघलादी सैन्याकडे अव़ज़ड तोफा, हत्ती, जनानखाना आदींचा मोठा भरणा असे. मराठा सैन्याच्या हालचाली चपळ असत. त्यामुळे सहज वागविता येणारी अशी शस्त्रे बाळगणेच मराठी सैनिकांना सोयिस्कर वाटत असे. शिवकाळातील शस्त्रास्त्रांची पाहणी केली तर असे दिसते की, शस्त्रास्त्रविश्वात मराठा खानदानाची शस्त्रे असा स्वतंत्र विभागच करता येतो.
` मराठा सैनिकांनी प्रामुख्याने कर्नाटकी धोप (फिरंग), पट्टा अशा तलवारी असायच्या. त्याचबरोबर वाघनखे, बिचवा आदी लहान हत्यारेही असायची. यातील कर्नाटकी धोप (फिरंग) ही तलवार वैशिष्ट्यपूर्ण होती. सुमारे ३६ ते ३८ इंच लांबीचे पाते व ८ इंच लांबीची मुठ जोडलेली ही तलवार एकधारी होती. पेशवे, पासलकर, जेधे, शिंदे आदी शिवकाळातील अनेक मानकरी गाजलेली सरदार घराणी होती. त्यांच्या म्यानातही प्रामुख्याने कर्नाटकी धोपच असत. तलवारीच्या खानदानातील पट्टाहाही परिमाणकारी होता. सरळसोट आकाराच्या पट्ट्याचे पाते ४० इंच असून त्यास जोडलेली मुठ ही सुमारे १० ते १२ इंचाची असे. पट्ट्याचे दोन प्रकार होते. काहींचे पाते कठीण तर काहींचे लवचिक असे. पट्ट्याला अस्सल मराठा खानदानीतल्या मुठी बसविण्यात येत असत. दुधारी असलेल्या पट्ट्यांची वार करण्याची क्षमता त्यामुळे वाढत असे. मराठी खानदानीतल्या तलवारींची निगा राखणारे शिकलगार म्हणून ओळखले जात. तलवारीची पाती मुठीत बसविणे, त्यांना धार काढणे ही कामे शिकलगार करीत. लोहार, घिसाडी हे तलवारी, मुठी करीत असत. शिवरायांनी मुल्हेर, औरंगाबाद, रायगड अशा विविध ठिकाणी तलवारी बनविण्याचे कारखाने उघडले होते...
शस्त्रास्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांनी अंतरंग उमलून दाखविले. `तलवारीशिवाय मराठा सैन्याकडे असलेली आणखीनही काही शस्त्रास्त्रे असत. त्यात भाल्याच्या जातकुळीतील विटा, तसेच भाल्यापेक्षाही मोठे व अखंड लोखंडापासून बनविलेले सांग असत. ताक घुसळायच्या रवीप्रमाणे दिसणारे अणकुचीदार टोके असलेले गुरज, कुर्हाडी, परशू या शस्त्रास्त्रांसोबत ढालीही असत. हत्ती, गेंडा, कासवाच्या पाठीच्या कातड्यांपासून ढाली बनविल्या जात. चिवट पण कठीण पण वजनाने लहान व अधिक बाकदार, आकाराने मोठी अशी ढाल उत्कृष्ट समजण्यात येते. अशा ढालींवर लाखेचा लेप लावून व घोटून ती चिवट बनविली जाई. अशा ढालींवर तलवारीचे घाव पडले तरी ती तुटत नसेच. मराठा खानदानाच्या तलवारींसाठी कालांतराने चांगले पोलाद मिळायला लागल्यानंतर पोर्तुगीज, तुर्कस्थान येथील पाती बसविणे शिवकाळातच सुरु झाले. भवानी तलवारीचे पाते हेदेखील पोर्तुगीज आहे. मराठा खानदानातील तलवारींच्या मुठीकडे विशेष लक्ष पुरविण्यात येत असे. तलवारींच्या मुठींवर बोटांना लागू नये म्हणून मुठीच्या समोर एक संरक्षक कवच दिले जाते. त्याला परज असे म्हणतात. हे संरक्षक पत्रे तलवारींना बसविण्याची पद्धती शिवाजी महाराजांनी सुरु केली. शिवरायांच्या काळात मराठा सैन्य एकूण ७० ते ७५ हजारांच्या आसपास असावे. या सैन्यास शस्त्रास्त्रे पुरविण्याची जबाबदारी सेनापतीकडे असे. सैनिक या तलवारी कमरेस शेला बांधून त्यात खोचून ठेवत असत. मराठा सैन्यात पायदळाबरोबर घोडदळही होते. घोड्यावर बसणारा सैनिकही आपल्याबरोबर ठेवायच्या शस्त्रास्त्रांची योजना नीट करत असे.
` याच लहान शस्त्रास्त्रांचाही खूप विकास झाला होता. यामध्ये कट्यार, बिचवा, खंजीर, जंबिया, सुरा, चिलानम, कर्द, पेशकबज, चाक, वाघनखे आदींचा समावेश आहे. या लहान शस्त्रांच्या मुठी या चांदी, लाकडी, पितळी, लोखंडी, संगमरवरी, जेड, हस्तिदंती, हरणाच्या शिंगांच्या असत. त्यांच्यावर कलाकुसर केलेली असे.
