Friday, April 28, 2017

विनोद खन्ना, पृथ्वीराज कपूर, राज कपूर, दिलीपकुमार, शाहरुख खान, नासीरुद्दीन शाह यांचे पेशावरशी जडलेले नाते - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २८ एप्रिल २०१७



http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/28042017/0/10/
विनोद खन्ना यांचा जन्म पेशावरला झाला होता. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पेशावरशी विनोद खन्ना व अन्य अभिनेत्यांची नाळ कशी जुळली आहे ते सांगणारा माझा हा लेख दै. दिव्य मराठीच्या २८ एप्रिल २०१७च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
---
पेशावरशी जडलेले नाते
समीर परांजपे
विनोद खन्ना हे किशनचंद खन्ना व कमला या पंजाबी दांपत्याचे अपत्य. विनोद खन्ना यांच्या वडिलांचा टेक्सटाइल, डाइज व केमिकलचा व्यवसाय होता. विनोद यांचा जन्म पेशावर (फाळणीनंतर हा भाग पाकिस्तानात गेला) येथे ६ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. भारताच्या फाळणीनंतर खन्ना कुटुंब मुंबईत आले. पेशावर या शहराशी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायकांचे खास नाते आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमॅन राज कपूर यांचे पिता व प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०६ रोजी पूर्वीच्या ल्यालपूर (आताच्या पाकिस्तानातील फैसलाबाद) जवळील समुंद्री येथे झाला. पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बसेश्वरनाथ कपूर हे पोलिस उपनिरीक्षक होते. बसेश्वर यांची बदली पेशावर येथे झाल्याने कपूर खानदान या शहरात राहायला आले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार (मूळ शब्द किस्सा कहानी, मग त्याचा अपभ्रंश झाला.) परिसरातील डाकी नालबंदी भागात कपूर खानदानाचे पिढीजात घर आहे. पृथ्वीराज कपूर यांचे सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण ल्यालपूर येथील खालसा कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पेशावरमधील एडवर्ड्स महाविद्यालयात झाले. एडवर्ड्स महाविद्यालयातील प्राध्यापक जय दयाळ हे कलाप्रेमी होते. पृथ्वीराज कपूर यांच्यातील अभिनेत्याला पहिली संधी मिळाली ती याच महाविद्यालयात. एडवर्ड्स महाविद्यालयातून पृथ्वीराज कपूर बी.ए. झाले. पृथ्वीराज कपूर यांचे खरे प्रेम नाटकांवरच होते. त्यामुळे पुढे साहजिकच त्यांची पावले नाट्य व चित्रपटसृष्टीकडेच वळली. १९२८ मध्ये पृथ्वीराज कपूर मायानगरी मुंबईमध्ये आले आणि मग कायमचे इथलेच झाले. पृथ्वीराज कपूर यांचा विवाह पेशावरमध्ये रामसरनी मेहरा यांच्याशी झाला. त्या वेळी पृथ्वीराज यांचे वय होते १७ वर्षांचे, तर त्यांच्या पत्नीचे वय होते १४ वर्षांचे. पृथ्वीराज कपूर यांचा थोरला मुलगा राज कपूर याचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावरमध्येच झाला. 
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ अशा शब्दांत गौरवल्या गेलेले तसेच ट्रॅजिडी किंग म्हणून रसिकमान्यता मिळालेले अभिजात अभिनेते दिलीपकुमार हेदेखील मूळचे पेशावरचेच. या शहरातील किस्सा ख्वानी बाजारातील मोहल्ला खुदादाद येथील निवासस्थानी ११ डिसेंबर १९२२ रोजी दिलीपकुमार यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मोहंमद युसूफ खान. पेशावरमधील त्यांच्या कुटुंबामध्ये हिंडको ही भाषा बोलली जात असे. दिलीपकुमार यांच्यासह ती सर्व १२ भावंडे होती. दिलीपकुमार यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम सरवार. ते फळांचे व्यापारी होते. त्यांच्या पेशावर व महाराष्ट्रातील नाशिकजवळील देवळाली येथे मोठ्या फळबागा होत्या. १९२०च्या दशकाच्या अखेरीस दिलीपकुमार यांचे कुटुंबीय मुंबईला आले व येथेच स्थायिक झाले. 
अभिनेता नासीरुद्दीन शाह यांचे पूर्वज सय्यद मुहम्मद शाह हे मुळचे अफगाणिस्तानचे. पहिले अँग्लो-अफगाण युद्ध व १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात सय्यद ब्रिटिशांच्या बाजूने सहभागी झाले होते. ते जान फिशान खान या नावानेही ओळखले जात. ब्रिटिशांनी त्यांना सरढाणाचे वतन देऊ केले होते. ते सरढाणाचे नवाब बनले. काबूलमधून कायमचे स्थलांतरित व्हावे लागलेल्या सय्यद मुहम्मद शाह यांनी काही काळ पेशावरमध्येही घालविला. त्यानंतर ते सरढाणामध्ये आले. या दूरच्या धाग्याने नासिरुद्दीन शाह देखील पेशावरशी जोडले गेले आहेत. पाकिस्तानच्या दौऱ्यावर काही वर्षांपूर्वी गेले असताना नासीरुद्दीन यांनी अफगाणिस्तानातील काबूल तसेच पाकिस्तानातील पेशावर शहरांशी आपल्या पूर्वजांचे असलेले नाते उलगडून दाखविले होते.
शाहरुख खान म्हणजेच किंग खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी नवी दिल्लीमध्ये झाला. पण त्याच्या पूर्वजांची पाळेमुळे ही पेशावरमध्येच आहेत. शाहरुख खानचे आजोबा जान मुहम्मद हे मुळ अफगाणिस्तानातले. जान मुहम्मद कालांतराने पेशावरमध्ये स्थायिक झाले. तेथे हे कुटुंब हिंडको भाषा बोलत असे. शाहरुख खानचे वडिल मीर ताज मोहम्मद खान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पेशावर येथील आंदोलनांत सहभागी झाले होते. फाळणीनंतर मीर ताज मोहम्मद खान हे भारतात आले. आजही शाहरुख खानचे काही नातेवाईक पेशावर येथे राहातात.
---
विनोद खन्ना, फिरोज खानची दोस्ती
विनोद खन्ना, फिरोझ खान यांच्या निधनाची तारीख २७ एप्रिलच!
विनोद खन्ना व फिरोज खान या दोघांचे रुपेरी पडद्यावर छान मेतकुट जमलेले होते. त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील काही घटनांमध्येही साम्य होते. फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यानंतर आठ वर्षांनी विनोद खन्ना यांचेही कर्करोगामुळेच २७ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले. विनोद खन्ना व फिरोझ यांनी शंकर शंभू, कुर्बानी, दयावान अशा काही चित्रपटांत एकत्र काम केले होते. मणिरत्नन याने नायकन हा तामिळ चित्रपट बनविला होता.फिरोझ खानने त्याचा दयावान या नावाने हिंदीत रिमेक केला होता. या दोघांनी एकत्र केलेला पहिला चित्रपट म्हणजे शंकरशंभू. हा चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला. फिरोझ खानने कुर्बानी चित्रपटानंतर जाँबाज चित्रपट बनवायला घेतला. त्यावेळी विनोद खन्नाला प्रमुख भूमिका देण्याचे फिरोझच्या मनात होते. पण ती भूमिका सरतेशेवटी अनिल कपूरने केली.
--
छोट्या पडद्यावरील `काशिनाथ'
विनोद खन्ना यांनी मोठा पडदा तर गाजवलाच पण छोट्या पडद्यावरही कालांतराने भूमिका साकारली. स्मृृती इराणी यांनी निर्मिलेल्या मेरे अपने या मालिकेमध्ये काशिनाथ ही भूमिका साकारली होती.
