Thursday, March 13, 2014

शंभर वर्षांपूर्वीची फॅन्सी फेअर (दै. दिव्य मराठी - मधुरिमा पुरवणी - २८ सप्टेंबर २०१२ )



 शंभर वर्षांपूर्वीची फॅन्सी फेअर या लेखाचा मुळ भाग.




 शंभर वर्षांपूर्वीची फॅन्सी फेअर या लेखाचा उर्वरित भाग.





महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी २६ सप्टेंबर १९१२ रोजी फॅन्सी फेअरचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते. या फॅन्सी फेअरच्या मुख्य प्रेरणास्रोत होत्या अर्थातच रमाबाई रानडे व त्यांची सेवासदन संस्था...या फॅन्सी फेअरला २६ सप्टेंबर २०१२ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मी दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा या महिला विषयक पुरवणीत २८ सप्टेंबर २०१२ रोजी मुख्य लेख लिहिला होता. त्या लेखाचा मुळ भाग व उर्वरित मजकूराच्या दोन जेपीजी फाईल्स वर दिल्या आहेत.
--------

शंभर वर्षांपूर्वीची फॅन्सी फेअर
--------

- समीर परांजपे
------

स्वत:नी (न्या. महादेव गोविंद रानडे) मला शिकून सवरून शहाणे होण्याचे व जमल्यास काही बायकांनाही तसे करून उद्योगशील करण्याचा मंत्र दिला आहे,’ असेउंच माझा झोकाया सध्या गाजणाऱया मालिकेतील रमा तिची नणंद असलेल्या आक्काबाइभना विनम्रतेने सांगते. रमाने अगदी सहजतेने काढलेले हे उद्गार आपल्याही मनावर ठसतात ते तिच्या निर्धारामुळे. न्या. रानडे यांनी दिलेला सामाजिक कार्याचा वसा त्यांच्या निधनानंतरही रमाबाई रानडे यांनी तितक्याच समर्थपणे पुढे नेला. ‘सेवा सदनसारखी संस्था स्थापन करून महिलांच्या उत्कर्षासाठी हिमालयाएवढे काम केले. महिलांनी स्वत:चा उत्कर्ष साधण्यासाठी उपक्रमशील झाले पाहिजे, उद्योग-व्यवसायाची कास धरून स्वत:ला आर्थिकदृष्टय़ा सबल केले पाहिजे, असा रमाबाई रानडे यांचा विचार होता. त्यातूनच महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी फॅन्सी फेअरचे (म्हणजे आजच्या काळातील ग्राहकपेठ) पुण्यामध्ये २६ सप्टेंबर १९१२ पासून सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले. या फॅन्सी फेअरच्या मुख्य प्रेरणास्रोत होत्या अर्थातच रमाबाई रानडे व त्यांची सेवा सदन संस्था.
महिलांच्या कलाकौशल्याच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन हा काही रमाबाई रानडे यांच्यासाठी नवा उपक्रम नव्हता. १८९३मध्ये ऑगस्टमध्ये पुण्यात साहित्यिक हरी नारायण आपटे यांच्या आवाहनामुळे महिलांच्या शिवणकाम, विणकाम व कशिदा यांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. त्यात गुणवत्तेनुसार बक्षिसेही ठेवलेली होती. त्या वेळी परीक्षकांमध्ये रमाबाई रानडे प्रमुख होत्या. १८८५च्या डिसेंबर महिन्यात पुण्यात राष्ट्रीय सभा (काँग्रेस) आणि सामाजिक परिषद अशा दोन्ही अधिवेशनात महिलांच्या कलाकौशल्याच्या वस्तूंचे मोठे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यातील वस्तूंची सुंदर मांडणी करण्यात आणि व्यवस्थापनात रमाबाइभचा महत्त्वाचा सहभाग होता. या दोन्ही प्रदर्शनांत परीक्षक महिलांनी स्वत: तयार केलेल्या वस्तूंचाही समावेश होता.
