Monday, December 26, 2016

मेरा नाम (सपनों का) सौदागर- राज कपूरच्या मेरा नाम जोकर चित्रपटाबद्दल लेख - दै. दिव्य मराठी २५ डिसेंबर २०१६ - समीर परांजपे







दै. दिव्य मराठीच्या रसिक या पुरवणीमध्ये दि. २५ डिसेंबर २०१६ रोजी मी लिहिलेला हा लेख व त्याची जेेपीजी फाइल.
-------------
स्लग : नॉस्टेल्जिया
-------------------
बायलाइन : समीर परांजपे
-------------------
हेडिंग : मेरा नाम (सपनों का) सौदागर
------------------
इंट्रो : ‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूरचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. आयुष्यभर ‘मिसअंडरस्टुड मास्टरपीस'चा मळवट भरून आपले सौभाग्य अजमावत राहिला. अगदी गेल्या १४ डिसेंबरला राज कपूरच्या ९२व्या वाढदिवशी या चित्रपटाचा विशेष खेळ मुंबईत झाला, तेव्हाही हाच माहोल होता. मात्र, ‘मेरा नाम जोकर’मध्ये मरिनाची भूमिका साकारलेली रशियन कलावंत सेनिया रिबिनिका या वेळी हजर होती, आणि तिच्या त्या निळ्याशार डोळ्यांत केवळ कृतज्ञता आणि कौतुक झळकत होते...
------------------
ब्लर्ब : ज्या ‘मेरा नाम जोकर’ने कपूर घराण्याला कर्जाच्या खाईत लोटले, तोच चित्रपट १९९० सालानंतर आर. के. फिल्म्सला खूप पैसे मिळवून देतो आहे.
------------------
‘जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही हम थे जहाँ, अपने यहीं दोनो जहाँ, इस के सिवा जाना कहाँ...' हे सगळे सांगतोय एक विदूषक... राजू त्याचे नाव... तोच स्वत: दु:खात ग‌ळ्यापर्यंत बुडालेला. तरीही त्याला हसवायचे आहे, आम जनतेला. त्यातूनच तो स्वत:मागच्या कटकटी विसरण्याचा मार्ग शोधतोय... मग त्याने तोंडाला रंग लावलाय. रंगीत आवरणाने नाक मस्त फुगीर केलेय. डोक्यावर शंकूच्या आकाराची चित्रविचित्र रंगांनी मढलेली टोपी घातलीय. वेषही असाच बावळा ठेवलाय... राजू बन गया सर्कशीतला जोकर...! वास्तवातला राज कपूर या राजू जोकरच्या रूपात प्रेक्षकांना खूप काही सांगू पाहात होता... १९७० सालातली ही गोष्ट... पण ‘सपनों के सौदागर’ राज कपूरचा हा अलग प्रयत्न प्रेक्षकांनी मनावर घेतलाच नाही. ‘मेरा नाम जोकर' हा चित्रपट दणकून सणकून आपटला. या चित्रपटाच्या निर्मितीत राज कपूरने अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. अपयशामुळे अख्ख्या कपूर खानदानाला कर्जबाजारी व्हायची पाळी आली... पण राज कपूरच तो... रडला, पण खचला नाही. तो पुन्हा उभा राहिला. अडनिड्या, अवखळ वयातली प्रेमकहाणी असलेला ‘बॉबी' चित्रपट त्याने बनविला. तो आवडला प्रेक्षकांना. पुन्हा पैशाच्या राशी आर. के. बॅनरच्या तिजोरीत धो धो जमा झाल्या. राज कपूरची मान पुन्हा ताठ झाली. पण... हृदयात त्याच्या शेवटपर्यंत कळ येत असे. ती असे ‘मेरा नाम जोकर’ची...का आवडला नाही लोकांना तो? हा प्रश्न राज कपूरच्या मनाला भुंग्यासारखा पोखरत असे.
चित्रपटसृष्टी असेच अजब, अतर्क्य रसायन आहे. कधी अमृत बनते, कधी अॅसिड... १९७०मध्ये ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाचा सीन सुरू होता. २०११मध्ये ट्रान्सफर सीनही पुढे आला.