---------

विनोद खन्ना : कलासक्त अभिनेता व संवेदनशील माणूस...सुभाष अवचट. (शब्दांकन - समीर परांजपे) - दै. दिव्य मराठी २८ एप्रिल २०१७




दै. दिव्य मराठीमध्ये दि. २८ एप्रिल २०१७ रोजी संपादकीय पानावर प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी विनोद खन्नाच्या जागविलेल्या आठवणी. या लेखाचे शब्दांकन मी केले आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/28042017/0/6/
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-subhash-awachat-writes-about-artificial-and-sensitive-person-article-in-vinod-kh-5585081-NOR.html
----
कलासक्त अभिनेता व संवेदनशील माणूस...
----
प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट
---
(शब्दांकन - समीर परांजपे)
---
इन्ट्रो - विनोद खन्ना हा माणूस कधी कोणाच्या स्पर्धेत उतरला नाही, कधी कोणाला आपले स्पर्धक मानले नाही. तो आपले काम चोख करीत राहिला. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात की त्यांची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही. नेमक्या याच भावना विनोद खन्ना या जिगरी मित्राबाबत माझ्या मनात दाटून आल्या आहेत.
---
अतिशय देखणा अभिनेता, संवेदनशील माणूस असलेला विनोद खन्ना हा माझा अत्यंत जवळचा मित्र होता. खरतर विनोद खन्ना माझ्यापेक्षा वयाने मोठा पण हे थोरलेपण त्याने कधीही जाणवू दिले नाही. १९८२ या वर्षातले दिवस आठवत आहेत मला. त्या का‌ळात पुण्यात आम्ही एकत्र खूप दिवस घालविले. त्या काळात विनोद खन्ना पुण्यात आला की बऱ्याचदा माझ्याच घरी राहायचा. त्या कालखंडात अभिनेता म्हणून त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता होता तो. असंख्य चाहते त्याच्या प्रेमात होते. त्याच्या लोकप्रियतेने कळस गाठला होता. या यशस्वी दिवसांतही विनोद खन्ना या साऱ्या गोष्टींकडे अत्यंत अलिप्तपणे बघत असे. त्याने एकदा मला खासगी गप्पांमध्ये सांगितले होते की, यार या चित्रपटसृष्टीत कधी येईन असे वाटलेही नव्हते. पण आता आलो आहे तर इथल्या भल्याबुऱ्या वातावरणासह जगायची मी सवय लावून घेतलेली आहे.
एक उत्तम अभिनेता म्हणून विनोद खन्नाची देश-विदेशातील रसिकांना ओळख आहेच. पण त्याचे काही अपरिचित पैलू सांगतो. विनोद खन्ना हा उत्तम क्लासिकल सिंगर होता. त्याने काही वर्षे पंडित जसराज यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही घेतलेले होते. पुण्याला तो जेव्हा माझ्या घरी यायचा त्यावेळी आमच्या विविध विषयांवर गप्पा व्हायच्या. त्यामध्ये संगीत, चित्रकला, इतर ललितकला व चित्रपट व पुस्तके असे नानाविध विषय असायचे. त्याच्या भोवती अभिनेत्याचे वलय असले तरी त्याला साधे आयुष्य जगणे अधिक पसंत होते. मुंबईच्या जहांगीर कला दालनामध्ये माझे पहिले चित्रकला प्रदर्शन जेव्हा भरणार होते, त्यावेळी मी त्याच्या घरीच मुक्काम केला होता. प्रदर्शनाच्या पूर्वतयारीसाठी विनोद खन्ना जहांगीर कला दालनामध्ये माझ्यासोबत आला होता. त्याने माझी चित्रे कला दालनात नीट लावायला मदत केली होती. स्मिता पाटीलनेही या चित्रप्रदर्शनाच्या पूर्वतयारीत हातभार लावला होता. मी ते क्षण कधीच विसरु शकणार नाही. 
१९८२ साली आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना अचानाक त्याने काही काळापुरता चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. भगवान रजनीश यांच्या विचारांनी भारावून त्याने त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. विनोद खन्ना याच्या आयुष्यातील हा बदल मला खूप जवळून बघायला मिळाला. महेश भट्ट, गोल्डी म्हणजे विजय आनंद यासारख्या त्याच्या मित्रांबरोबर तोही भगवान रजनीश यांच्या सान्निधात्य राहिला. त्या का‌ळात विनोद खन्नाशी माझ्या भेटी व्हायच्या. तो आचार्य रजनीशांकडे का गेला असावा? असा प्रश्न विचारला जातो. मुळात, कलावंत ज्या चित्रपटसृष्टीत वावरतात तिथे वलयांकित जीवन असले तरी बराचसा खोटेपणा, बटबटीतपणा असतो. या वातावरणाचा या अभिनेता, अभिनेत्रींना कालांतराने उबग येतो. वर्षभरातले काही दिवस तरी या वातावरणापासून दूर जावे असे त्यांना वाटू लागते. मग काही जण अमेरिका किंवा अन्य देशांत एक-दोन महिने राहून येतात. काही जण आध्यात्मिक गुरुंच्या सान्निध्यात काही दिवस घालविणे पसंत करतात. विनोद खन्नाने रजनीशांचे शिष्यत्व पत्करणे पसंत केले त्यामागील कारणांमध्ये हेही एक महत्वाचे कारण असू शकते. विनोदची पहिली पत्नी गीतांजली हिच्या समवेत त्याचे काही सांसारिक मतभेद झाले होते. त्यामुळेही तो अस्वस्थ होता. त्याला मन:शांतीची गरज होती. ती त्याला भगवान रजनीश यांच्या विचारांनी मिळवून दिली. कोरेगाव येथील रजनीश यांच्या आश्रमामध्ये त्याचे वास्तव्य असे तेव्हाही तो अत्यंत साधे आयुष्य जगत होता. आश्रमातील माळीकामापासून अनेक गोष्टी तो करत असे. आपण अभिनेता असणे तो त्यावेळी सहजी विसरुन जाई. पाच वर्षे रजनीशांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर विनोद खन्नाने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मला आठवते चित्रपटक्षेत्रात पुनरागमन करण्याआधी तो एका खोलीत १० ते १२ दिवस एकटा राहिला होता. त्याने या काळात आपल्या मनाशी योग्य खूणगाठ बांधूनच पुन्हा या क्षेत्रात पाऊल ठेवले. कोणत्याही अभिनेत्यासाठी सेकंड इनिंगमध्ये यशस्वी होणे तसे कठीण असते. परंतु विनोद खन्ना इतका जिगरबाज की त्याने हेही आव्हान पेलले. त्याचे चित्रपट पुन्हा यशस्वी होऊ लागले व तो पूर्णपणे इथे स्थिरावला. 
विनोद खन्नाने चित्रपटात काम करताना दिग्दर्शक, निर्माता व अन्य लोकांना कधी त्रास दिला आहे असे मी कधीही ऐकलेले नाही. मला अमुकच संवाद दे, भूमिकेची लांबी मोठी करा, दुसऱ्याची भूमिका कमी करा असे दडपण त्याने कधीही कोणावर आणले नाही. आपण आपले काम चोख करायचे हे त्याचे सूत्र होते. विनोद खन्ना हा उत्तम खेळाडू होता. तो पुण्यात माझ्या घरी आलेला असताना अनेकदा टेबल टेनिस खेळायचो. त्याचे क्रीडानैपुण्य तेव्हा लक्षात यायचे. त्याचे काही चित्रपट मला अतिशय आवडतात. शक, मेरे अपने, लहू के दो रंग, कोयलांचल, क्षत्रिय हे त्याचे चित्रपट मला आवडायचे. आम्ही गप्पा मारताना चर्चा तत्वज्ञानावरही वळत असे. विनोदचे वाचन उत्तम असल्याने तो या विषयातही अतिशय मुद्देसुद बोलायचा. त्याला चित्रकलेबद्दल आस्था होती. माझ्या चित्रांबद्दलही तो आवर्जून चर्चा करायचा. तो बऱ्यापैकी मराठी बोलत असे. मला तो `सुभ्या' या नावानेच हाक मारत असे. विनोदची मुले लहानपणी माझ्या पुण्यातील घरी खेळली, बागडली आहेत. 
