Tuesday, March 11, 2014

एव्हरेस्ट ‘वीरांगना’ ( दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा या महिलाविषयक पुरवणी - ३१ मे २०१३)



2013 साली एप्रिल-मे महिन्यामध्ये जगभरातील महिला गिर्यारोहकांपैकी काहींनी एव्हरेस्ट शिखर सर केले. त्या महिला गिर्यारोहकांच्या धाडसाचा वेध घेणारा लेख मी दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा या महिलाविषयक पुरवणीमध्ये ३१ मे २०१३ रोजी लिहिला आहे. त्याची लिंक व जेपीजी फाईल.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-everest-princess-4278494-NOR.html
-------------
एव्हरेस्ट ‘वीरांगना’
----------
- समीर परांजपे
-------------
29 मे 1953 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे हे हिमालयातील एव्हरेस्ट शिखराच्या माथ्यावर पोहोचले. 8848 मीटर उंची लाभलेल्या या जगातील सर्वोच्च शिखरावर प्रथमच मानवाच्या पाऊलखुणा उमटल्या. एव्हरेस्टला जगाचा तिसरा ध्रुवही म्हटले जाते. या अभूतपूर्व यशदायी घटनेला नुकतीच 29 मे रोजी 60 वर्षे पूर्ण झाली. तेनसिंग व एडमंड हिलरी यांच्या मोहिमेनंतर एव्हरेस्ट विजयाचा मार्ग जगातील सर्वच गिर्यारोहकांना सुकर झाला. त्यानंतर दरवर्षी अनेक देशांतून एव्हरेस्ट चढाई मोहिमांचे आयोजन केले जाऊ लागले. दरवर्षी एप्रिल ते मे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर देशोदेशीचे पुरुष-महिला गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेवर निघतात. या दोन महिन्यांत वा-याची दिशा, हवामानाची स्थिती गिर्यारोहण मोहिमांसाठी अनुकूल असते. तसेच हिमवादळे, हिमवितलन यांचे प्रमाण वर्षातील अन्य महिन्यांच्या तुलनेने कमी असते. त्यामुळे दरवर्षी या दोन महिन्यांत सरासरी किमान 450 हून अधिक गिर्यारोहकांनी एव्हरेस्टचा माथा सर केल्याच्या बातम्या येतात. त्यातून अनेक विक्रमही नोंदले जातात.
यंदाच्या मोसमातही नागरी तसेच लष्कराने प्रायोजित केलेल्या मोहिमांतून एव्हरेस्टवर अनेक गिर्यारोहकांची रीघ लागलेली आहे. त्यातील ज्यांनी हे शिखर पादाक्रांत केले त्यात देशोदेशीच्या महिला गिर्यारोहकांचाही समावेश असून त्यांनी काही विक्रम केले आहेत. एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील पहिली विकलांग महिला बनण्याचा विक्रम भारताच्या अरुणिमा सिन्हा हिने यंदा 17 मे रोजी केला. या शिखराची यशस्वी चढाई करताना तिने अपार जिद्द दाखवली. मूळची उत्तर प्रदेशमधील लखनौची असलेली अरुणिमा 11 एप्रिल 2011 रोजी ट्रेनने प्रवास करत असताना चोरांनी तिच्या गळ्यातील नेकलेस व पर्स लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार करताच चोरांनी तिला गाडीतून बाहेर फेकून दिले. या दुर्घटनेत जबर जखमी झालेल्या अरुणिमाला आपला डावा पाय गमवावा लागला. आयुष्य होत्याचे नव्हते झाले. मात्र, तिची जिद्द कायम होती. एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक बच्छेंद्री पाल यांचे मार्गदर्शन अरुणिमा सिन्हाला लाभले. तसेच टाटा स्टील अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशनने तिला आर्थिक साहाय्य देऊ केले. या पाठबळावर अरुणिमाने एव्हरेस्टला गवसणी घातली.