भारतीय अांतरराष्ट्रीय फिल्म अकादमी (आयआयएफए) आणि टोरोंटो अांतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव (टीआयएफएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने टोरोंटो येथे ‘राज कपूर रेट्रोस्पेक्टिव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले. त्या प्रसंगी राजसाहेबांचे सुपुत्र अभिनेते दिग्दर्शक रणधीर कपूर प्रमुख पाहुणे. समारंभात रणधीर बोलून गेले, ‘ज्या ‘मेरा नाम जोकर’ने कपूर घराण्याला कर्जाच्या खाईत लोटले, तोच चित्रपट १९९० सालानंतर आर. के. फिल्म्सला खूप पैसे मिळवून देतो आहे. विशेष कार्यक्रमप्रसंगी किंवा टेलिव्हिजनवर जेव्हा जेव्हा हा चित्रपट दाखविला जातो, तेव्हा आम्ही खूप कमाई करतो... पैशाच्या दृष्टीनेही आता ‘मेरा नाम जोकर’ एक यशस्वी चित्रपट बनला आहे. आज राज कपूर असते तर त्यांना आपल्या या चित्रपटािवषयी असलेला अभिमान आणखी दुणावला असता...'
या साऱ्या गतप्रसंगांची आठवण राज कपूरप्रेमींना होणे साहजिक होते, कारण तो दिवसही तसाच होता... १४ डिसेंबर. राज कपूर आज हयात असते तर यंदा या दिवशी त्यांचा ९२वा वाढदिवस असता. ‘मेरा नाम जोकर’मधला राजू जोकर म्हणतो, ‘ये मेरा गीत जीवन संगीत, कल भी कोई दोहरायेगा, जग को हँसाने बहरूपिया, रूप बदल फिर आयेगा.' सच्चे रसिक कधीच काही विसरत नाहीत. ‘मेरा नाम जोकर’मध्ये आहे, सारा सर्कस माहोल. सर्कशीतील ट्रॅपिझ खेळाडूंच्या भूमिकेसाठी राज कपूर यांनी खास रशियाहून त्या वेळी कलावंत बोलावले होते. त्यातीलच एक होती सेनिया रिबिनिका... यंदा तिलाच खास मुंबईत पाचारण करण्यात आले. राज कपूरच्या वाढदिवशी ‘मेरा नाम जोकर’चा खास खेळ आयोजिण्यात आला. त्याला उपस्थित असलेल्या रणधीर, ऋषी, राजीव कपूर यांच्या साक्षीने सेनिया रिबिनिका खूप खूप बोलली या चित्रपटाबद्दल.
सेनिया बोलली, त्यापेक्षा तिचे निळेशार डोळे जास्त बोलत होते. ‘मेरा नाम जोकर’च्या सोनेरी लडी उलगडताना ती सांगू लागली, ‘राजू जोकरची आई मरते, त्या वेळी मला रडण्याचे दृश्य द्यायचे होते. खूपच कष्ट घ्यावे लागले मला ते दृश्य करण्यासाठी. अशा वेळी राज कपूर यांच्यातील दिग्दर्शकाने कंबर कसली. माझ्या आतपर्यंत त्यांनी त्या रुदनाची अभिव्यक्ती पोहोचवली आणि मी घळाघळा रडले कॅमेऱ्यासमोर... निव्वळ नैसर्गिक अभिनय होता तो... असे एक नाही, अनेक अनुभव आहेत माझ्यापाशी या चित्रपटाचे.' सेनिया सांगता सांगता मध्येच थांबली. दीर्घ श्वास घेतला तिने. पुन्हा आठवणींच्या धुक्यात हरवली.
‘मेरा नाम जोकर’चा खास खेळ झाला गेल्या १४ डिसेंबरला. ती जागा होती, मुंबईतील पेडर रोडवरील ‘रशियन सेंटर ऑफ सायन्स अॅण्ड कल्चर’ची. इमारतीला सर्वत्र साऊंड प्रुफ खिडक्या. त्यामुळे आतला आवाज बाहेर नाही. बाहेरचा आतमध्ये नाही. पण तिथे त्या दिवशी जमलेल्या रसिकांच्या मनात राज कपूरच्या अभिनयाचा जो नाद घुमत होता, तो तेथे हजर असलेल्या सर्वांनाच ऐकायला येतच होता... सेनिया रिबिनिकाचे आता वय आहे ७४. ती व्हीलचेअरवरुनच वावरते कधीकधी. बायका आपले वय जरा कमीच सांगतात, असे म्हणतात. पण आपण ते थोडे वाढवू. सेिनया पाऊणशे वयोमानाची आहे, असे ढोबळ विधान करू. वृद्धत्वामुळे शारिरिक हालचाली मंदावल्या आहेत पण तिच्या मनाच्या उत्साहाचे वय मात्र पंचविशीचे असावे, असे कोणीही म्हणेल. आता ती पुन्हा सर्कशीतील ट्रॅपिझवर जाईल व खेळ सुरू करेल, असा एकंदरीत तिच्या वागण्यातील नूर होता. तिच्यासाठी राज कपूर म्हणजे राजू. ती संपूर्ण कार्यक्रमभर ‘राजू राजू’ म्हणतच त्या महान माणसाबद्दल बोलत राहिली. रशियन माणसांपैकी काही जणांचे इंग्रजी असते बरे, पण आपल्याला कळायला जरा कठीण. सेनियाचे इंग्रजी बोलही असेच कान टवकारून समजून घेण्याच्या लायकीचे. त्या बोलांतून झिरपणारे राजू कौतुक विलक्षणच.
