Thursday, March 6, 2014

वाद परंपरेचे संचित


 
दै. दिव्य मराठीच्या १७ मार्च २०१३ रोजीच्या रसिक या पुरवणीत मी केलेले पुस्तक परीक्षण. त्या लेखाची लिंक.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/17032013/0/5/
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-vaad-prativaad-book-4209714-NOR.html
------
वाद परंपरेचे संचित
-----------
समीर परांजपे
 ---------
महाराष्ट्रच नव्हे एकुणातच देशात गेल्या काही वर्षांत जातीपाती, धर्म, व्यक्ती यांच्याविषयीच्या अस्मिता इतक्या फुलून आलेल्या आहेत की या तथाकथित अभिमान प्रतीकांमधील दोष कुणाही अभ्यासकाने संपूर्ण अभ्यासानिशी जरी दाखवून दिले, तरी त्याचा प्रतिवाद बहुतेक वेळा विचारांनी न करता तो हाणामारीच्या पातळीवर, वैयक्तिक निंदानालस्ती करून केला जातो. अशा संकुचित वातावरणात निखळ वैचारिक वादविवाद होणे व त्यातून समाजातील सर्वच घटकांचे प्रबोधन होणे, हीच मुळात दुर्मीळ घटना झालेली आहे. अशा वातावरणातही काही आशेचे अंकुर असतात. दिवंगत ख्यातनाम विचारवंत डॉ. य. दि. फडके यांनी आपल्या आयुष्यात दिग्गजांशी ज्या विविध विषयांवर वाद घातले, काही वेळेस प्रहार केले व झेललेही; त्यापैकी काही गाजलेल्या वादांचा आढावा असलेले ‘वाद-प्रतिवाद’ हे पुस्तक ‘अक्षर प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांनी सध्या समाजात दुर्मीळ होत चाललेला वैचारिक मोकळेपणा, प्रबोधनाची ऊर्मी यांना पुन्हा विस्तृत वाव मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.
19व्या शतकाचा उत्तरार्ध व 20व्या शतकातील सामाजिक, राजकीय घडामोडी हा डॉ. य. दि. फडके यांच्या अभ्यासाचा खास विषय होता. त्याच अनुषंगाने त्यांनी आपले सारे लेखन केले. समाजाला अवघड परिभाषा कळत नाही, असे कारण देऊन सगळे सोपे, पातळ करून सांगण्याच्या सध्याच्या प्रचलित पद्धतीमुळे वाचकांची प्रज्ञापातळी वाढवण्याऐवजी आपण ती कमी करण्यासाठी कारक ठरत आहोत, याचे अनेकांना भान उरत नाही. त्यामुळे कोणताही अभ्यास न करता मनाला येईल ते दावे, विधाने करण्याची सवय बहुतांश अभ्यासकांना लागली आहे. या दाव्यांमधील फोलपणाला उघडपणे वैचारिक आव्हान देणारे विद्वज्जनही फारसे उरले नसल्याने वैचारिक धाकही फारसा उरलेला नाही. महाराष्ट्रातील साहित्यप्रांगणातल्या अनेक वादांवर नजर टाकली, तर अनेक भलेभले दिग्गज विद्वान आपल्या मतांचा हिरिरीने पुरस्कार करण्यासाठी मैदानात उतरल्याचे व प्रसंगी खडाजंगी करत वैयक्तिक पातळीवर टीका करण्यापर्यंत घसरलेले दिसतात. मात्र डॉ. य. दि. फडक्यांनी जे वाद घातले ते केवळ वैचारिक पातळीवरच. त्यांनी कधीही आकसाने प्रतिपक्षावर वैयक्तिक टीका केली नाही. हा दुर्मीळ गुण ध्यानात घेऊनच ‘वाद-प्रतिवाद’ या पुस्तकाचे वाचन करायला हवे.
डॉ. य. दि. फडके यांच्या संग्रहातील त्यांच्या विविध वादविषयक लेखांची कात्रणे, त्यांनी ज्यांच्याशी हे वाद घातले त्यांचेही परिश्रमपूर्वक मिळवलेले लेख, अशी सर्व सांगड घालून य. दि. फडके यांच्या पत्नी डॉ. वासंती फडके यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांची विवेचक प्रस्तावना लाभलेली आहे.
भाऊ पाध्ये यांची ‘वासूनाका’ ही कादंबरी 1966 मध्ये प्रसिद्ध झाली. वासूनाका म्हणजे चौकाचौकातील नाके. या नाक्यावर नेहमीच टोळभैरव असतात. ते सर्वांना माहीत असतात. पांढरपेशी माणसे, विशेषत: बायका-मुली शक्य तितक्या झटकन या टोळक्यासमोरून निघून जाण्याच्या प्रयत्नात असतात. या वासूनाक्यावरची भाषा भाऊ पाध्येंनी आपल्या या कादंबरीत आणली. पांढरपेशा साहित्याचा दंभ असलेल्या आचार्य अत्रेंसारख्या विचारवंतांनी भाऊ पाध्ये यांच्यावर या निमित्ताने अश्लाघ्य शब्दांत टीका केली. या वादात य. दि. फडके हे ‘वासूनाका’ पुस्तक आवडले म्हणून नव्हे, तर लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरण्यासाठी मैदानात उतरले. त्यांनी सत्यकथेच्या जून 1966च्या अंकात तसा लेखही लिहिला.