शस्त्रास्त्रसंग्राहक या नात्याने शिवकाळातील शस्त्रास्त्रांचा संक्षिप्त गोषवारा गिरीश जाधवांनी कथन केला होता, पण त्यांच्या मनात काही व्यथाही जरुर आहेत. मराठा खानदानीच्या शस्त्रास्त्रांचे साकल्याने दर्शन घडविणारी समृद्ध, परिपूर्ण संग्रहालये महाराष्ट्रात त्यामानाने कमी आहेत. या भावनेने ते अस्वस्थ होतात. मराठा खानदानातील शस्त्रांचे बर्यापैकी नीटस दर्शन होते ते अक्कलकोटच्या श्री फत्तेसिंह शस्त्रास्त्र संग्रहालयात. येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दालन आहे. तिथे या काळातील अत्यंत दुर्मिळ शस्त्रे मांडून ठेवली आहेत. शिवाय कोल्हापूरातील नवीन राजवाड्यातील शस्त्रास्त्रांचे दालन, सातारा घराण्याच्या संग्रहालयातील शस्त्रास्त्रे, बडोदा राजवाड्यातील शस्त्रास्त्र दालन, प्रिन्स आँफ वेल्स संग्रहालय या ठिकाणी मराठी खानदानातील शस्त्रास्त्रांचा उत्तम संग्रह आहे. पण समाजात या शस्त्रास्त्रांचे जतन व त्यांचा अभ्यास करण्याबाबत फारच अनास्था आहे. गिरीश जाधव यांच्यासारखे वैयक्तिक शस्त्रसंग्राहक मात्र महाराष्ट्रात फारच कमी आहेत. नागपूरचे कृष्णराव चिटणवीस, औरंगाबाद येथील डाँ. पुरवार, विश्रामबाग वाड्यात बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडील शस्त्रसंग्रह हे गिरीश जाधवांना अधिक आदर्श वाटतात. शिवकाळाशी नाळ जोडणारी अनेक सरदार, दरकदार घराणी आज महाराष्ट्र व अन्य राज्यांत आहेत. त्यांच्याकडेही मराठा खानदानाच्या शस्त्रास्त्रांचा विपुल साठा आहे. खंडेनवमीच्या पूजेसाठी ही शस्त्रास्त्रे बाहेर काढावयाची व यानंतरचे वर्षभर त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही अशी काहीशी प्रथा या घराण्यांमध्ये सध्याच्या काळात बोकाळली आहे. ज्या शस्त्रास्त्रांनी आपले संरक्षण केले त्यांच्याशी प्रतारणा करणार्या सरदार घऱाण्यांनी खरेतर ही शस्त्रास्त्रे अभ्यासासाठी संशोधकांना उपलब्ध करुन द्यावीत. ही अनास्था मराठी इतिहास संशोधकांमध्येही आहे. मराठीत शस्त्रास्त्रांविषयी फारच कमी पुस्तके आहेत. १९२० साली बडोदा संस्थानात प्रतापराव गायकवाडांना प्रशिक्षण देण्यार्या प्रो. माणिकराव यांनी `श्री प्रताप शस्त्रागारावर एक पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी शस्त्रास्त्रांचे प्रकार व मराठा खानदानातील शस्त्रास्त्रांचे साधार वर्णन केलेले आहे.
इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्याकडे तंत्रशुद्धदृष्ट्या अधिक प्रगत अशा तलवारी, तोफा होत्या, पण त्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर न करता शिवरायांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे वापरण्यावरच अधिक लक्ष केंद्रित केलेले होते. अगदी तोफांची गोष्ट घेतली तरी किल्ल्याच्या गड, बुरुजांवर वा आरमारी नौकांवर असणार्या तोफा या मध्यम पल्ल्यांच्याच असत. या तोफांपैकी काही शिवरायांनी इंग्रजांकडून घेतल्याचे उल्लेख आहेत. याउलट मुघल वा अन्य पातशहांकडील तोफा या लांब पल्ल्याच्या, अवजड अशा असत. त्यामुळे सह्याद्रीच्या कडेकपारीत युद्धप्रसंग आला की, या तोफा वाहून नेणे अवघड होत असे. त्यामुळे या सैन्याची हालचाल मंदावत असे. याउलट अत्यावश्यक व चपळ हालचाल करण्यास आडकाठी न करणारी शस्त्रे बाळगल्याने मराठा सैन्य गनिमी कावा तंत्रात नेहमीच उजवे ठरायचे. शिवाजी महाराजांनी ज्या मोहिमा आखल्या त्यामध्ये आपला कुटुंबकबिला त्यांनी बरोबर नेला आहे असे कधीही दिसले नाही. या सर्व गोष्टी मर्मस्थानी ठेवूनच शिवरायांच्या युद्धनीतीचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. शस्त्रास्त्रांविषयी आपुलकीने बोलणार्यांविषयी गिरीश जाधवांच्य़ा मनात खास जागा आहे. महाराष्ट्रात गिरीश जाधवांसारख्या वैयक्तिक शस्त्रसंग्राहकांची संख्या वाढल्यास त्यातून शस्त्रास्त्रविषयक थंड पडू लागलेल्या मराठी जाणीवाही पुन्हा फुलारुन निघण्याची शक्यता आहेच.



No comments:

Post a Comment