विनोद खन्नाने कालांतराने कविता दफ्तरी हिच्याशी दुसरे लग्न केले. कविता ही मराठी मुलगी आहे. माझ्या चित्रांच्या ऑक्शनच्या वेळीच या दोघांची भेट झाली. वारंवार भेटीचे रुपांतर मग प्रेमात व नंतर लग्नात झाले. विनोद खन्ना आता आजारी होता. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्याच्याशी वारंवार भेटी होत नव्हत्या. मात्र आम्ही फोनवर नेहमी बोलायचो. एकमेकांचे क्षेमकुशल विचारायचो. विनोद स्वत:च्या दु:खाविषयी कोणाशीही फार बोलत नसे. त्याला नेमका काय आजार झाला आहे याचा मला शेवटपर्यंत त्याने किंवा कविताने थांग लागू दिला नव्हता. विनोदच्या ७० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून मी त्याला भेटलो होतो. माझा खंडाळ्याला स्टुडिओ आहे. तिथे दोन-चार दिवसांसाठी येऊन राहायची त्याला खूप इच्छा होती. ते काही अखेरपर्यंत जमले नाही. मुकद्दर का सिकंदरसारख्या चित्रपटात तो व अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची तारीफ करतानाच मिडियाने त्यांच्यात सुप्त स्पर्धा असल्याच्या बातम्याही त्यावेळी पिकविल्या होत्या. मात्र मी दोन्ही अभिनेत्यांना खूप जवळून ओळखत असल्याने खात्रीने सांगतो की अशी स्पर्धा त्यांच्यात कधीही नव्हती. विनोद खन्ना हा माणूस कधी कोणाच्या स्पर्धेत उतरला नाही, कधी कोणाला आपले स्पर्धक मानले नाही. तो आपले काम चोख करीत राहिला. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात की त्यांची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही. नेमक्या याच भावना विनोद खन्ना या जिगरी मित्राबाबत माझ्या मनात दाटून आल्या आहेत.

Monday, April 24, 2017

हिराबाई पेडणेकर नावाची कस्तुरी! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी २३ एप्रिल २०१७


 हिराबाई पेडणेकर यांनी लिहिलेल्या संगीत दामिनी या नाटकाचे जे पुस्तक प्रकाशित झाले त्याचे पहिले पान.
---
हिराबाई पेडणेकर यांचे हस्ताक्षर
--------
 कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील रहिवासी कृष्णाजी नारायण नेने यांच्या समवेत हिराबाई पेडणेकर
------
 हिराबाई पेडणेकर यांचे रेखाचित्र.
----
 हिराबाई पेडणेकर लिखित संगीत दामिनी या नाटकातील इंदुमतीच्या भूमिकेत नटवर्य केशवराव भोसले.
--------
दै. दिव्य मराठीच्या दि. २३ एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या पुरवणीत मी नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्यावर लिहिलेला हा लेख. त्या लेखाची वेबपेज लिंक व जेपीजी फाइलही सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sameer-paranjpe-article-about-hirabai-pednekar-5581178-PHO.html?seq=2
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/23042017/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/23042017/0/2/
------------------
हिराबाई नावाची कस्तुरी!
-------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---------
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ९७व्या आकड्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. २०२० साली शतकमहोत्सवी नाट्य संमेलन होईल. आजवरच्या नाट्य संमेलनांच्या इतिहासामध्ये फक्त सात महिलांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. मराठीतील महिला नाटककार गिरिजाबाई केळकर यांना १९२८ मध्ये मुंबईत भरलेल्या २३ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर दुर्गा खोटे (नवी दिल्ली, १९६१), ज्योत्स्ना भोळे (पणजी, १९८४), भक्ती बर्वे ( कणकवली, १९९८), लालन सारंग (कणकवली, २००६), फय्याज (बेळगाव, २०१५) या अभिनेत्रींना व दिग्दर्शिका- अभिनेत्री विजया मेहता (इचलकरंजी, १९८६) यांना नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. मुळात मराठी रंगभूमीवर पूर्वी व आजही महिला नाटककारांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. गिरिजाबाई केळकरांना मिळालेले नाट्य संमेलनाध्यक्षपद ही तत्कालीनदृष्ट्या अपूर्वाईची घटना होती. गिरिजाबाईंनी आयेषा, पुरुषांचे बंड, मंदोदरी, राजकुंवर, वरपरीक्षा, सावित्री, हीच मुलीची आई अशी काही नाटके लिहिली होती. त्याशिवाय त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. गिरिजाबाईंच्या द्रौपदीची थाळी या आत्मचरित्रात त्यांचा लेखन व जीवनप्रवास कसा झाला याचे अतिशय निरामय वर्णन आहे.
गिरिजाबाई केळकर यांच्याप्रमाणेच बाळुताई खरे (मालती बेडेकर), आनंदीबाई किर्लोस्कर, शकुंतला परांजपे, उमाबाई सहस्त्रबुध्दे, पद्मा गोळे, सरिता पदकी, सई परांजपे, ज्योत्स्ना देशपांडे, सुमती क्षेत्रमाडे, वसुंधरा पटवर्धन, सुमतीदेवी धनवटे, रेखा बैजल, मालतीबाई दांडेकर, कुमुदिनी रांगणेकर, मुक्ताबाई दिक्षित, लीला फणसळकर, शिरीष पै, मंगला गोडबोले, मनस्विनी लता रवींद्र, इरावती कर्णिक, रोहिणी निनावे, मधुगंधा कुलकर्णी, संपदा जोगळेकर- कुलकर्णी, मनिषा कोरडे आदी महिला नाटककारांनीही आपली मुद्रा मराठी रंगभूमीवर उमटवली आहे. मात्र या सर्वांमध्ये एक नाव अतिशयच महत्वाचे आहे ते म्हणजे हिराबाई पेडणेकर या मराठीतील पहिल्या महिला नाटककार असे पूर्वी सांगितले जात असे. मात्र सोनाबाई चिमाजी केरकर यांचे ‘संगीत छत्रपती संभाजी नाटक’ आणि काशिबाई फडके यांचे ‘संगीत सीताशुद्धी’ ही नाटके कालानुक्रमे आधीची असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली. डॉ. मधुरा कोरान्ने यांनी आपल्या `स्त्री नाटककारांची नाटके' या पुस्तकात म्हटले आहे की, `सोनाबाई केरकर या मराठीतील आद्य स्त्री नाटककार आहेत. त्यांनी १८९४ साली `संगीत छत्रपती संभाजी नाटक' हे नाटक लिहिले. सोनाबाईंच्या मृत्यूनंतर (१७ जुलै १८९५) एक वर्षाने इ.स. १८९६ साली हे नाटक प्रसिद्ध करण्यात आले. परंतु यासंदर्भात डॉ. ताराबाई भवाळकर यांच्या मते `पहिली मराठी स्त्री नाटककार' असण्याचा मान काशीबाई फडके यांच्याकडे जातो. काशीबाईंचे संगीत सीताशुद्धी हे नाटक इ.स. १८९७मधे लेखिकेच्या मृत्यूनंतर (इ.स. १८९६) एका वर्षाने प्रसिद्ध झाले.'म्हणजे १८८७मध्ये लिहिलेले हे नाटक आहे. परंतु जसे हे नाटक पूर्वी जरी लिहिलेले असले तरी ते १८९७ साली प्रसिद्ध झाले आहे. एखाद्या साहित्य प्रकारातील आद्यत्व त्या त्या लेखकाच्या प्रसिद्ध छापील ग्रंथांच्या आधारेच ठरविले जाणे योग्य ठरते. सोनाबाई केरकर यांचे नाटक१८९६मध्ये प्रसिद्ध झाले असल्याने सोनाबाई केरकर याच पहिल्या मराठी स्त्री नाटककार ठरतात.'