पुण्याच्या सेवा सदनाच्या सभासद आणि परिचित महिलांमध्ये कलाकौशल्यात गती असणाऱया ज्या महिला होत्या त्यांना सुती, रेशमी, लोकरीचे कपडे, जर, कलावस्तू, निरनिराळ्या रंगांचा रेशमी दोरा वगैरे वस्तू देऊन नवीन कल्पना व नमुने शिकवून रमाबाई रानडे यांनी फॅन्सी फेअरसाठी सुबक वस्तू तयार करून घेतल्या. या वेळेपर्यंत पुणे सेवासदनाने १९०९पासून सुरू केलेल्या औद्योगिक शिक्षणवर्गाची प्रगती होऊन त्यातील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या जिनसांपैकी काही जिनसा आफ्रिकेत भरलेल्या हिंदी महिलांच्या कलाकृती प्रदर्शनात आणि १९११मध्ये इंग्लंडच्या बादशहाच्या भारतात झालेल्या आगमनप्रसंगी मुंबईत भरवण्यात आलेल्याओल्ड बॉम्बे एक्झिबिशनमध्येही पाठवण्यात आल्या होत्या. सेवासदनाची फॅन्सी फेअर हा त्याच्या पुढचा टप्पा होता.
श्रीमती रमाबाई रानडे : व्यक्ती आणि कार्य या माधव श्रीनिवास विद्वांस यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये या फॅन्सी फेअरचा सविस्तर रोचक वृत्तांत दिलेला आहे.
पुण्यातील गणेशखिंडी रोडवर बी.एस. कामत यांच्या नवीन प्रशस्त बंगल्यात आणि त्याभोवतालच्या विस्तृत प्रेक्षणीय बागेत या फॅन्सी फेअरचे आयोजन केलेले होते. बंगला व सभोवतालच्या बागेत चोहीकडे पताका, निशाणे, चायनीज लँटर्न लावलेले होते. निरनिराळ्या करमणुकीच्या कामांसाठी उभारलेल्या ऐटदार तंबूंमुळे परिसर मोठा गजबजलेला व रंगीबेरंगी दिसत होता.
२६ सप्टेंबर १९१२ रोजी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर जॉर्ज क्लार्क यांच्या पत्नी लेडी क्लार्क यांच्या हस्ते या फॅन्सी फेअरचे संध्याकाळी साडेचार वाजता थाटात उद्घाटन झाले. कामत यांच्या बंगल्याच्या मुख्य दिवाणखान्यात आणि खोल्यांत मिळून फॅन्सी फेअरमध्ये विक्रीच्या सामानाचे एकूण १५ स्टॉल होते. त्यापैकी दिवाणखान्यात सात व बंगल्याचा तळमजला व पहिल्या मजल्यावर बाकीचे स्टॉल होते. स्त्रियांनी केलेले शिवणाचे, कशिद्याचे, लोकरीचे, रेशमाचे, जरीकलाबतूचे, जाळीचे, विणकामाचे, काचेचे, कागदाचे, कातडय़ाचे, रांगोळीचे सुंदर नमुने होते. त्यातील बऱयाच वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. फॅन्सी फेअरच्या स्टॉलमध्ये चैत्रातील गौरीची आरास आणि सुधारलेल्या व जुन्या पद्धतीच्या संसाराचे देखावे लावलेले होते. फॅन्सी फेअरला येणाऱया लोकांना स्टॉलमधील वस्तू विकत घेण्यासाठी सेवा सदनाच्या स्वयंसेविका उत्तेजन देत होत्या. या स्टॉलमध्ये इंग्रजी पद्धतीच्या फराळाचेही दुकान फॅन्सी फेअरच्या पहिल्या दिवसापुरतेच लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे हिंदू पद्धतीच्या फराळाचे दुकानही फेअरच्या तीनही दिवस होते. या फॅन्सी फेअरसाठी फिरते चक्र आदी करमणुकीची साधने