Wednesday, March 19, 2014

मैत्रीपर्वाचा नवा अध्याय - दिव्य मराठी - ९ डिसेंबर २०१२



सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतरही या देशाशी भारताचे राहिलेले मैत्रीपूर्ण संबंध हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवरील औत्सुक्याचा तसेच द्वेषाचाही ठरला आहे. बदललेल्या राजकीय स्थितीत चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारतासारखा मित्र हवा आहे, तर भारताला अमेरिका व रशिया या दोन्ही देशांची समान गरज आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतीन हे भारताच्या दौऱयावर आले होते. त्यानिमित्त दोन्ही देशांदरम्यानच्या आजवरच्या संबंधांवर टाकलेला प्रकाशझोत टाकणारा हा लेख मी दै. दिव्य मराठीच्याडिसेंबर २०१२च्या अंकात लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.

मैत्रीपर्वाचा नवा अध्याय

- समीर परांजपे

रशियाचे पंतप्रधानपद भूषवलेले व आता अध्यक्षपदाची धुरा वाहणारे पुतीन हे आक्रमक राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संस्थेमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले पुतीन १७ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होऊन १९९१ मध्ये रशियाच्या राजकारणात सक्रिय झाले. रशियाचे तत्कालीन अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱया पार पडत असताना अचानक एका वळणावर येलत्सिन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ३१ डिसेंबर १९९९ रोजी पुतीन रशियाचे हंगामी अध्यक्ष झाले. त्यानंतर २००० मध्ये झालेल्या रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतीन यांचा विजय झाला. त्यानंतर २००४ मध्ये त्यांची फेरनियुक्ती होऊन ते या पदावर 2008 पर्यंत कायम राहिले. त्यामुळे एक बदल असा झाला की, २००८ मध्ये रशियाच्या अध्यक्षपदी दिमित्री मेदवदेव विराजमान झाले, तर पंतप्रधानपदी पुतीन यांची निवड झाली. एका बलाढय़ नेत्याचे हे झालेले पदांतर रशिया व आंतरराष्ट्रीय राजकारणावरही काही परिणाम नक्कीच घडवून गेले. त्यानंतर सप्टेंबर २०११ मध्ये रशियाच्या अध्यक्षपदासंदर्भातील कायद्यात काही बदल करण्यात येऊन पुतीन हे रशियाच्या अध्यक्षपदाची आपली तिसरी कारकीर्द गाजवण्यासाठी सज्ज झाले. या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये झालेल्या रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतीन विजयी झाले. त्यात त्यांनी एक खेळी अशी केली की अध्यक्षपदाची मूळ चार वर्षांची असलेली कारकीर्द त्यांनी सहा वर्षांची करून घेतली. पुतीन यांच्या तिसऱयांदा अध्यक्ष होण्याबद्दल रशियातील काही भागांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. त्यांच्या विरोधात तेथील नागरिकांनी जोरदार निदर्शनेही केली होती. या पार्श्वभूमीवर पुतीन भारतात येत आहेत. साम्यवादी विचारसरणीवर आधारित सोव्हिएत रशियातील राजवटींचे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतीय नेत्यांना विलक्षण आकर्षण होते. ही वैचारिक नाळ भारत स्वतंत्र झाल्यानंतरही कायम राहिली. दुसऱया महायुद्धानंतर अमेरिका व रशिया यांच्यामध्ये जी विलक्षण सत्ता चढाओढ सुरू झाली, त्याचा परिपाक शीतयुद्धामध्ये झाला. शीतयुद्धाच्या काळात रशिया सच्चा मित्र या नात्याने अनेक प्रसंगात भारताच्या पाठी भक्कमपणे उभा राहिला. शीतयुद्धाचा काळ संपल्यानंतर भारताच्या पाश्चिमात्य देशांशी असलेल्या संबंधात सुधारणा झाली. तत्पूर्वी १९५०च्या दशकामध्ये रशियाने तिसऱया जगातील राष्ट्रांशी मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्याचे धोरण अंगीकारले. त्यात त्याला भारताची मोलाची मदत झाली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे १९५५मध्ये सोव्हिएत रशियाच्या दौऱयावर गेले होते. त्या वेळी क्रुश्चेव्ह अध्यक्ष होते.काश्मीरप्रश्नी तसेच पोर्तुगीजांनी भारताचा जो भाग ताब्यात ठेवला होता, त्या संदर्भात क्रुश्चेव्ह यांनी त्या वेळी भारताची बाजू घेतली होती. भारत-चीन युद्ध असो किंवा १९६५ वा १९७१ तसेच कारगिल प्रश्नावरून उद्भवलेली भारत-पाकिस्तान दरम्यानची युद्धे असोत; रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम भारताची पाठराखण केली आहे. भारत व रशियामधील मैत्रीसंबंध हे केवळ संरक्षणसामग्री खरेदीपुरतेच (रशियाच्या संरक्षण उत्पादनांसाठी भारत ही दुसऱया क्रमांकाची मोठी बाजारपेठ राहिलेली आहे. २००४ची आकडेवारी पाहता असे दिसेल की भारतीय लष्करातील ७० टक्के साधनसामग्री ही रशियातून आयात करण्यात येत होती.) मर्यादित नसून ते संशोधनव विकास या क्षेत्रातही दृढ झाले आहेत. रशिया व भारत यांची शेवटची संयुक्त लष्करी कवायत उत्तराखंडमध्ये ऑक्टोबर २०१०मध्ये पार पडली होती. मात्र त्याच्या पुढील वर्षीइंद्रमालिकेतील रशिया व भारत दरम्यानच्या लष्करी कवायती काही कारणाने स्थगित झाल्याने या दोन देशांच्या संबंधात काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र तो काही काळाने निवळला. ब्रह्मोस क्रूझ मिसाइल विकास कार्यक्रम, पाचव्या पिढीतील लढाऊ जेट विमान प्रकल्प, सुखोई एसयू-30 एमकेआय विमान विकास प्रकल्प, ल्युशिन व हाल यांच्या संयुक्त सहकार्यातून राबवण्यात येणारा टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प यातून रशिया व भारत यांचे लष्करी क्षेत्रातील संबंध दृढ आहेत. एकीकडे भारत व रशिया यांच्यामध्ये व्यापारी क्षेत्रातील सहकार्यही वर्षागणिक वाढीस लागले. दोन्ही देशांतील व्यापारी उलाढाल २००७ मध्ये ७.५ अब्ज डॉलर इतकी होती. भारत व रशिया दरम्यानची व्यापारी उलाढाल २०१२ मध्ये १५ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा व्यापारी क्षेत्रातील तज्ञांचा होरा आहे. दोन्ही देशांची परस्पर गुंतवणूक ७.८ अब्ज डॉलर इतकी आहे. ती २०१५ पर्यंत २० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज असून भारत-रशिया मैत्रीपर्वाचा नवा अध्याय पुतीन यांच्या आगामी भारतभेटीच्या निमित्ताने नोंदला जाणार आहे.
samir.p@dainikbhaskargroup.com
 


No comments:

Post a Comment