डेहराडूनच्या ताशी व नुन्शी मलिक या 21 वर्षे वयाच्या बहिणींनी 19 मे रोजी एव्हरेस्टचा माथा सर केला. हा विक्रम करणा-या त्या जगातील पहिल्या जुळ्या बहिणी ठरल्या. एव्हरेस्ट व त्याच्यालगत असलेल्या ल्होत्से या शिखरावर यंदा पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ या संस्थेच्या गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली. त्यातील आशिष माने हा ल्होत्से शिखराचा माथा सर करणारा महाराष्ट्रातील पहिला गिर्यारोहक ठरला. आशिष माने या ज्या सातारचा आहे तेथील प्रियंका मोहिते या 21 वर्षीय युवतीनेही यंदा 22 मे रोजी सकाळी सव्वाअकरा वाजता एव्हरेस्टच्या माथ्यावर पाऊल ठेवले. हरियाणातील ‘ओशन टू स्काय’ या ग्रुपबरोबर तिने गेल्या 9 एप्रिलला आपल्या मोहिमेस प्रारंभ केला होता. तिच्यासह 15 ते 19 वर्षे वयोगटातील दोन मुली व आठ मुले असा दहा जणांचा संघ होता. या मोहिमेसाठी कॅप्टन नीरज राणा हे त्यांचे प्रशिक्षक होते. प्रियंका मोहिते गेल्या पाच-सहा वर्षांपासून गिर्यारोहणाचा कसून सराव करत होती. तिने गेल्या वर्षी दार्जिलिंगमधून गिर्यारोहणाचा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तिच्या या साहसी मोहिमेसाठी सातारकरांनी भरीव आर्थिक मदत केली. त्यामुळेच सर्वसामान्य कुटुंबातील प्रियंका जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करू शकली. प्रियंकाच्या यशाने आठवण झाली ती पुण्याच्या कृष्णा पाटील हिच्या एव्हरेस्ट मोहिमेची. 20 मे 2009 रोजी कृष्णा पाटील हिने वयाच्या 19व्या वर्षी एव्हरेस्टचा माथा सर केला.
हे यश संपादन करणारी ती भारतातील सर्वात तरुण वयाची दुसरी गिर्यारोहक तसेच महाराष्ट्रातील पहिली महिला गिर्यारोहक ठरली होती. सात खंडातील सात उंच शिखरे पादाक्रांत करण्याचे ध्येय कृष्णाने बाळगले होते. त्यातील काही शिखरे तिने पादाक्रांत केली असून अन्य शिखरांवरील यशस्वितेसाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत.
यंदाच्या मोसमात सौदी अरेबिया व पाकिस्तानच्या महिला गिर्यारोहकांनी एव्हरेस्टचा माथा सर केल्याच्या बातम्या विशेष लक्षवेधी आहेत. पाकिस्तानच्या समिना बेग हिने भारतातील ताशी आणि नुन्शी मलिक या जुळ्या बहिणींबरोबर 19 मे रोजी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. गिर्यारोहणासारख्या साहसी क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण साधणे, त्याचप्रमाणे भारत-पाकिस्तानमधील शांतीचा संदेश प्रसारित करणे या दोन उद्दिष्टांनी प्रेरित होऊन समिनाने एव्हरेस्टच्या मोहिमेची आखणी केली होती. एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर तिथे समिनाने पाकिस्तानचा राष्ट्रध्वज तर तिच्या बरोबरील जुळ्या बहिणींनी भारताचा राष्ट्रध्वज शेजारी-शेजारी फडकवला. एव्हरेस्ट सर करणारी पहिली पाकिस्तानी महिला ठरल्याबद्दल समिनाचे त्या देशातील प्रमुख वर्तमानपत्रे व अन्य प्रसारमाध्यमांनी तोंडभरून कौतुक केलेच, शिवाय भारत-पाकिस्तान मैत्रीची अनोखी दास्तान पेश केल्याबद्दल समिना बेग व भारतीय जुळ्या बहिणींना दोन्ही देशांतील राजकीय नेत्यांनीही शाबासकी दिली.