तिला घरचे सगळे लाडाने म्हणतात साना. साना शब्दाचा अर्थ श्रद्धा. ती त्याच भावाने राज कपूरविषयी बोलत होती. "मेरा नाम जोकर' झळकला, तो पडला, पण त्याने माझ्या ओंजळीत दान घातले, ते चाहत्यांच्या हजारो पत्रांचे. त्या चित्रपटातील माझ्या भूमिकेचे धो धो कौतुक केले साऱ्यांनी. चित्रपटाची लांबी जरा मोठीच होती. कदाचित इतका वेळ तग धरणे प्रेक्षकांना शक्य झाले नसेल. चित्रपट पडला.
सेनिया रिबिनिकाला शोधले कसे राज कपूरने? गमतीशीरच कहाणी आहे ती. मरिना या ट्रॅपिज आर्टिस्टच्या भूमिकेसाठी राज कपूर सुयोग्य कलाकाराच्या शोधात होता. त्याला हवी होती परदेशी युवती. रशियामध्ये गेल्यानंतर विविध सर्कशींच्या तंबूत राज कपूर फेऱ्या मारायचा. सर्कशीचे खेळ मन लावून बघायचा. त्यातच एकदा राज कपूर बोल्शेई बॅले बघायला गेला. त्यात काम करणारी सेनिया त्याच्या डोळ्यांत भरली. हीच ती ‘मरिना’. राजच्या मनाने कौल दिला. मुळात सेनियाला चमकाबिमकायची फारशी आवड नव्हतीच. तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असलेली बहीण एलिना ही खरेतर त्या काळातील सेलिब्रिटी कलाकार. पण बॅले पाहिल्यानंतर राज कपूरला मलाच भेटावेसे वाटले. त्याने मला भूमिका देऊ केली. तो माझा होता दुसरा चित्रपट. त्याआधी एका चित्रपटात काम केले होते मी. ‘मेरा नाम जोकर’सहित आजवर किमान १५ ते १६ चित्रपटांत भूमिका केल्या आहेत मी. त्यातील काही रशियन चित्रपट आहेत. पण सर्वात आवडती माझी भूमिका कोणती तर ती ‘मेरा नाम जोकर’मधील मरिनाचीच.
मरिना आणि राजू जोकरचा एक किसिंग सीन आहे चित्रपटात. १९७०चा माहोल लक्षात घेता, हे म्हणजे क्रांतिकारकच. पण किसिंग सीनचे काही अप्रूप सेनियाला नव्हते. बॅले करताना ते जोडपे एकमेकांना शरीरस्पर्श करतेच करते. ती स्पर्शाची जाणीव अभिव्यक्तीच्या क्षितिजावरील उगवता तारा बनते. वासनेचा वडवानल नाही पेटत त्यातून. सेनियालाही तेव्हा असेच वाटले अगदी.
ती खरे तर बॅलेत काम करणारी. तिला राज कपूरने सर्कशीत ट्रॅपिझचे खेळ करणारी कलाकार बनवून टाकले चित्रपटात. हा बदल तिला पचवणे सुरुवातीला जरा कठीणच गेले. सगळे काम सोडून रशियाला जायची इच्छा व्हायची. पण जिद्द आड यायची. अशातूनच मरिना साकारली गेली मेरा नाम जोकरमध्ये. या चित्रपटातील तिची भूमिका पाहून काही अन्य निर्मात्यांनी तिला आपल्या चित्रपटांत भूमिका देण्यासाठी बोलणी सुरु केली होती. पण नंतर माशी कुठेतरी शिंकली. तिला भारतात काही फारसे काम मिळाले नाही. ती परतली पुन्हा रशियामध्ये. काही फुटकळ भूमिका करुन वयाच्या ४०व्या वर्षी तिने निवृत्ती पत्करली! चाळीशीत माणूस पुन्हा जवान होतो मनाने आणि या बाईचे सारे उलटेच. तिचा नवरा लवकर वारला. तिचा मुलगा एगिन हा अभिनेता आहे.
