Friday, March 21, 2014

विनोदाचा वसंत ( विनोदी अभिनेते वसंत शिंदे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख) - दिव्य मराठी - २६ आॅगस्ट २०१२







नाही चिरा नाही पणती’, अशी अवस्था भल्या माणसांच्या वाटय़ालाच का येते? मूकपट, नाटक, बोलपट या त्रिविध माध्यमांमध्ये विनोदाचा वसंत बहर व बहार आणणारे ज्येष्ठ अभिनेते वसंत शिंदे यांची जन्मशताब्दी गेल्या १४ मे २०१२ रोजी अलगद पावलांनी सरून गेली. त्याची कोणालाच साधी गंधवार्ताही लागू नये? वसंत शिंदे यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येते. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तितकेच रंगून जात. वसंत शिंदे यांच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख मी दै. दिव्य मराठीच्या २६ आॅगस्ट २०१२ रोजी लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.

विनोदाचा वसंत 


- समीर परांजपे



सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी असल्याच्या बाता मारणाऱया महाराष्ट्र भूमीतील यच्चयावत कलाप्रेमी, कलासक्त मराठी माणसांनी प्रख्यात अभिनेते वसंत शिंदे यांचे कलाकर्तृत्व त्यांना देवाज्ञा झाल्यानंतर काही वर्षांतच नजरेअाड करावे, यापेक्षा अधिक कृतघ्नता कोणती असू शकेल? वसंत शिंदे यांचा जन्म भंडारदरा येथे १४ मे १९१२ रोजी झाला. शिंदे यांचे विनोदवृक्षहे मधू पोतदार यांनी शब्दांकित केलेले आत्मचरित्र अचानक हाती पडले. ते वाचताना शिंदे यांच्या सरून गेलेल्या जन्मशताब्दीचा थांग लागला. उशिरा का होईना, पण त्यांच्या कर्तृत्वाला शब्दांजली वाहण्याचे मनाने घेतले. साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनीतर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यात करण्यात आली. स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे. लहानपणापासून अंगपिंडाने गुटगुटीत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱया रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते. उंचीने काहीसे बुटके असलेला, उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. १९२५ मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या चतुर्थीचा चंद्रया मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती उत्तम वठली. त्यानंतर सीतावनवास’, ‘राम-रावण युद्धया मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाईमध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हादमध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेलीमध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले. हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात शिंदे जवळजवळ सगळ्या खात्यांमधील कामे शिकून आले. या काळात त्यांनी फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली १९ मूकपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. फाळकेंकडे नोकरी करताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला होता दरमहारुपये! पाच वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्या वेळी शिंदे यांचा पगार होता दरमहा १८ रुपये. पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले, तर त्याला निश्चितच भोवळ येईल. पण त्या काळच्या स्वस्ताईच्या जमान्यात एवढे पैसेही पुरेसे होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९२३ पासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते. मुंबईतील कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते. त्यांचे व फाळक्यांचे अनेकदा मतभेद होत. त्याचमुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत आले होते. मात्र तिसर्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा तिथे कधीही फिरकले नाहीत. ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले, त्यात वसंत शिंदेही होते. ते वर्ष अदमासे १९२८-२९ असे असावे. सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. पोट भरण्यासाठी हातपाय तर हलवायला हवे होते. नियतीने त्यांना या वळणावर नेऊन सोडले पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीत. लहान मुलांसाठी नाटके करणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्योग. बालमोहनचे मालक होते दामूअण्णा जोशी. वसंत शिंदे ज्या वेळी या कंपनीत गेले, तेव्हा तिचीदेखील ती सुरुवातच होती. संस्थेने तोवर एकही नाटक बसवलेले नव्हते. सगळी जमवाजमव सुरू होती. त्या दोन महिन्यांच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटय़ाला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही. त्यामुळे ते अखेर वैतागून पुन्हा नाशिकला परतले. ११ ऑगस्ट १९२९ रोजी स्थापन झालेल्या अरुणोदय नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडाव होता. या नाटय़मंडळीत त्यांनी चार वर्षे काढली. त्या कालावधीत गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले. त्यामुळे एक नाटय़कलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळू लागली. त्या वेळी नाटकमंडळ्यांचे संसारही अल्पजीवीच असायचे. अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यानंतर वसंत शिंदे यांची पावले वळली ती नवजीवन संगीत मंडळीमध्ये. मोराचा नाच, व्याही-विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली.नाटक-चित्रपटाचा व्यवसाय एकूण अस्थिरच. नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या आनंद व्यंगपटया कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचीही नोकरी केली. आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते. विवाहानंतर सांसारिक जबाबदाऱयांतही वाढ झाली होती. १९४१च्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करते झाले. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे. ‘भावबंधनमधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यांना पुढे कामण्णाया नावानेच ओळखले जाऊ लागले. दिनकर ढेरेंनंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची भूमिका मुळाबरहुकूम करून गाजवली. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली प्रेमसंन्यासमधील गोकुळ, ‘राजसंन्यासमधील जिवाजी कलमदाने अशा काही भूमिका केल्या. राजाराम संगीत मंडळीनंतर ललित कला कुंजच्या नाटकांत काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला मोहरा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला. बोलपटांची एव्हाना चलती सुरू झालेली होती. वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित ‘मायाबाजार’. १९३९ मध्ये झळकलेल्या या चित्रपटात त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती. १९४६मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित सासुरवासमध्ये सुभान्याच्या भूमिकेत वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले. त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. १९२४ ते १९२९ या काळात त्यांनी १९ मूकपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९३९ पासून ते १९९६पर्यंत १९०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्याशिवाय सात हिंदी चित्रपटांतही कामे केली. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले, तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांत प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते. अशाच अप्रदर्शित राहिलेल्या नऊ चित्रपटांतही वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या. पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही. वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाटय़ कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा सुमारे ५७ लोकनाटय़ांतून वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या होत्या. विनोद, कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते. माधवराव जोशी, आचार्य अत्रे, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्यंकटेश माडगूळकर आदी सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या. त्यांनी १०५ नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगडय़ाची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवलेली आहे, असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे. पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येईल. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तेवढेच रंगून जात. सुमारे ७५ वर्षे मूकपट, नाटके, बोलपट यांच्यात यशस्वी कारकीर्द गाजवल्यानंतर वसंत शिंदे यांचे १९९९ मध्ये निधन झाले. ‘विनोदवृक्षया आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना प्रख्यात अभिनेते शरद तळवलकर यांनी वसंत शिंदे यांचे अचूक वर्णन केले होते. शरद तळवलकरांनी म्हटले होते, ‘वसंत म्हणजे ऋतूंतला श्रेष्ठ ऋतू! सृष्टीचे वातावरण त्या वेळी प्रसन्न असतं. तेच नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले. त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावांवर येऊन पडली असं म्हणायला हरकत नाही.’
शरद तळवलकरांचे हे शब्दच या मजकुराची लेखनसीमा.

No comments:

Post a Comment