पहिल्या मराठी स्त्री नाटककार होण्याचा हिराबाई पेडणेकरांना मिळाला नाही पण त्यामुळे हिराबाईंच्या लेखनाची महत्ता कमी होण्याचे काहीच कारण नाही. हिराबाईंच्या ठायी कर्तृत्व असूनही त्यांना नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद कधीही मिळू शकले नाही. आज तर त्यांच्याबाबत `नाही चिरा नाही पणती' अशी अवस्था आहे.
हिराबाई पेडणेकर यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८६ साली सावंतवाडीमध्ये झाला. त्यांचा जन्म संगीत, नृत्याची जाण असणाऱ्या घराण्यामध्ये झाला असे मोघम त्यांच्याबद्दल लिहून ठेवले गेले असले तरी त्यांचा `नायकीण' असा अगदी स्पष्ट शब्दांत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेला आहे. याच ग्रंथात कोल्हटकरांनी पुढे हिराबाईंचा उल्लेख हिराबाई जोगळेकर (कारण बाईंचा किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीचे मालक-नट नानासाहेब जोगळेकरांशी स्नेह होता) असाही केला आहे. हा कोल्हटकरांचा कुत्सितपणा आहे. हिराबाई पेडणेकर या गोव्यातील गोमंतक मराठा समाजाच्या. गोवा, सिंधुदूर्ग, कारवार परिसरातील अनेक मोठ्या देवळांच्या परिसरात कलावंत, देवळी, भावीण, पेरणी, बांदे, फर्जंद, चेडवा अशा देवळात सेवा देणाऱ्या पोटजातींच्या समूहाला ‘देवदासी’ असं नाव मिळालं. या समाजातही स्त्रियांना देवाला वाहण्याचा सेषविधी होता. पण तो प्रत्येक बाईला बांधील नव्हता. या समाजात नृत्य, संगीतात मुली वाकबगार असत. या देवदासी समाजातील सर्व पोटजातींमध्ये ऐक्य घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून या समाजाचे नाव नाईक मराठा समाज आणि शेवटी गोमंतक मराठा समाज ठरलं. हिराबाई पेडणेकर हा सगळा वारसा घेऊन जन्मला, त्यातूनच त्यांच्या ठायी असलेल्या लेखन व इतर ललित कलांना प्रेरणा मिळाली. हिराबाई वारांगना नव्हत्या. त्या फक्त बैठकीच्या गाणेच करायच्या.
मुंबईतील मिशन स्कूलमध्ये त्या शिकल्या. हिराबाईंचे शिक्षण अवघे सातवीपर्यंतच झालेले. मुंबई विद्यापीठाला ‘राजाबाई टॉवर’ बांधून देणाऱ्या धनिक प्रेमचंद रायचंद यांच्या घरात त्या वाढल्या, त्या मावशी भीमाबाईमुळे. मावशीनं या भाचीला मुंबईत आणून शिक्षण दिलं. प्रख्यात डॉक्टर विठ्ठल प्रभू यांनी काही वर्षांपूर्वी अशी आठवण लिहून ठेवली आहे की, `समीक्षक प्रा. वि. ह. कुळकर्णी म्हणजे अण्णांबरोबर कधीकधी आम्ही भ्रमंतीला जात असू. राणीचा बाग, वरळी चौपाटी किंवा गिरगावात भटकून येत असू. त्यावेळी शांतारामाची चाळ, जगन्नाथाची चाळ, टिळकांच्या सभेची जागा, ग. त्र्यं. माडखोलकरांचे घर, हिराबाई पेडणेकरांचे घर, सर्व काही अण्णा दाखवायचे.' हिराबाई या गिरगाव इथल्या गांजावाला चाळीत राहात होत्या. याच गांजावाला चाळीचा जिना न. चिं. केळकर, चिंतामणराव वैद्य, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, वि. सी. गुर्जर, रेंदाळकर, बालकवी ठोंबरे, मामा वरेरकर हे चढले ते हिराबाईंचे गाणे ऐकायला तेही श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या आग्रहामुळेच. हिराबाईंना मराठी व संस्कृत उत्तमरित्या येत होते. त्याशिवाय हिंदी, बंगाली, इंग्लिश या भाषांचा काही अभ्यास त्यांनी केला होता. त्या उत्तम कविताही करीत असत. मनोरंजन आणि उद्यान या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्यांनी “माझे आत्मचरित्र” नावाची जी लघुकथा लिहिली होती त्यामुळे त्यांचा अधिक बोलबाला झाला. हिराबाईंनी गाण्याचे अधिक शिक्षण पं. भास्करबुवा बखले यांच्याकडून घेतले. १९०१ साल असेल. भास्करबुवा बखले यांना त्यांच्या काही गानपटु शिष्यांचे गाणे ऐकविण्याची विनंती श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केली होती. त्यानूसार ते किर्लोस्कर मंडळीचे प्रसिद्ध नट चिंतोबा गुरव यांच्यासोबत काही जणींकडे गाणे ऐकायला गेले. त्यातील एका १८-२० वर्षांच्या मुलीचे गाणे कोल्हटकरांना विशेष भावले. त्या होत्या हिराबाई पेडणेकर. त्यानंतर एक वर्षाने कोल्हटकर हे किर्लोस्कर कंपनीच्या बिऱ्हाडी गेले असताना गोविंदराव देवल यांनी त्यांच्या हातात एक पुस्तक ठेवले व ते म्हणाले ` हे नाटक एका सुशिक्षित नायकिणीने लिहिले आहे.' या नाटकातील पदांची रचना देवलांच्या धर्तीवर केलेली होती. कोल्हटकर यांनी हिराबाईंच्या घरी जाऊन त्यांच्याकडून ही पदे प्रत्यक्षात ऐकली व प्रभावित झाले. पण तरीही नाटकातील ही पदे हिराबाईंनीच लिहिली आहेत का? ही शंका कोल्हटकरांना आलीच. ही मनातली खुणगाठ ओळखून हिराबाई त्यांना म्हणाल्या की, `मला लिहिण्यावाचण्याचा नाद असल्याचे आपणांस आश्चर्य वाटेल. पण माझ्यासारख्या कितीतरी नायकिणी तो नाद असलेल्या आपणांस सापडतील.' १९०० ते १९११ दरम्यान हिराबाई किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीचे मालक-नट नानासाहेब जोगळेकरांसोबत त्या राहात होत्या. पुढे हिराबाईंचा कोल्हटकरांशी चांगला स्नेह जमला. त्या काही वर्षे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांबरोबर खामगाव येथे जाऊन राहिल्याही होत्या.