मरिनाच्या भूमिकेनंतर राज कपूर इतका खूश झाला की, त्याने सेनियाला एक सोन्याची अंगठी भेट दिली. भारतीय शिष्टमंडळ मॉस्को फिल्म फेस्टिव्हलला गेले होते त्या वेळची ही गोष्ट. अंगठी देतोय, ही पर्सनल गिफ्ट आहे, हे सेनियाला सांगायला राज कपूर लाजत, संकोचत होता. त्याने कधीही सेनियाला पत्रे वगैरे लिहिली नाहीत, पण तिचा अभिनय त्याने कायमच लक्षात ठेवला. तिनेही त्याला लक्षात ठेवले अगदी त्या सोन्याच्या अंगठीसकट.
ख्वाजा अहमद अब्बास यांच्या लेखणीतून उतरलेली ‘मेरा नाम जोकर’ची कहाणी पडद्यावर येण्यासाठी तब्बल सहा वर्षे निर्मितीच्या चक्रात गुरफटलेली होती. व्यावहारिकदृष्ट्या आर. के. फिल्म्सला खड्ड्यात घालणारा हा चित्रपट लौकिकाच्या दृष्टीने मात्र आकाश व्यापून टाकणारा ठरला. एक क्लासिक फिल्म आयुष्यभर ‘मिसअंडरस्टुड मास्टरपीस'चा मळवट भरून आपले सौभाग्य अजमावत राहिली. राहणार आहे. त्यातील अनेक कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. काही मागे उरलेत. या सर्वांच्या मनात एकच भावना होती, ‘कल खेल में हम हों न हों, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा...'
"मेरा नाम जोकर'चा विशेष खेळ पाहून परतताना अशीच भावविभोर अवस्था प्रेक्षकांचीही झाली होती. १४ डिसेंबर १९२४ रोजी राज कपूरचा जन्म झाला. १४ डिसेंबर २०२४ रोजी राज कपूरची जन्मशताब्दी साजरी होईल... त्या दिवशीही ‘मेरा नाम जोकर’चाच झेंडा पुन्हा खांद्यावर घेऊन येण्याचे काही जणांनी या विशेष खे‌ळाच्या वेळीच ठरवून टाकले. ‘सपनों का सौदागर’ असे राज कपूरला म्हणतात ते अशाच गोष्टींमुळे...

Monday, December 12, 2016

डॉ. रमेश प्रभू यांच्यावरील खटल्यात साक्षीदार म्हणून उभा राहिलो तेव्हा....समीर परांजपे


 (सोबत दिलेल्या छायाचित्रात उजवीकडील डॉ. रमेश प्रभू.)
-------------
डॉ. रमेश प्रभू यांच्यावरील खटल्यात साक्षीदार म्हणून उभा राहिलो तेव्हा....
