Tuesday, October 31, 2017

कमलाबाई गोखले ते विक्रम गोखले या तीन पिढ्यांनी जपलाय समाजकार्याचा `वसा' - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी ३१ आँक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या ३१ आँक्टोबर २०१७च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/beed/251/311…/0/5/
----
कमलाबाई गोखले ते विक्रम गोखले या तीन पिढ्यांनी जपलाय समाजकार्याचा `वसा'
- महाराष्ट्राच्या अभिनयक्षेत्रातील एक आगळी घटना
विक्रम गोखले यांनी सोमवारी वाढदिवसाच्या दिवशी दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपये
- समीर परांजपे
मुंबई, दि. 31 ऑक्टोबर - ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आज एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केले. विक्रम गोखले यांचा सोमवारी होता वाढदिवस. त्या दिवशी त्यांनी हे पुण्यकार्य केले. त्यांची आजी कमलाबाई गोखले, वडील चंद्रकांत गोखले व स्वत: विक्रम गोखले अशा गोखले यांच्या तीन पिढ्यांनी कोणताही गाजावाजा न करता समाजकार्याचा आपला वसा सुरु ठेवला आहे. अभिनयाचा आपला व्यवसाय निष्ठेने करतानाच समाजासाठीही आपल्या परीने झटणारे गोखले घराणे हे महाराष्ट्राच्या चित्रपट, नाटक, मालिका क्षेत्रातील एक दुर्मिळ उदाहरण आहे.
विक्रम गोखले यांच्या आई कमलाबाई गोखले. कमलबाईंची आई दुर्गाबाई कामत ही भारतीय चित्रपटातील पहिली नायिका समजली जाते. रघुनाथराव गोखले यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर कमलाबाई गोखले यांना तीन पुत्र झाले. त्यात चंद्रकांत गोखले यांचा समावेश होता. चंद्रकांत गोखले यांचे पुत्र म्हणजे विक्रम गोखले. कमलाबाई गोखले या चार वर्षांच्या असताना त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या चित्रपटात काम केले होते. कमलबाई गोखले यांनी सुमारे ३५ िचत्रपटांत कामे केली. संगीत उ:शाप या हरिजनांच्या उद्धार हा विषय घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या नाटकात कमलाबाई यांनी भूमिका केली होती. तेव्हापासून गोखले घराण्याच्या तीनही पिढ्या या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या अनुयायी राहिलेल्या आहेत. कमलबाई गोखले यांना वयाच्या २५ व्या वर्षी वैधव्य आले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात अबला, त्याचप्रमाणे लष्करातील सैनिक यांना आपल्या परीने जेवढी मदत किंवा सहकार्य करता येईल तेवढे केले होते.
कमलबाई गोखले यांच्याकडून नेमका हाच वसा त्यांचे पुत्र व अभिनेते चंद्रकांत गोखले यांनी घेतला. चंद्रकांत गोखले पूर्वी एक लाख रुपये दरवर्षी, युद्धात परावलंबी झालेल्या सैनिकांना देत असत. त्यासाठी त्यांनी बँकेत काही रक्कम ठेवली होती. पण बँकेचा व्याजदर कमी झाल्यानंतर वर्षाला लाखभर रुपये मिळेनासे झाले. चंद्रकांत गोखले यांनी सैनिकांना एक लाख रुपये देता यावेत म्हणून आपले एका वेळचे जेवण शेवटच्या श्वासापर्यंत बंद केलं. अर्धपोटी राहिले ते. घरात काही दिसत नाही, अंधार पडला, आता दिवा लावलाच पाहिजे, अशी वेळ येईपर्यंत ते दिवे लावेनासे झाले. आवश्यक तेवढंच पाणी वापरलं. अांघोळीसाठी पाणी तापवणे बंद केलं. वाचवता येतील तसे पैसे वाचवले, पण सैनिकांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचा संकल्प त्यांनी मोडला नाही. त्यांनी कधीही रिक्शा केली नाही. बसने प्रवास केला, पायी गेले. साधे कपडे घातले. असे करून जमतील तेवढे पैसे वाचवले आणि अनेक संस्थांना देणगी म्हणून दिले.
चंद्रकांत गोखले यांचे पुत्र विक्रम गोखले यांनी पंचवीस वर्षापूर्वी आपली आजी कमलबाई गोखले यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन केला असून त्याच्या माध्यमातून ते आदिवासी मुलांच्या कल्याणासाठी कार्य करतात. त्याचप्रमाणे अपंग मुलांच्या पुर्नवसनासाठी देखील या ट्रस्टमधून काही मदत उपलब्ध करुन दिली जाते. तुरुंगातील कैद्यांसाठीही विक्रम गोखले यांनी काही सेवाकार्य केले आहे. दुर्गाबाई भागवत यांच्यावर अंजली किर्तने यांनी जो लघुपट तयार केला त्यासाठी पहिली देणगी दिली ती विक्रम गोखले यांनी म्हणून तो लघुपट तयार होऊ शकला. कमलाबाई गोखले, चंद्रकांत गोखले ते विक्रम गोखले अशा गोखलेंच्या तीन पिढ्यांनी अभिनयाबरोबरच समाजकार्यात आपला ठसा उमटवला आहे ही या क्षेत्रातील एक आगळीच घटना आहे.
चंद्रकांत गोखले यांची त्यागी वृत्ती
प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी चंद्रकांत गोखले यांची आठवण सांगताना म्हटले होते की, ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले व आम्ही एखा नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात गेलो होतो. तिथे दररोज आम्हाला जेवणासाठी पैसे मि‌ळत असत. परंतु चंद्रकांत गोखले दिवसातून फक्त एकदाच जेवत असत. एका वेळच्या जेवणाचे पैसे त्यांनी साठवून ठेवले होते. चंद्रकांत गोखले जेव्हा परदेशातून भारतात परत आले तेव्हा त्यांनी आपल्याकडचे साठवलेले सुमारे हजार आठ डॉलर सहकाऱ्यांकडे दिले. गोखले केवळ एक वेळ जेवण करत. एका वेळच्या जेवणाचे पैसे त्यांनी साठवले होते. ते संपूर्ण पैसे मुंबई येथील सावरकर निधीला चंद्रकांत गोखले यांनी दिले होते. या गोष्टीचा कुठेही गाजावाजा कधीही चंद्रकांत गोखले यांनी केला नाही. दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ते स्वकमाईतील विशिष्ट रक्कम सैनिक कल्याण निधीलाही देत असत.

कमल हासन - आय एम द पीपल - श्रीधर तिळवे - शब्दांकन- समीर परांजपे - दै. दिव्य मराठी २९ ऑक्टोबर २०१७ रसिक पुरवणी