बालकवी ठोंबरे यांच्याशी झालेल्या परिचयामुळे हिराबाईंच्या काव्यस्फुर्तीला अधिक ऊर्जा मिळाली. तसेच हिराबाईंतील कलागुणांनी बालकवींच्याही प्रतिभेला बहर आला. `तू सुंदर चाफेकळी । धमक ग पिवळी, किती कांति तुझी कोवळी। तू नंदनवनीची चुकून अप्सरा आलिस या भूतळी ॥' असा प्रारंभ असलेली ही `चाफेकळी' कविता बालकवी यांनी हिराबाई पेडणेकरांवरच केली होती असे म्हटले जाते. राम गणेश गडकरी यांनीही हिराबाईंवर एक कविता केल्याचे उल्लेख आहेत. मात्र ती कविता नेमकी कोणती असावी याविषयी थांग लागत नाही. या दोन गोष्टींचे कोडे संशोधनाद्वारे सोडविणे गरजेचे आहे. या साऱ्या प्रतिभावंतांचा सहवास लाभलेल्या हिराबाई पेडणेकरांमधील नाटककारही स्वस्थ बसलेला नव्हता. हिराबाई पेडणेकरांनी लिहिलेल्या नाटकांपैकी जयद्रथ विडंबन (१९०४) व संगीत दामिनी (१९१२) या नाटकांचा विशेष बोलबाला झाला. एका पौराणिक कथानकाच्या आधारे त्यांनी जयद्रथ विडंबन हे नाटक लिहिले होते व त्यावर देवल शैलीच्या नाट्यलेखनाचा प्रभाव होता. ते नाटक व नाटकातील पदांचे नाट्यक्षेत्रातील त्यावेळच्या मान्यवरांकडून कौतुक झाल्याने एक मोठे स्वतंत्र नाटक लिहावे असे हिराबाईंच्या मनाने घेतले ते म्हणजे संगीत दामिनी. हिराबाईंनी लिहिलेले संगीत दामिनी हे नाटक कोणतीही नाटक कंपनी करण्यास तयार होईना. कारण कनिष्ठ कुलीन लेखिकेचे नाटक रंगमंचावर कसे आणावे असा प्रश्न त्यावेळच्या प्रस्थापित नाटकमंडळींना पडलेला! शेवटी ही गोष्ट मामा वरेरकरांच्या कानी गेली. त्यांनी `ललितकलादर्श' या नाटकमंडळीचे चालक व प्रखर अभिनेते केशवराव भोसले यांना हे नाटक करण्याविषयी गळ घातली. ती भोसले यांनी मान्य केली. हिराबाई कोणत्या कुळातल्या आहेत हे न पाहाता त्यांचे नाटक करण्याचा निर्णय घेऊन केशवराव भोसले यांनी आपले पुरोगामित्व कोणताही गाजावाजा न करता सिद्ध केले. अशाप्रकारे हिराबाई यांचे नाव महिला नाटककार म्हणून मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरले गेले. या नाटकाचे पुस्तक १ ऑक्टोबर १९१२ रोजी प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हिराबाई पेडणेकरांनी म्हटले आहे, `चांगल्या विद्वान नाटककारांच्या सुंदर नाट्यकृती रंगभूमीवर यावयाला किती अडचणी येतात, याविषयी काही माहिती व थोडा अनुभव असल्यामुळे मजसारख्या अशिक्षित स्त्रीची ही सामान्य कृती कशी रंगभूमीवर येते, याबद्दल मला फार काळजी वाटत होती. परंतू केशवराव भोसले यांनी हे नाटक रंगभूमीवर आणून ठिकठिकाणी त्याचे कळकळीने प्रयोग केले. या त्यांच्या धैर्याबद्दल व स्त्रीशिक्षणाविषयीच्या आस्थेबद्दल त्यांचे मी कितीही आभार मानिले तरी ते थोडेच होणार आहे.' हिराबाईंना समाजाकडून कोणती अहवेलना सहन करावी लागली असेल हे त्यांच्या या शब्दांतून समोर येतेच.
स्त्री शिक्षणाविषयी हिराबाईंना विलक्षण कळकळ होती. संगीत दामिनीमध्ये त्यांच्या या विचारांचे प्रतिबिंब दिसते. या नाटकात एकुण बहात्तर पदे आहेत हेही एक वैशिष्ट्य. हिराबाई पेडणेकरांनी लिहिलेली कवी जयदेवाची पत्नी, मीराबाई ही नाटके मात्र तेवढीशी गाजली नाहीत. हिराबाईंचा तत्कालीन नाट्यधर्मींवर एवढा प्रभाव होता की, कोल्हटकर, गडकरी, नाट्याचार्य खाडिलकर, केशवराव भोसले, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे यांना सुरेल चाली दिल्या. तर गडकरी, वि. सी. गुर्जर, बालकवी, लेले, रेंदाळकर, वरेरकर यांना हिराबाईंनी काव्यानंद दिला. नटवर्य गणपतराव बोडस यांनीही आपल्या पुस्तकात हिराबाईंविषयी याच साऱ्या आठ‌वणी लिहिल्या आहेत.
हिराबाई पेडणेकर हा मराठी नाट्यसृष्टीतील असा अविष्कार होता की जो काही काळच तेजाने तळपला व नंतर प्रसिद्धीच्या झोतापासून इतका दूर गेला की, त्यांची आठवणही खूप कमी लोकांनी राखली. नानासाहेब जोगळेकर यांच्या निधनानंतर तसेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याबरोबरच्या सहवासानंतर हिराबाईंनी कौटुंबिक, स्थैर्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील पालशेत गावच्या कृष्णाजी नारायण नेने या गृहस्थांशी घरोबा केला. कृष्णाजी नेने यांची हिराबाईंशी पहिल्यांदा ओळख १९१५ साली झाली. हिराबाई यांनी आधी `नायकिण' या अर्थाने जे आयुष्य व्यतित केले होते अशी नेने यांची जी समजूत होती त्या आयुष्याची सावली नेने यांना नको होती. त्यामुळे मागचे सर्व आयुष्य त्यागून एक साध्या राहणीची स्त्री म्हणून हिराबाईंनी आपल्याबरोबर आयुष्य व्यतित करावे अशी नेने यांनी बोलून दाखविलेली इच्छा हिराबाईंनीही मानली. नेने यांच्याबरोबर त्या सुमारे ३६ वर्षे पालशेत येथे राहात होत्या. त्यांचे गाणे, नाटक हा सर्व विसरलेला भूतकाळ झाला होता त्यांच्यासाठी. त्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत पालशेत येथेच राहात होत्या. कर्करोगाने त्यांचे पालशेत येथेच १८ ऑक्टोबर १९५१ रोजी निधन झाले. हिराबाईंच्या नंतर अकरा वर्षांनी ११ ऑक्टोबर १९६२ रोजी कृष्णाजी नेने यांचेही पालशेत येथेच निधन झाले. हिराबाई पेडणेकरांच्या आयुष्यातील घटनांनी प्रेरित होऊन वसंत कानेटकरांनी कस्तुरीमृग हे नाटक लिहिले. त्यात अंजनी ही नायिका हिराबाईंचे प्रत्यक्ष रुप आहे. ग. त्र्यं. माडखोलकरांनी व्यक्तिरेखा या आपल्या पुस्तकामध्ये हिराबाईंचे समग्र आयुष्य प्रत्ययकारी शब्दांत रेखाटले आहे. डॉ. विठ्ठल प्रभू यांनी आपल्या आठवणी लिहिताना म्हटले आहे की, `समीक्षक वि. ह. कुलकर्णी म्हणजे, अण्णा यांच्याकडे एकदा अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे नातेवाईक आले होते. त्यांनी अण्णांना हिराबाई पेडणेकर व नेने यांचे एक छायाचित्र दिले. मी अण्णांना भेटायला आठवड्यातून एकदोनदा जात असे. एका भेटीत अण्णांनी मला ते छायाचित्र दिले. हिराबाई पेडणेकर या महत्वाच्या स्त्री नाटककार. ज्या ज्या प्रतिष्ठित लेखकांकडे त्या आपल्या नाटकाच्या प्रयोजनासाठी गेल्या त्यांनी हिराबाईना मदत करणे सोडा, पण त्यांच्या स्त्रीत्वाचा फायदा मात्र घेतला. अखेरच्या पर्वात त्या कृष्णाजी नेने नावाच्या गृहस्थांकडे राहिल्या. हिराबाईंचा वि. ह. कुलकर्णी यांना मिळालेला व त्यांनी मला दिलेले ते छायाचित्र म्हणजे महाराष्ट्रातील नाट्यसृष्टीचा एक दस्तावेज होता. मी बराच काळ ते छायाचित्र सांभाळून ठेवले. तो योग्य ठिकाणी पोचवावा असे माझ्या मनात आले. पण तो कुठे पाठवायचा हे मला माहित नव्हते. एका कार्यक्रमासाठी आकाशवाणीवर गेलो असता रवींद्र पिंगे यांच्याकडे ते छायाचित्र दिले. `पिंगे, या छायाचित्राला ऐतिहासिक महत्व आहे. तो तुम्ही योग्य ठिकाणी पाठवा,' असे सांगून त्यांच्या हवाली केला. पुढे त्या छायाचित्राचे काय झाले, ते कुठे गेले हे काही कळले नाही.'