----------------------------------------
- समीर परांजपे
---
शिवसेनेचे माजी आमदार व मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांचे निधन झाले. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रमेश प्रभू यांचे ११ डिसेंबर २०१६ रोजी रविवारी सकाळी ६.२० वाजता निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी १९८७-८८ मध्ये मुंबईचे महापौरपद भूषवले होते. डॉ. प्रभू हे प्रथम १९७३ साली पार्ल्यातून नगरसेवक झाले. तसेच १९८५ ते १९९२ या काळात ते पार्ले येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९८७ साली आमदार हंसराज भुग्रा यांचे निधन झाल्यावर पार्ले विधानसभा मतदार संघात विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार करुन मते मागितली होती. ती देशातील अशी पहिलीच निवडणुक की ज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रचार करुन निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार जिंकला होता. रमेश प्रभू यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कुंटे उभे होते. ते हरले. प्रभू यांच्या विजयाला प्रभाकर कुंटे यांनी न्यायालयात आव्हान दिले. नेमका त्या खटल्याशी माझा संबंध आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलेपार्ले येथे जे हिंदुत्वाचा प्रचार करणारी भाषणे केली. त्यातील एका भाषणाचे वृत्तांकन मी दै. नवाकाळसाठी केले होते. १९८७ साली दहावी परीक्षा नुकतीच दिली होती. दादरहून गिरगावला नवाकाळ कार्यालयात जायचो. निळुभाऊ खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली थोडेफार लिहायचो. ते देतील ती पुस्तके वाचायचो. त्यावेळी प्रॅक्टिकल सोशॅलिझम हा त्यांनी मांडलेला विचार फार जोरात होता. एक दिवस निळुभाऊ म्हणाले की, नाना मुसळे (हे नवाकाळमध्ये ज्येष्ठ वार्ताहर होते. ते महापालिकेचे वृत्तांकन करीत असत.) यांच्याबरोबर विलेपार्लेला जा. तिथे आज सायंकाळी बाळासाहेबांचे भाषण आहे. मी नानांबरोबर गेलो. साधारण रात्री आठ वाजता शिवसेनाप्रमुखांचे भाषण सुरु झाले. माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनो, मातांनो अशी सुरुवात करुन त्यांचा वाक्प्रपात सुरु झाला. त्या भाषणाने प्रभावित झालो त्या वयात...दुसऱ्या दिवशी सकाळी नवाकाळ कार्यालयात येऊन मला जशी जमली तशी बातमी लिहून काढली. आणि निळुभाऊ खाडिलकरांकडे तपासायला दिली. दुपारी नाना मुसळे आले व त्यांनीही त्या सभेची त्यांची बातमी दिली. नाना मुसळे यांचीच बातमी छापून येणार हे नक्कीच होते. कारण ते स्टाफवर होते व अनुभवी होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७लाच मला आजीने उठवले. समीर, तुझ्या नावाने बातमी छापून आली आहे. बघ. मी डोळे चोळतच नवाकाळचा अंक पाहिला. हिंदुत्व हाच आमचा श्वास - बाळासाहेब ठाकरे असे त्या बातमीचे हेडिंग होते. आणि हेडिंगखाली समीर परांजपे यांजकडून असे छापून आले होते. मी ते सारे दहा दहा वेळा पाहिले. त्या दिवशी दुपारी नवाकाळ ऑफिसमध्ये गेलो निळुभाऊ खाडिलकरांचे आभार मानायला पण ते बाहेर गेलेले होते. ही माझ्या आयुष्यात मी केलेली व नावासह छापून आलेली पहिली बातमी.
त्यानंतर काही महिन्यांतच प्रभाकर कुंटे यांनी डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. विलेपार्लेच्या त्या पोटनिवडणुकीत ज्या ज्या बातमीदारांनी बातम्या दिल्या होत्या. त्या सर्वांच्या नावे मुंबई उच्च न्यायालयाने समन्स जारी केले. मला दादरच्या पत्त्यावर समन्स येताच मी पहिल्यांदा सावरकर स्मारकात धाव घेऊन प्रख्यात पत्रकार दि. वि. गोखले यांची भेट घेतली. गोखले म्हणाले चिंता नको. त्यांनी मला न्यायालयात साक्ष देणे वगैरे म्हणजे काय ते समजावून सांगितले. प्रत्यक्ष साक्ष देण्याच्या दिवशी न्या. भरुचा यांच्या न्यायालयात समोर साक्षात शिवसेनाप्रमुखांसह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते बसलेले होते. माझे नाव पुकारले जाताच मी साक्षीदाराच्या कठड्यात उभा राहून विलेपार्ले येथे शिवसेनाप्रमुखांची सभा कशी झाली त्याचे वृत्तांकन मी कसे केले याचे इतिवृत्त सांगितले. संपूर्ण साक्ष झाल्यानंतर न्या. भरुचा यांनी विचारले की, तू खरच ही बातमी कव्हर केली होतीस? मी हो म्हणून ठामपणे सांगितले. त्या खटल्यातील सर्वात लहान वयाचा साक्षीदार मीच होतो. ही साक्ष झाली तेव्हा मी अकरावी इयत्तेत प्रवेश घेतलेला होता.