दै. दिव्य मराठीच्या रसिक या रविवार पुरवणीत दि. 29 आँक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ कवी व चित्रपट पटकथाकार श्रीधर तिळवे यांचा हा लेख. या लेखाचे शब्दांकन मी केले असून त्या लेखाची वेबपेज लिंक व जेपीजी फाइल व मजकूर इथे सोबत दिला आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/29…/0/1/
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/29…/0/2/
-----------------------
कमल हासन - आय एम द पीपल
----------------------
- श्रीधर तिळवे
shridhar.tilve1@gmail.com
------------------------
(शब्दांकन - समीर परांजपे)
-----------------------
‘आय एम नॉट जस्ट द मॅन, आय एम द पीपल' अशी गर्जना करत कमल हासन तामिळनाडूच्या राजकीय क्षितिजावर अवतरला तेव्हा, ही गर्जना एका सुपरस्टारने केली आहे की, खरोखरच कमल हासन राजकारणाबाबत गंभीर झालाय, असा संभ्रम त्याला ओळखणाऱ्या अनेकांमध्ये निर्माण झाला. गेली कित्येक वर्षे कमल हासन अनेक प्रसंगात सामाजिक व राजकीय वक्तव्ये करत आलेला आहे. त्यावरुन वेळोवेळी वादही झडले आहेत. पण प्रथमच राजकारणाविषयी एक ठोस भूमिका असल्यासारखा तो बोलताना दिसतोय. त्यामुळे त्याची सर्व विधाने अत्यंत गांभीर्याने घेण्याची वेळ मीडिया आणि राजकारणी लोकांवर आलेली दिसतेे.
तामिळनाडूत जयललितांचा मृत्यू झाला आणि एक राजकीय पोकळी निर्माण झाली. या पोकळीत शशिकला स्थिरावतील, असे वाटत असतानाच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्या साइडलाइन झाल्या. अण्णाद्रमुक विरुद्ध द्रमुक ही आतापर्यंतची द्विध्रुवीय राजकीय स्थिती संपुष्टात येते की काय, अशी शंका निर्माण झाली. साहजिकच एका सुपरस्टारच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी दुसरा सुपरस्टार आणावा, ही भावना प्रबळ होत गेली आणि रजनीकांत व कमल हासन या दोघांमागे त्यांनी राजकारणात प्रवेश करावा म्हणून त्यांच्या काही फॅन्सनी वैयक्तिक पातळीवर तगादा लावायला सुरुवात केली. मात्र आरोग्याच्या समस्यांमुळे रजनीकांतच्या राजकारण प्रवेशाच्या शक्यता मावळत गेल्या. सगळा झोत कमल हासनच्या दिशेने वळला. यात भरीस भर म्हणून भाजपची आतापर्यंतची तामिळनाडूमध्ये मर्यादित असलेली ताकदही विस्तारत गेली. अर्थात, भाजपची कर्मठ भूमिका जोवर राजकारणापर्यंत मर्यािदत होती, तोवर तामिळ चित्रपटसृष्टीला तिच्याशी काही देणेघेणे नव्हते. पण अचानक सुपरस्टार विजयच्या ‘मर्सल’ या चित्रपटावरून भाजपने वादळ उठविले. चित्रपटात जीएसटीवर नव्हे तर पंतप्रधान मोदींवर टीका आहे, या कारणास्तव हा चित्रपट रिसेन्सॉर करावा, अशी बालीश मागणी केली गेली. एवढा आक्षेप घेऊनही भाजप कार्यकर्त्यांचा आत्मा थंडावला नाही. आपल्यातला जोश दाखण्यासाठी त्यांनी ‘मर्सल’चा नायक विजय हा ख्रिश्चन असल्याने त्याने हे मुद्दाम केले असा बिनबुडाचा आरोपही केला.यानंतर मात्र, तामिळ चित्रपटसृष्टीत प्रचंड नाराजी पसरली. वास्तविक तामिळ चित्रपटसृष्टीने आजवर कधीही जातपात व धर्मबिर्म बघितलेला नाही. ही भारतातील कदाचित एकमेव चित्रपटसृष्टी असेल, जिथे तब्बल ८० टक्के अभिनेते ब्राह्मणेतर आहेत आणि त्यातील पन्नास टक्के चक्क अनुसुचित जाती-जमातींतले (शेड्युल कास्ट) आहेत. अशा वेळी अभिनेता विजयचा धर्म काढणे, हे कोणालाच मानवणारे नव्हते. नेमका याचवेळी कमल हासनने विजयला जाहीर पाठिंबा दिला. याचे कारण उघड आहे. कमल हासन ब्राह्मण असला, तरी त्याच्या जातीचा विचार ना कमल हासनने केला, ना चित्रपटसृष्टीने केला ना, त्याच्या चाहत्यांनी. राजकारणातही त्याच्या पूर्वी जयललिता या ब्राह्मण असूनही, त्यांचे ब्राह्मण्यत्व कधीही राजकारणाच्या आणि लोकपाठिंब्याच्या आड आले नव्हते. त्यामुळे कमल हासनला ब्राह्मण असल्याचे कसलेच नुकसान होणे शक्य नाही. शिवाय जात आणि धर्माच्या कॉलमात कायमच ‘नास्तिक’ असा उल्लेख करत आल्याने कमल हासन हा ब्राह्मण्यत्वाचा त्याग केलेला पुरोगामी नट अशीच प्रतिमा तामिळनाडूमध्ये रुजली आहे. साहजिकच सेक्युलर वातावरण जिवंत ठेवण्यासाठी भाजपचा पाडाव झाला पाहिजे, असे मानणारे लोक कमल हासनमागे उभे राहायला सुरुवात झाली.
यात कमल हासनची पंचाईत अशी आहे की, तो द्रमुक व अण्णाद्रमुकमध्ये जाऊ शकत नाही. याचे कारण, त्याचे स्वत:चे व्यावसायिक हितसंबंध! दुसरी गोष्ट, त्याच्या दोन्ही मुली विशेषत: अक्षरा ही बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी धडपडते आहे. त्यामुळे स्वत:ची राष्ट्रीय प्रतिमा जपणे कमल हासन कुटुंबाला व्यावसायिक पातळीवर विशेष आवश्यक आहे. अण्णा द्रमुक, द्रमुक हे दोन्ही पक्ष द्रविड तामिळ अस्मितेचा कट्टर पुरस्कार करत असल्याने, प्रादेशिक अस्मितेशी जुळवून घेणे कमल हासनला तसेही शक्यच नाही. साहजिकच या पार्श्वभूमीवर कमल हासनपुढे चारच पर्याय उपलब्ध होते. एक,कम्युनिस्ट. दोन, काँग्रेस. तीन, भाजप आणि चार, आप. परंतु, कमल हासन सेक्युलरवादाचा कट्टर पुरस्कर्ता असल्याने, भाजपशी त्याचे जमणे शक्यच नव्हते आणि आपण डावे नाही आहोत, हे तर तो १९८० पासूनच सांगतो आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष हा पर्यायही बाद झाला. काँग्रेस ही कमल हासनसाठी एक उत्तम शक्यता होती. पण काँग्रेसला तामिळनाडूमध्ये पक्का बेस नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सोबत गेल्याने कमल हासनची मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही. साहजिकच हा पर्यायही रद्दबातल आहे. मग शेवटी, ‘आप’च उरतो. कमल हासनला तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनविण्यात ‘आप’ची कसलीच आडकाठी नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगितले आहे. केजरीवाल हे काँग्रेसपेक्षा शब्दांचे अधिक पक्के आहेत, या भरवशावर कदाचित कमल हासन ‘आप’कडून रिंगणात उतरु शकतो. किंवा काँग्रेस-आपला पाठिंबा देणारा नवा पक्ष वा संघटना जन्माला घालू शकतो. पण हेही तितकेसे सोपे नाही. कारण, कमल हासनची आर्थिक स्थिती. 
कमलचे ‘हे राम'पासूनचे कित्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चाललेले नाहीत. त्यामुळे जाणकारांच्या मते, त्याने कमावलेले जवळजवळ ७० टक्के पैसे हे वाया गेलेले आहेत. साहजिकच उरलेले ३० टक्के पैसे राजकारणासाठी पणाला लावण्याची कमल हासनची तयारी नाही. मात्र उद्या जर कोणी त्याच्या स्वतंत्र पक्षाची आर्थिक जबाबदारी घेतो,असे म्हणाला तर कमल हासन आप सोडून स्वत:चा पक्ष काढणार नाही, याचीही खात्री नाही. इथे असा प्रश्न निर्माण होतो की, रजनीकांतप्रमाणे कमल हासनजवळ पैसा का उरला नाही? याचे उत्तर असे की, रजनीकांत हा कधीच प्रचंड पैसे गुंतवणारा निर्माता झाला नाही. स्टारडममुळे मिळणारा पैसा त्याने सामाजिक कार्यात दान केला. कमल हासनने आपला सारा पैसा कायमच चित्रपटसृष्टीत पणाला लावला. त्यामुळे त्याच्या हातात मोठा दानधर्म करायला पैसाच शिल्लक उरला नाही. एकदा तर चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्याच्या जवळ पैसा नव्हता, तेव्हा रजनीकांतने पैसे पाठवून तो चित्रपट पूर्ण केला. त्यामुळे जे सामाजिक उत्तरदायित्व रजनीकांतबाबत प्रखरपणे पुढे येते, ते कमल हासनबाबत कधीच पुढे आले नाही. त्यामुळे कमलच्या चाहत्यावर्गात चित्रपट फ्लॉप होत गेले, तसे घट होत गेली. त्याउलट रजनीकांतचे चित्रपट चाहते मात्र वाढतच गेले. याचा परिणाम कमल हासनवर नेमका काय होणार आहे?
याही पुढचा प्रश्न असा की, कमल हासन नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार आहे? कमल हासनची गांधीवादी विचारसरणीशी असलेली जवळीक आणि त्यातून निर्माण झालेला ‘हे राम’ हा चित्रपट सर्व तामिळनाडूला माहिती आहे. पण ‘हे राम’ हा चित्रपट गांधीवादाच्या बाजूने आहे की गांधीवादाच्या विरुद्ध आहे, हे सहजासहजी कळत नाही. अशाच स्वरूपाचे एक प्रकारचे अपूर्णत्व, ज्याला इंग्रजीत ‘अनफिनिशिंग’ असे म्हणता येईल ते, कमल हासनच्या आयुष्यात सातत्याने जाणवते. त्यामुळे कमल हसनचा अलिकडचा प्रत्येक चित्रपट हा एखाद्या ‘अनफिनिश्ड प्रॉडक्ट’सारखा असतो. त्याची राजकीय भूमिका ही अशीच ‘अनफिनिश्ड प्रॉडक्ट’ असणार का? कमल हासनने ‘इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत ‘मी डावा पण नाही, उजवा पण नाही. किंबहुना ‘इझम’ची कोणतीच गरज लोकांना वाटत नाही आणि उरलेलीही नाही' असे विधान केले होते. हा पोस्टमॉर्डन स्टान्स आहे. या पोस्ट मॉर्डनिझमने काही वर्षांपूर्वी ‘आयडिऑलॉजी इज डेड' अशी घोषणाही केली होती. त्याच्याशी सुसंगत असाच कमल हासनचा स्टान्स आहे. कमल हासनबाबत गेली कित्येक वर्षे तो स्पष्टवक्ता आहे, की उद्दाम आहे? स्वच्छ दृष्टीचा आहे की केऑटिक आहे? कलानिष्ठ आहे की ओव्हरड्यूअर आहे असा प्रश्न कायमच लोंबकळता राहिला आहे. तेव्हा त्याचे राजकारणही असेच लोंबकळते राहाणार का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होणे अपरिहार्य आहे. 
त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट अशी की, कमल हासन काही बाबतीत मात्र ठाम दिसतो. उदाहरणार्थ, कमल हासनने आपण नास्तिक आहोत अशी उघडउघड केलेली घोषणा. त्यामुळे साहजिकच त्याची मुलगी अक्षरा हिने माझा ईश्वरावर विश्वास नाही आणि मी हिंदू धर्मापेक्षा बौद्ध धर्माला अधिक जवळचा मानते असे घोषित केले, तेव्हा कमल हासनने तिला पाठिंबाच दिला होता. त्यावरुनही बरीच खळबळ उडाली होती. अर्थात, तामिळनाडूच्या राजकारणात नास्तिक असणे हे परवडू शकते. याला कारण दक्षिणेत विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी परंपरेला अवकाश मिळवून देणारे नेते पेरियर ई.व्ही. रामासामी यांचा जनमानसावर असलेला प्रभाव. एका बाजूला वैयक्तिक आयुष्याचा विचार करता कमल हासनचे वैवाहिक जीवन हे कायमच वादळी राहिले. वाणी गणपती, सारिकापासून ते गौतमीपर्यंत अनेक स्त्रिया त्याच्या आयुष्यात आल्या आणि गेल्या. पण यासंदर्भातील त्याची भूमिका त्याने कायमच स्पष्ट स्वरुपात मांडल्यामुळे तो जसा आहे, तसाच चाहत्यांनी त्याला स्वीकारला. किंबहुना, रजनीकांत आणि कमल हासन यांच्यातला फरक परंपरेचे आधुनिक रुप आणि आधुनिकतेचे उत्तर आधुनिक रुप असाच आहे. तरीही दोन्ही अभिनेत्यांना लोकांनी स्वीकारले याचे कारण त्यांचा प्रामाणिकपणा. यातूनच जन्मलेली कमल हासनची दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, खुल्या मनाने स्वत:च्या चुकांची कबुली देणे. याबाबत तो गांधींना आपला गुरु मानतो. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी जेव्हा नोटबंदी जाहीर केली तेव्हा, त्याने अत्यंत खुल्या दिलाने त्याचे स्वागत केले. या काळात त्याच्या कॉम्रेडस् मित्रांनी तो कसा चुकीचा अाहे, हे त्याला वारंवार सांगितले होते. पुढे जेव्हा नोटबंदीमळे देशभर गोंधळ निर्माण झाला तेव्हा, त्याने हा अंमलबजावणीतला घोळ आहे असे सांगून मोदींनाच पाठिंबा दिला होता. मात्र, जेव्हा रिझर्व्ह बँकेचे रिफंडचे आकडे आले तेव्हा त्याने, स्पष्टपणे व उघडपणे कबुली दिली की, मी चुकलो! माझा पाठिंबा चुकीचा होता!! कमल हासन इतकेच बोलून थांबला नाही, तर गांधीजी जसे आपल्या चुका कबुल करीत, तसे सर्वसामान्य माणसांचे जीणे हराम करणारे डिमॉनिटायझेशन ही आपली चूक होती असे मोदींनी जाहीरपणे कबूल करावे, असे आवाहनही मोदी यांना कमल हासनने दिले. 
कमल हासनचा हा प्रामाणिकपणा त्याच्या चाहत्यांना नेहमीच दिलासादायक वाटला आहे. किंबहुना, रजनीकांत व कमल हासन यांच्या दोस्तीचा मूळ धागा हा प्रामाणिकपणाचाच आहे. त्यामुळे तामिळनाडूत सध्या चर्चिला जाणारा प्रश्न हाच आहे की, रजनीकांत, कमल हासनला पाठिंबा देणार की नाही? किंबहुना, कमल हासनने रजनीकांतला तसे आवाहनही केले आहे. एकीकडे कमल हासन हा भ्रष्टाचार करणार नाही, याविषयी चाहत्यांच्या मनात जराही शंका नाही. देशातल्या अत्यंत प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या मोजक्या लोकांपैकी तो एक आहे. मात्र, कमल हासन यानेच म्हटल्याप्रमाणे प्रामाणिक नेता तेव्हाच निवडून येतो, जेव्हा मतदार प्रामाणिक असतात. आता तामिळनाडूमध्ये किती प्रामाणिक मतदार आहेत, आणि त्यातील किती जण कमल हासनला पाठिंबा देतात, यावर त्याचे राजकीय अस्तित्व अवलंबून असणार आहे. अर्थात, ७ नोव्हेंबरला म्हणजेच त्याच्या वाढदिवसाला तो राजकारण प्रवेसासंदर्भातली घोषणा करणार आहे. "आय कॅन सी दॅट ए युथ फोर्स इज वेटिंग टु बी को ऑर्डिनेटेड...' हे त्याचं वाक्य त्याचा इरादा पुरेसा स्पष्ट करणारं आहे.

`भंगार' ठरले गोसावी समाजातील व्यक्तिने लिहिलेले मराठीतील पहिले आत्मचरित्र! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी २८ ऑक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या २८ ऑक्टोबर २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. त्या बातमीची वेबपेज लिंक, जेपीजी फाइल व मजकूर पुढे देत आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/28102017/0/11/
--
`भंगार' ठरले गोसावी समाजातील व्यक्तिने लिहिलेले मराठीतील पहिले आत्मचरित्र!

