Thursday, March 6, 2014

झपाटलेल्या माणसाची परिकथा

६ अाॅक्टोबर २०१३ रोजी दैनिक दिव्य मराठीच्या रसिक या रविवारच्या पुरवणीत मी लिहिलेला लेख. त्याची ही लिंक.


http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-samir-paranjpe-article-on-movie-bambai-fairy-tale-4394590-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/06102013/0/5/
 

------------
झपाटलेल्या माणसाची परिकथा

----------
- समीर परांजपे
-----------------
अमेरिकेत राइट बंधूंनी 17 डिसेंबर 1903 रोजी जगातील पहिले विमान निर्माण करून त्याचे यशस्वी उड्डाण केले, हे सर्वविदित आहे. मात्र ही गोष्ट भारतातील काही इतिहासकारांना मान्य नाही. 1895मध्ये शिवकर बापूजी तळपदे यांनी मुंबईच्या चौपाटीवर मानवरहित विमान उडविण्याचा भारतातील पहिला प्रयोग केला होता. मात्र, काही फूट उंचीपर्यंत जाऊन हे विमान खाली कोसळले. (हे विमान दोन-चारशे फूट की हजार फूट उंचीपर्यंत उडाले, याविषयी संशोधकांत मतभेद आहेत.) त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. साहजिकच जागतिक स्तरावर या प्रयोगाची नीटशी दखलही घेण्यात आली नव्हती. विमान बनविण्याचा अहोरात्र ध्यास घेतलेल्या शिवकर बापूजी तळपदे यांच्या अथक परिश्रमांची जी कहाणी आजवर दुर्लक्षित राहिली होती, तिला ‘बम्बई फेअरी टेल’ या चित्रपटाद्वारे पडद्यावर साकारण्याचे गुनीत मोंगा यांच्या प्रॉडक्शन हाउसने ठरविले आहे. गेल्या वर्षी झळकलेल्या ‘विकी डोनर’ या विनोदी हिंदी चित्रपटातील भूमिकेमुळे नावाजलेला अभिनेता आयुष्मान खुराणा हा शिवकर यांची भूमिका साकारणार आहे.
एका मोठ्या शोधाचा ध्यास घेतलेले, त्या दिशेने केलेला प्रयोग अयशस्वी ठरल्यानंतरही हार न मानणारे शिवकर तळपदे यांची जीवनकहाणी नेमकी आहे तरी काय?
संस्कृताचार्य पंडित शिवकर बापूजी तळपदे यांनी आपले स्नेही सुब्बाराय शास्त्री यांच्या सहकार्याने वेद-उपनिषदांच्या प्राचीन संहितांचा अभ्यास केला व त्याच्या आधारे ‘मरुत्सखा’ विमानाची निर्मिती साधून उड्डाणाचा प्रयोग केला होता. या बाबतची माहिती प्रताप वेलकर लिखित ‘पाठारे प्रभूंचा इतिहास’ या पुस्तकात मिळते. ‘प्राचीन भारतीय विमानशास्त्र’ हे कॅ. आनंद बोडस लिखित पुस्तकही आपल्याला या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती पुरविते.
विमान निर्मितीचे तंत्र पुराणकाळापासून भारतात अस्तित्वात होते की नव्हते, हा वादाचा मुद्दा असला तरी त्या अनुषंगाने प्राचीन काळी लिहिले गेलेले ‘बृहद् विमानशास्त्र’सारखे साहित्य व त्याचे विश्लेषण करणारे काही ग्रंथ शिवकर बापूजी तळपदे यांनी बारकाईने अभ्यासले होते. पाचशे सूत्रे, आठ अध्याय आणि शंभर प्रकरणांत विस्तारलेल्या प्राचीन भारतीय विमानशास्त्राच्या ग्रंथाचे नाव ‘बृहद विमानशास्त्र’ असून त्याचे कर्ते महर्षी भारद्वाज आहेत. प्राचीन विमानशास्त्राचा उहापोह करणारे ‘विमान इन एन्शन्ट इंडिया’ हे पुस्तक प्रा. डी. के. कांजीलाल यांनी लिहिलेले असून त्यामध्ये तळपदे यांच्या प्रयोगाचीही माहिती देण्यात आली आहे.