हिंदुत्वाचा विचार मला पहिल्यापासूनच कधीही पटला नाही. त्यामुळे या साक्षीतही मी हिंदुत्वाच्या विरोधात माझ्या त्यावेळच्या आकलनाप्रमाणे टीकाच केली. माझ्याप्रमाणेच अनेक पत्रकारांचीही साक्ष त्यावेळेला झाली. त्यानंतर काही वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने रमेश प्रभू यांचा विजय रद्दबादल केला. प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही प्रभू हरले. मी ज्या न्यायालयीन दालनात साक्ष दिली त्या दालनाचे महत्व पुढे कळाले. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला होता. त्यावेळी त्यांची केसही मुंबई उच्च न्यायालयाच्या याच दालनात चालली होती. तशी स्मृतिपट्टिका आता या दालनाबाहेर लावण्यात आली आहे. एका निवडणुकीमुळे इतक्या अनेक गोष्टींशी संबंध आला. त्यानंतर मात्र एक ठरविले कोणत्याही गोष्टींना ठामपणे समोर जायचे. कोणत्याही धमकी, दटावणीला घाबरायचे नाही. आदराने दोन पावलाने मागे जायचे पण ते दोनशे पावले पुढे जाण्यासाठी. यामुळेही प्रभू खटला लक्षात राहिला.
११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हिंदुत्वावर निवडणूक लढवून आमदार झाल्याबद्धल त्यांना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षांची मतदान आणि निवडणूक लढवण्यास बंदी घातली. पुढे डॉ. रमेश प्रभूही शिवसेनेत अप्रिय झाले. ते शिवसेना सोडून मनसे मध्ये गेले. मात्र त्यानंतरही डॉ. प्रभू जेव्हाजेव्हा भेटत त्यावेळी पांढऱ्या सफारी सुटमधील त्यांचे हसरे व्यक्तिमत्व लुभावणे वाटत असे. अत्यंत मृदूभाषी असा हा नेता. आपल्या राजकीय कारकिर्दीवर हिंदुत्वाची मोहर उमटवूनच ते वावरत होते. त्याचा त्यांना अभिमानही होता...आता ते या लौकिक जगातून पारलौकिकतेत विलिन झाले आहेत...
प्रभू आता प्रभूपाशीच गेले...

Sunday, December 4, 2016

आंबेडकरी चळवळीची कव्वालीयात्रा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी - ४ डिसेंबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या दि. ४ डिसैंबर २०१६च्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये शाहीर विठ्ठल उमप यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने मी लिहिलेला हा लेख. या लेखाची वेबपेज व टेक्स्ट लिंक तसेच जेपीजी फाइल व मजकूर पुढे दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-rasik-article-in-marathi-5473432-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/04122016/0/6/
---------------
आंबेडकरी चळवळीची कव्वालीयात्रा
----------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
प्रख्यात इतिहासकार न. र. फाटक यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. पण त्यांनी लिहायला घेतलेले ‘मुंबई नगरी’ हे पुस्तक त्यांच्या निधनामुळे अपूर्णच राहिले. पुढे त्यात काही भर घालून ते पुस्तक त्यांच्या मुलाने पूर्ण केले. प्रख्यात संगीतकार सुधीर फडके यांचे ‘जगाच्या पाठीवर’ हे आत्मचरित्रही त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकले नव्हते. लेखकाच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेले पुस्तक, असे एक स्वतंत्र दालनच मराठी साहित्यात निर्माण झालेले आहे. त्यात अनेक उत्कृष्ट पुस्तके आहेत. त्याच पंक्तीतले एक पुस्तक म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलेले ‘जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास’.
विठ्ठल उमप हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत ते १९६० सालापासून. ते वयाच्या आठव्या वर्षापासून गायनकलेत रुजू झाले. पहिल्यापासून ते शाहिरी कार्यक्रम करत होते. त्यांची हजारच्या वर ध्वनिमुद्रित गीते अाहेत. विठ्ठल उमप म्हणजे ‘जांभुळाख्यान’, असे समीकरण मराठी माणसाच्या मनात घट्ट रुजलेले आहे. आकाशवाणी, दूरदर्शनपासून चित्रपटांपर्यंत त्यांची गायक, अभिनेता म्हणून अत्यंत वैभवी कामगिरी आहे. उमप हे आंबेडकरांचे सच्चे अनुयायी. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी माझी वाणी भीमचरणी, माझी आई भीमाई हे गीतसंग्रह लिहिले. त्यांचा अजून एक विशेष म्हणजे, ते गझल, कव्वालीचे निस्सीम भक्त व भोक्ते होते. त्यातून त्यांनी ‘उमाळा’ हा गजलसंग्रहही लिहिला होता. उर्दूची नजाकत विठ्ठल उमपांच्या नसानसात भिनलेली होती. त्यामुळे त्या भाषेच्या संगतीने येणारे जे संगीताविष्कार आहेत, त्यांचा ध्यास त्यांना लागला होता. कव्वालीप्रेमही त्यातूनच आले.