- अशोक जाधव या लेखकाचे आत्मचरित्राचे प्रकाशक आहेत मनोविकास प्रकाशन

- समीर परांजपे

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर - भटका विमुक्त असलेला गोसावी समाज हा मुळचा भिक्षा मागून जगणारा. मात्र त्यांना मिळणाऱ्या भिक्षेचे प्रमाण कमी झाल्यामुळे पोट भरण्यासाठी या समाजातील लोकांनी पाच सहा पिढ्यांपूर्वी भंगार वेचण्याचे काम पत्करले. स्त्रियांनी शिक्षण घेणे हा जणू काही गुन्हा आहे अशी गोसाव्यांच्या जातपंचायतीची भूमिका. या सगळ्या बंधनांना झुगारुन गोसावी समाजातून गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत जी मुले-मुली शिकले त्यांच्यातलेच एक म्हणजे अशोक जाधव. पेशाने शिक्षक असलेल्या अशोक जाधव त्यांनी `भंगार' नावाचे आत्मचरित्र लिहिले असून ते मनोविकास प्रकाशनच्या वतीने लवकरच प्रसिद्ध होणार आहे. गोसावी समाजातील व्यक्तीने मराठीत लिहिलेले ते पहिले आत्मचरित्र आहे.
यासंदर्भात अशोक जाधव यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, इचलकरंजी परिसरात वेताळपेठ नावाचे एक गाव आहे तिथे माझा जन्म झाला. गोसावी समाज भटका विमुक्त असल्याने तो अनेक ठिकाणी विखुरला गेला आहे. त्यामुळे तो शिक्षण व अनेक सुविधांपासून वंचित राहिला होता. हा समाज गावगाड्याबाहेरचा. लोकांकडून मिळणाऱ्या भिक्षेचे प्रमाण कमी झाल्याने पोटापाण्यासाठी गोसावी समाजाच्या पूर्वीच्या पिढ्यांनी भंगार वेचायचा व्यवसाय पत्करला. त्यासाठी उकीरड्यांवर जावे लागे. हे जीणे खूप भयानक आहे. गोसावी समाजातील अनेक लोक आजही भंगार वेचण्याचा व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतील.
ते पुढे म्हणाले की, मला शिक्षणाची इच्छा प्रबळ होती. त्यामुळे मी खूप कष्ट घेऊन, विपरित परिस्थितीचा सामना करुन बीए., बीएड. झालो. त्यानंतर राधानगरी तालुक्यात शिक्षक म्हणून १६ वर्षे काम केले. आता इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये मराठी व इतिहास विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या आजवरच्या ४३ वर्षांच्या आयुष्यात गोसावी समाजातील व्यक्ती म्हणून जगताना जे अनुभव आले ते वेगळे होते. आपल्याला जसा शिकण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला तसा गोसावी समाज तसेच इतर बेघर लोकांच्या मुलामुलींना करावा लागू नये असे मला वाटत होते. त्यासाठी इचलकरंजीला पंचगंगा सहकारी साखर कारखान्यासमोर मी ५ गुंठे जागा घेतली. तोवर माझ्या मालकीचा एक इंच जमिनीचा तुकडाही नव्हता. त्या जमिनीमध्ये एक पत्र्याची शेड बांधून मी माझ्या कुटुंबासहित राहू लागलो. त्याचबरोबर गोसावी समाजातील तसेच बेघर मुला-मुलींना त्यांच्या कुटुंबासहित आमच्यासोबत राहायला दिले. त्यांना एकच अट घातली मला इथे राहाण्याचे भाडे देऊ नका पण तुमच्या मुलामुलींना शिकवा. आज या मुलामुलींपैकी एक मुलगी बीफार्मसी झाली, एक जोगतीण होती तिला शिकवून शिक्षिका बनविले, गोसावी समाजातील एक मुलगा माझ्याकडे राहून डॉक्टर झाला. एक मुलगी चांगली शिकून मुंबईत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करते आहे. यात मी काही विशेष करत होतो असे नाही. पण मी मुलींना शिकायला मदत करत होतो त्यामुळे गोसावी जातपंचायतीने माझ्यावर आठ वर्षे बहिष्कार घातला होता. सध्या मी `बेटी बचाव, बेटी पढाव' हे अभियान सुरु केले आहे.
अशोक जाधव पुढे म्हणाले की, मला आलेले सगळे अनुभव सांगावेसे वाटले. त्यातून `भंगार' हे आत्मचरित्र मी लिहिले. गोसावी समाजाबद्दल माहिती देणारे लेखन काही जणांनी केले आहे. पण गोसावी समाजातील एखाद्या व्यक्तीने आपले मराठीत आत्मचरित्र लिहिले आहे असे यापूर्वी घडलेले नाही. `भंगार' हे आत्मचरित्र लिहून झाल्यानंतर ज्यांनी त्याचा खर्डा वाचला त्यांच्या ही बाब लक्षात आली. तोपर्यंत मलाही या गोष्टीचे भान नव्हते. गोसावी समाज असो किंवा कोणताही भटका-विमुक्त समाज त्यांच्यात आज शिक्षणाचा प्रसार होत आहे पण अजूनही तो म्हणावा तितका होताना दिसत नाही. ही सगळी स्थिती या आत्मचरित्राद्वारे लोकांसमोर प्रखरतेने यावी हाही हे पुस्तक लिहिण्यामागचा माझा उद्देश आहे.

Friday, October 27, 2017

फास्टर फेणे चित्रपटाचा रिव्ह्यू - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी वेबसाइट - मराठी सिनेकट्टा सेगमेन्ट, २७ ऑक्टोबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेन्टसाठी मी फास्टर फेणे या चित्रपटाचे केलेले परीक्षण. त्याचा वेबलिंक व मजकूर पुढे दिला आहे.
---






दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेन्टसाठी मी फास्टर फेणे या चित्रपटाचे केलेले परीक्षण. त्याचा वेबलिंक व मजकूर पुढे दिला आहे.
---
चमकदार कामगिरी करत प्रेक्षकांचे मनोरंजन करतो साहसी फास्टर फेणे
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - तीन स्टार
--
कलाकार - अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, शुभम मोरे, चिन्मयी सुमीत, सिद्धार्थ जाधव, श्रीकांत जाधव
दिग्दर्शक - आदित्य सरपोतदार
कथा, पटकथा, संवाद - क्षितिज पटवर्धन 
निर्माते - रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख (मुंबई फिल्म कंपनी), मंगेश कुलकर्णी (झी स्टुडिओज)
चित्रपट प्रकार : क्राइम स्टोरी 
--
प्रख्यात ब्रिटिश लेखक आर्थर इग्नेटिस कॉनन डॉयल यांनी शेरलॉक होम्स हा गुप्तहेर जन्माला घातला. आपल्या या मानसपात्राच्या माध्यमातून डॉयल यांनी ज्या रहस्यकथा लिहिल्या त्यात वाचक गुंगून गेले. शेरलॉक होम्सच्या कथांवर जे चित्रपट निघाले त्यांचीही भुरळ जगभरातल्या रसिकांना पडली. मराठी साहित्यात बाबुुराव अर्नाळकर हे एक महत्वाचे रहस्यकथाकार होते. अर्नाळकरांच्या काळा पहाड, गोलंदाज, छोटू, झुंजार, इन्स्पेक्टर धनंजय, डिटेक्टीव्ह रामराव, सुदर्शन, फू मांच्यू आदी मानसपात्रांनी जी रहस्ये शोधून काढली ती मराठी वाचकांनी मनापासून प्रिय मानली. प्रख्यात लेखक भा. रा. भागवत यांचा फास्टर फेणे हा मानसपात्र. तोही धाडसी पण तो काही खाजगी गुप्तहेर नाही. पण रहस्याच्या तळाशी जाऊन ते शोधायला त्याला आवडते. जेव्हा प्रसारमाध्यमांचा फारसा बोलबाला नव्हता, वृत्तपत्रे हीच जगाची माहिती मिळवण्यासाठी महत्वाचे साधन मानले जात होते अशा काळात म्हणजे १९७०च्या दशकापासून ते १९८९ पर्यंत भा. रा. भागवतांनी फास्टर फेणे या मानसपात्राला काही चित्तथरारक कामगिऱ्या आपल्या पुस्तकांतून करायला लावल्या. हा धाडसी फास्टर फेणे बालवाचकांना भलताच आवडला होता.फास्टर फेणेसारखाच बिपिन बुकलवार हा देखील भा. रा. भागवतांचाच मानसपात्र. या दोघांपैकी फास्टर फेणेची लोकप्रियता एवढी की डीडी नॅशनल चॅनेलवर १९८३ साली फास्टर फेणे ही मालिका सुरु झाली होती. त्यात फास्टर फेणेची भूमिका सुमीत राघवन याने केली होती. या मालिकेला अनेक वर्षे झाली तरी त्या मालिकेची अनेकांच्या मनात असलेली आठवण अजूनही कायम आहे. फास्टर फेणेवर भा. रा. भागवतांची सुमारे २० पुस्तके प्रसिद्ध असून ती आजही वाचकप्रिय आहेत. या पुस्तकांची ऑडिओ बुक्सही निघणार आहेत. फास्टर फेणे या नावामागची ही सारी पुण्याई लक्षात घेऊन त्याच्यावर फास्टर फेणे हा चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटातील फास्टर फेणे हा सध्याच्या आधुनिक काळातला, फेसबुक, स्मार्ट फोन, लॅपटॉपपासून पेन ड्राइव्हपर्यंत अशा साऱ्या लेटेस्ट गोष्टी वापरणारा आहे. फास्टर फेणे या नावामागचा नॉस्टाल्जिया व त्याला आधुनिक रुप देत केलेला चित्रपट असे सारे पॅकेजिंग असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही.
कथा - चित्रपटातला फास्टर फेणे हा आता २० वर्षांचा झालेला आहे. तो आधुनिक युगातील माहिती तंत्रज्ञानाने सुसज्ज असा युवक आहे. तो पुण्याला मेडिकल शाखेच्या प्रवेशपरिक्षेसाठी आलेला आहे. त्याची आई ही त्याची खूप काळजी करणारी. फास्टर फेणेचे खरे नाव बनेश फेणे. फास्टर फेणेचे वडील वारले आहेत. घरात तो व त्याची आई असे दोघेच. फेणे हा पहिल्यापासून धाडसी. एकदा प्रतापगडच्या भूयारात शिरला होता तेव्हा गु़डघे फोडून घेतले होते. या साहसाबद्दल त्याच्या आईला कौतुक व काळजीही वाटते. त्यामुळे तो पुण्याला जेव्हा मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी जायला निघतो तेव्हा त्याची आई सांभा‌ळून राहा, लवकर घरी ये असे आवर्जून सांगते. फास्टर फेणेला आईची काळजी समजते परंतू त्याचा धाडसी स्वभाव त्याला सतत काहीतरी वेगळे करायला, शोधायला भाग पाडतो. कुठे काही चुकीचे घडले की संवेदनशील फास्टर फेणे स्वस्थ बसणे शक्यच नसते. मेडिकल शाखेच्या प्रवेश परीक्षेसाठी तो पुण्यातील परीक्षा केंद्रावर येतो. तेथे परीक्षा सुरु होण्याआधी त्याची भेट होते धनेश लांजेकर या विद्यार्थ्याशी. तोही मेडिकल शाखेची प्रवेश परीक्षा देण्यासाठी आलेला असतो. फेणे व लांजेकर यांची सिटिंग अॅरेजमेंट वेगवेग‌‌‌ळ्या वर्गात असते. परीक्षा संपल्यानंतर मात्र त्या दोघांची भेट होत नाही. कारण लांजेकर आधीच निघून गेलेला असतो. दुसऱ्या दिवशी फेणे आपल्या घरी जायला एसटीत बसतो. हाती वर्तमानपत्र घेतो तेव्हा त्याला एक बातमी दिसते ती म्हणजे धनेश लांजेकर याने आत्महत्या केल्याची. जो धनेश परीक्षेआधी भेटला होता तेव्हा खूप यश मिळवण्यासंदर्भात उत्साहाने बोलत होता तो आत्महत्या कसा करेल? असा प्रश्न फास्टर फेणेला पडतो. तो घरी न जाता पुण्यातच थांबतो. या प्रकरणाचा छडा लावण्याचा निश्चय करतो. तो ज्यांच्याकडे उतरलेला असतो ते म्हणजे प्रख्यात लेखक भा. रा. भागवत. त्यांच्या घरी चोरी झालेली असते. त्या प्रकरणामधील चोर कोण आहे ते फेणे चलाखीने शोधतो. भूषण नावाच्या म्युन्सिपालटी शाळेमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलाने ती चोरी केलेली असते. भूषणचे टोपणनाव म्हणजे भू भू. त्याला पकडून फास्टर फेणे भा. रा. भागवतांकडे येतो. पण त्या मुलाला पोलिसात न देता भा. रा. भागवत भू भू ला आपल्या घरी ठेवून घेतात. त्याच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवितात. फास्टर फेणेला आता भू भू नावाचा एक छान साथीदार मिळतो. हे सगळे घडल्यानंतर उद्भवते ते धनेश लांजेकरच्या आत्महत्येचे प्रकरण. त्या प्रकरणाच्या मुळाशी जायचा निर्धार करुन फास्टर फेणे पोलिसांकडे जातो. आपल्याला परीक्षेआधी धनेश लांजेकर कसा भेटला होता, तो अजिबात निराश नव्हता त्यामुळे तो आत्महत्या करुच शकत नाही हे तो ठासून पोलिसांना सांगतो. पण धनेशच्या कथित आत्महत्या प्रकरणाचा तपास करणारे इन्स्पेक्टर जयंत सोलापूरकर हे फेणेला उडवून लावतात. हे सारे प्रयत्न सुरु असताना फास्टर फेणेला त्याची बालमैत्रिण अबोली भेटते. ती पत्रकार असते व शिक्षणातील भ्रष्टाचार शोधून तो बातम्यांद्वारे उजेडात आणण्याचे काम धडाडीने करीत असते. अबोली, फास्टर फेणे, भू भू हे तिघेही आता धनेश लांजेकरच्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी खूप प्रयत्न करु लागतात. नेमके याच वेळेला रुद्रनाथ अंधारे म्हणजे अाप्पा या खलनायकाची एन्ट्री होते. विविध शाखांच्या परीक्षांमध्ये बोगस विद्यार्थी बसवून इच्छुक परीक्षार्थींना उत्तम मार्कांने उत्तीर्ण करुन देण्याचा गोरखधंदा तो करत असतो. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांना हव्या त्या शिक्षणसंस्थांमध्ये व शाखेमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा व त्या बदल्यात लाखो रुपये उकळण्याचा अप्पाचा धंदाही तेजीत असतो. त्यासाठी त्याने विविध शिक्षणसंस्थांच्या संचालकांना पैशाने, दहशतीने बांधून ठेवलेले असते. तो आपले इस्पित साध्य करण्यासाठी खूनखराबा करायलाही कमी करत नाही. अशा उलट्या काळजाच्या आप्पाने मेडिकल प्रवेश परीक्षेतही बोगस विद्यार्थी बसविलेले असतात. त्यासाठी तो परीक्षांचे बोगस हॉल तिकिट तयार करण्यापासून सगळे उद्योग करत असतो. त्यासाठी त्याने अनेक हस्तक, गंुंड पाळलेले असतात. मेडिकल शाखेच्या प्रवेश परीक्षेत अशाच एका मुलाच्या जागेवर दुसरा मुलगा पेपर लिहितोय हे धनेश लांजेकरच्या लक्षात येते. हे तो त्या वर्गातील सुपरवायझरला लक्षात आणून देतो. मात्र सुपरवायझरही आप्पाचाच माणूस. त्यामुळे तो लगेच आप्पाला फोनवरुन या धनेशची माहिती देतो. ज्या मुलाच्या जागी दुसरा मुलगा पेपर लिहित असतो तो म्हणजे अमोल. धनेश घाईघाईने आपला पेपर संपवून प्रिन्सिपलकडे तक्रार करायला म्हणून वर्गातून निघून जातो. त्या पाठोपाठ आपण पकडले जाऊ नये म्हणून अमोलही वर्गातून बाहेर निघून तिथून पसार होतो. ही सारी माहिती फास्टर फेणेला जसजसे तो या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ लागतो तसतशी हाती लागते. अमोल परीक्षा केंद्रातून पसार होतो पण तो आपल्या घरी न थांबता तु‌ळजापूरात का दडून बसलेला असतो? धनेश लांजेकरचा खून झाला आहे हे फेणेच्या व अबोलीच्या लक्षात आलेले असते पण तो खून नेमका कोणी केला आहे असा प्रश्न त्यांना सतावत राहातो. हा खुनी नेमका कोण आहे हे रहस्य फास्टर फेणे उलगडू शकतो का? फास्टर फेणेच्या जीवावर उठलेल्या आप्पाची कारस्थाने यशस्वी होतात का? असे अनेक प्रश्न या कथानकातून निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी फास्टर फेणे हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - भा. रा. भागवतांच्या पुस्तकात शालेय विद्यार्थी असलेला फास्टर फेणे या चित्रपटाद्वारे युवकावस्थेत प्रेक्षकांसमोर येतो. फास्टर फेणेची भूमिका अमेय वाघ याने केली असून ती त्याने अत्यंत समंजसपणे साकारली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सध्याच्या का‌ळात फास्टर फेणे जसा वागला असता तसाच तो या चित्रपटात वागताना दिसतो. फास्टर फेणेच्या निडर व साहसी वृत्तीला पोषक असाच अभिनय अमेय वाघ याने चित्रपटात केला आहे. सर्वात उत्तम भूमिका झाली अाहे ती भा. रा. भागवत रंगविणाऱ्या दिलीप प्रभावळकरांची. भा. रा. भागवत हे केवळ बालसाहित्यिक नव्हते तर विशिष्ट विचारसरणीच्या मुशीतून तयार झालेले असल्याने त्यांच्या लेखन, वक्तव्यात एक प्रकारचा संयतपणाही मुरलेला होता. त्या विचारशील व्यक्तिमत्वाचा बाज सांभाळत तसेच आपण लेखक आहोत याचे भान राखत आयुष्य जगणारा एक ज्येष्ठ लेखक दिलीप प्रभावळकरांनी त्याबाबत संवादातून फारसे भाष्य न करताही उत्तम साकारला आहे. भा. रा. भागवत यांचे पात्र निर्मिणाऱ्या पटकथाकार, संवादलेखकाचेही यश आहे. पर्ण पेठे ही एक सुजाण अभिनेत्री आहे. तिला नेमून दिलेली अबोली या महिला पत्रकाराची भूमिका पर्णने व्यवस्थित साकारली आहे. या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे गिरीश कुलकर्णी हे खलनायकी भूमिकेत आहेत. गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेला आप्पा हा काही वेळेस त्यांच्या क्रूर अदाकारीने प्रेक्षकांच्या संतापाचाही धनी होतो. या चित्रपटात अंबादास पाटील या रिक्षाचालकाची भूमिका सिद्धार्थ जाधवने साकारली आहे. अंबादासच्या भूमिकेला काहीही आकारउकार नाही. त्याची भूमिका मुळ कथानकात सपशेल विजोड वाटते. मुळात कथानकात एक पाहुणा सेलिब्रिटी कलाकार हवा अशी खरच काही गरज नव्हती. पण चित्रपट बनविण्याच्या पॅकेजिंगमध्ये काय काय घुसेल सांगता येत नाही. शुभम मोरे (भू भू), चिन्मयी सुमित (फास्टर फेणेची आई), श्रीकांत यादव (इन्स्पेक्टर जयंत सोलापूरकर) आदी कलाकारांनी फास्टर फेणेला योग्य साथ दिली आहे. 
दिग्दर्शन - आदित्य सरपोतदारने फास्टर फेणे हा चित्रपट दिग्दर्शित केला अाहे. माहिती तंत्रज्ञान युगातील फास्टर फेणे दाखविताना त्याला युवकावस्थेत प्रेक्षकांसमोर आणणे व सादर करणे हा चांगला निर्णय चित्रपटलेखक क्षितिज पटवर्धन तसेच दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी घेतला. आदित्यच्या दिग्दर्शनात सफाई आहे. फास्टर फेणे हा चित्रपट प्रारंभापासून शेवटापर्यंत कुठेही कंटाळ‌वाणा होत नाही हे त्याच्या दिग्दर्शनाचे मोठे यश आहे. कथानकातील काही दुवे जुळवताना सिनेमॅटिक लिबर्टी चित्रपट लेखक व दिग्दर्शकाने घेतली आहे. पण त्याने काहीही फरक पडत नाही. फास्टर फेणे हा चित्रपट एकदा तरी जाऊन बघण्यासारखा आहे. मात्र त्या चित्रपटात आशयघनता वगैरे शोधायला जाऊ नका. एक क्राईम स्टोरी आपण पाहून आलो एवढेच समाधान तुम्हाला तो चित्रपट पाहिल्यावर मिळेल. आदित्य सरपोतदारचे दिग्दर्शकीय कौशल्य त्यामुळे सार्थकी लागते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुखचा डान्स असलेले एक गाणे दुरचित्रवाहिनीवरुन गेले अनेक दिवस वाजत गाजत आहे. मात्र चित्रपट बघितल्यावर हे लक्षात येते की या चित्रपटात ते रितेशचे गाणेच नाही. म्हणजे ते गाणे फक्त चित्रपटासंदर्भात रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी या हेतूने खास तयार केले गेले होते. एकही गाणे नसल्यामुळे या चित्रपटाच्या संगीताविषयी काहीच लिहिता येणार नाही. चित्रपटाचे छायाचित्रण व बाकीच्या तांत्रिक बाजू उत्तम आहेत. एक चकाचक मराठी व्यावसायिक चित्रपट आहे फास्टर फेणे.
---
https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-movie-review-faster-phene-5730164-PHO.html?seq=1&ref=ht

Tuesday, October 24, 2017

वरून भपकेबाज, आतून भोंगळ! - समीर परांजपे दै. दिव्य मराठी २२ ऑक्टोबर २०१७ची रसिक पुरवणी - विनोद तावडे यांच्यावर घणाघाती टीका करणारा लेख