पाठारे प्रभू समाजातील शिवकर तळपदे (जन्म 1864) संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते. मुंबईच्या जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये हँड आणि क्राफ्ट शाखेचे ते तज्ज्ञ शिक्षक होते. क्राफ्ट हा विषय शिकवताना चालणार्‍या गाड्या आणि फिरती चक्रे कशी तयार करावीत, हे विद्यार्थ्यांना शिकवित असत. हवेत उडणार्‍या पक्ष्यांचे चित्र काढताना, पंखांची उघडझाप यंत्रांच्या साहाय्याने करता आली, तर क्राफ्टचे विमानदेखील हवेत का उडू शकणार नाही, असे प्रश्न त्यांना पडत असत. त्यातूनच त्यांनी प्राचीन विमानशास्त्राचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविले.
‘पाठारे प्रभूंचा इतिहास’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, ‘ऋग्वेदांतील ऋचांमध्ये भारद्वाज ऋषींनी विमानाला गती देण्याच्या यंत्ररचनेत दंड, चक्र इत्यादी सात प्रकारचे वायू आणि सूर्यकिरणांची शक्ती यांचा संयोग करून विशेष तºहेने वापर केला होता. प्राचीन वायुगमन या विषयावरील भारतीय तंत्र, मंत्र, यंत्र विज्ञान शास्त्रांतही पारद गुटिका म्हणजे, पार्‍याचा उपयोग केल्याची नोंद आहे. या सगळ्या नोंदींचा अभ्यास करून शिवकर तळपदे यांनी असा निष्कर्ष काढला होता की, आकाशामध्ये सूर्यकिरण आणि पारा यांचा संयोग झाल्यानंतर विद्युतशक्ती निर्माण होऊन या सातही वायूंना वेग येऊन आपोआप विमानाला गती मिळू शकेल. त्याप्रमाणे कयास बांधून ऋग्वेग्दातील ऋचा बरहुकूम तळपदे यांनी आपल्या प्रयोगशाळेत एक स्पेसशिप (डिरीजीबल) तयार केले. त्या विमानाचे नाव त्यांनी ‘मरुत्सखा’ असे ठेवले. हेच ते प्राचीन विमान विद्येवर आधारलेले पहिले भारतीय विमान.’
1895मध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पोलिसांच्या परवानगीने मुंबईतील चौपाटीच्या मोकळ्या जागेत शिवकर बापूजी तळपदे यांनी मरुत्सखा हे विमान उडविण्याचा पहिला प्रयोग केला. या महिन्यात पावसाळी, वादळी हवा नसल्याने सदर प्रयोगासाठी हा कालावधी उत्तम होता. हा प्रयोग पाहण्यासाठी पोलिस अधिकारी, लालजी नारायण, भाऊचा धक्क्याचे आनंदराव अजिंक्य वगैरे त्या वेळचे काही धनवान गृहस्थ, हितचिंतक तसेच सामान्य माणसे उपस्थित होती. मुंबई पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी पिटकर यांची तळपदे यांना या वेळी मदत झाली. या वेळी हे विमान काही उंचीपर्यंत उडून खाली कोसळले.