1968-69मध्ये प्रा. गोवर्धन पारीख यांनी शिवाजी विद्यापीठात लोकमान्य टिळक या विषयावर व्याखानमाला गुंफली. त्यातील तिन्ही व्याख्याने पुस्तकरूपाने ‘मौज’ प्रकाशनाने प्रसिद्ध केली. त्या पुस्तकाचे फडके यांनी केलेले परीक्षण सत्यकथेच्या जानेवारी 1970 च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याला उत्तर देणारे प्रा. गोवर्धन पारिखांचे उत्तर मार्च 1970 व यदिंचे त्या वादातील अखेरचे उत्तर मे 1970च्या ‘सत्यकथा’मध्ये प्रसिद्ध झाले होते. टिळकांना धर्माधिष्ठित राष्ट्रवादी म्हणायचे की त्यांना धर्मनिरपेक्षतेचे वावडे नव्हते म्हणायचे, या प्रश्नाची उकल करताना गोवर्धन पारिख टिळकांना उदारमतवादाच्या चौकटीत बसवू पाहत होते. तर यदिंना ते म्हणणे काही पटलेले नव्हते. लोकमान्य टिळक यांच्या जीवनाकडे नव्या दृष्टीने बघण्याचे भान या वैचारिक वादामुळे आले, हे इथे नमूद केले पाहिजे.
या पुस्तकातील एका वादाची थोड्या विस्ताराने माहिती घेणे आवश्यक आहे. 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 1985 मध्ये काँग्रेसच्या शताब्दीपूर्तीनिमित्त महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने कुमार केतकर यांच्याकडून ‘स्वातंत्र्याची कथा’ हे पुस्तक लिहून घेतले. मुख्यत: प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर इतिहासाचे अध्यापन करणार्‍यांना उपयुक्त ठरावे, अशी पुस्तकाची मूळ योजना होती. लेखकाच्या निवेदनानुसार हे पुस्तक संंशोधनपर प्रबंध नाही, तसेच यात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राच्या सहभागाचाही संपूर्ण इतिहास नाही.
या पुस्तकाचे हस्तलिखित अनेक मान्यवरांनी काळजीपूर्वक वाचल्याचाही उल्लेख केतकरांनी केला होता. पुस्तकात कुमार केतकरांनी केलेला काही घटनांचा उल्लेख व क्रम याबद्दल य. दि. फडकेंनी मतभेद व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने टीका करणारे दोन लेख यदिंनी त्या वेळी ‘लोकसत्ता’त लिहिले. पहिला लेख 27 जुलै 1986 रोजी व दुसरा लेख 3 ऑगस्ट 1986 रोजी प्रसिद्ध झाला. या दोन लेखांना कुमार केतकरांनी तितकेच दोन विस्तृत लेख लिहून 17 व 24 ऑगस्ट 1986 रोजीच्या ‘लोकसत्ता’ अंकातून उत्तर दिले होते. या वादाच्या निमित्ताने काँग्रेसची स्थापना, टिळक युग, भारताचा स्वातंत्र्यलढा या संदर्भात अनेक पैलूंची विद्वत्तापूर्ण चर्चा झाली. काही ऐतिहासिक पुराव्यांची पुन्हा कसोशीने छाननी करण्यात आली. दोन दिग्गज विद्वानांमध्ये झालेला हा वैचारिक वाद आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
त्याशिवाय या पुस्तकात दुर्गा भागवत, गंगाधर गाडगीळ, ज. द. जोगळेकर, प्रा. स. गं. मालशे, विद्याधर गोखले यांच्याबरोबर य. दि. फडके यांनी घातलेल्या वैचारिक वादांचा मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे. स्थलमर्यादेअभावी या सर्वच वादांमधील
य. दि. फडके यांचे व प्रतिपक्षाचे मुद्दे व गुद्दे यांचा विस्तृत ऊहापोह करणे शक्य नाही. 19व्या शतकाच्या पूर्वार्धापासून महाराष्ट्रात जे प्रबोधनाचे युग सुरू झाले, त्याचे प्रतिसाद कालांतराने भारतवर्षात उमटले. या प्रबोधनातून जी सामाजिक जागृती झाली, त्याची गोड फळे 20व्या शतकात समाजातील प्रत्येक घटकाने चाखली. 21वे शतक हे आता या सुधारणांमध्ये अधिक भर टाकण्यासाठी उपयुक्त आहे. आणि नेमके याच प्रसंगी सामाजिक दुही वाढवणार्‍या प्रवृत्ती प्रबळ होऊन समाजातील बहुतेक घटक अधिकाधिक संकुचित बनताना दिसत आहेत. नि:पक्षपाती इतिहासलेखन व वैचारिक वादांसाठी ही अनुकूल भूमी खचितच नव्हे. अशा वेळी ‘वाद-प्रतिवाद’सारख्या पुस्तकांचे महत्त्व काकणभर अधिकच अधोरेखित होते.
----------
पुस्तकाचे नाव - वाद-प्रतिवाद, प्रकाशक - अक्षर प्रकाशन, किंमत - 300 रुपये, पृष्ठसंख्या - 224
---------

No comments:

Post a Comment