२६ नोव्हेंबर २०१० रोजी विठ्ठल उमपांचे निधन झाले. या घटनेला नुकतीच २६ नोव्हेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण झाली. हे आठवणींचे पुस्तक त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होण्याचा योग नव्हता. परंतु गेल्या आॅगस्ट महिन्यात त्यांचा पुत्र संदेश याने पुढाकार घेतला व सुगावा प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत विलास वाघ यांनी म्हटले आहे की, ‘शाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली यांनी हा गायनप्रकार दर्ग्यातून आंबेडकरी चळवळीत आणला. कव्वालीने आंबेडकरी चळवळीत प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले आहे. नंतर गायक मंडळींनी आंबेडकर जयंती उत्सवात कव्वालीचा उपयोग करायला सुरुवात केली. विठ्ठल उमप यांचे मोठमोठ्या कव्वालांंच्या सोबत कव्वालीचे सामने होत असत. ते शीघ्र कवी होते. उत्तर देण्यासाठी त्वरित काव्यरचना करीत असत.’ शाहीर उमपांमधील कव्वालाचे वर्णन यापेक्षा अधिक समर्पक शब्दांत होऊ शकत नाही.
‘जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास’ या पुस्तकाची सुरुवात होते ती विठ्ठल उमप यांच्या बालपणीच्या दिवसांपासून. दादर पूर्वेला नायगावच्या बीडीडी चाळ क्र. १३ मध्ये त्यांचे बालपण गेले. आजूबाजूचे वातावरण असे होते की, लोककलांच्या माहोलमध्येच ते मोठे झाले. १९२५पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिचळवळीला जोर चढला होता. त्या वेळी त्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शाहीर भीमराव कर्डक पुढे आले. त्यांनी भीमजलसा काढला. तो पहिला आंबेडकरी जलसा. त्या मागोमाग आडांगळे, घेगडे, गायकवाड, कांबळे, भोसले अशा जलसाकारांचे फड उभे राहिले. ब्राह्मणांनी दलितांवर शतकानुशतके जे अत्याचार केले, त्यांना वाचा फोडण्याचे काम या जलशांतून होत असे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची माहितीही त्यात मिळे. मात्र परिस्थिती आपल्या गतीने बदलत असते. सिनेमाच्या उडत्या गीतांनी जनसमुदायाला वेड लागले. विठ्ठल उमप हे सारे परिवर्तन सजगतेने पाहात होते. जलसा मागे पडून आंबेडकरी विचारांच्या प्रचारासाठी नव्या उमेदीचे तरुण गायक, कवी पुढे आले. त्यांनी जलशाचा ढंग बदलला, त्याला कव्वालीचा पेहराव दिला. कव्वाली हा प्रकार फार पूर्वी रुजविला अजमेरचे हजरत ख्वाजा गरीब नवाज यांनी. त्यानंतर अमीर खुसरोने कव्वालीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. या कव्वाली यात्रेत ख्वाजा, खुसरो यांचे गानवारसदार बनले विठ्ठल उमप. या वाटचालीत त्यांचे सहप्रवासी होते ते म्हणजे गोविंद म्हशीलकर, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, कृष्णा शिंदे, किसन खरात, भिकाजी भंडारे, काशिनाथ शितोळे, राजेश जाधव, नवनीत खरे, दत्ता जाधव, प्रतापसिंग बोदडे आणि असे बरेच... त्यातील काही प्रसिद्ध झाले, काहींचे नाव तितके पुढे आले नाही. परंतु या सर्वांची कव्वालीवर नितांत श्रद्धा होती. कव्वालीच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची विलक्षण तळमळ होती.
