Thursday, March 6, 2014

ऑलिम्पिकचा मराठी ग्रंथखजिना

 












--------

२७ जुलै २०१२ रोजी आँलिम्पिक खेळांना लंडनमध्ये प्रारंभ झाला होता. त्यानिमित्त दै. दिव्य मराठीमध्ये २२ जुलै २०१२ रोजी आॅलिम्पिक या विषयावर जितकी मराठी पुस्तके आली. त्यांचा परिचय करुन देणारा मी लेख लिहिला होता.

----------

ऑलिम्पिकचा मराठी ग्रंथखजिना 

---------

- समीर परांजपे
----------
२७ जुलै २०१२ रोजी आँलिम्पिक खेळांना लंडनमध्ये प्रारंभ झाला होता. त्यानिमित्त दै. दिव्य मराठीमध्ये २२ जुलै २०१२ रोजी आॅलिम्पिक या विषयावर जितकी मराठी पुस्तके आली. त्यांचा परिचय करुन देणारा लेख लिहिला होता.  १८९६ साली आधुनिक शैलीतील आँलिम्पिक खेळ पार पडले. त्यानंतर त्या खेळांचा आजवरचा प्रवास सुरु आहे. मराठी ग्रंथविश्वामध्ये आँलिम्पिक खेळांबद्दल पहिले व त्यानंतर अगदी ताजे अशी किती मराठी पुस्तके लिहिली गेली, त्यातून आँलिम्पिक खेळांविषयी कोणकोणत्या अंगाने माहिती देण्याचा प्रयत्न झाला हे ताडून पहावे असे मनात आले व लक्षात आले या अंगाने आजवर कुणीच शोध घेतलेला नाही. मग मुंबईतील दोन महत्त्वाच्या ग्रंथालयांत असलेल्या आँलिम्पिकवरील मराठी पुस्तकांचा आधार घेऊन तसा शोध घेतला. हा शोध परिपूणर् नाही याची मला जाणीव आहे. मी खाली लेखात नमूद केलेल्या आँलिम्पिकवरील मराठी पुस्तकांच्या यादीत माझ्याकडून काही नावे ती पुस्तके न मिळाल्याने राहिली असण्याची शक्यता आहे. आँलिम्पिक खेळ व खेळाडूंवर लिहिलेल्या गेलेल्या अजून मराठी पुस्तकांची नावे माहित असल्यास वाचकांनी ती मला जरुर कळवावीत. 
----------------------------------------
 http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/22072012/0/8/ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-of-london-olympic-3553727-NOR.html ---------------------------------------- ऑलिम्पिकचा मराठी ग्रंथखजिना - समीर परांजपे paranjapesamir@gmail.com ---------------------- ज्याप्रमाणे आयुष्यातही जिंकण्यापेक्षा कसे झगडलात हेच अधिक महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे ‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांतील सर्वात मोठी गोष्ट जिंकणे ही नसून त्यातील सहभाग हीच आहे. प्रत्यक्ष जिंकण्यापेक्षा तुम्ही कशी लढत, झुंज दिली हेच अधिक महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. - बॅरेन पिअरे द कुर्बतिन फ्रेंच शिक्षणतज्ज्ञ- इतिहासकार आणि आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांचे जनक असलेल्या बॅरेन पिअरे द कुर्बतिन यांनी केलेल्या उपरोक्त प्रतिपादनात ऑलिम्पिक खेळांचे सारतत्त्व दडले आहे. यंदा ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये 27 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक खेळ होणार आहेत. या आधी लंडन शहरामध्ये 1908 व 1948मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. ऑलिम्पिक खेळांच्या प्राचीन ते अर्वाचीन काळापर्यंतच्या प्रवासावर मराठी, इंग्रजीसह जगातील बहुतांश भाषांंमध्ये पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत. ऑलिम्पिकची कथा चितारणा-या इंग्लीश भाषेतील पुस्तकांबद्दल इंटरनेटसहित अनेक माध्यमांतून सहजी माहिती हाती लागू शकते. मात्र मराठीमध्ये ऑलिम्पिक खेळ व ऑलिम्पिक खेळाडूंवर कोणती पुस्तके लिहिण्यात आली आहेत, असा प्रश्न विचारला तर ब-याच जणांना त्याचे उत्तर पटकन देता येणार नाही. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या 100 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या संस्थेचा संदर्भविभाग व तशीच मोठी परंपरा असलेले दादर सार्वजनिक वाचनालय या दोन संस्थांमध्ये ऑलिम्पिकवर लिहिल्या गेलेल्या मराठी पुस्तकांचा शोध घेतला तर आगळी माहिती हाती आली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील विविध विषयांवर मराठीतून पुस्तके प्रकाशित करण्याचा प्रघात दक्षिणा प्राईज कमिटीच्या पुढाकाराने सुरू झाला. त्या वेळेपासून सुमारे 1974पर्यंत मराठीत ऑलिम्पिकवर पुस्तक लिहिले गेले असावे, अशी शक्यता खूपच कमी दिसते. खूप धुंडाळूनही या कालावधीतील ऑलिम्पिकवरचे मराठी पुस्तक काही सापडू शकले नाही. निदान उपरोक्त ग्रंथालयांमध्ये तरी ते नाही. महाराष्ट्रात 100 वर्षांहून अधिक जुनी अनेक ग्रंथालये आहेत. त्यांच्याकडे 1974 सालाच्या आधी प्रकाशित झालेली ऑलिम्पिक या विषयावरील मराठी पुस्तके संग्रही असल्यास त्या ग्रंथसंग्रहालयांनी किंवा जिज्ञासू वाचकांनी त्या पुस्तकांची माहिती आवर्जून सर्वांसमोर उजेडात आणायला हवी. हा सगळा कालक्रम बघता ऑलिम्पिकवरील हाती लागलेल्या मराठी पुस्तकांमध्ये सर्वात जुने पुस्तक हे ‘ऑलिम्पिक महोत्सव आणि त्यातले विक्रमी खेळाडू’ या नावाचे आहे. ‘दी ऑलिम्पिक्स अँड देअर हिरो’ या मेलव्हिल डिमेलो लिखित इंग्रजी पुस्तकाचा प्रख्यात लेखक भा. रा. भागवत यांनी ‘ऑलिम्पिक महोत्सव आणि त्यातले विक्रमी खेळाडू’ या नावाने मराठीत अनुवाद केला होता. हे मराठी पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टने 1975मध्ये प्रकाशित केले असून त्याच्या वितरणाची जबाबदारी पॉप्युलर प्रकाशनाने स्वीकारली होती. ऑलिम्पिक खेळांचे वैभव, ऑलिम्पिक सामने : प्राचीन-अर्वाचीन, नामवंत ऑलिम्पिक खेळाडू, नवयुवकांचे आव्हान अशी त्यातील प्रकरणांची नावे असून हे पुस्तक 64 पृष्ठांचे आहे. भा. रा. भागवतांपेक्षा ऑलिम्पिक खेळांसंदर्भात अधिक विस्ताराने माहिती देण्याचा प्रयत्न भानू शिरधनकर यांनी लिहिलेल्या व मनोरंजन प्रकाशनने जुलै 1976मध्ये प्रकाशित केलेल्या ‘ऑलिम्पिकची नवलकथा’ या पुस्तकात करण्यात आला होता. ऑलिम्पिक खेळाडंूच्या चित्तथरारक विक्रमांच्या कहाण्या, त्या खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत याचा सविस्तर तपशील या निमित्ताने मराठी भाषेमध्ये पुस्तकरूपात पहिल्यांदाच आला होता. त्यानंतर 1976मध्ये प्रख्यात पत्रकार हेमंत जोगदेव यांचे ‘ऑलेंपिक’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ऑलिम्पिकच्या प्राचीन ते आधुनिक इतिहासाचा हेमंत जोगदेव यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यातूनच त्यांनी ऑलिम्पिकवर आणखी काही