हिराबाई पेडणेकरांच्या मृत्यूनंतर काही जणांनी पुस्तक लिहून किंवा लेख लिहून त्यांची आठवण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला; पण ते प्रयत्न क्षीण स्वरुपाचेच होते. हिराबाई पेडणेकर हयात असताना त्यांना पदोपदी उपेक्षाच सहन करावी लागली. मरणानंतरही ही उपेक्षा कायम राहिली. परंपरेने जखडलेल्या मराठी नाट्यसृष्टीरुपी मृगालाही आपल्यातल्या हिराबाई पेडणेकर नामक कस्तूरीचा कधी थांग लागला नाही...
------
हा लेख लिहिण्यासाठी वापरलेले संदर्भ -
(१) कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे आत्मवृत्त - प्रकाशक ह. वि. मोटे, प्रकाशनवर्ष - १ जून १९३५
(२) कोल्हटकर आणि हिराबाई - लेखक - प्रा. म. ल. वऱ्हाडपांडे, प्रकाशक - साहित्य सहकार प्रकाशन, प्रकाशनवर्ष - १९६९
(३) व्यक्तिरेखा - लेखक - ग. त्र्यं. माडखोलकर, नागपूर प्रकाशन, प्रकाशनवर्ष - १९४३
(४) अप्रकाशित गडकरी - प्रकाशक - ह. वि. मोटे या पुस्तकातील रोजनिशीतील पाने या भागात पान ९४ वरील २२ मे १९१६ या दिवसातील घडामोडींची राम गणेश गडकरींनी हिराबाईंबद्दल केलेली नोंद.
(५) माझी भूमिका - लेखक - गणपतराव बोडस
(६) गोमांत सौदामिनी - लेखिका - माधवी देसाई.
(७) बहुरुपी - लेखक - चिंतामणराव कोल्हटकर
(८) स्त्री नाटककारांची नाटके - लेखिका - डॉ. मधुरा कोरान्ने
(९) कहाणी कलावतीची, विराणी वारांगनेची - लेखक - कमलाकर नाडकर्णी - अनुराधा दिवाळी- २०००.
(१०) पुरुषार्थ - लेखक - पत्रकार वामन राधाकृष्ण
(११) `इंडियाज् फर्स्ट डेमोक्रॅटिक रेवोल्यूशन` - लेखक - प्रा. पराग परब
(१२) मैत्री २०१२ या ब्लॉगवरील `प्रा. वि. ह. कुळकर्णी : मिष्किल व रसिक आनंदयात्री' हा लेख - लेखक - डॉ. विठ्ठल प्रभू.
विशेष आभार- प्रा. श्रीपाद जोशी, प्रा. विजय तापस, डॉ. विठ्ठल प्रभू, नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी.
(13) या लेखासाठी संदर्भग्रंथ उपलब्ध करुन देणारी ग्रंथालये - (अ) दादर सार्वजनिक वाचनालय, दादर पश्चिम, मुंबई - हे वाचनालय व त्या वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक यांचे मनापासून आभार.
(ब) लोकमान्य सेवा संघाचे श्री. वा. फाटक वाचनालय, विलेपार्ले पूर्व, मुंबई - हे वाचनालय व त्या वाचनालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांचे मनापासून आभार.

Wednesday, April 19, 2017

`लिळा पुस्तकांच्या' जोडणार मराठीतील `बुक ऑन बुक्स'चा धागा...दै. दिव्य मराठी दि. १९ एप्रिल २०१७




दै. दिव्य मराठीच्या दि. १९ एप्रिल २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली मी केलेली बातमी.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/19042017/0/7/
---
`लिळा पुस्तकांच्या' जोडणार मराठीतील `बुक ऑन बुक्स'चा धागा...
प्रा. नितिन रिंढे लिखित पुस्तक होणार लोकवाङ‌्मय गृहातर्फे लवकरच प्रसिद्ध
---
- समीर परांजपे
---
मुंबई, िद. १८ एप्रिल - मराठी साहित्यात `बुक ऑन बुक्स' म्हणजे `पुस्तकांवरील पुस्तक' अशा प्रकारची पुस्तके फारशी लिहिली जात नाहीत. ही प्रथा मोडीत काढणारे एक आगळे पुस्तक लोकवाडमय गृहाच्यावतीने लवकरच प्रसिद्ध होत आहे. `लिळा पुस्तकांच्या' असे या पुस्तकाचे नाव असून ते प्रख्यात समीक्षक व प्रा. नितीन रिंढे यांनी लिहिले आहे. मराठी साहित्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारचे पुस्तक बऱ्याच कालावधीनंतर प्रसिद्ध होत आहे.
या पुस्तकाच्या अंतरंगाबद्दल बोलताना प्रा. नितीन रिंढे यांनी सांगितले की, माझ्या या पुस्तकामध्ये काही अमेरिकन तसेच युरोपियन पुस्तकांबद्दल मी लिहिले आहे. बुक ऑन बुक शेल्फ हे इंग्रजी पुस्तक बुक शेल्फचा इतिहास सांगणारे आहे. त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ मिडनाईट लायब्ररी या पुस्तकात ग्रंथालयांशी संबंधित गमतीदार घटना आहेत तसेच खाजगी व सार्वजनिक ग्रंथालयांचे किस्से आहेत. हिटलर्स लायब्ररी नावाचे एक पुस्तक माझ्या वाचनात आले होते. हिटलरने जमविलेल्या पुस्तकांच्या आधारे हिटलरचे चरित्र या पुस्तकात रेखाटले आहे. पुस्तकांबाबत ड्युमाज क्लब सारख्या कादंबऱ्याही इंग्रजीत प्रसिद्ध होतात. त्यापैकी काही कादंबऱ्यांबद्दलही `लिळा पुस्तकांच्या'मध्ये मी लिहिले आहे. पुस्तकांच्या संदर्भात लिहिलेल्या पुस्तकांची संख्या युरोप, अमेरिकेत मोठी आहे. फ्रेंच, जर्मन,इंग्लिश भाषेत `बुक आॅन बुक्स' प्रकारातील पुस्तकांच्या संख्या मोठी आहे. त्यातील निवडक ९० पुस्तकांची वैशिष्ट्ये उलगडून दाखविणारे २३ लेख `लिळा पुस्तकांच्या'मध्ये आहेत.