विठ्ठल उमप लिखित या पुस्तकात अशा कव्वालांबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या आठवणी जागविण्यात आल्या आहेतच; शिवाय नामांतरासारख्या आंदोलनामध्ये कव्वालीने कशी साथ दिली, याचे वर्णन या पुस्तकात त्याच धगधगत्या शब्दांमध्ये येते. मुंबईच्या राणीच्या बागेतील शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह येथे श्रावण यशवंते यांच्या साहाय्यार्थ त्यांच्या मित्रांनी तिरंगी कव्वालीचा सामना आयोिजत केला होता. त्यात विठ्ठल उमप, रंजना शिंदे, शीलादेवी असे तीन गायक सहभागी झाले होते. गीत, गजल, खमसा, विनोदी गाणी या गानप्रकारापलीकडे तोवर मराठी कव्वाली गाण्यात मुक्तछंद हा काव्यप्रकार आलेला नव्हता. तो विठ्ठल उमपांनी या कव्वाल सामनाच्या माध्यमातून प्रथमच पेश केला. त्याचा मासला असा-
कल्याणच्या बाजारात कांदे विकतो
काळ्या चौकटीत डांबू नका
खर सांगतो रोकडेंना विचारा
विद्यानंदाची शपथ
हृदय धडधडतं
‘जज’ साहेब
आपण पंडित आहात, न्याय करा....
विविध माणसांच्या आठवणींतून हे किस्से पुढे खुलत जातात. उमपांची लेखनशैली धारदार आहे. त्याबरोबरच ती कधीकधी मिश्कील रूप धारण करते. कव्वाली गायकांतील उमपांचे एक सहचर म्हणजे आप्पा कांबळे. दिलखुलास वृत्तीचे, दिलदार बाण्याचे, शीघ्र गीते लिहिणारे, लोकगीतांची परंपरा जपणारे कव्वाल म्हणजे आप्पा कांबळे, असे वर्णन विठ्ठल उमपांनी त्यांच्यावरील लेखात केले आहे. त्यांच्यात नेहमी काव्यजुगलबंदी होत असे. आप्पा कांबळे यांचे लोकप्रिय गीत होते, ‘दार उघड आता दार उघड’. एका बाईचा नवरा दारू पिऊन आलाय. तो दारावर थाप मारून दार उघड, दार उघड, असं ओरडतोय. बाई दार उघडत नाही. शेजारचा एक मित्र त्याला सांगतोय, काय आलास ना कोणाचा मार खाऊन? ती दार उघडत नाही. अशा गीतांतून सामाजिक स्थितीबद्दलही प्रखर भाष्य केले जात असे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दोन-एक वर्षांनी बाबांचे निष्ठावंत कार्यकर्ते बी. सी. कांबळे व आर. डी. भंडारे यांच्यात मतभेद निर्माण झाले. दख्खनस्थ मंडळी भंडारे यांच्याबरोबर, तर कोकणातील दलित मंडळी बी. सी. कांबळे यांच्यासोबत होती. मुंबईतही दुहीचा वणवा पेटला होता. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या लेकरांनी आपापसात भांडू नये म्हणून विठ्ठल उमप यांच्यातील कवी, शाहीर, कव्वाल जागा झाला होता. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तो आपल्या दलित बांधवांच्या कल्याणासाठीच. त्या वेळी महाराष्ट्रातील विविध भागांतील एकमेकांचा दुस्वास करणाऱ्या दलित बंधूंना या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण करून देण्यासाठी विठ्ठल उमपांची लेखणी सांगू लागली...
‘मजेदार गोष्ट ऐका या पुराणाची
महाभारत आणि या रामायणाची
कथा ऐका हो या रक्तमिश्रणाची
भानगड ऐका तुम्ही या पुराणाची
मी हिंदू धर्मात मरणार नाही...’
माटुंगा लेबर कॅम्पमधील दिवसांपासून ते त्यांना भेटलेल्या रसिकांपर्यंत अनेकांच्या आठवणी या पुस्तकात विठ्ठल उमपांनी लिहिल्या आहेत. कोणतीही चळवळ म्हटली की ती केवळ भाषणबाजीतून फोफावत नाही. गाणी, कविता, लोककला यांच्या अाविष्कारातून या चळवळीला अनेक धुमारे फुटतात. आंबेडकरी चळवळीलाही असेच जे धुमारे फुटले त्यापैकी आंबेडकरी कव्वालांचे एक प्रकारचे आत्मचरित्र म्हणजे विठ्ठल उमपांचे हे आठवणीवजा पुस्तक आहे. आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, जिज्ञासू वाचक यांच्यासाठी उमप यांच्या सुरेल आठवणींचा खजिना उत्तम संदर्भस्रोत ठरू शकतो. मिळवून वाचावे, असेच हे पुस्तक आहे.
जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास
लेखक : लोकशाहीर विठ्ठल उमप
प्रकाशक : सुगावा प्रकाशन
पृष्ठसंख्या : २०४, मूल्य : २००/-
--------