Thursday, March 27, 2014

प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या कर्तृत्वाचा आगळा परिचय ( दै. सामना २ मे २०००)

 लेखाचा मूळ भाग.


 लेखाचा उर्वरित भाग.



थंड गोळयाप्रमाणे पडलेल्या महाराष्ट्राला विचारांची ऊब देऊन त्यात चेतना निर्माण करणारे प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे यांची यंदा स्मृतिशताब्दी आहे. न्या. रानडेंचे शैक्षणिक, समाजकार्य प्रचंड विस्तारलेले होते. त्या विविधांगी कार्याची तपशीलवार ओळख करुन देणारे एक खास प्रदर्शन मुंबईतील पुराभिलेखागार कार्यालयाने ३ ते ८ मे २००० या कालावधीत आयोजिले होते. या प्रदर्शनात नेमके काय असणार आहे याची माहिती देणारी मी केलेली खास बातमी दैनिक सामनाच्या २ मे २००० रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. या बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.

प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या कर्तृत्वाचा आगळा परिचय
- समीर परांजपे
थंड गोळयाप्रमाणे पडलेल्या महाराष्ट्राला विचारांची ऊब देऊन त्यात चेतना निर्माण करणारे प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे यांची यंदा स्मृतिशताब्दी आहे. न्या. रानडेंचे शैक्षणिक, समाजकार्य प्रचंड विस्तारलेले होते. त्या विविधांगी कार्याची तपशीलवार ओळख करुन देणारे एक खास प्रदर्शन मुंबईतील पुराभिलेखागार कार्यालयाने ३ ते ८ मे २००० या कालावधीत आयोजिले होते.
न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८४२ साली झाला. याच सुमारास विद्यापीठ कायदा बनविण्याच्या हालचाली सुरु झालेल्या होत्या. त्याला अनुसरुनच मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ साली करण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे १८५९ साली घेण्यात आलेल्या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेत महादेव गोविंद रानडेंसह एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
पुराभिलेखागार कार्यालयाने फोर्ट येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या इमारतीत भरविलेल्या प्रदर्शनात न्या. रानडे यांच्या जीवनाशी संबंधित अनेक दुर्मिळ कागदपत्रे, विविध वृत्तपत्रांतील रानडे यांच्या संदर्भातील लेख असे बहुमोल साहित्य मांडलेले होते. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यार्थी अनेकदा पुस्तकांतील मजकुरावरच समाधान मानतात. पण इतिहासाच्या खर्या प्रेमींना न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या कार्याचे संपूर्ण दर्शन पुराभिलेखागाराच्या या प्रदर्शनातून झाले.
विद्यापीठाच्या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेत जे २२ जण उत्तीर्ण झाले होते त्यातील रानडे यांच्यासहित सर्व विद्यार्थ्यांची यादी ३१ आँक्टोबर १८५९ला विद्यापीठ रजिस्ट्रार आर. एस. सिनक्लेअरने प्रसिद्ध केली. त्याची मूळ प्रत या प्रदर्शनात मांडलेली होती. १८६२ला न्या. महादेव गोविंद रानडे हे बी.ए. व त्यानंतर एम. ए. झाले. या पदव्यांच्या प्रमाणपत्रांच्या नोंदीही या प्रदर्शनात होत्या. विद्यापीठ परीक्षेतील यशाबद्दल रानडे यांना त्यांच्या सहाध्यायांनी जे घड्याळ भेट दिले त्याच्या खरेदीचा पत्रव्यवहारही येथे पाहायला मिळाला.
न्या. रानडे यांची एल्फिन्स्टन महाविद्यालयाशी घनिष्ठ संबंध होता. याच महाविद्यालयात शिकत असताना रानडेंनी १८५९ साली महाराष्ट्राच्या इतिहासावर एक निबंध लिहिला होता. त्याची आवृत्तीही या प्रदर्शनात होती. दक्षिणा फेलो म्हणून रानडेंनी आपली विद्यार्थीदशा कशी व्यतित केली यासंदर्भातील १८६३ ते १८६५ सालचा रानडेंनीच सादर केलेला अहवालही येथे मांडलेला होता. त्यात त्यांनी आपण अभ्यासादरम्यान कोणती महत्त्वाची पुस्तके वाचली याचाही निर्देश केलेला आहे. हा अहवाल त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे तत्त्कालीन प्राचार्य के. एस. चॅटफिल्ड यांना सादर केलेला होता.
एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिष्यवृत्ती मिळणारे विद्यार्थी वर्गात अनुपस्थित राहिल्यास त्या प्रमाणात शिष्यवृत्तीतून रक्कम कापण्यात येई. त्याचा १८६० सालचा महाविद्यालयाचा अहवालही येथे होता. त्यात न्या. रानडेंचेही नाव आहे. एल्फिन्स्टनमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासदरीबाबतचा न्या. रानडे, बाळ मंगेश, रामचंद्र विष्णू या तिघांनी सादर केलेला अहवालही या प्रदर्शनात आहे. १८६८मध्ये न्या. रानडेंची एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये इंग्रजी भाषेचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून दरमहा ४२५ रुपयांवर नेमणूक झाली. त्याचा शिक्षण खात्याने काढलेला आदेशही या प्रदर्शनात पाहायला मिळतो. त्यानंतर एल्फिन्स्टन महाविद्यालयातच न्या. रानडे यांनी प्राध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याबाबत तत्कालीन प्राचार्यांनी १८६८ साली लिहिलेले एक पत्र इथे मांडलेले आहे. न्या. रानडेंनी कोल्हापूर-मुंबई असा एक दौरा केला होता त्याचाही तपशील आहे. एल्फिन्स्टन महाविद्यालयतील प्राध्यापकांच्या वेतन तसेच उपस्थिती संदर्भातील फेब्रुवारी ते आॅगस्ट १८६८ या कालावधीत संपूर्ण अहवाल उपलब्ध आहे. त्यातही न्या. रानडे यांचे नाव आहे.
न्या. राऩडे यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ज्या विविध जबाबदार्या सांभाळल्या त्याचे वेळोवेळी निघालेले आदेशही या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयात न्या. रानडे यांची १८९३ साली न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. या नेमणूकीसंदर्भातील ब्रिटिश शासनाची अधिसूचना, विधी खात्याच्या आदेशाची मूळ प्रत येथे पाहायला मिळत होती. १६ जानेवारी १९०१ रोजी न्या. रानडे यांचे निधन झाले. त्यावेळी विधी खात्याने शोक प्रकट करणारे जे परिपत्रक काढले त्याची मूळ प्रतही त्याशिवाय `टाइम्स', `पूना आँब्झर्व्हर' यांतील न्या. रानडेंवरील प्रशंसापर लेखही येथे मुळ रुपातच मांडण्यात आलेले होते.
१९४२मध्ये न्या. रानडे यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली होती. त्यावेळी `सह्याद्री' नियतकालिकाने न्या. रानडे यांच्यावर एक विशेषांक काढला होता. रानडेंच्या विविध पैलूंचा शोध घेणारे `सह्याद्री'मधील वि. श्री. जोशी, वामन मोरेश्वर पोतदार, ध. रा. गाडगीळ, न. चिं. केळकर, रा. श्री. जोग यांचे लेख या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