पुस्तके लिहिली. त्या प्रवासाचा प्रारंभ त्यांच्या ‘ऑलेंपिक’ पुस्तकाने झाला. या पुस्तकात ऑलिम्पिक, ऑलेम्पिया आणि ऑलेम्पिकचा जन्म, प्राचीन ऑलिम्पिक, ऑलिम्पिकचे पुनरुज्जीवन, अथेन्स ते म्युनिक, मॉट्रिअल ते मॉस्को, ऑलिम्पिक परंपरा, रूढी व संघटना, ऑलिम्पिकमधील विविध लोक, भारत आणि हॉकी, ऑलिम्पिक आणि भारत, देशी खेळ आणि ऑलिम्पिक, ऑलिम्पिक - भवितव्य व समस्या आदी मुद्द्यांचे अत्यंत सविस्तर विश्लेषण केलेले आहे. हेमंत जोगदेव यांच्या या पुस्तकाच्या निमित्ताने मराठीमध्ये ऑलिम्पिकचा इतिहास अत्यंत चिकित्सक व शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रथमच मांडण्यात आला. 1984मध्ये लॉस एंजलिस येथील ऑलिम्पिकला प्रत्यक्ष उपस्थित राहून मायदेशात परतल्यानंतर लेखक शरद भाटे यांच्या मनात या सा-या आठवणी रुंजी घालू लागल्या व त्यातूनच त्यांनी ‘ऑलिम्पिकच्या सुखद आठवणी’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक ओंकार प्रकाशनाने 1984मध्ये प्रकाशित केले आहे. याच वर्षीच्या जुलै महिन्यात आरती प्रकाशनाने अनिल चक्रदेव यांचे ‘ऑलिम्पिक’ या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध केले. हे पुस्तक त्या आधी ऑलिम्पिकवर प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकांची रूढ वाटच चोखाळणारे होते. अनिल चक्रदेव यांच्या या पुस्तकातील प्राचीन ऑलिम्पिक, ऑलिम्पिकचे पुनरुज्जीवन, आधुनिक ऑलिम्पिकची वाटचाल, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, ऑलिम्पिकमधील रथी-महारथी व याच पुस्तकांतर्गत असलेल्या दुस-या भागातील ऑलिम्पिकमधील खेळाडूंची कामगिरी असे मथळे असलेली प्रकरणेच या पुस्तकाचे स्वरूप स्पष्ट करण्यास पुरेशी आहेत. 1984 सालानंतर ऑलिम्पिकवर मराठी पुस्तक यायला 1988 साल उजाडले, असा प्राथमिक निष्कर्ष शोधादरम्यान सापडलेल्या पुस्तकांवरून काढावासा वाटतो. डोंबिवलीच्या गौरी प्रकाशनाने 1988मध्ये सदानंद जोशी यांनी लिहिलेले ‘ऑलिम्पिक! ऑलिम्पिक!!’ हे मासिकाच्या आकारातील पुस्तक प्रकाशित केले. त्यामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे वैभवशाली उद्घाटन सोहळे, ऑलिम्पिकची जन्मकथा, ऑलिम्पिकचा प्रवास, असे खेळ असे खेळाडू, देशोदेशांची कामगिरी, सेऊल ऑलिम्पिकवर दृष्टिक्षेप अशी प्रकरणे आहेत. अमेरिकी कृष्णवर्णीय अ‍ॅथलिट जेम्स क्लिव्हलँड (जेसी) ओवेन्स याने 1936मध्ये बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी, तसेच कार्ल लुईस यांची विशेष माहिती दिलेली आहे. धावणे या क्रीडा प्रकारातील मॅरेथॉन, रिले शर्यती, थ्रोईंग इव्हेन्ट्स, कॉम्बॅट स्पोर्ट्स, फिल्ड गेम्स, वेटलिफ्टिंग, आर्चरी, जलक्रीडास्पर्धा यांचा सविस्तर परिचय करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये तुलनेने त्या वेळी नव्याने समावेश झालेल्या बेसबॉल, तायक्वांदो, महिला ज्युदो आदी खेळ व त्यातील खेळाडूंचा रसिला परिचय सदानंद जोशी यांनी या पुस्तकात करून दिला होता. नागपूरच्या लाखे प्रकाशनाने 1992मध्ये प्रसिद्ध केलेल्या व विनोद दिनकर देशमुख यांनी लिहिलेल्या ‘ऑलिम्पिकायन’ पुस्तकातून फारशी नवीन माहिती हाती लागत नाही. त्यानंतर 1994मध्ये लातूरच्या मीनल प्रकाशनाने शरद भाटे यांचे ‘ऑलिम्पिक’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामध्ये 1980च्या दशकातील ऑलिम्पिकविषयी दिलेली नवीन माहिती वाचकांना त्या वेळी नक्कीच रोचक वाटली असणार. शरद भाटे यांच्या लेखनशैलीत वाचकांना गुंगवून ठेवण्याची क्षमता आहे. ती या पुस्तकात ठायीठायी जाणवते. ऑलिम्पिक संदर्भातील आणखी एका चिकित्सक व रसील्या लेखनशैलीने परिपूर्ण पुस्तकाची भर पडली ती 1996मध्ये. हेमंत जोगदेव यांनी लिहिलेल्या व कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘ऑलिम्पिकच्या उगमाशी’ या पुस्तकाचा बाज होता इतिहास कथनाचा. आधुनिक ऑलिम्पिकचे 1996मध्ये शताब्दी वर्ष होते. त्या वर्षी अ‍ॅटलांटामध्ये होणा-या ऑलिम्पिकमध्ये हा शताब्दी महोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. या पार्श्वभूमीवर हेमंत जोगदेव यांनी लिहिलेल्या या पुस्तकात ग्रीसच्या वाटेवर, मुक्काम पोस्ट ऑलिम्पिया, पवित्र संकुल, अंतरंग, प्राचीन खेळ, तत्कालीन स्पर्धा, मध्यंतर, ऑलिम्पिकच्या अखंड वाटचालीकडे या प्रकरणांतून ऑलिम्पिकचा प्राचीन ते अर्वाचीन असा सर्वंकष इतिहास उभा केला आहे. ज्याला ऑलिम्पिक म्हणजे काय हे बारकाईने समजून घ्यायचे असेल त्याला ‘ऑलिम्पिकच्या उगमाशी’ हे पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. 1952मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा दादासाहेब जाधव यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारात फ्रीस्टाईल रेसलिंगमध्ये ब्राँझ पदक पटकावले. कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची अतुलनीय कामगिरी व त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारे चरित्रात्मक पुस्तक संजय दुधाणे यांनी 2001मध्ये लिहिले. ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ असे या पुस्तकाचे नाव असून ते मीनल प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. ऑलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्स व त्यातील खेळाडू हा खूप रोचक विषय आहे. त्याची सर्वंकष माहिती हेमंत जोगदेव लिखित व दिलीपराज प्रकाशनाने 13 ऑगस्ट 2004रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘ऑलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्स’ या पुस्तकातून वाचकांना मिळते. त्यामध्ये प्राचीन ग्रीकांचे अ‍ॅथलेटिक्स, अ‍ॅथलेटिक्सच्या आधुनिकतेचे रंगरूप, अ‍ॅथलेटिक्समधील क्रीडाप्रकार, प्राचीन ऑलिम्पिक विजेते, अर्वाचीन ऑलिम्पिक विजेते, उत्तुंग शिखरे, भारतीय अ‍ॅथलिट अशा प्रकरणांतून अ‍ॅथलेटिक्सचा इतिहास उलगडत जातो. ऑलिम्पिकवरील मराठी पुस्तकांमध्ये अलिबागचे लेखक गे. ना. परदेशी यांनी लिहिलेली दोन पुस्तके त्यांच्या विषयांमुळे आगळी ठरतात. ‘ऑलिम्पिक्समधील भारतीय हॉकीपटूंची कामगिरी’ व ‘ऑलिम्पिक्स क्रमवारीत भारत पहिला’ या अनुक्रमे ऑगस्ट 2004 व 8 ऑगस्ट 2008मध्ये प्रसिद्ध झालेल्या गे. ना. परदेशी यांच्या दोन छोटेखानी पुस्तकांतून ऑलिम्पिक व भारताचा