दै. दिव्य मराठीच्या दि. 22 आँक्टोबर 2017 च्या रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा माझा लेख. त्या लेखाची वेबपेजलिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे. 
https://m.divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjape-w…
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/22…/0/1/
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/22…/0/4/
-----
वरून भपकेबाज, आतून भोंगळ!
------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीस सत्तावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत.संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,आम्हाला मराठी राज्य निर्माण करायचे आहे.त्यांच्या या उद््गारामध्ये या राज्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न होते.मात्र,आता अतिशय परखडपणे सांगावे लागत आहे की,यशवंतरावांना अपेक्षित असा महाराष्ट्राचा विकास तर झालेला नाहीच,शिवाय या राज्याचा सांस्कृतिक विकासही खुरटलेला राहिला आहे.मराठी राज्य निर्माण करणे म्हणजे मराठी माणसांना केवळ आर्थिकदृष्ट्या समृृद्ध करणे असे नव्हे,तर मराठी संस्कृती,ललित कला आदींचाही उत्तम विकास त्यात अपेक्षित होता.पण दोन्ही आघाड्यांवर हाती फारसे लागलेले नाही.परिणामी,महाराष्ट्राची ओळख सांगणारा नेमका कलाप्रकार कोणता,याचे निश्चित उत्तर आजही आपल्याला सापडत नाही.
मुळात,मराठी संस्कृती म्हणून जे काही सध्या अस्तित्वात आहे,ते जतन करण्यासाठी मराठी माणूसही काहीअंशी बेफिकीर आहे.‘यथा राजा तथा प्रजा’याप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या लेखी सांस्कृतिक गोष्टी या त्यामुळे सर्वात दुर्लक्षित ठरत असतील तर त्याचा दोष सर्वप्रथम सर्वसामान्य मराठी माणसाकडे जातो.याचे कारण,त्याला आपल्या संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टी टिकाव्यात,वाढाव्यात याचीच आस व आच नसेल तर या गोष्टी आचके देणारच.सर्वसामान्यांचा दबाव असेल तर सांस्कृतिक गोष्टींचे भरणपोषण सरकारकडून नीट होईल.मात्र,तसे होत नसल्याने या अनागोंदीचा सर्वाधिक फायदा २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकार सत्तेवर आले त्याला मिळाला आहे.या सरकारने विनोद तावडे यांच्याकडे सांस्कृतिक खाते(की अधिभार?)सोपवले आहे.तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण,क्रीडा आणि युवा कल्याण,उच्च आणि तांत्रिक शिक्षण,अल्पसंख्याक विकास आणि वक्फ बोर्ड,मराठी भाषा विभाग आदी चार-पाच खात्यांचीही जबाबदारी दिलेली आहे.त्यामुळेच एकाच वेळी इतक्या खात्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या तावडे यांचे प्राधान्य खाते कोणते हा प्रश्नही इथे विचारता येतो.ते खाते सांस्कृतिक आहे,असे म्हणावे तर या खात्यात ते करत असलेला कारभार इतका दिखाव्याचा राहिलेला आहे की,त्यामुळे तावडे यांच्यासारखा सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राला नकोच,अशी मागणी अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांना पुण्यात नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन करावी लागली.मराठी नाटक,चित्रपट,साहित्य या क्षेत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.त्या मागण्यांची सांस्कृतिक विभाग गांभीर्याने दखल घेत नाही,हा जोशींचा मुख्य आक्षेप आहे.या आक्षेपात वजन असल्यामुळेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,नाट्य निर्माते,महाराष्ट्र साहित्य परिषद,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन सरतेशेवटी पुण्यात एल्गार केला. 
महाराष्ट्रातील साहित्य-सांस्कृतिक चळवळीला ठोस दिशा देण्यासाठी राज्य सरकारने २०१० मध्ये सांस्कृतिक धोरण तयार केले होते.त्याला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यताही दिली होती.मात्र,या धोरणातील काही महत्त्वाच्या तरतुदी अमलात आणायला काँग्रेस सरकारने अक्षम्य ढिलाई केली.हीच ढिलाई देवेंद्र फडणवीस सरकारनेही पुढे चालू ठेवली.यात जबाबदार मंत्री या नात्याने विनोद तावडे यांचाही सिंहाचा वाटा आहे.मागच्या काँग्रेस सरकारांकडेच याचा दोष जातो,अशी पळवाट या प्रकरणात तावडे यांना शोधता येणार नाही.शोधणे योग्यही नाही. 
प्रख्यात विचारवंत आ.ह.साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सांस्कृतिक धोरणविषयक समितीने आपल्या अहवालात अनेक कल्पक योजना सुचवल्या होत्या.त्यात इंडॉलॉजीच्या धर्तीवर महाराष्ट्राचा अभ्यास करण्याकरिता मराठी बोली अकादमी,प्रत्येक महसुली विभागामध्ये एक कला संकुल,महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना,महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र,सांस्कृतिक समन्वय समिती,प्रमाणभाषा कोश,संतपीठ,परदेशांत अध्यासने अशा गोष्टींचा समावेश आहे.मात्र,२०१० मध्ये तयार झालेले महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण सात वर्षे उलटले तरी त्यातील काही महत्त्वाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच नसेल तर त्याच्या आढाव्याचा,फेरआढाव्याचा प्रश्नच येतो कुठे?त्यातही सांस्कृतिक धोरणात ज्याचा उल्लेख आहे,तो राज्य सांस्कृितक निधीही स्थापन जरी करण्यात आला असला तरी तो इतका तोकडा आहे की त्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो किंवा नाट्य संमेलन यांसारखे उपक्रम होऊच शकणार नाहीत.राज्यामध्ये लोकसाहित्य समिती नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे हे तरी सांस्कृतिक मंत्र्यांच्या गावी आहे का?याचे कारण या समितीला ना धड पुरेसा निधी मिळत ना तिच्याकडे धड मनुष्यबळ‌आहे ना कार्यालय.मराठी संस्कृती संवर्धनाबद्दलच्या अशा अनेक गोष्टी सांस्कृतिक खात्याने वाऱ्यावर सोडून दिल्या आहेत.किंबहुना,महाराष्ट्र येत्या १० वर्षांत सांस्कृतिकदृष्ट्या कसा प्रगती करत राहावा,राज्याचे सांस्कृतिक धोरण नेमके कसे असावे याकरिता कोणताही रोडमॅप या सरकारकडे दिसत नाही.बुलेट ट्रेन आणि मेट्रोचे रोडमॅप तयार असतील तर कला-संस्कृतीच्या भविष्यातील वाटचालीचे रोडमॅप का नकोत?हा सवालही इथे बिनतोड आहे. 
खरे तर विनोद तावडे यांनी सांस्कृतिक मंत्री म्हणून एकही काम तडीस नेले नाही,असे कोणाचेच म्हणणे नाही.त्यांनी गडकिल्ल्यांचे जतन,राज्य व बृहन्महाराष्ट्रातील सांस्कृतिक संस्थांना अनुदान,भाषा सल्लागार समिती,मराठी भाषाविषयक धोरण,युनिकोड फाँटची निर्मिती व वापर,दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन याबाबत काही चांगले निर्णय नक्कीच घेतले.पण या निर्णयांची नीट अंमलबजावणी झाली तरच त्याचे नेमके फलित काय हे समजू शकेल.वस्तुत:तावडे यांच्या कारभारात कुठेही सुसूत्रता नसल्याने या फलिताबाबतही जाणकारांच्या मनात साशंकताच आहे. 
नपेक्षा सांस्कृतिक मंत्री म्हणून मोठमोठ्या घोषणा करायची विद्यमान सांस्कृितक मंत्र्यांना सवय आहे.त्यांनी अशीच एक घोषणा घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात केली होती की,साहित्य व नाट्य संमेलनाचे अनुदान दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जमा केले जाईल.ही घोषणा म्हणजे,शब्दांचे बुडबुडेच निघाले.नाट्य संमेलनाचे अनुदान सरकारकडून कधीच वेळेवर मिळत नाही.जे अनुदान आहे,तेही तोकडे आहे.विनोद तावडे यांच्या कारकीर्दीतला अनुभव असा आहे की,नाट्यसंमेलनाचे अनुदान सरकारकडून मिळते,ते संमेलन संपल्यानंतरच.ते अनुदानही सरकार नाट्यसंमेलन आयोजकांच्या हातात देते.‘जीएसटी'मुळे नाटकांचे तिकीट दर वाढले आहेत.प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे.असे असेल तर नाट्य संस्था कशा जगतील?अशा अनेक अडचणी आमच्यासमोर आहेत.त्या वारंवार निदर्शनास आणून दिल्या तरी,त्या सोडवण्यासंदर्भात अनास्था दाखवली जाते,असा जो प्रहार मोहन जोशी यांनी केला,तो योग्यच म्हणायला हवा. 
मराठी नाटक व चित्रपट क्षेत्राचे जसे अनेक प्रश्न लोंबकळत पडले आहेत तसेच राज्यातील साहित्य संस्थांचे प्रश्नही मार्गी लागलेले नाहीत.साहित्य संस्थाच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता.राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या‘साहित्य संस्थांना अनुदाने’या योजनेंतर्गत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.विविध वाङ््मयीन उपक्रमांद्वारे मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाचे कार्य करण्यासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी रुपये पाच लाखाचे अनुदान प्रतिवर्षी प्रत्येकी रु.१० लाखापर्यंत वाढवण्यात आले.याचा लाभ साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत १)अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ,२)विदर्भ साहित्य संघ,नागपूर,३)मराठवाडा साहित्य परिषद,औरंगाबाद,४)महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे,५)मुंबई मराठी साहित्य संघ,मुंबई,६)कोकण मराठी साहित्य परिषद,रत्नागिरी,७)दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा,कोल्हापूर या सात साहित्य संस्थांना मिळणार आहे.ही तरतूद झाली असली तरी ती मुळात अपुरी आहे.याबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाद जोशी यांनी घणाघाती टीका करताना म्हटले आहे की,‘साहित्य संस्थांच्या अनुदानात वाढ केल्याचे सांगण्यात येत असले तरी ही वाढ दहा वर्षांनंतर होत असल्याने ज्या प्रमाणात ती होत आहे,ती अतिशय तुटपुंजीच असून किमान २५ लाख एवढे तरी हे साहाय्य असावे,अशी मागणी होती.एवढ्या तुटपुंज्या वाढीसोबत गेल्या वेळेप्रमाणे या वेळी कोणत्याही नवीन अटी लादल्या जाणार नाहीत,अशी अपेक्षा आहे.एक लाख रुपयांमध्ये वाढ करून दहा वर्षांपूर्वी पाच लाख करताना अनेक अव्यावहारिक अटी लादल्या गेल्या,त्याला महामंडळाने विरोध केला होता.त्यामुळे त्या अटींशिवाय साहाय्य लाभत राहिले,हे लक्षात ठेवायला हवे.हे साहाय्य महामंडळाच्या व संबंधित संस्थांच्या कार्य व उद्दिष्टपूर्तीसाठी दिले जाते.हे कार्य मुळातच फार व्यापक असल्याने कोणत्याही नव्या अटी लादल्या जाऊ नयेत व नियत कार्यच करू दिले जावे,अशी अपेक्षा आहे.तसेच महामंडळाच्या समाविष्ट व संलग्न संस्था यांनादेखील वार्षिक तीन लाख रुपये स्वतंत्र साहाय्याची मागणी करणारा जो ठराव शासनाकडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पाठवला आहे,त्याचाही विचार व्हावा अशीही अपेक्षा आहे.'
हे झाले साहित्य विश्वाबद्दलचे.परंतु,मराठी चित्रपट क्षेत्राच्या समस्यांबद्दल कुणीही बोलायला लागले की विनोद तावडे म्हणतात की,राज्यातील छोट्या गावांमध्ये चित्रपटगृहे उभारली जावीत यासाठी व्हिडिओ पार्लर ॲक्ट(सिनेमॅटोग्राफर ॲक्ट)अटींमध्ये दुरुस्ती केली.पूर्वी फक्त तळमजल्यावरच थिएटर होऊ शकत होते.ते बदलून आता कोणत्याही मजल्यावर थिएटर करण्यास परवानगी दिली.तसेच या थिएटरची आसन क्षमता ७५ पर्यंत मर्यादित होती ती १५० पर्यंत वाढवली.याचा मराठी चित्रपटांना नक्कीच फायदा होईल असे जर वाटत असेल तर तो सांस्कृतिक मंत्र्यांचा भ्रम आहे.याचे कारण मराठी चित्रपटांना पुरेशी चित्रपटगृहे मिळत नाहीत,ती चित्रपटगृह चालकांच्या आडमुठेपणामुळे.त्यांच्यावर राज्य शासनाचा व सांस्कृतिक खात्याचा वचकच नाही.
एकीकडे चित्रपटांना जे अनुदान दिले जाते,त्याचे काही निकष आहेत.त्या निकषांनुसार आपल्याला अनुदान मिळावे,म्हणून अनेक मराठी निर्माते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून सरकारकडे धोशा लावत आहेत.राज्य सरकारने विशिष्ट श्रेणी मिळवलेल्या चित्रपटांनाच अनुदान द्यायचे ठरवले असल्याने ते प्रत्येकालाच मिळणे शक्य नसते.त्यामुळे या संदर्भातील जीआरमध्ये जो अनुदान शब्द आहे,त्याऐवजी विशेष आर्थिक साहाय्य असा शब्द वापरण्यात यावा,असा आग्रह अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने सरकारकडे धरला होता.मात्र,तसा बदल करायलाही सरकार तयार नाही.‘अनुदान’असा शब्द जर वापरायचा असेल तर त्याचा लाभ सर्वच मराठी चित्रपट निर्मात्यांना मिळायला हवा,हे महामंडळाचे म्हणणे योग्यच आहे.पण त्याकडे सांस्कृितक खाते दुर्लक्ष करते आहे.मराठी नाटके जिथेजिथे होतात,त्या नाट्यगृहांची अवस्था गंभीर आहे.कुचंबणा झालेल्या स्थितीत अनेक मराठी कलावंतांना नाट्यप्रयोग करावे लागतात.जीएसटीमुळे नाटकांच्या तिकिटांच्या दरांवर अतिरिक्त बोजा पडला आहे.पण कोणत्याही मागण्या केल्या की,अर्थ खात्याकडे बोट दाखवून गप्प केले जाते.मग त्यापेक्षा सांस्कृतिक खाते बरखास्त केले तर बिघडले कुठे?अर्थ खातेच अनुदानापासून अनेक कामे पाहत जाईल!
पुण्यात साहित्य-चित्रपट महामंडळांनी नोंदवलेल्या आक्षेपांना उत्तर देताना,विनोद तावडे यांनी आपल्या कारकीर्दीत काय काय कामे झाली याची एक जंत्री दिली आहे.त्यात‘सरस्वतीबाई फाळके मराठी फिल्म अर्काइव्हजचे कामकाज सुरू झाले असून यामध्ये जुन्या व दुर्मिळ चित्रपटांचे जतन केले जाईल,असे म्हटले आहे.शिवाय,कोल्हापूर चित्रनगरीच्या कामासाठी भरीव आर्थिक तरतूद व रखडलेली कामे मार्गी लावली.कोल्हापूर चित्रनगरी येथे २५ पेक्षा जास्त चित्रीकरण स्थळे निर्माण केली.चित्रीकरणासाठी राज्यभरातील विविध स्थळांचे लोकेशन कॉम्पेडियम प्रकाशित झाले. राज्यात चित्रीकरण करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून एक खिडकी परवाना पद्धत सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले.मराठी चित्रपट निर्मात्यांच्या सुविधेसाठी पु.ल.देशपांडे अकादमी येथे अद्ययावत असा डी.सी.प्रोजेक्टर बसवण्याची प्रक्रिया सुरू केली.चित्रपट,नाट्य,साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांशी गप्पा साधून त्यांच्या आठवणी,त्यांचे जुने प्रसंग नवीन पिढीला समजावेत व त्याची ओळख व्हावी या दृष्टीने त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.'आदी गोष्टींचा उल्लेख आहे. परंतु,ही कामे महत्त्वाची असली तरीही पुरेशी नाहीत,हेही तितकेच खरे आहे. 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशामध्ये लोककलेचा मोठा सहभाग आहे.दशावतार महोत्सव गेली सहा वर्षे होत नव्हता.तो परत सुरू करून सात दिवसांचा महोत्सव यशस्वीपणे पार पाडला,असा आपल्या कामगिरीचा एक पैलू विनोद तावडे यांनी सांगितला आहे.मात्र लोककला म्हणजे तेवढेच नाही. तीच गोष्ट वृद्ध व गरजू कलाकारांना देण्यात येणाऱ्या पेन्शनची.त्या पेन्शनच्या रकमेत वाढ केली,असे आवर्जून सांगण्यात येते,परंतु ती रक्कम दर महिन्याला त्या कलाकाराला मिळते का याची शहानिशा केली जात नाही.कोणा कलाकाराने चौकशी केली तर सध्या निधीचा तुटवडा आहे,अशी उत्तरे सांस्कृतिक खात्याकडून दिली जातात.
अशी जंत्री काढली तर खूप मोठी होईल.महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत वैचारिक प्रदूषण खूप झाले आहे.जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात योग्य आवाज उठवतात त्यांची वाटेल त्या पद्धतीने मानहानी केली जाते.ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती.हे वातावरण बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारमध्ये या गोष्टींची नीट काळजी वाहण्यासाठी सांस्कृतिक खात्याला स्वतंत्र मंत्री असणे नितांत आवश्यक आहे. 
-समीर परांजपे,paranjapesamir@gmail.com

मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास मांडला जाणार अकरा खंडांतून! - समीर परांजपे. दिव्य मराठी २३ ऑक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २३ आँक्टोबर २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या व मी केलेल्या विशेष बातमीची वेबपेज लिंक व जेपीजी फाइल, मजकूर पुढे दिला आहे.
---
मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास मांडला जाणार अकरा खंडांतून!
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी या प्रकल्पाचे प्रमुख संपादक व डॉ. अजय देशपांडे आहेत संपादक
- कथा, कविता, कादंबरी, ललित वाङ््मय, वैचारिक गद्य, शास्त्रीय लेखन, नाटक व उरलेले साहित्येतर लेखन या वाङ््मय प्रकारांचा आहे समावेश
- समीर परांजपे
मुंबई, दि. 22 ऑक्टोबर - मराठी वाङ््मयाचा इतिहास हा मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा काही भागांपुरताच केंद्रित झाला असून राज्याच्या अन्य भागात लिहिले गेलेले वाङ््मय व लेखक यांच्याबद्दल चिकित्सक अभ्यास होणे ही महत्वाची गरज आहे. परंतु अशा प्रकारचे काम फारसे होत नसल्याने जी एक प्रकारची कोंडी निर्माण झाली होती ती आता विदर्भातील काही वाङ््मय अभ्यासकांनी हाती घेतलेल्या प्रकल्पामुळे फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भातील विविध साहित्य प्रकारांमध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत जे काम झाले आहे त्याची चिकित्सक मांडणी करणारा `मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' हा प्रकल्प आता आकाराला आला असून त्या इतिहासाचे दोन किंवा तीन खंड नजिकच्या काळात प्रकाशित होणार आहेत.
या प्रकल्पाचे प्रमुख संपादक, मराठीतील ज्येष्ठ कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी `दिव्य मराठी'ला यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मराठी वाङ््मयाचा इतिहास हा काही प्रदेशांपुरताच लिहिला गेला आहे. विदर्भामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत विविध प्रकारचे मराठी वाङ््मय लिहिले गेले आहे. मात्र विदर्भातील चार-पाच मोजकी नावे सोडली तर या भागातील इतर साहित्यिकांविषयी महाराष्ट्रात फारसे कोणाला माहित नसते. ही फारशी भुषणावह गोष्ट नाही. ही उणीव दूर करण्यासाठी विदर्भातील वाङ््मयाचा समग्र इतिहास लिहिण्याबद्दलचा एखादा प्रकल्प हाती घ्यावा अशी संकल्पना माझ्या मनात आली. अशा प्रकल्पांसाठी सरकार निधी उपलब्ध करुन देईल अशी आशाच नाही. तसेच ज्या साहित्य संस्थांनी असे प्रकल्प राबवायचे त्या अशा गोष्टींत सहभाग घेताना दिसत नाहीत. त्यामुळे विदर्भातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था विजय प्रकाशनचे संचालक सचिन उपाध्याय यांना ही कल्पना सांगितल्यावर त्यांनी मराठी वाङ््मयाच्या वैदर्भीय इतिहासाचे खंड प्रकाशित करण्याचे ठरविले.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पुढे सांगितले की, प्रकाशकांच्या संमतीनंतर मग मी एक बैठक घेऊन त्यात या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या ३० लेखकांची एक यादी तयार केली. `मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' या प्रकल्पाचा मी प्रमुख संपादक आहे तर वणी येथील प्राध्यापक डॉ. अजय देशपांडे हे संपादक आहेत. विदर्भामध्ये कथा, कविता, कादंबरी, ललित वाङ््मय, वैचारिक गद्य, शास्त्रीय लेखन, नाटक व उरलेले साहित्येतर लेखन अशा अनेक प्रकारांत लेखन झाले आहे. त्या प्रत्येक वाङ््मय प्रकारात िवदर्भामध्ये जे जे लेखन झाले आहे त्याचा साद्यंत इतिहास त्यासंदर्भातील खंडात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा जो वाङ््मयीन इतिहास लिहिला जातो आहे त्यामध्ये स्थानिक पातळीवरील नोंदीचा अभाव असतो. ती उणीव या प्रकल्पात भरुन काढली जाईल. विदर्भातील कविता, कथा, नाटक या तीन वाङ््मय प्रकारांच्या इतिहास लेखनाचे काम मार्गी लागले असून त्यांचे खंड नजिकच्या काळात विजय प्रकाशनतर्फे प्रसिद्घ होतील.`मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' हा एकुण ११ खंडांमध्ये प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. त्यातील प्रत्येक खंड अडीचशे पानांचा असणार आहे असेही डॉ. श्रीपाद जोशी यांनी पुढे सांगितले.
महाराष्ट्रातील विविध भागांत वाङ््मय इतिहास लेखन प्रकल्प सुरु करण्यास मिळेल प्रेरणा
`मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' हा प्रकल्प येत्या तीन ते चार वर्षांत पुर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे असे सांगून डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी पुढे म्हणाले की, हे खंड प्रसिद्ध झाले की, अशा प्रकारच्या प्रकल्पाचे एक रोल मॉडेल तयार होईल. `मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' या प्रकल्पातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागांमधेही तेथील मराठी वाङ््मय प्रकारांच्या इतिहासाच्या लेखनाचे प्रकल्प हाती घेण्यासाठी संशोधकांना प्रेरणा मिळेल.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग तयार होणार - - ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २४ ऑक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २४ आॅक्टोबर २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली बातमी. या बातमीची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मजकूर पुढे देत आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/24102017/0/5/
----
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग तयार होणार 
- ‘मुंबई पुणे मुंबई – ३’मध्ये झळकणार स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे 
- २७ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार - दिग्दर्शक सतीश राजवाडेंची घोषणा
मुंबई, दि. २३ ऑक्टोबर (विशेष प्रतिनिधी) - पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ने महाराष्ट्रासह इतर राज्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश तर मिळविलेच पण प्रेक्षकांनाही वेड लावले. त्या चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई -२ : लग्नाला यायचंच’ नावाने आला आणि त्याच यशाची पुनरुक्ती झाली. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचा तिसरा भागही आणण्याचे जाहीर केले आहे. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘मुंबई पुणे मुंबई–३’ चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही केली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये एखाद्या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होण्याची हि पहिलीच वेळ आहे.
२ वर्षांपूर्वी दिवाळीच्याच मुहूर्तावर १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-२ : लग्नाला यायचंच’चे मोठ्या धुमधडाक्यात सिनेमा रसिकांकडून स्वागत झाले. चित्रपटाला महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिकेतूनही प्रचंड प्रतिसाद लाभला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलाच व्यवसाय केला होता. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को, ह्युस्टन ,लॉस एन्जेलिस, डेट्रोईट, सॉल्ट लेक सिटी या शहरांमध्ये पण या चित्रपटाचे खेळ झाले होते.
या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या भागाच्या निमित्ताने बोलताना सतीश राजवाडे म्हणाले, मुंबई पुणे मुंबई भाग पहिला करताना हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना इतका आवडेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती, मराठी‘मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने लव स्टोरीचा एक मोठा व नवा प्रवाह मराठी चित्रपटसृष्टीत आणला. मुंबई पुणे मुंबईमधील गौतम आणि गौरीच्या जीवनामध्ये आता पुढे काय घडते आहे ह्याची उत्सुकता रसिकांना लागली आहे कारण प्रत्येक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या गोष्टी ही आपली स्वत:ची गोष्ट वाटते.
“मूळ चित्रपट करताना त्याचा सिक्वेल येईल असे काही वाटले नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई -2: लग्नाला यायचंच’ हा सिक्वेल करत असताना मात्र आम्ही चित्रपटाचा तिसरा भागही बनवू शकतो हे मात्र जाणवले होते. तिसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, पण पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिसरा भागही प्रेक्षकांना आवडेल याची आम्ही हमी देऊ शकतो.” असेही दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी पुढे सांगितले.
पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपपाटाचे अनेक भारतीय भाषांमध्ये ‘रिमेक’ झाले तर जगभरच्या प्रेक्षकांना हा चित्रपट आपला वाटला. चित्रपटाचा पुढील भाग बनावा, अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीला पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता रसिकांना होती. रसिकांनी त्यांची पसंती ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई –२’च्या तिकीट खिडकीवरील गर्दीतून आधीच व्यक्त केली होती.