न्या. राऩडे यांच्यावर जी पुस्तके लिहिण्यात आली व रानडे यांची स्वत:ची काही पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात अाली होती.`१८५७ ते १९४७ - स्वातंत्र्यसमराचा काळ' अशी संकल्पना केंद्रीभूत धरुन पुराभिलेखागार विभागाने २००० सालच्या जानेवारीपासून काही प्रदर्शने भरविली होती. सुभाषचंद्र बोस यांच्यावरही एक प्रदर्शन या विभागाने आयोजित केले होते. अस्सल दुर्मिळ कागदपत्रांतून न्या. रानडे यांचे व्यक्तित्त्व उभे करणारे प्रदर्शन पुराभिलेखागार विभागाने एल्फिन्स्टन महाविद्यालयात ३ मे  ते ८ मे २००० या कालावधीपर्यंत आयोजिले होते. त्याचे उद्घाटन तत्कालीन सांस्कृतिक राज्यमंत्री डाँ. हिराणी यांच्या हस्ते ३ मे रोजी दुपारी १२.३० वाजता झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख ज. वि. नाईक व पत्रकार डाँ. अरुण टिकेकर हे उपस्थित होते. हे प्रदर्शन रोज १०.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत जनतेसाठी खुले होते. हे प्रदर्शन आयोजित करण्यात पुराभिलेखागार विभागाचे तत्कालीन संचालक डाँ. महेश शुक्ला व अभिलेखाधिकारी अशोक खराडे यांचा सिंहाचा वाटा होता.

1 comment:

  1. मी,श्री. गोविंदराव तळवलकरांचे "विराट ज्ञानी" म्हणून पुस्तक आहे - खर तर ग्रंथ आहे, तो वाचल्याचे आठवले. खरतर रानड्यांबद्दल अजूनही आपल्या समाजात फारसे काहीही माहिती नाही. महाराष्ट्र आणि त्याचे पुनरुथ्थान म्हटले की लगेच फुले, शाहू महाराज आणि आंबेडकर, या त्रयीवरच सगळे थांबते!!

    ReplyDelete