उपलब्ध होती. पंतसचिव यांच्याकडून एक हत्ती व लष्कर खात्याकडून दोन उंट मिळाले होते. पहिल्या दिवशी मिलिटरी बँड मिळाला होता. जत्रा सुशोभित करण्यासाठी पुण्यातील व्यापाऱयांनी आपल्या दुकानांतील टेबले, कोच, खुर्च्या, पेले-भांडी आदी सामान भाडे न घेता दिले होते. फॅन्सी फेअरच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर प्रेक्षक स्त्राeपुरुषांचा घोळका प्रदर्शन पाहण्यासाठी आणि वस्तूंच्या खरेदीसाठी कामत बंगल्यात गेला.
या फॅन्सी फेअरचा दुसरा दिवस फक्त स्त्रियांकरिता होता. त्या दिवशी पुण्यातील आठशे-नऊशे महिलांनी या फेअरमध्ये हजेरी लावली. कार्यक्रमाचे ठिकाण मुख्य गावापासून तसे लांब होते, वाहतुकीच्या सोयीही फार नव्हत्या, त्यातच महिलांनी सार्वजनिक कार्यक्रमांत हजर राहण्याबद्दल त्या वेळच्या पुराणमतवादी लोकांचा असलेला विरोध हे सगळे अडथळे पार पाडून महिलांनी इतक्या मोठय़ा संख्येने फॅन्सी फेअरला येणे हे एक नवलच होते. या दिवशी फॅन्सी फेअरच्या स्टॉलवर पाचशे-सहाशे रुपयांची विक्री झाली. फॅन्सी फेअरच्या तिसऱया दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर १९१२ रोजी फॅन्सी फेअरमध्ये सर्वांकरिता प्रवेश खुला होता. त्या दिवशी एकूण सहाशे-सातशे मंडळी आली असावीत. त्यात कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा विशेष भरणा होता. या दिवशी स्टॉलवरील वस्तूंची सुमारे दोनशे-अडीचशे रुपयांची विक्री झाली. भोंडे यांच्या नकलांनी त्या दिवशी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सेवा सदनमधील स्वयंसेविका व रमाबाई रानडे यांनी आयोजित केलेली फॅन्सी फेअर इतकी यशस्वी ठरल्याने पित्त खवळलेल्या एका सनातन्याने सेवा सदनाचा एक हितचिंतक या टोपणनावानेकेसरीवृत्तपत्राच्याऑक्टोबर १९१२च्या अंकातसेवा सदनाचा मीनाबाझारया शीर्षकाचे निंदानालस्ती करणारे पत्र लिहिले. त्या पत्रालाज्ञानप्रकाशच्या लगेचच्या अंकात गांगेयी या टोपणनावाने फॅन्सी फेअर समर्थकाने सणसणीत उत्तर दिले. पुणे सेवा सदनाला फॅन्सी फेअरमुळे ३,५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले. फॅन्सी फेअरमुळे मोठय़ा जनसमुदायाला सेवा सदनाची माहिती मिळाली. संसारी महिलांनी स्त्रीशिक्षण व स्त्रीउन्नती या कार्याला द्रव्यसाहाय्य मिळवून देण्याच्या सार्वजनिक कार्यासाठी जनसमुदायासमोर येणे ही प्रथा फॅन्सी फेअरने प्रस्थापित केली.
शंभर वर्षांपूर्वी पुण्यात झालेली फॅन्सी फेअर व आता होणाऱया ग्राहक पेठा यांच्यातील वातावरणात काही ठळक सनातनी तपशील वगळले तर फारसा फरक झालेला नाही असे आढळून येईल. ग्राहक पेठांतून महिला उद्योजकांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग नक्कीच सापडतो. पण महिलांचा सर्वांगीण विकास हा जो अशा कार्यक्रमांचा उद्देश असायला हवा, तो सध्या काहीसा बाजूला पडलेला दिसतो.

sameer.p@dainikbhaskargroup.com

No comments:

Post a Comment