ताजमहालवरुन रणकंदन हे आठवे आश्चर्यच! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. २४ आँक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २४ आँक्टोबर २०१७च्या अंकात ताजमहालवरुन उठलेल्या वादंगाविषयी मी लेख लिहिला आहे. त्या लेखाची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मजकूर पुढे देत आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/241/24102017/0/10/
----
ताजमहालवरुन रणकंदन हे आठवे आश्चर्यच!
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
आग्रा येथील ताजमहालचा जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश होतो. पण त्यानंतर एक आठवे आश्चर्यही घडले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विराजमान होऊन सहा महिनेही पूर्ण झाले नाहीत, तितक्यातच या राज्याच्या पर्यटन विभागाच्या माहितीपुस्तकातून ताजमहाल वगळण्यात आला. गेल्या ऑक्टोबरमधील ही घटना आहे. तेव्हापासून ताजमहाल हा जो काही वादाचा विषय बनला आहे, तसा ताजमहाल बांधणाऱ्या शहाजहान बादशहाच्या काळातही कदाचित वादग्रस्त बनला नसेल. असे होण्याला एक पार्श्वभूमीही आहे. गेल्या जूनमध्ये योगी आदित्यनाथ वदते झाले, `ताजमहाल हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक नाही.' आता आपले मुख्यमंत्रीच जर असे म्हणू लागले तर त्यांच्या हाताखालचे उत्तर प्रदेशी नोकरशहा त्यांचेच ऐकणार की नाही? त्यांनी वगळून टाकले ताजमहालला माहितीपुस्तकातून. योगी व नोकरशहांना वाटले चला, जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य तर गायब केले! पण त्यांचे प्रयत्न वृथा ठरले. ताजमहाल सगळ्यांना पुरुन उरला. अगदी दशांगुळे उरला. तेव्हापासून दर चार पाच दिवसांनी कोणी ना कोणी ताजमहालविषयी एक तर भारतीय संस्कृतीच्या बाजूने(?) किंवा भारतीय संस्कृतीच्या विरोधात (?) वक्तव्ये करीत आहे. उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाच्या माहितीपुस्तिकेतून जसे ताजमहालला हटविले तसे भाजपचे उत्तर प्रदेशातील एक आमदार संगीत सोम यांनी एक विधान केले आहे. `ताज महालच्या बनविणाऱ्याने उत्तर प्रदेश आणि भारतातील हिंदूंचे उच्चाटन करण्याचेच काम केले. तो एक देशद्रोही होता. त्यामुळे ही वास्तू देशाला लागलेला एक कलंक आहे.' भाजपाचे एक वरिष्ठ नेते विनय कटियार यांनी तर `ताजमहालच्या आधी तिथे तेजोमहाल हे शंकराचे मंदिर होते. त्याचे शहाजहानने मकबऱ्यात रुपांतर केले. असे असले तरी ते पाडून टाकण्याची गरज नाही. कारण जगातील सात आश्चर्यांपैकी ते एक आहे.' 
वास्तूलाही मन असते असे म्हणतात. त्यामुळे आपल्यावरुन एवढे वादंग का माजत आहेत याचे कदाचित ताजमहाल या वास्तूलाही आश्चर्य वाटले नसेल. कारण ही सगळी विधाने देशात जातीय वातावरण निर्माण करण्यासाठीच सुरु आहेत याची त्या ऐतिहासिक वास्तूलाही जाण असावी. ताजमहालशी संबंधित पर्यटनखात्याच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या २६ ऑक्टोबरला आग्रा येथे दौरा करणार आहेत. ताजमहालवरुन उत्तर प्रदेश व देशातील वातावरण भाजपच्या लोकांकडून मुद्दामहून तापले व तापविले जात आहे याचे भान नसण्याइतपत आदित्यनाथ दुधखुळे नक्कीच नाही. ही आग लागल्यानंतर ते ती विझवायला बंब घेऊन आले. ताजमहालवरुन चाललेल्या वादाविषयी इतके दिवस धारण केलेले मौन सोडून योगीराज बोलते झाले ` ताजमहाल हा भारतीय मजूरांनी आपला घाम गाळून बांधला आहे. ताजमहाल हा अतिशय महत्वाचा आहे, विशेषत: पर्यटनाच्या अंगाने त्याला खासे महत्व आहे. त्यामुळे ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा मिळाव्या, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी यासाठी आमचे सरकार नक्कीच योग्य पावले उचलेल.' आदित्यनाथांचे हे विधान चलाखीचे आहे. ताजमहाल हा शहाजहान या मुस्लिम बादशहाने बांधला त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या ती वास्तू हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने किती महत्वाची आहे किंवा नाही याविषयी आदित्यनाथांनी बोलायचे टाळले. त्याचबरोबर ताजमहालमुळे मोठा महसुल मिळत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने त्यांना ही वास्तू टाळता येणेही अशक्य आहे. त्यामुळे पर्यटनासाठीच ताजमहाल चांगला असा कळत पण नकळत भाव आणत त्यांनी सूर लावला. मुळात आदित्यनाथ, विनय कटियार किंवा संगीत सोम यांच्या कोणत्याही फटकळ आणि फुटकळ विधानांनी ताजमहालचे ऐतिहासिक महत्व किंचितही कमी होणार नाही. ताजमहाल बांधताना जी सौंदर्यदृष्टी त्या कारागिरांनी ठेवली होती, त्यातील एक सहस्त्रांशही नजर या भगव्या लोकांकडे नाही. त्यांना प्रत्येक ठिकाणी धर्माशिवाय दुसरे काही दिसत नाही. अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवरील वादग्रस्त बाबरी मशिद ज्यांनी पाडली, ते कोण आहेत ते सर्वांनाच माहित आहे. त्या धर्तीवर अजून काही प्रयोग होऊ शकतात का याची आसूरी भूक असुरांना लागलेली असते. ताजमहाल वाद जेव्हा सुरु झाला त्यावेळी ती एक मुस्लिम वास्तू आहे असे तिच्याकडे पाहाणाऱ्यांची तुलना फक्त तालिबानी प्रवृत्तींशीच होऊ शकते. 
आपल्या खोटारड्या युक्तिवादांसाठी इतिहास खोटा करुन सांगणाऱ्यांना ऐतिहासिक दाखला देऊनच त्यांचे कान उपटले पाहिजेत. अफगाणिस्तानातील हझरत भागातील बमियान येथे चवथ्या व पाचव्या शतकात डोंगरामध्ये गौतम बुद्धाची भव्य पूर्णाकृती शिल्पे कोरण्यात आली होती. गांधार शैलीतील ही शिल्पे होती. २००१ साली धर्मांध व नादान तालिबान्यांनी आपला नेता मुल्ला मोहम्मद ओमर याच्या आदेशानूसार बमियानमधील बुद्धाच्या या भव्य मूर्ती सुरुंग लावून तसेच तोफांचे बार उडवून उद्ध्वस्त केल्या. बुतशिकन प्रवृत्ती ती हिच. त्यामुळे या मूर्तींचे बरेच नुकसान झाले. त्या मूर्तींचे पुन्हा नीट जतन करण्यासाठी आता युनेस्कोने कंबर कसली आहे. या सगळ्या जतनीकरणाला जपान, स्वित्झर्लंड या देशांनीही सहाय्य केले आहे. आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) म्हणजे दुसऱ्या शब्दांत भारतीय केंद्रीय पुरातत्व खाते. हा विभाग ब्रिटिश राजवटीत लॉर्ड कनिंग याने ब्राह्मी लिपिचा जाणकार अलेक्झांडर कनिंगहॅमच्या याच्या सहकार्याने स्थापन केला. भारतातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संरक्षण व्हावे यासाठी हा विभाग सुरु करण्यात आला. साम्राज्यवादी गोऱ्या साहेबाला भारतातील वास्तू उद्ध्वस्त झाल्या असत्या तरी काय फरक पडणार होता? पण तरीही त्यांनी सांस्कृतिक नजर दाखवली बाबा! तर अशा या एएसआयने १९६९ व १९७७ साली बमियानमधील बुद्धमूर्तींच्या जतन व संरक्षणासाठी अफगाणिस्तानला खास मदत केली होती. त्याचे भरपूर तपशील उपलब्ध आहेत. ती बौद्धधर्माची शिल्पे होती म्हणून एएसआयने हे पाऊल उचलले होते का? तर असे काही नव्हते. कोणत्याही धर्माच्या, संस्कृतीच्या भारत व भारताबाहेरील ऐतिहासिक वास्तूंचे नीट जतन व संरक्षण व्हायला पाहिजे ही एएसआयची या विभागाच्या स्थापनेपासूनची भूमिका आहे. आग्रा येथील ताजमहालचे जतन व संरक्षण याची जबाबदारी एएसआयवरच आहे. `ताजमहाल हा मुघल बादशहा अकबराचा नातू शहाजहानने आपली राणी अारजूमंद बानो बेगम (मुमताज महल) हिच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला' असा स्पष्ट उल्लेख आर्किआॅलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत व या िवभागाच्या वेबसाइटवरही आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने ताजमहालला आपल्या माहितीपुस्तिकेत ठेवो किंवा वगळो त्याने काहीही फरक पडत नाही. ताजमहालच्या मुळ परिसरामध्ये उत्तर प्रदेश सरकारला काहीही ढवळाढवळ करता येणार नाही, कोणतेही अनाठायी बांधकाम करण्याचा अधिकारच नाही. ही जाणीव उत्तर प्रदेश सरकारला असल्यानेच ताजमहालच्या पर्यटनाविषयीच्या योजनांच्या आढाव्याबद्दलच योगी आदित्यनाथ बोलत आहेत. वास्तूबद्दल बोलायचे टाळत आहेत. पण हे भाजप नेत्यांना नीट कळते पण त्यांना फक्त ताजमहालवरुन वातावरण तापवायचे आहे. 
ताजमहाल नव्हे तेजोमहालय असे एक अर्ध्याकच्च्या इतिहासाचे पुस्तक कथित इतिहास संशोधक पु. ना. ओक यांनी चा‌ळीस वर्षांपूर्वी लिहिले. त्यांनी ताजमहालच्या इतिहासाचे पुर्नलेखन केले जावे अशी मागणी करणारी २००० साली केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. पु. ना. ओक यांचा ताजमहालवरील पुस्तकाचा आधार घेऊन ताजमहालाचे तेजोमहाल असे नामकरण करा अशी याचिका २०१५ साली आग्रा जिल्हा न्यायालयामध्ये सहा वकिलांनी संयुक्त याचिकेद्वारे केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली. थोडक्यात काय तर न्यायसंस्थेनेही तेजोमहालवाल्यांना कधीही उभे केले नाही. ताजमहाल मंदिर नव्हे, तर समाधीस्थळ आहे हे एएसआयने न्यायालयात सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रातही म्हटले आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नोव्हेंबर २०१५ मध्ये लोकसभेत हे स्पष्ट केलं होतं की ताजमहालाच्या जागी मंदिर असण्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. या इतक्या गोष्टी होऊनही ताजमहालवरुन भाजप नेत्यांना देशभर रान पेटवायचे असेल तर त्यांना रोखले पाहिजे. इतिहासाला वेठीला धरुन इतिहास घडत नसतो हे या संस्कृतीरक्षकांना जेवढे लवकर कळेल तितके चांगले