प्रा. नितिन रिंढे यांनी सांगितले की, `बुक ऑन बुक्स' या प्रकारच्या पुस्तकांमध्ये पुस्तकांबद्दलच्या आठवणी असतात. दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह करणारे, पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा इतिहास, लेखकांबद्दलच्या आठवणी, लेखकाच्या घरातील पुस्तकांबद्दल केलेले लेखन, पुस्तकाची छपाई, त्यातील चित्रे, छायाचित्रे, रेखाटने, कागदाचा दर्जा याबद्दलच्या वाचकांच्या आठवणी, पुस्तकांच्या निर्मितीमागील इतिहास, पुस्तकांनी घडविलेला इतिहास, पुस्तकांचा परिचय करुन देणारी पुस्तके अशा पुस्तकांचा `बुक ऑन बुक्स' या प्रकारात समावेश होतो.
--
मराठीतील `बुक ऑन बुक्स'
मराठी साहित्यामध्ये डॉ. अरुण टिकेकरांचे अक्षरनिष्ठांची मांदियाळी हे गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेले `बुक आॅन बुक्स' प्रकारातील अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे. त्यानंतर महत्वाचे ठरावे असे नितिन रिंढेंचे `लिळा पुस्तकाच्या' हे पुस्तक असेल. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी पुस्तकांचा परिचय करुन देणारी लिहिलेली पुस्तके, अ. का. प्रियोळकर लिखित प्रिय-अप्रिय, श्री. बा. जोशी यांनी लिहिलेली संकलन, गंगाजळी, उत्तम-मध्यम ही तीन पुस्तके, स. ग. मालशे यांचे आवड-निवड, अविनाश सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेले दुर्मिळ अक्षरधन अशी `बुक ऑन बुक्स' प्रकारातील मराठी पुस्तके उपलब्ध आहेत. या प्रकारातील पुस्तकांची संख्या वाढली तर वाचकांना पुस्तकांबद्दल रोचक माहिती मिळणे अधिक सुलभ होईल. इंटरनेटवर कोणत्याही पुस्तकाची माहिती एका क्लिकवर मिळत असली तरी त्या पुस्तकांबाबत पडद्यामागे वा लेखकाच्या स्तरावर घडलेल्या घटनांचा तपशील फारसा मिळत नाही. तो अशा पुस्तकांच्या माध्यमातूनच अधिक मिळू शकतो.

Sunday, April 16, 2017

माणुसकीच्या शत्रूसंगे - डॉ. भरत केळकर - लेखाचे शब्दांकन - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी, दि. १६ एप्रिल २०१७



दै. दिव्य मराठीच्या दि. १६ एप्रिल २०१७च्या अंकातील रसिक पुरवणीत नाशिकचे प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. धनंजय केळकर यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. सिरिया, येमेन या देशांत युद्धभूमीवरील निर्वासित छावण्यांत, रुग्णालयांत माणुसकीच्या नात्याने एक महिना राहून तेथील रुग्णांना उपचार देण्याचे कार्य डॉ. केळकर यांनी पार पाडले. त्या अनुभवांवर आधारित हा लेख असून त्याचे शब्दांकन मी केले आहे. त्या लेखाची टेक्स्ट लिंक, वेबपेज लिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-bharat-kelkar-rasik-article-5575771-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/16042017/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/16042017/0/3/
--
डॉ. भरत केळकर हे ‘डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी कार्य करणारे भारतातील काही मोजक्या डॉक्टरांपैकी एक आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी त्यांनी सििरया आणि गेल्या वर्षी येमेनच्या सीमेवर जाऊन युद्धग्रस्तांची सेवा केली होती. हिंसेने पोळलेल्या माणसांच्या आयुष्याला नव्याने अर्थ देण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. केळकरांनी मांडलेले हे विदारक अनुभव...
-----
माणुसकीच्या शत्रूसंगे
---
- डॉ. भरत केळकर
--
अस्थिरोग तज्ज्ञ, नाशिक
---
लेखाचे शब्दांकन - समीर परांजपे
----
तसा मी हाडांचा डॉक्टर... वेदनांना सामोरं जाणं मला नवीन नाही, परंतु ‘रामथा’पासून जवळच असलेल्या झतारी या गावात उभारलेल्या रुग्णालयात त्या दिवशी जे काही माझ्या समोर घडलं ते खूपच अस्वस्थ, बेचैन करणारं आणि हादरवणारं होतं...
भूसुरुंगाच्या स्फोटात जखमी झालेली दोन कोवळी मुलं... एक पाच तर त्याचाच मोठा भाऊ सात वर्षांचा... भूसुरुंगावर पाय पडल्याने अचानक मोठा स्फोट झाला आणि बॉम्बचे शार्पनेल त्यांच्या सबंध शरीरात घुसले होते. अंगावर जागोजागी भाजल्याच्या जखमा झाल्या होत्या. छोट्याचे दोन्हा पाय व उजव्या हाताचा पंजा पार निकामी झाला होता. मात्र त्याचे प्राण वाचवण्यासाठी दोन्ही पाय व हाताचा पंजा कापून काढण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. काही तासांपूर्वी स्वत:च्या पायावर उड्या मारू शकणाऱ्या या गोबऱ्या गालाच्या निरागस कोवळ्याचे दोन्ही पाय मी कापून टाकले होते. वैद्यकीय क्षेत्रातल्या इतक्यावर्षांच्या अनुभवात पहिल्यांदाच मला भडभडून आलं...
वॉर वुंडेड पेशंट्सचे (युद्धात जखमी झालेले रुग्ण) एक भयावह रूप मी पहिल्यांदाच पाहात होतो.
*********
रामथा हे जॉर्डनच्या सीमेवरील एक छोटंसं गाव. सीरियाची सीमा तेथून अक्षरश: पाच ते सात किलोमीटरवर आहे. याच सीमेवरच्या झतारी या गावात यादवीने होरपळलेल्या सिरियातल्या निर्वासितांची छावणी आहे आणि म्हणूनच ‘डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स’ या संस्थेने म्हणजे मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्स - एमएसएफने युद्धात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी येथे एक रुग्णालय उभारले आहे. ही संस्था आज जगभरातल्या जवळपास ७० देशांमध्ये रुग्णसेवेचं काम करते. यातले काही देश युद्ध किंवा यादवीने होरपळलेले आहेत, तर काही देशांमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घातलेलं आहे. या संस्थेला १९९९मध्ये शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. अलिप्तता अन् मौन सोडून प्रत्यक्ष संकटस्थळी धावून जाण्याचा थेटपणा हे या संस्थेचं वैशिष्ट्य. या हाकेला साद देऊन जगभरातले असंख्य डॉक्टर्स ‘एमएसएफ’कडे अर्ज करतात आणि त्यापैकीच मी एक डॉक्टर...
*********
जॉर्डनमधून मी महिनाभराने भारतात परत आलो तरी त्या मुलाची सध्याची अवस्था काय आहे, याकडे माझे लक्ष होतेच. त्या मुलाला कृत्रिम पाय लावून फिजियोथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली चालण्याचे प्रशिक्षण देण्यात असल्याचा एक व्हिडिअो जॉर्डनमधील रामथा गावच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी मला नंतर पाठविला. तो पाहून मनाला समाधान वाटले. या दोन्ही मुलांना ज्या माणसाने सिरियाची हद्द ओलांडून रामथा रुग्णालयात आणले होते, तो खरे तर त्यांचा शेजारी होता. या दोन मुलांची आई गर्भवती होती. मुलांचे वडील बॉम्बहल्ल्यात जखमी झाल्याने सिरियातील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे या दोन मुलांना उपचारांसाठी कोणीतरी रुग्णालयात नेणे गरजेचे होते. ते काम या शेजाऱ्याने केले. प्रथम तो आम्हाला मीच या मुलांचा पिता आहे, असे सांगत होता. मग मात्र त्याने आपण या मुलांचे शेजारी आहोत, असे खरे सांगून टाकले. मानवतेचा झरा सीमा ओलांडूनही कसा वाहता राहतो, याचे दर्शनच मला या अनुभवातून घडले.