पाकिस्तानप्रमाणेच सौदी अरेबियाच्या राहा मोहार्रक या 27 वर्षांच्या युवतीने गेल्या 18 मे रोजी एव्हरेस्टचा माथा सर केला. हा विक्रम करणारी राहा सौदी अरेबियाची पहिली महिला गिर्यारोहक ठरली आहे. ‘सौदी अरेबियातील महिलांविषयी अन्य देशांतील लोकांनी आजवर बाळगलेली मते तसेच सौदी अरेबियातील महिलांचा स्वत:विषयी असलेला दृष्टिकोन यामध्ये माझ्या या यशाने सकारात्मक बदल झाला तर माझे साहसी प्रयत्न कारणी लागले असे समजेन’, अशी अत्यंत प्रगल्भ प्रतिक्रिया राहाने दिली. एव्हरेस्टवर जाणे ही राहाची वैयक्तिक आकांक्षा होती. गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या दोन महिला क्रीडापटूंनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर आता राहाने साहसी क्रीडा प्रकारात मिळवलेल्या यशाने सौदी अरेबियाच्या महिलांचे क्षितिज विस्तारले आहे.
जपानची जुंको तबेई ही एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला गिर्यारोहक. तिने 16 मे 1975 रोजी हा विक्रम प्रस्थापित केला. त्या वेळी तिचे वय होते 35 वर्षांचे. एव्हरेस्ट मोहिमेवर निघण्याआधी तबेईने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला घरच्यांच्या हवाली केले व ती साहसी मोहिमेवर रवाना झाली. एक प्रकारे ही जपानी हिरकणीच म्हणायची. तबेईसारखेच लक्षणीय यश त्यानंतर मिळवले ते इंग्लंडच्या एलिसन जेन हारग्रिव्हज या महिलेने. 13 मे 1995 रोजी एलिसनने एव्हरेस्ट शिखर सर केले. के-2, कांचनगंगा ही दोन शिखरेही तिने पादाक्रांत केली.
या पार्श्वभूमीवर भारतीय महिला गिर्यारोहकांची कामगिरीही लक्षणीय आहे. एव्हरेस्टच्या माथ्यावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक म्हणजे बच्छेंद्री पाल. तिने 23 मे 1984 रोजी हे शिखर सर केले. 1994मध्ये तिने राफ्टिंग मोहिमेत महिलांच्या चमूचे नेतृत्व केले. त्यानंतर 1995मध्ये बच्छेंद्रीने भारत-नेपाळ एव्हरेस्ट मोहिमेच्या चमूचे नेतृत्व केले होते. या मोहिमेतून गिर्यारोहणविषयक सात विश्वविक्रम निर्माण झाले. भारतातील आणखी एक महिला गिर्यारोहक संतोष यादवने मे 1992 व त्यानंतर मे 1993मध्ये असे एका वर्षाच्या आत दोनदा एव्हरेस्ट माथा सर केला. असा विक्रम करणारी ती जगातील पहिली महिला गिर्यारोहक ठरली. साहसाला वयाची मर्यादा नसते. त्यासाठी लागते अपार जिद्द. येईचिरो मिअरा या जपानी पुरुष गिर्यारोहकाने वयाच्या 80व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले होते. हा विक्रम करणारे ते जगातील पहिले वयोवृद्ध गिर्यारोहक ठरले होते. येईचिरो यांनी केलेला विक्रमही आता जगभरातील वयाने ज्येष्ठ महिला गिर्यारोहकांना खुणावतो आहे आणि खात्री आहे, की तो विक्रमही एक दिवस मोडला जाईल. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्यरत आहेत. एव्हरेस्टचा माथा सर करण्याचे कर्तृत्वही मग त्याला अपवाद कसे ठरावे? ‘एव्हरेस्ट वीरांगना’ यापुढेही आणखी विक्रम रचत राहतील.
------------

No comments:

Post a Comment