कवितेतून गाण्याकडे : लोभस शब्दसांगावा - समीर परांजपे -- ना. धों. महानोर यांच्या पुस्तकाचा परिचय...दै. दिव्य मराठी २४ ऑक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. 24 आँक्टोबर 2017च्या अंकात मधुरिमा या पुरवणीमध्ये मी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितेतून गाण्याकडे या पुस्तकाचे परीक्षण लिहिले आहे. त्या लेखाची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मजकूर पुढे देत आहे.

http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/24102017/0/5/
----
कवितेतून गाण्याकडे : लोभस शब्दसांगावा...
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
चित्रपटांसाठी गीते लिहिणारे हे मुळात प्रतिभावंत कवी असतात. त्यामुळेच त्यांना चित्रपटातील कथानकासाठी अनुकूल अशी उत्तमोत्तम गाणी लिहिता येतात. ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबूडकर, सुधीर मोघे हे त्या प्रभावळीतील काही तेजस्वी तारे. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली अनेकानेक गाणी ही आजही लक्षावधी रसिकांच्या मनात आजही लखलखत आहेत. मात्र अशा प्रतिभावंत गीतकारांच्या कामगिरीची मराठी समीक्षकांनी म्हणावी तशी दखल कधी घेतलीच नाही. गीतकार हे प्रतिभावंत कवी कसे आहेत याबद्दल मराठीत उल्लेखनीय अशी समीक्षा कधीही लिहिली गेली नाही. कवि हा श्रेष्ठ व गीतकार हा काहीसा दुय्यम असाच मराठी समीक्षकांचा नेहमी पवित्रा राहिला आहे. ही सल अनेक साहित्यरसिकांच्या मनात आहे. मात्र या भेदभावापलीकडे स्वत:च्या कवितेने जाऊन पोहोचलेले अजून एक महत्वाचे नाव म्हणजे निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे. जैत रे जैत या चित्रपटापासून महानोर यांनी चित्रपटगीते लिहायला सुरुवात केली. महानोर यांनी जैत रे जैत, सर्जा, दोघी, मुक्ता, अबोली, उरुस, एक होता विदुषक, अजिंठा, मालक, यशवंतराव चव्हाण अशा दहा मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. त्याचबरोबर चित्रपटबाह्य गाणीही लिहिली जी विविध ध्वनिमुद्रिका व सीडींमध्ये समाविष्ट आहेत. ना. धों. महानोर यांचा हा जो कवितेतून गाण्याकडे प्रवास झाला त्याबद्दल रसिकांना खूप कुतुहल होते. विविध साहित्यविषयक कार्यक्रमांत, काव्यवाचनप्रसंगी त्यांना रसिक या गाण्यांच्या निर्मितीबद्दल प्रश्न विचारायचे. त्या गाण्यांची निर्मिती कशी झाली याबद्दल त्या त्या वेळी महानोर विवेचनही करायचे. पण हे सारे विवेचन अक्षरबद्ध तसेच ग्रंथबद्ध होणे आवश्यक होते. ते कार्य आता पूर्ण झाले असून त्यातूनच ना. धों. महानोर यांचे काव्यातून गाण्याकडे हे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पॉप्युलर प्रकाशनने ते पुस्तक प्रसिद्ध केले आहे.
या पुस्तकाच्या मनोगतात ना. धों. महानोर यांनी आपल्या गीतलेखनाचे सारतत्व सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे `मी माझे काव्य निसर्ग प्रतिमांतून व नव्या निर्माण केलेल्या शब्दांमधून उभे केले. कविता काहीच सांगत नाही, सूचित करते. संपूर्ण कविता प्रतिमा होऊन लिहिलेल्या प्रीतीच्या व दु:खाच्याही कविता मी माझ्या परीने लिहिल्या. मराठी रसिकांनी त्यासाठी मला भरभरुन दिले. अनेक गायक, गायिका- संगीत दिग्दर्शक यांनी त्या कवितेला आणखी वेगळ्या जगात नेऊन ठेवले. कविता व गीत यात मी कधीच फरक न ठेवता एकसंध लिहिले. हा भेद कोणी केला मला ठाऊक नाही. चित्रपट गीतांमध्ये व इतर ध्वनिमुद्रिकांमध्येही मुक्त कविता, लयबद्ध कविता, गाणी आहेत. त्यासंबंधी रसिकांमध्ये कुतुहल असते. त्याची माझी म्हणून निर्मितीप्रक्रिया व पद्धती याविषयी आणि त्या अनुषंगाने मी लिहावे असा रसिकांचा आग्रह म्हणून मी कवितेतून गीताकडे हे पुस्तक लिहिले.'
कवितेतून गीताकडे या पुस्तकाचे पहिले प्रकरण आहे ते `आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले' हे. १९४२ साली महानोर यांच्या जन्माच्या काळात पळसखेड हे दोनशे-तीनशे उंबऱ्यांचे गाव होते. या खेड्याचा श्वास प्राण होता गाणं. लोकगीत, लोकसंगीत, लोकनृत्य आणि लोकसंस्कृतीची पांघर अंगावर घेऊन जगण्याचा. चांगला हंगाम, दुष्काळ, संकट, सणउत्सव, देवधर्म, भजन-कीर्तन, ओवी, झोपाळा, लोकनृत्य यांत एकजीव होऊन छान जगणाराहा खेड्यांतील शेतकरी समाज. या सगळ्या गोष्टींचे संस्कार ना. धों. महानोर यांच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. हे मातीतले सारे संस्कार पुढे ना. धों. महानोर यांच्या कवितेतून उमटले. या माहोलवर त्यांनी लिहिलेल्या पहिल्या प्रकरणात त्यांच्या काव्यप्रवासाचे मुलस्थान काय होते याची सविस्तर माहिती रसिकांना मिळते. महानोर यांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांनी कविता व गीत यांच्यातील फरकच संपवून टाकला. 
महानोर यांनी ज्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली त्या प्रत्येक चित्रपटातील दोन गाणी त्यांनी त्या चित्रपटाबद्दल लिहिलेल्या प्रकरणात दिली आहे. या गाण्यांच्या अनुषंगाने त्यांच्या लेखनामागची प्रक्रिया व अनुभव कथन केले आहेत. जैत रे जैत चित्रपटाविषयी लिहिलेल्या प्रकरणात त्यांनी `हिरव्या पानात हिरव्या पानांत चावळ चावळ चालते...', नभं उतरु आलं ही दोन गाणी आवर्जून दिली अाहेत. जैत रे जैत चित्रपटासाठी मंगेशकरांनी जेव्हा महानोरांना गाणी लिहायला बोलावले तेव्हा महानोरांना त्याचे खूप आश्चर्य वाटले होते. त्यावेळी त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या रानातल्या कविता, वही या दोन कवितासंग्रहात एकुण शंभर कविता होत्या. ते नवकवी होते. कधीही चित्रपटासाठी एकही कविता-गीत त्यांनी तेव्हा लिहिलेले नव्हते. ही सारी पार्श्वभूमी घेऊन ते १९ मार्च १९७७ रोजी गुढीपाडव्याला लतादिदी मंगेशकर यांच्या मुंबईतील प्रभूकुंज या निवासस्थानी जैत रे जैत संदर्भातील बैठकीला हजर झाले. चित्रपटाच्या विविध अंगांविषयी बैठकीत चर्चा होत होती. गाण्यांच्या जागाही ठरत होत्या. अशाच एका गाण्यासाठी चर्चा झाली. महानोर प्रभुकुंज निवासस्थानातील एका लहानशा खोलीत एकटेच जाऊन बसले. ते त्या गीताच्या बांधणीत व्यग्र झाले होते. खिशातील मजुरी वाटण्याची लहान डायरी होती. त्यावरच ते लिहिते झाले...
मी रात टाकली
मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची, बाई लाज टाकली
ह्या पंखांवरती
मी नभ पांघरती
या ओळी लिहून ते पुन्हा बैठकीत सामील झाले. सग‌ळ्यांच्या आग्रहावरुन आपल्या गावरान पद्धतीने त्यांनी स्वच्छ शब्द व लयीत हे गीत तिथे गाऊन दाखविले. संबंध प्रभुकुंज टाळ्यांनी दुमदुमला. हे गाणे तिथेच संमत झाले. अशा रितीने निसर्गकवि ना. धों. महानोर हे आता गीतकाराच्या भूमिकेत शिरले होते. जैत रे जैतमध्ये मोठी दहा गाणी व एक दीड मिनिटे अवधीची सात साँगलेट्स होती. ती सारी महानोर यांनी लिहिली. जैत रे जैत चित्रपट त्यातील गाणी व दिग्दर्शन या दोन्ही गोष्टींनी गाजला. 
कवितेतून गाण्याकडे वळल्यानंतर महानोरांनी दहा चित्रपटांसाठी गीतलेखन केले. `सर्जा' चित्रपटातील `चिंब पावसानं रान झालं आबादानी', मी काट्यातून चालून थकले ही गीते, `दोघी' चित्रपटातील `भुई भेगाळली खोल ओल राहिली ना कुठं', `इथे आलो होतो मागाया जोगवा', `मुक्ता' चित्रपटातील `त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे', `वळणवाटातल्या झाडीत हिर्वे छंद', `अबोली' चित्रपटातील `तुझ्या वाटेला ओले डोळे सुकून गेले पाणमळे', `निळ्या ग डोळ्यांच्या स्वप्नात चांदणं' अशा अनेक गाण्यांनी ना. धों. महानोर यांनी रसिकांच्या आयुष्यात शब्दचांदण्यांचा प्रकाश दिला. 
त्याशिवाय माझ्या आजोळची गाणी, दूरच्या रानात, माझी मुलगी, गाथा शिवरायाची, पालखीचे अभंग, गगनाला पंख नवे, फिटे अंधाराचे जाळे, नाव माझं शामी, गंध मातीचा, जरा अस्मान झुकले, शेवंतीचं बन या चित्रपटबाह्य ध्वनिमुद्रणांमध्ये महानोर यांनी लिहिलेली गीतेही तितकीच भावस्पर्शी झाली आहेत. त्यांचाही प्रवासही या पुस्तकात चित्रपटाबाहेरची गाणी या स्वतंत्र विभागात एकेका प्रकरणाद्वारे महानोर यांनी मांडला आहे. कविता व गीत यांतील भेद संपविणाऱ्या कवीचा हा `कवितेतून गाण्याकडे' हा लोभस शब्दसांगावा रसिकांनी आवर्जून वाचला पाहिजे.
--
पुस्तकाचे नाव - कवितेतून गाण्याकडे
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
किंमत - २५० रुपये
पृष्ठसंख्या - १४८
---