संबंध नेटकेपणाने उलगडण्यात आला आहे. ‘ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा’ या नावाचे चरित्रात्मक पुस्तक अनिल किणीकर यांनी लिहिलेले असून ते ऑगस्ट 2008मध्ये प्रकाशित झाले आहे. यानंतर 2009 साली प्रकाशित झालेले प्रख्यात छायाचित्रकार व लेखक मोहन बने यांचे बीजिंग ऑलिम्पिकवरचे ‘ऑलिम्पिकचे सोनेरी सीमोल्लंघन’ या शीर्षकाचे पुस्तक हे अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण ठरावे असेच आहे. दर चार वर्षांनी होणारा ऑलिम्पिक सोहळा म्हणजे खेळाडूंचा एक महाकुंभमेळाच असतो. या क्रीडामहोत्सवाची भव्यदिव्यता व उंची इतकी मोठी असते की ती शब्दांत व्यक्त करणेही कधीकधी अवघड होऊन बसते. अशावेळी या महोत्सवाची छायाचित्रेच अधिक बोलकी ठरतात. मोहन बने यांच्या कॅमे-याने टिपलेले बीजिंग ऑलिम्पिकमधील मैदानावरचे आणि चीनच्या समाजातील विविध परंपरा, संस्कृती यांचे दर्शन घडविणारे क्षण अधिक प्रभावी, परिणामकारक आणि हृदयस्पर्शी आहेत. उत्कृष्ट रंगीत छपाई असलेल्या या पुस्तकाची प्रस्तावना भारताची ऑलिम्पियन शूटर अंजली भागवत हिने लिहिली आहे. हे पुस्तक गौरधन व्हीजनने प्रकाशित केले असून त्याची पृष्ठसंख्या 96 आहे व पुस्तकाचे मूल्य 450 रुपये आहे. लंडन येथे होणा-या ऑलिम्पिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकवर अजून काही नवी मराठी पुस्तके प्रसिद्ध होतीलही, पण ती रुळलेल्या वाटेनेच जाणारी असू नयेत, अशीच वाचकांची अपेक्षा राहील. ऑलिम्पिकचा इतिहास, त्यातील खेळ, खेळाडू व त्यांचे विक्रम यांच्या संदर्भात या विषयावरील मराठी पुस्तकात आजवर खूप माहिती येऊन गेली आहे. जागतिक इतिहासाचा पट लक्षात घेतला तर पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, सोव्हिएत रशियाचे झालेले विघटन, जर्मनीचे एकीकरण, अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला, 2008मधील अमेरिकेतील मंदी अशा विविध टप्प्यांदरम्यान झालेल्या ऑलिम्पिकच्या आडून देशोदेशांनी खेळलेले डावपेच, ऑलिम्पिकमध्ये विविध क्रीडाप्रकारांतील स्पर्धांच्या आयोजनात वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान कसकसे प्रगत होत गेले, अशा अनेक अस्पर्श मुद्द्यांचा उहापोह करणारी पुस्तके यापुढे मराठीत येणे आवश्यक आहे. इंग्रजीत ऑलिम्पिकवर अशा पद्धतीची पुस्तके या आधीच आलेली आहेत. ऑलिम्पिकवरील मराठी पुस्तकांचा हा सारा प्रवास आणखी प्रगल्भ होण्याची गरज आहे, पण त्यासाठी आवश्यकता आहे चिकित्सक व अभ्यासू लेखकांची. ही उणीव भरून निघेल का? 
------
ऑलिम्पिकवरील काही वैशिष्ट्यपूर्ण इंग्रजी पुस्तके
(1) लंडन 2012 दी ऑफिशियल बुक : प्रस्तावना - सॅबॅस्टिन को (2) दी ऑलिम्पिक्स गेम मिसेलेनी - जॉन व्हाईट (3) ऑलिम्पिक्स गेम्स - डेव्हिड चेस्टर (4) दी 1972 ऑलिम्पिक गाईड - जॉन ग्रोम्बॅच (5) ऑलिम्पिझम : प्रकाशक - इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (6) गिनिज बुक ऑफ ऑलिम्पिक रेकॉर्ड्स - हॉरिस व रॉस मेव्हिर्टर (7) ऑलिम्पिक गेम्स अँड इंडिया - सर्दिनू संन्याल. 
---------------------

No comments:

Post a Comment