पं. शिवकर तळपदे यांनी केलेल्या विमानोड्डाणाच्या प्रयोगासंदर्भातील काही उपलब्ध कागदपत्रे, त्यांनी वापरलेल्या वस्तू, हत्यारे, विमानाचे भाग, क्रँकशाफ्ट, चक्रे वगैरे गोष्टी शोधण्याचा ‘पाठारे प्रभूंचा इतिहास’ या ग्रंथाचे लेखक प्रताप वेलकर यांनी प्रयत्न केला. यासाठी प्रथम त्यांचे वंशज शोधण्याचा प्रयत्न झाला. परंतु दोन पिढ्यांनंतर शिवकर तळपदे यांचा वंश खुंटला, असे आढळून आले. शिवकर तळपदेंची भाची रोशन तळपदे यांनी प्रताप वेलकर यांना दिलेल्या माहितीनुसार ‘शिवकर यांचे निवासस्थान मुंबईतील गिरगाव येथे ड्युकर लेनमध्ये (आताचा डॉ. नगिनदास शहा मार्ग) होते. तेथे त्यांच्या ‘मरुत्सखा’ स्पेसशिपचा सांगाडा क्रँकशाफ्टसह कित्येक वर्षे धूळ खात पडून होता. लहानपणी त्या सांगाड्यात बसून आपण काल्पनिक हवाईप्रवास केल्याचीही रोशन यांची आठवण आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षांनी गोयल नावाचे एक सरकारी अधिकारी शिवकर तळपदेंचे चिरंजीव दिनकरराव यांच्याकडे आले. त्यांनी या विमानाचे भाग व काही कागदपत्रे गोळा करून दिल्लीला नेली. दिनकरराव यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव विनाजींनी शिवकर तळपदेंच्या विमान प्रयोगासंदर्भातील उरलेली सर्व कागदपत्रे बंगळुरू येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्सला सुपूर्द केली.
प्राचीन विमान विद्येवर आधारलेल्या प्रयोगाची बातमी इतर प्रांतात पोहोचल्यानंतर पं. शिवकर तळपदे यांना या विषयावर बोलण्यासाठी ठिकठिकाणांहून आमंत्रणे आली. त्यांची भडोच, अहमदाबाद, पुणे आदी ठिकाणी व्याख्यानेही दिली. विमाननिर्मिती व उड्डाणाचे प्रयोग करण्यासाठी पं. शिवकर तळपदे यांनी अहमदाबाद येथील व्याख्यानात आर्थिक मदतीची मागणी परतफेडीच्या बोलीवर जनसमूहास केली होती. त्यांना पन्नास हजार रुपये देणारे एक हजार देणगीदार हवे होते. परंतु त्यात त्यांना अपयश आले व विमान संशोधनाची प्रगती तेथेच थांबली, अशी माहिती प्रताप वेलकर यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. शिवकर तळपदे यांचे 1916मध्ये निधन झाले. 1907मध्ये तळपदे यांनी ‘प्राचीन विमानविद्येचा शोध’ ही पुस्तिका लिहिली, मात्र त्यात आपल्या 1895च्या विमानोड्डाणाच्या प्रयोगाबद्दल त्यांनी एकही अक्षर लिहिलेले नाही. त्याचबरोबर तळपदे यांच्या कार्याची फारशी दखल त्यांचे समकालीन व पुढच्या पिढ्यांनीही घेतली नाही. 1952-53च्या दरम्यान ‘केसरी’चे संपादक ग. वि. केतकर यांनी विमान विद्येवर लिहिलेल्या तीन लेखांपैकी एका लेखात तळपदेंच्या प्रयोगाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर तळपदेंबाबत गो. ग. जोशी यांनी 18 जून 1978रोजी ‘लोकसत्ता’त विस्तृत लेख लिहिला होता. इतकीच त्यांच्या कार्याची मराठी माणसांनी घेतलेली ठळक दखल!
भारतातील विमानोड्डाणाचा पहिला प्रयोग शिवकर तळपदे यांनी केला होता. तो कितपत शास्त्रीय होता की नव्हता, हा वाद यापुढेही रंगत राहील. मात्र एका ध्येयाने पछाडून एखादी व्यक्ती आपले सारे आयुष्य त्यातच व्यतीत कशी करते, याचे तळपदे हे आदर्श उदाहरण आहेत. त्यांच्या या ध्येयासक्त वृत्तीचे दर्शन ‘बम्बई फेअरी टेल’ या चित्रपटात दिसेल व आयुषमान खुराणा हा तळपदे यांची भूमिका तितकीच जिवंत वठवेल, अशी आशा करू या!

-----

No comments:

Post a Comment