*********
सिरियाच्या यादवीमध्ये बॅरल बॉम्बचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. समजा, हा बॉम्ब पडलेल्या घरामध्ये सात-आठ जणांचे कुटुंब राहात असेल तर त्यातील दोघे-तिघे जण जागीच ठार झालेले असायचे. त्यातील बाकीच्या चार-पाच सदस्यांपैकी जो अितशय गंभीर जखमी असेल त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाही प्रकृती ढासळत जायची व शेवटी तो मरण पावायचा. जे उरलेले जखमी असायचे त्यांचे अवयव या बॉम्बहल्ल्यात निकामी झालेले असायचे. त्यामुळे कायमचे अपंगत्व येणे हे ठरलेलेच. एकदा बॉम्बस्फोटामध्ये एक कुटुंबच रुग्णालयात उपचारांसाठी आले.
बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यांच्या कुटुंबातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या कुटुंबातील जे जखमी रुग्णालयापर्यंत येऊन पोहोचले त्यापैकी दोघांनी तिथे प्राण सोडले. कुटुंबातील तीन व्यक्ती वाचल्या. त्यात एक महिला दोन तरुण होते. त्यांच्या जखमा कालांतराने बऱ्या झाल्या असतील; पण मनावर उमटलेल्या जखमा कधी भरून निघाल्या असतील का? असा प्रश्नही मला पडला होता.
*********
जॉर्डनमध्ये रामथाच्या आमच्या रुग्णालयापासून झतारी येथे सिरियातील निर्वासितांसाठी एक प्रचंड छावणी उभारलेली होती. झतारीच्या छावणीत मी आठवड्यातून दोनदा जात असे. कोणत्याही निर्वासित छावणीचे दृश्य डोळ्यासमोर आणले तर सर्वप्रथम नजरेत भरते ती तेथील अस्वच्छता. पण झतारीच्या छावणीत अगदी वेगळे दृश्य होते. तिथे दृष्ट लागावी अशी स्वच्छता राखण्यात आलेली होती. तेथील एक अनुभव माझ्या मनावर कोरला गेला आहे. या छावणीतील एका आइसक्रीमच्या दुकानापाशी गेलो. आइसक्रीम खरेदी केल्यानंतर त्या दुकानदाराला पैसे देऊ लागलो तर तो ते घेईना. एमएसएफ या संस्थेचा लोगो असलेला टीशर्ट त्या वेळी मी घातला होता. त्यावरून मी सेवाकार्यासाठी तिथे आलेला डॉक्टर आहे, हे त्या दुकानदाराने ओळखले होते. तो अतिशय कृतज्ञभावाने माझ्याकडे बघत होता. मी त्याला विनंती केली की, माझ्या सोबत एक छायाचित्र काढाल का? तर तो चक्क नाही म्हणाला. याचे कारण असे होते की, त्या माणसाचा मूळ व्यवसाय हा काही आइसक्रीम विकण्याचा नव्हता. तो मुळातला एक बडा व्यावसायिक. पण सिरियातील यादवीमुळे तेथील ज्या अनेक संपन्न लोकांनाही विपन्नावस्था अाली, त्यापैकी तोही एक होता. माझ्या बरोबर काढलेला फोटो जर त्याच्या ओळखीच्या लोकांनी बघितला असता त्यांना कळले असते की, हा आता आइसक्रीम विकतो तर त्याला इभ्रतीच्या दृष्टीने ते अयोग्य झाले असते.
*********
सिरियाच्या अनुभवानंतर माझ्या गाठीशी अनुभव जमा झाला तो येमेन या देशाचा. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात येमेनमध्ये एक महिनाभरासाठी दाखल झालो. सिरियापेक्षा येमेन हा देश फारच गरीब. मी तिथे गेलो त्याच्या एक वर्ष आधीच भारत सरकारने ‘ऑपरेशन राहत’ ही मोहीम राबवून येमेनमधील ४५०० भारतीयांना सुखरूप भारतात आणले होते. येमेनमध्ये सुरू असलेल्या यादवीत तेथील स्थानिक नागरिक सापडले आहेत. चहुबाजूंनी त्यांची कोंडी झाली आहे. सेवाकार्यासाठी पहिल्यांदा येमेनच्या भूमीवर पाऊल ठेवले, ते साना येथील विमानतळाच्या ठिकाणी. बाॅम्बहल्ल्यामध्ये साना विमानतळाचे अतिशय नुकसान झालेले आहे. येमेनमध्ये बंडखोरांच्या ताब्यात जो प्रदेश आहे, त्यात सानाही येते. सानापासून काही तास अंतरावर असलेल्या तैझ गावामध्ये एमएसएफने एक रुग्णालय उभारले होते. तिथे पोहोचलो. एकदा रुग्णालयात प्रवेश केला, तो सुरक्षिततेच्या कारणांमुळे महिनाभर तिथे आतमध्येच होतो. रुग्णालयाचे प्रवेशद्वार उघडून बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण बंडखोरांचे वर्चस्व असलेल्या भागातच ते रुग्णालय होते. म्हणजे एकदम युद्धजन्य भागातच. त्यामुळे दिवसा रात्री बॉम्बस्फोट यांचे आवाज यायचे. त्या आवाजाची नंतर सवय होऊन गेली. तिथे बहुतेक लोकांकडे एके४७ रायफली ग्रेनेड बेल्ट असायचे. ते रुग्णालयात आले तरी ही शस्त्रसामुग्री बाहेरच्या खोलीत ठेवून मगच ते डॉक्टरकडे यायचे. बॉम्बहल्ल्यात, भूसुरुंगाच्या स्फोटात जखमी झालेले असंख्य रुग्ण तैझच्या रुग्णालयांतही यायचे. येमेनमध्ये अगदी लहान मुलेही शस्त्रे बाळगतच फिरायची. ट्रकसारखी अवजड वाहने चालवितानाही मुले पाहायला मिळाले. तैझमध्ये यादवीमुळे वैद्यकीय सेवा तसेच अन्नधान्य पुरवठा अशा सगळ्याच बाबी कोलमडून पडलेल्या होत्या. अन्न पाण्यासकट सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. याचा सर्वाधिक वाईट परिणाम कोणावर होत असेल तर तो गरोदर महिला लहान मुलांवर. अनेक कुटुंबांना आपली घरेदारे सोडून जाण्यासाठी बळजबरी करण्यात आली. त्यामुळे घराचे छप्पर नसलेले असंख्य लोक आता येमेनमध्ये खूप हालाखीचे जिणे जगताना दिसतात. युद्धाच्या खाईत ढकललेल्या देशांमध्ये केवळ वास्तूच बेचिराख होतात असे नाही तर माणसेही सर्वार्थाने उद्ध्वस्त होतात, याचे जवळून दर्शन मला सिरिया येमेन अशा दोन्ही ठिकाणी झाले.
*********
माझ्या रामथा आणि येमेनमधील वास्तव्याच्या काळात मी रोज किमान सात ते आठ शस्त्रक्रिया करायचो. गोळ्या किंवा भूसुरुंगामुळे जखमी रुग्ण आला नाही, असा जवळजवळ एकही दिवस उगवला नाही. नाव, वय, लिंग वगळता जखमांचा तपशील तोच. भयानक रक्तस्राव आणि बाहेरून अंदाज येऊ नये एवढ्या तीव्र स्वरूपाच्या अस्ताव्यस्त जखमा.
- bkelkar@gmail.com